बयो !! भाग ३ - अंतिम

बयो !! भाग १

बयो !! भाग २

"सांगते बाबा सगळं. हि बयो माझ्यापेक्षा दोन वर्षाने लहान आहे. फक्त दोन वर्षाने लहान असून तिचे खूप लाड व्हायचे घरी. तिला जे मागेल ते खायला प्यायला द्यायचे आई बाबा. मलाही द्यायचे पण तिच्याकडे आई बाबांचे जरा जास्तच लक्ष होतं. यामुळे तिला बाहेरचं चमचमीत खायची सवय लागली. मी नेहमी शाळेत डबा घेऊन जायचे पण हि मात्र आईकडून पैसे घेऊन जायची व बाहेरचं काहीतरी अरबट चरबट खायची. मग कधी कधी पोट दुखायचं, त्यावर घरगुती उपाय व्हायचे आणि त्यानिमित्ताने आणखी लाड व्हायचे. कधी कधी तर मला असं वाटायचं कि ती मुद्दामून पोटात दुखतंय असं सांगायची, आई बाबांकडून लाड करून घ्यायला आणि शाळेत दांडी मारायला.

मला आठवतंय मी दहावीत होते आणि हि आठवीला. शाळेतून एकदा फोन आला कि ताबडतोब शाळेत या, प्रीती खूप रडतेय आणि जमिनीवर गडाबडा लोळतेय, काहीही बोलत नाहीये. आम्ही तिघेही शाळेत गेलो तर बयोची अवस्था बघवत नव्हती. वेदनांनी खूप व्याकुळ झाली होती. आईने मांडीवर घेतले, आम्हाला सर्वांना बघून तिला धीर आला.
बाबांनी विचारले, "काय होतंय बाळ?"
व्हिवळत म्हणाली, "पोटात खूप दुखतंय"
तिथून आम्ही तिला घेऊन थेट हॉस्पिटलात गेलो आणि ऐड्मिट केले. डॉक्टरांनी बहुतेक तिला पेनकिलर देऊन झोपवले. आणि सोनोग्राफी सहित सर्व टेस्ट करायला सांगितले. आई बाबा घरी आलेच नाहीत. दोन दिवसांनी सर्व टेस्टचे रिपोर्ट आले. मीच ते रिपोर्ट लैब मधून घेऊन हॉस्पिटल मध्ये गेले. डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट बघून काही सांगेपर्यंत आमच्या जीवातजीव नव्हता. डॉक्टर म्हणाले कि, "आतड्याचा काही भाग खराब झाला आहे."
बाबा म्हणाले, "मग आता काय?"
"एकदम घाबरण्यासारखे काही नाही ऑपरेशन करून खराब झालेला भाग काढून टाकावा लागेल." डॉक्टर.
आई तिथेच रडायला लागली. मी तिला घेऊन घरी आले. डॉक्टर म्हणत होते कि हि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारेसुद्धा करता येईल (स्कोपी). पण त्याला भरपूर खर्च येणार होता. आणि ते करणारे डॉक्टर सद्या उपलब्ध नव्हते. शेवटी डॉक्टरांनी स्वतःच ती शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेतला.

शस्त्रक्रिया पार पडली. आतड्याचा खराब भाग काढून टाकला पण शस्त्रक्रियेमुळे पोटाला वितभर जखम झाली. डॉक्टरांनी सांगितले कि हिच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्या लागतील नाहीतर परत हा आजार उद्भवू शकतो.

पोटाला जे टाके पडलेत ते साडी घातल्यावर स्पष्टपणे दिसतात. सर्व जण विचारतात, काय झालं? प्रत्येकाला काय सांगणार? आता तिचं शिक्षण पूर्ण झालंय, बँकेत नोकरीला आहे. पोटाचा त्रासही नंतर नाही झाला. पण पोटाच्या त्या वितभर जखमेमुळे बाबांना तिच्या लग्नाची चिंता लागून राहिलीये.
"विवेक, तू विचारत होतास ना, कि ती माझ्यापेक्षा सुंदर आहे का? ती माझ्यापेक्षा खूप सुंदर आहे रे. या फक्त एकाच गोष्टीमुळे बाबा काळजीत असतात.
हे सर्व सांगताना ती खूप भाउक झाली.

"हम्म असं आहे तर, पण असं असलं तरी पण तिचं लग्न तुझ्या आधी करायची घाई का?"

"अरे माझाही मोठा प्रोब्लेम आहे न"

"तुझा प्रोब्लेम काय आता?"

"अरे माझं ग्रेजुएशन झाल्यावर, बाबांनी माझं आणि बयोचं नाव एका वधुवरसूचक मंडळामध्ये नोंदवलं होतं. तिथून मला दोन स्थळं आली. पहिल्या स्थळाबरोबर लग्नाची बोलणी होऊन साखरपुडा ठरला. आणि नवऱ्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. दुर्दैवाने आणि योगायोगाने दुसऱ्या मुलाचासुद्धा लग्न ठरल्यावर अपघाती मृत्यू झाला. आई बाबांसाठी हा मोठा धक्का होता. ते पार खचून गेले. वधुवर सूचक मंडळाने माझ्या नावावर काट मारली. तुला माहित आहे ना वाईट बातम्या कशा वाऱ्यासारख्या पसरतात. त्यानंतर माझ्यासाठी कोणतेच स्थळ आलं नाही. लवकर येण्याची शक्यताही नाही. म्हणून बाबांनी विचार केला असेल कमीतकमी बायोचं लग्न उरकून घ्यावं. कारण बायोबद्दल जे काही आहे ते सांगितलं तर तिचा कोणीतरी स्वीकार करेल तरी पण माझं तर कठीणच वाटतंय."

थोडा वेळ भयाण शांतता पसरली. कोणी काहीच बोलत नव्हतं. कोमल थोडावेळ विचार करून म्हणाली, "विवेक, बायो माझ्यापेक्षा खूप सुंदर आहे रे, चांगली नोकरीला देखील आहे, तू हो म्हण. मला तुला गमवायचं नाहीये.
"म्हणजे"
"अरे, माझ्याबरोबर जर तुझं लग्न ठरलं आणि तुझंही काही बरंवाइट झालं तर मी स्वत:ला क्षमा नाही करू शकणार. तू बयोबरोबर लग्न करून सुखी हो" यापुढे तिला हुंदका आवरेना.
मला काय बोलावं सुचत नव्हतं, म्हणालो. "हे बघ कोमल. तू मला सगळं सांगितलं आहेस ना? तू आधी रडायची थांब. मला जरा विचार करुदे."
त्यानंतरचा संध्याकाळपर्यंतचा सर्व वेळ विचार करण्यात गेला. कोमल थोड्या थोड्या वेळाने माझ्याकडे बघून अंदाज घेत होती. तिथे असणारी जीवघेणी शांतता तिला सहन होईना. काही न बोलता सरळ उठून घरी निघून गेली. मी सुन्न मनाने घरी आलो. माझा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. पण घरच्यांना कसं पटवायचं हा मोठा प्रश्न होता. आई सहजासहजी तयार झाली नसती. आईच्या चाणाक्ष नजरेने काहीतरी बिनसलंय हे ओळखलं. पण काही विचारलं नाही.

१५/२० दिवस असेच गेले. विलास बंगलोरला जाउन ट्रेनिंग घेऊन आला. आंम्हाला एच पी सर्वर ची ऑर्डर मिळाली. सर्वर्स डेलिवर झाले. विलासला नवीन काम शिकायला मिळाल्यामुळे खुश होता. पण त्यालाही कोमल आणि माझ्यामध्ये काहीतरी झालय याचा अंदाज आला होता.

एकदा साहेबांचा फ़ोन आला, म्हणाले, "अरे, आम्ही सोफ़्ट्वेअर डेवलप करतो त्याच बरोबर आम्ही ते हार्ड्वेअर सहित इन्स्टोलही करून देतो. व त्याचा मेण्टेनन्सहि आम्हीच करतो. आमचे परदेशी सुद्धा क्लायण्ट आहेत. मला असा कोणीतरी हवाय जो तिकडे राहून आमच्या सर्वर सेटअपची देखभाल करू शकेल. सद्या आमचे १०० सर्वर्स अमेरीकेभर पसरेल आहेत. तुझ्या माहितीत कोणी असेल तर सांग. तू किंवा विलास जात असशील तर तसं सांग. तू गेलास तर मला आवडेल, तुला अनुभवही जास्त आहे. काय ते सांग मला."
"ठीक आहे साहेब मी सांगतो"

छान संधी आली होती पण करणार काय. दोन चार दिवसात दसरा आला. एक दीड वर्षात आमचा धंदा चांगलाच फोफावला होता. या वर्षीचा दसरा चांगला साजरा करायचा असं ठरवलं. ऑफिसमध्ये लहानशी पूजा करायचे ठरवले. कोमलच्या घरातील सर्वांना बोलावले. आधी तिने आढेवेढे घेतले पण नंतर म्हणाली कि, "घरी सांगून बघते".

दसऱ्याच्या दिवशी लवकर उठून ऑफिसला गेलो. थोडी साफसफाई केली. कोमलसुद्धा घरचीच पूजा असल्यासारखी लवकर आली. साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. मी विचारले, "काय गं, आई बाबा नाही आले?"
"ते येतायत मागाहून थोड्यावेळाने" कोमल म्हणाली.
आम्ही दोघांनी पुजेची तयारी केली. सर्व साहित्याची पूजा केली. थोड्या वेळात विलास आला. सर्वजण चहा पिउन बसलो होतो. तेवढ्यात कोमलचे आई बाबा आले आणि त्यांच्यामागून बयो. माझ्या मनातील बायो आणि प्रत्यक्षातील बयो यात जमीन आसमानाचा फरक होता. कोणत्याही जाहिरातीत मोडेल शोभेल अशी होती बयो. साडीमध्ये तीचं सौंदर्य अजूनच खुललं होतं. अगदी यमी गौतमची जुळी बहिण वाटावी इतकी सुंदर होती.
abcd

कोणाचे तिच्या पोटाकडे लक्षही गेले नसते पण मला माहित होतं म्हणून कोणाचे लक्ष नाहीसे बघून व्यवस्थित बघितलं. चांगला वितभर रुंदीचा व्रण पोटावर होता. एवढं काही व्यंग म्हणावं असं काही वाटत नव्हतं. माझं लक्ष विलासकडे गेले आणि मला हसूच आलं. अक्षरश: संमोहित झाल्यासारखा बयोकडे बघत होता. सर्वजण पूजेच्या पाया पडून चहा पिउन निघाले. बाबांनी माझी आणि विलासची बयोबरोबर ओळख करून दिली. तिनेही "हाय" बोलून हसून आमच्याशी हस्तांदोलन केले. विलासची तर फक्त लाळ गाळायची बाकी होती. कोमलच्याही ते लक्षात आले. कोमल आई बाबांबरोबर निघून गेली. मी विलासला विचारले,
"काय विलास?"
"काय?"
"आवडली का?"
"कोण?"
"एवढा वेळ कोणाकडे बघत होतास?"
"अरे, सुंदर आहेरे पण आपल्याला कोण विचारतेय? ती बँकेत कामाला, मी हा असा."
"अरे तू स्वत:ला कमी का लेखतोस? एकदम हैण्ड्सम तर आहेस?"
"कमी नाहीरे, पण तिचे आईवडील कोणीतरी चांगला पैसेवालाच बघणार ना"
"अरे, तुला सांगू का, तिचं स्थळ माझ्यासाठी आलं होतं"
"काय सांगतोस? अरे यार तू तर लकी निघालास"
"अरे त्यांनी माझा धंदा बघून मला विचारलं, हाच धंदा तुझा असता तर तुलाही विचारलं असतं"
"हो ते तर आहेच"
"समज, त्यांनी तुला विचारले तर? तुझं काय मत असेल?"
"मी तर एका पायावर तयार होईन, पण माझं कुठे एवढे नशीब"
"समज, हा बिजनेस मी तुझ्या नावावर केला तर?
"काय यार विवेक? कशाला मस्करी करतोस?"
"अरे मस्करी नाही. मी तुला ५० टक्क्याचा पार्टनर बनवला तर?"
"अरे पण हे कसं शक्य आहे?" विलास या अनपेक्षित प्रपोजल ने चकित झाला.
"शक्य आहे"
"अरे विवेक यार, काय बोलतोयस तू?"
"हे बघ विलास मी तुला पहिल्यापासून पाहतोय. तू विश्वासू आहेस. मेहनती आहेस. मी तुला पार्टनर करून घ्यायला तयार आहे. पण एक अट आहे"
"……………????"
"तू बयोबरोबर लग्न करायचं"
"ए विवेक, बस झाली हा मस्करी !!"
"अजिबात मस्करी नाही. आय एम सिरिअस"
"अरे यार मी काय बोलू, आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन"
मी विलासला बयोबद्दल सर्व सांगितले. तो बयोच्या सौंदर्याने एवढा घायाळ झाला होता कि त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. अगदी हवेत तरंगायचा बाकी होता. तरंगतच घरी गेला. जाताना मला घट्ट मिठी मारली. त्याला हे स्वप्न वाटत होतं.
विलासला म्हणालो, "हे बघ विलास हे बोलणं आपल्या दोघात आहे. अजून मला बयोच्या बाबांबरोबर बोलायचं आहे.

दुसऱ्या दिवशी कोमल आल्या आल्या तिला सर्व प्लान सांगितला. तिलासुधा कल्पना आवडली.
मी म्हणालो, "बाबांना तू हे सांगशील का?"
"मला नाही जमणार, तूच सांग."
"ठीक आहे, बाबाना बोलावलय म्हणून सांग"
"पण मग आपलं काय?"
"आपण दोघांनी अमेरिकेला जायचं"
"काय?
"हो, चांगली संधी आहे" मी साहेबांच्या प्रपोजलबद्दल तिला सर्व सांगितले. एकदम खुश झाली.
मग म्हणाली, "अरे पण माझ्या पत्रिकेचे काय?"
"ते सोड गं, पत्रिका वगैरे काही नसतं. जे होईल ते होईल."
यावर ती खुश तर झाली पण आतून धास्तावली होती. म्हणाली, "विवेक मला भीती वाटते रे"
"तू काळजी नको करू ग़ं. बाबांना निरोप तेवढा सांग"

दुसऱ्या दिवशी बाबा हजर.
"काय काका? कसे आहात?"
"बरा आहे. तुम्ही बयो बद्दल मत सांगितलं नाहीत"
"काय काका, तुम्ही मला अर्धवट माहिती सांगितलीत"
"म्हणजे?"
"बयोच्या ऑपरेशनबद्दल तुम्ही मला कुठे सांगितले?"
हे ऐकल्यावर ते एकदम खजील झाले व सावरून म्हणाले, "तसं नाही, मी सांगणारच होतो पण एकदा तुम्ही फिजिकली एकमेकांना पसंत केल्यावर."
"अहो मला सारं कळालय कोमल कडून"
"अच्छा, मग तिने तिच्याबद्दल पण सारं सांगितलं असेल?"
"हो, तिने मला दोघीं बद्दल सर्व सांगतिले"
"काय सांगू विवेक तुम्हाला, नशीब आमची परीक्षा पाहतंय बघा. माझंच चुकलं मी आधी तुम्हाल सर्व माहिती द्यायला हवी होती. माफ करा मला."
"अहो काका माफी कसली मागताय? मीच तुम्हाला एक विनंती करणार आहे."
"कसली?"
"तुम्ही विलास ला पाहिलत का?"
"हो पाहिलं"
"कसा वाटला?"
"म्हणजे?"
"मी बयोसाठी बोलतोय"
"बयोसाठी?" पण तो तर तुमच्याकडे कामाला आहे. आणि बयो तुम्हाला पसंत नाही का?"
"हे बघा काका, बायोमध्ये नापसंत करण्यासारखं काही नाहीये. ज्याच्याशी पण तिचं लग्न होईल तो भाग्यवानच असेल. मी विलासला माझा पार्टनर करून घेतोय मग तर तुम्हाला काही हरकत नाहीना?"
"हो पण विलास……. !!"
"हे बघा काका, बयोबद्दल तुम्ही कोणाला सांगितलत तर लग्न होणं थोडंसं कठीण वाटतंय. पण विलासला सर्व माहित असून तो तयार आहे."
"अच्छा, पण तुम्ही का नकार देताय?"
"कारण मला कोमल पसंत आहे"
"काय? सर्व माहित असून?"
"हो, मला काहीच प्रोब्लेम नाही"
काकांना एकदम गहिवरून आलं, "यावर मी काय बोलू विवेक?"
"तुम्ही काही बोलायची गरज नाही. कोमल आणि विलासला सर्व माहित आहे. तुम्ही फक्त बयोला विचारा."
"ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका." असे म्हणून ते निघून गेले.

त्याच दिवशी मी घरी विषय काढला. आईला संशय आलाच होता. कोमल बद्दल सर्व सांगतिले. सर्व ऐकल्यावर ती थोडी धास्तावली. पण तिला माहित होतं मी काही ऐकणार नाही. म्हणाली, "तू सर्व निर्णय घेऊन मला सांगतोयस. तू तर तिच्या बाबांशीपण बोललास. आता मी काय बोलणार?"
आमच्या घरातील वातावरण तसं पुरोगामी असल्यामुळे जास्त अडचण आली नाही."

दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो. कोमल वेळेपेक्षा लवकरच आली. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. मी विचारले, "काय गं, काय झालं घरी?"
"अरे आम्ही सर्वांनी काल चर्चा केली. बयोला काहीच हरकत नाहीये. बाबा सांगायला येतीलच"
"ओक्के, मग आपण कधी जायचं हनिमूनसाठी अमिरीकेला?"
कोमल एकदम गोरीमोरी होऊन म्हणाली. "मला नाही माहित."
"माहित नाही म्हणजे, जायचं कि नाही हनिमूनला?"
लाजून म्हणाली, "विवेक, तू आता असंच बोलणार असशील तर मी घरी जाते." आणि घरी पळाली.

(समाप्त)

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

ठीकठीक. लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवट अगदी उरकल्यासारखा वाटला
हा भाग ठीक. लिहित रहा!

पुढिल कथेला शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कथा चांगली फुलवली आहे. संवादलेखनही चांगलं झालेलं आहे. मात्र कथेत काय होणार याचा अंदाज या भागाच्या सुरूवातीलाच येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0