अभिवाचनयोग्य कथा सुचवा...
मित्रहो,
जाहीर कार्यक्रमात अभिवाचन करता येतील, अशा मराठीतील काही वेगळ्या, दर्जेदार कथा सुचवता येतील? प्रसिद्ध कथाकारांच्या फारशा परिचित नसलेल्याही चालतील. फक्त त्या अभिवाचनयोग्य हव्यात. (थोडं वर्णन, थोडे संवाद, थोडं रंजन, असा मिलाफ साधणाऱ्या.)
आधी वाचलेल्या, कुणी सुचवलेल्या कथाही नमूद केल्या, तरी चालेल.
अभिप्रायांच्या प्रतीक्षेत....
?
प्रसिद्ध कथाकारांच्या फारशा परिचित नसलेल्याही चालतील.
लेखक प्रसिद्ध असलाच पाहिजे, हा निकष नाही. लेखक प्रसिद्ध असला (आणि/किंवा कथा फारशी परिचित नसली), तरी चालेल, अशी ती सवलत असावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
फक्त त्या अभिवाचनयोग्य हव्यात.
हा निकष असावा, असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.)
'फक्त' हा शब्द महत्त्वाचा आहे.
मराठी कथा विसावे शतक
संदर्भासाठी 'मराठी कथा विसावे शतक - के. ज. पुरोहित, सुधा जोशी' हे पुस्तक उपयुक्त ठरावं. त्याशिवाय श्री. दा. पानवलकरांची 'पद्म' ही कथा (कथासंग्रहः 'सूर्य') किंवा दि. बा. मोकाशींची 'आता आमोद सुनासि आले' ही कथा नाट्यमयता/अभिवाचन या दृष्टीने अधिक चपखल बसतील, असं वाटतं. प्रताधिकाराबाबत कल्पना नाही.
एका नवीन कथेचा आराखडा, एकदा
एका नवीन कथेचा आराखडा, एकदा जम्बूद्वीपे भरतखंडे दुष्ट राक्षसांचे राज्य होते.... जनतेचे भारी हाल होत होते...... एका ऋषीला लोकांचे लोकांचे हाल पाहवले नाही. त्यांनी तपस्या केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले.... एक सेनापती प्रगटला. त्याच्या डोक्यावर टोपी होती आणि त्याने डोक्यावर मफलर ही घातले होते. गर्जना करत तो राक्षसांवर तुटून पडला..... राक्षस सेना त्राही त्राही करू लागली. त्याचा पराक्रम पाहून ऋषी प्रसन्न झाला..... पण हे काय विपरीत घडले... राक्षसांनी त्या सेनापतीलाच भरतभूमीचे राज्य सौपविले. सेनापती गादीवर बसला, राक्षस पुन्हा जोमाने जनतेला त्रास देऊ लागले......
कथा आणखीन वाढविता येईल... पुढे त्या सेनापतीचे काय झाले आणि काय होणार...
त्या ऋषीचे काय झाले...
कदाचित त्याने पुन्हा तपस्या केली, या वेळी ब्रह्मदेवाने त्याला किरणांस्त्र, दिले, ते किरणांस्त्र कुणी चोरले किंवा पळविले, हस्तगत गेले...
ऐकणारे दाद देतील अशी, चांगली कथा लिहिता येईल... वाट पाहतो... कोण पूर्ण करतो ते.....
अजून काही
संवादरूपी-
हातमोजे : (कथासंग्रह रंगांधळा -रत्नाकर मतकरी)
वेगळी कथा-
दृष्टीआड सृष्टी/ उजव्या सोंडेचा गणपती : (कथासंग्रह -यक्षांची देणगी - जयंत नारळीकर)
================
विज्ञानकथांची जाहिरात
निरंजन घाटेंची एक कथा आहे, त्यात चंद्रावर गेलेल्या अंतराळयात्रींना काही विचित्र अनुभव येतात. नाव काही केल्या आठवत नाहीये. (चंद्राचा मृत्यू बहुतेक)
अॅसिमोवच्या कथांचे अनुवाद "जगाचा भार" ह्या नावाने एका कथासंग्रहात अनुवादित केले होते.
त्यातल्या -
होते कुरूप वेडे (अॅसिमोवची ugly little boy) [बहुधा सर्वश्रेष्ठ]
सॅली (अॅसिमोव- Sally)
शापूर
बाळ फोंडकेंच्या कथा.
लहान मुलांसाठी असेल तर भालबा केळकरांच्या कथा :)
==============
दर्जेदार -
जीए -(विदूषक फार मोठी आहे, पण फस्स्क्लास) किंवा मग "रात्र झाली गोकुळी" नाहीतर मग "दूत" .. जीएंची कुठलीही घ्या.
तीन सुचवणी
काऊचिऊची कथा या दृष्टीने उत्तम आहे.
यात थोडे वर्णन ('एकदा काय झाले, खूप मोठ्ठा पाऊस आला, नि काऊचे घर गेले वाहून!'), थोडा संवाद ('चिऊताई, चिऊताई, दार उघड!' 'थांब, माझ्या बाळाला न्हाऊ घालते!') आणि भरपूर रंजन (आता हे आम्ही सांगायला पाहिजे काय?) आहे.
आणि, मुख्य म्हणजे, मराठीतून आहे.
तशी ती 'एक चिमणी आली, तिने एक दाणा उचलला आणि भुर्रकन उडून गेली'वाली कथासुद्धा सुचविली असती - तिच्यातही भरपूर वर्णन आणि भरपूर रंजन आहेच, आणि (मुळातली कुठल्या का भाषेतली असेना, पण) मराठीतून सांगता येते - पण ती संवादाच्या बाजूने अंमळ कमी पडते. (तिच्या प्रोलॉगमधील माफक संवाद गणल्याखेरीज, किंवा पूर्ण कथा हाच एक एकतर्फी संवाद म्हणून गणल्याखेरीज.)
किंवा, तिन्ही निकषांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने लाकूडतोड्याची गोष्टही तशी वाईट नाही.
शिवाय, या तिन्ही कथा बहुधा प्रताधिकारमुक्त असाव्यात. (चूभूद्याघ्या.)