आइसलंडमध्ये तीन दिवस - भाग १.

भाग १.

दोन वर्षांपूर्वी मे महिन्यामध्ये आइसलंडला भेट देण्याचा योग जमला. भूगर्भशास्त्राचे अनेक चमत्कार दाखविणार्‍या ह्या छोटया देशामध्ये तीन दिवसांच्या सुटीमध्ये थोडेफार हिंडून गोळा केलेल्या छायाचित्रांपैकी काही येथे दाखवीत आहे.

हा देश छोटा आहे तो आकाराने नव्हे तर लोकसंख्येने. साधारणपणे १ लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ असलेला हा देश आकाराने दक्षिण कोरिया, हंगेरी अशांच्या आकाराचा आहे पण त्याची लोकसंख्या केवळ ३,२०,०००, म्हणजे साधारणत: मालदीवइतकी आहे आणि त्यापैकी १,२०,००० इतकी लोकसंख्या राजधानी रेकयाविक (Reikjavik) येथे राहते. त्याच्या खालोखालचे गाव म्हणजे उत्तरेकडचे अकुरेरी (Akureiri). येथे १७,५०० इतकी लोकसंख्या आहे. बाकी सर्व लोकसंख्या लांबलांबवर पसरलेल्या छोटया गावांमध्ये आणि दोनतीन घरांच्या वाडीवजा वस्त्यांमध्ये विखुरली आहे. देश बराच उत्तरेला असूनहि हवामान फार थंड नाही कारण देशाच्या पश्चिम किनार्‍याजवळून गल्फ स्ट्रीम जातो. परिणामत: आकाश बहुतेक वेळा ढगाळ असते. सुदैवाने आमच्या मुक्कामात सर्व वेळ हवा सूर्यप्रकाशयुक्त आणि भटकंतीला योग्य अशी राहिली.

अलीकडे २०१० साली आइसलंडमधील ऐयाफ्यथ्लायोकुथ्ल (Eyjafjallajokull, उच्चार येथे पहा) अशा काहीशा नावाच्या ज्वालामुखीने मोठा स्फोट करून आणि आकाशात कित्येक मैल उंचीपर्यंत भूगर्भामधील दगडगोटे, राख आणि गंधकयुक्त वायु उडवून अटलांटिक महासागरावरील हवाई वाहतूक काही आठवडे बंद ठेवली होती आणि जगाच्या तोंडचे पाणी पळवले होते हे लक्षात असेलच. आइसलंडमध्ये असे अनेक सुप्त आणि अर्धसुप्त ज्वालामुखी असून ते वर्ष दोन वर्षातून आपल्या अस्तित्वाची आठवण करून देत असतात. ह्याचे कारण म्हणजे उत्तर-दक्षिण अमेरिका खंड आणि युरोप-आशिया हा भूखंड ज्यांच्या पाठीवर आहेत अशा भूगर्भातील टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांपासून दूर जात आहेत. ह्यांच्यामधील भेगेमधून भूगर्भातील दाबाची शक्ति आणि लाव्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे त्या भेगेवर आणि तिच्या आसपास ज्वालामुखी, भूकंप अशा घटना होत असतात हा विचार भूगर्भशास्त्राला आता संमत झालेला आहे. अटलांटिक महासागराच्या तळावर असलेली ही भेग आइसलंडच्या खालूनहि आहे आणि त्यामुळे आइसलंडचेच दोन भाग एकमेकांपासून दूर चालले आहेत. ह्या भेगेमुळे सर्व आइसलंडभर दुभंगणारी जमीन, गरम झरे आणि फवारे, ज्वालामुखी आणि तशा प्रकारचे भूगर्भीय चमत्कार ह्यांची रेलचेल आहे. (दोन भाग एकमेकांस दूर लोटत आहेत म्हणजे आइसलंडचे दोन तुकडे व्हायला काही कोटि वर्षे लागतील. तुमच्याआमच्या आयुष्यात काही प्रश्न नाही!)

शेवटचे हिमयुग युरोप, उत्तर अमेरिका खंड येथून ओसरल्याला आता १०,००० वर्षे झाली पण त्याचे अखेरचे अवशेष अजूनहि आइसलंडमध्ये शिल्लक आहेत. आइसलंडवर बर्‍याच ठिकाणी विस्तृत आकाराचे भूभाग कित्येकशे फूट खोलीच्या बर्फाच्या कायमच्या आवरणाखाली झाकलेले आहेत आणि कित्येक धोकादायक ज्वालामुखी ह्या बर्फाच्या पोटामध्ये दडलेले आहेत. आइसलंडच्या पहिल्या दर्शनातच तेथील वेगळेपणा जाणवू लागतो. विमान जसे रेकयाविकच्या जवळ पोहोचते तसे उजव्या बाजूच्या खिडकीमधून जमिनीतून बाहेर पडणारा एक मोठा ढग दिसू लागतो. ’ब्ल्यू लगून’ नावाचे प्रवाशांचे एक प्रमुख आकर्षण असे गरम पाण्याचे झरे रेकयाविकपासून २० मैलावर आहेत त्याच्या वाफेचे हे दुरून होणारे दर्शन. विमानतळावरून बाहेर पडून रेकयाविक गावाकडे जाऊ लागलो की एकहि मोठे झाड नसलेली आणि दगड धोंडयांनी भरलेली, तसेच काचेवर दगड पडला तर जशा भेगा तिच्यावर दिसू लागतात तशी भेगाळलेली जमीन सर्वत्र दिसू लागते.

सुटीच्या पहिल्या दिवशी बाहेर पडलो आणि बंदरावर जाऊन देवमासे बघण्याच्या एका गटाबरोबर समुद्रामध्ये गेलो. नशिबवान लोकांना अनेकदा तेथे देवमासे दिसतात पण आम्हाला देवमासाहि नाही आणि शेपूटचा काय, बोंबलाच्या आकाराचाहि मासा कोठे दिसला नाही. अनेक प्रकारचे समुद्रपक्षी मात्र खूप दिसले. नंतर दुसर्‍या एका चारपाच जीप गाडयांच्या एका ताफ्याबरोबर ’लांगयोकुथ्ल’ (Langjökull) नावाच्या रेकयाविकपासून ६० मैलावर असलेल्या बर्फाळ प्रदेशाकडे निघालो. (मालगाडयांच्या लांबीच्या आइसलॅंडिक शब्दांचा उच्चार ही एक निराळीच गंमत आहे. 'j' ह्या अक्षराचा उच्चार ’य’सारखा होतो हे समजू शकते पण ’ll’चा उच्चार ’ल’ असा न होता थोडासा ’थ्ल’सारखा होतो हे गूढ मात्र आन्तरजालाची मदत घेतल्याखेरीज समजत नाही. आमचे हॉटेल ज्या मोठया रस्त्यावर होते त्याचे पूर्ण नाव आम्हाला नीट कळेपर्यंत आमचा मुक्कामच संपत आला. आम्ही त्याच्या पहिल्या चारपाच अक्षरांवरून आमच्यापुरता एक शॉर्टफॉर्म केला होता तोच एकमेकांमध्ये वापरत असू. jökull ह्या शब्दाचा अर्थ glacier अथवा ice cap असा सापडतो.) आइसलंडमध्ये नॉर्वेसारखेच लहानमोठे फ्योर्ड वाटेत आडवे येतात. अशा एका फ्योर्डला ख्वालफ्योर्दुर (Hvalfjörður) नावाच्या फ्योर्डला घालायला लागणारा वेळखाऊ वळसा टाळण्यासाठी त्याच्याखालून एक बोगदा काढण्यात आला आहे. सुमारे ६ किमी लांबीचा हा बोगदा पाण्याखालून १६५ मीटर इतक्या खोलीला पोहोचतो. त्याची पावणेसहा किमी लांबी पार करायला गाडीला ८-१० मिनिटे पुरतात. ह्याच्यामुळे फ्योर्डच्या टोकाला वळसा घालण्याचा ४५ किमीचा प्रवास वाचतो इति आमचा गाईड.

ह्यापुढील चित्रांपैकी पहिली दोन चित्रे देइलदारतुंगउख्वेर (Deildartunguhver) नावाच्या गरम पाण्याच्या झर्‍याची आहेत. (’ख्वेर’ म्हणजे झरा इति गाईड.) येथे खडकांमधील अनेक लहानमोठया भेगांमधून उकळते पाणी उसळ्या मारत वर उडत असते. पाण्याचे तापमान १०० अंश सेल्सिअस वा अधिक असल्याने त्याचा थेंबहि अंगावर पडला तरी चटका बसू शकतो. ह्याकारणाने ठिकठिकाणी ’झर्‍यांकडे दुरूनच पहा’ अशा सावधगिरीच्या सूचना लिहिल्या आहेत. ह्या अतिशय उकळत्या पाण्याला पाइपांमधून जवळच्या गावांमध्ये नेऊन घरे गरम ठेवणे, तसेच ग्रीन हाऊस शेती करणे अशा कामांना वापरले जाते.

तिसरे आणि चौथे चित्र तेथून जवळच असलेल्या ख्वीता (Hvita) नावाच्या नदीमध्ये पडणारे ख्राउनफोसार (Hraunfossar, Foss म्हणजे धबधबा). नावाचे धबधबे आहेत आणि त्याच नदीवरचा बार्नाफॉस नावाचा धबधबा ह्यांची आहेत. येथील जमीन झाकलेल्या लाव्हा रसाला Pillow Lava असे म्हणतात. असा लाव्हा बनण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन गोळ्यांच्या मध्ये सच्छिद्रता राहते आणि त्यातून पाणी जाऊ शकते. अशा Pillow Lava मध्ये दूरवरपासून मुरलेले पाणी नदीच्या प्रवाहामध्ये अनेक धबधब्यांच्या स्वरूपात पडतांना ख्राउनफोसारमध्ये दिसत आहे. त्यापुढील बार्नाफॉस नावाच्या धबधब्याबद्दल अशी समजूत आहे की नदीवर एकेकाळी नैसर्गिक रीत्या पाण्याच्या कृतीमुळे झालेली खडकामधील कमान होती. जवळच्या गावातील दोन मुले नदीपाशी खेळत असता पाण्याबरोबर वाहून गेली. त्यांच्या आईने रागारागाने कमानच तोडून टाकली. त्या मुलांवरूनच धबधब्याला बार्नाफॉस हे नाव पडले.

नंतरच्या दोन चित्रांमध्ये त्याच नदीचा खडकांच्या भिंतीमधून चाललेला प्रवाह दिसत आहे.

येथून थोडया अंतरावर विथ्गेल्मिर (Víðgelmir) नावाचा लाव्हा रसाच्या कृतीमुळे तयार झालेला सुमारे १.५ किमी लांबीचा नैसर्गिक बोगदा पहायला मिळतो. पूर्वी केव्हातरी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन जमिनीवरून लाव्हा वाहू लागला. ह्या लाव्हामध्ये एकमेकांपासून भिन्न प्रवाहीपणा असलेले लाव्हा होते आणि वरचा थर कमी प्रवाही असल्यामुळे त्याला वाहण्यास अधिक वेळ लागून तो जागीच थंड होऊ झाला. अधिक प्रवाही असा खालचा थर त्यामानाने लवकर वाहून जाऊन वरच्या थंड थराखाली पोकळी निर्माण झाली. येथे ही पोकळी बोगद्यासारखी सुमारे १.५ किमी इतकी लांबली आहे आणि ती दोन ठिकाणी उघडी पडली आहे. त्यापैकी एक येथे दिसत आहे. शेजारीच ह्या बोगद्याचा plan आणि elevation दाखविणारा नकाशा दिसत आहे. ह्या बोगद्याचे पूर्ण संशोधन केले गेले आहे, जरी आज ह्याच्या आत जाण्यासठी आधी परवाना मिळवावा लागतो. एकेकाळी मानवी वसतीसाठीहि ह्याचा उपयोग केला गेला असला पाहिजे कारण जळलेल्या शेकोटया, प्राण्याची हाडे येथे सापडली आहेत.

ह्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराचे वरूनच दर्शन घेऊन आम्ही ’लांगयोकुथ्ल’कडे निघतो.

लांगयोकुथ्ल हे संपूर्ण बर्फाच्छादित दीडएकशे किमी लांबीरुंदीचे पठार आहे. त्यात प्रवास करतेवेळी गाडया बर्फात घसरू नयेत म्हणून त्यांचे आधीच जाड असलेले टायर्स त्यांमधील हवा कमी करून अधिक जाड करण्यात आला. खडबडीत आणि घट्ट झालेल्या बर्फावरून आमचा हाडांचा खुळखुळा करणारा प्रवास सुरू झाला. सगळ्या जीपगडया वादळात सापडलेल्या जहाजांसारख्या वेडयावाकडया डुलत ताशी १०-१५ किमीच्या गतीने जात होत्या. आसपास मनुष्यवस्तीची काहीहि खूण नव्हती. वाटेत येणार्‍या वितळलेल्या पाण्याच्या प्रवाहांमधून जोराने पाणी उडवत गाडी नेणे, शेजारच्या बर्फाळ टेकडीवर वेगात गाडी चढविणे अशा कसरती ड्रायवर्स करीत होते आणि आम्ही सीटला घट्ट धरून त्यातहि फोटो काढण्याचे प्रयत्न करीत होतो. वाटेत एकदा थांबून थर्मॊसमधील गरम कॉफी आणि बिस्किटेहि मिळाली. अखेर दोन तासांनंतर दुसर्‍या बाजूला बाहेर पडून साध्या खडी घातलेल्या रस्त्यावर आम्ही येऊन पोहोचलो. कॉफीब्रेकमध्ये घेतलेली चार चित्रे पहा. त्यापैकी एकामध्ये हवा सोडण्याचे काम चालू आहे आणि दुसर्‍यामध्ये आमचा ड्रायवर-कम-गाईड.

आता येथून आम्ही थिंगवेथ्लिर (Þingvellir) ह्या आइसलंडच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या भागामध्ये येऊन पोहोचतो. ह्या जागेला भूगर्भशास्त्रीय महत्त्वहि फार आहे कारण अमेरिका आणि युरो-अशिया ह्यांना दुभंगणारी पृथ्वीची भेग येथे प्रत्यक्ष पहायला मिळते.

ह्या जागेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येण्यासाठी आइसलंडच्या इतिहासाकडे दृष्टि टाकायला हवी. नॉर्वेच्या राजापासून स्वत:ची सुटका करू पाहणार्‍या आणि शेती आणि पशुपालनासाठी नव्या जागा शोधणार्‍या वायकिंग लोकांनी ९व्या शतकात येथे प्रवेश केला. त्यापूर्वी हा प्रदेश मानववस्तीपासून संपूर्ण मुक्त होता. असे पहिलेपहिले वसाहतवाले लोक प्रथम एकमेकांपासून दूरदूर राहात असत पण जशी त्यांची संख्या वाढू लागली तेव्हा ह्या नव्या देशात काहीतरी कायदेकानून पाहिजेत असे त्यांना वाटू लागले. ९३० सालापासून अशा वेगवेगळ्या वस्त्यांच्या प्रमुख लोकांनी वर्षातून एक वेळा एकत्र जमून सर्वाना मान्य असे नियम करणे, लोकांच्यामधले दावे सोडविणे अशा गोष्टी करायला प्रारंभ केला. अशा वार्षिक भेटींना अल्थिंगी (Alþingi) म्हणत असत आणि हे एक ओबडधोबड प्रकारचे लोकसत्ताक होते. जगातील पहिले पार्लमेंट म्हणजे आमची अल्थिंगी असा आइसलंडचा दावा आहे आणि आजहि आइसलंडच्या पार्लमेंटचे नाव तेच आहे. अल्थिंगीची जागा म्हणजे थिंगवेथ्लिर (Þingvellir). ह्यासाठी त्यांनी जागा निवडली ती म्हणजे पृथ्वीची भेग जेथून जाते नेमकी ती. त्यांना अर्थात तिचे भूगर्भशास्त्रीय महत्त्व ठाऊक नव्हते पण जवळच थिंगवात्लावा (Þingvallavatn) हा आइसलंडमधील सर्वात विस्तृत तलाव, तसेच घोडयांना चार्‍याची मुबलकता अशा कारणामुळे मोठ्या समुदायाला एकत्र यायला ती उत्तम जागा होती. अजूनपर्यंत आइसलंडमध्ये जुना वायकिंग धर्मच चालू होता पण नॊर्वेजियन दबावामुळे १०व्या शतकात ख्रिश्चन धर्म येथे पोहोचला. त्याच काळापासून आइसलंडचा इतिहास ’सागा’ ह्या स्वरूपात रचला जायला सुरुवात झाली. अंतर्गत कुरबुरींचे फलित म्हणजे १२६२ साली नॉर्वेचे राज्य येथे सुरू झाले. कालान्तराने नॉर्वेची जागा डेन्मार्कने घेतली आणि डॅनिश सत्तेखाली आइसलंड १९४४ सालापर्यंत राहिला. त्या साली परस्परसंमतीने आइसलंड स्वतन्त्र देश झाला. (तुरळक वस्तीचा शेजारचा ग्रीनलंड अजूनहि डेन्मार्ककडेच आहे.)

आइसलंडमध्ये ह्या स्थानाला साहजिकच फार महत्त्व आहे. १९४४ साली आइसलंड स्वतन्त्र देश म्हणून घोषित केला गेला तो येथूनच. तेथील अनेक जागांची स्मृति अजून जागी आहे मात्र सर्वात महत्त्वाची जागा Lögberg (Law Rock), ज्याच्यावर उभे राहून नव्या कायद्यांची आणि अल्थिंगीच्या निर्णयांची घोषणा केली जाई, ती जागा मात्र निश्चित करता येत नाही.

पुढील चित्रांमध्ये पहिले Lögberg (Law Rock) च्या जागेचे आहे आणि ते विकिपीडियावरून घेतलेले आहे. उरलेली चित्रे तेथील जमिनीची प्रचंड भेग आणि आसपासचे वातावरण दाखवीत आहेत. आमच्या मुक्कामाच्या पहिल्या आणि तिसर्‍या दिवशी असे दोनदा आम्ही थिंगवेथ्लिरमधून गेलो. दोन्ही वेळची चित्रे येथे एकत्रच दाखवीत आहे.

पुढील तीन चित्रे तीन प्रकारे थिजलेल्या लाव्हा रसाचे नमुने दाखवतात. थिंगवेथ्लिर येथे आम्हाला १७-१६ शतकातील काही थडगीहि दिसली. ह्या थडग्यांमधून कोण अज्ञात झोपलेले आहेत ह्याची कल्पना आली नाही पण त्यातील एका थडग्याचे चित्र पुढे आहे.

आता संध्याकाळचे ५ वाजत आहेत आणि आम्ही दौरा आटोपून परतीच्या मार्गी लागतो. रेकयाविक ६४ अंश उत्तर अक्षांशावर असल्याने आर्क्टिक सर्कलच्या थोडेच दक्षिणेस आहे. त्यामुळे आम्ही तेथे असतांना मे २० च्या पुढेमागे दिवस जवळजवळ २२ तासांचा असे. उरलेल्या तथाकथित रात्रीतहि पूर्ण अंधार असा नसेच. रात्री १२ च्या सुमारास सूर्य मावळला की तास सवातासातच पुन: उगवायला लागायचा. ह्यापुढची दोन चित्रे आमच्या खिडकीमधून रात्री ११.४५ नंतर मावळत्या सूर्याची १५ मिनिटांच्या फरकाने घेतलेली आहेत.

(ह्यानंतर भाग २.)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

बॉबी फिशर आणि बोरिस स्पास्की यांची १९७२ साली रेकयाविक (Reikjavik) येथे बुद्धीबळाची विश्वचषक स्पर्धा झाली होती, याव्यतिरिक्त आइसलंडबद्दल फारसे कधी वाचनात आले नाही. हा भाग आवडला, पुढील भागाची वाट बघत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर लेख. आईसलँडबद्दल रेकयाविक आणि तो एल्याफ्कुथ्ल का कायशाशा नावाचा ज्वालामुखी वगळता काही माहिती नव्हते. बहुत धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांगला लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच!
आमच्या अनंत-यादीमध्ये आणखी एका देशाची भर पडत आहे!

नेहमीप्रमाणे उत्तम लेखन.

एकूणच याभागातील शब्द, ते लिहिताना वापरण्यात येणारे रोमन अक्षरे आणि प्रत्यक्ष उच्चार यांच्यातील गंमत आमच्या म्युनिक ट्रीपमधील डखाऊ गटातील एका आइसलँडियन (ज्याला आधी आम्ही ब्रिटीश समजत होतो) व्यक्तीला खिजवताना एका दुसर्‍या ब्रिटिश गट-सहकार्‍याने आपल्या खास खवचट्ट ढंगात करून दिली होती. आता ते उदाहरण विसरलो पण तो ढंग नी उदाहरण मस्त होते. हे उच्चार इतर युरोपियनांनाही (किमान ब्रिटीशांना) नीटसे जमत नाहीत, तर आपली काय पत्रास अशी खूणगाठ मात्र तेव्हा बांधली.

आमच नी आईसलँडचा एवढाच काय तो प्रत्यक्ष संबंध!

===

लेखमालेच्या शेवटी अवांतर टिपांमध्ये तेथील पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थेबद्दलही (किती सोयीची, फ्रिक्वेन्सी वगैरे) लिहिता आले तर कृपया लिहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकूणच याभागातील शब्द, ते लिहिताना वापरण्यात येणारे रोमन अक्षरे आणि प्रत्यक्ष उच्चार यांच्यातील गंमत आमच्या म्युनिक ट्रीपमधील डखाऊ गटातील एका आइसलँडियन (ज्याला आधी आम्ही ब्रिटीश समजत होतो) व्यक्तीला खिजवताना एका दुसर्‍या ब्रिटिश गट-सहकार्‍याने आपल्या खास खवचट्ट ढंगात करून दिली होती. आता ते उदाहरण विसरलो पण तो ढंग नी उदाहरण मस्त होते. हे उच्चार इतर युरोपियनांनाही (किमान ब्रिटीशांना) नीटसे जमत नाहीत, तर आपली काय पत्रास अशी खूणगाठ मात्र तेव्हा बांधली.

'ब्रिटिशांना' नाही, 'इंग्लिशांना' म्हणा!

नाहीतर मग वेल्समधले Llanfair­pwllgwyn­gyllgo­gery­chwyrn­drobwll­llanty­silio­gogo­goch (उच्चार) किंवा अगदी त्याचे मूळ लघुरूप Llanfairpwllgwyngyllसुद्धा कोणत्या भावाने?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहमीप्रमाणे उत्तम लेखन.

(माझी एक आइसलंडीक मैत्रीण सध्या पुन्हा मायदेशी गेली आहे आणि तिथले फोटो फेसबुकावर टाकत आहे. तिने अचानक आईसलंडीक भाषेत लिहायला सुरूवात केल्यामुळे वर्णनं मिळत नव्हती. त्यातून मी कोणत्या तोंडाने तिच्याकडे भाषांतरं मागणार.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वेगळ्याच जगाची सफर घडवणारं लेखन. वाचतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा मस्त लेख आणि फोटो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ खरच माहीतीपूर्ण लेख व उत्तम छायाचित्रे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0