इतिहास १ - राणी ताराबाई

राणी ताराबाई

वाचक हो, आज मी आपल्यासमोर आपलाच इतिहास जो कि सर्वांनाच माहित आहे तरीही काहीजण त्यापासून अज्ञात आहेत त्यांच्यापर्यंत मी ती माहिती पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात हि विनंती.

महाराष्ट्राचा गौरवशाली "शिवइतिहास" घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने!सह्याद्रीचे कणखर कडे, गड, किल्ले, बुरुज आज ही इतक्या दीर्घ कालाने शिवइतिहासाची साक्ष देतात. स्वातंत्र्य हा मानवाचा मुलभूत हक्क आहे याची जाणीव झाल्यावर त्या थोर पुरुषाने स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला अन् मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य स्थापनेचा इतिहास ही घडविला. हा इतिहास नुसताच घडत नाही गेला तर तो इतक्या विविध पैलूंनी समृध्द होत गेला की आजमितीस एखादी घटना अभ्यासताना मानवी मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित! अशा थोर पराक्रमी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा!!
मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचं पहिलं पर्व संपलं आणि दुसर्या पर्वाला सुरुवात झाली. हे दुसरं पर्व अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. मराठ्यांचा एक राजा मारला गेला तर दुसरा राजा कर्नाटकात जाऊन राहिला. छत्रपती संभाजीराजांची पत्नी म्हणजे मराठा राज्याची राणी आणि राजपुत्र (येसुबाई आणि शाहू) मुघलांचे कैदी बनले. मराठ्यांचे गडकोट, जंजिरे, प्रदेश भराभर मुघलांच्या हाती पडले आणि काही काळ असं वाटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं मराठा राज्य संपलं, नष्ट झालं. ज्या मराठा
राज्यासाठी महाराजांनी अपार शक्ती आणि द्रव्य वेचलं, हजारो तरुण मराठ्यांचं बलिदान दिलं, ते मराठ्यांचं स्वातंत्र्य नष्ट झालं आणि मराठे पुन्हा गुलामीत पडले. पण ही भावना काही काळच पसरली. मराठ्यांनी लगेच स्वतःला सावरलं.
छत्रपती संभाजीराजांच्या क्रूर वधाने महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठा खवळून उठला आणि त्याने मिळेल त्या साधनांनीशी मुघल शत्रूशी गनिमीकाव्याने युद्ध सुरू केलं. राज्य नाही, राजा नाही, गडकोट नाहीत, मोठमोठ्या फौजा नाहीत, खजिना नाही, राज्ययंत्रणा नाही, तरीही या महाराष्ट्रातील लोक औरंगजेब बादशहाशी लढत राहिले, ही गोष्ट त्या काळात अचंबा वाटावी अशी घडली.
मराठे का लढत राहिले? कारण मराठ्यांची अस्मिता महाराणी ताराबाई यांच्या रूपाने प्रकट झाली होती.
इतिहास घडला तो कर्त्या व्यक्तींच्या कर्तृत्वावर, त्यातही कर्त्या स्त्रियांची नावं थोडीच!असचं एक कर्तबगार व्यक्तिमत्व ज्यांचं नाव भद्रकालीची आठवण करुन देतं ते म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या संस्थापिका महाराणी ताराबाई! भोसले घराण्यातील एक मनस्विनी!!
नेसरीच्या खिंडीत बहिलोल खानाशी लढताना प्रतापराव गुजर मृत्यु पावले अन् मराठ्यांचे सेनापतीपद रिक्त झाले मग चिपळूणच्या लष्कर मेळाव्यातून शिवाजी राजांनी संभाजी मोहीते (सावत्रआई तुकाबाई यांचे बंधु/सोयराबाईंचे वडील) यांचा पुत्र हंसाजी मोहीते यांची सेनापतीपदी निवड केली, हंबीरराव हा किताब दिला. अन् याच शूर सेनापतीच्या पोटी सुमारे १६७५ साली तेजस्वी तारा जन्मला. ताराबाई! अशा लढाऊ तळबीडकर मोहीते घरण्यात जन्म झाल्याने सहाजिकच त्यांना घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालविणे, मुळाक्षर ओळख इ. शिक्षण मिळाले होते.शुर सेनापतीची मुलगी पुढे शिवरायांची सुन झाली...अन् तिने स्वातंत्र्ययुध्दाची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याचा यत्न केला अगदी शुरपणाने.
शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापना केली, वृध्दीही केली त्याच बरोबर स्वराज्य संरक्षणही सुरु होतं पण त्यांच्या मृत्युनंतर स्वराज्याचं संरक्षण करणं दिवसेंदिवस खडतर होत चाललं कारण एकतर प्रधानमंडळाच अन् संभाजीराजांच पटत नव्हत...अन् त्यात भर म्हणून सोयराबाईंनी संभाजीराजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न केला (अर्थात तो यशस्वी झाला नाही). पण हा विषप्रयोगाच कट उघडकीस येताच संभाजीराजेंनी कणखर भुमिका घेत सोयराबाई अन् त्यांचा मुलगा राजाराम राजे यांच्यावर नजरकैद बसवली. पुढे सोयराबाईंचा मृत्यु ऑक्टोबर १६८१ साली झाला, त्यानंतर त्यांनी राजारामावर फारकाळ नजरकैद ठेवली नसावी. संभाजी राजांनी पुढाकार घेऊन राजाराम यांचा विवाह हंबीरराव मोहिते यांच्या कन्येशी म्हणजेच ताराबाईंशी करून दिला अन् भावी लढाईचा वारसा चालवणारी एक शूर मनस्विनी भोसले घराण्यात आली. लग्नाच्या वेळचं त्यांचं वय ९-१० वर्ष असावं, पण सख्या आत्याचा म्हणजे सोयराबाईंचा झालेला मृत्यु, चाललेल राजकारण यांचाही प्रभाव पडला होता.राजाराम राजेंचा हा दुसरा विवाह.पहिला विवाह जानकीबाई याच्यांशी झाला.ताराबाईंशी विवाह झाल्यानंतरही राजाराम राजांचे आणखी दोन विवाह झाल्याचे आढळते, राजसबाई अन् अंबिकाबाई यांच्याशी!!शिवाय त्याच्या नाटकशाळेतील सगुणाबाई ही पत्नीसम रक्षा होती.
ताराबाईंच्या लग्नाला ५-६ वर्षे सरली न सरली तोच मराठेशाहीला मोठा धक्का बसला तो संभाजीराजांच्या औरंगजेबाकडून क्रुर वध! १६८९ साली संभाजीराजांना पकडलं गेलं. संभाजीराजे कैदेत असताना त्यांची पत्नी येसुबाई यांनी मराठ्यांची बाजू सावरण्यासाठी स्वतःचा पुत्र शाहूराजे यांना पुढे न आणता राजाराम राजे यांना पुढे आणले. मंचकारोहण विधी नंतर राजाराम राजेंनी सगळी सुत्रं आपल्या हाती घेतली.इकडे संभाजीराजांचा क्रुरपणे वध केला. अन् राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडले. येसुबाईनी शक्य तितका काल किल्ला लढवला...अन् अखेर औरंजेबाने रायगड घेतला.शाहूराजे, येसुबाई, अन्य सरदार कैद केले.
पुढे राजारामाने ताराबाईंच्या साथीने मोघलांना कडवी झुंज दिली. वास्तविक संभाजीराज्यांच्या वधानंतर मराठ्यांची सत्ता नामशेष करायला जास्त वेळ लागणार नाही अशी अटकळ औरंगजेबाने बांधली होती. पण राजाराम राजेंनी ती फोल ठरवली.ह्या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जाणं, शत्रुशी लढणं, अशी सततची धावपळ अन दगदग यामुळे मुळचे नाजुक प्रकृतीचे असणारे राजाराम राजे आजारी पडले. तब्येत ढासळली अन् १७०० साली सिंहगडावर त्यांनी आपला देह ठेवला. यानंतर एकट्या स्त्रीने मोघलांना दिलेली झुंज ही मराट्यांच्या दुसर्याय स्वातंत्र्ययुध्दातील अतिशय कठीण काळ होय.
पुढे राजाराम राजांच्या मृत्युनंतर ताराबाईंनी आपला मुलगा 'शिवाजी'' याची मुंज व राज्याभिषेक करण्याची सुचना रामचंद्रपंत अमात्य यांनी केली पण पंतांनी संभाजीपुत्र शाहूराजे यांची आठवण करून दिली (त्यांची मुंज व्हायची होती) पण ताराबाईंनी "यांची मुंज अगत्यमेव मला कर्तव्य" असे बजावून सांगितलं अन् दुसर्याज शिवाजीचा मुंज आणि राज्याभिषेक जुन १७०० च्या दरम्यान विशाळगडावर पार पडला.इकडे बादशहाने पन्हाळा काबीज करण्यासाठी आपलं सैन्य शहजादा बेदरबख्त व जुल्फिकारखान यांच्यासमवेत पाठवलं पण ५० हजार पायदळ आणि ३० हजार घोडदळ असून ही पन्हाळ्याचा वेढा यशस्वी झाला नाही हे पाहून दस्तुरखुद्द औरंगजेब पन्हाळ्याकडे आला. पण पन्हाळा तसा काबीज न झाल्याने वाटाघाटी झाल्या व रोख ५५ हजार रुपये मराठ्यांनी वसूल करून किल्ला दिला, पुढे विशाळगडासारखा भव्य गड लढून नाही मिळत म्हणल्यावर मोघलांनी वाटाघाटी करून तब्बल दोन लाख रुपये मोजून किल्ला ताब्यात ठेवला. अशाच रितीने मोघलांनी चंदन्-वंदन, सिंहगड, राजगड, तोरणागड असे ९-१० किल्ले काबीज केले. इ.स. १७०० साली सुरु केलेली ही मोहीम १७०४ संपली ती तोरणागड घेऊनच. यातला तोरणाच काय तो फक्त लढून मिळाला, बाकीचे किल्ले वेढा घालूनसुध्दा सर न झाल्याने त्यांना भरभक्कम रकमा मोजूनच घेतले.
इकडे ताराबाई स्वस्थ नव्हत्या, किल्लेदारांना पत्र लिहून शक्य तितका काळ किल्ला लढवा, मनुष्यहानी जास्त होऊ देऊ नका अशा आशयाची पत्रे पाठवत, प्रसंगी रसदही पाठवत अन् इकडे लष्कर मोहिमेचाही विचार करत.थोडक्यात बचावात्मक धोरण त्यांनी राबविले पण १७०२ सालानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. इकडे किल्ले लढत होतेच तर दुसरीकडे त्यांनी गुजरात, माळवा, आंध्र, कर्नाटक, तमीळनाडू अशा लष्करी मोहिमा उभारल्या.एकीकडे बादशहा किल्ले घेण्याच्या मागे लागला होता पण त्याच बरोबर मराठी फौजा मुसलमानी राज्यांवर आक्रमणे करीत होत्या, त्यामुळे कित्येकदा त्याने जुल्फिकारखानास वेढ्याच्या कामातून काढून मराठ्यांचा बंदोबस्त करायला पाठवले. मोघली फौजा आपले तळ हलवून दुसरीकडे जायला लागल्या की मराठे त्यांच्यावर हल्ले करीत. भरीस भर निसर्गही पावसाळ्याच्या रुपाने मोघली फौजांवर अवकृपा करायचा.तरीही बादशहाने मोहिम सुरुच ठेवली.
शक्य तितका काळ किल्ला लढवायचा, मनुष्यबळाची नुकसानी टाळायची, किल्ल्यावरची शिबंदी, दिलेली रसद संपत आली की वाटाघाटीच्या बोलण्यात शत्रुला गुंतवुन आणखी वेळ काढायचा अन् किल्ला शत्रुला देताना भरभक्कम रक्कम उकळूनच द्यायचा हेच धोरण ताराबाईंनी ठेवले. कारण पुढे शत्रुची पाठ वळली की हे किल्ले पुन्हा हस्तगत करुच हा विश्वास त्यांना होता. अन् तो सार्थ ठरलादेखील.
गेलेले गडकिल्ले त्यांनी मोठ्या हिकमतीने हस्तगत केले जे की औरंगजेबाने फारमोठ्या प्रमाणात वित्तहानी, मनुष्यहानी अन् खूप मोठा काळ खर्च करुन घेतले होते.
किल्ले हस्तगत केल्यानंतर बादशहा वाकिणखेड्याची मोहिम संपवून अहमदनगरला आला अन् अखेरचे दिवस कंठू लागला.तरीही त्याच्या फौजा लढतच होत्या ताराबाईंच्या लष्करी मोहिमाही अर्थात सुरुच होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीलाच औरंगजेबाच्या राज्यात फौजा पाठवण्याचे धोरण ठेवले परिणामतः मराठ्याना कुठे कुठे प्रतिकार करावा हेच बादशहाला उमजत नव्हते. बादशहाचे पारडे खचत चालले तर उलटपक्षी शत्रु आरीस येण्याला आणखी थोडाच काळ लागेल हे दिसताच ताराबाईंनी मोघली प्रातांवर प्रचंड लष्कर मोहिमा उभारल्या अन् मराट्यांचा आपल्या प्रातांतील धुमाकुळ पाहण्याशिवाय बादशहाला गत्यंतर नाही राहिले.
२० फेब्रुवारी १७०७ रोजी औंरगजेबाचा मृत्यु झाला. १६८१ साली दक्षिणेत उतरलेला बादशहा १७०७ साली दक्षिणेतच गेला अन् तब्बल २७ वर्षांची ही लढाई मोहिम संपुष्टात आली.अन् तो काळ एक तेजस्वी इतिहास बनला. या काळात संताजी-धनाजी यांसारखे शूर सेनानी चमकले, ताराबाईंसारखी एक रणरागिनी तार्या.सारखी चमकली.
राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर म्हणजे इ.स. १७०० पासून ते औरंजेबाचा मृत्यु होईपर्यंत म्हणजे फेब्रु. १७०७ पर्यंत म्हणजे ७ वर्षे ताराबाई मराट्यांना सोबतीस घेऊन मोघलांशी झुंजत होत्या. मनुष्यहानी टाळण्यासाठी कधी बचावात्मक धोरण अवलंबित होत्या तर कधी चढाईचं! लष्करी मोहिमेत प्रसंगी त्या तळावर घोड्यावरून रपेट मारत, मुक्कामी राहात, सैन्यांचं मानसिक बळ वाढवत अशा अनेक गोष्टींमुळे सैन्यात उत्साह येई अन् याचा परिणाम युध्दभुमीत दिसे.
पन्हाळ्याचे किल्लेदार गिरजोजी यादव हे त्यांचे अत्यंत विश्वासु माणूस, बर्यातचदा त्यांच्याकडूनच आपले आदेश त्या मराठ्यांना सांगत. धनाजी जाधव, परशुराम त्रिंबक, रामचंद्रपंत अमात्य, शंकरजी नारायण अशा अनेक शुरांची साथ त्यांना लाभली.
बादशाहाच्या मृत्युनंतर त्याच्या मुलांमध्ये सत्तेसाठी तंटे निर्माण झाले अन् त्यासाठी उत्तरेकडे जात असताना त्याच्या पुत्राने शहजादा आज्जम ने शाहू राजांची (संभाजी पुत्र)सुटका केली. शाहू राजे स्वराज्यात परत आल्यानंतर सेनेतील अधिकारी त्यांच्यांकडे जाऊ लागले. पुढे त्यांनी छत्रपतीपदावर आपला हक्क सांगिताच भोसले घराण्यात झगडा निर्माण झाला. त्याच्यां अन् ताराबाईंच्यामध्ये कधेमधे प्रसंगी चकमकी सुध्दा झाल्या अन् दुफळी निर्माण झाल्याने सातारा व पन्हाळा अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या, इथून पुढे त्यांच्या कारकिर्दीला उतार लागला.
अवघ्या २५-२६ वर्षाच्या विधवेने मोघलांचा जो मुकाबला केला, रणसंग्राम केला तोच इतिहासात आज तिचं नाव अजरामर करतो आहे. लष्करी कारभारावर पुर्ण मदार ठेवून त्यावर जी जरब महाराणीनी बसवली त्यास तोड नाही. दरम्यान संताजी-धनाजी वितुष्ट, धनाजी-नेमाजी वितुष्ट, घोरपडे घराण्याची बंडखोरी, सरदारांची वतनासक्ती, सरंजामशाही अशा छोट्या मोठ्या घरच्या संकटांना तोंड देत औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रुला दिलेली झुंज हे अशक्य असं राष्ट्रकार्य ज्या तडफदारपणे, जिद्दीने पुर्णत्वास नेले त्यास तोड नाही.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

काही काळ विसरला गेला होता त्याला उजाळा मिळाला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाहू परत आल्यावर ताराबाईंची सद्दी संपली. कैक वर्षे नजरकैदेत कुजावे लागले तरी त्यांची जिद्द संपली नाही. पार १७६१ पर्यंत त्या जिवंत होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शाहू राजे स्वराज्यात परत आल्यानंतर सेनेतील अधिकारी त्यांच्यांकडे जाऊ लागले.

हे का व्हावे हे कळले नाही कधी. इतके वर्ष वाईट काळात मराठी सत्ता सांभाळल्यावर ताराबाईंना सोडुन सरदारांनी शाहू कडे जाणे हे दुर्दैवी होते.
ताराबाईंचे कर्तुत्व बघता आणि त्यांना मिळालेले आयुष्य बघता, जर मराठी सत्ता त्यांच्या कडेच राहीली असती तर फारच वेगळा इतिहास झाला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोयराबाईंचे वडील हंबीरराव असा उल्लेख दिसतो आहे.
हंबीरराव हे सोयराबाईंचे बंधू, राजरामांचे मामा होते असे मला वाटते.
त्यांची कन्या ताराबाई. ताराबाई- राजाराम विवाह (ताराबाईंचे आत्याच्या मुलाशी लग्न; राजारामांचे मामाच्या मुलीशी लग्न; which was a norm)
अन्यथा, हंबीरराव ह्यांची कन्या ह्या नात्याने ताराबी ही सओय्राबाईंची बहीण ठरते. राजारामांची मामेबहीण (व संभाव्य पत्नी) न ठरता मावशी ठरते.
.
.
ताराबाईंच्या काळाबद्दल काही अल्पपरिचित फ्याक्ट्स :-
ताराबाई औरंगजेबास शब्दशः पुरून उरल्या, त्याच्या मृत्यूनंतर पन्नासहून अधिक वर्षे जिवंत.
अखेरपर्यंत सत्तावर्तुळाशी निगडित.
त्यांचे आणि पुण्याच्या पेशव्यांचे (विशेषतः नानासाहेब) फारसे पटले नाही.
पण पेशवाई ऐन भरात असतानाही नानासाहेबाने ताराबाईंशी थेट पुन्हा लढाई करणे टाळले.
पानिपतात पराभव झाल्याचे ऐकल्यावर त्यांनी "बरे झाले" असे उद्गार काढले.
(त्याकाळी माहिती-दळण वळण यंत्रणा प्रगत नसावी. कोणत्या स्केलवर आणि केवढा प्रकोप झालाय ह्याची निश्चित कल्पना मिळाली नसावी.
नानासाहेब पेशव्याचे नाक कापले गेले; त्याची अजून एक मोहिम फसली; इत्के मात्र समाधान असावे.)
भाउसाहेब पेशव्यांना कोल्हापूरची पेशवाई देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
(त्यायोगे पेशवाईत फूट पडून पुन्हा कोल्हापूर संस्थान प्रबळ होइल. सातारा प्रबळ असण्याच्या कारणांपैकी एक म्हणजे सातार्‍याच्या अधिपत्याखालील पुणेकर पेशवाई जोरात होती)
.
.
शिवाय शाहूला नंतरच्या काळात दत्तक प्रकरणात जी व्यक्ती दत्तक म्हणून त्यांनी घ्यायला लावली;
त्या केसमध्ये त्यांनी बरेच यू टर्न मारले.
.
.
कोल्हापुरात अत्यंत चांगला कारभार केला.
.
.
महालातील घडामोडिंनंतर काहीकाळ पुत्रासमवेत अटकेत.
(बहुतेक सावत्र पुत्राने काहीकाळ गादी बळकावली कारस्थान करुन)
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माहितीपूर्ण लेखन.
ऐसीअक्षरेवर स्वागत आहे.

दोन परिच्छेदांमध्ये एक ओळ सोडलीत तर वाचणे अधिक सुलभ होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद,
आपल्या प्रतिक्रियेसाठी मी आपली अत्यंत आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण लेख. इतिहासात राणी ताराबाई यांना न्याय देण्याचे कार्य, महाराष्ट्र सरकारने केले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0