बयो !! भाग २

बयो !! भाग १

एकदा नेहमीप्रमाणे कोमल ऑफिस मध्ये नसताना तिचे बाबा आले.
मी म्हणालो, "काय काका?"
"काही नाही सहजच. मी काय म्हणत होतो…"
"काय?"
"आमची बयो ग्रजुएट झालेली आहे" (बहुतेक कोमलला घरी बयो म्हणत असावेत)
"हो माहित आहे मला"
"दिसायला हि सुंदर आहे"
"…………" (आता हे नवीन काहीतरी सान्गीतल्यासारखे काय सान्गताय? काय ते विचारा)
"तर मी म्हणत होतो कि…… "
"काय?" (मला आता धडकी भरली. एखाद्या गोष्ट बऱ्याच दिवसापासून मनात असेल आणि आता ती मिळण्याची वेळ जवळ आल्यावर जसा माणूस नर्वस होतो तसे झाले. अजून किती वेळ घेणार आहेत हे?)
"आम्ही परब, कणकवलीजवळ आमचे गाव आहे"
"ओके(????)"
"मी बयोसाठी स्थळ शोधत होतो"
"ओके" (अहो विचारा काय ते लवकर)
"तुम्ही एकदा बयोला घरी येउन बघून गेलात तर बरे होईल."
"अहो रोजच तर बघतो मी तिला इथे"
"अहो बयो, कोमलची धाकटी बहिण"

"काय??????"

(पुढे चालू)
-------------------------------------------------------------------------------

फक्त चक्कर यायची बाकी राहिली होती. कोणीतरी माझ्याकडे बघून जोरात खदाखदा हसतय असा भास होत होता. माझा खर्रकन उतरलेला चेहरा बघून काका थोडे अस्वस्थ झाले. आणि चुळबूळ करू लागले. मी काही बोलत नाही हे बघून स्वत:च म्हणाले. "ठीक आहे, तुम्ही काय ते सांगा सावकाश." आणि निघून गेले.

मी गप दुकान बंद केले आणि घरी गेलो. जेवायची तर इछाच नव्हती. झोप पण लागेना. काय करावे समजत नव्हते. कोमल ला फोन करावा का? तिला हे माहित असेल का? हे तिच्या संमतीने तर होत नाही ना? डोकं गरगरायला लागलं. शेवटी उपाशीपोटी क्रोसिन घेऊन झोपलो.

दुसऱ्या दिवशी थोडा उशिरा उठलो. दुकानावर जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण जावं तर लागणारच होतं. विलासचे दोन फोन येउन गेले होते. ११:०० वाजता दुकानावर पोहोचलो. विलास एकटाच बसला होता. कोमल आली नव्हती. ती अशी सहजासहजी दांडी मारत नसे. का आली नसावी? आजारी असेल का? का तिला हे सर्व माहित झाल्यामुळे येण्याचे टाळत असेल? काही कळायला मार्ग नव्हता.
मी आलोय हे बघून विलास बाहेरचे कॉल करायला निघून गेला. मी आपला एकटाच भकास ऑफिसमध्ये बसून होतो. ती नसताना ऑफिस नुसते खायला उठत होते. मला आणि ऑफिस दोघांना तिची सवय लागली होती. तिच्याशिवाय ऑफिसमधले पान हलत नव्हते. मी तिच्यावर एवढा अवलंबून आहे हे मला आता कळालं. माणूस नसतानाच त्याचं महत्व कळतं. दोन तीन वेळा कोमलला फोन करायचा प्रयत्न केला. रिंग वाजल्यावर ठेऊन दिला. धीर होत नव्हता बोलायचा. काय बोलणार, काय विचारणार.

दुपारी ऑफिसचा फोन घरच्या फोनवर डायवर्ट करून घरी आलो. थोडंसं खाल्लं आणि परत क्रोसिन घेऊन झोपलो. संध्याकाळी ५ वाजता उठलो. आईने मस्तपैकी चहा करून दिला. बरे वाटले. आईने ओळखले काहीतरी बिनसलंय,
आई म्हणाली "काय रे काय झालं?, दुपारी घरी आलास तो?"
"काही नाही, डोकं दुखत होतं"
"नक्की?"
"हो गं. गोळी घेतली बघितलीस ना."
"बरं"
"मला एक विचारायचे आहे"
"काय?"
"तुझे आणि बाबांचं लग्न पत्रिका बघून झाले होते का?"
"काय रे, बरा आहेस ना? झोप पूर्ण झाली नाही का?"
"तू सांग ना"
"अरे बघितलेली चांगली असते, म्हणजे आपल्यात बघतात.आपल्यात म्हणजे आपल्या जातीत. बाकीच्यांचे मला माहित नाही"
"जात…. (हे एक मोठं गौडबंगाल आहे)
"पडलास विचारात?"
"हम्म"
"अरे माझ्या जन्मतारखेचाच घोळ होता. शिवाजी महाराजांसारखा… त्यामुळे कसली पत्रिका आणि कसलं काय… "
"ओके"

आता गौडबंगाल काय आहे ते सांगतो - माझ्या आई आणि बाबांचा प्रेमविवाह. आई ब्राह्मण, बाबा मराठा. त्यामुळे कागदोपत्री माझी जात मराठा. त्यात आईची आई मराठा, आणि आईचे बाबा ब्राह्मण. माझी आत्या एका नवबौद्ध माणसाबरोबर लग्न करून अमेरिकेत स्थायिक झालीय. माझ्या सख्ख्या भावाने एका ख्रिचन मुलीशी लग्न केले आहे. त्यामुळे आमच्या घरात जातींची मस्त भेळ झाली होती आणि जातीची कोणाला पडली नव्हती.
परत आईने विचारले "पण काय रे, आजच एवढे प्रश्न का पडलेत तुला?"
"काही नाही सहजच"
आमची आई म्हणजे उडत्या पाखराचे पंख मोजणारी. तिने परत विचारले, "कोणी आहे का मनात?"
"छे गं"
तो विषय तिथेच संपला.

दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेलो, दुसऱ्या दिवशीसुद्धा मैडमचा पत्ता नव्हता. आता माझा धीर सुटत चालला. सरळ फोन केला. तिनेच उचलला. "हेलो"
"मी विवेक बोलतोय."
"बोल"
"काय झालं?"
"कुठे काय"
"मग येत का नाहीस ऑफिसला?"
"अरे तब्येत बरी नव्हती"
"मग एक फोन करून सांगता येत नाही का?"
"अरे खूप ताप होता. बाबांनी सांगितले नाही का?"
"बाबा आले होते पण ते तर भलतंच काहीतरी बोलत होते"
"………."
"काय गं"
"………."
"हेलो, काय बोलतोय मी? ऐकतेस ना?"
"अरे मी काय बोलते, मी उद्या येतेय न ऑफिसला, मग आपण बोलू"
"हम्म, नक्की या पण"
"हो"
"काळजी घे"
"हम्म" (स्वर कातर)
फोन ठेवला.

विलास ला फोन केला आणि ऑफिस ला बोलावून घेतला. लगेच आला बिचारा. त्याला विचारले, "तुला कोणता चांगला बार माहिती आहे?"
"का?" विलास
"चल ना यार, आज वैताग आलाय"
बारमध्ये गेलो, मस्तपैकी ढोसली. विलासला विचारले, "काय रे विलास, तुझे कुठे अफ़ेअर वगैरे आहे का?"
"नाही रे, वेळ कुठे मिळतोय?"
"तेही खरच आहे. करू हि नकोस"
"काय रे विवेक, ती कोमल येत का नाहीये ऑफिस मध्ये दोन दिवस"
"अरे आजारी आहे"
"ओके, अरे सांगायचे विसरलोच. ते साहेब भेटले होते कंपनीत. त्यांना आपल्याकडून सर्व्हर्स हवे आहेत."
"सर्व्हर्स? किती?"
"दहा बोलत होते"
"हे तू मला आत्ता सांगतोयस?"
"अरे सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिले, पण मी कोमल ला बोललो होतो. कोमल बोलली नाही तुला?"
"आलीय कुठे दोन दिवस?"

बयोच्या लफड्यात धंद्याकडे दुर्लक्ष होत होते. ताबडतोब साहेबांना फोन लावला. प्रांजळपाने सांगितले कि "मला सर्व्हर चे तांत्रिक ज्ञान आहे पण खरेदी विक्री कधी केली नाही. तरी बघतो."
"अरे आमचा नेहमीचा वेण्डर आहे तो बरोबर सर्व्हिस देत नाहीये. म्हणून मला वेण्डर बदलायचा आहे. माझा एक मित्र एच पी मध्ये आहे तो तुला डिलरशिप मिळवून देईल. पण त्यासाठी तुला आणि विलासला बंगलोरला जाउन एक आठवड्याचे ट्रेनिंग घ्यावे लागेल. त्यानंतर तू एच पी चे सर्व्हर्स ची विक्री करू शकशील."
"एक आठवडा…कठीण वाटतंय?"
"का रे? इकडे तुझी बायको बघेल ना सगळं"
"बायको?"
"ती ऑफिस मध्ये असते ना?"
"सर, ती माझी कोणीही नाहीये"
"……… "
"सर ती माझ्याकडे कामाला आहे"
"ओह, सॉरी, ठीक आहे आता विलासला पाठवू नंतर तू जा"
"ओके सर"
"हे बघ विवेक, चांगली संधी आहे, दवडू नकोस. डेस्क्टोप मध्ये किती दिवस डील करत बसणार?"
"बरोबर सर"

विलासला सर्व सांगितले, तोहि खुश झाला. या घडामोडींनी मनाला उभारी आली.

तिसऱ्या दिवशी चित्त थोडे थाऱ्यावर आले. ऑफिसमध्ये गेलो. आजतरी येतेय का? थोडी उशिरा आली पण आली. चेहरा थोडा सुजल्यासारखा वाटत होता. जास्त झोपल्यामुळे किंवा रडल्यामुळे असावा. पहिला एक तास कोणीच कोणाशी बोलेना. माझे तिच्याकडेच लक्ष होते. वाट बघत होतो आत्ता बोलेल, नंतर बोलेल. बोलणे तर दूर नजरेला नजर द्यायला तयार नाही. शेवटी कोंडी फोडण्यासाठी मीच विचारले. "चहा पिणार का?"
"घेईन थोडासा"
"ठीक आहे, एकच मागवतो"
वातावरण एकदम टेन्स होते थोडंसं खेळकर वातावरण करणं गरजेच होतं. हिला बोलतं करायचे म्हणजे काहीतरी विचारावे लागणारच. नाहीतर हि अशीच घुम्यासारखी बसून राहणार. घाबरत घाबरत विषय काढला, "काय गं, हि जी बयो आहे, काय नाव काय तीचं?"
"प्रीती"
"अरे किती सुंदर नाव आहे. तुम्ही लोकांनी बयो करून टाकलीत."
"……"
"कशी आहे ती? तुझ्यापेक्षा सुंदर आहे का?" (इथे माझ्या हातून चुकून मोठा बॉम्ब पडला)
रागाने फणफणत म्हणाली, "घरी जाउन बघना !!! मला कशाला विचारतोस? आमंत्रण आलंय ना तुला?"
डोळ्यातून गंगा जमुना वाहायला लागल्या. हमसून हमसून रडायला लागली. आयला, मी घाबरलो. मी हे कधी अनुभवलं नव्हतं. मी कावरा बावरा होऊन बाहेरून कोणी बघत तर नाहीना हे पाहिलं. मी म्हटलं,
"हे बघ, आधी रडणं थांबव, बाहेरून कोणी बघितलं तर काय म्हणेल?"
तिचे अश्रू काही थांबेनात. मी पुढे होऊन तिचा चेहरा वर केला आणि तिचे अश्रू पुसले. खूप सुंदर दिसत होती. हा मी तिला केलेला पहिला स्पर्श. मनात बरंच काही होतं पण स्वत:ला आवरलं.
म्हणालो, "आधी फ्रेश होऊन ये जा"
तिलाही ते पटलं. गेली आणि १५ मिनिटांनी आली. बहुतेक तिकडे अजून रडून घेतलं असणार. डोळे लाल झाले होते. चहावाला चहा देऊन गेला होता. त्याला सांगितले "वाटी लेनेको शामको आना." दोघेही चहा प्यायलो. बरे वाटले.
मी म्हणालो, "बोल आता"
"काय बोलू"
"तुला हे सगळं माहित होतं ना? बाबा विचारायला येणार ते"
"नाही रे, मला काहीच माहित नव्हतं, तुझी शपथ" परत रडायला सुरवात.
"तू अशी दिवसभर रडतच बसणार आहेस का? मग आपण न बोललेच बरं"
"………."
"हे बघ, यातून काही मार्ग काढायला पाहिजे कि नको?"
"……………."
"काय गं"
"हो रे, पण आता काय करायचं?"
"करू काहीतरी, पण त्याआधी मला तुझ्या मनात काय आहे ते ठामपणे सांग"
"तुला काय सगळं सांगाव लागतं का?
"ओके बाबा"
"विवेक, तू बाबांना काय सांगणार आहेस?"
"ते मी काय सांगायचे ते सांगतो, आधी मला बयोची भानगड काय आहे ते सांग"
"भानगड?"
"अगं म्हणजे हेच कि ती लहान असून बाबांना तिच्या लग्नाची घाई का?"
"अरे खूप प्रोब्लेम आहेत रे"
"मग मला ते सर्व माहित असावेत असं वाटतं का तुला?"
"हम्म"
"मग काय ते सविस्तर सांग"

(क्रमशः)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

आधीच्या भागातल क्रमशः होता काय? लक्षच गेलं नव्हतं
आता मात्र उत्सुकता आहे. पुढला भाग वाचतोच आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!