गाव, शहर आणि बरंच काही

नशीब फक्त माणसांनाच असतं असं नाही. ते जमिनीच्या तुकड्यालासुद्धा असतं . कुणाच्या नशिबी समुद्राची साथ असते तर कुणाच्या नशिबी पर्वतांची रांग. नुसतं नशीबच नाही, स्वभाव असतो प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला. चेहरा असतो, भूतकाळ असतो आणि वर्तमानसुद्धा. तो तुकडाही तसाच होता. त्याला आठवतं तेव्हापासून समुद्राची सोबत होती. परदेशी पाहुणे आणि परदेशी माल ह्यांची नवलाई त्याला कधीच नव्हती. त्याच्या किनाऱ्याला गलबत लागायची आणि मालाच्या किंमतीची खलबतं व्हायची. आजूबाजूच्या प्रदेशात सत्ता कुणाचीही असेना ह्याच्यावर राज्य व्यापारी लोकांचंच असायचं. त्यामुळेच कदाचित, जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला जसा असतो तसा ह्याला ‘godfather’ नव्हता. ह्याच्या जीवाला न कधी आराम असायचा न कधी शांतता. दिवस संपून रात्र होते कधी आणि रात्र संपून दिवस उजाडतो कधी याचं भान त्याला नसायचंच. सगळ्या जगाचा जिवलग असा जो पैसा तो ह्याच्या नसानसांतून वाहायचा. दिवसरात्र कष्ट, काम आणि त्यातून येणारा पैसा ह्या जमिनीच्या तुकड्याची ओळख बनला. न थांबणारे प्रयत्न आणि न थांबणारा पैशांचा ओघ ह्यांनी त्याला आत्मविश्वास दिला. कानाकोपऱ्यातून त्याच्या आडोशाला त्याच्यासारखेच लोक यायला लागले. ‘workoholic’ अशी त्याची ओळख बनू लागली. पैशांचा ओघ चहुबाजुने येऊ लागला. आजूबाजूच्या जमिनींच्या तुकड्यांवर याने कधीच मात केली. पैशांच्या जोरावर ह्याने पाणी विकत घेतलं, वीज विकत घेतली. सारं काही मिळालं म्हणून तो थांबला नाही. त्याचा वेग मंदावला नाही. उलट तो अधिक जास्त मिळवत राहिला. लोकांना हा त्याचा ‘हव्यास’ वाटू लागला पण ‘godfather’ नसलेल्या एका जमिनीच्या तुकड्याला ‘survival’ साठी हे आवश्यकच होतं. त्याने ते केलं आणि लोक त्याला ‘शहर’ म्हणू लागले.
जमिनीचा असाच एक दुसरा तुकडा. त्यालाही सारं काही या तुकड्यागत मिळालेलं पण कदाचित योग्य ‘attitude’ मिळाला नसावा. आधीच्याला मिळाले तसे राबणारे हात मिळाले नसावेत.सगळ्यांना सामावून घेण्याची आणि समान संधी देण्याची गरज कळाली नसावी. संधीचा उपयोग करून घेण्यासाठी लागणारी चतुराई मिळाली नसावी. कष्टांची गरज आणि त्यातून येणाऱ्या पैशांची किंमत कळाली नसावी. नवीन गरजाच निर्माण न झाल्याने “हमारी जरूरते कम हैं ” म्हणण्यातच त्याला मोठेपणा वाटू लागला असावा. केव्हातरी त्या ‘शहरी’ जमिनीच्या तुकड्याकडे जाउन यायचं आणि आल्यावर “आम्हाला आमचाच तुकडा प्यारा” असं म्हणायचं हे ठरून गेलं होतं. आपल्या ह्याच ‘निवांत’पणामुळे आपला “गाव” कधी झाला हे त्या तुकड्याला कळलंसुद्धा नाही.

जमिनीचे असे तुकडे प्रत्येक देशांत असतात. काही ‘शहरं’ म्हणून ओळखले जातात काही “गाव” म्हणून. जमिनीच्या तुकड्यांमधला वर्गसंघर्षच असतो हा. शहर होण्यासाठी आधी गावाच्या गरजा बदलाव्या लागतात, विचार आणि दृष्टीकोण बदलावा लागतो. नुसते डांबराचे रस्ते बांधून आणि विजेच्या तारा टाकून गावाचं शहर होत नसतं. शेवटी प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला त्याचं स्वतःचं एक व्यक्तिमत्त्व असतं. म्हणूनच आपण कितीही ठरवलं आणि कितीही अभ्यासदौरे केले तरी कोकणचा कॅलिफोर्निया होत नाही, मुंबईचं शांघाय होत नाही, आहो इतकंच काय दुसरी अगदी तशीच्या तशी मुंबैसुद्धा तयार होत नाही तिला ‘नवी मुंबई ‘च म्हणावं लागतं.

-अभिषेक राऊत.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile
चांगली सुरूवात..
छान तब्येतीत सुरवात करून तात्विक टिपणी करून वळण घेत अचानक संपल्यासारखा वाटला.

असा लेख अधिक ऐसपैस हवा होता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान आहे लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0