माझी शाळा सृजन आनंद -५

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४

निकाल:
मी आधी कधीतरी सृजन आनंद मधील निकाल इतर निकालांपेक्षा वेगळे होते हे सांगितलेलं . हा एक नमुना :

विद्यालयाची देवाविषयी भूमिका
शाळेत कधीच देवादिकांच्या गोष्टी सांगितलेले आठवत नाही. किंबहुना देवाचे अस्तित्व शाळेला मान्य नव्हते पण जर तुम्हाला देव मानायचा असेल तरीही शाळेची ना नव्हती . पण शाळेने मुलांना प्रत्येक गोष्ट विचार करून , पटत असेल तरच करायला शिकवले . कोणत्याही गोष्टीचे (चांगली अथवा वाईट ) अंधानुकरण शाळेला मान्य नव्हते.
मला घरातल्या संस्कारांमुळे नेहमी उत्तरपत्रिकेत सर्वात वर श्री लिहायची सवय होती. ( आईने पत्राच्या वर सुरुवातीला श्री लिहायचे असे शिकवले होते ते मी आज्ञाधारकपणे सगळीकडे फॉलो करत होते ) ती सवय पुढील आयुष्यात माझी कमजोरी बनू नये म्हणून उदयदादांनी माझ्याशी ह्या विषयावर खूप चर्चा केली होती. पण तासाभराच्या चर्चेनंतर श्री लिहायचं कि नाही हा निर्णय त्यांनी सर्वस्वी माझ्यावर सोडला होता . त्यानंतर त्यांनी कधीही त्याबाबतीत मला टोकले नाही . आणि अर्थातच नकळतपणे माझी ती सवय सुटली.
गणेशचतुर्थी किंवा हादगा ( भोंडला- हत्तीच्या चित्राभोवती मुलींनी फेर धरून गाणी म्हणणे) सारखे सण सृजन मध्ये साजरे केलेले मला तरी आठवत नाहीत . नाही म्हणायला नागपंचमीला नागांचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने असणारे महत्त्व, साप - नाग ह्याबद्दलची शास्त्रीय माहिती वगैरे दिलेली आठवते
माझ्या ५वी नंतरच्या (पारंपारिक) शाळेत गणपती, हरितालिका , भोंडला असे सगळे सण साजरे केले जात पण ते खूपच जेन्डर स्पेसिफिक असे . म्हणजे गणपती आणायला / बसवायला फक्त मुलं आणि भोंडला करायला फक्त मुली असं . अजून एक (जे आत्ता जाणवतंय ) म्हणजे हे सर्व साजरे केले जाणारे सण केवळ हिंदू सण असत . ( ह्यामुळे शाळेतील इतर धर्मियांना काय वाटेल वगैरे विचार कधी कोणी केलाच नसावा. )
सृजन मध्ये असा मुलं -मुली किंवा धर्म किंवा इतरही बाबतीत भेदभाव कधीच नव्हता.

स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव
मी चौथीत (ऑगस्ट १९९७) असताना भारताचा ५०वा स्वातंत्र्यदिन होता. सृजन मध्ये ह्यावर्षी नेहमी प्रमाणे सकाळी ७ वाजता झेंडा वंदन न करता आम्हाला १४ तारखेला मध्यरात्री शाळेत बोलावले होते. ५० वर्षापूर्वी मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे वातावरण आम्हाला अनुभवायला मिळावे म्हणून ! रात्री सगळ्यांनी शाळेत भेटायची पहिलीच वेळ होती. मला वाटतं आम्हाला रात्री झोप येवू नये म्हणून त्या दिवशी दुपारी झोपण्यासाठी शाळा लवकर सोडली होती. संपूर्ण शाळेला दिव्यांनी सजवले होते आणि आम्ही बरोबर १२ वाजता झेंडा वंदन करून राष्ट्रगीत म्हटलं. अर्थातच हा अनुभव नेहमीच्या झेंडावंदनापेक्षा खूपच अनोखा होता. मला अंधुकसं आठवतंय कि बिन आवाजाचे केवळ रोषणाई वाले फटाके उडवले होते पण हे नक्की नाही कारण आमची शाळा फटाके , ध्वनि प्रदूषण , ह्यांच्या विरोधात होती.
विज्ञानाच्या तासाला उदयदादा नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन आणि संवर्धन , गरज आणि चैन , प्रदूषण , उर्जा , पारंपारिक-अपारंपरिक उर्जेचे स्त्रोत, सौंदर्यप्रसाधने आणि त्यांचे शरीरावर परिणाम अशा अनेक विषयांवर आमच्यासोबत चर्चा करत . त्या इतक्या परिणामकारक होत्या कि मी आजपर्यंत कधीही फटाके उडवू शकले नाही किंवा कधीच नेल-पेंट लावलेलं नाही Smile

मिठाचा सर्वे
सृजन मध्ये असताना मला वाटतं गांधीजयंतीच्या सुमारास (निमित्ताने) आम्ही मिठाचा सर्वे केला होता . आमच्या वर्गातून २ मुले आणि २ मुली असे मुलामुलींचे गट केले होते. प्रत्येक गटाला जवळपासची काही घरे नेमून दिली होती. साधारण ४ च्या सुमारास आम्ही शाळेतून बाहेर निघून घराघरांत जात असू . आणि हो, प्रत्येक गटासोबत एक ताई किंवा दादा असत. तर घराघरांत जाऊन आम्ही त्या घरातल्यांची माहिती घेतली होती. किती सदस्य राहतात आणि कोणते मीठ वापरतात , आयोडीनयुक्त मीठ वापरतात कि नाही इ इ .
हे सर्वे करायला जाण्याआधी आमची तयारी करून घेण्यात आली होती. मुळात आपण सर्वे का करतोय?, काय काय माहिती विचारली तर उपयोगी पडू शकते ह्या चर्चे नंतर सर्वांच्या फॉर्म मध्ये कोणते कोणते रकाने असतील हे ठरलं होतं. मग प्रत्येक गटाने आपले आपले फॉर्म / टेबल तयार केलेले होते.
मग कोणाच्या घरी गेल्यावर कसं बोलायचं , आपल्या गटाची ओळख कशी करून द्यायची , (माहिती द्याल का , आता वेळ आहे का वगैरे विचारयच) हे सांगितलं होतं .
सर्वे मधून आम्ही काही निष्कर्ष सुद्धा काढले होते. हा सर्वे करतानाचा फोटो :

क्रीडा महोत्सव :
सर्वच शाळांप्रमाणे सृजनमध्येही क्रीडा महोत्सव दणक्यात साजरा होत असे. वेगळेपणाचे मुद्दे तेवढेच सांगते . सृजनमध्ये प्रत्येक वर्षीच्या क्रीडा महोत्सवाचं वेगळं क्रीडा-चिन्ह असत असे . एका वर्षी क्रीडा-चिन्ह होतं खार . मला मुळीच आठवत नाहीये कि क्रीडा-चिन्ह कोणतं असावं हे मुलं ठरवत कि ताई -दादा कि मतदानाने ( कारण सृजन मध्ये बर्याच गोष्टी मतदानाने ठरवल्या जात ) पण एकदा क्रीडा-चिन्ह ठरलं कि मग वर्गावर्गातून त्यावर चर्चा होत असे . खारीचे कोणते गुण आपण क्रीडा-महोत्सवात अंगिकारले पाहिजेत ( चपळता , वेग ) किंवा खार हि क्रीडा-चिन्ह बनण्यास योग्य का आहे किंवा आहे कि नाही किंवा खार आपल्या क्रीडा-महोत्सवात आली तर कोणकोणते खेळ जिंकू शकेल, कोणकोणते खेळ जिंकू शकणार नाही अशा बर्याच चर्चा होत. क्रीडा-महोत्सव तीन दिवस असायचा . त्या काळात प्रत्येकाच्या गणवेशावर एक कागदी बिल्ला लावलेला असायचा . ह्या बिल्ल्यावर आमचं ( आतापर्यंत लाडकं झालेलं ) क्रीडा-चिन्ह आणि प्रत्येकाचं नाव आणि इयत्ता लिहिलेली असायची . पहिल्यापासूनच मैदानी खेळांची फारशी आवड नसल्याने क्रीडा-महोत्सवाच्या माझ्या आठवणी मर्यादित आहेत .

निरोप समारंभ :
४थीत गेल्यापासून हे आपलं शाळेतलं शेवटचं वर्ष ह्याची सर्वांनाच जाणीव झालेली . साधारण आई-बाबांची एकमेकांत नवीन शाळेबद्दल चर्चा चालू झाली होती. सृजन आनंद मध्ये ५वी नंतरचे वर्ग नाहीत हे जरी माहिती असलं तरी लीलाताई एका वर्षी एक असे पुढचे वर्ग चालू करतील आणि मग आपल्याला शाळा सोडून जावंच लागणार नाही अशी एक भाबडी आशा देखील मनात होती . पण तसं काहीही न होता समारोपाचा दिवस आला . निरोप समारंभाचा कार्यक्रम म्हणजे छोटसं स्नेह-संमेलनच असे . ४थी च्या वर्गातील मुलं -मुली नाच, नाटक गाणी सदर करत . कोणी आपलं मनोगत व्यक्त करत . बहुतेक जणांना सर्व कार्यक्रमादरम्यान कधी ना कधी रडू येत असे . मग आपण दुसर्या शाळेत गेलो तरीही दर वर्षी ह्या शाळेत येत राहायचं, भेटायचं इ गोष्टी ठरवल्या जात .
छोट्या वर्गातील (१ली ते ३री) मित्र-मैत्रिणीनापण वाईट वाटत असे . मग ते आम्हाला स्वत: केलेले भेट कार्ड किंवा पत्र लिहून देत. शेवटी सर्व ताई -दादा आणि ४थी चा वर्ग ह्यांचा एकत्र फोटो काढला जात असे ( फोटोची प्रत प्रत्येकाकडे निकला दिवशी दिली जात असे ). हा आमचा निरोप समारंभाचा फोटो :

दुसरी शाळा:
५वीपासून १०वी पर्यंत पारंपारिक शाळेत जाण्यावाचून पर्यायच नव्हता . तरीही आम्ही सृजन मध्ये मित्र-मैत्रिणी असलेल्यांच्या आई-बाबांनी आम्हाला हा बदल सोपा / सोयीचा जावा म्हणून आम्हाला एकाच शाळेत घालायचं ठरवलं . ह्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी एका रविवारी छोटीशी परीक्षा होती . गणित नक्की होतं. बाकीचे विषय आठवत नाहीत.
नवीन शाळेत एका वर्गात ६०-८० विद्यार्थी होते . एकेका बेंच वर ३ -३ जणांना ( दाटीवाटीने) बसावं लागत असे. छोट्या छोट्या गोष्टी ज्या वेगळ्या होत्या त्यांसाठी जुळवून घ्यावं लागलं . जसे कि इथे प्रत्येक तासाला शिक्षक वर्गात आले कि उठून उभं राहण्याची पद्धत होती . आम्हाला सृजन मध्ये ह्या गोष्टीची सवय नसल्याने सुरवातीला काही दिवस आम्ही बर्याचदा उठून उभं राहायचं विसरायचो .
आई-बाबांना पण ह्या शाळेची सवय होण्यासाठी ( सृजन आनंद ची सवय सुटण्यासाठी ) थोडा वेळ लागला . सृजन प्रमाणे इथे दर महिन्याला पालक सभा होत नसे म्हणून ५वी त दर महिन्याला माझी आई शाळेत येवून वर्गशिक्षकांना भेटून चौकशी करत असे . तिलापण ऑफिस मधून परवानगी वगैरे काढून येणं जरा जिकिरीचचं होत असणार. पण २-३ महिन्यानंतर तिला वर्गशिक्षकांनी सरळ सांगितलं कि तुम्ही दर महिन्याला येवून चौकशी करायची गरज नाही. काही लागलं तर चिठ्ठी पाठवून किंवा फोन करून बोलावून घेवू . Biggrin

काही मोजके अपवाद वगळता बाकीच्या शिक्षकांना शिकवण्यात , विद्यार्थ्यांना समजून घेण्यात फारसा इंटरेस्ट नसावा . अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे शिक्षक सरळ सरळ त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्यांना फेवर करायचे . ह्या शाळेत मुला-मुलींना वेगवेगळं बसवत आणि वर्गात मुला-मुलीत किंवा एकंदरीतच निकोप वातावरण नव्हतं . एकदा माझा एक सृजन मधला मित्र आणि मी दोन तासांच्या मध्ये गप्पा मारत होतो तर एका सरांनी त्याला मुलींशी का बोलतोस म्हणून ओरडलेलं आठवतंय .
ह्याही शाळेत माझे काही चांगले मित्र झाले , काही आवडते शिक्षक होते पण मी सृजन मधून नवीन शाळेत कधी रुजलेच नाही.मी केवळ जावं लागतंय म्हणून शाळेत जायचे आणि जास्तीत जास्त शाळा बुडवायची संधी शोधायचे.

मी आठवीत असताना शाळेत घडलेला एक प्रसंग खूप त्रासदायक होता. काही कारणाने लायब्ररीमधून वर्गात यायला उशीर झाला आणि सर वर्गात आले तेव्हाच मी आणि अजून १-२ मुल-मुली वर्गात आलो . मला अजूनही वाटत नाही कि हा काही फार मोठा गुन्हा होता पण त्या शिक्षकांनी मला ( आणि बहुधा अजून एका मुलीला ) पहिले आणि वर्गात उभं करून संपूर्ण वर्गासमोर अपमानकारक शब्दात ओरडले. त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी काही बोलायला गेले तर परत मला शिस्त कशी नाही , शिक्षकांप्रती आदर कसा नाही वगैरे ओरडले .
काही जणांना ह्यात विशेष त्रासदायक असं काही वाटणारही नाही पण माझ्यासाठी हा अनुभव खूप traumatic होता . मी घरी येवून खूप रडले आणि पुन्हा त्या शाळेत जाणार नाही मला दुसर्या शाळेत घाल असं आईला सांगितलं . माझं रडणं थांबेना तेव्हा आईने लीलाताईना फोन लावून दिला. त्यांनी मला जे काही झालं ते लिहून त्यांच्याकडे घेवून बोलावलं. त्याच रात्री मी आणि आई लीलाताईंच्या घरी गेलो . त्यांनी ते सगळं वाचलं आणि मग मला समजावून सांगितलं . मी शाळेत जाणारच नाही म्हणून हटुन बसले होते . माझी चूक नसताना मला ओरडले ह्याबद्दल मी शाळेवरच बहिष्कार टाकणार असं माझं म्हणणं होतं . शिवाय परत सगळ्या वर्गाला फेस करणंसुद्धा मला अपमानाचं वाटत होतं . लीलाताईंनी आणि आईने मिळून मला नक्की कसं समजावलं आठवत नाही पण त्यांनी मला "मन शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वीमोलाची" हि कविता सांगितल्याच मात्र आठवतंय ( आईला आणि मलापण ) , (लीलाताईंना असं कविता किंवा गोष्टी सांगून समजावण्याची सवय होती. )
तपशीलात न जाता सांगते कि पुढे आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, कधी कोणी माझ्या संतापाचं कारण लक्षात न घेता माझ्या शीघ्रकोपीपणाचा बाऊ केला तर कधी मी वयाने मोठ्यांशी निर्भीडपणे केलें प्रतिवाद म्हणजे माझ्याकडील संस्कारांची कमतरता असं म्हटलं गेलं आणि जेव्हा मला सगळं सोडून द्यावंसं वाटलं , जेव्हा मला परिस्थितीला सामोरं जाण्यापेक्षा पलायन सोपं वाटलं , तेव्हा प्रत्येकवेळी मला आईने लीलाताईंनी काय सांगितलय असं म्हणून ह्या कवितेची आठवण करून दिली. आणि मार्गावर आणलं .

असो. तर माझ्याकडील शाळेबद्दलच्या सांगण्यासारख्या गोष्टी संपल्या ( असं आत्ता तरी वाटतंय ). माझ्या लक्षात असणाऱ्या सर्वच गोष्टी जरी मी सांगितल्या आहेत तरी अजून अशा भरपूर गोष्टी असणार आहेत ज्या माझ्या लक्षात नाहीत त्यामुळे इथे सांगायच्या राहून गेल्या. आज मी जी काही आहे ते केवळ त्या शाळेमुळे आहे असं वगैरे मी मुळीच म्हणणार नाही . आपल्या जडण-घडणीसाठी बर्याच गोष्टी कारणीभूत असतात. आणि ह्या शाळेत रुजवले गेलेले विचार, उपक्रम आणि अभ्यासक्रम ह्यांचा माझ्या व्यक्तित्वावर निश्चितच परिणाम झाला . शाळेने आम्हाला काय दिले ते मी मोजणार नाही . शाळेने आम्हाला बाहेरील जगासाठी तयार केले कि नाही ते मला माहिती नाही पण शाळेने आमचं लहानपण, आमचं प्राथमिक शिक्षण आनंददायी केलं हे मात्र नक्की आणि त्यासाठी माझ्या मनात शाळेबद्दल नेहमीच कृतज्ञता आहे. असेल .

- सिद्धि

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (6 votes)

प्रतिक्रिया

छान लिहिलं आहे, मनापासून लिहिलं आहे हे जाणवलं.

आज मी जी काही आहे ते केवळ त्या शाळेमुळे आहे असं वगैरे मी मुळीच म्हणणार नाही . आपल्या जडण-घडणीसाठी बर्याच गोष्टी कारणीभूत असतात. आणि ह्या शाळेत रुजवले गेलेले विचार, उपक्रम आणि अभ्यासक्रम ह्यांचा माझ्या व्यक्तित्वावर निश्चितच परिणाम झाला . शाळेने आम्हाला काय दिले ते मी मोजणार नाही . शाळेने आम्हाला बाहेरील जगासाठी तयार केले कि नाही ते मला माहिती नाही पण शाळेने आमचं लहानपण, आमचं प्राथमिक शिक्षण आनंददायी केलं हे मात्र नक्की.

हा परिच्छेद विशेष आवडला. आपल्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणाबद्दलचे निर्णय घेताना तुमचा हा अनुभव नक्कीच उपयुक्त वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखमालिकेतला हा सर्वात महत्त्वाचा भाग ठरावा.
अनेक लहान वाटणार्‍या तरीही महत्त्वाच्या गोष्टी इथे विषद केल्या आहेत. सर्व्हे घेण्यासारखे उपक्रम अतिशयच स्तुत्य आहेत (नायतर आम्हाला घरोघरी हेल्पेज इंडीयाचे कागद घेऊन पैसे गोळा करायला पिटाळलं जायचं Sad )

आपल्या जडण-घडणीसाठी बर्याच गोष्टी कारणीभूत असतात. आणि ह्या शाळेत रुजवले गेलेले विचार, उपक्रम आणि अभ्यासक्रम ह्यांचा माझ्या व्यक्तित्वावर निश्चितच परिणाम झाला . शाळेने आम्हाला काय दिले ते मी मोजणार नाही . शाळेने आम्हाला बाहेरील जगासाठी तयार केले कि नाही ते मला माहिती नाही पण शाळेने आमचं लहानपण, आमचं प्राथमिक शिक्षण आनंददायी केलं हे मात्र नक्की आणि त्यासाठी माझ्या मनात शाळेबद्दल नेहमीच कृतज्ञता आहे. असेल .

सुरेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तरपत्रिकेत सर्वात वर श्री लिहायची सवय होती.

एसएससी बोर्डाच्या परिक्षेत असे लिहिलेले चालत नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एसएससी बोर्डाच्या परिक्षेत असे लिहिलेले चालत नव्हते.

सहमत आहे.

अर्थात, बोर्डाला चालत नसले, तरी शालांतर्गत परीक्षांत याची अंमलबजावणी फारशी सक्तपणे केली जात नसावी. आमच्या शाळेतील टारगट पोरे त्या चार दंडांमध्ये नुसते श्रीच काय, श्री अमूकमास्तर प्रसन्न, श्री तमूकबाई प्रसन्न किंवा कधी श्री जगदंबा प्रसन्न असेही लिहीत. झालेच तर त्या मास्तरांचे/बाईंचे/जगदंबेचे एखादे रेखाचित्रही काढत. असो.
..........
(मूळ लेखातून उद्धृत:)

मला घरातल्या संस्कारांमुळे नेहमी उत्तरपत्रिकेत सर्वात वर श्री लिहायची सवय होती. ( आईने पत्राच्या वर सुरुवातीला श्री लिहायचे असे शिकवले होते ते मी आज्ञाधारकपणे सगळीकडे फॉलो करत होते )

वैयक्तिक/कौटुंबिक/अनौपचारिक पत्रव्यवहारात, त्यातील मजकुरात जर कोणीतरी गचकल्याची अथवा तत्सम काही दु:खद वा अशुभ बातमी देणेचे नसेल, तर पत्राच्या शीर्षस्थानी, ओळीच्या मध्यभागी श्री अथवा तत्सम काही क्षेमसूचक शुभचिन्ह लिहावे, हा मराठी पत्रलेखनातील एक सामान्य (आणि बहुधा पारंपरिक) संकेत असावा. यात घरातल्या संस्कारांचा संबंध नेमका कोठे नि कसा यावा, ते कळत नाही.

शिवाय, आमच्या शाळेतील टारगट पोरे अलाहिदा, परंतु हा संकेत परीक्षांच्या पेपरांना लागू होत नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप छान, मनापासून लिहीलं आहेस. शेवटचा परिच्छेद तर फार सुंदर.

आज मी जी काही आहे ते केवळ त्या शाळेमुळे आहे असं वगैरे मी मुळीच म्हणणार नाही .

यावरुनच शाळेने तुमच्यात आंधळी भक्ती रुजू दिली नाही हे लक्षात येतं.
भोंडला,नवरात्र वैगेरे सण साजरे करणं म्हणजेच संस्कृती परंपरांचा आदर करणं हे बरयाच शाळांचं समीकरण दिसतं त्यामुळे ते विचारपूर्वक टाळणारी शाळा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेची ओळख आवडली.

आमच्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी चालवलेल्या शाळेतही सरस्वतीपूजन सोडून बाकी काही सण साजरे होत असल्याचं आठवत नाही. भोंडला वगैरे तर कधी पाहिलाही नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भोंडला वगैरे तर कधी पाहिलाही नाहिये.

अरेरे! किती रे तुम्ही कमनशिबी! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मग कधी करुन/म्हणून दाखवताय? Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो. शाळेत भोंडला कधीच नाय पाहिला. नातेवाईकांकडेच पाहिलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमच्या शाळेत होत असे. मज्जा यायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मला घरातल्या संस्कारांमुळे नेहमी उत्तरपत्रिकेत सर्वात वर श्री लिहायची सवय होती. ( आईने पत्राच्या वर सुरुवातीला श्री लिहायचे असे शिकवले होते ते मी आज्ञाधारकपणे सगळीकडे फॉलो करत होते ) ती सवय पुढील आयुष्यात माझी कमजोरी बनू नये म्हणून

श्री लिहिल्याने काय कमजोरी येते? उदा. ज्या बॉसला, इ मी दर पाच मिनिटानी भेटतो त्याला मेल लिहिताना प्रत्येक वेळी डिअर सर असे किंवा डिअर क्ष असे लिहितो. तसा हा मूर्खपणा आहे. प्रेम दाटून आल्यावरच किंवा अल्प का होईना प्रमाणात ते प्रकट करायचे असल्यासच डिअर शब्द वापरायला पाहिजे, नै का? मग श्री हा निरर्थक शुभारंभसुचक शब्द वापरायला लागलो काय कमजोरी येणार आहे?
---------------------------------------------------------------------------------------------------------

गणेशचतुर्थी किंवा हादगा ( भोंडला- हत्तीच्या चित्राभोवती मुलींनी फेर धरून गाणी म्हणणे) सारखे सण सृजन मध्ये साजरे केलेले मला तरी आठवत नाहीत . नाही म्हणायला नागपंचमीला नागांचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने असणारे महत्त्व, साप - नाग ह्याबद्दलची शास्त्रीय माहिती वगैरे दिलेली आठवते

अवघड आहे. नाताळच्या दिवशी ख्रिश्चन धर्माचे जगातील महत्त्व व प्रभाव अशी माहिती देण्यात आली का? किंवा रंगपंचमीला ४००० ते ७००० मायक्रोमीटर लांबीचे विद्युतचुंबकीय तरंग मानवाच्या आयुष्यात काय महत्त्व राखून आहेत हे सांगीतले का? माणूस सेलेब्रेशन प्रिय प्राणी असावा. ते सोडून उगाच डोकेफोड का करावी?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

गणपती, हरितालिका , भोंडला असे सगळे सण साजरे केले जात पण ते खूपच जेन्डर स्पेसिफिक असे.

हरितालिका आणि भोंडला काय असतं ते मैत नै पण गणपती जेंडर स्पेसिफिक? शाळेत?
----------------------------------------------------------------------------------------------------------

( ह्यामुळे शाळेतील इतर धर्मियांना काय वाटेल वगैरे विचार कधी कोणी केलाच नसावा. )

समजा पृथ्वीवरचे लोक मंगळावर पोचले. महिनाभरासाठी. तर काय तिथल्या लोकांनी पृथ्वीवासियांना कसे वाटेल म्हणून त्यांचा भिपावली हा सण साजराच करू नये का? काहीतरी अनावश्यक गंड निर्माण करण्यात शाळा यशस्वी झालेली दिसते. पारंपारिक शाळेत मुस्लिम मुलांनी घाट घातलेला त्यांचा सण शाळेने आणि मुलांनी हाणून पाडला असे देखिल झालेले काय?
----------------------------------------------------------------------------------------------------------------

सृजन मध्ये असा मुलं -मुली किंवा धर्म किंवा इतरही बाबतीत भेदभाव कधीच नव्हता.

अत्यंत आनंदाची बाब आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

संपूर्ण शाळेला दिव्यांनी सजवले होते आणि आम्ही बरोबर १२ वाजता झेंडा वंदन करून राष्ट्रगीत म्हटलं. अर्थातच हा अनुभव नेहमीच्या झेंडावंदनापेक्षा खूपच अनोखा होता. मला अंधुकसं आठवतंय कि बिन आवाजाचे केवळ रोषणाई वाले फटाके उडवले होते पण हे नक्की नाही कारण आमची शाळा फटाके , ध्वनि प्रदूषण , ह्यांच्या विरोधात होती.

१. आवाज आला नाही फटाक्यांमुळे प्रदूषण होतेच.
२. शाळा, राष्ट्रपती भवन, इ इ दिव्यांनी सजवणे, त्याचे सुंदर फोटो काढणे, त्याचा खर्च करदात्याच्या (मंजे देशाच्या) पैशातून करणे, नि वर लोकांना वीज वाचवायला सांगणे निरर्थक आहे.
पोल्यूशन इज डायरेक्ट फंक्शन ऑफ योर सोशल क्लास, एक्सपेंडीचर, इ इ. उगाच मगभर पाणी वाचवून आपण कसे पर्यावरण फ्रेंडली आहेत असे वाटवून घ्यायला सार्‍या शाळा कशा शिकवतात देव जाणो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

त्या इतक्या परिणामकारक होत्या कि मी आजपर्यंत कधीही फटाके उडवू शकले नाही किंवा कधीच नेल-पेंट लावलेलं नाही.

एक रिजनॅबिलिटी म्हणून प्रकार असतो. माझ्या मते, आपण इतकं आणि अशी ठराविक कृत्येच करत असाल तर, हे सगळं केवळ सिंबॉलिक आहे. प्रत्येक माणसाचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रत्येक प्रकारचे पोल्यूशन किती आहे याची एक लिस्ट लावली तर आपला क्रमांक कितीतरी फटाकेबाज व नेलपेंटबाजांच्या बराच वरचा निघण्याची बरीच संभावना आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------

जसे कि इथे प्रत्येक तासाला शिक्षक वर्गात आले कि उठून उभं राहण्याची पद्धत होती.

ही पद्धत चांगली होती. हा सन्मान व्यक्तिचा नसतो. आजही भारतात आणि बाहेर राजकारणात, प्रशासनात, आणि बर्‍याच अंशी व्यवसायात प्रमुख व्यक्ति प्रवेशित होते तेव्हा उभे राहणे अभिप्रेत आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------

काही मोजके अपवाद वगळता बाकीच्या शिक्षकांना शिकवण्यात , विद्यार्थ्यांना समजून घेण्यात फारसा इंटरेस्ट नसावा .

शिक्षण हा एक रसाळ विषय आहे असा गैरसमज प्रत्येकाचा असणे आवश्यक नाही.

अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे शिक्षक सरळ सरळ त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्यांना फेवर करायचे .

मंजे मार्क्स जास्त द्यायचे? उत्तर चूक असूनही? समोरच्या लोकांत भिन्नता आहे हे माहित असूनही ती नाहीच असे वागल्याने कृत्रिम वातावरण निर्माण होते.

ह्या शाळेत मुला-मुलींना वेगवेगळं बसवत आणि वर्गात मुला-मुलीत किंवा एकंदरीतच निकोप वातावरण नव्हतं . एकदा माझा एक सृजन मधला मित्र आणि मी दोन तासांच्या मध्ये गप्पा मारत होतो तर एका सरांनी त्याला मुलींशी का बोलतोस म्हणून ओरडलेलं आठवतंय .

मुलींना आणि मुलांना एकत्र वा वेगळे बसवायचे नसते. अलिकडे त्यांना मुद्दाम एकत्र बसवायचा प्रकार चालला आहे. रँडमली लोक एकत्र आले तर जनरली एक जेंडरचे लोक गँग-अप करतात (अनलेस देअर आर अदर फॅक्टर्स). शाळा वातावरण निकोप न राहावे म्हणून काय करत असावी असा विचार करत आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

काही कारणाने लायब्ररीमधून वर्गात यायला उशीर झाला आणि सर वर्गात आले तेव्हाच मी आणि अजून १-२ मुल-मुली वर्गात आलो . मला अजूनही वाटत नाही कि हा काही फार मोठा गुन्हा होता

शिक्षक किती कडक असावेत हे ही तुम्हीच ठरवणार? शिस्तीचे टॉलरन्सेस किती ते पण तुम्हीच सांगणार? नॉट फेअर. शाळा ज्ञान, शिस्त, विचार, संस्कार, इ इ द्यायची जागा आहे. It is not an institute to promote your ego.
------------------------------------------------------------------------------------------------------------

कधी कोणी माझ्या संतापाचं कारण लक्षात न घेता माझ्या शीघ्रकोपीपणाचा बाऊ केला तर कधी मी वयाने मोठ्यांशी निर्भीडपणे केलें प्रतिवाद म्हणजे माझ्याकडील संस्कारांची कमतरता असं म्हटलं गेलं

संताप ठिकै एखादवेळी. पण शीघ्रकोपीपणाचा बाऊ करायलाच हवा. इन मेनी अ प्लेस, आपण हे विसरत आहात कि आपण आपण आहात म्हणून आपल्याला जे वाटते ते सर्व योग्य ठरते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
फक्त इतकाच रिमार्क शाळेबद्दल आहे:

शाळेने आम्हाला बाहेरील जगासाठी तयार केले कि नाही ते मला माहिती नाही पण शाळेने आमचं लहानपण, आमचं प्राथमिक शिक्षण आनंददायी केलं हे मात्र नक्की आणि त्यासाठी माझ्या मनात शाळेबद्दल नेहमीच कृतज्ञता आहे. असेल .

या भागापुरते या शाळेचे वर्णन वाचल्यावर मला माझ्या छोट्या गावातल्या सरकारी प्राथमिक शाळेपेक्षा या शाळेत एकही गोष्ट अधिकची आढळली नाही. त्याला फक्त फोटोंचा अपवाद आहे. अजूनही ३-४ गोष्टी असाव्यात. ताई, दादा, इ इ .
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वसाधारणपणे असा 'थेट' प्रतिसाद देणे अप्रस्तुत आहे. फॉर्मली असं लिहित नाहीत. पण उद्देश चर्चा करायचा आहे.
------------------------------------------
मला आपली शाळा तसेच लेखमाला खूप आवडल्या हा भाग वेगळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाबौ! 'ललित' लेखनाची इतकी चिरफाड, 'चर्चाविषय' असता तर काय या विचारानेच शहारलो!
==
असो. काय बोलायचे! मोठी विचित्र खुमखुमी आहे! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे ललित आहे आणि त्यावर अशी प्रतिक्रिया अभिप्रेत नाही हे मला माहित नव्हतं. तरीही सदर प्रतिक्रिया सदर लेखनानंतर अप्रस्तुत आहे हे मला मान्य आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही जर १, २, ३, ४ असे मुद्दे लिहिले असते तर मला उत्तर देणे आणि तुम्हालाही उत्तर वाचणे सोप्पे गेले असते . असो. हे क्रमाने १, २, ३, ४ ची उत्तरे असे वाचावे

१.
मुळात तुम्ही जे डिअर सर चे उदाहरण दिले आहे ते चुकीचे आहे. डिअर सर हा पत्राचा किंवा मेल चा भाग आहे आणि तुम्ही तुमच्या पत्रात काय संबोधन वापरायचे हा तुमचा प्रश्न आहे. जर का मला उत्तरपत्रिकेत एकाऐवजी दोन समास आखण्याची सवय असती तर हे उदाहरण सयुक्तिक ठरले असते.
आता श्री बद्दल बोलू , मुळात श्री शुभारंभ सूचक आहे हे सगळं मला मान्य आहे आणि पत्रावर श्री लिहिणे हा माझा निर्णय असू शकतो परंतु उत्तरपत्रिका म्हणजे पत्र नव्हे. वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे दहावीच्या उत्तरपत्रिकेवर असे श्री वगैरे लिहिलेले चालत नाही . मी जर श्री लिहीतच राहिले असते , श्री वर विसंबून किंवा श्री लिहिले तर माझे चांगले मार्क येतात इ इ श्रद्धा बाळगली असती तर पुढे जावून ती माझी कमजोरी बनली असती आणि मग ती सवय सोडताना त्रास झाला असता . त्यामुळे वेळेतच माझ्याशी चर्चा करून , माझ्या श्री लिहिण्यामागचे reasoning जाणून घेवून ,मला विचार करायला लावून उदयदादांनी हे सर्व टाळले ( असे मला वाटते ).
२.
अवघड काय आहे ? नागाची माहिती सांगितलेलं कि इतर सण साजरे न केलेलं ?
आपण जे पूर्वापार सण साजरे करतो त्या मागील कारण काय ? ते का साजरे करावेत ? असे प्रश्न मुलांना पडणे साहजिक आहे आणि नाही जरी पडले तरी हि माहिती मुलांना लहान वयात दिली तर ते अधिक जाणतेपणे सेलेब्रेशन करतील असे आपणास वाटत नाही का ? नागपंचमी मला ठळकपणे आठवतेय. इतरही सणांची माहिती दिली गेली असावी .
३.
हरितालिका माहिती नाही ? खरच ? असो तुम्ही पूर्ण वाचलेलं दिसत नाही मी लिहिलंय जेंडर स्पेसिफिक म्हणजे कसं ते . तरीही पुन्हा डकवते :

म्हणजे गणपती आणायला / बसवायला फक्त मुलं आणि भोंडला करायला फक्त मुली असं

४.
अहो जोशी तुम्ही खरचच काहीही उदाहरणे देता . भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात हिंदू सोडून अन्य धर्मियांना परग्रहवासी कसे काय म्हणू शकता ?
असो. उदाहरण अत्यंत अयोग्य असले तरी उत्तर देतेय , एकीकडे "सर्वधर्मसमभाव " हे एक नैतिक मुल्य म्हणून शिकवायचे आणि दुसरीकडे फक्त हिंदू सण साजरे करायचे हा मला जरा दुटप्पीपणा वाटतो .
५.
अत्यंत आनंदाची बाब आहे- धन्यवाद.
६.
परत एकदा तुम्ही वाचण्यात गफलत केली आहे . मी म्हटलंय कि हे फटाक्यांच नक्की माहिती नाही कारण शाळा फटके आणि एकंदर प्रदूषणाच्या विरोधात होती .
आमची शाळा हि विनानुदानित होती. सरकारकडून पैसे घेत नव्हती . सो दिव्यांचा खर्च हा मुलांच्या पालकांनी किंवा शिक्षकांनी केला असणार आहे . त्यामुळे ज्यांनी ह्यासाठी पैसे खर्च केले त्यांनी / त्यांच्या मुलांनी त्याचा उपभोग घेतला . मध्येच तुम्ही राष्ट्रपती भवनाचा उल्लेख का केलाय ते कळले नाही .
७.
अर्थात. मी माझ्या फटके किंवा नेल पेंट च उदाहरण ह्यासाठी दिलाय कि काही लहान वयात मनावर ठसल्या गेलेल्या गोष्टी दीर्घकाळ सोबत राहिल्यात . मी खूप कमी प्रदूषण करते असा दावा मुळीच नाही .
८.
मी कुठे म्हटलय कि हि सवय चुकीची होती म्हणून ? छोट्या छोट्या गोष्टीत वेगळेपणा कसा होता आणि कसं जुळवून घ्यावं लागलं ह्याचं ते एक उदाहरण होतं फक्त .
९.
हे तुमचं मत केवळ शालेय शिक्षणाबद्दल आहे कि एकंदरीतच ? Anyway, तुम्हाला शिक्षण रसाळ वाटत नसेल तर मी काय बोलणार ? I respectfully disagree.
१०.
फेवर करणे म्हणजे केवळ मार्क जास्ती देणे नाही हो . गुणवत्तेतील फरक मार्कात व्यक्त होणारच आणि ते सर्वमान्य असते . इतर कारणांनी विद्यार्थ्यांत भेदभाव करणे आणि वेग-वेगळी वागणूक देणे ह्या अर्थानी लिहिलंय ते मी .
अवांतर आहे खूप पण तुम्ही "To kill a mockingbird" वाचलं नसेल असं वाटतंय . आणि ते तुम्ही वाचावं असही वाटतंय .
११.
शाळा मुद्दाम वातावरण निकोप न राहण्यासाठी काही करत होती असं नाही पण ते निकोप राहावं ह्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात नव्हते.
१२.
मुळीच नाही. हे शिक्षक खूप शिस्तप्रिय किंवा कडक आहेत असे अनुभव असते तर आम्ही देखील जास्तीची खबरदारी घेतली असती . त्यापूर्वी कधीच असं घडलं नव्हतं कि ह्या कारणाने सर चिडले आहेत किंवा हि गोष्ट त्यांना अजिबात चालत नाही .
१. ते अचानक चिडले
२. जरी इतर मुलही उशिरा आली आहेत हे माहिती होतं तरी त्यांनी त्यांना जे दिसले/ ज्यांची नावं माहिती होती त्यांनाच उभं केलं
३. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी सुद्धा दिली नाही
४. भर वर्गात जाहीर अपमान केला
ह्या गोष्टी माझ्या tolerance level च्या वर गेल्या .

आणि तुम्ही परत नीट वाचले नाहीये , मी लिहिलंय कि काहीना ह्यात विशेष त्रासदायक असं काही वाटणारही नाही.
मला असं वाटतं कि प्रत्येकाच्या upbringing नुसार ज्याचं त्याचं एक threshold ठरलेलं असतं . हि गोष्ट माझं threshold cross करणारी ठरली .
It is not an institute to promote your ego.- Of course not but that doesn't mean students can't ask for justice.
१३.
मी आधीपासून सांगतेय हे सर्व लेख माझ्या दृष्टीकोनातून लिहिले आहेत आणि त्यामुळे मी स्वत:प्रती biased असणार आहे . Everyone is entitled to their own opinion .
१४.
आनंद आहे .

सर्वसाधारणपणे असा 'थेट' प्रतिसाद देणे अप्रस्तुत आहे. फॉर्मली असं लिहित नाहीत. पण उद्देश चर्चा करायचा आहे.

तुमचा उद्देश चर्चा करण्याचा आहे म्हणूनच मी एवढा प्रतिसाद लिहिला . I know how it is played but I am not interested in playing प्रतिसाद - प्रतिउत्तर game. No offense to anyone but I have better things to do.
------------------------------------------

मला आपली शाळा तसेच लेखमाला खूप आवडल्या हा भाग वेगळा.

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

No offense to anyone but I have better things to do.

No offense to anyone but I have better things to do.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सिद्धी, लेखमाला अतिशय आवडली.

... शाळेने आमचं लहानपण, आमचं प्राथमिक शिक्षण आनंददायी केलं हे मात्र नक्की आणि त्यासाठी माझ्या मनात शाळेबद्दल नेहमीच कृतज्ञता आहे.

हे वाचून हेवा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विक्षिप्तबाई, हेवा वाटण्यासारखे काय आहे ह्यात?

आमची शाळा मुन्शिपाल्टी शाळा, क्र. १३, फरासखाना, सातारा ही touchy-feely अजिबात नव्हती, आमचे हेडमास्तर मला मुख्यत्वेकरून आठवतात ते त्यांच्या तोंडातल्या अर्वाच्य शिव्यांमुळे हे मी ह्या मालिकेतील पूर्वीच्या एका लेखाच्या प्रतिसादात लिहिलेच आहे, तरीपण शाळेने आमचं लहानपण, आमचं प्राथमिक शिक्षण आनंददायी केलं हे मात्र नक्की आणि त्यासाठी माझ्या(हि) मनात शाळेबद्दल नेहमीच कृतज्ञता आहे हेहि खरे आहे.

मनुष्य वयाने वाढला आणि त्याने शिकवलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग केला तर लहानपणच्या असल्या बारक्यासारक्या गोष्टी त्याच्यावर परिणाम करीत नाहीत पण चांगल्या गोष्टी मागे राहतात असा सार्वत्रिक अनुभव नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला माझ्या शाळांबद्दल कृतज्ञता असण्यापेक्षाही तिथे मिळालेल्या मैत्रिणींचं मोल जास्त वाटतं. आपल्या वयाच्या लोकांमध्ये कसं वागावं, बोलावं याचं शिक्षण शाळेत आपसूक मिळतं, ते घरात राहून मिळालं नसतं. शाळेने आमच्या आनंद-शिक्षणासाठी काही खास प्रयत्न केल्याचं आठवत नाही. प्राथमिक शाळेने निदान आनंद नासवण्याचा प्रयत्न केला नाही. सगळ्यांना समान वागणूक किंवा समान दुर्लक्ष एवढंच काय ते आठवतं.

माध्यमिक शाळा म्हणजे "मार्क्सिस्ट" जातीयता, पुढेपुढे करणाऱ्या मुलींना चढवणं, वेगळा विचार करणाऱ्यांकडे साफ दुर्लक्ष, शाळेतल्या बाईंच्या क्लासला जाणाऱ्यांना चांगलं म्हणणं आणि वर पुन्हा 'तू मूळची या शाळेची नाहीस' अशी सतत परकी, स्थलांतरित असण्याची टोचणी लावणं असे अनुभव होते. माध्यमिक शाळेत असताना हे जाणवलं पण शब्दांत मांडता आलं नाही. मला माध्यमिक शाळेबद्दल कृतज्ञता वगैरे नाही. त्या बाबतीत मला कोरडा व्यवहार आठवतो; आई-वडलांनी कर भरला, त्यातले काही पैसे आमच्या अनुदानित शाळेवर खर्च झाले, त्यातून मी शिकले. मात्र वरच्या वर्गांचे काही शिक्षक चांगले होते, त्यांच्याबद्दल आजही प्रेम वाटतं. शिक्षणाची यत्ता जसजशी वाढत गेली तसा शिक्षकांचा माणूस म्हणून दर्जाही उंचावत गेला आणि त्या संस्थांबद्दल आत्मीयता वाटते.

माध्यमिक शाळेमुळे माझं काही नुकसान झालं असं वाटत नाही; त्याचं कारण कदाचित आई-वडील, इमारतीत, शाळेत आणि त्याही पुढे मिळालेल्या मित्रमंडळात असावं. हे असं नशीब शाळेतल्या इतर अनेकांना लाभलं असेल असं वाटत नाही. दुर्दैवाने हे सुद्धा मला त्या वयात समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्या शाळेत अदिती शिकली त्या शाळेतल्या अन्य कोण्या विद्यार्थ्याकडून या प्रचंड निगेटीव प्रतिसादाची समीक्षा व्हायला हवी अशी मागणी करून खाली बसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या शाळेची गंमत अशी की 'हुशार' वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या आणि 'ढ' वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही दोन टोकांच्या ऐकलेल्या आहेत. दोन्ही प्रकारच्या वर्गांमध्ये शिकलेल्या, टोकांमधल्या प्रतिक्रियाही ऐकलेल्या आहेत.

या शाळेबद्दल अनेकांना स्मरणरंजनी, गोग्गोड लेखन करावंसं वाटतं आणि फार थोडे तटस्थपणे किंवा कडवटपणे बोलतात हे मलाही माहित्ये. 'मधली सुट्टी' नामक कार्यक्रम या शाळेत झाला होता तेव्हा फेसबुकावर लोकांना शाळाप्रेमाचे उमाळे आले होते. माणसाप्रमाणे अनुभव बदलत जाणारच. माझ्या वर्गात, माझ्यासारखीच, दुसऱ्या शाळेतून पाचवीत आलेली एक मुलगी होती. ती फार बोलणाऱ्यातली नाही, तिचा बहुतांश भर मार्क मिळवण्यावर असायचा आणि तिचा पहिला-दुसरा नंबर नेहेमीच असायचा. तिलाही शिक्षकांच्या पुढे-पुढे करायची सवय नाही, शाळेतल्या शिक्षकांच्या क्लासेसला ती जायची नाही, दिसायला ती गोड-गोड सुंदरही नाही. ती एकदा म्हणाली होती, "मी मार्क मिळवले नाहीत तर वर्गातल्या मुली माझ्याशी बोलायलाही येणार नाहीत." आमच्या शाळेतली बरीच मुलं मेरीट लिस्टमध्ये असायची. आमच्या बॅचला ही एकटीच मुलगी मेरीट लिस्टमध्ये आली. पहिलीपासून याच शाळेत असणारी हुशार मुलगी, जिच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, तिचा अर्थातच हिरमोड झाला होता, पण किमान वर्गमैत्रिणीचं अभिनंदन करण्याचं औदार्य तिच्याकडे होतं. प्राथमिक शाळेतल्या काही शिक्षकांकडे तेवढं शहाणपणही नव्हतं.

स्थलांतरितांची मानसिकता स्थानिकांपेक्षा वेगळी कशी असते हे शाळा बदलूनही आम्हांला कळलं होतं. या सगळ्यांचे अनुभव एकसारखेच असावेत असा (साम्यवादी!) हट्ट कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मनुष्य वयाने वाढला आणि त्याने शिकवलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग केला तर लहानपणच्या असल्या बारक्यासारक्या गोष्टी त्याच्यावर परिणाम करीत नाहीत पण चांगल्या गोष्टी मागे राहतात असा सार्वत्रिक अनुभव नाही काय?

फते कि बात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमची शाळा मुन्शिपाल्टी शाळा, क्र. १३, फरासखाना, सातारा ही touchy-feely अजिबात नव्हती, आमचे हेडमास्तर मला मुख्यत्वेकरून आठवतात ते त्यांच्या तोंडातल्या अर्वाच्य शिव्यांमुळे हे मी ह्या मालिकेतील पूर्वीच्या एका लेखाच्या प्रतिसादात लिहिलेच आहे, तरीपण शाळेने आमचं लहानपण, आमचं प्राथमिक शिक्षण आनंददायी केलं

शाळेने असं विशेष काय केलं तुमचं लहानपण, प्राथमिक शिक्षण आनंददायी होण्यासाठी ? कृपया सांगाल का ? कारण वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडल्यानंतर भूतकाळातील आठवणी रम्यच वाटतात ( शाळा , लहानपण , लहानपणी खाल्लेला मार इ इ ) असं मी पाहिलेलं आहे .

मनुष्य वयाने वाढला आणि त्याने शिकवलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग केला तर लहानपणच्या असल्या बारक्यासारक्या गोष्टी त्याच्यावर परिणाम करीत नाहीत पण चांगल्या गोष्टी मागे राहतात असा सार्वत्रिक अनुभव नाही काय?

नाही. लहानपणी घडलेल्या गोष्टींचा परिणाम दीर्घकाळ राहतो. पण अर्थात हे ज्याच्या-त्याच्या संवेदनशीलपणावर अवलंबून आहे. माझा एक ब्राझील मध्ये शिकलेला (अमेरिकेत उच्च शिक्षण घेणारा ) मित्र आहे. तो लहान असताना वर्गात पाढे शिकवले जात होते. त्याने शंका विचारली कि पाढे एक पासून का सुरु होतात शून्य पासून का नाही. वास्तविक शिक्षिकेला ह्याचं सरळ उत्तर देत आलं असतं कि शून्य च्या पाढ्यातील सगळे अंक शून्यच असतील इ इ. पण शिक्षिका तो प्रश्न किती मूर्खपणाचा अशा अर्थाचं काहीतरी म्हणून हसली आणि त्यावर त्याचे वर्गमित्र पण जोरजोरात हसले. ह्या घटनेनंतर प्रत्येक वेळेस वर्गात शंका विचारताना हा मित्र कचरतो. प्रत्येक वेळेस आपण स्वत:च हसं करून घेणार नाही न अशी भीती त्याला वाटते. वर्गात तू मोकळेपणे संवाद का करत नाहीस असा प्रश्न विचारल्यावर त्याने हा अनुभव सांगितला .

चांगल्या आणि वाईट अनुभवांतूनतून चांगलं घेण्याची किंवा चांगलं ते लक्षात ठेवण्याची वृत्ती छानच आहे पण म्हणून चांगलं आणि वाईट ह्यात फरक नाही असे नाही ना .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

ह्या घटनेनंतर प्रत्येक वेळेस वर्गात शंका विचारताना हा मित्र कचरतो. प्रत्येक वेळेस आपण स्वत:च हसं करून घेणार नाही न अशी भीती त्याला वाटते.

अगदी. अगदी. मी अश्या शालेय जीवनात अश्या अनुभवातून बरेचदा गेले आहे. त्यामुळे मी ही उघडपणे मत मांडणं, बोलणं, शंका विचारणं हे जाणूनबुजून नाही तर अगदी नकळत टाळते. बघून, समजून घेऊन मग व्यक्त होण्याकडे माझा कल असतो याचे तोटेही बरेच होतात विशेषतः फर्स्ट इंप्रेशनच्या आजच्या जमान्यात. शेवटी असे परिणाम ज्याच्या त्याच्या मानसिक घडण कशी आहे त्यावर अवलंबून असतात. तरी सृजन-आनंदसारख्या शाळांची गरज नाकारता येत नाही.
सिद्धीने म्हाट्ल्याप्रमाणे लहानपण कसंही असलं तरी मोठेपणी ते रम्यचं वाटतं पण ते रम्य करण्यात शाळेचा चांगल्या पद्धतीने सहभाग असावा ही अपेक्षा गैर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कधीकधी शाळेत पोचायला उशीर होइ. उशीर झाला की शिक्षा/सजा/शासन होइ. कधी मैदानाला धावत धावत एक दोन चकरा मारायला लावत; कधी उठाबशा; कधी नुसतीच बोलणी बसत. "उशीर का झाला ? " ह्या प्रश्नास उत्तर म्हणून मुले खर्‍या-खोट्या कहाण्या/सबबी/कारणे सांगत.
"शाळेत यायला उशीर झाला तर नुकसान नक्की कुणाचं आहे ? त्यात वाईट काय आहे ? " अशा अर्थाचं काहीतरी मी विचारल्यावर सरळ उत्तर देण्याऐवजी शिक्षा दसपट वाढवून दिली. शिक्षकांना वाटलं मी त्यांना खिजवतोय. (आता इतकी वर्षे/दशके झाली; खोटं बोलणार नै. मी खर्रच खिजवत नव्हतो.)
.
.
प्रार्थना नीट म्हणता आली नाही तरी क्वचित शिक्षा होइ. मुळात प्रार्थना म्हणायची कशाला, हे मात्र कुणी सांगितलं नै.
विचारल्यावर 'आगाउ कार्टं ' असं लेबल मिळालं.
.
.
"सिगारेट वाईट असते; लहानांनी पिउ नये " असे सांगितले जाइ.
मग या गोष्टी वाईट असतील तर मोठ्यांनी केलेल्या कशा चालतात, हे विचारल्यावर मात्र नजरेनेच दरडावले जाइ.
.
.
असो. आगाउ/बोलघेवडा असतो, तर अदरवाइज introvert किंवा अबोल कशाला राहिलो असतो ?
भाषण-वादविवाद स्पर्धेत सातत्यानं सपाटून मार का खाल्ला असता ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकूण प्रतिसादाचे स्वरुप पाहून मनोबाला "...संपले बालपण माझे" ही काव्यपंक्ति नीटशी लागू होत नसावी असे वाटते.
=============================================================================================================

"शाळेत यायला उशीर झाला तर नुकसान नक्की कुणाचं आहे ? त्यात वाईट काय आहे ? "

हा प्रश्न दहापट शिक्षेच्या लायकीचा नसला तरी दुप्पट शिक्षेच्या लायकीचा जरूर आहे. शाळेत उशिरा जाण्याचं "आज" समर्थन करणं भयंकर आहे. आणि शिक्षकांना खिजवल्यासारखं वाटलं म्हणून सजा केली. वाटलं नसतानाही केलेली नाही. आणि तुमचा प्रश्न खिजवलं वाटावं असाच आहे. इट लॅक्स अ‍ॅनि अँड एवरी लॉजिक.
-----------------------------------------------------------------------------

मुळात प्रार्थना म्हणायची कशाला?

आज काय मत आहे? बालपणी प्रार्थना म्हणून चूक केली? कि आपल्या कोर्‍या पाटीवर एका विशिष्ट धाटणीचे 'परस्परसंमती न घेता' विचित्र संस्कार केले गेले याचं वैषम्य आहे?
मूळात हे करायचंच कशाला हा प्रश्न प्रार्थना स्पेसिफिक असावा. अन्य संदर्भांत तो अजिबात पडत नसावा. म्हणजे आज विमा क्षेत्रात कार्यरत असाल तर रसायनशास्त्रात आयनिक बंध, सहसंयुज बंध आणि कॅटनेशन प्रक्रिया "मूळात" शिकवल्याच कशाला असाही प्रश्न पडतो का? हा प्रश्न अख्ख्या सिलॅबसबद्दल पडायला पाहिजे, नै का? समजा तुम्ही आठवीला जीवशास्त्र शिकवता आणि कोण्या विद्यार्थ्याने विचारले कि प्रकाश संस्लेषणातील रासायनिक क्रिया "मूळात" मी शिकायची गरजच काय? तर काय उत्तर द्याल? अन उत्तर दिले तर त्याच लॉजिकने हे हे, ते ते सुद्धा का नै शिकवत म्हटल्यावर?
--------------------------------------------------------------------------------------

मग या गोष्टी वाईट असतील तर मोठ्यांनी केलेल्या कशा चालतात, हे विचारल्यावर मात्र नजरेनेच दरडावले जाइ.

या गोष्टी मोठ्यांनी केलेल्या देखिल चालत नाहीत. मोठ्यांना दरडावायची पद्धत वेगळी असते. लहान-मोठे हे पोलिटिक्स जनरल मुलांच्या मनात नसावे. माणसाचे सगळे रानटी गुणधर्म जन्मलेल्या मुलांत असतात. त्यांना नियंत्रित करून या सिविलायझेशन मधे अ‍ॅडजस्ट व्हायला फिट बनवायचे असते. ते दरडावणे वैगेरे इतके माइंड नसते करायचे. हे सगळे लोक तुम्ही अन्य समाज जसा आहे तसे बनावेत असे प्रयत्न करत असतात. आज तुमचं मत "अन्य समाज चुकिचा वागतो" असं असेल तर लहानपणी तुम्हाला सामान्य समाजाशी अलाईन करणारांस कटघरात उभे करणार?
-------------------------------------------------------------
बोलघेवड्या लोकांनी वक्तृत्वपरीक्षेत तुलनात्मक चांगले पर्फॉम करावं हे कोरिलेशन देखिल खेचून ताणून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तरी सृजन-आनंदसारख्या शाळांची गरज नाकारता येत नाही.

१. अशा शाळांत सिलॅबस, मार्क्स इ इ पेक्षा एक वेगळं जग आहे अशी सुस्पष्ट जाणीव विद्यार्थ्यांत असते.
२. पारंपारिक शाळांत जीवनातील कितीतरी महत्त्वाची अंगे, जसे संगीत, नृत्य, आउटडोर नि इनडोअर खेळ यांच्यावर अगदीच नगण्य भर असतो. या सर्व विषयांचं आयुष्यातलं प्रत्यक्ष महत्त्व पाहू जाता, पारंपारिक शाळांची हि ट्रिटमेंट अन्यायकारी आहे.
३. संस्कार, व्यक्तित्व विकास, संवाद कौशल्ये, समूह कौशल्ये, इ इ अपारंपारिक शाळांसाठी महत्त्वाची असतात.

सध्याला शिक्षणाचा परिणाम समाजाच्या मूल्यपरिवर्तनात मुळी होत आहे का असा प्रश्न कैकदा शिक्षितांचे वर्तन पाहून उभा राहतो. अपारंपारिक शाळा असा प्रश्न वाटू नये याचा प्रयत्न करतात. अपारंपारिक शिक्षणाचा सिलॅबस, शिक्षक, राबवण्याचं फ्रेमवर्क, इंफ्रास्ट्रक्चर, इ इ वर चांगला अभ्यास करून सरकारनं शक्य तितक्या शाळांना किमान सेमी-अपारंपारिक बनवायचा प्रयत्न केला पाहिजे.

ज्या ज्ञानाला आपण आपल्या आयुष्याशी, भविष्याशी फार नीटपणे जोडू शकत नाहीत त्याची घोकंपट्टी करत लहान/मुलांना अगदी वीट येईपर्यंत होईपर्यंत सध्याची शिक्षणपद्धती बोर मारते. त्यातलं कामाचं आणि सुसह्य तेवढं ठेऊन जीवनकौशल्यांवर भर दिला तर शिक्षण फार आनंददायी प्रक्रिया असेल.

हॅविंग सेड धिस, पारंपारिक शिक्षण पद्धती, किमान ज्या मुलांच्या घरात शिक्षणाचं, मॉडर्न वातावरण नाही, त्यांना अशा सर्व कौशल्यांपासून दूर ठेवते हे सत्य असले तरी अशी मुले कायमची मागे राहत नाहीत. उत्साह, एक्सपोजर ही पोकळी लवकरच भरून काढतात. दुसरीकडे अपारंपारिक शाळांतील विद्यार्थ्यांची मूल्यरचना सरस असते वा त्यांचे बालपण अधिक आनंददायी असते हे गृहितक देखिल धाडसाचे ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझ्यातर्फे एक रोचक
तुम्ही असं समंजस टोनमध्ये काही लिहू लागलात की हेच का ते अजो असा प्रश्न पडतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या धाग्यावरचे सगळे असमंजस प्रतिसाद देखिल एक पर्पज हायलाईट करून जातात. सिद्धीताईला माध्यमिक शाळा न आवडणं, तिथे शिकत असताना आणि आजही, तिथे ती असिमिलेट न होणं आणि तितकीशी आनंदी न असणं, हे तिची अपारंपारिक शाळा मोप छान असली तरी, तिचे (शाळेचे) मुलांना सामान्य (कॉमन) सामाजिक वातावरणात आनंदी जीवन जगण्यासाठी ट्रेन करण्यातले अपयश समोर आणतात. सिद्धीताईच्या स्वभावात आपल्या जुन्या शाळेच्या श्रेष्ठतेचा गंड नव्हताच असे मानले तरी भिन्न वातावरणाबद्दल पुरेसा अकोमोडेटीवनेस नव्हता आणि आदरही नव्हता हे दिसून येते. हे सृजनानंद मधे शिकवलं गेलं पाहिजे होतं असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

निष्कर्षावर येण्याची घाई कशाला ?
प्रत्येक केसमध्ये खूप खूप डतपशील असतात.
लागलिच अकोमोडेटिवनेस असणे/नसणे बद्दल मत देणे म्हणे जजमेंटल होणे, घाईत निष्कर्श काढणे होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निष्कर्षावर येण्याची घाई कशाला ?
प्रत्येक केसमध्ये खूप खूप डतपशील असतात.
लागलिच अकोमोडेटिवनेस असणे/नसणे बद्दल मत देणे म्हणे जजमेंटल होणे, घाईत निष्कर्श काढणे होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडल्यानंतर भूतकाळातील आठवणी रम्यच वाटतात ( शाळा , लहानपण , लहानपणी खाल्लेला मार इ इ ) असं मी पाहिलेलं आहे.

वयाचा अजून एक यापुढचा टप्पा ओलांडल्यानंतर या भूतकाळातील आठवणी खरोखरच रम्य असतात आणि बालपण खरोखरच सुखद असते हे डायरेक्ट सिद्ध होते असं मी पाहिलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमचे हेडमास्तर मला मुख्यत्वेकरून आठवतात ते त्यांच्या तोंडातल्या अर्वाच्य शिव्यांमुळे

अरविंदजी, आपण मला याबाबतीत नशीबवान वाटता. मला स्वतःला 'शिव्या न देणार्‍या' जगातून 'शिव्या देणार्‍या' जगाकडे स्थानांतरण करताना प्रचंड त्रास झाला. शिव्या देणारे लोक नीच नि दुष्ट असतात असा माझा समज बराच काळ होता. हा समज बर्‍यापैकी मूर्खपणाचा आहे हे कळायला देखिल वेळ लागला. अगदी ऐसीवर देखिल 'शिव्या हा भाषेचा शृंगार' टाईप विधाने ऐकताना, ठिके, पण असं नसतं तर बरं झालं असतं असं वाटतं. इंजिनिअरींगला असताना मी प्रचंड शिव्या देई तेव्हा तो एक 'लो पिरियड' होता असं कधीतरी मधेच मला वाटतं. मला शिव्या द्यायला आवडतं, पण दुसरीकडे त्याचा कधी कधी गंड वाटतो.
अर्थातच शिक्षकांनी मुलांसमोर अर्वाच्य शिव्या देऊ नयेत, पण दुसरीकडे मोठेपणी आयुष्यभर नळाचे पाणी प्यायचे असताना दहावीपर्यंत बॉटल्ड मिनरल पाणीच पाजत बसू नये. शाळा बाहेरच्या समाजाचे प्रतिरुप असावे असं नाही, ती नक्कीच थोडी बरी असावी, पण समाजापासून अगदीच तुटलेली नसावी. शिक्षकांना ताई, दादा म्हणताना नंतरच्या आयुष्यात याचा उपयोग परिचितांशी प्राथमिक भाव बंधुभाव वा भगिनीभाव जागृत होण्यासाठी होत असेल तर ठिक. पण असं नसेल तर ते त्याच (सर, मॅडम) अर्थाचे वेगळे उच्चार ठरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

छान. हा भागदेखील आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भाग एकदम मस्त झाला आहे. सिद्धी तुम्ही खूप नीरीक्षण करता अन इन जनरल आयुष्य सतर्क, सजगपणातून उपभोगत/अनुभवता जे की कौतुकास्पद आहे, असे माझे नीरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

धन्यवाद सर्वांनाच. मला वाटलं नव्हतं माझ्याकडून पूर्ण लिहून होईल. वेळोवेळी आवर्जून प्रतिसाद आणि प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचेच अगदी मनापासून आभार.

तरीही माझ्या मेमरीच्या आणि लिहिण्याच्या मर्यादेमुळे शाळेला पूर्ण न्याय देता आला नाहीये असंच वाटतंय !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि