Skip to main content

दोन प्रेमकविता

अर्थातच याही कविता पूर्वप्रकाशित आहेत.

दोन निरनिराळ्या मूड्समधल्या या कविता. संबंध म्हटला तर नाही, म्हटला तर आहे.

***

तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा

'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असावं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

नजरेतली उनाड फुलपा़खरी मिश्किली सहज वाचत जाणारा मित्र
शरीराच्या अनवट वाटांनी अज्ञातातले प्रदेश उलगडत नेणारा प्रियकर
स्वामित्वाच्या रगेल अधिकाराचं उद्धट-आश्वासक आव्हान पुढ्यात फेकणारा शुद्ध नर
आणि भिजल्या नजरेची कोवळीशार जपणूक पावलांखाली अंथरणारा बापही.
ही सगळी नाती रुजत गेली तुझ्या-माझ्यामधल्या मातीत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

तुझ्या स्वप्नील नजरेत बिनदिक्कत हरवून जाताना
तु़झ्या मोहासाठी लालभडक मत्सराशीही रुबरु होत जाताना
निर्लज्ज होऊन तु़झ्या स्पर्शाला साठवताना - आठवताना
तुला कुशीत घेऊन लपवून ठेवावं सगळ्या जगाच्या नजरेपासून
असं आईपण माझ्या गर्भात रुजवत जाताना
बाई आणि आईही जागत गेली माझ्याआत,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

आणि आता,
थेट 'शोले'मधल्या त्या सुप्रसिद्ध सीनची आठवण यावी
तशी ही नात्यांची छिन्नविच्छिन्न कलेवरं आपल्या दोघांमध्ये ओळीनं अंथरलेली.
भयचकित हुंदका गोठून राहावा ओठांवर
आणि सगळ्या बेडर उल्हासावर दु:खाची काळीशार सावली धरलेली.
तरीही सगळ्या पडझडीत क्षीणपणे जीव धरून राहावी कोवळी ठकुरायन
तशी एकमेकांबद्दलची ओलसर काळजी अजुनी जीव धरून राहिलेली.
तिचं कसं होणार हा एक यक्षप्रश्न तेवढा उरलेला
आता तुझ्या-माझ्यामधल्या उजाड़ प्रदेशात,
या सगळ्या विध्वंसासकट
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

प्रदेश उजाड खरेच...
पण या आणि अशा अनुभवांना पचवत जाते,
तेव्हाच तर बाई ’आपला’ पुरुष मागू पाहते...
आपसूक मिळून गेलेलं एक कसदार उत्तर.
कसल्याच दु:खांची क्षिती न बाळगता
तुला ’आपलं’ म्हटलं तेव्हा.

'आपला' पुरुष हवा असं म्हणते बाई
तेव्हा काय अभिप्रेत असतं तिला -
या प्रश्नाची लाख अलवार उत्तरं झिरपत गेली मनात,
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा.

(२९ ऑक्टोबर २००७)

***

पुन्हा या रस्त्यांवरून

शरीराच्या शरीरावर उमटणार्‍या मुद्रा
तात्पुरत्या आणि आजन्म,
उष्ण आणि जिवंत गरजांनी भारलेल्या,
विलक्षण खर्‍या,
आज-आत्ताच्या क्षणात पाय घट्ट रुतवून धरणार्‍या,
उद्यामध्ये पूर्ण बहरण्याच्या अनंत शक्यतांची बीजं पोटी घेऊन असणार्‍या.
मान्य.

पण त्यातच आहेत आपल्या बहुमितीय प्रसरणशील होऊ शकणार्‍या
नात्याला चौकटींचे क्रूर संदर्भ देण्याच्या शक्यताही.
उद्या,
शरीरानं शरीरावर उमटणार्‍या मुद्रा
टळणार नाहीत.
ही अपरिहार्यता
आणि आश्वासनही.

तोवर जगून घेऊ देत मला
आपल्यामधले अशारीर, निवळशंख क्षण.
कसल्याही सस्पर्श देवाणघेवाणी शक्य नसताना
एकमेकांना उद्देशून हवेवर लिहिल्या गेलेल्या कवितांच्या ओळी.
प्रिय व्यक्तींनी दिलेले सल मिटवून टाकता येतील आपल्या कोवळ्या सुरांनी
अशा भाबड्या आशा बाळगत तळ्याच्या काठावरून सोडून दिलेल्या लकेरी.
टक्क जाग्या रात्री एकमेकांना सोबत करत, लखलखत्या आभाळाकडे पाहत
एकमेकांना सांगितलेल्या सुरस आणि चमत्कारिक, पर्युत्सुक सिनेमास्कोपिक गोष्टी.
शब्दांची, अर्थांची आणि मौनांचीही भाषांतरं.
स्पर्शांच्या तहानेइतकं हे सारंही माझ्या आतड्याचं आहे,
हे तुलाही ठाऊक असेलच
असा अनाकलनीय विश्वास...
जगून घेऊ देत.

पुन्हा या रस्त्यांवरून
आपण चालू न चालू...

(१७ जानेवारी २०१४)

***

ऋषिकेश Wed, 01/10/2014 - 16:04

दुसरी प्रचंड आवडली!

पहिलीही ताकदीची कविता आहे, मात्र त्यातील काही वाक्य विशेषत: "स्वामित्वाच्या रगेल अधिकाराचं उद्धट-आश्वासक आव्हान पुढ्यात फेकणारा शुद्ध नर" मधील स्वामित्त्व शब्द जखम करून गेला :(

एकुणच २००७ ते १४ मध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय तर! ;)

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 17:12

In reply to by ऋषिकेश

लोल! आता तिसरी परवाची कविता दाखवली तर परत आणिक एक पूल बांधशील की! तारखा एवढ्याकरता लिहिल्या, की 'दोन्हीत काही संबंध आहे का? कोण हा प्रियकर?' छापाचे प्रश्न येऊ नयेत. तर - असो!

स्वामित्वाबद्दलः कायम जरी नाही, तरी काही क्षणांसाठी केलेलं / झालेलं स्वामित्वाचं प्रदर्शन मोहक असतं, असू शकतं आणि त्याचा स्त्रीच्या मुक्त असण्यानसण्याशी काही संबंध नाही, असं मी मानते.

अजो१२३ Tue, 07/10/2014 - 11:15

In reply to by मेघना भुस्कुटे

तरी काही क्षणांसाठी केलेलं / झालेलं स्वामित्वाचं प्रदर्शन मोहक असतं, असू शकतं आणि त्याचा स्त्रीच्या मुक्त असण्यानसण्याशी काही संबंध नाही,

गुलामीचा आणि मुक्तीचा एकत्र हव्यास हसू आणणारा आहे.

बॅटमॅन Tue, 07/10/2014 - 13:07

In reply to by अजो१२३

गुलामीचा आणि मुक्तीचा एकत्र हव्यास हसू आणणारा आहे.

आचरण ग्रे असलं तरी थेरीचा चष्मा बायनरी असल्यास असे प्रश्न येतात. लिखाणात तीच गोष्ट कैच्याकै वाटते आचरणापेक्षा.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/10/2014 - 03:54

In reply to by मेघना भुस्कुटे

कविता पुन्हा सावकाश, सवडीने वाचेन.

स्वामित्वाबद्दलः कायम जरी नाही, तरी काही क्षणांसाठी केलेलं / झालेलं स्वामित्वाचं प्रदर्शन मोहक असतं, असू शकतं आणि त्याचा स्त्रीच्या मुक्त असण्यानसण्याशी काही संबंध नाही, असं मी मानते.

ललित लेखनाची जशी चिरफाड नको तसं चिरफाड करत समर्थनही नको वाटतं. पण कधीतरी हा विषय निघेल तेव्हा तुझी आठवण होईल.

मन Wed, 01/10/2014 - 16:14

त्या खणखणीत वादावादी, स्त्री विरुद्ध पुरुष वगैरे नंतर एकदम प्रेमबिम?
थांब वाचतो आधी आनी मग प्रतिसाद टंकतो.

कान्चिल Thu, 02/10/2014 - 01:04

पुन्हा या रस्त्यांवरून

कविता वाचत जातो आणि तुम्ही जिंकत जाता!
जीयो जीयो , असाचं लिहीत रहा या शुभेच्छा! :)

अस्वल Thu, 02/10/2014 - 01:17

दुसरी कविता मला काय नक्की कळ्ळी नाही. :(
मात्र निवळशंख हा शब्द बेक्कार आवडला. "बहुमितीय प्रसरणशील" काही झेपलं नाही.

मेघना भुस्कुटे Thu, 02/10/2014 - 11:28

In reply to by वामा१००-वाचनमा…

:( अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं मुळात कविता गंडल्याचंच लक्षण. पण प्रयत्न करते -

जे नातं उद्या कदाचित शरीरसंबंधात परिणत होण्याची शक्यता आहे, अशा नात्याबद्दलची ती कविता आहे. उद्या प्रियकर आणि प्रेयसी आणि पुढे अजूनही काही, अशा रूढ नात्यांत शिरलोच आपण, तर त्यातल्या चौकटी निराळ्या असतील. त्यांचे फायदे-तोटे निराळे. ते असोत किंवा नसोत. आज-आत्ता जे काही आहे, ते मात्र अमोल आहे. ते अनुभवून घेऊ या, असं कवयित्री (कैच्याकै वाटतं हो आपल्याच कवितेबद्दल या टोनमध्ये बोलणं, छ्या!) म्हणते आहे.

गब्बर सिंग Thu, 02/10/2014 - 15:19

In reply to by मेघना भुस्कुटे

ते असोत किंवा नसोत. आज-आत्ता जे काही आहे, ते मात्र अमोल आहे. ते अनुभवून घेऊ या,

.

वक्त का मतलब होता है "अब"
प्यार करना है तो "अब"
हाथ पकडना है तो "अब"
माफी मांगना है तो "अब" ________ सेक्सी सॅम

.

वामा१००-वाचनमा… Thu, 02/10/2014 - 16:26

In reply to by मेघना भुस्कुटे

वा! सुरेख कल्पना आहे. धन्यवाद मेघना. त्या चष्म्यातून वाचते.
______________
आहाहा!!! काय सुरेख कल्पना आहे अन आता कविता फिट्ट समजली. अजिबात गंडली नाहीये.

कान्चिल Thu, 02/10/2014 - 02:18

तुझी कविता वाचताना कुसुमाग्रजांची आठवलेली एक कविता

नात्यास आपुल्या नाव देऊ नकोस काही ।
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही ॥

व्यवहार कोविंदांचा होईल रोष होवो ।
व्याख्येतूनच त्यांची प्रद्ण्या वाहात जाई ॥

ना तालराग यांच्या बंधात बांधलेला ।
स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही ॥

गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा ।
मंझिलकी जयाची तारांगणात राही ॥

वामा१००-वाचनमा… Thu, 02/10/2014 - 02:35

In reply to by कान्चिल

तशाच धाटणीची सोनाली वायकुळ यांची , माझी अतिशय आवडती कविता - http://www.misalpav.com/node/17033

पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो
यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो
नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात?
आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात?
नाही दिली नावं म्हणून काही अडत का?
आणि फक्त ‘नाव’ कधी मन आपली जोडतं का?
नावांच्या परिघात कोंडतात नाती
नियम तोडायला मग भांडतात नाती
म्हणूनच सांगू का
नात्यांची नावं शोधायची नसतात
नात्यांना नावं ठेवायची नसतात

ॲमी Thu, 02/10/2014 - 05:13

In reply to by वामा१००-वाचनमा…

छान आहे ही कविता; खासकरून तू इथे दिलेला भाग.
पण 'नात्यांना नावं ठेवायची नसतात' हे 'नाव देणे' या अर्थाने आहे ना? 'नावं ठेवणे' मंजे 'वाईट बोलणे' असा अर्थ होतो. की तोच अर्थ घ्यायचाय?

वामा१००-वाचनमा… Thu, 02/10/2014 - 23:09

In reply to by ॲमी

नावं ठेवणं नसून नावाच्या चौकटीत बांधण्याचा अर्थहीन प्रयत्न/अट्टाहास करणं या अर्थाने वाटले मला.

बॅटमॅन Thu, 02/10/2014 - 01:40

पैली मस्त जमली आहे!!! अरुणा ढेरेंच्या 'पुरुष असाही असतो' चा प्रभाव वाट्टोय का किञ्चित?

दुसरी नाय आवडली.

ॲमी Thu, 02/10/2014 - 05:21

कविता फारशा समजत नाहीत; त्यात ह्या प्रेमकविता + जरा हटके पद्धतीने लिहीलेल्या. त्यामुळे दोनतीनदा वाचल्यावर पहिली आवडली. दुसरी अजून परत वाचावी लागेल.

अंतराआनंद Thu, 02/10/2014 - 14:04

फार सुंदर. "पुन्हा या रस्त्यावरून" जास्त भावली.

पण त्यातच आहेत आपल्या बहुमितीय प्रसरणशील होऊ शकणार्‍या
नात्याला चौकटींचे क्रूर संदर्भ देण्याच्या शक्यताही.

आणि
एकमेकांना उद्देशून हवेवर लिहिल्या गेलेल्या कवितांच्या ओळी.

हे सहीच.

सोनालीका Tue, 07/10/2014 - 12:03

फार सुंदर.
तुला 'आपलं' म्हटलं तेव्हा प्रचंड आवडली

आंबाबर्फी Tue, 04/10/2016 - 10:05

"स्त्री-पुरुष" नात्याचा संदर्भ असलेल्या, निर्मम मनाने भोगाव्या अशा या दोन कविता. कौतुक करण्यास शब्द थिटे आहेत. सुंदर शब्दरचनेबरोबरच शृंगार, समर्पण, प्रेम, मोह, मत्सर यांचा सप्तरंगी लोलक श्ब्दाशब्दातून जाणवत रहातो. कल्पनेच्या पंखांबरोबरच वास्तवाचे भान शब्दबद्ध केलेल्या अलवार कविता. खूप आवडल्या.

मिलिन्द Wed, 05/10/2016 - 03:44

दोन्ही कविता जबरी ! मानतो!