'ऐसी अक्षरे'ला खास दिवाळी भेट - मोरा गोरा अंग...

राम राम मंडळी,

'ऐसि अक्षरे'च्या सर्व सभासदांना, संपादक-चालक-मालक वर्गाला व सर्व वाचकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..! नुकतंच हे संस्थळ सुरू झालं आहे त्याबद्दल सर्व संबंधितांचं मनापसून अभिनंदन व माझ्या एका अत्यंत आवडत्या गाण्याचं रसग्रहण या संस्थळास दिवाळीनिमित्त सादर भेट करतो..

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मोरा गोरा रंग.. (येथे ऐका)

थोरल्या बर्मनदांचं बंदिनी चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं. दिग्दर्शक बिमलदा, गीत- गुलजारसाहेब, संगीतकार थोरले बर्मनदा, सोज्वळ सौंदर्यवती नूतन आणि मा दिनानाथरावांची थोरली हृदया, अर्थात लतादिदि मंगेशकर. (आपल्या महितीसाठी - दिदिचं पाळण्यातलं नांव - 'हृदया' हे होय.)

सगळी टीमच भन्नाट. फक्त आणि फक्त उत्कट कलेशी बांधिलकी असलेली. यातलं ना कुणी त्या बापुडवाण्या झी/सोनी वहिनीच्या उथळ इंडियन आयडॉलच्या स्पर्धेतलं, ना कुणी महागायक/महागयिका, महाराष्ट्राचा गौरव इत्यादी समस चा लाचारी जोगवा मागणर्‍या खेदजनक स्पर्धेतलं. तरीही सारेच अव्वल..!

मोरा गोरा अंग लइ ले
मोहे शाम रंग दइ दे
छुप जाऊँगी रात ही में
मोहे पी का संग दइ दे

एका तरुणीचं मनोगत. लइ ले आणि दइ दे ही क्रियापदं अगदी वळणदार..किती सुरेख शब्द आहेत या गाण्यात! हिंदी भाषेचा गोडवा काही औरच आणि त्यातले लइ दे, दइ दे, हमका बताइ दे इत्यादी उच्चार केवळ दिदिनेच करावेत..

एक लाज रोके पैयाँ
एक मोह खींचे बैयाँ

क्या बात है! जेवढा मोठा मोह, तितकीच मोठी अदब आणि संस्कार..! मोहाने बाही खेचली जातेय परंतु संस्कार पाउलांना थांबवताहेत..! 'एक मोह खिचे पैया' तल्या दिदिच्या कोमल गंधाराबाबत काही भाष्य करायला मी फार छोटा माणूस आहे! 'बैयाँ' शब्दातली 'नीसां' संगती केवळ लाजवाब. आणि त्यानंतरचं दिदिचं 'हाए..!'

असं 'हाए' गेल्या दहा हज्जार वर्षात झालं नाही आणि पुढे होणार नाही..! (जाता जाता - तेच 'हाए' अनुराधा या अप्रतीम चित्रपटात पं रवीशंकरांनी दिदिच्या 'कैसे दिन बिते कैसे बिती रतिया..' या गाण्यात घेतलं आहे!)

जाऊँ किधर न जानूँ
हम का कोई बताई दे

'जाऊँ किधर न जानूँ..' या ओळीतलं कोमल निषाद आणि शुद्ध धैवताचं तसं अनोखं परंतु छान अद्वैत..आणि त्याच नीध चं 'हम का कोई बताई दे' या ओळीनं पंचमावर न्यास करून केलेलं छान समाधान..!

बदरी हटा के चंदा
चुप के से झाँके चंदा

हम्म! इतका वेळ ढगाआड लपलेला चंदा आता हळूच त्या मुलीचं मनोगत ऐकायला आला आहे. प्रकट झाला आहे.

तोहे राहू लागे बैरी
मुस्काये जी जलाइ के

पण तिला ते तेवढंसं आवडलेलं नाहीये. तिच्या चेहेर्‍यावरचा तो लटका राग केवळ क्लास! आणि मग 'तोहे राहू लागे बैरी..' असं म्हणून त्या चंद्राला 'तुझ्यामागे राहूचं शुक्लकाष्ट लागो..' अशी दिलेली प्रेमळ धमकी!

आपले गुलजारसाहेब शनीच्या ऐवजी बहुधा राहूला अधिक घाबरत असावेत. म्हणूनच ते नायिकेकरवी चंद्राच्या मागे चक्क राहूची पीडा लावू इच्छितात..! Smile

कुठे अवखळपणा तर कुठे थोडा नखरा, कुठे लटकेपणा तर कुठे 'मोहे पी का संग..' किंवा 'तोहे राहू लागे बैरी..' तली मनलुभावणी मेलडी. एखादं गाणं किती देखणं असावं, सुरेख असावं..?

कहाँ ले चला है मनवा
मोहे बाँवरी बनाइ के

क्या केहेने! इथे किती मोठी गोष्ट सांगून गेलेत गुलजारसाहेब! प्रत्येक तरुणीच्या आयुष्यात असं एक वेडं वय येतं जेव्हा कुणीतरी भेटावसं वाटतं, कुणासोबततरी हातात हात धरून कुठेसं जावसं वाटतं. मस्त वार्‍यावर फडफडणारं मन. अगदी खरोखर 'बाँवरी' बनवणारं ते वय..!

मंडळी, एखादं गाणं आपल्याला ऐकायला आवडतं, कानांना गोड वाटतं. परंतु मी इथे इतकंच सांगेन की आपण त्याही पुढे जाऊन त्या गाण्याकडे कसं बघतो, त्यातल्या स्वरसंगती, न्यासस्वर, लयतालाची बाजू, त्यातले शब्द अन् त्याची चाल कशी समजून घेतो हेही महत्तवाचं आहे. त्यामुळे ते गाणं आपल्याला निश्चितच अधिकाधिक आनंद देऊन जाईल..

उगाच कुठेही गोंगाट नसलेला कमीतकमी वाद्यमेळ, सुंदर शब्द, वजनदार ठेका, तरीही अगदी भरपूर मेलडी असलेलं हे गाणं. नूतनची मोहक छबी आणि तिचा सहजसुंदर गाण्यानुरूप अभिनय. का माहीत नाही परंतु नूतनकडे बघताना मला उगाचंच आमच्या मुमताज जहान बेगम दहलवी 'आपा'ची आठवण झाली! Smile

आता कुठे गेली हो अशी गाणी? खरंच, कुठे गेली..? Sad

आहे तो केवळ बराचसा गोंगाट अन् मेलडीचा अभाव असलेले भडक वाद्यमेळ..!

असो..

-- (दिदिची व्यक्तिपूजा, विभूतीपूजा करणारा तिचा एक लोटांगणवादी चाहता) तात्या अभ्यंकर.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख एकदम आवडेश.
(फक्त रफीभक्त) टार्‍या भजनकर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....

उद्घाटनानिमित्त तात्यांचा खास तात्या शैलीतला लेख आलेला पाहून आनंद झाला. गाणं लाजवाब आहे. एका तरुणीच्या मनातली हुरहूर गुलजारने सुंदर व्यक्त केली आहे. तो अल्लडपणा टिपण्यासाठी खास लडिवाळ बोली वापरली आहे ती फारच गोड. संगीत, स्वर आणि ऍक्टिंग सगळंच एकावर एक मजले चढवणारं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तात्या लेख नेहमीप्रमाणेच आवडला. लता मंगेशकर यांचे पाळण्यातील नाव हृदया होते हे प्रथमच कळते आहे. खूप गोड नाव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख अतिशय आवडला. हे गाणं तसं अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बिमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटातली इतर गाणी जरी शैलेंद्रने लिहिली असली, तरी हे एकच गाणं गुलझारने लिहून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत गुरुवारी रंग-तरंग म्हणून पुरवणी यायची. त्यात एकदा गुलजारला नायिका आपल्याला त्रास देणाऱ्या चंद्राला राहूचे भय दाखवते ही कल्पना खूप दिवसांनी, गाण्याची दोन कडवी मनाजोगती होऊनही गाण्याची पूर्तता कशी करावी या विवंचनेत काही दिवस घालवल्यावर कशी सुचली याचं वर्णन केलं होतं.

पुत्रवती बभूव' होण्यापूर्वी (मोहनीश बहल) चित्रित झालेला नूतनचा हा शेवटचा चित्रपट. मर्ढेकरांची उपमा उसनी घेऊन सांगायचं झालं तर, तिचा चेहरा गर्भवतीच्या 'सोज्वळ मोहकतेने' पडदा उजळून टाकतो. या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, लता आणि एस. डी. बर्मन यांच्यात निर्माण झालेला काही काळापुरता बेबनाव मिटवून, दोघांनी पुन्हा एकत्र काम करणं सुरू केल्यानंतर आकाराला आलेलं हे पहिलंच गाणं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही लिहिलेले अक्षर न अक्षर मान्य. पण सिनेमा पाहिला असल्याने, ती ज्याच्यासाठी एवढं चांगलं गाणं म्हणते तो 'अशोककुमारचा' चेहेरा आठवला की, अगदी लहानपणी जो प्रश्न पडला होता तोच आता म्हातारपणी पडतो. 'अरेरे, हिने ह्या म्हातार्‍यात असं काय बघितलं?'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

दॅट्स द स्पिरिट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

मराठीमधील लेखनातून, मग ते ललित असो की वैचारिक, माहितीपूर्ण असो की निव्वळ मनोरंजनात्मक - लेखकांचे व वाचकांचे जीवन काही अंशांनी समृद्ध करणे, हे 'ऐसी अक्षरे' चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आंतरजाल हे मराठी साहित्यनिर्मितीचे व वाचनाचे माध्यम म्हणून समृद्ध करणे हे त्याला पूरक उद्दिष्ट आहे.
असे या संस्थळाचे धोरण आहे. तेव्हा आपले हे लेखन येथे टाकण्यापूर्वी आपल्याला या उद्दिष्टाची कल्पना नसल्यास तसे येथे स्पष्ट करा. प्रतिसाद राहू द्या तसाच. पण यापुढे असे अन्य भाषेतील लेखन येथे न करणे उपरोक्त उद्दिष्टानुसार उचित असेल हे तुम्हालाही मान्य व्हावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खाजगीवाले,

माझ्या समजुतीप्रमाणे मी सदर लेख मराठीतच लिहिला आहे. असो..

तात्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार छान उद्घाटन-लेख.

(मात्र चंद्रामागे राहू किंवा केतूचीच पीडा लागणे योग्य. राहू आणि केतू हे चंद्राला अक्षरशः ग्रहण देतात.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरेख लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व रसिक प्रतिसादींचा मी ऋणी आहे, वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..

नंदनशेठचा प्रतिसाद विशेष आवडला..

तात्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाण्याची ओळख आवडली. मी लहान असताना आमच्या बाजूला असणार्‍या टपरीवर हे गाणे सतत लागे, ऐकून होतोच. पण असे रसग्रहण मिळाल्याने नीट ओळख झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars