मला माफ कर पोरी....माफ कर.

'पहिल्याच दोन पोरी झाल्यात, आता तिसरा चान्स घेतोय खरा ह्यावेळी तरी पोरगा झाला पाहिजे. आपण आईवडिलांचे एकुलते एक, आपल्याला दोन पोरी, वंश चालवायला कोणी नको का? घराण नष्ट होईल आमच. ते काही नाही ह्यावेळी पोरगाच पाहिजे.
एका मित्राने सांगितले दहा हजार रुपये खर्च येईल चाचणीला पोरगा असला तर ठीक नाही तर गर्भपात करून टाकायचा. 'शिट, यार हे काही बरोबर वाटत नाही. पण मरू दे चांगले असो वा वाईट आपल्याला फक्त पोरगा पाहिजे.
गर्भलिंग चाचणीचा निकाल आलाय मुलगी आहे. डॉक्टर बोलला चार दिवसाने या गर्भपात करून टाकू. सारा चोरीचा मामला, सारे गुप्तपणे होणे महत्वाचे, नाही तर पोरगा राहायचा बाजूला नि जेलात खडी फोडत बसाव लागेल. बायकोला सार सांगितले तिलाही मुलाची भारी हौस ती हि तयार झाली.
रात्री मस्त जेवून झोपलो तर स्वप्नात एक लहान मुलगी.'बाबा, तुम्ही मला मारणार? नका न हो अस करू. मला आईच्या पोटी जन्म घेवू द्या. मलाहि जगायचं हो बाबा,, मला मारू नका न बाबा'.
काय भयानक स्वप्न म्हणायचं हे. सारा घामाघूम झालो. नंतर झोप काय लागलीच नाही.दुसऱ्या दिवशीही तीच तऱ्हा, आणि हे स्वप्न स्वप्नासारखे वाटत नव्हते अस वाटायचं ती पोरगी खरच समोर उभ राहून माझी विनवणी करतेय. च्यामारी, हि काय झंझट आहे पण शेवटी आपण चुकीचे काम करतोय ह्याची बोचणी लागायचीच.
अखेर चौथा दिवस उजाडला बायकोला घेवून डॉक्टर कडे गेलो. डॉक्टरांनी त्यांचे काम चोख केले. बायकोला घेवून घरी आलो तेव्हा बायको म्हणते, 'आपण, अस करायला नको होत हो, एक कोवळा जीव मारला गेला.अहो तुम्हाला एक सांगायचं होत माझ्या स्वप्नात दोन तीन दिवस सारख एक बाळ यायचं नि आई मला मारू नको अशी विनवणी करायचं'.
'काय'? मी भीतीने आवंढा गिळला. बायकोने माझ्या खांद्यावर मान ठेवली, मी तिची पाठ थोपटत विचारात गुंतलो. बायकोचा गर्भपात झाल्यानंतर हे स्वप्न पडायचे थांबले. बायकोकडे चौकशी केली तिची स्वप्न हि थांबली होती.

दिवस भराभर उलटले बायको पुन्हा प्रेग्नंट राहिली. पुन्हा तपासणी केली ह्या वेळेस मात्र मुलाचा गर्भ होता. बायको नि मी अतिशय आनंदी झालो. मुलगा झाला त्याचा वाढदिवस आम्ही धुमधडाक्यात केला. काळ उलटला मुलगा आता चार वर्षाचा झाला होता. मला एक बाब मात्र खटकायची कि मी त्याला मला पप्पा म्हणायला सांगायचो पण तो मात्र मला हटकून बाबाच म्हणायचा.माझ्या दोन्ही मुली मला पप्पाच म्हणत फक्त बायकोच्या गर्भपातावेळी जे स्वप्न पडले होते त्यातील मुलीच्या तोंडून मी बाबा हा शब्द एकला होता.
मुलाला चांगला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकला. आता तो तिसऱ्या इयत्तेत गेला होता. त्याच्या शाळेतून मला बोलावणे आले तेथे गेलो तर त्याच्या टीचरने मला सांगितले कि तुमचा मुलगा हा मुलींमध्ये जास्त रमतो त्याला मित्र नाहीत. त्याच्या आवडी निवडीही मुलीन सारख्याच आहेत तुम्ही जर नीट लक्ष असू द्या त्याच्यावर. ठीक आहे, असे बोलून घरी गेलो.मनात म्हटले अरे लहान पोरगा तो त्याला काय कळतेय थोडा मोठा झाला तर रमेल मुलांमध्ये आपोआप.
त्या दिवशी मी बाहेरून घरी आलो. मुलगा अभ्यास करत बसला होता त्याला जवळ घेतले तो म्हणाला,'काय, बाबा? 'अरे, तुला कितीदा सांगितले मला पप्पा म्हण. तू मला बाबा का म्हणतोस'?. 'ठावूक नाही. पण मला बाबाच म्हणायला आवडत'.मी त्याला सहज विचारले आता पुढच्या महिन्यात तुझा आठवा वाढदिवस. तुला काय आणू? तुला काय आवडते?. मुलगा म्हणाला, 'बाबा, तुम्ही मला फ्रॉक आणाल काय? मी आश्चर्याने डोळे विस्फारून बघू लागलो. 'बाबा मला न फ्रॉक खूप आवडतात लाल, निळ्या, पिवळ्या रंगांचे झालर असलेले. अस वाटत फ्रॉक घालून गोल गोल फिरावं. गोल गोल राणी सारख. आज मी बारकाईने ऐकले तर मला त्याचा आवाज हा हि मुलींसारखा वाटत होता.
दुसऱ्या दिवशी मुलाला घेवून मानसोपचार तज्ञांकडे गेलो त्यांनी त्याची तपासणी केली. ते म्हणाले कि 'सारे काही ठीक आहे, काही आजार वाटत नाही. तुम्ही ऑफिसला असता घरी आई नि दोन बहिणी त्यांच्या बरोबर राहून राहून असे वाटत असेल त्याला, . मला काही हे पटले नाही, दुनियात लाखो मुल आपल्या आई नि बहिणींबरोबर राहतात ते थोडी असे वागत असतील.दिवसेंदिवस मुलाची लक्षण मुलीसारखीच वाटत होती. बायकोनेही एके दिवशी सांगितल कि तिने त्याला त्या दिवशी लिपस्टिक लावताना पकडल. काय तो लिपस्टिक लावतो. मुलगा आता जवळ जवळ १३ वर्षाचा झाला होता.त्याच्यातील मुलींची लक्षण वाढतच चालली होती. त्याला समजावण्याचे सारे उपाय संपले होते मारहाण, दम देणे ह्या साऱ्याच्या तो पलीकडे गेला होता,त्याचा हट्टीपणा वाढतच चालला होता. त्याला डॉक्टरांकडे नेले त्याच्या तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले,'जरी, हा शरीराने मुलगा असला तरी ह्याच्यात मन एका मुलीचं आहे'.
घरी आलो धाय मोकलून रडलो, बायकोलाही सारे कळले होते.सारी आपल्याच पापाची सजा अस समजून गप्प बसलो .मुलगा आता सोळा वर्षाचा झाला होता त्याने एक दिवस घर सोडण्याचा निर्णय आम्हाला सांगितला. गावाबाहेर एक तृतीयपंथी लोकांची जमात राहत होती त्यांच्याबरोबर जावून राहण्याचा त्याने निर्णय घेतला. त्याला परवानगी दिली. आता त्याचा विचार करण्यापेक्षा मला मुलींच्या भवितव्याची काळजी वाटत होती. त्यांच्या लग्नात पुढे अडचणी येवू नयेत असे वाटत होते.आपल्या इथे समाज सुधारणेच्या बाता सारे मारतात पण ज्याची जळते न त्यालाच कळते. अशी घटना ज्यांच्या बाबतीत घडते ते समाजात एकटेच पडतात.
मुलगा घरातून निघून गेला.रात्री बायको रडत म्हणाली, 'काहो, अस आपल्याच बाबतीत घडल आपण कुणाच काय वाईट केल होत?.
मी हताश होवून तिला म्हणालो, 'एक, जीव, ज्याची जन्माला येण्याची दुर्दम्य इच्छा होती, त्याला आपण मारल, आपण त्या गर्भाची हत्या केली पण त्याच्यात असलेली जीवनेच्छा जागृतच राहिली. नि ती दुसऱ्या रूपाने आपल्या घरी आली. आपण त्या जीवाला मारू नये म्हणून स्वप्नात येवून त्या जीवाने आपली विनवणी केली पण आपण त्याचे एकले नाही. आपल्या खोट्या प्रतिष्ठेपायी कुळाच नाव सुरु रहाव म्हणून आपण एका चिमुरड्या गर्भाची हत्या केली, पण निसर्गाचा न्यायच शेवटी खरा झाला.दुसर रूप घेवून पण तीच जीवनेच्छा घेवून ते बाळ आपल्याच घरी जन्माला आल.

आणि अचानक मला भडभडून आले कंठ दाटला नि मी गदगदलेल्या स्वरात मनापासून म्हणालो,'पोरी, मी आज तुझी माफी मागतो तुझा हा बाप तुझा दोषी आहे ग . मला माफ कर पोरी....माफ कर.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

खाली तात्पर्य दिलं असतंत तर "आधुनिक punch-तंत्र" मध्ये टाकता आलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.