Skip to main content

मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला

गाढवाला सांगतो, गीता... असा मी बावळा
दांभिकांची कैद ज्ञाना, ज्ञानवंता कोहळा

धर्म नामे सर्प डसतो, मानवी वेडेपणा
भूक घेते प्राण येथे, पिंड मागे कावळा

भाव नाही जाणलेला वरलिया रंगा भुले
वर्ण वाटे गोरटा मनरंग काळा सावळा

करपलेल्या भाकरीचे पदर घेतो वाटुनी
घास उदरी पोचला तो, होय मोठा सोहळा

मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला
भ्रष्ट म्हणती लोक आम्हा, कोण येथे सोवळा?

घाबरावे या जगां इतका नसे कमजोर तू
सांग त्यांना ठासुनी, समजू नका मी कोवळा !

विशाल

इरसाल म्हमईकर Fri, 12/12/2014 - 09:30

In reply to by वामा१००-वाचनमा…

हो पीर म्हणजे मुस्लिम साधूच !

इथे 'रेखिला'मध्ये मनाचे गुंतणे आहे. हरि जितका प्रिय, तितक्याच आवडीने त्याच्या पायरीशी पीर चितारला. बाकी रेखिला हा शब्द,मला मी 'हेतुपुरस्सर' हरिच्या पायरीपाशी पीराचे अधिष्ठान ठेवले आहे असा अभिप्रेत आहे. हरि आणि पीर, राम आणि रहिम हे दोन्ही एकच आहेत हे भिनवायचा हा जाणिवपूर्वक प्रयत्न केला असा अर्थ मला हवा आहे.

हा शेर लिहिताना डोळ्यासमोर अक्कलकोटचा स्वामी समर्थांचा मठ होता. स्वामीमठाजवळच एक दर्गा आहे. स्वामींची रोज त्या दर्ग्याला फेरी असे. तिथे असलेले मौलवी अजूनही त्या कथा सांगतात. त्या दर्ग्याच्या चौथर्‍याच्या खाली गायवासरु रेखलेले आहे. सगळं एकत्वच, सगळ्या प्रार्थनांचे प्रवाह एकाच सागरात. खरे सोवळेपण हेच. :)

वामा१००-वाचनमा… Fri, 12/12/2014 - 19:37

In reply to by इरसाल म्हमईकर

अरेच्च्या बरं झालं मी हा प्रश्न विचारला. बरीच रोचक व चांगली माहीती मिळाली. धन्यवात इरसालजी.
असे कवितेचे पदर अन कवीस अध्याहृत असणारे गूढार्थ खरं तर नेहमी प्रश्नोत्तरातून उलगडावेत.

इरसाल म्हमईकर Wed, 24/12/2014 - 09:58

In reply to by सुहास

त्या भागात ' पीर प्रसन्न ' अश्या पाट्या ही पाहिल्यात>>

हो खरे आहे. कारण हिंदू जसे स्वामी समर्थांना दत्तगुरुंचा अवतार मानतात तसेच त्यांना पीरही मानले जाते. ते बर्‍याचदा पीराच्या वेषातही फिरत असत . (जसे साईबाबा). त्यामुळे असेल कदाचित .

उपाशी बोका Fri, 26/12/2014 - 22:38

छान लिहिले आहे. आवडले.