फोटोत पहिल्यांदाच हसले त्याची गोष्ट

नव्वदोत्तरी कथा

फोटोत पहिल्यांदाच हसले त्याची गोष्ट

लेखक - मंदार पुरंदरे

सक्काळी सक्काळी उठून अंगणात सडा-बिडा टाकून रांगोळी काढायचं काम मी आणि शेजारची मंजू करायच्या. रांगोळीची बारीक घोटीव रेघ काढण्यात मंजूचा हात धरणारी गावात कोणीच नव्हती. सकाळी सहाच्या आसपास आमचा हा कार्यक्रम सुरू होई. ठिपक्या-ठिपक्यांची, नक्षीची, गणपतीची, फुलाफुलांची अशा अनेक प्रकारच्या रांगोळ्या. कधी पुस्तकात पाहून, कधी आपल्याच मनाला विचारीत आमचं काम मुकाट्यानं चालायचं. तासभर निवांतपणे आम्ही आमच्या ठिपक्यांच्या, रेषांच्या जगात बुडालेल्या असू. रांगोळी काढताना आम्ही एकमेकींशी फार कमी बोलायच्या. पुढचा ठिपका किंवा पुढची रेघ कोण कुठे काढणार हे आम्हांला न बोलता उमजत असे. क्वचित आम्ही ‘हा रंग दे गं,’ ‘रंगाची डबी देतीस का’ अशी मोजकी वाक्यं बोलत असू. रांगोळी काढून झाल्यावर मात्र आम्ही नेहमीच्याच बोलघेवड्या मुली होऊन जात असू.

माई आणि अण्णा या दोघांनीही आम्हांला कधीही हटकलं नाही. अण्णा आमचे इतके कनवाळू की अंगणात आम्ही जिथे रांगोळी काढत असू, तिथे त्यांनी वर पत्र्याची शेड स्वतःच्या हातांनी बनवून दिली. आमची रांगोळी अर्ध्यावर आली की माई चहा घेऊन हजर असायची. बाहत्तर-त्र्याहत्तर साली गाव आजच्यासारखं नव्हतं. रामाच्या देवळातल्या पहाटेच्या काकडआरतीचा आवाज सोडला तर सगळीकडे नीरवता असायची. नदीच्या बाजूला गेलो तर नदीच्या खळाळाचा आवाज, कंपनीच्या बाजूला यंत्रांचे थोडे थोडे आवाज, जनरेटरची मंद घरघर असे मोजकेच आवाज गावाच्या अंगावर होत असत. गावाची संथ लय त्यामुळे बिघडत नव्हती. देवळात लाउड स्पीकर्स होतेच, पण पुष्कळदा वीज नसायची. मग लाउड स्पीकर्सचा प्रश्नच येत नसे. तसे ते सणासुदीला, मिरवणुकीला वगैरे वापरले जात म्हणा; तरीही आजच्यासारखे ओरखडे आणणारे आवाज गावाच्या अंगावर होत नसत. या शांततेत आमची छान लय लागत असे.

आमची रांगोळी गावात प्रसिद्ध होतीच. रांगोळी बघायला पुष्कळ जण येत. रात्रपाळी संपवून दत्तू काका येत असत आणि एक-दोन मिनिटं रेंगाळून निघून जात. ते आल्याचं आणि गेल्याचं समजतही नसे. देवळाकडे जाणारे लोक, सकाळची एसटी पकडण्याची घाई असलेले काही लोक, आठच्या गाडीनं कॉलेजला जाणारी काही मुलं-मुली आणि दररोज नदीकडे जाणारे कानडे गुरुजी. आम्हांला रांगोळी काढताना कानडे गुरुजी शांतपणे पाहत आणि, “अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते पोरींची!” हे वाक्य हमखास म्हणत.

‘ब्रह्मानंदी टाळी’ खरोखरच लागत असे. रांगोळीच्या ठिपक्यांचा आणि ब्रह्मांडाचा काही संबंध होता असं मला आता वाटतं. रांगोळी काढायला सुरुवात करण्यापूर्वी खालची सारवलेली जमीन, तिचा मातकट रंग, आजूबाजूच्या काही गोष्टी यांचं भान असे. रांगोळी काढायला सुरुवात केल्यानंतर थोड्याच वेळात या सर्व गोष्टी विरून जात असत. एकतर बराच वेळ उकिडवं बसून पायाला रग लागत असे आणि थोड्या वेळाने आपले पाय जणू नाहीसे झाले आहेत असं वाटत असे, दोन्ही गुडघ्यांत डोकं घालून बसल्याने अंग अगदी सूक्ष्म होऊन जात असे आणि मनात भरून राहत ते रांगोळीचे पांढरे, केशरी, लाल, निळे ठिपके, रांगोळीच्या पातळ जाड रेषा. हळूहळू रांगोळीचा सूक्ष्म ठिपकासुद्धा ब्रह्मांडाएवढा मोठा वाटू लागे. जवळजवळ तासाभराच्या रांगोळी-समाधीनंतर मन अगदी रिकामं होत असे, त्याची रांगोळी होऊन सांडत असे जमिनीवर. रांगोळीचं काम पूर्ण झालं की काही क्षण अगदी कोरे जात. त्या क्षणांत आनंद, दुःख, शोक, ईर्ष्या काहीच वाटत नसे. आपला चेहरा अगदी कोरा आहे असं काहीतरी जाणवे आणि आणखी काही बाही.

मंजूचं घर आमच्या घराजवळच होतं. आमच्या कुटुंबांमध्ये चांगला घरोबा होता. मंजू माझ्यापेक्षा काही महिन्यांनी मोठी. तिच्या आणि माझ्या आवडीनिवडी तशा वेगवेगळ्या. ती गाणी म्हणायची, सुमन कल्याणपूर तिची आवडती गायिका. मंजू विणकाम करायची, ती शाळेत गणितातसुद्धा हुशार होती आणि ती धीट मुलगी होती. मी मात्र माझ्या घाबरटपणामुळं मागं राहायची. मला बारावीत कमी मार्क मिळाले. मंजूला मात्र चांगले मिळाले. मी बाहेरून बी.ए. करायचं ठरवलं आणि तीन वर्षांच्या बी.ए.ला चार वर्षं लावली. मंजू मात्र तालुक्याच्या कॉलेजला जाऊन बी. ए. करू लागली. हा बदलाचा टप्पा आम्हां दोघींसाठी फार अवघड होता.

मंजू दुसऱ्या दिवशी तालुक्याला जाणार. आदल्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे उठून रांगोळी काढायला सुरुवात केली. एकही शब्द न बोलता आमचं काम सुरू होतं. पावसाळी दिवस होता. साडेसहा वाजले तरी सूर्यनारायणाचा पत्ता नव्हता. त्या दिवशी आम्हां दोघींची ‘ब्रह्मानंदी टाळी’ लागली आणि एक सुरेख नक्षी आकाराला आली. मंजूचं अन्‌ माझं अद्वैतच होतं ते. पुन्हा कोऱ्या चेहऱ्याचे ते क्षण आलेच. या कोऱ्या चेहऱ्याच्या क्षणांची ओळख आम्हां दोघींना होती. मग आम्ही दिवसभर खूप बडबड केली. मंजूचं सामान वगैरे बांधलं, माझ्या माईनं तिच्यासाठी तिच्या आवडीची कोथिंबीर वडी बनवून दिली. दुसऱ्या दिवशी मंजू तालुक्याला गेली.

मंजू तालुक्याला गेली त्या दिवशी माझा खाडा झाला. पण दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा सर्व नेहमीप्रमाणेच सुरू झालं. हे नेहमीप्रमाणे म्हणजे शांत सकाळचे क्षण असणारे दिवस हळूहळू बदलू लागले होते आणि हे बदल लांबून आपल्याजवळ येत आहेत याची मला काही कल्पना नव्हती.

सकाळच्या शांततेत आता महाडिक काकांच्या घरातली विविधभारती जरा जास्तच आवाजात लागू लागली होती. महाडिक काकांची नुकतीच इथे बदली झाली होती, ते सध्या एकटेच होते. कंपनीमध्ये ज्यादा लोकांची भरती झाली होती आणि गावात नवीन चेहरे दिसू लागले होते. या अशा छोट्याछोट्या बदलांमध्ये माझा दिनक्रम फारसा बदलला नाही. पण मंजू गेल्यानंतर दोन-तीन महिन्यांत मला वाटू लागलं की मी जरा यंत्रवत रांगोळी काढू लागले होते. मंजू नसल्याने असेल कदाचित, पण आपला कोरा चेहरा सापडण्याचे क्षण कमी होऊ लागले होते की काय माहीत नाही.

दिवाळीच्या सुटीला मंजू आली. मग नेहमीप्रमाणेच धामधुमीत आम्ही दिवाळीची मोठी रांगोळी काढली, त्यावर पणत्या लावल्या. रांगोळी पाहायला येणारा प्रत्येक जण हरखून गेला. त्याच वेळी आमच्या गावात कुठूनसा एक परदेशी गोरा आला. तो खरंतर वाट चुकला होता, कर्नाटकात जाताना चुकून आमच्या गावात उतरला आणि गावाच्या प्रेमातच पडला. महाडिक काकांच्या घरात राहू लागला. चांगला महिना-दीड महिना मुक्काम ठोकून होता. त्याला फोटो काढण्याचं भारी वेड. माळाचे, नांगराचे, फाळांचे, गुरा-ढोरांचे, पारावर दुपारी झोपणाऱ्या लोकांचे, चावडीचे... सारखे फोटो काढत होता. आमच्या रांगोळीचेही त्याने पुष्कळ फोटो काढले. माझे आणि मंजूचेही. मंजू त्याच्याशी धिटाईनं इंग्लिशमध्ये बोलत होती, मी मात्र घुम्यासारखी होते. त्या बाबाचं वैशिष्ट्य असं की तो बाबा फोटो काढताना आधी सांगत नसे, की बाबा मी तुझा फोटो काढतोय. दुसरी गोष्ट त्याचं वय ! त्याचं नक्की वय त्याच्याकडे पाहून बिलकुल समजत नव्हतं. यामुळं मी जर बावरूनच गेले होते.

आमच्या माईनं त्याला एक दिवस घरी जेवायलाच बोलावलं. जेवण झाल्यावर त्याच्याकडून सगळ्या घराचे फोटो काढून घेतले. त्याच्याकडे पोलारोईड की कुठलासा कॅमेरा होता, त्यात लगेच फोटो येत असे. काही फोटो त्या कॅमेऱ्यानेसुद्धा काढले. माजघर, स्वयंपाकघर, तुळशीवृंदावन, गोंदवलेकर महाराज, नारायण महाराज यांच्या तसबिरी, विठोबा अशा सर्वांचे. माई आणि अण्णा दोघेही खूश होते, एकदम. मग कधीतरी ते, पोलाराईडवाले आणि दुसरे, असे सगळे फोटो आम्ही संध्याकाळी बघत बसलो होतो. मी माझे फोटो बघत होते - रांगोळी काढताना, मंजूसोबत, चहाचा कप आणताना. बघता बघता वाटू लागलं की हा आपला फोटो नाही. एकाही फोटोत माझ्या चेहऱ्यावर सहजता नव्हती. फोटो पाहताना वाटत होतं की आपला खरा चेहरा, आपला कोरा चेहरा कुठलाच फोटो पकडू शकणार नाही. बाकी लोकांना फोटोत काय दिसतं समजत नाही.

गंमत अशी की याच बाबानं काढलेल्या फोटोवर माझं लग्न जमलं. जवळच्याच पण थोड्या मोठ्या गावात. अनिल मुळात आयटीआय झालेले, इलेक्ट्रिशियन. एका सहकारी दुग्धसंघात त्यांची नोकरी. अनिल नुसतेच इलेक्ट्रिशियन नव्हते. मशिनी दुरुस्त करण्यात, आणि नवी मशीन बनवण्यातपण, त्यांचा हातखंडा. त्यांना कुठून कुठून लोक बोलावून न्यायचे मशिनी दुरुस्त करायला. लग्नानंतर मुलीचं आयुष्य पार बदलून जातं, माझंही तसंच झालं.

तरी माझं लग्न अगदी नेहमीसारखं झालं, म्हणजे फोटो दाखवून, पत्रिका जुळवून, ओळखीपाळखी बघून. सासरही मला समंजस मिळालं. सरासरी काढली तर आनंदच. कानडे गुरुजी पत्रिका बघून म्हणाले होते, “राजयोग आहे मुलीला.” म्हणजे नक्की काय ते मला आजवर समजलेलं नाही, पण आयुष्याची गाडी रुळावरून सरळ चालत होती एवढंच.

मंजूचं जीवन मात्र धाडसी बाई! कॉलेजला जायला लागल्यापासून तिला तालुक्याचं, शहराचं वारं लागलं होतं. त्यातून ती इंग्लिश पुस्तकं वाचायची आणि भरीस भर म्हणून अविनाशच्या प्रेमात पडली होती. कुठल्याश्या कामानिमित्तानं त्यांची कॉलेजात भेट झाली आणि मग पळून जाऊन लग्न करेपर्यंत वेळ आली.

पहिली दोन वर्षं मंजू दूर गेल्याचं दुखः मला वेढून होतं. तरी चार-सहा महिन्यांत एकदा ती येत असे. आम्ही मिळून रांगोळी काढत असू, आणि आम्हांला अधूनमधून तरी काही निवांत कोरे क्षण मिळत होते. मग दिवसभर मंजू तालुक्यातल्या, शहरातल्या गोष्टी सांगायची. ते ऐकून फार कौतुक दाटायचं मनात. तिला मार्कही चांगले मिळत होते.

मंजूसाठी कॉलेजचं तिसरं वर्ष फार बदलाचं गेलं. याच वर्षात तिला अविनाश भेटला. तिच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठा. धडाडीचा होता. तो नक्की इंजिनियर होता की शिक्षण अर्धवट सोडून त्यानं हे सर्व सुरू केलं होतं याबद्दल मला आजही नक्की कल्पना नाही. एवढं मात्र नक्की की गावागावांत जाऊन पिण्याच्या पाण्याची हालत बघायची, पाण्याच्या स्रोतांची नोंद घ्यायची, गावातल्या लोकांशी-शेतकऱ्यांशी बोलायचं असं काहीतरी काम होतं त्याचं. मंजू त्याचा एक फोटो जवळ ठेवत असे. छान दिसत होता तो फोटोत. मंजू सांगायची, अविनाशला मनापासून वाटे की दुष्काळ आणि पाण्याची समस्या सोडवणं आपल्याच हाती आहे. त्यानं शेतकी कॉलेजचाही कुठलासा अभ्यासक्रम पूर्ण केला होता बाई. गावागावात जाऊन विहिरींची पाहणी करून विहिरींवर सुरक्षा दोर बसवणे हा एक स्वतंत्र उद्योग तो करीत असे. त्याच्या लहानपणी त्याचा एक मित्र विहिरीत पडून गेला होता. त्यानंतर त्यानं बऱ्याच वेगवेगळ्या क्लृप्त्या योजल्या होत्या. सर्वात कमी खर्चाची योजना होती सुरक्षा-दोर किंवा सुरक्षा-साखळी योजना. मंजू त्याच्याबद्दलचे किस्से सांगताना अगदी अविनाशमय होऊन जायची आणि मला एखादा हिंदी पिच्चर पाहिल्यासारखं वाटे. मला मंजूची किंचित असूया वाटत असे आणि पुष्कळशी काळजी.

आम्ही भेटलो की मंजूच जास्त बोलत असे. मी आपली जास्त करून ऐकत असे. एका अर्थाने नुसतंच शांत बसून राहण्यासाठीचं माझं हक्काचं माणूस होतं मंजू. पण तिच्या तालुक्यात आणि शहरात जाण्यानं मात्र यात जरा फरक पडू लागला होता. तालुक्यानं आणि शहरानं आमच्यातला हा धागा विरळ होऊ लागला होता की काय जणू? शहरं शेवटी गावांना खाऊन टाकतात... गावाला समजून घेण्याची गरज शहराला पडत असेल का...असे चित्रविचित्र विचार मनात येत. वाऱ्यानं रांगोळी विस्कटून गेली किंवा ठिपके जागोजागी चुकल्यावर वाटतं ना, तसं वाटे.

माझं लग्न झाल्यानंतर दोन-एक वर्षांत मंजूचं लग्न झालं, पळून जाऊन. असलं काही धाडस करू नकोस बाई, असं मंजूला सांगण्याचं धाडस काही मला झालं नाही. तिच्या लग्नाची बातमीच नुसती मिळाली. वीणाकाकू, मंजूच्या आई, फार दुःखी झाल्या. त्या खरंतर गोंधळल्या होत्या. काका मंजूवर फार चिडले होते, रागानं लालेलाल झाले होते. मंजूच्या आणि आमच्या घरात चांगला घरोबा असल्यानं याचा परिणाम माई-अण्णांवरही होऊ लागला. त्याच वेळी मला दिवस गेले होते. अण्णांना वाटलं की या वातावरणात मला ठेवणं बरोबर नाही. मुली पहिलं बाळंतपण हौसेनं माहेरी करतात, माझं मात्र सासरी झालं. अपर्णा आमची पहिली मुलगी. आठवा महिना चालू होता आणि माईचा फोन आला की मंजू नवऱ्याबरोबर सुखरूप आहे. सध्या कुठल्याश्या प्रकल्पासाठी दोघं कोल्हापुरात आहेत. मी इतकी आनंदले की रडलेच. आत्ता लगेच कोल्हापूर गाठावं असं वाटू लागलं. माझ्या पोटात असलेल्या अपर्णालाही ते समजलं की काय न कळे! पोटात लाथा मारून तिनं मला हैराण केलं.

लग्नानंतर बाईचं आयुष्य बदलतंच, पण मूल झाल्यावर ते पराकोटीचं बदलून जातं. मला एक नवीन चेहरा मिळाला होता. अपर्णाच्या बडबडबोलांत, तिचं सगळं करण्यात अगदी गुंगून गेले मी. कशाकशाला फुरसत नव्हती. रांगोळी काढायलासुद्धा नाही. सासूबाई म्हणायच्या म्हणून देवघरापुढे काढीत असे एखादी छोटी नक्षी. पण आता अपर्णानीच मला अंतर्बाह्य वेढून टाकलं होतं. तिला वाढताना पाहण्यात मला पराकोटीचं सुख वाटत होतं. अपर्णा सहा वर्षांची होईपर्यंत आनंद झाला आणि मग तिच्या काळजीत, संगोपनात पुढली काही वर्षं गेली. गाव, माहेर सोडलेली मी आणि आत्ताची दोन मुलांची आई असलेली मी यात पुष्कळ काही बदललं होतं; पुष्कळ नवे चेहरे मला मिळाले होते, माझे मलाच नवे गवसत होते. बदल सगळीकडेच होत होते. अनिलना सारखी बाहेरगावची कामं येऊ लागली, त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कधी कधी महिना-महिनाभरही ते घराबाहेर राहू लागले. तरीही घराकडं त्याचं लक्ष असे. माई आणि अण्णा म्हणत, “पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून असा जावई मिळाला.”

मंजूचं आता बऱ्यापैकी चाललं होतं. तिची आणि माझी गेल्या अनेक वर्षांत प्रत्यक्ष भेट नव्हती, पण फोनवर बोलणं होई. मंजूला अजून मूलबाळ नव्हतं, पण बाकी स्थिरस्थावर होतं. ती कुठलीशी छोटी नोकरी करीत होती आणि अविनाश वर्षातले सहा-सात महिने फिरतीवर. अविनाशनं आता जीप घेतली होती. एकुणातच जीप आणि गाड्या सगळीकडे वाढू लागल्या होत्या. लोकांची ये-जा वाढू लागली होती. गणपती, शिवजयंती, नवरात्र, दिवाळी... सगळे सण सगळीकडे धूमधडाक्यात साजरे होऊ लागले होते. गावातल्या शनिवारी निघणाऱ्या मारुतीच्या पालखीतदेखील लाउडस्पीकरचा आरडाओरडा वाढला होता. गावाचा चेहरा बदलू लागला होता. गावी परत जावंसं वाटेना. माई म्हणायची, मी आणि मंजू गेल्यापासून आपल्या गावानी चांगली रांगोळी बघितली नाही. माझी वहिनी नीलाक्षी काढत असे रांगोळी, पण ती पुस्तकातलीच.

आमच्याकडे दोन स्कूटर्स आल्या होत्या. पेजर आणि नंतर मोबाईपण आला, जाडजूड. तराजूत वजन म्हणून ठेवायला चांगला. त्यामुळे फटाफट बोलण्याची चांगली सोय झाली. मी आणि मंजू आता जास्त बोलत असू आणि भेटण्याचं ठरवत असू. प्रत्यक्षात तसा योग आलाच नाही. मंजू आता रांगोळी काढत होती की नाही माहीत नाहीे, पण तरीही तिच्याशी बोलल्यावर समाधान वाटे, आपलाच एक हिस्सा कुठेतरी दूरवर सुखरूप आहे अशी काहीतरी भावना होई.

अपर्णा नऊ-दहा वर्षांची झाल्यावर मीच पुन्हा एकदा रांगोळी काढायला सुरुवात केली. तिला हाताशी घेऊन. पण काही उपयोग नाही झाला. या लहानग्यांच्या जीवनात धावपळ आली होती; सारखं क्लासला जाणं, अभ्यास करणं आणि टीव्ही बघणं. नवऱ्याच्या कृपेनं आमच्या घरात दोन टीव्ही होते. सासूबाई त्याला चिकटून असत सारख्या. सासूसुनांच्या मालिका आणि रामायण, महाभारत, विक्रम वेताळ असल्या मालिका मोठ्या चवीनं सगळे पाहू लागले होते. मालिका सुरू झाल्यापासून आपलं आयुष्य ही मालिकेसारखंच लोकांना वाटू लागलं की काय, न कळे. मंजूकडे टीव्ही आहे की नाही हे मी अजून विचारलं नव्हतं.

एखादी लोकप्रिय मालिका तिच्यातल्या लोकप्रिय कलाकारांना घेऊन बरीच वर्षं न कुरबुरता सरळसोट चालत राहते, तशी ही दहा बारा वर्षं गेली. मध्ये एकदाच मंजूची भेट झाली आणि अविनाशचीही. नेमके अनिल नव्हते. धावती भेट, काही तासांसाठी. तिला माझा संसार, घर, बाग दाखवताना मला आनंद, किंचित ईर्ष्या, अभिमान असं काही-काही वाटत होतं. मंजू समंजसपणानं, उत्सुकतेनं मला बरंच काय काय विचारत होती. आम्हांलाआमची ओळख पटत होती, अनेक वर्षानंतर. अनेक वर्षानंतर स्वतःचाच कुठलासा हरवलेला चेहरा सापडल्यासारखं झालं. चहा-पोहे बिस्कीट-अशा साध्या खाण्यावर ही भेट संपली. मंजू बदलली होती का? काही कळेना! सांगता येईना! अविनाशनं बागेची आणि पाण्याची नीट पाहणी केली, झाडांबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यांच्याकडे एक कॅमेरा होता छोटा, त्यानं काही फोटोपण काढले. फोटो नंतर पाठवतो म्हणाले आणि जीपमध्ये बसून गेलेसुद्धा.

***

अपर्णाच्या लग्नाची पत्रिका पाठवली मंजूला आणि अविनाशला. फोनवर फोन आले. त्या दोघांनी जाणून-बुजून एकटं राहायचं ठरवलं होतं, ते मंजूला आता जरा जड जात होतं. फोनवर बोलताना हे मला जाणवू लागलं. लग्नाला येऊ शकली नाही. कारण मी विचारलं नाही, फक्त थोडी दुःखी झाले, पण थोडीच! लग्नाच्या धडाक्यात माणूस सगळं विसरून जातो. अपर्णाचं लग्न झाल्यावर अनिल मला म्हणाले, “चांगला जावई मिळाला आपल्याला, पूर्वपुण्याई चांगली आहे आपली.”

***

अपर्णाची पहिली मंगळागौर. गाणी-बिणी चालू असतानाच फोन आला. अविनाशच्या गाडीला अपघात झाला, दोघेही सिरीयस आहेत. काय करावं सुचेना! अनिल लगेच निघाले. मला म्हणाले, “आधी मी जाऊन पाहतो आणि गरज वाटली तर तुला बोलावतो.” ते हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत सगळं उरकलं होतं.

***

अवंती आता मोठी झाली आहे, मोठी म्हणजे सात वर्षांची. आजीची लाडकी नात. अपर्णाची पहिली मुलगी. मंजू गेली आणि अवंती आली अशी आपली माझी भाबडी समजूत. अवंती मंजूचेच डोळे घेऊन आली आहे आणि सुरेख चित्रं काढते. चित्र काढण्यात रंगून जाते हे अगदी महत्त्वाचं. माझ्या तीन नातवंडांपैकी अवंतीच माझ्यापाशी जास्त राहते, रमते. तिला कागद, रंग दिले की तिला दुसरं काहीही लागत नाही; टीव्ही नको, बाकी काही हट्ट नको, काही नको. ती आणि तिचं कागदपेन्सिलीचं जग. कागदावर एकतानतेने लयीत एखादी नक्षी चितारते, किंवा नुसतीच झाडं-जंगल असा सीन असतो. ते बघून माझे डोळे आणि मन भरून येतं. मी नकळत स्वस्थ होऊन बसते तिच्याजवळ. तिची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते आणि मला म्हातारीला फार पूर्वीचं काही आठवू लागतं.

***

कितीही झालं तरी अवंती नवीन पिढीतली मुलगी आहे. लहानपणापासून मोबाईल, लेपटॉप यांच्याशी खेळते. आणि आता तर काय, त्या मोबाईलमध्ये फोटोपण काढता येतात. पोलाराईडच एक प्रकारचा! लोक सारखे फोटोच काढत असतात आजकाल. नाहीतर त्या मोबाईलमध्ये काहीतरी लिहीत असतात. अवंती तिच्याजवळचा मोबाईल घेते आणि मला म्हणते, “आजी, मी तुझा फोटो काढते”. मी थोडी कावरीबावरी होते, पण अचानक तिच्याकडे पाहते. अवंतीचे डोळे अगदी तजेलदार आहेत, मंजूसारखे. अवंतीसुद्धा माझ्याकडे पाहते, जणू खोलवर. आणि मला कसलीशी खूण पटते. अनंत ब्रह्मांडात विखुरलेली रांगोळी दिसू लागते, तिचे रंगीत कण खोलीत फिरू लागतात. अवंती तिच्या गोड आवाजात मला म्हणते, “बघ ना आजी, कसा आलाय फोटो?” फोटो मला लगेच दिसतो. फोटो, फोटोतला माझा चेहरा, सर्वांची ओळख पटते. आज अनेक वर्षांनी फोटो काढताना खरीखुरी पहिल्यांदा हसले, पहिल्यांदा माझे डोळे खुलले असं काहीसं मला वाटतं. अवंतीला तिची आजी पोटाशी घट्ट कवटाळते.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

छान!

अविनाशच्या गाडीला अपघात झाला, दोघेही सिरीयस आहेत. काय करावं सुचेना! अविनाश लगेच निघाले. मला म्हणाले, “आधी मी जाऊन पाहतो आणि गरज वाटली तर तुला बोलावतो.”

इथे अनिल असं हवं ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धन्यवाद. बदल केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

छान आहे कथा!

अवांतर: "अविनाश लगेच निघाले. मला म्हणाले, “आधी मी जाऊन पाहतो आणि गरज वाटली तर तुला बोलावतो.” इथे "अनिल लगेच निघाले" असे पाहिजे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

उत्तम! कथा आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडली. रांगोळीचे नायिकच्या भावविश्वातील स्थान - सुंदर टिपले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0