Skip to main content

छबू आणि ठोंबा

एक होता छबू
त्याला दिसला भुभू
भुभू होता झोपेत
घोरत होता मजेत
छबूने धरली शेपूट
भुभूला म्हटला ऊठ ऊठ
भुभूला आली जाग
चढला भलता राग
भुभू भुंकत उठला
छबू धावत सुटला

एक होता ठोंबा
त्याला दिसली हंबा
हंबा होती चरत
हिरवे हिरवे गवत
ठोंबा गेला मधे
आणि म्हटला, "दुध दे"
हंबाने उचलली मान
जोरात हलवले कान
चिडली होती भारी
ठोंबा म्हटला सॉरी

- ग्लोरी

प्रास Sat, 14/01/2012 - 17:00

मस्तंय की ही छोट्यांसाठीची कविता.....

आवडलीये.

मी Tue, 24/01/2012 - 18:17

छान, खालच्या कवितेची आठवण झाली.

एक होती आजी चिरत होती भाजी
भाजीतून निघाली आळी
आजी होती आंधळी
आळीने घेतला चावा
आजी म्हणाली धावा
मुले आली धावून
आळी काढली पाहून
आळी फेकली लांब
आजीचे झाले काम
मुले म्हणाली जाऊ?
आजीने दिला खाउ.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 24/01/2012 - 20:41

कवितेला मस्त लय आहे, कविता आवडली. "मी" यांनी दिलेली कविताही आवडली.

ग्लोरी, मधे गायबच झालेला होतात.

धनंजय Wed, 25/01/2012 - 01:51

मजा आली.

आणि म्हटला, "दुध दे"

या ओळीवर अडखळायला होते आहे - लयीकरिता थोडी लांब वाटते आहे.
म्हटला तिला "दूध दे"
असे लयीत (माझ्यासाठी) अधिक सोपे गेले.