भेटवस्तू

भेटवस्तू
पूर्वीच्या काळी दळणवळणाची फारशी साधनं नव्हती. एका गावातून दुसर्या गावात जाण्यासाठी बरेच दिवस लागायचे. कधी कधी तर कित्येक महिने प्रवासात जायचे. त्या काळी मुलगी एका गावातून दुसर्या गावात लग्न करून जाणं म्हणजे मुलगी फार दूर गेली असं आईवडिलांना वाटायचं. कारण कधी कित्येक दिवस, कधी कधी कित्येक महिने, कधी तर कित्येक वर्षं आईवडिलांची आणि मुलीची भेटच व्हायची नाही. जी काही भेट व्हायची ती पत्रातूनच. अशाच एका आईवडील आणि त्यांच्या लाडक्या मुलीच्या बाबतीतली ही एक छोटीशी गोष्ट.
मुलीचं नुकतंच लग्न झालं आहे. लग्न होऊन ती दुसर्या गावात (सासरी) नांदायला गेली आहे. आईवडिलांना मुलीचा घरातील वावर अजूनही जाणवतोय. काही दिवसांनी गावात एकदा जत्रा भरते. आईवडिलांच्या मनात आपल्या मुली बरोबरच्या जत्रेतील सगळ्या आठवणी दाटून येतात. आई आणि वडील मोठ्या हौशीने जत्रेतून मुलीसाठी काही वस्तू घेतात. अर्थातच तिच्या आवडी-निवडी लक्षात ठेवूनच त्या सगळ्या वस्तू घेतल्या जातात. आईवडील दोघंही त्या वस्तू जीवापाड जपून ठेवतात, त्यांची काळजी घेतात. एक दिवस मुलीच्या सासरहून निरोप येतो की, काही कारणास्तव सासरच्या घरी एक धार्मिक कार्य योजलं आहे, तेव्हा आईवडिलांना आवर्जून तिथे उपस्थित रहायचं आहे. म्हणजेच ते एक प्रकारचं बोलावणंच असतं. त्याला निमंत्रण किंवा आमंत्रणदेखील म्हणू शकतो. आईवडिलांना कोण आनंद होतो. आता त्यांना धार्मिक कार्याच्या निमित्ताने का होईना, आपल्या मुलीला भेटायला मिळणार असतं, तिचा संसार बघायला मिळणार असतो. आतापर्यंत सगळ्या जपून ठेवलेल्या वस्तू, ज्या जत्रेत घेतल्या होत्या मुलीसाठी, त्या काढल्या जातात आणि मुलीच्या सासरकडे प्रवास सुरू होतो. बर्याच दिवसांचा बैलगाडीचा प्रवास थांबतो तो मुलीच्या सासुरवाडीत. आईवडील आणि मुलीची भेट होते. सासरच्या मंडळींसमोर सगळ्या भावनांना आवर घालावा लागतो. घरातील धार्मिक कार्य उरकतं आणि मग माय-लेकींना एकांत मिळतो, बोलायला आणि भेटायला. आईकडून मुलीची विचारपूस होते आणि मग आई जत्रेत मुलीसाठी घेतलेली साडी-चोळी मुलीच्या हातावर ठेवते. ती साडी बघताच मुलीचे डोळे भरून येतात. भरलेल्या डोळ्यांतून ती साडी कशी आहे ते तिला दिसत नसतं. पण त्यातील आईची माया नक्कीच तिच्यापर्यंत पोहोचलेली असते. लहानपणी मुलीला तिचे वडील जत्रेत नेहमीच घेऊन द्यायचे आणि तिच्या आवडीचं खेळणं तिच्यासाठी विकत घ्यायचे. आता तेच खेळणं ते यावेळी देखील मुलीला आणून देतात. यावेळी मात्र मुलीला आपल्या भावनांना आवर घालणं फारच कठीण जातं. तिच्या भावनांचा बांध फुटतो. ही अशी आईवडिलांची भेट आणि त्यांनी दिलेल्या भेटवस्तू ती मुलगी जीवापाड जपते.
वरील कथेतून एक बाब प्रकर्षाने जाणवते की, भेटवस्तू देण्यामागे आणि घेण्यामागे केवळ भावनांची देवाणघेवाण असते. देवाणघेवाण जरी असली तरी कुठेही त्यात व्यवहार प्रथम स्थानी नाही. भेटवस्तू म्हणजे ओढ, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, आठवण, जपणूक, काळजी अशा अनेक निर्मळ, निःस्वार्थी भावनांचा संगम. यामध्ये कुठेही व्यवहार, बंधन, कर्तव्य नाही. रूढी, परंपरा, पद्धती, देणं-घेणं, हक्क, अधिकार, मान-अपमान, सन्मान अशा बाबी तर मुळीच नाहीत. पण तरीसुद्धा अशा गोष्टी/बाबी आपल्या अवतीभवती समाजात नित्यनियमित घडताना दिसतात. का बरं असं घडतं?
आपण वरील प्रसंग घेऊया किंवा असं म्हणूया की, त्याच प्रसंगात पुढे काय घडलं ते बघुया. आईवडिलांचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि इकडे मुलगी कौतुकाने घरातील सगळ्या मंडळींना, आईवडिलांनी दिलेल्या, भेटवस्तू दाखवू लागते. घरातील काहींना त्याचं खरंच कौतुक वाटतं. पण काहींना त्यात मान-अपमान दिसतात. जावईबापुंसाठी काहीच आणलं नाही?, निदान घरातील वरिष्ठ व्यक्तिंसाठी तरी काही आणायचं, लग्नकार्यात काही मागितलं नव्हतं याचा अर्थ कधीच काहीच देऊ नये असा नव्हे, वरिष्ठांचा मान राखणं देखील तितकंच गरजेचं आहे इत्यादी. अशा असंख्य वाक्यांचा मुलीवर भडिमार होऊ लागतो. जितक्या घरात व्यक्ती तितक्या वेगवेगळ्या मनोवृत्ती यातून दिसून येतात. त्यातच घरात धार्मिक कार्य असल्यामुळे व्यक्तिंचा म्हणजेच पाहुण्यांचा काही तोटा नाही. कुणाचे कान भरले जातात तर कुणाचा गैरसमज करून दिला जातो. (अर्थात ही सगळी कारणं झाली. प्रत्येक व्यक्तिच्या प्रत्येक मताला कुणीही कारणीभूत असलं तरी ती व्यक्ती स्वतःच्या मतांना जबाबदार असते). मुलीला वाईट वाटतं. अतिशय दुःख होतं. एखाद्या शब्दाचा कसा अपभ्रंश होतो तसा हा एकाअर्थी परिस्थितीचा, भावनांचा अपभ्रंश आहे. मग यापुढे कोणतीही भेटवस्तू जर आईवडिलांना आपल्या मुलीला द्यावीशी वाटली तर त्यांना इतर सासरच्या मंडळींच्या मागण्यादेखील विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे इथे व्यवहार आला, मान-अपमानाचं नाट्य आलं. पण हे कुणीही सहसा मान्य करत नाही. कारण या सगळ्या गोष्टी रूढी, परंपरा, पद्धती, मान, कर्तव्य यांसारख्या शब्दांच्या वेष्टनाखाली झाकलेल्या असतात. पुढे जाऊन तर या सगळ्याची अनेक रूपं उदयास येतात ती म्हणजे देणं-घेणं, मागणी/मागण्या, हुंडा, हुंडाबळी इत्यादी.
भेटवस्तू देण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे भेटवस्तुचा प्रवास. एखादं धार्मिक कार्य किंवा एखादा सण किंवा एखादा महत्त्वाचा क्षण हे एक केवळ निमित्त आहे (घेतलेली भेटवस्तू देण्यासाठी). सोप्या शब्दात सांगायचं तर आधी भेटवस्तू घेतली जाते आणि मग निमित्ताची निर्मिती होते. निमित्त आहे म्हणून भेटवस्तू घेतली जाणं हा प्रत्यक्षात भेटवस्तुचा उलटा आणि अयोग्य प्रवास आहे. पण आजकाल हा उलटा प्रवासच बघावयास मिळतो. भेटवस्तुंचं केवळ व्यवहारातच नाही तर वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यातदेखील व्यावहारिकरण झालं आहे. या आधी तो व्यवहार एकतर्फी होता किंवा असं म्हणूया अर्धवट होता. पण आजकाल तर तो एकतर्फी व्यवहारसुद्धा पूर्ण केला जातो. याचं उदाहरण म्हणजे परतीची भेटवस्तू किंवा Return Gift परत या सगळ्या भेटवस्तुंमध्ये, मग ते Gift असो वा Return Gift असो, स्थान/प्रतिष्ठा/ दर्जा या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या जातात. म्हणजेच प्रवास नुसताच उलट्या दिशेने होत नाहीये तर तो भरदाव वेगाने होत आहे. नक्की आपण कुठे चाललोय? आपण आपल्या पुढच्या पिढींपर्यंत नक्की काय पोहोचोवतोय? अशा प्रश्नांची उत्तरं शोधणं आवश्यक नाही का?
भेटवस्तुंचं झालेलं बाजारीकरण हे काही ठरावीक वर्गांपर्यंतच मर्यादित नाही. सुशिक्षित असो वा अशिक्षित असो, गरीब असो वा श्रीमंत असो, तरुण असो वा वृद्ध असो, सर्वच वर्गांमध्ये याची उदाहरणं दिसून येतात. विशेष म्हणजे या बाजारीकरणात भेट, प्रेम, आपुलकी, ओढ यासारख्या भावनांचाच आधार घेतला जातो. भेटवस्तू मागणं किंवा Demand करणं हा काय प्रकार आहे? भेटवस्तू या शब्दांत सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे भेट. भेटीतील ओढ, भेटीआधीचं वाट पाहणं, भेटल्यानंतर व्यक्त होणारी आपुलकी, प्रेम, काळजी या सगळ्या बाबींची अनुभूती त्या भेटवस्तुमधून होते. वस्तू म्हणजे केवळ वस्तू नाही त्यामागे आवड आहे, आठवण आहे, साठवण आहे, स्पर्श आहे, भावना आहे, आश्चर्य किंवा सुखद धक्का आहे. एखादी भेटवस्तू देण्यासाठी हवे तितके पैसे खर्च करावेत. पण ज्याला भेटवस्तू देणार आहोत त्याच्यासाठी आणि मग त्या भेटवस्तुसाठी पुरेसा, मुबलक वेळ खर्च करावा. त्या वस्तुंची किंमत करण्यापेक्षा ती किती अमूल्य आहे ही भावना जोपासावी.
शेवटी अनेक प्रश्न उरतात (जे आपण स्वतःला विचारले पाहिजेत). आपण स्वतःला पुरोगामी म्हणतो किंवा आपण फुले-आंबेडकरांचं नाव घेतो ते कशासाठी? आपण सुशिक्षित असूनदेखील देण्या-घेण्याच्या जाळ्यात कसं बरं अडकतो? आजही संस्कृतीच्या नावाखाली आपण एका विशिष्ट दिवशी भेटवस्तू मिळणार्या दुकानांची तोडफोड का करतो? रूढी, परंपरा, पद्धती, मान, सन्मान, प्रतिष्ठा यासारख्या बाबींच्या जोरावर आपली सारासार विचारशक्ती कुंठीत होत आहे, याचा आपण स्वीकार का करू शकत नाही? आणि सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी उशीर तर झाला नाही ना?
शिरीष फडके
कलमनामा - ०५/०१/२०१५ - लेख १२ - भेटवस्तू
भेटवस्तू

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

बाकी ठीकय; पण फडके काका लेख टाकून गायब का होतात ?

ऐसीवरती लेखन करता येतं; त्याचप्रमाणं प्रतिसादही देता येतात.
हे इंटरअ‍ॅक्टिव्ह (ह्याला मराठीत काय म्हणतात?) प्रकारचं फोरम/व्यासपीठ आहे.
छापील माध्यमांइतकं एकेरी/वन सायडेड नाही.
.
.
तुमचे काही लेख इंटरेस्टिंग* वाटले.
*
रोचक म्हण्णार नाही, कारण रोचक हा शब्द गुळगुळीत झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शिरीष ह्या काकूही असू षकतात. (मुद्दाम ष लिहिलाय. उगाच)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अकारांत स्त्रीलिंगी नाव संस्कृतला चालत नाही ( असा माझा समज * ). आणि लेखन बघता हा नियम मोडण्याची लेखकाची तयारी असेल असे वाटत नाही.

--------
* : कधितरी लहानपणी हे ऐकले आहे, आत्ता कुठल्याही ग्रंथाचा पुरावा देऊ शकणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिरीष हे मराठीत तरी पूर्वीपासून दोन्ही लिंगात वापरले जाणारे नाव आहे. (शिरीष पै, शिरीष कणेकर). अशीच काही आणखी फुलांची नावे- गुलाब, बकुळ. अकारांत नावे- माणिक, केशर, किरण, कांचन, सुहास, रंजन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फडके काका ( खरे तर तुमचे लेख वाचुन तुम्हाला आजोबा म्हणावेसे वाटते ), तुम्ही नुस्ते प्रश्नच विचारले आहेत हो. शेवटच्या पॅरॅ मधे तर ५ प्रश्नचिन्ह आहेत.

तुमचे नक्की म्हणणे काय आहे?

ह्.घ्या्.वे.सां.न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोमवारची "खुलगाभर दूधाची" कहाणी आठवली. Smile
लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की आपण कुठे चाललोय? आपण आपल्या पुढच्या पिढींपर्यंत नक्की काय पोहोचोवतोय? अशा प्रश्नांची उत्तरं शोधणं आवश्यक नाही का?

वेळ कुणाला आहे? असले विचार करणे देखिल मागासलेपणाचे समजले जाते. आपल्या आयुष्याचा भरोसा नाही, पुढच्या काही दिवसांचा भरोसा नाही आणि पुढच्या पिढींपर्यंत, ढी वर अनुस्वारासहित?? पुढच्या पिढ्या म्हणजे मूल हॉस्टेलला जाईपर्यंतचा काळ!!! त्यानंतर आपला त्यांचा संबंध उरत नाही.

हे विचार व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू हे एक निमित्त आहे. माणसाच्या जीवनाला स्पर्शणार्‍या प्रत्येक गोष्टीबद्दल हीच बोंब आहे. सुखासीन जीवन जगण्यासाठी बाजारात हजारो दर्ज्यांच्या लाखो गोष्टी आहेत. जास्त वस्तू घेण्यासाठी किंवा जास्त चांगल्या दर्जाची गोष्ट घेण्यासाठी खूप जास्त कष्ट ओतावे लागतात. मग त्या गोष्टी ऑपरेट आणि मेंटेन करण्यासाठी अजून बरेच कष्ट ओतावे लागतात. शिवाय त्या कष्टांचा आणि व्यक्तिगत जीवनाचा काही एक संबंध नाही, महिन्याअखेर खात्यात पडणारा पगार सोडला तर! मग म्हणून तिथे श्रद्धा नाही. आपण नक्की कुठे चाललोय? हा काय प्रश्न झाला? स्वतःला, समाजाला दिशा असते, भावना असतात, मूल्ये असतात हे सगळं गौण आहे. फक्त पगार मिळाला कि संपलं, त्याचे परिणाम काहीही असो. समाज कुठेही जावो, आपन स्वतः कुठेही जावो, मूल्यांचे, भावनांचे मातेरे होवो! नको तितक्या व्यापक स्तरावर समाज इतका घट्ट विणला आहे कि विचारी लोक निष्प्रभ आहेत नि कोण्या अदृश्य, अपेशी लोकांच्या हितांसाठी सामान्य लोक जीवन जगत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अतिशय तरल आणि मार्मिक प्रतिसाद.
मनातले हुंकार जणू एकेका शब्दातून प्रतीत होतायेत आणि अंतर्मनाच्या गूढगर्भी भावनांना साद घालताहेत असं वाटलं. विचारांचा विचारांशी मेळ घालताना होणारी उलाघाल तुम्ही अचूक टिपली आहे. दिवसेंदिवस अस्वस्थ होणारं संवेदनशील मन आणि निबर असा समाज यातला संघर्ष खूपच वैचारिकरित्या ओघवत्या भाषेत मांडलाय.
साहित्य आणि मूल्य ह्यापेक्षाही सुंदर काही असू शकतं, आणि ते ललित लेखनाचा बाज न समजताही मांडता येतं, ह्या दृढ विश्वासाला सार्थ ठरवल्याबद्दल अभिनंद्न!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भेट्वस्तूची अजुन एक गंमत असते. आपल्याला लाख मोलाची असेल एखादी वस्तू, पण भेट द्यावी ती समोरच्याला अवडणारी गोष्ट मग भले ती कितीही का क्षुल्लक असेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0