नातं

नातं
कुण्या एका गावाच्या वेशीवर एक कुटुंब छोट्याश्या घरात रहात असतं. आईवडील आणि त्यांची चार मुलं. आईवडील वेशीबाहेरच्या जंगलात जाऊन वनौषधी गोळा करून गावातल्या एका वैद्याला विकत असत. त्यातून मिळणार्या पैशांतून घर चालत असे. दोन वेळेचं जेवण कसंबसं भागत होतं. वडिलांकडे वंशपरंपरागत आलेलं वनौषधी आणि आयुर्वेदाचं ज्ञान त्यांना जंगलात वनस्पती निवडण्यात कामी येत होतं. आईचं काम होतं त्यांना मदत करणं आणि चूल पेटवण्यासाठी लाकडं गोळा करणं. कित्येक वर्षं हे नित्यनियमाने सुरू होतं.

मुलं मोठी होत गेली. जसजशी मुलं मोठी होत गेली तसतसं आईवडील आणि मुलांमधलं अंतरही वाढत गेलं. चारही भावंडांची तोंडं चारही दिशेला वळली. पुढे घरात सुना आल्या आणि प्रत्येकाला निमित्तच मिळालं. एका घराची पाच घरं झाली. प्रत्येकजण आपापल्या शिक्षणाप्रमाणे कामधंदा करू लागला. पण कोणीही वडिलोपार्जित वनौषधी गोळा करून विकण्याचा व्यवसाय सोडला नाही. तो व्यवसाय जमेल तसा आणि जमेल तेवढा सुरूच ठेवला.

पण कोणत्याही भावंडाचा एकमेकांशी, आईवडिलांचा मुलांशी, कुणाचाही एकमेकांशी संपर्क नव्हता. त्याला सर्वात मोठा मुलगा थोडासा अपवाद होता. तो इतर सगळी भावंडं आणि आईवडिलांशी कामापुरतं का होईना पण बोलत होता.

एकेदिवशी मोठ्या मुलाच्या बोलण्यातून आईवडिलांना कळलं की वेशीबाहेरच्या जंगलात खोलवर एक अशी जागा ऐकीवात आहे जिथे मुबलक प्रमाणात वनौषधी आणि जळणाला लाकडं सापडतील. पण कुणी खात्रीपूर्वक तसं सांगू शकत नव्हतं. बरेच दिवस आईवडिलांच्या डोक्यात हा विचार घोळत होता. तसं वय झालं होतं त्यांचं आणि आयुष्यात सगळं उपभोगूनही झालं होतं. त्यामुळेच त्या जागेच्या शोधात जर आपण जंगलात गेलो आणि आपलं काही बरं-वाईट झालं तरी काही हरकत नाही. पण खरोखरच तिथे मुबलक नैसर्गिक संपत्ती असेल तर गावाचं भलं होईल असा विचार करून त्यांनी त्या ऐकीवात जागेच्या शोधात जंगलात जायचं ठरवलं. मनातून त्यांना मुलांसाठी हे करावंसं वाटत होतं. पण नात्यांमधील दुराव्यामुळे ते मान्य करणं त्यांच्यातल्या ‘मी’ला शक्य होत नव्हतं.

त्यांनी पौर्णिमेचा दिवस निवडला. जरी जंगलातून परतायला उशीर झाला तरी चंद्राचा प्रकाश थोडीशी वाट दाखवण्यास मदत करणार होता. लाकडाची मोळी बांधण्यासाठी एक जाडसर दोरखंड, लाकूड कापण्यासाठी एक कुर्हाड, टोपल्या आणि दोन दिवस पुरेल एवढं अन्न सोबत घेऊन पहाटे पहाटे त्यांचा प्रवास सुरू झाला. बरेच तास प्रवास केला. अधूनमधून थोडीशी विश्रांती ते घेत होते. बराचसा प्रवास केल्यावर जी जागा ऐकीवात होती ती जागा त्यांना दिसली. त्यांना कोण आनंद झाला, आतापर्यंत जपून टाकलेली पावलं निष्काळजीपणे भराभर पडू लागली आणि तिथेच घात झाला. निसरड्यावरून पाय घसरला आणि दोघंही दलदलीत रुतले. घाबरले. जितका प्रयत्न ते बाहेर पडण्यासाठी करू लागले तितकेच ते आणखीन आत रुतत गेले, धसत गेले. बराच प्रयत्न केल्यावर आता कुणाची मदत घेतल्याशिवाय बाहेर पडणं शक्य नाही हे त्यांना कळून चुकलं. त्यांनी ‘वाचवा वाचवा’चा धावा केला. मग क्रमाने काही योगायोग घडले.

पहिला योगायोग म्हणजे त्यांचा सर्वात मोठा मुलगा नेमका त्याच दिवशी जंगलात गेला होता तेही ऐकीवात असलेल्या ठिकाणाच्या शोधात. त्याने दुरूनच ‘वाचवा वाचवा’चा धावा ऐकला. तो आवाजाच्या दिशेने जाऊ लागला आणि एका क्षणी स्वतःच्याच आईवडिलांना दलदलीत बघून दचकला. त्याला काय करावं कळेना. तो एका भल्या मोठ्या वृक्षामागे लपला. आईवडिलांचं त्याकडे लक्ष गेलं नव्हतं. त्याला आईवडिलांची मदत करायची होती पण त्याला त्यांच्यासमोर जाण्यास लाज वाटत होती. त्याच्यामुळे आईवडिलांवर आज ही परिस्थिती ओढवली होती असं त्याला वाटत होतं. आईवडिलांना मदत करण्याऐवजी त्यांच्यासमोर कुठल्या तोंडाने जाऊ हा विचार करून तो लपला होता. काही वेळाने त्याची थोडी भीती कमी झाली पण अजूनही पुढे जाऊन मदत करायला धाडस होत नव्हतं. काहीतरी केलंच पाहिजे पण काय? त्याने आडवाटेने गावाकडे जाऊन मदत मागायचं ठरवलं. एकप्रकारे भ्याडपणाच होता तो. स्वार्थी विचार होता तो. खडतर वाट धरून (काटेरी झाडा-झुडपातून) तो गावाकडे पळत सुटला.

दुसरा योगायोग घडला तो म्हणजे त्यांचा दुसरा मुलगादेखील त्याच दलदलीच्या दिशेने चालला होता. त्यानेदेखील दुरूनच वाचवा वाचवाचा धावा ऐकला. आपल्या आईवडिलांना संकटात बघून तो घाबरला आणि मग मागचा पुढचा काहीही विचार न करता तो आईवडिलांच्या दिशेने मदतीसाठी पळत सुटला. ती दलदल आहे याचंही त्याला भान नव्हतं. दुर्दैवाने दोन संकटग्रस्तांमध्ये आणखीन एकाची भर पडली.

तिसरा योगायोग घडला तो म्हणजे त्यांचा तिसरा मुलगा जंगलात त्याच दिशेने चालला होता. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा आवाज ऐकला (यावेळी मात्र तो आवाज तीन व्यक्तिंचा होता) आणि सावधगिरीने तो हळूहळू आवाजाच्या दिशेने सरकू लागला. पाहतो तर काय आपलेच आईवडील आणि भाऊ. काही क्षण तोही घाबरलाच होता पण त्याने स्वतःला सावरलं. स्वतःजवळचा दोरखंड त्याने तिघांच्या दिशेला फेकला आणि दोरखंडाचं दुसरं टोक एका वृक्षाला बांधण्याचं ठरवलं, जेणेकरून दुसर्या टोकाकडून मुबलक जोर किंवा आधार मिळेल. पण जरी जवळ एक भला मोठा वृक्ष असला तरी तिथवर दोरखंड पोहोचत नव्हता. आईवडिलांनी, भावाने आणलेले दोरखंड हे त्यांच्यासोबतच दलदलीमध्ये समाधी घेण्यास गेले होते. शेवटी स्वतःच ताकदीने खेचून त्यांना बाहेर काढायचं त्याने ठरवलं. परंतु त्याची ताकद कमी पडत होती. काही वेळाने, सतत प्रयत्न केल्यामुळे, त्याच्या हातांची सालपटं निघू लागली. पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. निदान ते तिघंही दलदलीमध्ये रुतत किंवा धसत नव्हते. जसे ते आतमध्ये रुतू लागले की तो तिघांनाही दोरखंडाने वर खेचत असे. पण हे तो किती काळ करणार होता कुणास ठाऊक? त्याची हिंमत तुटत होती. त्याचवेळी गावातील एक गडी माणूस त्याच्या दिशेने येताना त्याला दिसला. हा तोच गडी माणूस होता ज्याला गावाच्या वेशीवर सर्वप्रथम सर्वात मोठा भाऊ भेटला होता आणि त्याने काय घडलं ते सांगून मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्या गडी माणसाने ते आवाहन स्वीकारलं होतं आणि तो मदतीसाठी जंगलात त्या दलदलीच्या दिशेने आला होता. परंतु सर्वात मोठा भाऊ मात्र त्याच्याबरोबर न येता इतर गावकर्यांना सांगण्यासाठी गावाच्या दिशेने गेला होता. आधी त्या गडी माणसाला थोडं आश्चर्यच वाटलं होतं आणि प्रश्नही पडला होता की हा स्वतःच्या आईवडिलांना स्वतः मदत करण्याऐवजी सगळ्यांकडे मदत का मागतोय? त्या गडी माणसाने जेव्हा तिसर्या मुलाच्या हातांवरची जखम पाहिली तेव्हा मदत करण्यासाठी पुढे सरसावलेले त्याचे हात त्याने परत मागे घेतले. त्याने मदत करण्यास नकार दिला. तिसर्या मुलाने त्याला विनंती केली की, मी बराच वेळ आईवडील आणि भावाला प्रयत्न करून त्या दलदलीत धसू दिलेलं नाही. यापुढे माझ्या हातात एवढी शक्ती उरली नाही की, असे पुन्हा करू शकेन तेव्हा तू कृपया मदत कर, निदान गावकर्यांची मदत मिळेपर्यंत तरी मदत कर. वाटल्यास मी तुला पैसे देतो. तेव्हा तो गडी म्हणाला की, पैसा महत्त्वाचा नाही पण तुझ्या आणि तुझ्या आईवडील, भावंडांमधून विस्तवदेखील जात नाही मग तू एवढे हाल होईपर्यंत का कष्ट करतोयस? तेव्हा त्या तिसर्या मुलाने त्याला सांगितलं की, काहीही झालं तरी ते माझे आईवडील आहेत, त्यांनी मला लहानाचा मोठा करताना खूप परिश्रम घेतले आहेत तेव्हा आता माझं कर्तव्य आहे त्यांना मदत करणं. बर्याचप्रकारे विनवणी केल्यानंतर तो गडी माणूस मदत करण्यास तयार झाला.

सर्वात शेवटचा योगायोग म्हणजे त्या आईवडिलांच्या सर्वात शेवटच्या/ धाकट्या मुलाचं तिथे येणं. प्रत्यक्षात तो त्याजागी बराच आधी आलेला असतो. परंतु तो समोर न येता एका वृक्षाआडून हा सर्व प्रकार बघत योग्य वेळच्या प्रतीक्षेत असतो. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तो सर्वात धाकटा मुलगा त्या दलदलीच्या ठिकाणी जातो आणि आपल्याकडील दोरखंड भावाच्या दोरखंडाला जोडतो ज्यामुळे त्याचं दुसरं टोक त्या भल्यामोठ्या वृक्षापर्यंत पोहोचतं. दुसर्या टोकाकडून भक्कम आधार मिळाल्यामुळे आता तिघांनाही त्या दलदलीतून बाहेर काढणं सोपं जाणार असतं. बस! आता केवळ एका सुरुवातीच्या झटक्याची आवश्यकता असते, जेणेकरून त्या तिघांनाही बाहेर येण्यासाठी एक ठरावीक लय किंवा वेग मिळेल. धाकटा मुलगा, त्याचा मोठा भाऊ आणि गडी माणूस तिघं मिळून जोर लावतात. त्यामुळे आईवडिलांना आणि त्यांच्या दुसर्या मुलाला बाहेर येण्यासाठी एक ठरावीक लय मिळते. ज्याक्षणी ते तिघं दलदलीतून बाहेर येणार असतात त्याचक्षणी तो धाकटा मुलगा तिथून तात्काळ निघून जातो. तेवढ्यात तिथे सगळे गावकरी पोहोचतात. त्यांच्यासोबत सर्वात मोठा मुलगादेखील असतो. पण जेव्हा त्याला खात्री होते की आपले आईवडील आता सुखरूप आहेत तेव्हाच तो पुढे येतो. सगळ्यांच्या मदतीने आईवडील सुखरूप गावात आपल्या घरी पोहोचतात. पण सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न निर्माण होतो की सर्वात धाकटा मुलगा असा का वागला? खुद्द आईवडिलांनाही त्याचं आश्चर्य वाटतं. ज्याप्रमाणे त्यांना पहिल्या तिन्ही मुलांचे आभार मानण्याची संधी मिळाली तशी संधी त्या धाकट्या मुलाने त्यांना का दिली नाही? असे अनेक प्रश्न आईवडिलांच्या डोक्यात घोळत असतात. जंगलात घडलेल्या प्रसंगामुळे काही दिवस आईवडिलांना स्वतःला सावरण्यासाठी द्यावे लागतात. जेव्हा त्यांना बरं वाटतं तेव्हा ते त्यांच्या धाकट्या मुलाच्या घरी जाऊन त्याचे आभार मानतात, कौतुक करतात.

वरील कथेतून नात्यांची उकल होते. नात्यांचे चार निरनिराळे पर्याय (Options), प्रकार, भूमिका, त्यामागील विचार, मनोवृत्ती आपल्यासमोर येतात. त्या सगळ्या नात्यांची सरमिसळ केली तर काय होतं ते या कथेतून कळतं. म्हणजे नक्की काय आणि कसं?

(क्रमशः)

शिरीष फडकेकलमनामा – ०९/११/२०१४ – लेख ८ – नातं - भाग १

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वाचतो आहे, पण गोष्टीत तुम्ही काळाचा कल्लोळ केला आहे, त्या मुळे वाचताना मेंदुला फारच त्रास झाला.' काळ आला होता पण वेळ आली नव्हती' ही म्हण तुमच्या गोष्टीला शोभून दिसेल. पण काळाच्या कल्लोळामुळे सगळेच काळ एकाच वेळी आले होते, ही नवीन म्हण सुचते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0