Skip to main content

'भा. रा. भागवत' यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त स्पर्धा

‘भास्कर रामचंद्र भागवत’, अर्थात ‘भा.रा.भागवत’ हे नाव अनेक मराठी वाचकांना परिचित आहेच. मराठी बालसाहित्यातील एक अतिशय नावाजलेले लेखक आणि अग्रणी असे त्यांचे वर्णन करणे अतिशयोक्त होणार नाही. 'बालमित्र' या अंकाचे ते संस्थापक व संपादक. अर्थात, त्यांची ओळख इतर साहित्यापेक्षा 'फास्टर फेणे' या त्यांच्या प्रसिद्ध पात्रामुळेच अधिक आहे. मात्र तो झाला त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतील केवळ एक भाग! त्यांचे स्वातंत्र्ययुद्धात भाग घेणे असो किंवा 'बिपीन बुकलवार'सारख्या पात्राला घेऊन केलेले रहस्यकथांचे लेखन असो, ज्यूल व्हर्नच्या साहसकथांचे वा 'शेरलॉक होम्स'चे भाषांतर असो किंवा 'बालमित्र'चा उपक्रम असो; त्यांच्या संपन्न लेखणीतून अनेक प्रकारचे सुरस असे बालसाहित्य आपल्याला लाभले आहे.

येत्या ३१ मे २०१५ रोजी भा.रा.भागवत यांचा १०५ वा जन्मदिवस आहे. या निमित्ताने एक स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे. या स्पर्धेचे दोन विभाग असतील. इच्छुक सदस्य एकाच वा दोन्ही भागांत सहभागी होऊ शकतात.

स्पर्धेचे नियमः
१. ‘भा.रा.भागवत - लेखन स्पर्धे’चे पुढील दोन भाग असतील.
अ. कल्पनाविस्तार स्पर्धा: यात वाचकांना काही विषय दिले जातील व एक स्वैर लेखनाचा पर्याय असेल. त्यावर आधारित लेखन दिलेल्या मुदतीत आमच्याकडे पाठवायचे आहे.
ब. प्रश्नमंजूषा: यात भा.रा.भागवत, तसेच मराठी साहित्याशी संबंधित प्रश्न विचारले जातील. त्यांची उत्तरे दिलेल्या मुदतीत पाठवायची आहेत. प्रश्नमंजूषेचा दुवा.
२. सदस्य कोणत्याही एका किंवा दोन्ही विभागांत सहभागी होऊ शकतील.
३. प्रत्येक विभागाचे विजेते स्वतंत्रपणे निवडले जातील. शिवाय एक संयुक्त विजेताही घोषित केला जाईल.
४. संयुक्त विजेता ठरवण्यासाठी दोन्ही विभागांतील गुणांना समान महत्त्व दिले जाईल.
५. विजेत्यांना मिळणारी बक्षिसे काय असतील हे तपशील लवकरच घोषित करू.
५. विजेत्यांना बक्षीस म्हणून आवडती पुस्तके खरेदी करता येतील असे 'गिफ्ट कार्ड' दिले जाईल.
=======

विभाग पहिला: कल्पनाविस्तार/लेखन स्पर्धा


आज या धाग्यावर स्पर्धेच्या या विभागाचे विषय व नियम घोषित करत आहोत.

कल्पनाविस्तारासाठी/लेखनासाठी विषय:
१. फास्टर फेणे अतिरेक्यांचा पुण्यावरील हल्ला वाचवतो
२. बिपीन बुकलवार भारतीय गुप्तहेर संघटनेत प्रवेश कसा मिळवतो?
३. जगज्जेता ‘रोबर’ पुन्हा जग जिंकण्याचा दावा करतो.
४. फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार भेटतात तेव्हा...
५. स्वैर लेखनः भा.रा.भागवतांचे किमान एक पात्र घेऊन, आधुनिक जगात फुलवलेली कोणतीही कथा.

नियमः
१. लेखन मराठीत व देवनागरीत असावे. लेखन युनिकोडमध्ये असणे बंधनकारक आहे.
२. किमान शब्दमर्यादा ५०० तर कमाल शब्दमर्यादा २००० शब्द. योग्य कारणासाठी कमाल शब्दमर्यादा भंग झाल्यास हरकत नाही.
३. या स्पर्धेसाठी केलेले लेखन कुठेही व कोणत्याही स्वरूपात पूर्वप्रकशित नसावे. तसेच लेखात जर काही चित्रे, आकृत्या, प्रतीके/प्रतिमा, उद्धृते असतील तर ती प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत.
४. या स्पर्धेचा विजेता २८मे ते ३१ मे दरम्यान रोजी घोषित केला जाईल.
५. स्पर्धेच्या विजेत्यांना आपले लेखन निकाल घोषित झाल्यापासून १ महिना अन्यत्र पुनर्प्रकाशित करता येणार नाही. त्यानंतर ते लेखन अन्यत्र कुठेही पाठवायची/प्रकाशित करायची मुभा लेखकाला असेल. जे स्पर्धक विजेते ठरणार नाहीत त्यांना आपले लेखन विजेता घोषित झाल्यानंतर अन्यत्र कुठेही पाठवता/प्रकाशित करता येईल. निकाल जाहिर झाल्यानंतर लेखनाचे प्रताधिकार संबंधित लेखकाकडे असतील.
६. लेखन ऐसी अक्षरेवर स्वतंत्र धाग्यावर करायचे आहे. धाग्याच्या विषयात {भा.रा.भागवत लेखन स्पर्धेसाठी} अशी नोंद करणे आवश्यक.
७. लेखन प्रकाशित करण्याची अंतिम तारीख २७ मे २०१५ आहे. परीक्षणासाठी योग्य तो वेळ मिळावा यासाठी ही मुदत सर्वांनी पाळावी अशी नम्र विनंती.
===

प्रश्नमंजुषेच्या विभागाचे प्रश्न व नियम वेगळ्या धाग्यात योग्य वेळी प्रकाशित केले जातील.

आपल्या अधिकाकाधिक मित्रांपर्यंत, भागवतांच्या वाचकांपर्यंत या स्पर्धेबद्दलची ही माहिती / ही घोषणा पोचवा. भा.रा.भागवतांचे आपल्या सर्वांच्याच मनातील स्थान लक्षात घेता लेखनाची व भरपूर प्रतिसादाची अपेक्षा आहे. तेव्हा बघताय काय… सामील व्हा!

--
एक विनंती: या धाग्यावर स्पर्धेशी केवळ स्पर्धेशी संबंधित प्रश्नोत्तरे/अभिप्राय प्रतिसादात असतील याची काळजी आपण सारे घेऊयात. अवांतर/समांतर प्रतिक्रीया अन्य धाग्यांवर हलवण्यात येतील.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

ऋषिकेश Tue, 28/04/2015 - 08:53

सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा! यानिमित्ताने ऐसीवर अधिकाधिक सकस व प्रस्थापितांसोबतच नव्या लेखकांचे लेखनही वाचायला मिळो ही एक वाचक म्हणून स्वतःलाच सदिच्छा! ;)

'फास्टर फेणे'चा चाहता वर्ग फार मोठा आहे, तेव्हा या स्पर्धेला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

Satyawan Redkar Sat, 02/05/2015 - 10:48

In reply to by ऋषिकेश

स्पर्धेसाठी लेखन पाठविण्या करिता पत्ता किंवा ईमेल देण्यात यावा

धाग्यावर म्हटल्या प्रमाणे 'लेखन ऐसी अक्षरेवर स्वतंत्र धाग्यावर करायचे आहे. धाग्याच्या विषयात {भा.रा.भागवत लेखन स्पर्धेसाठी} अशी नोंद करणे आवश्यक.'

इथे उजव्या बाजुला 'महत्त्वाचे दुवे' या विभागात 'लेखन करा' म्हणून लिंक दिसेल. तिथे जाउन 'ललित' हा लेखन प्रकार निवडा. व तिथे तुमचे लेखन प्रकाशित करा.

--

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 07/05/2015 - 19:02

In reply to by ऋषिकेश

ललित लेखन करताना 'भा. रा. भागवत लेखनस्पर्धा' असा एक टॅग दिसेल. वेळेत आठवल्यास तो निवडा (किंवा व्यवस्थापक ते काम नंतर करतील).

रेड बुल Tue, 28/04/2015 - 10:50

चलो एकबार फिरसे छोटे बच्चे बनजायें हम सब...

ऐसीअक्षरे Thu, 07/05/2015 - 11:24

स्पर्धेचा कालावधी '२७ मे' पर्यंत वाढवण्यात आला आहे, तसेच बक्षीस म्हणून आवडते पुस्तक खरेदी करता येईल असे गिफ्ट कार्ड दिले जाईल असे ठरले आहे, याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी.

धाग्यात योग्य तो बदल केला आहे.

परी Thu, 07/05/2015 - 13:05

प्रश्नमंजूषा: यात भा.रा.भागवत, तसेच मराठी साहित्याशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
हे प्रश्न केंव्हा देणार आहात. मी रोज पाहतेय पण कुठेच प्रश्न दिसत नाहीत

ऋषिकेश Thu, 07/05/2015 - 13:07

In reply to by परी

येत्या काही दिवसांत ते प्रश्न प्रकाशित होतील.
दीर्घ लेखनाला अधिक वेळ लागतो त्यामुळे ते विषय आधी दिले आहेत, ज्यामुळे सदस्यांना लेखनासाठी पुरेसा वेळ मिळेल

फ्रेंक उर्फ फ्… Fri, 15/05/2015 - 11:11

अरे, आपण तर भाग घेणारच. आपण भा.रा.भा. म्हणजे आपले मानसआजोबा!
कथाही तयार झाली आहे. शब्दसंख्या जरा जास्त झाली असली तरी नियमांत योग्य कारणासाठी चालेलं असं म्हटलं असल्याने लवकरच टाकतो.

फ्रेंक उर्फ फ्… Fri, 15/05/2015 - 11:14

आमच्या मानसआजोबांच्या स्पर्धेत भाग तर घेणारच आपण!

काव्या Fri, 15/05/2015 - 18:41

In reply to by फ्रेंक उर्फ फ्…

"मानसआजोबांच्या " अह्हा क्या बात!! मस्त शब्द कॉइन केलात कवडाजी. असा शब्द कॉइन करणार्‍या ,आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत :)

काव्या Sat, 16/05/2015 - 17:59

प्रत्येक कथेवेरती स्वतः परीक्षक असल्याच्या थाटात प्रतिक्रिया देत आहे. पण खूप मजा येते आहे. अन मेंदूच्या "judgement" या faculty ला ही भरपूर चालना मिळते आहे. अजुन कथांचा पाऊस पडावा हीच इच्छा.

कुलस्य Mon, 18/05/2015 - 12:26

उपक्रम खुपच स्तुत्य आहे. मी पण लिहित आहे. पण आतापर्यन्त आलेल्या कथा पाहुन आपली कथा तेवधि आवडॅल का अशी शन्का येत आहे. पण असो. आनन्द मह्त्वाचा.

काव्या Mon, 18/05/2015 - 15:21

In reply to by कुलस्य

लिहा ना कुलस्य. कथा आवडली तर छानच पण नाही आवडली तरी तुम्हाला हे तर कळेल काय सुधारणा करायला हवी. प्रत्येक जणच त्याच्या त्याच्या मर्यादांनुसार इथे लिहीतो.

ऋषिकेश Mon, 25/05/2015 - 09:52

या स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटली तारीख परवा २७ मे आहे याची आठवण करून द्यायला प्रतिसाद.
आतापर्यंत केवळ दोनच स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. आशा आहे या दोन दिवसांत अधिकाधिक स्पर्धक आपले लेखन प्रकाशित करतील