नवनव्या गरजा शोधून काढल्या पाहिजेत

आजवर खूप शोध लागलेत. आपल्या सगळ्याचं जीवन त्यामुळे किती सुखकारक झालं आहे.

तरीपण अजून खूप शोध लागायचे बाकी आहेत.

उदाहरणार्थ: सर्व कुटुंबाला एकत्र बसून पाहाता येतील असे छान छान कार्यक्रम दाखवणाऱ्या टीव्हीचा शोध अजून लागायचा आहे. अनेक गंभीर रोगांवर शास्त्रज्ञांनी परिणामकारक औषधं आणि लसी शोधून काढल्या आहेत खरं आहे, पण एड्‌सपेक्षा अधिक भयानक असा भ्रष्टाचाराचा विकार जो देशभर पसरला आहे त्याच्यावर परिणामकारक इलाज शोधून काढण्यात मात्र वैज्ञानिकांना अजून यश आलेलं नाही. चपराशापासून पंतप्रधानांपर्यत सर्वांना पीडणाऱ्या या रोगावर प्रतिबंधात्मक लस शोधून काढणं ही आजची गरज आहे. पैसे खाण्याचा विकार माणसाला तसा खूप लहान वयात जडतो. लहान मुलाच्या हातात नाणं द्या तो नाणं घट्ट पकडून हात तोंडाकडे नेतो. लहानवयातली ही सवय वयाबरोबर वाढत जाते. पैसे खाण्याच्या या विकारावर लवकरात लवकर काही तरी इलाज शोधून काढणं गरजेचं आहे.

निवडणुकीचे वारे वाहू लागले की भाषणबाजीला ऊत येतो. आणि तशी निवडणूक नसताही आपल्या देशात भाषणबाजी मोठ्या प्रमाणात चालते. काम कम, बाते ज्यादा... असं सर्व ऑफिसात, संस्थांत चालू असतं. लोक बोलून तोंडाची किती तरी वाफ वाया दवडतात. तोंडावाटे दवडली जाणारी ही वाफ विधायक कामासाठी उपयोगात आणता येते का यावर संशोधन व्हायला नको का? या वाफेपासून ऊर्जा निर्मिती करता येते का हे देखील अजमावायला हवं. हे जमलं तर मुंबई शहर हे जगातलं सर्वात श्रीमंत शहर बनून जाईल. खास करून देशातल्या स्त्री-शक्तिचा विधायक वापर होत राहील.

धोकादायक रसायनांचं उत्पादन करणाऱ्या कारखान्यात विषारी वायू गळतीचा शोध घेणारी आणि त्यानुसार कामगारांना धोक्याचा आगाऊ इशारा देणारी यंत्रणा निर्माण करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झालेत. त्याच धर्तीवर शाळा-कॉलेजच्या परिक्षांत हमखास होणाऱ्या पेपर गळतीचा शोध घेणारी यंत्रणा शास्त्रज्ञांनी विकसित करायला हवी. गळती झाल्यास लगेच ही यंत्रणा शहरभर सायरन वाजवून सर्वांना सावध करेल.

स्टिरिओफॉनिक साऊंड सिस्टम, थ्री-डी यामुळे थिएटरमध्ये सिनेमा बघणे हा आजकाल थरारक अनुभव झाला आहे. तंत्रज्ञांचे त्यासाठी आभार मानावेत तेवढे थोडेच. व्हर्च्युअल रिअॅलीटी या तंत्राचा वापर थिएटरात करणं शक्य होईल का याचा मात्र अजून विचार झालेला नाही. हे तंत्र थिएटरात वापरलं तर पडद्यावरल्या घोडदौडीची धूळ प्रेक्षकांच्या नाकाडोळ्यात जाईल. सिनेमातल्या फायटिंगच्या वेळी चार दोन थपडा प्रेक्षकांच्या गालावरही बसतील. हिंसक द्दश्यं एन्जॉय करणासाठी जमलेल्या रसिकांना पडद्यावरल्या हिंसेचा थोडा तरी प्रसाद मिळाला पाहिजे.

मराठी सिनेमाबद्दल काय बोलावं? सिनेमे जास्त प्रेक्षक कमी अशी मराठी सिनेसृष्टिची आज अवस्था आहे.

मराठी सिनेमाकडे मराठी प्रेक्षकाला आकर्षून घेण्यासाठी काय करता येईल याचा वैज्ञानिक पातळीवरून विचार केला पाहिजे. मराठी थिएटरबाहेर व्हॅक्यूम क्लिनर लावून प्रेक्षकांना खेचून घेता येईल का? प्रयोग करायला काय हरकत आहे. यशस्वी झाला तर हे उपकरण मराठी बुकस्टॉल, ग्रंथालय अशा ठिकाणी देखील बसवता येईल.

काही आधुनिक उपकरणं आपण गेली काही वर्षे वापरत आहोतच. पण त्यात काही सुधारणा करण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे. उदाहरणार्थ : यांत्रिक झाडू म्हणता येईल असे व्हॅक्युम क्लीनर आज सगळीकडे सर्रास वापरले जात आहेत. पण या झाडूनं झुरळं नाही मारता येत. काडया-पेट्याऐवजी आज लोक लायटर वापरायला लागले आहे. पण लायटरनं कान नाही कोरता येत. याबद्दल काहीतरी करायला पाहिजे. हसण्यावारी नेऊ नका. आपल्या शास्त्रज्ञांनी दखल घ्याव्यात अशा या मूलभूत अडचणी आहेत.

म्हणतात, माणसाचे श्रम कमी कमी करत शून्यावर आणणं हे विज्ञानाचं मुख्य काम आहे. मानवी जीवन सुखकारक होण्यासाठी वैज्ञानिकांनी नवनवी उपकरणं शोधायचे कसून प्रयत्न केले पाहिजेत यात दुमत असायचं कारण नाही. तातडीनं विचारात घ्याव्यात अशा काही गोष्टी आहेत.बसगाडया बसस्टॉपवर थांबाव्यात म्हणून बसस्टॉपवर खास चुंबकीय उपकरणं बसवायला हवीत. खूप नवनव्या टूथपेस्ट बाजारात आल्या आहेत. त्यात खास करून तोंडाची दुर्गंधी दूर करणाऱ्या, हिरडया बळकट करणाऱ्या टूथपेस्ट आहेत. हे चांगलंच आहे पण दात स्वच्छ करणारी टूथपेस्ट आता कोणीतरी विकसित केली पाहिजे. मोबाईलवर आता टीव्ही सिरिअल पाहता येतात; नेट सर्फिंगही करता येतं. आता एकमेकांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येईल असा मोबाईल विकसित केला पाहिजे.

या छोटया मोठया उपयुक्त गोष्टींबरोबर प्राधान्यानं कराव्यात अशा इतरही काही गोष्टी आहेत. वैज्ञानिकांनी त्यात गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे. उदाहरणार्थ: श्रीमंतांना गरिबांविषयी कळवळा वाटेल अशा गोळ्या शोधून काढल्या पाहिजेत. विषमतेचं निर्मूलन त्यावर अवलंबून आहे. विवाहाला दहा वर्षे लोटल्यानंतर नवरा-बायकोतलं प्रेम आणि जिव्हाळा कमी होऊ नये, परस्परांविषयी त्यांच्यात पूर्वीइतकीच ओढ राहावी म्हणून प्रतिबंधात्मक इंजेक्शनं निघाली पाहिजेत. समाजातल्या घटस्फोटाचं प्रमाण त्यामुळे बरंच कमी होईल. तरूण मुलांना आपल्या वडिलधाऱ्या वृद्ध पिढीविषयी आदर वाटेल अशी काहीतरी औषधं देखील शोधून काढली पाहिजेत. परधर्मीयांविषयी, परप्रांतीयांविषयी आणि परजातीयांविषयी माणसाच्या मनात असलेली कटुता शस्त्रक्रिया करून काढून टाकायचं तंत्र विकसित केलं पाहिजे. स्त्री-पुरूष मैत्रीत अकारण निर्माण होणारी अढी देखील औषधोपचारांनी किंवा शस्त्रक्रियेनं दूर करता आली तर बरं होईल. स्त्रियांना एकमेकांविषयी वाटणारा मत्सर नष्ट होईल अशी इंजेक्शनं किंवा मस्तकलेप निघाले तर ग्रेटच.

रिमोटनं कंट्रोलनं नियंत्रित करता येणारी उपकरणं आजकाल घराघरात दिसू लागली आहेत. झोपल्या झोपल्या आपण रिमोटनं टीव्ही ऑफ करून सिरिअलमधली माणसं नष्ट करू शकतो. या रिमोटची कार्यक्षमता आणखी वाढवली पाहिजे. अवेळी दारात उभे राहाणारे पाहुणे, वॉटर-फिल्टर, शाम्पू वगैरे आपल्या माथी मारायला आपल्या दाराशी येणारे सेल्समन, निवडणूक जवळ आल्यावर मतं मागायला येणारे उमेदवार ही सारी आगंतुक मंडळी रिमोटचं बटण दाबून तिथल्या तिथं डिलीट करता येईल असे रिमोट शोधून काढता आले तर किती बहार येईल?

थोडक्यात, आपल्याकडल्या वैज्ञानिकांपुढं मोठी आव्हानं उभी आहेत. त्यांनी आता अधिक सक्रिय व्हायला पाहिजे. सेमिनारमध्ये पेपर वाचून, वृत्तपत्रात वैज्ञानिक लेख लिहून आपल्या देशातल्या समस्या दूर होणार नाहीत; त्यासाठी नवनवे शोध लावल्यावाचून पर्याय नाही.

... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोध लावण्यासाठी आपण नवनव्या गरजा शोधून काढल्या पाहिजेत; शेवटी गरज ही शोधाची जननी आहे. आपण शाळेत पाचव्या इयत्तेत नाही का हे शिकलो?

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

एवढा खवचट लेख आवडला म्हणावं तर शेवटी पुन्हा पाचव्या यत्तेत आणून सोडलंत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्यातर्फे एक मार्मिक दिलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्तच! Smile

फक्त

पण एड्‌सपेक्षा अधिक भयानक असा भ्रष्टाचाराचा विकार जो देशभर पसरला आहे त्याच्यावर परिणामकारक इलाज शोधून काढण्यात मात्र वैज्ञानिकांना अजून यश आलेलं नाही.

अशी वाक्य वाचून अचानक निवडणुकांतील भाषणंच ऐकतोय का वाटू लागलं Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Biggrin लॉल. धमाल लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0