याच काळात इंग्लंड दुसऱ्या जागतिक महायुद्धात पूर्णपणे फसलेला होता. इंग्लंडमधील बहुतेक वैज्ञानिक ब्रिटिश सरकारच्या युद्धोपयोगी प्रकल्पात भाग घेत होते. ऍलन ट्युरिंगही ब्लेचली पार्क येथील कोडब्रेकिंग प्रकल्पात सहभागी झाला. मुळातच ऍलन ट्युरिंगला व्यवहारोपयोगी प्रयोगात रुची होती. अनेक वेळा आकाशाकडे पाहून तो अचूक वेळ सांगत असे. ब्लेचली पार्क येथील नोकरी त्याला फार आवडली. जर्मन सैन्य Enigma या अत्याधुनिक कोडिंग मशीनद्वारे गुप्तसंकेत पाठवून इंग्लंडच्या कुठल्या जहाजावर वा विमानावर हल्ला करायचे आदेश देत होते. या संकेतलिपीचा शोध घेऊन जर्मन सैनिक हल्ला करण्यापूर्वीच इंग्लंड सैन्याला धोक्याचा इशारा देण्याचे काम या पार्कमधून चालायचे. गणितीय तर्क व कोडब्रेकिंगचे अत्याधुनिक तंत्र वापरून कमीत कमी वेळेत संकेतलिपीतील क्लिष्टपणा शोधून शत्रुसैन्यावर मात करण्याची कुशलता ट्युरिंगने आत्मसात केली. या पूर्वीच्या प्रयत्नात डीकोडिंग मशीनमधील गीअर्स, स्प्रिंग्स, इत्यादींच्या किचकट रचनेमुळे व डीकोडिंगसाठी वापरत असलेल्या क्लिष्ट तार्किक मांडणीमुळे डीकोडिंगला बराच उशीर लागत होता. अट्लांटिक महासागरातील इंग्लंडच्या बोटी बुडाल्यानंतर हल्ला होण्याचा इशारा पोचत होता. परंतु ट्युरिंगची तर्कशुद्ध विचार पद्धती, ट्युरिंगने शोधलेले बोंबे (Bombe) मशीन्स व त्यावर काम करणारी माणसं, नियोजन, इत्यादीमुळे डीकोडिंग अत्यंत कमी वेळेत होऊ लागले. इंग्लंडच्या बोटी सुरक्षितपणे शत्रुसैन्यावरील हल्ला परतवू लागल्या. सुरुवातीला हे काम मंदगतीने चालत होते. जर्मन सैन्य संकेत पाठविण्यासाठी short wave signalsचा वापर करत होती. या सर्व गोष्टींचा मागोवा घेत ऍलन ट्युरिंगने डीकोडिंगसाठी व्यूहरचना केली होती. ट्युरिंगच्या डोक्यातील संगणक जरी अस्तित्वात आले नसले तरी त्यातील महत्वाचे भाग - स्मृती, प्रक्रिया व reconfigurable सॉफ्टवेअर - यांची प्रत्यक्ष चाचणी ब्लेचली पार्कमध्ये होऊ लागली. या गोष्टीसाठी वेगवेगळ्या इमारतींची व्यवस्था केली. मशीन्सवर काम करणाऱ्यात बहुतेक महिला होत्या. बोंबे मशीन्स, त्यावर काम करणाऱ्या उत्साही महिला व ट्युरिंगची प्रचंड तार्किक बुद्धीमत्ता इत्यादीमुळे डीकोडिंगचे काम सुलभ झाले.
याच सुमारास ऍलन ट्युरिंग ब्लेचली पार्क येथे काम करत असलेल्या जोन क्लार्क या तरुणीच्या प्रेमात पडला. अत्यंत प्रामाणिकपणे स्वत:मधील समलिंगी आकर्षणाबद्दलही त्याने प्रेमिकेला सांगून मोकळा झाला. दोघेही 9-10 ची शिफ्ट संपवून जवळ पासच्या बागेत प्रेमाराधन करत होते. ऍलन ट्युरिंग गणितीय अनुभवाच्या 'रोमांचक गोष्टी' तिला सांगत होता.
मित्रसैन्याचा डीकोडिंगच्या संदर्भातील कामाची तत्परता ओळखून जर्मन नौदलाने प्रगत तंत्रज्ञानानुसार कोडींगच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केले. Electrical signal यंत्रणेतील संशोधनामुळे शत्रुसैन्याची कोडिंग यंत्रणा बळकट झाली. ब्रिटिश नौदलाची वाताहत होऊ लागली. जहाज व विमान यांचा अचूक अंदाज घेऊ शकणारी रडार यंत्रणा अजूनही बाल्यावस्थेत होती. त्यामुळे ट्युरिंगच्या टीमवर भार मोठी जबाबदारी होती. रात्रंदिवस काम करून जर्मन संकेत प्रणालीचा भेद त्यानी केला. जर्मन सैन्य नवे नवे संकेत प्रणाली विकसित करत होती. त्याचप्रमाणे इकडे ट्युरिंग तर्कशक्ती वापरून डीकोडिंग करत होता. काही काळानंतर बोंबे मशीनच्या मर्यादा उघडे पडू लागल्या. ट्युरिंगला बोंबेवर आधारित असलेल्या यंत्रणेऐवजी कोलोसस नावाचे नवीन प्रकल्प हाती घेऊन डीकोडिंग यंत्रणा उभी करायची होती. प्रकल्प प्रस्तावातील कोलोसस मशीन ट्युरिंगच्या कल्पनेतील मशीनच्या जवळपास जाणारे मशीन होते. बोंबे मशीन्ससाठी शेकडो किलेमीटर लांबीच्या तारा विद्युत वाहक म्हणून वापरल्या होत्या. काम करताना त्या तारा प्रचंड प्रमाणात तापून खोलीचे तापमान वाढत होते. अनेक वेळा तेथे काम करणाऱ्या महिलांना तेथील पुरुषांना बाहेर काढून अर्धनग्नावस्थेच काम करावे लागत असे.
प्रकल्प प्रस्ताव व त्यासाठीची निधीची मागणी चर्चिलपर्यंत गेली. चर्चिल स्वत: या प्रकल्पाला अग्रक्रम देऊन निधीचा तुटवडा पडणार नाही यासाठीचे आदेश दिले. तरीसुद्धा कोलोससमध्ये रोज काहीना काही बदल करावे लागत होते. दिवसे न दिवस त्यातील किचकटपणा वाढतच चालला. जर्मन सैन्य रोज नवीन नवीन तंत्र वापरत होते. ऍलन ट्युरिंगला त्यंच्याबरोबर स्पर्धा करणे अवघड होऊ लागले. कोलोसस adding machines च्या तुलनेत कित्येक पटीने वेगळे होते. परंतु खऱ्या अर्थाने ते संगणक नव्हते. ट्युरिंगच्या कल्पनेतील मशीनपासून फार दूर होते. त्याचा मंदवेग डोकेदुखी ठरत होता.
केवळ डीकोडिंगच नव्हे तर कोडींगसाठीसुद्धा ट्युरिंगने डिलाइला यंत्रणेची रचना केली होती. मित्र राष्ट्रा - राष्ट्रातील संवादाचा आशय शत्रुराष्ट्रांना कळू न देण्याची ती व्यवस्था होती. यात मूळ ध्वनी लहरीत scrambled लहरींचे मिश्रण करून पाठवण्यात येत होते. ज्यांना संदेश पोचवायचे आहे तेच फक्त scrambled भाग वेगळे काढून संदेश ऐकू शकत होते.
1945मध्ये युद्धसमाप्तीची घोषणा झाली. ट्युरिंगला याच क्षेत्रात आणखी जास्त संशोधन करायचे होते. ब्लेचली पार्क येथील काम संपले होते. ट्युरिंग यानी आपला प्रस्ताव भौतशास्त्रात प्रगत संशोधन करणाऱ्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (NPL) कडे पाठवला. मशीनमधील हार्डवेअरला हात न लावता कामाच्या स्वरूपानुसार सातत्याने बदलत जाणाऱ्या मशीनचा तो प्रस्ताव होता. याच सुमारास सहमतीने जोन क्लार्क व ट्युरिंग एकमेकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मुळात जोनला समलिंगी माणसाच्या बंधनात अडकून घेणे योग्य वाटत नव्हते. पुन्हा एकदा ट्युरिंग एकाकी पडला.
NPLमधील सुरुवातीचे दिवस चांगले गेले. उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेल्या चार्ल्स डार्विनचे नातू सर् चार्ल्स डार्विन त्या संस्थेचे संचालक होते. परंतु या वरिष्ठ संचालकाच्या काही कल्पना कालबाह्य होत्या. ऍलन ट्युरिंग यानी वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या मशीन्सची रचना करण्यास त्यांचा विरोध नव्हता. परंतु ट्युरिंगच्या universal मशीनचे खूळ त्यांना पसंद नव्हते. एकच मशीन टाइप करणार, आकडे मोड करणार, हिशोब ठेवणार, चित्रं काढणार, गाणं म्हणणार, कविता - कादंबऱ्या लिहिणार... हात - पाय चिकटविल्यास शेतात जाऊन शेतीही करणार... अशा प्रकारच्या अशक्यातल्या गोष्टीसाठी श्रम, वेळ आणि पैसा खर्च करणे त्यांना योग्य वाटत नव्हते. ट्युरिंगला हवे असल्यास स्विचिंग रिलेज, vacuum ट्यूब्स, इतर इलेक्ट्रॉनिक सामान घेण्यास त्यांची आडकाठी नव्हती. शुद्ध गणितातील प्रमेयावर संशोधन करण्यास त्यानी उत्तेजन दिले असते. परंतु ट्युरिंगच्या डोक्यातील software हे त्यांच्या दृष्टीने खुळचटपणाचे होते. चित्रविचित्र कल्पना डोक्यात असलेल्या या तरुणाला वास्तवाचे भान नाही या निष्कर्षापर्यंत ते पोचले. युद्धकाळात त्यानी काही चांगले काम केले असले तरी सर् डार्विन मात्र त्याच्या खुळचटपणाला उत्तेजन देण्याच्या मनस्थितीत नव्हते.
ट्युरिंग पूर्णपणे वैतागला होता. त्याच्या डोक्यातील संगणकाच्या रचनेसाठी वायर्स, वाल्व, स्विचेस इत्यादी बाह्य घटकांबरोबरच कार्यनिर्देशाप्रमाणे घटकांचे नियंत्रण करू शकणाऱ्या programming ला पर्याय नाही याची त्याला खात्री पटू लागली. प्रत्येक वेळी हार्डवेअर बदलण्याची गरज नाही; programmingमध्ये बदल केलेतरी पुरेसे ठरेल. त्याच्या कोलोसस डीकोडिंग यंत्रणेच्या प्रकल्प प्रस्तावात या सर्व गोष्टी होत्या. जर्मन सैन्याच्या बदलत्या संकेतानुसार आतील कुठल्याही घटकांना हात न लावता डीकोडिंग करण्यात कोलोसस जवळ जवळ यशस्वी झाली होती. हे उदाहरण माहित असूनसुद्धा ट्युरिंगला पुढील संशोधन करण्यास वाव मिळत नाही, याचे त्याला वाईट वाटू लागले.
बाहेरच्या बाजारात त्याच्या मनाप्रमाणे अगदी लहान आकारातील स्विचेस, स्टोरेज डिव्हायसिससारखे घटक अजूनही उपलब्ध नव्हत्या. programmingची कार्य प्रणाली अनेक स्टेप्समध्ये विभागलेली होती. प्रत्येक स्टेपसाठीच्या विद्युत मंडलासाठी 4-5 घटक असल्यामुळे मशीनचा आकारमान वाढत होता. रडार संशोधनाच्या प्रयोगाच्या पाइपमध्ये पारा भरून त्यात तरंग उमटविल्यास ते तरंग अचूकपणे परत येत होत्या हे त्याच्या लक्षात आले. ऍलन ट्युरिंग यानी संगणकातील मेमरीसाठी याचा वापर करता येता का या विचारात पडला. संचालकाच्या कपीमुष्टीतून पैसा सुटत नव्हता. लॅबच्या आजूबाजूला पडलेल्या पाइपचे तुकडे व तारा वापरून तो प्रारूप तयार करत होता. खरे पाहता वाल्वला पर्याय ठरू शकणारा व आकारमानात अत्यंत कमी असलेल्या ट्रान्सिस्टरवर अमेरिकेत अत्यंत गुप्तपणे काम चालू आहे याची कल्पना त्यावेळी त्याला नव्हती. 1946 -47 ही दोन वर्ष वाया गेले म्हणून दुसऱ्या नोकरीच्या शोधाला लागला.
1948 च्या सुमारास ट्युरिंग मॅंचेस्टर विद्यापीठात नोकरी करू लागला. या विद्यापीठात संगणकाच्या जवळपास जाणाऱ्या प्रकल्पाचे काम जोराने चालू होते. हाही त्या गटात सामील झाला. यूद्धपूर्व काळात प्रसिद्ध झालेल्या ऍलन ट्युरिंगच्या शोधनिबंधाच्या आधारे ब्रिटन व अमेरिकेत काही प्रकल्प हाती घेण्यात आले होते. कोलोससची सुधारित आवृत्ती तयार होत होती. परंतु ट्युरिंगच्या विचित्र वागणुकीला कंटाळल्यामुळे केंब्रिज व प्रिन्स्टन येथील दरवाजे त्याच्यासाठी बंद झाले होते. त्यातल्या त्यात मँचेस्टर बरे म्हणून तेथे तो काम करू लागला. मँचेस्टर येथील वैज्ञानिक, व गणितज्ञ जरी मित्रत्वाच्या नात्याने वागत असले तरी प्रारूपातील बदलासाठी ऍलन ट्युरिंगने केलेल्या सूचना ऐकण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. मशीन शॉपमधील तंत्रज्ञ प्रारूपात बदल करू शकले असते; परंतु ट्युरिंगच्या हेकेखोरपणाला ते कंटाळले. ऍलन ट्युरिंगची लंडनस्थित उच्चाराची लकब मँचेस्टरच्या तंत्रज्ञांना आवडत नव्हती. एका प्रकारे तो प्रादेशिकवादाचा बळी ठरला. अमेरिकेतील ट्रान्सिस्टरवरील संशोधन शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचलेले होते. त्याचा वापर करून अत्यंत लहान आकारातील विद्युत मंडल तयार करणे शक्य झाले असते.
याच काळात त्यानी कृत्रिम बुद्धीमत्तेसंबंधी विचार करून शोधनिबंध लिहिला. परंत् त्यात काही विशेष नाही म्हणून वरिष्ठानी ते प्रसिद्ध करू दिले नाही. त्याच्या मृत्यु पश्चात 1968मध्ये निबंध प्रसिद्ध झाल्यानंतर जगाला त्याची किंमत कळली व त्यावरील संशोधनाला गती मिळाली. त्याचप्रमाणे ऍलन ट्युरिंग यानी जीवशास्त्राविषयी केलेले संशोधनही अभूतपूर्व ठरले. लहानपणापासूनच त्याला निसर्ग व गणित यांच्यातील संबंधाविषयी कुतूहल होते. फुलाच्या पाकळ्यांची संख्या फिबोनाकी संख्यांशी जुळतात याचे त्याला आश्चर्य वाटत होते. त्याचप्रमाणे बिबटे, मांजर, गायी यांच्या त्वचेवरील ठिबके कशामुळे तयार होतात यावर तो विचार करून पेशीमध्ये रासायनिक प्रक्रिया घडत असावी असा अंदाज वर्तविला होता. मोर्फोजेनेसिसची सैद्धांतिक संकल्पना मांडली. पुढील काळात त्याच्या या सिद्धांताने जीवशास्त्राच्या एका नव्या शाखेला जन्म दिला. एखाद्या मशीनमध्ये बुद्धीमत्ता आहे की नाही हे ठरविण्यासाठी त्यानी शोधलेले ट्युरिंग टेस्ट हा या क्षेत्रातील मैलाचा दगड ठरला.
परंतु मँचेस्टरच्या त्या उदास वातावरणात राहणे त्याला संदर्भहीन वाटू लागले. हळू हळू तो तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. ट्युरिंगची आई त्याला पत्र पाठवून लग्न करण्याचा आग्रह करत होती. दरवेळी काही तरी खोटे सांगून तो वेळ मारून नेत होता. खोटे बोलण्याचा व खोटे लिहिण्याचा त्याला कंटाळा येत होता. नैराश्य टाळण्यासाठी काही वेळा पुरुष वेश्यांशी समागम करू लागला. जानेवारी 1952 मध्ये अशाच एका अनोळखी तरुणाबरोबर रात्र काढल्यानंतर त्याच्या घरातील काही वस्तू गायब झाल्याचे त्याच्या लक्षात आले. वस्तूंच्या चोरीपेक्षा विश्वासघात केल्याचा त्याला राग आला होता. चोर म्हणून त्या तरुणावर त्यानी पोलीसात फिर्याद नोंदविली. परंतु पोलीस चौकीतील ही फिर्यादच त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरली.
मँचेस्टरमध्ये त्या काळी समलिंगी समागम हा अक्षम्य गुन्हा होता. कदाचित हा गुन्हा केंब्रिज वा लंडन येथे घडला असता तर ऍलन ट्युरिंगच्या विद्वत्तेची कदर करून त्याला सौम्य शिक्षा मिळाली असती. परंतु मँचेस्टर हे केंब्रिज वा लंडन नव्हे. कोर्टात त्याचा गुन्हा शाबीत झाला व कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली. त्याच्या युद्धकाळातील सेवेसाठी म्हणून कोर्टाने त्याच्यासोर दोन पर्याय ठेवले: तुरुंगवासाची शिक्षा भोगणे किंवा त्याकाळी समलिंगी प्रवृत्तीतून सुटका करून घेणाऱ्या वैद्यकीय प्रयोगात सहभागी होणे. तुरुंगवासाची बदनामी नको म्हणून ऍलन ट्युरिंगने दुसरा पर्याय निवडला. त्यासाठी त्याला हार्मोन्सचे इंजेक्शन्स घ्यावे लागणार होते.
ऍलन ट्युरिंगवर 'उपचार' चालू झाले. रोज गोळ्या - इंजेक्शन्स घ्यावे लागत होते. परंतु या उपचार पद्धतीचा त्याच्या मनावर परिणाम होऊ लागला. एकाग्रता ढासळू लागली. तो जवळ जवळ मनोरुग्णाच्या अवस्थेला पोचला. कोर्टाच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे लागत असल्यामुळे औषधाचे डोजही कमी करता येईना. हळू हळू या उपचाराचे उपदुष्परिणाम दिसू लागले. त्याच्या स्तनांचा आकार वाढू लागला. मानसिक व्याधी व शारीरिक व्यंग यामुळे तो डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. 1953मध्ये त्याच्यावरील उपचार थांबविण्यात आले. तरीसुद्धा तो आजारातून बरा होऊ शकला नाही. जून 1954 मध्ये झोपण्यापूर्वी एका कापलेल्या सफरचंदाच्या फोडीवर सायनाइडचा लेप लावून त्यानी खाल्ले व झोपेतच त्याचा मृत्यु झाला. वयाच्या 42 व्या वर्षी आत्महत्या करून त्यानी आपले जीवन संपविले.
एका चावलेल्या सफरचंदाचे प्रतिक म्हणून वापर करून स्टीव्ह जॉब्स याने माहिती तंत्रज्ञानात भर घालून नावलौकिक मिळविला. परंतु सफरचंदाच्या फोडीनेच संगणक व माहिती तंत्रज्ञानातील संकल्पनांचा जनक म्हणून ओळखला गेलेल्या ऍलन ट्युरिंगचा जीव घेतला!
(2010मध्ये ब्रिटिश प्रधान मंत्री डेव्हिड ब्राऊन यांनी ऍलन ट्युरिंगला ज्याप्रकारे कोर्टाने शिक्षा केली त्याबद्दल ब्रिटिश नागरिकांच्या वतीने जाहीर माफी मागितली. परंतु काळाचे काटे मागे सरकवता येत नाहीत. एका असाधारण बुद्धीमत्ता असलेल्या संशोधकाचा अशा प्रकारे अकाली मृत्यु होणे ही मानवतेला काळिमा ठरणारी घटना आहे.)
.....समाप्त
माहितीपूर्ण लेख आहेच, शेवट
माहितीपूर्ण लेख आहेच, शेवट दु:खदायकही! :(
म्हटलं तर अवांतरः
म्हटलं तर अवांतरः 'नांगरल्यावीण भुई' कधी वाचणार?
नांगरल्याविण भुई - (अ(त्य?)ल्प परिचय)
पुस्तक विकत घेऊन 2-3 वर्षे झाली तरी हे पुस्तक वाचायचे राहून गेले. कदाचित पुस्तकाचे शीर्षक misleading वाटल्यामुळे तसे झाले असेल. हे पुस्तक शेतीविषयक असावे असा (गैर)समज झाला होता. (शीर्षक वाचताना फुकोयामाचे One Straw Revolution सारखे काही तरी असावे असे वाटले असेल). परंतु पुस्तक वाचून संपवल्यानंतर हा एक सर्वस्वी वेगळा प्रयत्न आहे हे लक्षात आले. जयंत नारळीकर पती-पत्नींच्या मलपृष्टावरील थोडक्यात मांडलेल्या अनुकूल अभिप्रायापेक्षा कादंबरीचा आवाका फार मोठा आहे हे वाचताना लक्षात येवू लागले.
कादंबरीचा विषय, रचना, पात्रनियोजन, विषयाची मांडणी व शेवट या सर्व आघाड्यावर लेखक नंदा खरे यांना शंभर टक्के यश मिळाले आहे असे म्हणता येत नसले तरी या प्रकारे एखादी कादंबरी लिहिता येऊ शकते यातच लेखकाचे यश दडले आहे.
संगणकशास्त्राचे सैद्धांतिक पाया उभारणाऱ्या काही मोजक्या वैज्ञानिकापैकी अत्यंत नावाजलेल्या ऍलन ट्युरींगसारखे एक पात्र घेऊन त्याच्या सर्व गुणदोषासह त्याला भारतीय वातावरणात उतरवणे हे येरा गबाळाचे काम नाही. इंग्रजी साहित्यविश्वालासुद्धा आव्हानात्मक वाटणाऱ्या ट्युरिंगला भारतीय साज चढवणे खरोखरच सर्जनशीलतेची उच्च पातळी गाठण्यासारखे ठरेल.
मूळ वैज्ञानिक सिद्धांतापासून संगणकाची रचना करण्याचा ध्यास असलेल्या यातील पात्ररचना खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. टाटांची प्रेरणा व त्यांचा आर्थिक सहभाग, रामानुजनबरोबरची ट्युरिंगची काल्पनिक ओझरती भेट, टाटा-भिसे यांचे (त्या काळातील) स्वामित्व हक्कासाठीचा संघर्ष, इत्यादींचा अत्यंत खुबीने वापर करून सीता छत्रे या लहानपणीच विधवा झालेल्या व almost निराश्रित असलेल्या काल्पनिक स्त्रीच्या भोवती कथानक फिरते ठेवून या बाईला लेखकाने वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले आहे.
संगणक विज्ञानातील प्राथमिक अडथळे कशा प्रकारचे होते याची पूर्ण कल्पना हे पुस्तक वाचताना येते. विज्ञान - तंत्रज्ञानाचा वापर करून एखादी ललित साहित्यकृती उभी करणे व वाचकांना वेगळ्या विश्वात नेणे फार कठिण काम आहे. लेखक या कामी यशस्वी झालेले आहेत ही बाब पुस्तक वाचताना नक्कीच लक्षात राहते.
परंतु यातील बारकावे समजून घेण्यासाठी वाचकांकडे बहुश्रुतता आवश्यक आहे. ते जर नसल्यास कादंबरी निर्जीव वाटू लागते. मग मात्र (नेहमीप्रमाणे) दोष लेखकाच्या माथी मारून वाचक सहीसलामत स्वत:ची सुटका करून घेतो.
हे पुस्तक वाचताना The Soul of a New Machine ची आठवण होत होती.
नांगरल्याविण भुई,
नंदा खरे,
ग्रंथाली, मुंबई, 2005,
पृ.सं - 177, किं - 150 रु
(खरे पाहता या पुस्तकाचा हा फारच त्रोटक परिचय आहे हे मला जाणवते. नंदा खरे याच्या प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकावर लिहिलेले सुदीर्घ लेख वाचायला मला नक्कीच आवडेल. कुणीतरी हे काम नक्कीच करतील अशी आशा बाळगू या!)
मेघना, नानावटी दोघांचेही
मेघना, नानावटी दोघांचेही आभार
पुस्तक वाचायचे आहेच. पण...
असो. नक्कीच वाचेन :)
आवडला लेख. आधुनिक जगाचा कणा
आवडला लेख.
आधुनिक जगाचा कणा म्हणता येईल अश्या शाखेची पायभरणी करणार्या व्यक्तीचा असा शेवट दुर्दैवीच.
रोचक ओळख आहे...
चित्रपट डोक्यात गेला होता. पण लेख आवडला.
नुकताच ट्युरिंगवरचा सिनेमा
नुकताच ट्युरिंगवरचा सिनेमा बघितला. त्यानंतर हा लेख वाचल्यामुळे त्याच्या आयुष्याबद्दल आणि कार्याबद्दल अधिकच समग्र माहिती मिळाली.
'यंत्रांना इतर अनेक गोष्टी करता येतील, पण विचार करणं शक्य नाही. तो मानवी बुद्धीचाच भाग आहे.' असं म्हणणारे कुठे ना कुठे आपण मनुष्य आहोत त्यामुळे 'क्षुद्र' यंत्रांच्या पलिकडचे आहोत असं ठसवण्याचा प्रयत्न करतात. यांत्रिक जगापेक्षा नैसर्गिक, सेंद्रिय जग कसं जास्त चांगलं आहे हे सिद्ध करण्याचा वेळोवेळी प्रयत्न झालेला आहे. 'नया दौर' मध्ये बसपेक्षा घोडागाडीच कशी जास्त वेगाने धावू शकते हे दाखवून झालं. आत्ताच्या काळात सर्वोत्तम मानवी चेस खेळाडू कास्पारॉव्हची आयबीएम ब्लूशी मॅच घेऊन झालं... तंत्रज्ञान पुढे गेलं की मग हे प्रयत्न फारसा गाजावाजा न करता बासनात गुंडाळून ठेवले जातात. आणि गोलपोस्ट पुढे सरकतो.
ट्यूरिंगची थोरवी ही की विचारप्रक्रिया ही यांत्रिक क्रिया आहे हे त्याने ओळखलं. त्यासाठी आवश्यक असलेली जुजबी यंत्रणा - प्रोसेसर, मेमरी आणि प्रोग्राम (सॉफ्टवेअर) तयार केली आणि अमलातही आणली. आणि आजच्या संगणकयुगाचा पाया घातला.
विचारप्रक्रिया ही यांत्रिक क्रिया असण्याचे प्रचंड तात्विक परिणाम आहेत. मुख्य म्हणजे जर यंत्रदेखील माणसासारखाच विचार करू शकत असेल तर त्याचा अर्थ असा होईल की माणसाच्या शरीरात अभौतिकी काहीच नाही. प्रत्येक माणसाच्या मनात येणारे विचार हेदेखील अत्यंत क्लिष्ट यंत्रणेचा परिपाक आहेत. मेंदूच्या आतमध्ये कोणीतरी आणखीन अज्ञात, अभौतिक यंत्रणा विचार करून निर्णय घेते हे चित्र नष्ट व्हायला त्यामुळे मदत होते.
कुल.
हे म्हणजे "I dont exist..." अथवा "मी" हा एक भास आहे असेच सिध्द करणे झाले _/\__/\_
माय गॉड! दुर्दैवी
माय गॉड! :-O दुर्दैवी अंत!
ट्युरींगबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. या लेखांमधूनच माहिती मिळाली. खूप आभार.
परंतु काळाचे काटे मागे सरकवता येत नाहीत. >> जितक्या लवकर जास्तीजास्त लोकं हे समजून घेतील तेवढं सगळ्यांचच जगणं सुकर होइल.
एनिग्मा मशीन
अॅलन टयूरिंग आणि अन्य 'कोडब्रेकर्स' वापरत असलेल्या 'एनिग्मा मशीन'बद्दल येथे पहा.
फार छान लेख. "नांगरल्याविण
फार छान लेख.
"नांगरल्याविण भुई" बाजारात उपलब्ध आहे का?
धन्यवाद
याआधी अॅलन ट्युरिंगबद्दल काही माहिती नव्हती. योग्य काळाआधी जन्मलेल्या असाधारण व्यक्तीचीआणि त्याच्या दृष्टीची दुर्दिवी अखेर चटका लावून गेली.
लेख आवडला. नंदा खऱ्यांच्या
लेख आवडला. नंदा खऱ्यांच्या 'ज्ञाताच्या कुंपणावरून'मध्ये ट्युरिंग टेस्टबद्दल छान विवेचन होते. 'नांगरल्यावीण भुई' वाचायचे आहे.
लेख
कॉलेजात थिअरी ऑफ कम्प्युटर सायन्स असा एक विषय होता त्यात ट्युरिंग मशीन वगैरेचा अभ्यास केला होता. मात्र ट्युरिंगच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारशी माहिती नव्हती. लेखाच्या शेवटी फारच वाईट वाटले.