चावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार

chawadee

“भाजपाचा चौखूर उधळलेला वारू रोखला गेला की दिल्लीत! आप ने इतिहास घडवला.”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, अशा थाटात बोलताय की अश्वमेधच रोखला जणू!”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो नारूतात्या, अवघा भारत भगवा करण्याचा 56 इंची अश्वमेधच होता तो.”, बारामतीकर खोचकपणे.

“एका उथळ माणसाला आणि पर्यायाने उथळ पार्टीला निवडून देऊन अराजकाला आमंत्रण दिले आहे दिल्लीने.”, चिंतोपंत हताशपणे.

“तो शिंचा केजरी त्या अम्रीकेच्या CIA च्या ताटाखालचं मांजर आहे म्हणे!”, घारुअण्णा डोळे गोल गोल फिरवत.

“हो त्याच्या NGO ला मिळणारे फंडींग, त्याच्या परदेशवार्‍या तसे असण्याला दुजोराच देताहेत.”, इति चिंतोपंत.

“अहो हो ना, म्हणे भाजपावर वचक आणि कंट्रोल ठेवायला अम्रीकेने उभे केलेले बुजगावणे आहे ते, जसे त्या पाकड्यांच्या मलाला उभे केले होते तसे.”, घारुअण्णा घुश्शात.

“अहो घारुअण्णा, उगा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे करू नका, शांतपणे बोला जरा.”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“हो ना, विषय काय नं हे बोल्तात काय? भाजपाचा सुपडा साफ झालाय त्याचे काय ते बोला ना.”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“बहुजनहृदयसम्राट, तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! अहो पण भाजपाचा मतदार दूर गेलेला नाही. तो भाजपाच्या पाठीशीच आहे.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी… मियाँ गीरे तो गीरे तंगडी उनकी उप्परच!”, नारूतात्या पुन्हा एकदा पांचट विनोद मारत.

“हो ना! अहो, दिल्लीत जेमतेम 3 जागांची बेगमी झालीय आणि कसला मतदार पाठीशी हो घारुअण्णा?”, बारामतीकर शड्डू ठोकत.

“अहो बारामतीकर, भाजपाचा टक्का कमी झालाच नाहीयेय, काँग्रेसची सगळी मते आपला मिळाली आहेत आणि काँग्रेसचाच सुपडा साफ झाला आहे खरंतर.”, इति चिंतोपंत.

“बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकरच ते, काँग्रेस संपतेय ते कसे काय बघवेल त्यांना.”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! इथे विषय दिल्ली निवडणूकीच्या निकालांचा चाललाय. काँग्रेस तशीही रिंगणात कधी नव्हतीच. दुहेरी लढतच होती ही.”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“हो, आणि अरविंदला शह द्यायला त्याच्या एकेकाळच्या साथी, किरण बेदींना, रिंगणात आणायची चाल खेळून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती भाजपाने. पण ती गाजराची पुंगी होती ते आता कळतंय, आता पराभवाचे खापर त्यांच्या बोडक्यावर मारता येईल म्हणजे मोदींच्या जोधपुरीवर शिंतोडा नाही.”, बारामतीकर शांतपणे.

“मोठे मोठे नेते, खुद्द पंतप्रधान, दिल्लीत येऊन शक्तिप्रदर्शन करून दिल्ली काबीज करण्याच्या गर्जना करत होते.”, इति भुजबळकाका.

“पंतप्रधान? प्रधानसेवक म्हणायचंय का तुम्हाला?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“अहो ते तर दिल्ली पादाक्रांत केल्याच्या थाटात, दिल्लीतूनच नितीशकुमारांना आव्हान देत होते!”, बारामतीकर चौकार ठोकत.

“बारामतीकर, तुस्सी सही जा रहे हो!”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, एक अराजक माजवणारा माणूस आणि त्याचा पक्ष, काश्मीरला स्वायत्तता द्या असे म्हणणारे त्याचे साथीदार हे दिल्लीचा, देशाच्या राजधानीचा, कारभार हाकणार हे पटतच नाहीयेय.”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“फुक्कट वीज, फुक्कट पाणी सगळा फुकट्या कारभार असणार आहे. काय आहे विश्वेश्वराच्या मनात ते त्या विश्वेश्वरासच ठाऊक! ”, घारुअण्णा तणतणत.

“कळकळ दिल्लीत अराजक माजणार त्याच्यामुळे आहे.”, चिंतोपंत.

“होय होय, भाजपा हरल्याचं दुःख नाही पण हा केजरीवाल सोकावतोय ना...”, घारुअण्णा उद्वेगाने.

“किती ती तणतण घारुअण्णा!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हीच बघा आता काय ते सोकाजीनाना. हे असले कुडमुडे ‘आप’वादी राजकारणी कसं काय राज्य चालवणार?”, चिंतोपंत सीरियस चेहरा करत.

“आप किंवा केजरीवाल अ‍ॅन्ड कंपनी दिल्लीत निवडून आली, ती कशी? भरघोस मतदान होऊन! आता मतदान कोणी केले? दिल्लीकरांनी! जे तिथे राहताहेत त्यांनी त्यांच्या भल्यासाठी दिलेला कौल आहे तो. त्याच दिल्लीकरांनी लोकसभेसाठी भाजपाला कौल दिला होता, तो देश चालविण्यासाठी होता. आता स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी त्या प्रश्नांची जाण असलेल्या लोकांना निवडून आणले आहे. परिपक्व लोकशाहीची जाण असल्याचा वस्तुपाठ आहे तो! आणि अराजक माजवलेच आपने तर जशी भाजपाची आणि काँग्रेसची गत आज केलीय तशी दिल्लीकर आपची करतीलच की! दिल्लीकरांनी विश्वास दाखवलाच आहे तर आपण ही 100 दिवस बघू की वारा कुठल्या दिशेला वाहतोय ते. त्यावरून 5 वर्षांत काय होईल याचा अंदाज येईल. आणि तसंही जादूची कांडी असल्यासारखे सगळे लगेच आलबेल होत नाही, लागायचा तो वेळ लागतो, हे मोदींनी केंद्रात दाखवून दिले आहेच!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“तर, जे काय व्हायचे असेल ते होईलच! पण आता जरा ‘आप’चे कौतुक आणि अभिनंदन करा की 67/70 ही कामगिरी कौतुकास्पद आहेच. काय पटते आहे का? जाऊ द्या, चला चहा मागवा!”, सोकाजीनाना मिश्किल हसू तसेच चेहेर्‍यावर ठेवत.

सर्वांनीच हसत हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

जे ब्बात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१०० दिवसांत पुढिल ५ वर्षांच्या कारभाराचा अंदाज येतो हे चिंतोपंत मान्य करतात का पण? Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आयात केलेला उमेदवार मुख्यमंत्री पदाचा दावेदार करणे यापेक्षा अन्य कोण्तीही कृती भित्रेपणाची प्रतिक ठरत नाही हे अमित शहाला समजले नाही यातच भाजपाचा पराभव सामावला आहे. ज्याने आधीच्या निवडणूकीत भाजपाला यश मिळवुन दिले त्याचेही खच्चीकरण झाले आणी ज्या विरोधात लढत आहोत त्यांच्या गोटातला माणूस आयात करुन त्याला मुख्यमंत्रीपदाचे दावेदर करुन विरोधकच जास्त योग्यतेचे आहेत असाच संदेश दिला... आणी दिल्लीने गल्ली चुकवली... असो जे व्हायचे ते बळकट लोकशाहीचे उदाहरण आहे असेच वाटते. विषेशतः प्रादेशीक पक्ष संपवायचे भाजपाचे जे धोरण आहे त्याला जबरा चाप बसला. प्रचंड बहुमत मिळाल्यावर भाजपाने सर्व जुन्या मित्रांना तुछ्चतेची वागणूक दिली.... आता या निकालाने(उगाच्च) ममता ते नितीष, सेना ते अकाली द्ल सगळेच रिवाइटलाइज झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!