बोक्याचे बाबा आणि रॉबिन हुड
- दिलीप प्रभावळकर
.तुम्हांला आश्चर्य वाटेल- नि मला सांगायलाही बरं नाही वाटत! - पण मी फास्टर फेणे वाचलाच नाहीय. फास्टर फेणे आला, तोपर्यंत माझं लहान मुलांची पुस्तकं वाचायचं वय उलटलं होतं. मला भागवत ठाऊक आहेत ते 'रॉबिन हुड'वाले, ज्यूल व्हर्न आणि एच्. जी. वेल्सच्या पुस्तकांची भाषांतरं करणारे. त्यांची मात्र मी असंख्य पारायणं केली आहेत.

आमच्या लहानपणी मराठी माध्यमाच्या शाळेत वाचनाचं महत्त्व फार असे. तेव्हा मी भागवतांचा 'रॉबिन हुड' वाचला. ते पुस्तक मला स्पष्ट आठवतं. त्यातल्या चित्रांसकट आठवतं. मला वाटतं, त्यात वाईरकरांची चित्रं होती. अजूनही घरात ते पुस्तक असेल, उत्खनन करून पाहिलं पाहिजे. त्या पुस्तकाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे. मी ते जगलो आहे, असं म्हणायला हरकत नाही. मुंबईतल्या हाउसिंग कॉलनीत मी वाढलो. तिथे आम्ही 'रॉबिन हुड'मधले प्रसंगच्या प्रसंग 'खेळत' असू. तिरंदाजीची स्पर्धा, त्यांच्यातली चुरस... त्यातला धाकला जॉन, टक, मच, लठ्ठंभारती, विली... ही पात्रं अगदी जवळची-ओळखीची वाटत. ते भाषांतर आहे, हे कळल्यावर खरंच वाटलं नव्हतं - इतकं त्याचं भागवतांनी सहज रूपांतर केलं आहे. 'Little John' हे त्या पात्राचं नाव. त्याचं 'धाकला जॉन' हे किती अस्सल मराठी रूपांतर आहे!
तसं मी बरंच वाचत असे. साने गुरुजी, ना. धों. ताम्हनकर, श्री. शं. खानविलकर आणि भा. रा. भागवत. साने गुरुजींचं साहित्य, ताम्हनकरांचा गोट्या, चिंगी आणि खानविलकरांचा चंदू, गाडगीळांनी केलेलं टॉम सॉयरचं भाषांतर, भागवतांचा 'रॉबिन हुड', ज्यूल व्हर्नचं त्यांनी भाषांतर केलेलं 'चंद्रावर स्वारी' नि 'पाताळलोकची अद्भुत यात्रा', 'झपाटलेला प्रवासी', एच. जी. वेल्सचं 'अदृश्य माणूस'... या पुस्तकांची माझ्यावर छाप आहे.
भागवतांबद्दल कृतज्ञता अशासाठी, की त्यांनी किती मुबलक लिहिलं आहे! आणि भाषेचा दर्जा कुठेही न सोडता. इतकं सकस आणि इतकं मुबलक लिहिणं - मला वाटतं, ते अगदी शेवटपर्यंत लिहीत होते - फार अवघड असतं. मला त्यांची तुलना पी. जी. वुडहाउसशी करावीशी वाटते. पी. जी. वुडहाउसनंही असंच मुबलक लिहिलं आणि तरी शेवटपर्यंत त्यातला विनोद तसाच्या तसा ताजातवाना होता. भागवतांनीही तसंच ताजं, तितकंच मुबलक लिहिलं. त्यांच्या लेखनातला ह्यूमरही तसाच मजेशीर आणि चिरतरुण आहे. दुसरं म्हणजे त्यांची वाचकांच्या कल्पनाशक्तीला, कुतूहलाला आवाहन करण्याची क्षमता. ती क्षमता फार कमी जणांच्यात दिसते. विशेष करून बालसाहित्य लिहिणाऱ्या लेखकाचा हा मोठाच गुण. त्यांच्या गोष्टी मुलांना विचार करायला, दुसर्या जगाचं कल्पनाचित्र रंगवायला प्रवृत्त करतात.
बालसाहित्यातून त्यांनी तीन-चार पिढ्यांची वाचनाची अभिरुची घडवली. त्यांच्यामुळेच मला - आणि माझ्यासारख्या अनेकांना - वाचनाची गोडी लागली, असं म्हणायला पाहिजे.
पुढे मी जो बोक्या सातबंडे लिहिला, त्याचं मूळ कुठेतरी या वाचनात आहे, असं मला वाटतं. भागवतांचे सगळे नायक कुतूहल असलेले असतात, कुठल्यातरी साहसावर जातात, त्यांच्यात जाणून घेण्याचं कुतूहल असतं. त्याचा संस्कार माझ्यावर कुठेतरी असणार. तसं बोक्या आणि फास्टर फेणे यांच्यात काही साम्य नाही. प्रभाव असण्याची शक्यता नाही, कारण मी म्हणालो तसं, मी मुळात 'फास्टर फेणे' वाचलेलाच नाही. फास्टर फेणे मला वाटतं, १३-१४ वर्षांचा आहे. तर बोक्या ८-९ वर्षांचा मुलगा आहे. शिवाय फाफे होस्टेल लाइफमध्ये घडतो; बोक्या मुंबईतल्या हाउसिंग सोसायटीच्या संस्कृतीतला आहे. पण मला मुळात तो लिहावासा वाटला, त्याचं मूळ भागवतांच्या पुस्तकांमध्ये कुठेतरी असणार.
माधव कुलकर्णींच्या 'बाल दरबार'साठी मी बोक्याच्या श्रुतिका लिहिल्या. मला वाटलं नव्हतं, तो इतका यशस्वी होईल असं. त्यांनी मला तसं सुचवल्यावर मी त्यांना शिष्टपणे म्हटलं, "टीव्हीच्या जमान्यात कुठली आलीयेत मुलं श्रुतिका ऐकायला?" माझा अंदाज मी कुलकर्णींना बोलून दाखवला नि मोकळा झालो. पण त्यांनी फार आग्रह केला, म्हणून त्या लिहिल्या. त्या इतक्या चालल्या! नि गंमत म्हणजे, टीव्ही न पोचलेल्या भागातल्या मुलांपर्यंत रेडिओवरच्या श्रुतिका पोचतील नि त्यांना आवडतील, असा माझा अंदाज होता. पण तसं नाही झालं. शहरी भागांत - जिथे टीव्ही आहे, तिथेच - त्या खूप ऐकल्या गेल्या. हीऽ पत्रं आली. गठ्ठेच्या गठ्ठे. मग 'राजहंस'च्या माजगावकरांनी मला आग्रह केला, 'श्रुतिकांची पुस्तकं घेऊन कोण वाचणार हो? तुम्ही संवादप्रधान कथा लिहा. आपण प्रसिद्ध करू.' मग मी त्या कथा लिहिल्या नि त्या चालल्या.
पण मजा म्हणजे, त्यावर आलेली मालिका मी पाहिलेली नाही. काही ना काही निमित्तं येत गेली नि ते राहिलं ते राहिलंच.
तसा फास्टर फेणे आणि रॉबिन हुडसुद्धा दृश्य माध्यमात बघायला मिळावा असं माझ्या डोक्यात कधी आलेलं नाही. रॉबिनवर आधीच इंग्रजी सिनेमे बनलेले होते, म्हणूनही असेल. कुणास ठाऊक. पण माझ्या डोक्यात ती पुस्तकातलीच पात्रं आहेत.
आता विचार करताना वाटतं, बोक्या सातबंडेचा फास्टर फेणेशी तसा थेट संबंध नाही, पण मुळात तो माझ्या डोक्यातून जन्माला आला त्याच्या मुळाशी भागवतच असणार!
***
शब्दांकन: मेघना भुस्कुटे
चित्रे: जालावरून साभार
या मुलाखतीच्या वेळी
या मुलाखतीच्या वेळी प्रभावळकरांसारख्या 'स्टार'शी संपर्क साधायचा म्हणून थोडी धाकधूक होती. पण बिचकत लिहिलेल्या मेलला, "मलापण खूप आवडतात हो भागवत. मी फॅन आहे त्यांचा!" असं उत्तर लग्गेच आलं, नि मग 'हे आपल्यातलेच दिसतायत!' असं वाटून पुढे गप्पा मारायला संकोच वाटला नाही.
आता गुर्जींच्या लेखामुळे मी पुन्हा मुशे वाचतेय. त्यात प्रोफेसर रोझेत प्रभावळकरांनी रंगवला, तर कसलं भारी वाटेल, असं मनाशी येऊन मज्जा वाटते आहे.