विश्वाचे आर्त - भाग २ - नासदीय सूक्त

बॉक्स:
ऋग्वेद १०.१२९ । ऋषिः परमेष्ठी प्रजापतिः । छन्दः त्रिष्टुप् । देवता भाववृत्तम् ।

नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥

न मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒ न रात्र्या॒ अह्न॑ आसीत्प्रके॒तः ।
आनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒ तस्मा॑द्धा॒न्यन्न प॒रः किं च॒नास॑ ॥ २ ॥

सृष्टीच्या सुरूवातीला काहीच नव्हतं. असणं नव्हतं किंवा नसणंही. धुळीची जमीन नव्हती, की वर आकाश नव्हतं. काही झाकलेलं नव्हतं, की लपलेलं नव्हतं. त्या क्षणी ना मृत्यू होता, ना मृत्यूपासून सुटका. एका निर्वात, निरावकाशाने स्वतःला जेव्हा आणलं, आणखी काही काही तिथे नव्हतं.
----

कुठल्यातरी तप्त वायूंची एक तबकडी स्वतःभोवती भिरभिरली. त्यातला मुख्य भाग गुरुत्वाकर्षणाने केंद्राकडे खेचला गेला. हा आपला सूर्य. त्या तबकडीच्या काही भागांत इतर वायू गोळा झाले. त्यांचे जागोजागी गोळे झाले. ते अव्याहतपणे गुरुत्वाकर्षणाने सूर्याभोवती फिरत राहिले. पोटात कमीजास्ती आग राखून ठेवून थिजले. आपापल्या परीने घट्ट-विरळ, ओले-कोरडे, थंड-गरम झाले. हे आपले सूर्यमालेतले ग्रह. त्यातलीच एक आपली पृथ्वी. पृथ्वीच्या उकळत्या लाव्ह्यावर थंड सायी आल्या, त्यांची जमीन झाली. पोटातून निसटणारी वाफ पाणी होऊन जमिनीवर स्थिरावली आणि वातावरणाचं पांघरुण टिकून राहिलं. त्यातच आपल्याला दिसणारी सर्व जीवसृष्टी फुलली. ही गेल्या साडेचार अब्ज वर्षांची कथा आहे. पण मुळात ही तप्त वायूची तबकडी आली कुठून?

त्यासाठी आपल्याला अजून मागे जावं लागतं. गेल्या लेखात आपण पृथ्वीच्या वयाचा अंदाज घेण्यासाठी एक वाव पसरून उभा राहिलेल्या माणसाची प्रतिमा डोळ्यांसमोर आणली. पण संपूर्ण विश्वाचा उगम बघायचा झाला तर त्या माणसाच्या अलिकडे अजून दोघांना वाव पसरून उभं राहावं लागेल. कारण विश्वाचं वय पृथ्वीच्या वयाच्या जवळपास तिप्पट आहे - १३.८ अब्ज वर्षं. हे वय आपल्याला अगदी अचूकपणे माहीत आहे - त्यातली संभाव्य त्रुटी हजारात पाच इतकीच आहे. आता हे वय कसं मोजलं? हे समजावून घेण्यासाठी आपल्याला महास्फोटाचा सिद्धांत (ज्याला सामान्यपणे बिग बॅंग असं नाव आहे) थोडासा समजावून घ्यावा लागेल.

दूरदूरच्या दीर्घिकांचा (आपल्या आकाशगंगेप्रमाणेच इतर तारकासमूहांचा) अभ्यास करताना शास्त्रज्ञांना हे लक्षात आलं की प्रत्येक तारकासमूह आपल्या आकाशगंगेपासून दूर दूर चाललेला आहे. हे काहीसं चक्रावून टाकणारं होतं. कारण पृथ्वी हे विश्वाचं केंद्रस्थान नाही, तो एका साध्यासुध्या दीर्घिकेतल्या साध्यासुध्या ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह आहे हे उघड होऊनही शतकं लोटली होती. मग आता बरोब्बर आपणच केंद्रस्थानी असल्याप्रमाणे विश्व का वागत होतं? थोडी गणितं केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे तारकासमूह नुसतेच दूर जात आहेत असं नाही, तर जितके लांबचे तितके अधिक वेगाने दूर जात आहेत. याची सांगड कशी लावायची? लवकरच त्यांना उत्तर सापडलं. हे तारकापुंज फक्त आपल्यापासून दूर जात नसून, सगळेच सगळ्यांपासूनच दूर जात आहेत. किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर हे विश्वच प्रसरण पावतं आहे. अवकाशाची व्याप्तीच वाढते आहे.

गुलाबजाम तळायला टाकला की तो मोठा होतो हे आपण अनुभवलेलं आहे. आता कल्पना करूया की त्या गुलाबजामच्या आतमध्ये सगळीकडे पसरलेले बरेचसे वेलचीचे दाणे आहेत. आपण कुठच्यातरी वेलचीच्या दाण्यावर बसून इतर दाण्यांकडे बघत आहोत अशीही कल्पना करू. जसजसा गुलाबजाम मोठा होत जाईल, तसतसे तुमच्या मागचे पुढचे, वरचे खालचे सर्वच दाणे आपल्यापासून दूर जाताना दिसतील. कारण आख्खा गुलाबजाम फुलतो आहे. आता हा गुलाबजाम म्हणजे संपूर्ण विश्व, त्यातला खवा म्हणजे अवकाश, आणि वेलचीचे दाणे म्हणजे तारकासमूह हे समजून घेतलं की सर्वच तारकासमूह आपल्यापासून दूर का जात आहेत याचं कोडं सुटतं. किंवा हीच कल्पना एका फुग्याचं उदाहरण घेऊनही सांगता येते. समजा, एका फुग्यावर अनेक ठिपके काढलेले आहेत. यापैकी कुठल्याही दोन ठिपक्यांमधलं अंतर फुग्याच्या पृष्ठभागावर रेषा काढून मोजता येतं. आपण जसजसा फुगा फुगवू तसं प्रत्येकच ठिपक्यांच्या जोडीतलं अंतर वाढताना दिसेल.

तर विश्व विस्तारतं आहे. याचा अर्थ आपण जसजसं इतिहासात जाऊ तसतसं ते लहान होत जाणार. आणि एक क्षण असा येईल की ते एका बिंदूमध्ये सामावलं असेल. तिथपासून ते आत्तापर्यंतच्या विस्ताराची कथा भौतिकीच्या (फिजिक्सच्या) नियमांच्या आधारे सांगणारा सिद्धांत म्हणजे महास्फोट सिद्धांत - बिग बॅंग थियरी. या सिद्धांताच्या आधारे या स्फोटानंतरच्या अगदी काही मिलीसेकंदांपासून पुढे काय झालं याचं अगदी स्पष्ट टप्प्याटप्प्याचं चित्र मांडण्यात शास्त्रज्ञ यशस्वी ठरलेले आहेत. या मांडणीमुळे अर्थातच 'इतक्या अब्ज वर्षांनी अमुक अमुक गोष्टी दिसतील इतक्या इतक्या प्रमाणात दिसतील' अशा प्रकारची काही भाकितं करता येतात. त्यातली एक म्हणजे विस्ताराचा वेग. एका विशिष्ट प्रकारच्या सुपरनोव्हांचा - अत्यंत प्रखर ताऱ्यांचा - अभ्यास करून हा वेग मोजला. तो बरोब्बर १३.८ अब्ज वर्षांनी जितका असायला हवा तितका आला. कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड रेडिएशन वापरून तापमानात होणारे चढउतार मोजले. तेही त्याच सिद्धांताच्या गणितानुसार १३.८ अब्ज वर्षांनी जितके असायला हवे तितकेच आहेत हे दिसून आलं. तसंच तारकासमूहांचं एकमेकांपासूनचं सरासरी अंतर किती असेल याचंही महास्फोट सिद्धांतानुसारचं गणित आणि सध्याचं निरीक्षण यामधूनही १३.८ अब्ज वर्षांचाच आकडा मिळतो.

थोडक्यात या सिद्धांताच्या तीन अंगांचा अभ्यास केला तर तिन्हींमधून उत्तर एकच येतं - आणि सत्याशी मिळतंजुळतं ठरतं. यापलिकडे अवकाशात प्रत्यक्षात दिसणाऱ्या अनेक गोष्टींची संगती लागते. महास्फोटाच्या सिद्धांतानुसार हायड्रोजन आणि हेलियम विश्वात प्रचंड प्रमाणात असतील आणि तसेच ते दिसतात. 'कॉस्मिक मायक्रोवेव्ह रेडिएशन दिसायला हवं' हेही महास्फोट सिद्धांताचं - आता खरं ठरलेलं भाकित आहे. म्हणजे आरोपीच्या हाताचे ठसे शस्त्रावर मिळणं, मृत व्यक्तीच्या कपड्याचे तंतू आरोपीच्या अंगावर सापडणं, शस्त्र विकत घेतल्याची पावती त्याच्याकडे सापडणं असे तीन स्वतंत्र पुरावे सापडले तर आरोपीच खुनी आहे हे ओळखू येतं. त्याहीपलिकडे त्याच्याकडे खून करण्यासाठी सबळ कारण असणं, आधी त्याने धमकी दिलेली असणं, त्या वेळेसाठी त्याच्याकडे दुसरीकडे असण्याचा पुरावा नसणं हेही दिसून आलं तर त्यावर शिक्कामोर्तबच होतं. इतकेच किंवा त्याहूनही अधिक भक्कम पुरावे महास्फोट सिद्धांतासाठी आहेत. याचा अर्थ सगळेच बारीकसारीक प्रश्न सुटलेले आहेत असं नाही. पण म्हणून आत्तापर्यंत सापडलेलं उत्तर टाकून देण्याची पाळी येणार नाही इतकं चांगलं सर्वसाधारण उत्तर सापडलेलं आहे हे निश्चित.

पण मग १३.८ अब्ज वर्षांपूर्वी काय होतं? हा महास्फोट का झाला? तो कोणी घडवून आणला का? हे प्रश्न थोडे फसवे आहेत. कारण काळ आणि अवकाशच सुरू होण्याचा तो 'क्षण' आहे. अवकाश म्हणजे काही खरोखरचा गुलाबजाम नाही, जो आधी कोणीतरी तयार करावा लागतो. आख्खं विश्वच त्या एका बिंदूत सामावलेलं होतं. तिथपासून वेळेची मोजणी सुरू झाली. असं असताना 'त्याआधी काय होतं?' हा प्रश्नच निरर्थक ठरतो - शून्याने भाग देण्यासारखा.

वर उद्धृत केलेल्या नासदीय सूक्तात म्हटलेलं आहे - 'सृष्टीच्या सुरूवातीला काहीच नव्हतं. असणं नव्हतं किंवा नसणंही.' ही न-असण्याची स्थिती आपल्याला डोळ्यासमोर आणता येत नाही. 'धुळीची जमीन नव्हती, की वर आकाश नव्हतं.' या वस्तुमान अवकाश नसण्याच्या स्थितीची कल्पनाही आपल्याला करता येत नाही. नासदीय सूक्ताच्या कर्त्याला अर्थातच महास्फोट सिद्धांताचं ज्ञान नव्हतं. कारण या कळसापर्यंत पोचण्यासाठी आधी न्यूटन, नंतर आइन्स्टाइन आणि त्यानंतर आलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी बांधलेल्या पाया, पायऱ्या आणि खांबांचा आधार लागतो. जर कोणीतरी काढलेल्या चित्रात आजच्या देवळाच्या कळसासारखा आकार दिसत असेल तर त्यावरून त्याकाळी आख्खं देऊळ होतं असं म्हणणं योग्य ठरत नाही. नासदीय सूक्तातलं वर्णन हे काव्यात्म वर्णन आहे. सत्य परिस्थितीच्या जवळ जाणारं आहे इतकंच. शब्दांच्या, भाषेच्या मर्यादा या सूक्तातही जाणवतात - कारण काळच सुरू झालेला नसतानाही तिथे-तेव्हा असे स्थितीकालदर्शक शब्द वापरल्यावाचून त्या परिस्थितीचं वर्णन करता येत नाही. त्यामुळे हा महास्फोट कोणी केला, कधी केला, कुठे केला हे प्रश्नच काहीसे निरर्थक बनून जातात. तो झाला हेच निश्चितपणे म्हणता येतं.

(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

वाचतोय.
विश्व प्रसरणं पावतं म्हणजे नवी स्पेस तयार होते हे आकलन बरोबर आहे का? तस असेल तर 'स्पेस तयार झाली' हे इमॅजिन करायला जड जातय.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ती स्थिती डोळ्यासमोर आणता येत नाही हेच खरं. शिवाय का कधी कोणी वगैरेची उत्तरं मिळणं अशक्य आहे. काळ "सुरु" झाला म्हणजे काय हेदेखील इमॅजिन करणं फक्त थिअरीतच शक्य आहे.

विषय अत्यंत रोचक. वाचतो आहे.

इव्हेंटस् घडतात म्हणून काळाला दिशा आहे. इव्हेंटस घडलेच नसते तर भूत किंवा भविष्य असे कशाच्या आधारावर म्हणता आले असते?

अगदी सुसूत्र आणि क्रमवार मांडणीमुळे लेख वाचणे आवडत आहे. थिअरीसुद्धा रोचक आहे.
एक शंका. अगदी मागे जाता, एक बिंदू होता, असे लक्षात आले. बिंदूच्याही मागे जाता येईल काय ?

कधीच न ओलांडता येणारी एक ज्ञान करुन घेण्याची मर्यादा, अज्ञेयवाद, कितीही आकाशपाताळ एक केलं तरी निरर्थकतेची कशानेही न फुटणारी अज्ञात भिंत कधीनाकधी या प्रवासात येणारच हे माझं अत्यंत आवडतं मत सिद्ध करणारा तो बिंदू.. !!! आय लव्ह इट..!! Wink

प्रतिसाद आवडला. पण अज्ञेय हे सदाच अज्ञेय राहील का असे वाटते. सध्यापेक्षा वेगळ्या मोजपट्ट्या निर्माण होतीलही कदाचित.

तेच तर.. इतर सर्व गोष्टी वाढत्या ज्ञानाने शक्य होतील.. पण, एक अशी भिंत (!!) आहे की जी कधीच म्हणजे कधीच पार होणार नाही. ती आपल्या असण्याचीच मर्यादा आहे. डिफाईन करता येत नाही पण तिचं अस्तित्व पक्कं आहे.

आपण आत आहोत आणि बाहेरुन पाहूच शकत नाही अशी मर्यादा.

शक्यता अशीही असेल का की त्या बिंदूआधीही एक विस्तार अस्तित्वात होता ? आणि आपण तेव्हा 'बाहेर' होतो ?
सहज असं वाटलं, म्हणून विचारलं.

आपल्या पुराणांमध्ये अशी कल्पना आहेच की एका प्रदीर्घ कालावधीनंतर (कल्प, मनु इ.इ. जे काय ते) अखिल विश्व नष्ट होते. आणि पुन्हा शून्यातून नवनिर्मिती होते. ही शून्याची कल्पना मोठी आकर्षक आहे. प्रलय म्हणजे प्रकर्षाने लय. अग्निप्रलय, वायुप्रलय, जलप्रलय समजू शकतो. पण आकाशप्रलय? आकाशामुळे कसा काय प्रलय? आकाश म्हणजे अवकाश असा अर्थ घेतला तर थोडाफार अर्थ लागतो. आणि लय च्या अनेक अर्थांपैकी एक म्हणजे विरून जाणे, हा घेतला तर अवकाशात विरघळणे, विरून जाणे असे मानता येते. पण विज्ञानाचा धागा अर्थावरून परमार्थाकडे घरंगळायला नको म्हणून इतके पुरे.

कुठल्याही काळात "अज्ञेय" हे असणारच. जेंव्हा ज्ञात डीफाईन करतो तेंव्हाच अज्ञात पण डीफाईन करतो.

मला एक गमचीचा प्रश्न आहे.

मला ग्रहमालिकांच्या रचनेत आणी अणु च्या रचनेत नेहमी साम्य वाटत आले आहे ( माझ्या थोडक्या ज्ञानावर ).
मला नेहमी असे वाटते की आपल्या सूर्याची ग्रहमालिका ही कोणाच्या तरी विश्वातला एक अणु असेल का?

किंवा एखाद्या अणुच्या इलेक्ट्रॉनवर जीवसृष्टी?

आपली आकाशगंगा म्हणजे कोणाच्या तरी विश्वातला एक थेंब वगैरे

कुठल्याही काळात "अज्ञेय" हे असणारच. जेंव्हा ज्ञात डीफाईन करतो तेंव्हाच अज्ञात पण डीफाईन करतो.

यू गॉट इट..!!!

यू गॉट इट..!!!

गवि - माझ्या कल्पनाविलासाबद्दल बोला की

तेच तर कधीही न कळणार्‍या भागात येतं ना..

आपलं भांडंच मर्यादित.

माहीत असेलच, तरीही:

The anthropic principle (from Greek anthropos, meaning "human") is the philosophical consideration that observations of the universe must be compatible with the conscious and sapient life that observes it. Some proponents of the anthropic principle reason that it explains why the universe has the age and the fundamental physical constants necessary to accommodate conscious life. As a result, they believe it is unremarkable that the universe's fundamental constants happen to fall within the narrow range thought to be compatible with life

https://en.wikipedia.org/wiki/Anthropic_principle

(मेन इन ब्लॅक मधे होती अशी फँटसी.)
पिंडी ते ब्रह्मांडी मधे हेच अपेक्षित असेल का?

विषय आवडला आणि सरळ सोप्या भाषेत तो मांडण्याची धाटणीही आवडली.
नासदीय सूक्त यात कुठेतरी यायलाच हवे होते. त्याचा उल्लेख झाला हेही आवडले.
विश्वाचे आर्त हे शीर्षक शैलीदार आणि पकड घेणारे आहे. आवडले. अतुल देउळगावकरांचे याच नावाचे पुस्तक प्रसिद्ध आहे खरे पण इथे विश्वाच्या संदर्भात 'पृथ्वीचे प्रेमगीत' या शीर्षकाची आठवण झाली.

प्रकाटाआ

भारत एक खोज मालिकेचा टायटल ट्रॅक नासदीय सूक्तांतील याच श्लोकांचा आहे. पुढे त्याचं समश्लोकी हिंदी भाषांतरही आहे. ("सृष्टी से पहले कुछ नहीं था..." वगैरे)

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

चांगली लेखमाला. सोप्या भाषेतला वाचनीय लेख.

गुलाबजाम तळायला टाकला की तो मोठा होतो हे आपण अनुभवलेलं आहे. आता कल्पना करूया की त्या गुलाबजामच्या आतमध्ये सगळीकडे पसरलेले बरेचसे वेलचीचे दाणे आहेत. आपण कुठच्यातरी वेलचीच्या दाण्यावर बसून इतर दाण्यांकडे बघत आहोत अशीही कल्पना करू. जसजसा गुलाबजाम मोठा होत जाईल, तसतसे तुमच्या मागचे पुढचे, वरचे खालचे सर्वच दाणे आपल्यापासून दूर जाताना दिसतील. कारण आख्खा गुलाबजाम फुलतो आहे. आता हा गुलाबजाम म्हणजे संपूर्ण विश्व, त्यातला खवा म्हणजे अवकाश, आणि वेलचीचे दाणे म्हणजे तारकासमूह हे समजून घेतलं की सर्वच तारकासमूह आपल्यापासून दूर का जात आहेत याचं कोडं सुटतं. किंवा हीच कल्पना एका फुग्याचं उदाहरण घेऊनही सांगता येते. समजा, एका फुग्यावर अनेक ठिपके काढलेले आहेत. यापैकी कुठल्याही दोन ठिपक्यांमधलं अंतर फुग्याच्या पृष्ठभागावर रेषा काढून मोजता येतं. आपण जसजसा फुगा फुगवू तसं प्रत्येकच ठिपक्यांच्या जोडीतलं अंतर वाढताना दिसेल.

.
काय अप्रतिम हातोटी आहे सोप्पं करुन सांगण्याची. मजा येते आहे.
.

आपणच केंद्रस्थानी असल्याप्रमाणे विश्व का वागत होतं? थोडी गणितं केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे तारकासमूह नुसतेच दूर जात आहेत असं नाही, तर जितके लांबचे तितके अधिक वेगाने दूर जात आहेत.

हे माहीत नव्हते.

बाळकृष्णाच्या तोंडात यशोदेला गुलाबजामच दिसला असावा! Wink

छान-सोपे लिहिले आहे.

स्वातंत्र्यदिनासाठी सजवलेला ऐसीचा लोगो आवडला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा. 'ऐसी'धरून सर्वांनाच.

सोपी भाषा, छान मांडणी. पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट पहातेय.

माझ्या एका शंकेचं अधिक स्पष्टीकरण मिळालं तर हवं आहे. उत्पत्तीपासून काही मिलिसेकंदापासूनचा इतिहास ज्ञात आहे असं म्हटलं आहे. जेव्हा विश्व बिंदुवत अवस्थेत (अत्यंत उच्च घनता) असेल तेव्हा काळ अत्यंत मंद चालत असणार. ही मिलिसेकंदे तेव्हाच्या मंद काळातली समजायची की आताच्या काळातली समजायची?

------
बिग बँगच्या आधी काही होते का? या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. आपल्याला काय ज्ञात होऊ शकेल याची ती मर्यादा आहे. त्याच्या आधी काही असले तरी त्याच्या बद्दलची काहीही माहिती आपल्यापर्यंत पोचू शकणार नाही. [जरी असे बिग बँग आणि बिग क्रंच -समजा-परत परत होत असले तरी एका सायकलमधली माहिती दुसर्‍या सायकलमध्ये जाऊ शकत नाही].

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जेव्हा विश्व बिंदुवत अवस्थेत (अत्यंत उच्च घनता) असेल तेव्हा काळ अत्यंत मंद चालत असणार.

हे असं का आणि कोणत्या संदर्भचौकटीतून म्हणता येईल हे समजलं नाही.

सैद्धांतिक पातळीवर, विश्वाचं वय शून्य सेकंद ते १०-४६ सेकंद या काळात काय झालं ते सांगता येत नाही. बोलण्यासाठी काही मिलिसेकंद हा तपशील ठीकच, १०-४६ सेकंद म्हणजे नक्की किती हे माझ्यासाठी कल्पनातीतच आहे. खगोलीय निरीक्षणं करून निष्कर्ष मांडताना त्यापेक्षा बरंच जास्त काही सांगता येत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

> ही मिलिसेकंदे तेव्हाच्या मंद काळातली समजायची की आताच्या काळातली समजायची?
धन-वस्तुमान-पिंडांचा स्वीय काल (प्रॉपर टाईम) असावा. स्वीय कालमापन साधारण तसेच असते - आज घ्या काय, नि तेव्हा घ्या काय.

अर्थात स्वीय कालमापनाकरिता त्या पहिल्या मिलिसेकंदाच्या अंशात घड्याळ म्हणून काय वापरता येईल ते मला ठाऊक नाही. अणुरेणू उद्भवले की अणुरेणूंमधून निघणार्‍या प्रकाशाच्या कंपनांची वारंवारिता (फ्रीक्वेन्सी ऑफ एमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन) वापरून कालमापन वापरता येते. बहुधा त्याआधी परमाणुकणांपासून उद्भवणारा प्रकाश वापरून घड्याळ बनवता येईल.

लेखा इतकीच प्रतिसादांनीही ज्ञानात भर पडत आहे. लेखमाला संपेपर्यंत तेही असेच विस्तार पावत राहील.

मस्त आहे, आवडले.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याच लेखातून सूक्ताचा अर्थ घेतलेला आहे.

नास॑दासी॒न्नो यामधलं स वरचं चिन्ह कसं टाईप करायचं?

"माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..."

क्यू हे अक्षर टाईप करा. बटन एकदा प्रेस केल्यास वर॑ चे चिन्ह येते, तेच दोनदा केल्यास खाली॒ चे चिन्ह येते.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद..

"माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..."

सिग्निफिकन्स काय आहे त्या चिन्हांचा? उच्चार विशिष्ट प्रकारे करायचा का?

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

येस. टोनच्या प्रकाराप्रमाणे त्याला उदात्त-अनुदात्त अशी नावे आहेत. वैदिक संस्कृतात टोनला महत्त्व होते, कारण सेम शब्द वेगळ्या टोनमध्ये उच्चारला तरी अर्थ बदलायचा. हाच प्रकार प्राचीन ग्रीकमध्येही होता. संस्कृत उदा. म्हणजे राजपुत्र. एका टोनमध्ये उच्चारल्यास नेहमीचा अर्थ, दुसर्‍या टोनमध्ये उच्चारल्यास 'ज्याचा मुलगा राजा आहे असा तो' असा अर्थ व्हायचा. पुढे संस्कृतातही हे फीचर राहिले नाही, आणि मॉडर्न भारतीय भाषांत तर हे फीचर आजिबात नाही, अपवाद पंजाबी. त्यातील एक उदा. खालील लिंकवर दिसेल. (शाहमुखी ही पाकिस्तानात पंजाबीकरिता वापरली जाणारी उर्दू लिपी आहे.)

http://forum.wordreference.com/threads/punjabi-tone-representation-in-sh...

अन्य भाषांपैकी मँडारिन भाषेत हे वैशिष्ट्य आहे. मा हा शब्द एका टोनमध्ये उच्चारल्यास अर्थ आई असा होतो तर दुसर्‍या टोनमध्ये उच्चारल्यास घोडा असा अर्थ होतो.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उदात्तानुदात्तस्वरित या तिघांचा (अनुक्रमे नव्हे) तार-मध्य-खर्ज अशा स्वरानव्हेपट्टीशी (चिनी भाषेसारखा) संबंध आहे, अशी वदंता आहे - हे खरे आहे.

परंतु माझ्या मते हे चूक आहे. माझे मत काशिनाथ वामन अभ्यंकरांच्या मतासारखे आहे. उदात्त म्हणजे आघातमय स्वर होत. (अनुदात्त म्हणजे विशेष निराघात स्वर, स्वरित म्हणजे आघाती सुरुवात होऊन निराघात होणारा स्वर, आणि एकश्रुति म्हणजे असे कुठलेही वैशिष्ट्य नसलेला स्वर.)

आणि (उच्चारी) स्वरांचे महत्त्व फक्त वेदांत आहे/होते, अशी एक विचित्र कल्पना काही शतके रूढ आहे - आणि काही शतके व्याकरणाचा अभ्यास करणार्‍यांना या विचित्र कल्पनेबद्दल कोडे पडते. मराठीतसुद्धा "सहज बोलणारा विरुद्ध नुकताच शिकलेला" हा फरक स्वराघातावरून करता येतो. स्वराघात भाषेत वापरणे कधीच संपले नाही. वैदिक भाषेचे ते विलक्षण वैशिष्ट्य नव्हे.

लेखनाबाबत : मात्र स्वरांची चिन्हे वैदिक मंत्र-वाङ्मयातच लिहायची पद्धत रूढ आहे, ही बाब खरी आहे.

(हे अवांतर येथेच थांबवतो.)

धन्यवाद.

आणि (उच्चारी) स्वरांचे महत्त्व फक्त वेदांत आहे/होते, अशी एक विचित्र कल्पना काही शतके रूढ आहे - आणि काही शतके व्याकरणाचा अभ्यास करणार्‍यांना या विचित्र कल्पनेबद्दल कोडे पडते. मराठीतसुद्धा "सहज बोलणारा विरुद्ध नुकताच शिकलेला" हा फरक स्वराघातावरून करता येतो. स्वराघात भाषेत वापरणे कधीच संपले नाही. वैदिक भाषेचे ते विलक्षण वैशिष्ट्य नव्हे.

हा पॉइंट लक्षात आला नव्हता. पण तोच शब्द वेगवेगळ्या प्रकारे उच्चारल्यास अर्थात फरक पडणे हे मुख्य फीचर मराठी किंवा बहुसंख्य भारतीय भाषांत नाही ना. त्याअर्थी टोनल नाही असे म्हटले आहे. बाकी स्वराघाताचे तुम्ही म्हटल्याप्रमाणे महत्त्व आहे पण ते चिनी भाषेपेक्षा बरेच कमी आहे असे वाटते - यद्यपि हेही मान्य केलेच पाहिजे की चिनी टोन इंट्रोडक्शनच्या व्हिडिओज बघून हे टोनचे स्थान जरा जरा लक्षात येऊ लागले होते पण पूर्णतः नाही.

तदुपरि- पाणिनीय संस्कृतात हे फीचर नाही, बरोबर? 'राजपुत्र' वगैरेसारखी औटलायर उदाहरणे वगळता? आणि ही कल्पना 'काही शतके' रूढ आहे म्हणजे साधारण कधीपासून?

आपली थोडीशी चर्चा झाली होती त्यात वैदिक अ‍ॅक्सेंट हा टोनल नसून स्ट्रेसवाला आहे हे तुमचे मत ऐकले होते. त्याबद्दल अजून काही माहिती असेल तर वाचायला आवडेल, धन्यवाद.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाणिनीय (लौकिक भाषेच्या) वर्णनाचे फीचर आहे.
अर्थ बदलणे क्वचित असले, तरी योग्य आघात वैकल्पिक नाही, आवश्यक आहे.

अतिरोचक. हे माहिती नव्हते, धन्यवाद.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राही, धनंजय, अमुक, रोचना, धनुष (आणि काही इतर) लोकांना प्रचंड इंट्रेष्टिंग काहीतरी सांगायची तर उबळ असतेच; वर हे लोक ऐन रंगात आल्यावर ’असो, अवांतर नको’ असं म्हणून रसभंग करतात. असू द्या की ओ अवांतर. आम्हांला वाचण्यात रस आहे. इथे च्यामारी शिवाजीच्या स्वराज्यस्थापनेबद्दलच्या लेखात मस्तानी, आनंदीबाई, सुमेरसिंगाची आत्महत्या, लग्नसंस्थेची भलामण, आश्लील्य... असं काहीही आलेलं लोक गपगुमान वाचतात. मग तुम्ही काय बोलताय त्यानं काय घोडं मारलं? उलट झाला तर एखाद्या मरतुकड्या घोड्यावर उपचारच होईल. का उगाच असा भाव खावा म्हणते मी?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शिवाजीच्या स्वराज्यस्थापनेबद्दलच्या

तुम्ही मराठी नाहीत म्हणजे!

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझं मत असं आहे: जे लोक शिवाजीला अहो-जाहो करून परकं करतात, तेच लोक मराठीला लांछन आहेत. किंबहुना ते खरे मराठी नव्हेतच. शिवाजीला परकं करून त्याची देव्हार्‍यात प्रतिष्ठापना करायची आणि त्याला मराठी लोकांपासून हळूहळू दूर न्यायचं असा त्यांचा डाव आहे. आपण तो हाणून पाडला पाहिजे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

च्यायला, स्मायली नाय टाकली तर लोकं कशालाही शिरेस घेतात आजकाल.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तेच ना.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आमच्या चाळीत खूप नॉन मराठी लोक रहायचे आणि ते "शिवाजी म्हणतो" नावाचा खेळ खेळायचे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खी खी खी ROFL

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेघनाचा निषेध सर आँखोंपर.
चला उठाबस करा आणि चला उठा बस करा यामध्ये थांबे, टोन, आघात यापैकी काय काय आहे किंवा नाही?

लाठाबस करा
लाठा स करा

बोलताना दोन "लेखी शब्दांमध्ये" कालांतर (विराम) नसतो (चलाव्ठाबऽस्करा / चलाव्ठाबऽस्करा). परंतु दुसर्‍या वाक्यात आघातांची संख्या जास्त आहे. कानांनी आपण ऐकतो, तेव्हा वेगवेगळे अर्थ समजण्यात काही संदिग्धता नसते.

त्याच प्रमाणे
ला \ चला
जोडीत अर्थाचा फरक आहे :

ला ! आली बस शेवटी! (येथे "चालायला लागा" असा अर्थ नाही, तर "वाट बघणे बस झाले" अशा अर्थाचे काहीतरी आहे.)
ला ! आली बस शेवटी! (येथे "चालायला लागा" असा अर्थ आहे.)

हां, हे पर्फेक्ट आहे. आता लक्षात आले, धन्यवाद. म्हणजे याबाबतीत मराठी व मँडरिन यांमधील फरक गुणात्मक नसून प्रमाणाचा आहे असे म्हणता यावे काय?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मॅडॅरिनच्या pitch-toneशी तसे काही सामांतर्य नाही.
इंग्रजीतल्या (वा लॅटिन वा स्पॅनिशमधल्या) stress-accentशी सामांतर्य आहे.

बहुतेक इन्डो युरोपियन भाषांत pitch-tone चा उपयोग वाक्याला प्रश्नार्थक, उपहासात्मक वगैरे अर्थ देण्यासाठी होतो.
तो आला? (ला : "/" अशी चढती पट्टी, उच्चारात प्रश्न कळतो)
तो आला, ... (ला : "--" अशी समान पट्टी, तर आणखी एक उपवाक्य येणार आहे, अशी syntactic जोडणी)
तो आला, ... (पण) (ला : "\\" अशी अतिशय जास्त उतरती पट्टी, उच्चारात "पुढील उपवाक्यात येण्याच्या विरोधात काहीतरी पणपरंतु असणार आहे, अशी syntactic जोडणी)
तो आला. (ला : "\" अशी थोडकी उतरती पट्टी, उच्चारामुळे साधी "माहिती सांगणे" अर्थ कळतो)

धन्यवाद! उदाहरण एकदम नेमके आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओ थॅंक यू हां!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

घ्या अवांतर. होऊ दे एखादे घोडे जिवंत.
तर मी असे ऐकले/वाचले आहे की या ऋचा/सूक्ते इत्यादींच्या गायनात फारसे चढउतार नसतात/नसावेत. भारतीय संगीतातल्या सात सुरांपैकी फक्त पहिले चार सूर वापरून हे गायन होते/व्हावे. म्हणजे 'ध'पासून पुढचे स्वर वर्ज्य. असे काही आहे का? मुळात सामवेदकालखंडात भारतीय संगीत कितपत विकसित झाले होते? किंवा जे गायले जात होते तेच स्वर उचलून त्यात भर घालून अफ्गानिस्तानी/हिंदुस्तानी संगीत बनले? सामगायन आणि सूफींचे समा नृत्यगान यात काही सारखेपणा होता/आहे का? साम, समा आणि psalm यांचा उघड दिसणारा परस्परसंबंध मुळात खरा आहे का?
(पूर्ण/र्वपरवानगीनिशी केलेले) अवांतर संपले.
जाखुक.

२०-२५ प्रतिसादांचा हा धागा वेगळा करावा ही विनंती. विषय पुरेसा वेगळा आहे, आणि मूळ धाग्यापासून स्वतंत्र आहे.

१. थत्ते सायकलचा उल्लेख करतात. त्या कशा होतात ? दुसर्‍या सायकलमधे नवा सुतळी बाँब फुटणार काय ? मग आधीच्या गुलाबजामाचे काय ? (पुढील प्रश्न पहावा)
२. प्रसरण पावणारं विश्व आणि एकमेकांपासून दूर जाणारे घटक ही प्रक्रिया सदैव चालू राहील की, गुलाबजांब फुटला, सर्व कण पसरले आणि मग हा तप्त गुलाबजांब "पडून" थंड झाला - म्हणजे सर्व कण थंड पडले - असं होणार आहे ? हे थंड पडणं म्हणजे सर्व प्रकारच्या जैविक/रासायनिक प्रक्रियांचा शेवट होणं असा अर्थ आहे काय ? त्याला किती वर्षं बाकी आहेत ? तसं होणार असल्यास तो नव्या लेखाचा विषय आहे का ?
३. स्टेडी स्टेट थेरी नि बिग ब्यांग मधला फरक काय ? यात बिग ब्यांगचा घोडा विनमधे कसा आला ?

वगैरे.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

१. थत्ते सायकलचा उल्लेख करतात. त्या कशा होतात ? दुसर्‍या सायकलमधे नवा सुतळी बाँब फुटणार काय ? मग आधीच्या गुलाबजामाचे काय ? (पुढील प्रश्न पहावा)

सायकल होतात असे मी म्हणत नाही. सायकल (बिग बँग नंतर बिग क्रंच) होत असतील तरी एका सायकलमधली माहिती दुसर्‍या सायकलमध्ये पोचणार नाही.

२. प्रसरण पावणारं विश्व आणि एकमेकांपासून दूर जाणारे घटक ही प्रक्रिया सदैव चालू राहील की, गुलाबजांब फुटला, सर्व कण पसरले आणि मग हा तप्त गुलाबजांब "पडून" थंड झाला - म्हणजे सर्व कण थंड पडले - असं होणार आहे ? हे थंड पडणं म्हणजे सर्व प्रकारच्या जैविक/रासायनिक प्रक्रियांचा शेवट होणं असा अर्थ आहे काय ? त्याला किती वर्षं बाकी आहेत ? तसं होणार असल्यास तो नव्या लेखाचा विषय आहे का ?

याविषयी सध्या काही ठाम हायपोथिसिस नाही असे वाटते.

३. स्टेडी स्टेट थेरी नि बिग ब्यांग मधला फरक काय ? यात बिग ब्यांगचा घोडा विनमधे कसा आला ?

बिग बँगचा घोडा विनमध्ये आला कारण त्यातून निघणारी बरीच प्रेडिक्शने निरीक्षणात सिद्ध झाली. स्टेडी स्टेट हायपोथिसिस इज ऑलमोस्ट डेड. (नारळीकर मात्र अजूनची त्याला चिकटून आहेत). स्टेडी स्टेट म्हणाजे विश्वाला उगम नाही (शेवटही नाही). अशीच एक पल्सेटिंग युनिव्हर्सची थिअरीसुद्धा आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बाकीचं माहिती नै पण सायकल-हायपोथेसिस हा थत्त्यांनीच नव्हे तर रॉजर पेनरोजनेही मांडलेला आहेच की. बिगब्यांग-बिगक्रंच अशा अनेक सायकली झालेल्या असून किमान एक ट्रिलियन वर्षे तरी या भानगडीत व्यतीत झालेली आहेत अशा अर्थाचा त्याचा दावा कुठेशीक वाचल्याचे स्मरते.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थत्ते सायकलचा उल्लेख करतात. त्या कशा होतात ? दुसर्‍या सायकलमधे नवा सुतळी बाँब फुटणार काय ? मग आधीच्या गुलाबजामाचे काय ?
प्रसरण पावणारं विश्व आणि एकमेकांपासून दूर जाणारे घटक ही प्रक्रिया सदैव चालू राहील की, गुलाबजांब फुटला, सर्व कण पसरले आणि मग हा तप्त गुलाबजांब "पडून" थंड झाला - म्हणजे सर्व कण थंड पडले - असं होणार आहे ?

सुतळी बाँब नव्हे, मोठा बाँब. विश्व कसं उत्पन्न झालं आणि 'नजीकच्या भविष्यात' त्याचं काय होईल याबद्दल निरीक्षणांमधून तर्क-निष्कर्ष मांडता येतात. दुसरी सायकल येणार का नाही हे सांगता येत नाही, पण गुलाबजाम तोच राहणार. सायकलींच्या प्रक्रियेत आहे तोच गुलाबजाम लहानमोठा (चूप चावट) होत राहणार.

एकच सायकल असेल तर तीन शक्यता आहेत -
गुलाबजाम मर्यादित वेगाने मोठा होत राहणार, थंड होत राहणार.
गुलाबजाम अमर्यादित वेगाने मोठा होणार आणि फुटण्यासारखं काहीतरी होणार. ते गुलाबजाम घेऊन समजावता येणार नाही. (तोंडात टाका तो.)
तिसरी शक्यता, गुलाबजाम थंड आणि छोटा होणार आणि तसाच राहणार.

३. स्टेडी स्टेट थेरी नि बिग ब्यांग मधला फरक काय ? यात बिग ब्यांगचा घोडा विनमधे कसा आला ?

गुलाबजाम तळताना लोकांनी निरीक्षणं केली. त्यात गुलाबजाम तळताना पसरतो असं दिसायला लागल्यामुळे बिग ब्यांगचा घोडा विनमध्ये यायला लागला. स्टेडी स्टेटला गुलाबजामाचं पसरणं स्पष्ट करायला फार वेळ लागला. मग त्यात पाकाचं स्पष्टीकरण देता येईना. पाक म्हणजे आपल्या दीर्घिकेतल्या ताऱ्यांचं मर्यादित वय, आणि इतर बऱ्याच गुंतागुंतीच्या गोष्टी. (मला माहित नाही म्हणून पाकाच्या नावावर खपवून देत्ये.)
बिगबँगमध्येही अडचणी आहेत, पण त्यातल्या त्यात त्याच तळणीत सगळे गुलाबजाम बरे तळून निघत आहेत. म्हणून त्यांचा घोडा विनमध्ये येतो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.