Skip to main content

रविकर

रविकर
---------------------------------
सकाळी सकाळी खिडकीतून येणारी
अवखळ तिरीप पापण्या चाळवते,
आणि दाखवून तुझी पाठमोरी आकृती
लगेच शिरते तुझ्या कुरळ्या केसांत.
न गुंतता तिथेच माझ्या बोटांसारखी
अलगद उतरते तुझ्या कानावरती.
चकाकतो एक थेंब - शिंपल्यातला मोती.

तो कवडसा जेमतेम गाल गोंजारतो
आणि घाईत तुझ्या खांद्यावर उतरतो
खरपूस कांतीवर माखतो वर्ख सोन्याचा
बेमुर्वतपणे, होय! माझ्यादेखत!

तुझ्या कमरेवर टेकतो, नाही राहात
तिथेच रेंगाळत माझ्या मिठीसारखा.
डौलदार ढुंगण वस्सकन लख्ख
करतो हा उजेड - अरसिक, मख्ख.
तुझ्या मांड्या, पोटर्‍या, पाय
पादाक्रांत करणार काय
हा चक्रवर्ती सूर्यनारायण?
संपत नाही उपभोगूनही मी
ते सर्वस्व जिंकणार का पण
हा उपभोगशून्य स्वामी?

रात्री जोखड म्हणून झटकलेले
पांघरूण पुन्हा घेऊया ओढून.
वाढवू दिवसाच्या मोंगलाईतून
स्वराज्य क्षणाचे काळोखलेले.
---------------------------------

पूर्वप्रकाशनाचा दुवा

.शुचि. Fri, 11/09/2015 - 01:46

वाढवू दिवसाच्या मोंगलाईतून
स्वराज्य क्षणाचे काळोखलेले.

वक्त की कैद में जिंदगी हैं मगर
चंद घड़ियाँ हैं यही जो आज़ाद हैं
____
धनंजय ही तुमची कविता पूर्वी वाचलेली आहे. यातील मत्सरभावना अतिशय आवडते. सूर्याचाही मत्सर :) खूप प्रेम करत असेल ती व्यक्ती. स्वामित्व गाजवत असेल तना-मनावर.
____
माझ्या मत्सर धाग्याची जाहीरात करते आहे - http://aisiakshare.com/node/3049

ऋषिकेश Fri, 11/09/2015 - 13:45

कविता वाचलेली आहेच, त्यातील ढुंगण या शब्दावर खल झाल्याचेही पुसटसे स्मरतेय

बाकी, अतिशयच छान कविता आहे. "चित्रदर्शी" आणि मुख्य म्हणजे लिंगनिरपेक्ष! :)

ऋषिकेश Fri, 11/09/2015 - 17:11

In reply to by मेघना भुस्कुटे

ऑ!
ती पाठमोरी व्यक्ती स्त्री आहे का पुरूष त्याने कवितेत काय फरक पडतो? (आणि बघणारी व्यक्ती देखील) प्रत्येक वाक्य सगळ्या लिंगांच्या व लैंगिकतेच्या व्यक्तींना लागू आहे

अश्या कवितांचा आस्वाद प्रत्येक लिंगाची तसेच लैंगिकतेची व्यक्ती समरस होऊन घेऊ शकेल (केवळ कल्पनाविलास करावा लागणार नाही)

गवि Fri, 11/09/2015 - 17:16

In reply to by ऋषिकेश

केवळ गेस्टाल्ट बदलून कोणत्याही कलाकृतीचा लिंगनिरपेक्ष आस्वाद घेता येईल.

(या वाक्यात काही दम नाही हे मला मान्य आहे, पण मी गेस्टाल्ट शब्द वापरण्याची सिच्युएशन शोधली अन घेतली.. ;) )

बॅटमॅन Fri, 11/09/2015 - 17:19

In reply to by गवि

बहुधा कोणत्याही व्यामिश्र सौंदर्यानुभवात अशी अनेकात्म परिप्रेक्ष्ये अनुस्यूत असतातच असे या संदर्भचौकटीवरून जाणवते खरे.

घाटावरचे भट Fri, 11/09/2015 - 17:00

In reply to by गवि

आणि कोणाला त्याच्या निरपेक्षतेचं....

@ऋ, लिंगाच्या सापेक्षतेच्या किंवा निरपेक्षतेच्या गोष्टी करून गविंना डिवचू नका. त्यांना मागच्या एका चर्चेत 'लिंगवि' अशी पदवी मिळालेली आहे.;-)

अनुप ढेरे Fri, 11/09/2015 - 17:10

In reply to by गवि

साइनफेल्डची एक मुलाखत वाचली होती रिसेंटली. त्यात तो म्हणाला होता की लोकांना रेसिस्ट सेस्क्सिस्ट होमोफोबिक हे शब्द वापरायला आवडतात.लोक ते शब्द वापरता येतील अशा सिचुएश्न्स शोधून काढतात. तशी केस वाटते ही.

ऋषिकेश Fri, 11/09/2015 - 17:15

In reply to by अनुप ढेरे

वर स्पष्टीकरण दिलेय
पटते का बघा

शोधून काढलेली सिच्युएशन नाहिये. खरोखर जाणवलेली गोष्ट आहे.

धनंजय Fri, 11/09/2015 - 21:50

In reply to by ऋषिकेश

गंमत म्हणून रचनेच्या वेळचा तपशील सांगतो.

लिंगनिरपेक्ष रचना असावी हे बंधन मी हेतुपुरस्सर स्वतःवर घेतले होते. आकृतीच्या पाठमोरी असल्याची बाब पुष्कळांच्या लक्षात येईल. परंतु ती पूर्ण बाब नव्हे :

सूर्यकिरण बघणे होते आहे, ती व्यक्ती पुरुष/स्त्री आहे असा सांगणारा व्याकरणातला शब्द नाही; आणि सूर्यकिरण अंगावर झेलत आहे ती व्यक्ती पुरुष/स्त्री आहे असा सांगणारा व्याकरणातला शब्द नाही. अर्थात मराठीत अशी रचना करायची म्हणजे प्रत्येक क्रियापदाबद्दल दक्ष असावे लागते : परंतु ओढाताण करून असा आटापिटा होतो आहे, असे वाचकाला जाणवता कामा नये. कारण वर्णन एखाद्या विवक्षित आकृतीचे नाही, केवळ सैद्धांतिक आकृतीचे आहे, असे वाचकाला भासले, तर ही "घटना" राहात नाही. वाचताना "हे असे झाले, या कोणीतरी ठराविक व्यक्ती होत्या" असेच भासले पाहिजे. माझ्या मते मला हे या ठिकाणी जमले आहे.

अर्थात ललित* रचनांकरिता लिंगनिरपेक्षता असावी, असे माझे कुठले तत्त्व नाही! परंतु कधीकधी आपण स्वतःपुढे मुद्दामूनच आव्हानाकरिता आव्हान ठेवतो, आणि ते पेलण्याची मजा वाटते, तशी ही रचना आहे.

(*बिगरललित/माहितीपूर्ण/कायदेविषयक लेखनात जर व्यक्तीचे लिंग नि:संदर्भ असेल, तर वाक्याची रचनाही लिंगनिरपेक्ष करावी. थोडा प्रयत्न करून हे जमवावे, असे माझे मत आहे खरे. परंतु तशा लेखनात भाषा प्रवाही नसली तरी चालते. "मुद्दाम लिंगनिरपेक्ष भाषा योजली आहे" असे वाचकाला जाणवले, तर मोठे काही नुकसान होत नाही.)

.शुचि. Fri, 11/09/2015 - 22:05

In reply to by धनंजय

अवघड आहे खरे. हे आव्हान तुम्ही पेलले आहेत - याच्याशी सहमत आहे.
.
शिवाय ज्यांनी स्वतः एखादी कविता लिहीलेली आहे, त्यांना प्रकर्षाने त्यातील अवघडपणा कळेल असे वाटते.
.
एकदम छान आहे कविता. म्हणजे मी ज्या कंटेंपररी इंग्रजी कविता वाचते त्याच प्रकारची व उत्तम आहे कारण अनुभवाची सचोटी आहे.
.
ह्म्म्म ऋ म्हणतात तसा ढुंगण हा शब्द मलाही खटकला त्याऐवजी मी नितंब शब्द वापरला असता. :) एक काव्यमय मुलामा. पण नितंब जरा दवणीयच वाटतं. तोच शब्द ओके आहे.
.
अधिक कविता लिहाव्यात - याच्याशी बाडिस.

धनंजय Sat, 12/09/2015 - 02:00

In reply to by मेघना भुस्कुटे

चांगला पर्याय आहे. अर्थात मागल्या पुढल्या ओळीही त्याला जुळवून घ्याव्या लागतील.

पण "मांड्या", "पोटर्‍या" हे चालून जात आहेत? याची थोडी गंमत वाटते. त्या सर्व शब्दांचा या दोनतीन ओळींमध्ये ट-ठ-ड-ढ-ण असा "खडबडीत" मूर्धन्य अनुप्रास टणाठण ढुशा देतो आहे.
हे सर्व शब्द सामान्य कवितांमध्ये सौंदर्यवर्णनात येत नाहीत. परंतु कोणाकडे लालसेने बघताना नजर इथे हमखास जाते. येथे सूर्यकिरणाचा उडाणटप्पूपणाही तसाच आहे.

(जर त्यावेळी मनात विचार आला असता, तर "ढोपरं" शब्द सुद्धा गंभीरपणे विचारात घेतला असता. अर्थात येथे अवयवांची जंत्री करायची नाही, कथानक आशिखपदान्त गतिमान राहावे, हे महत्त्वाचे.)

मला वाटते, सध्या तरी "ढुंगण" हाच पर्याय मला अर्थ, ध्वनि वगैरेंसाठी पटतो आहे.

तिरशिंगराव Sat, 12/09/2015 - 12:54

वही बात!
ढुंगण वही, जो पिया मन भाये!!