नरहरी सोनार हरीचा दास

आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया).
त्यांना भावपूर्ण आदरांजली.

वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय
करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत
होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा
व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते.
वाड्‌.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो.

यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या
दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता. या दोन्ही संप्रदायांतील जे
स्वमताभिमानी होते, त्यांच्यापैकी काही जणांमध्ये अन्य मतांबद्दल व
संप्रदायाबद्दल दुरावाही होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी शिव आणि विष्णू ही
एकाच परमेश्वराची नावं आहेत, अशी ’हरिहरैक्यां’ची समन्वयवादी भूमिका
घेतली. त्यामुळं या दोन्ही संप्रदायांतील दुरावा व एकमेकांविषयीचा
भेदभाव नाहीसा झाला. त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून
नरहरी महाराजांच्या जीवनाचा उल्लेख करायला हवा.

ज्ञानेश्वर माऊलींनी जी शैव आणि वैष्णव यांच्यामधील एकात्मतेची
अपेक्षा केली, ती नरहरी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या आचरणाद्वारे
पूर्ण केली. ते प्रारंभी कट्‍टर शिवोपासक होते. ’कटिसूत्र’ प्रसंगानंतर
ते वारकरी (विठ्ठलोपासक) झाले, कारण त्यांना शिव आणि विष्णू
यांच्यामधील अभेद जाणवला.

ज्या ’कटिसूत्र’ (कडदोरा) प्रसंगानं नरहरी महाराजांना शिव आणि
विठ्ठल यांच्या मधील अभेद जाणवला, त्या ’कटिसूत्र’ प्रसंगाचं /
अख्यायिकेचं आकलन आपण करून घ्यायला हवं. त्यामुळं नरहरी
महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींची हरिहरैक्याची भूमिका का स्वीकारली,
याचा उलगडा हो‌ईल. ही घटना/ आख्यायिका अशी आहे -
देवगिरीच्या एका सावकारानं विठ्ठलमूर्तीला ’कटिसूत्र’ (कडदोरा) अर्पण
करायचं ठरविलं व ते काम त्यानं नरहरी महाराजांकडे सोपविलं.
महाराज कट्‍टर शैव असल्यानं ते विठ्ठल मंदिरात जात नव्हते. विठ्ठल
मूर्ती दर्शन त्यांना निषिद्ध वाटत होतं. त्यामुळं त्यांनी त्या सावकारालाच
मूर्तीच्या ’कटिसूत्रा’चं माप आणायला सांगितल. त्यानुसार नरहरी
महाराजांना त्या सावकारानं माप आणून दिलं. नरहरी महाराजांनी
त्यानुसार ’कटिसूत्र’ तयार केलं. पण ते चार बोटं सैल झालं.
मग, सावकाराने महाराजाना स्वत: माप घेण्याविषयी आग्रह केला.
पण विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं नाही म्हणून स्वत: नरहरी महाराजांनी
डोळ्यांवर पट्‍टी बांधून मूर्तीच्या ’कटिसूत्रा’चं माप घे‌ऊ लागले.
तेव्हा विठ्ठलमूर्ती ही शिवमूर्ती आहे, असं त्यांना जाणवलं.
तेव्हा डोळ्यांवरील पट्‍टी काढल्यावर पुन्हा ती विठ्ठलमूर्तीच असल्याची
प्रचिती त्यांना आली. त्यामुळं ’हरी’ आणि ’हर’ हे एकच आहेत,
हे चिरंतन सत्य त्यांना जाणवलं. त्याविषयी ते पुढील अभंगात म्हणतात.

शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा । ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित ॥
धन्य ते संसारी, नर आणि नारी । वाचे ’हर हरी’ उच्चारीती ॥
नाही पैं भेद, अवघा मनीं अभेद । द्वेषाद्वेष- संबंध उरी नुरे॥
सोनार नरहरी न देखे द्वैत । अवघा मूर्तिमंत एकरूप ॥

भाषिक व ऐतिहासिक प्रमाणांच्या आधारे चिकित्सा केल्यावर नरहरी
महाराजांच्या उपलब्ध अभंगांची संख्या चाळीस ते पन्नास अभंग
इतकीच असावी असं मानलं जातं. मौखिक परंपरांचा आणखी
धांडोळा घेतल्यास आणखी भर पडू शकेल, असं अनुमान करता येतं.
असं असूनही नरहरी महाराजांची उपलब्ध असलेली निर्मिती
अल्प असूनही तिनं आपलं वैशिष्ट्य नि वेगळंपण सिद्ध केलं आहे.

आपला व्यवसाय व संसार चांगल्या प्रकारे करीत असताना नरहरी
महाराजांनी आत्मचिन्तन केलं नि आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केला.
त्या वेळी त्यांना कशाची प्रचिती आली ?

जग हे अवघें सारें ब्रह्मरूप । सर्वांभूती एक पांडुरंग ॥
अणुरेणुपर्यंत ब्रह्म भरियेलें । सर्वांघटीं राहिलें अखंडित ॥
विश्व हें व्यापिलें भरूनी उरलें । कवतुक दाविलें मायाजाळ ॥
भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ । परब्रह्मीं खेळे अखंडित ॥
अखंडित वस्तु हृदयी बिंबली । गुरुकृपे पाही नरहरी ॥

ही जाणीव म्हणजेच ज्ञानदेवांनी ’ज्ञानेश्वरी’त प्रतिपादिलेला
’चिद्विलासवाद’ होय. नरहरी महाराज हे नाथ सांप्रदायी असून
त्यांना प्रत्यक्ष गहिनीनाथांनीच अनुग्रह दिला होता असे परंपरा
मानते.

कौटुंबिक पार्श्वभुमी -
श्री संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपुर येथे सवंत शके १११५
श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी बुधवार रोजी प्रात:काळी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव अच्युतबाबा तर आईचे नाव सावित्रीबाई
असे होते. पंढरी येठेच ते सोनार कामाचा व्यवसाय सचोटीने
करीत असत. उत्तम कारागीर म्हणू त्यांची ख्याती होती. घरात
परंपरागत शीव उपासना होती व घरातच शीव मंदिरही होते.
रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि
नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. त्यांच्या पत्नीचे नाव
गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.

संसार करता कराताच संत समागम, नाम चिंतन करत त्यांनी
परमेश्वराची प्राप्ती करुन घेतली.
नरहरी महाराजांनी शके १२३५ माघ वद्य तृतिया सोमवार
इसवी सन १२८५ रोजी पंढरपुर येथेच समाधी घेतली.
आजही पुंडलीकाचे दर्शन घेवून आपण विठ्ठल मंदिराकडे
जावू लागलो की मंदिराजवळच डाव्या बाजूला नरहरी
महाराजांचे समाधी मंदिर आपल्याला पहायला मिळते.

- देवदत्त परुळेकर मो. ९४२२०५५२२१

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ते प्रारंभी कट्‍टर शिवोपासक होते. ’कटिसूत्र’ प्रसंगानंतर
ते वारकरी (विठ्ठलोपासक) झाले, कारण त्यांना शिव आणि विष्णू यांच्यामधील अभेद जाणवला.

जर भेद नव्हता, तर शिवभक्ती सोडायचं कारण काय होतं?

हे म्हंजे "सगळ्या कंपन्या सारख्याच" असं म्हणायचं आणि इन्फी सोडून टेक-म मध्ये जायचं असं झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे म्हंजे "सगळ्या कंपन्या सारख्याच" असं म्हणायचं आणि इन्फी सोडून टेक-म मध्ये जायचं असं झालं.

..पॅकेज?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करगोट्याचे माप हा किस्सा वारकरी संप्रदायाच्या प्रवचनात ऐकत असे. सोनार हे दैवज्ञ ब्राह्मण असल्याने ते जानवे घालतात अशीही माहिती ऐकिवात आहे.
बाकी देवदत्त, हा वारकरी संप्रदाय व संतपरंपरा यांच्या परिचयाचा उपक्रम चांगला आहे. लिहित राहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

<भाषिक व ऐतिहासिक प्रमाणांच्या आधारे चिकित्सा केल्यावर नरहरी महाराजांच्या उपलब्ध अभंगांची संख्या चाळीस ते पन्नास अभंग इतकीच असावी असं मानलं जातं. मौखिक परंपरांचा आणखी धांडोळा घेतल्यास आणखी भर पडू शकेल, असं अनुमान करता येतं. असं असूनही नरहरी महाराजांची उपलब्ध असलेली निर्मिती अल्प असूनही तिनं आपलं वैशिष्टय नि वेगळंपण सिद्ध केलं आहे.>

ह्या विषयात वि.ल.भावे निर्मित 'महाराष्ट्र सारस्वता'ला जी शं.गो. तुळपुळे पुरवणी आहे त्यात पुढील विधान सापडते:

<सांप्रदायिक गाथ्यांतून नरहरि सोनारांचे म्हणून जे अभंग दिलेले आढळतात त्यांत शिवदिन केसरींच्या परंपरेतील नरहरिदास आणि नरहरि मालो ह्या दोन अलीकडील कवींच्या कृतींची भेसळ झालेली दिसते. ही भेसळ काढून टाकली म्हणजे नरहरि सोनारांचे असे अवघे आठदहाच अभंग उरतात. असो.>

हे मला नीट कळत नाही. ज.र.आजगावकरलिखित महाराष्ट्रकविचरित्र भाग ३ मध्ये नरहरि सोनार ह्यांच्यावर काही लिखाण आहे. त्यात त्यांचे म्हणून एकूण १२ अभंग दिले आहेत. त्यांपैकी ११ अभंगांमध्ये अभंग करणार्‍याचे नाव स्पष्टपणे 'नरहरि सोनार' अथवा 'सोनार नरहरि' असे दाखविले आहे आणि १२व्या मध्ये ते केवळ नरहरि असे आहे. शं.गो. तुळपुळे ह्यांचे लिहिणे त्यांनी पूर्ण तपासणी करूनच लिहिले असणार आणि ज.र.आजगावकरांचे लिखाण त्यांच्यापुढे होतेच. ह्या ४०-५०, ८ आणि ११-१२ ह्या परस्परविरोधी संख्यांची सांगड कशी घालायची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख सकाळी वाचला होता. फार आवडला होता/आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता. या दोन्ही संप्रदायांतील जे स्वमताभिमानी होते, त्यांच्यापैकी काही जणांमध्ये अन्य मतांबद्दल व संप्रदायाबद्दल दुरावाही होतो.

महाराष्ट्रात पहिले मुसलमानी आक्रमण कधी झाले असावे? अल्लाउद्दिन खिल्जी, १२९६? (इतिहास हा काही आपला प्रांत नव्हे, पण ओझरत्या गूगलनिरीक्षणात हे कोठेसे दिसले ब्वॉ. चूभूद्याघ्या.) आणि तेही यादवकालाच्या अखेरीस, आणि त्यात पुन्हा यादव-टेरिटरीत? (देवगिरीचीच पुढेमागे दौलताबाद झाल्याबद्दलही उडतउडत ऐकलेले आहे; पुन्हा चूभूद्याघ्या.)

बोले तो, हिंदू-मुसलमान भांडणांची मूलभूत सुविधा यादवकालात अद्याप प्रस्थापित झालेली नसल्याकारणाने ती तहान तेव्हा शैव-वैष्णव झगड्यांवर भागवून घ्यावी लागत असावी काय?

(ती पाणपोई महाराष्ट्रात प्रथम घालून दिल्याबद्दल महाराष्ट्र श्री. अल्लाउद्दिन खिल्जी यांचा कधीही उतराई होऊ शकणार नाही. श्री. खिल्जी यांचे या निमित्ताने अनेकानेक आभार.)

ज्ञानेश्वर माऊलींनी शिव आणि विष्णू ही एकाच परमेश्वराची नावं आहेत, अशी ’हरिहरैक्यां’ची समन्वयवादी भूमिका घेतली.

त्यापेक्षासुद्धा, पुढील काळात हाच फंडा राम आणि रहीम (किंवा ईश्वर आणि अल्ला) यांना लावण्याकरिता भविष्यकालीन समन्वयवाद्यांस उपलब्ध करून दिला, हे त्यांचे कॉण्ट्रिब्यूशन अधिक महत्त्वाचे आहे.

त्यामुळं या दोन्ही संप्रदायांतील दुरावा व एकमेकांविषयीचा भेदभाव नाहीसा झाला.

याबद्दल किंचित साशंक आहे; मात्र, अशा प्रकारे अशा सर्वच संप्रदायांतील दुरावा आणि भेदभाव नष्ट होईल, तो सुदिन. बोले तो, अच्छा दिन. (तथास्तु, आणि आमीन.)

(अच्छे दिन 'आनेवाले हैं' म्हणतात, हाच काय तो त्यातल्या त्यात आशादायी भाग आहे. चूभूद्याघ्या.)

बाकी,

नरहरी महाराजांनी शके १२३५ माघ वद्य तृतिया सोमवार इसवी सन १२८५ रोजी पंढरपुर येथेच समाधी घेतली.

१२८५ साली बोले तो खिल्जीपूर्व काळात. समाधी खिल्जीपूर्व काळात घेतली बोले तो जन्मही बहुधा खिल्जीपूर्व काळातलाच असावा. (चूभूद्याघ्या.) म्हणजे त्यांचे आईवडील हे त्याही पूर्वीच्या काळातले असणार.

पण... पण... पण... पण मग...

त्यांच्या वडिलांचे नाव अच्युतबाबा तर आईचे नाव सावित्रीबाई असे होते.

हे कसे?

'बाबा' प्रत्ययाचा उगम तर फारसीतून आहे ना? आणि, नक्की खात्री नाही, पण, 'बाई'सुद्धा बहुधा फारसीच असावी. (की अरबी? चूभूद्याघ्या. पण पारशांतसुद्धा 'अमूकबाई', 'तमूकबाई' वगैरे असतात, तेव्हा फारसीच बहुधा.)

जाणकारांनी कृपया खुलासा करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0