Skip to main content

पाय मोकळे करून आल्यानंतर लिहिलेली कविता


परवा मोठी झड झालीन्,
झाडाच्या सावल्या
पूनवेला माजल्या

सांडली ज्वारी रातसारी,
खुल्या आभाळात,
पेरली मग माळात.

चपलीला चाक चांदव्याखाली,
पायातून उडली,
सशाची पिली.

कुत्र्याचं रडं, दिव्याचा ठिपू,
लांब मैलावर
आलं वाऱ्यावर.

बांधाच्या उतरीला दगडाची चळ,
पाण्याचा सळ,
खेकड्याचा पळ.

रातीची हाळी पाहाटेला आली,
परतीचा पाय,
अनोळखी होय.

कान्होजी पार्थसारथी Sat, 11/10/2014 - 23:41

In reply to by मेघना भुस्कुटे

:)
आहे की नाही मी कवी??
रात्री सूर्य नसतोच त्यामुळे 'जे न दिसे रवीला...' हे मी 'खरे' करून दाखवले की नाही?

कान्होजी पार्थसारथी Sun, 12/10/2014 - 00:29

In reply to by 'न'वी बाजू

अहो आम्ही फरमाईशीवर कविता लिहीत नाही.तरीही हां एक 'कळी'चा मुद्दा आहे. मुळात कवी लोकांचे ओठात एक पोटात एक असे नसते. त्यामुळे जरी संबधित विषयावर कविता लिहिलीच तरी आमच्या आतड्याचा पीळ किंवा आतल्या गाठी इत्यादि दिसतीलच याची खात्री नाहीच.त्यामुळे पास.

धनंजय Sun, 12/10/2014 - 03:55

खेळकर आहे, छान.

मला अनेक शब्द नवीन आहेत, ते समजले नाहीत.

राजन बापट Sun, 12/10/2014 - 19:35

कविता आवडली. शब्दांच्या नावीन्यामुळे अधिक आवडली.
मला न समजलेले शब्द/शब्दसंहती :

"चपलीला चाक" : दोन्ही शब्द माहिती आहेत पण दोन्हींचा एकत्र अर्थ माहीत नाही. दुसरं म्हणजे या दोन्ही शब्दांचा इथला अर्थ मला माहित असल्यापेक्षा वेगळाही असावा असं वाटतो आहे.
"ठिपू" शब्द माहिती नाही. पण मजेशीर आहे.
"दगडाची चळ" : म्हणजे चळत, रांग का ?

राजन बापट Sun, 12/10/2014 - 20:07

:)

रमताराम Mon, 13/10/2014 - 15:02

यावरून 'मोकळे होऊन आल्यावर लिहिलेली कविता' असे विडंबन लिवण्याची सुपारी देतो आहे घासकडवी गुर्जींना.

कान्होजी पार्थसारथी Mon, 13/10/2014 - 22:09

धन्यवाद! ही कविता पाडलेली असल्याने शब्दार्थ देत आहे. (नाहीतरी ग्रेसगत 'लावा तुमचा तुमी अर्थ' (जन्मभर) असा पवित्रा घेतला असता!)
झड: सामान्यत: पाऊस.
रातसारी: रात्रौ, रातच्याला
चळ : चळथ, चळत (ढीग) यासाठी वापरतो कधी कधी.
सळ : ध्वनिदर्शक शब्द.
हाळी: हाक (कर्नाटकी प्रभाव)
(चपलीचे) चाक : हे चकाकी, ग्लिटर आणि ध्वनि या दोऩीं साठी वापरलाय. चाक(आरे) हे ही फिट्ट् बसते. पण स्केटसाठी नाही वापरलाय!
ठिपू: ठिपू[स], ठिपका, ओलसर भासणारा फिकट डाग.