विश्वाचे आर्त - भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी

कोंबडी आधी की अंडे आधी?

माझ्या लहानपणी घरी येणारे एक काका गंमत करण्यासाठी म्हणून 'कोंबडी आधी की अंडे आधी?' असा प्रश्न विचारायचे, आणि मी गोंधळात पडलो की कशी मजा आली म्हणून हसायचे. त्याचा मला खूप राग यायचा. एक म्हणजे हा खराच कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. आणि काहीही उत्तर दिले तरी ते कोडे सुटत नाही. दुसरे म्हणजे त्यांना उत्तर माहीत असेल अशी आशा असायची. पण 'कोंबडी आधी' असे उत्तर सांगितले की 'पण अंड्याशिवाय कोंबडी कशी येईल' असा विरुद्ध प्रश्न विचारण्यापलिकडे त्यांच्याकडून काही मिळायचे नाही. जसा मी मोठा झालो आणि इतर मुलांना हाच प्रश्न विचारताना मी पाहिले तेव्हा माझ्या लक्षात यायला लागले की त्यांनाही या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही. आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे मुलांना गोंधळात टाकण्याच्या खेळापलिकडे या प्रश्नात काहीतरी शोधण्यासारखे आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती.

कोडे खरेच विचित्र आहे. अंडे आधी म्हणावे तर ते अंडे उबवायला कोंबडी लागते. कोंबडी आधी म्हणावी तर अंडे घालू शकणारी कोंबडी ही त्या अंड्यातूनच जन्माला येते. त्यामुळे आधी काय? हे कोडे असाध्य आहे हे मान्य केले तर 'अनंत काळपासून हे आहे हे असे आहे. काळालाच सुरूवात नाही, त्यामुळे कोंबडी-अंडे या चक्रालाही सुरूवात नाही.' हे मान्य करावे लागते. या चक्राची उत्पत्ती काही-नाही पासून झाली हे सकृद्दर्शनी संभवतच नाही. परमेश्वराने सगळे निर्माण केले, आणि प्रजाती बदलत नाहीत या गृहितकाला पुष्टी मिळते. त्यामुळे शून्यापासून, कुठच्याही निर्मात्याशिवाय जीवांची निर्मिती कशी झाली हे जाणून घ्यायचे असेल तर या कोड्याचे उत्तर समजून घ्यावे लागते.

याचे उत्तर दडले आहे या कोड्याच्या भाषेतच. 'अंड्याशिवाय कोंबडी नाही, आणि कोंबडीशिवाय अंडे नाही' असे म्हटले की हे चक्र बदलू न शकणारे आहे हे आपणच गृहित धरतो. हे अर्थातच खरे नाही हे आपल्याला कुठेतरी माहीत असते. कारण पृथ्वीचा जन्मच साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला. हा कालखंड प्रचंड असला तरी तो अनंत नाही. जवळपास चाळीस टक्के काळ कोंबड्या जगू शकतील इतका ऑक्सिजनच पृथ्वीवर नव्हता. किंबहुना हाडे असणारे प्राणीच पन्नासेक कोटी वर्षांआधी सापडत नाहीत. पण त्याआधी काही प्रकारचे जीव तर होतेच. त्यामुळे आधीच्या कुठच्यातरी प्राण्यापासून कोंबड्या तयार झाल्या असणार हे मान्य करावे लागते. म्हणजे कोंबडी-अंडे-कोंबडी हे चक्र कधीतरी निर्माण झाले असणार. आपल्याला फक्त या चक्राची उत्पत्ती कशी झाली हे शोधून काढायला हवे.
कोंबडी अंडं चक्र

ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी वरील चित्राकडे पाहा. चित्राच्या पहिल्या भागात सध्या चालू असलेले चक्र दाखवलेले आहे. कोंबडीपासून अंडे बनते, अंड्यातून पिलू बाहेर येते, ते वाढून कोंबडी होते, आणि ती कोंबडी अंडे देते. चित्राच्या दुसऱ्या भागात हेच चक्र शतकानुशतके, युगानुयुगे चालू असलेले दाखवले आहे. डावीकडून उजवीकडे जसजसे जातो, तसतसा काळ पुढे जातो. आणि प्रत्येक चक्र म्हणजे एक पिढी अशी कल्पना केलेली आहे. जर या चक्रात बदल होणारच नाही, होतच नाही, आणि पूर्वापारपासून अव्याहतपणे ते तसंच चालू आहे असे गृहित धरले तर दुसऱ्या चित्राप्रमाणे अनादी अनंत काळाचा भास होतो. हेच कोंबडी आधी की अंडे आधी या कोड्याचे सार आहे.

मात्र तिसऱ्या भागाकडे बघितले की खरी परिस्थिती डोळ्यासमोर आणता येते. सर्वात आधी एकपेशीय जीव होते. ते सरळसरळ पेशीविभाजनाने पुनरुत्पादन करत असत. त्यामुळे इथे चक्राचा प्रश्नच नाही. त्यानंतर द्विपेशीय आणि नंतर हळूहळू अनेकपेशीय जीव आले. त्यांचेही पुनरुत्पादन जसेच्या तसे होत असावे. त्यामुळे तिथेही चक्राचा प्रश्न नाही. जसजसे जीव अनेकपेशीय झाले, तसतसे त्यांच्या पेशींचे समूह विशिष्ट कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे करू लागले. म्हणजे अवयव निर्माण झाले. त्यातला एक अवयव म्हणजे गर्भाशय. म्हणजे पुनरुत्पादनातून निर्माण होणारा जीव हा संपूर्णपणे वाढलेला नसून जन्माला आल्यानंतर वाढून मग पुनरुत्पादन करण्याच्या क्षमतेवर आला. या पातळीवर कुठेतरी या चक्राला हळुवार सुरूवात झाली. कारण 'आधी कोंबडी की आधी अंडे?' हा प्रश्न 'आधी प्राणी की आधी अर्भक?' या स्वरूपात विचारता येऊ शकतो. याच सुमाराला कुठेतरी लैंगिक पुनरुत्पादनालाही सुरूवात झाली. नवजात जिवाला जन्म घालण्यात नर आणि मादी असे शुक्राणू आणि अंडंबीज पुरवणारे दोन भाग एकाच प्रजातीमध्ये दिसायला लागले. मग जीव जन्मण्याच्या आणि वाढण्याच्या प्रक्रियेचे गर्भाशयात घडणाऱ्या प्रक्रिया, आणि गर्भाशयाबाहेर घडणारी वाढ असे भाग व्हायला लागले. म्हणजे आपल्याला दिसणारे चक्र हे अधिकाधिक मोठे व्हायला लागले. काही प्रजातींमध्ये बाहेर येणाऱ्या गर्भावर ते काही काळ टिकून राहावे यासाठी कदाचित आवरण तयार झाले असेल. हे आवरण जसजसे कठीण होत गेले, तसतसे गर्भाशयातल्या प्रक्रिया गर्भाशयाबाहेर, या आवरणाच्या आत अधिकाधिक प्रमाणात व्हायला लागल्या. आणि त्याचे एका टोकाचे स्वरूप कोंबडीमध्ये दिसते. कोंबडीच्या पिलाची वाढ ही एकाच मोठ्या अंडंपेशीपासून ते पिलापर्यंत ही गर्भाशयाबाहेर, अंड्याच्या आत होऊ लागली. गरज असते ती फक्त विशिष्ट तापमान राखण्याची.

दुसऱ्या पद्धतीनेही याचा आपल्याला विचार करता येतो. कुठचीही कोंबडी असली तरी तिला आई असतेच. आता एका प्रचंड मैदानावर एक रेष आखू. ही काळरेषा. तिच्या सर्वात उजव्या टोकावर आजची एक कोंबडी ठेवली. तिच्या डाव्या बाजूला एक मीटरवर तिची आई कोंबडी ठेवली. तिच्या डाव्या बाजूला एक मीटरवर तिची आई.... असे करत करत गेलो तर आपल्याला काय दिसेल? जसजसे डाव्या बाजूला जाऊ तसतसे आपण काळात मागे जाऊ. मीटरला एक पिढी या दराने. आता कुठच्याही कोंबडीकडे बघितले तरी ती गुणधर्मांनी जवळपास तिच्या आईसारखीच असेल. कारण उत्क्रांतीचे बदल हे एखाद-दोन पिढ्यांत दिसून येत नाहीत. त्यामुळे तुम्ही आजची कोंबडी बघितली आणि डावीकडे एक किलोमीटर चालत हजार पिढ्या मागे गेलात तरी तुम्हाला त्यांच्यात फरक दिसणार नाही. दोन्ही प्राण्यांना तुम्ही कोंबडीच म्हणाल. मात्र लाखभर पिढ्यांचा फरक केलात निश्चितच त्यांच्यात फरक जाणवेल. कदाचित त्यांचा आकार वेगळा असेल, कदाचित आधीच्या कोंबड्यांची अंडी लहान असतील, कमी कडक असतील... पाचदहा लाख पिढ्या मागे गेलात तर कदाचित इतका प्रचंड फरक जाणवेल की हा प्राणी तुम्हाला कोंबडी म्हणून ओळखू येईल की नाही सांगता येणार नाही. पण गंमत अशी की त्या पाच लाखाव्या आजीच्या आसपासच्या 'कोंबड्या' जवळपास हुबेहुब तिच्यासारख्याच दिसतील. कारण हा घडणारा बदल हजारो पिढ्यांमध्ये, हळूहळू होतो. जर तुम्ही काही कोटी पिढ्या मागे गेलात दिसणारा प्राणी हा इतका वेगळा असेल की त्याला कदाचित पक्षी म्हणता येणार नाही. कदाचित तो अंडे घालत नसेल. अजून अनेक कोटी पिढ्या मागे गेलात तर काही पेशींचा अवयव नसलेला गोळा दिसेल. त्याही मागे मागे सुमारे पन्नासेक कोटी वर्षे गेलात तर दोनचार पेशींचा समूह असेल. आणि पुरेसे मागे गेले तर त्या रांगेत एकपेशीय जीव सापडतील. अशा रीतीने हे कोडे पद्धतशीरपणे सुटते. यासाठी उत्क्रांतीद्वारे हळुहळू होणारा बदल लक्षात घ्यावा लागतो.

या कोड्याची मेख 'खूप मोठे' आणि 'अनादी-अनंत' यामधल्या फरकात आहे. आपल्याला सर्वसाधारण जीवनात दिसणाऱ्या गोष्टी या मर्यादित काळाच्या आणि मर्यादित आकाराच्या असतात. आपल्याला ज्या कोंबड्या माहीत आहेत, त्या आपल्या वडलांना, आजोबांना दिसणाऱ्या कोंबड्यांसारख्याच असतात. कोंबडी-अंडे-कोंबडी या चक्रात गेल्या काही शतकांत बदल झालेला नाही. काळाच्या रेषेवर उभ्या केलेल्या या कोंबड्यांकडे आपल्याला काहीशे मीटरपलिकडच्या कोंबड्या दिसत नाही. त्यामुळे साहजिकच आपल्याला यात बदल होऊ शकतो याची कल्पना करता येत नाही. त्यामुळे 'खूप मोठा काळ' आपण मागे वाढवून 'अनादी काळ' मनातल्या मनात आपोआप बनवतो. काळाच्या महाप्रचंड पसरलेल्या आवाक्यात आपले स्थान टिचभर आहे. त्याच्या लहानशा भागाकडे - शंभर दोनशे वर्षांकडे - पाहून आपण जे निष्कर्ष काढतो ते मोठ्या काळाच्या - कोट्यवधी वर्षांच्या - पातळीवर लागू ठरतातच असे नाही. हे एकदा मान्य केले की हे कोडे सहज सुटते.

(मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अप्रतिम झालाय हा भाग! एकदम सोपा समजायला!

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा भाग आवडला.

हा भाग समजला.

हा भाग सोपा आणि स्पष्ट आहे. पण 'कितीही म्हटलं तरी कोंबडी ही हुबेहूब कोंबडीच्या आईसारखी नसते' हा पॉइंट हवा होता. आणि तुमच्या उपक्रमवाल्या मालिकेतलं अ अक्षर बदलून स होणारे चित्र हवे होते.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण 'कितीही म्हटलं तरी कोंबडी ही हुबेहूब कोंबडीच्या आईसारखी नसते' हा पॉइंट हवा होता.

उत्क्रांतीमुळे होणारे बदल हळूवार आहेत हे अधोरेखित करण्यासाठी - सर्वसाधारणपणे आई-मुली जितक्या सारख्या असतात, आणि पिढ्यानपिढ्या हे सारखेपण बदलत नाही, तसंच इथेही दिसतं; मात्र हजारो लाखो पिढ्या मागे गेलात तर पुरेसं वेगळेपण दिसतं - असं म्हटलेलं आहे.

अ पासून स पर्यंत बदलणारं अक्षर हे उत्क्रांती कशी होते, किंवा प्रजाती कशा बदलतात हे सांगण्यासाठी नव्हतं. तर निर्जीव आणि सजीव असे दोन खोके नसून त्यांमध्ये चढती भाजणी आहे हे दाखवण्यासाठी होतं. ते येत्या एका लेखात आहे.

संकल्पना सोप्या भाषेत सुस्पष्ट करून लिहिलीये. व्हेरी गुड!

बाकी, 'कोंबडी आधी की अंडे आधी?' याचं आम्हाला उमजलेलं उत्तरः
आधी ड्रिन्क्स, मग दोन पेग झाल्यावर (उकडलेली) अंडी, आणि शेवटी मसाला कोंबडी!!
कुक्कुटवंशाचा विजय असो!!!
Smile

तुमच्या चिरंजीवांनी मसाला कोंबडी आणि मग वाटलंच तर उकडलेली अंडी असा क्रम लावला तर मग उत्क्रांती होत आहे याचा पुरावा मिळेल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा क्रम उलटा करुन बघा कधी! भरल्या पोटी दोनाच्या ऐवजी चार पेग रिचवू शकाल!

लेखाबद्दलः लेखमाला तर आवडतेच आहे, पण तसं लिहिलं आणि राघांनी खरच एफटीआयआयचं संचालकपद बहाल केलं तर कठीण प्रसंग येईल. अहो, आम्हाला ब्,क आणि ड दर्जाच्या सिनेमातला पण अनुभव नाहीये हो! शिवाय टी.व्ही. वरील चर्चेला सामोरं जावं लागेल. घट्ट सफारी सूट घालून, मख्ख चेहेर्‍याने स्वतःचं समर्थन करावं लागेल.

हा भाग समजला आणि आवडला.

कारण इतर कोणत्या तरी दुसर्या प्राण्यांच्या संयोगातून हे अंड निर्माण झालं असणार, आणि त्या अंड्यातून दोन पिल्ली बाहेर आली असणार,एक कोंबडा आणि एक कोंबडी आणि या दोघांपासून कुक्कुट वंशावळ पुढे गेली असणार (असा माझा दावा नाही,तर अंदाज आहे,पटलं तर घ्या नाहीतर कलटी मारा)

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

संपूर्ण लेखमाला आवडली.
बाकी
कुणाच्या तरी मनात विचार जन्मला असेल, त्यानंतर पुढे .......
शिवाय आजकाल कुठल्या दिवशी कोंबडी खाणे कानूनी दृष्ट्या उचित आहे, याचा हि विचार करणे आलेच.