"शांत बसणं हीसुद्धा माझी गरज आहे."
"शांत बसणं हीसुद्धा माझी गरज आहे."
प्रा. नीलिमा कढे यांच्याशी ३_१४ विक्षिप्त अदितीने केलेल्या गप्पा
प्रा. नीलिमा कढे या गेली अठ्ठावीस वर्षे 'ठाणे आर्ट स्कूल' नावाचं कलामहाविद्यालय चालवताहेत. त्याखेरीज चित्रकला, शिल्प, नृत्य, संगीत अशा वेगवेगळ्या कलाप्रकारांचे अंतर्बंध हा विषय त्या पुण्यातल्या 'ललित कला केंद्रा'मध्ये शिकवतात. नीलिमा कढे यांनी ’जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून फाईन आर्ट्स (पेंटिंग) या विषयाचं आणि सुचेता चापेकर यांच्याकडून भरतनाट्यम्चं शिक्षण घेतलेलं आहे.
अलीकडेच त्यांनी कलामहाविद्यालयातल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने 'ऐस पैस कला' ह्या अनियतकालिकाचा पहिला अंक काढलेला आहे. कलाकार आणि संघटक म्हणून त्यांचा प्रवास, कलाशिक्षण आणि दृश्यकला यांबद्दल समाजात त्यांना दिसणारी अनास्था, त्यात बदल होण्यासाठी काय करावं याविषयी त्यांचा दृष्टिकोन यांबद्दल अदितीने त्यांच्याशी केलेल्या अनौपचारिक गप्पांचं हे टिपण.
✻
कलामहाविद्यालय सुरू करावं असं का वाटलं?
आम्ही जे. जे. मधून बाहेर पडल्यावर एक छोटा ग्रूप तयार केला होता. सगळ्यांचा आपापला उद्योग सुरू झाला होता, कुठे ना कुठे नोकऱ्या सुरू झाल्या होत्या. मैत्रिणींचा ग्रूप टिकवून ठेवायचा असेल तर ‘भेटत जाऊ’ म्हणून पुरणार नाही, त्यापेक्षा काही प्रकल्प सुरू करूया अशा विचारातून एक आर्ट सोसायटी सुरू केली. दर रविवारी किंवा महिन्यातले दोन रविवार आम्ही भेटायचो. न्यू इंग्लिश स्कूलचे दातार सर आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. या कार्यक्रमांसाठी आम्हाला शाळेची जागा मिळत होती. पोर्ट्रेट डेमो, गावाबाहेर जाऊन आऊटडोअर फोटोग्राफीवर लेक्चर असं करता करता एखादं प्रदर्शन भरवावं असं मनात आलं. चित्रं बघायची तर जहांगीरपर्यंत जावं लागत असे. आम्ही रंगायतनच्या मॅझेनीन मजल्याबद्दल ठाण्याचे आयुक्त गोविंदस्वरूप यांना विचारलं. जे.जे.तल्या काही शिक्षकांपासून सामान्य लोकांपर्यंत अनेकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या उपक्रमांतर्गत रवी परांजप्यांचं एक प्रदर्शन भरवलं होतं, तेव्हा लोकांनी ठाण्यात "आर्ट स्कूल नाही का?" असा प्रश्न विचारला होता. सगळ्यांना जे.जे.ला प्रवेश मिळतही नाही. नव्या संस्थांमध्ये प्रशिक्षित शिक्षक मिळत नाहीत, पैसे हवे असतात ही अडचण असते. पैशांशिवाय कोण चांगलं शिकवणार? आमच्याकडे प्रशिक्षण होतं तर मग प्रयत्न करून बघूया, असा विचार तेव्हा केला.
माझी आई बरंच सामाजिक काम करत असे. तिच्या ओळखीतल्या चार लोकांना मी या संदर्भात जाऊन भेटले. सगळ्यांनी भरीव पाठिंबा दिला. तेव्हा ‘डिरेक्टर ऑफ आर्ट’ या पदावर सडवेलकर होते. त्यांचा माझ्यावर विश्वास नसावा; ते म्हणाले, "ह्या प्रकल्पाला पाठिंबा देतील अशा ठाण्यातल्या पन्नास लोकांची यादी दे.” मी तशी यादी त्यांना दिली. रजिस्ट्रेशन वगैरेची सुरुवात आम्ही केलेली होतीच. तेव्हा जागेचा प्रश्न होता. आम्ही आता ज्या जागेत आहोत तिचे मालक आमच्या घरी आले होते. ते आईकडे ऑफर घेऊन आले होते की "तुम्ही जे काही व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग चालवता, ते आमच्या जागेत चालवा. ही इमारत मी समाजाने वापरावी म्हणून बांधलेली आहे." आईने त्यांना आर्ट स्कूलबद्दल सांगितलं; त्यांनी होकार दिला. एक वर्ग आम्ही भाड्याने घेतला. शासकीय अभ्यासक्रमातला, फाउंडेशनचा पंधरावीस मुलांचा वर्ग सुरू करून बघायचं ठरवलं.
शैक्षणिक संस्था चालवण्यासाठी पब्लिक ट्रस्ट असावा लागतो, त्यासाठी ट्रस्टीजही मिळाले. ही सगळी औपचारिक कामं दोन-अडीच वर्षे चालली होती. तेव्हा मी ए.के. जोशी शाळेत शिकवत असे. माझ्या शिक्षणाचा मोठ्या मुलांना फायदा मिळायला पाहिजे म्हणून शाळेने मला दुपारच्या सत्रात शिकवशील का, असं विचारलं. मला दुपारी जमणार नव्हतं; माझा नाच सुरू होता, शिवाय हे प्रकल्प सुरू झाले होते. ते त्यांना पटलं नाही म्हणून मी नोकरी सोडून दिली आणि पूर्णवेळ संस्थेचंच काम पत्करलं. दोनेक वर्षांत आमचा जम बसला. दर दोन महिन्यांनी आम्ही अॅक्टिव्हिटी करायचो; एखाद्या कलाकाराला बोलवायचं, त्या गटातल्या सगळ्यांबरोबर चर्चा करायची, टेबलटॉप फोटोग्राफी, पोर्ट्रेट पेंटिंग, क्ले मॉडेलिंग असे विषय घेतले. त्यातून अनेकांना ही अॅक्टिव्हिटी समजली. आणि मग पुढे आर्ट स्कूल सुरू करावं असा विचार मांडला.
मुख्य अडचण ही होती की सुरुवातीला पन्नास हजारांचं डिपॉझिट ठेवायचं, तेही १९८६ साली. माझ्याकडे तेव्हा काहीच नव्हतं. मी जेमतेम तेवीस वर्षांची होते तेव्हा. कोणाचाच तेव्हा माझ्यावर विश्वास नव्हता; ‘ही काय दोन वर्षांनी लग्न करून निघून जाईल’ असंच सगळ्यांना वाटत असे. देवळे काका (आर. के. देवळे) आमचे ट्रस्टी होते; त्यांच्याकडे मदत मागितली. ‘किती पाहिजेत तेवढे घे’ असं म्हणून काकांनी पुडकं आणून दिलं. वर्षापुरतं डिपॉझिट ठेवायचं होतं; पुढे ते पैसे कॉलेजसाठी वापरता येणार होते. त्यांचे पैसे त्यांना मी हळूहळू परत दिले. मुलांची फी आणि लोकांकडून मिळवलेल्या देणग्या यातून जसं कॉलेज चालवता येईल तसं चालवायचं, असा विचार होता. पण शासकीय, राजकीय मदत घ्यायची नाही, कोणत्याही राजकारण्याचं नाव द्यायचं नाही असं आम्ही आधीच ठरवलेलं होतं.
आता आम्हाला सरकारी मदत आहे. तशी फार नाही, पण शिक्षकांच्या पगाराचा थोडा भाग त्यातून येतो. आम्हाला अनुदान मिळालं, कारण एका मंत्रीमहोदयांच्या बहिणीने आमच्यानंतर सुरू केलेल्या दुसऱ्या एका संस्थेसाठी फार मेहनत करून अनुदान मिळवलं. आमची संस्था आधी सुरू झालेली असल्यामुळे आम्हालाही ते आपसूक मिळालं. डिरेक्टरच्या कार्यालयात एक इन्स्पेक्टरची पोस्ट असते. सरकारी उपचार पार पडल्यावर ते म्हणाले, "मॅडम, सगळ्यांनी आम्हाला काय-काय आणून दिलं, पेढे वगैरे. तुम्ही काही पेढे दिले नाहीत!" मी म्हटलं, "सर, सरकारी मदत मिळाल्यामुळे आमचं कल्याण होणार का अकल्याण, ते काही वर्षांनी कळेल. तेव्हा बघू." पैसे सरकारी, पण आपल्या खिशातून दिल्यासारखा आव!
ठाण्यात कलामहाविद्यालय चालवण्याला तुम्ही कलाशिक्षणाचं विकेंद्रीकरण म्हणाल का? जे.जे. आणि जहांगीर ही दोन्ही दक्षिण मुंबईत असल्यामुळे, इतरत्र तसा उपक्रम चालवण्याचा हा प्रयत्न आहे का?
ठाण्याजवळच्या मुलांना व्हीटीपर्यंत प्रवास करायला लागू नये हा महाविद्यालय सुरू करण्यामागचा मुख्य हेतू होता. आमच्या कॉलेजात भिवंडी, कर्जत, कसारा इथपासून मुलं येतात. बरीच मुलं निम्न आर्थिक वर्गातली आहेत. नोकरी करून शिकणारी आहेत. त्यांना आम्ही शिष्यवृत्त्या मिळवून देतो.
आमच्या कॉलेजमध्ये इंटिरियर डेकोरेशन, फाईन आर्ट/पेंटिंग आणि या सगळ्यासाठी लागणारा मूलभूत फाउंडेशन कोर्स आहे. डिप्लोमाच्या पुढचा 'डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन' असं मिळून सहा वर्षांचा कोर्स उपलब्ध आहे. जी.डी. आर्ट विथ फाईन आर्ट/पेंटिंग, इंटिरियर, आर्ट एज्युकेशन आणि आर्ट टीचर डिप्लोमा असे चार प्रकारचे सरकारी डिप्लोमा आम्ही देऊ शकतो. शासकीय डिप्लोमा असल्यामुळे शाळांमध्ये शिक्षकांच्या नोकऱ्या मिळतात.
आता मुंबई विद्यापीठातही दृश्यकलांचे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. फक्त महाराष्ट्रातच परिस्थिती अशी आहे की ‘डायरेक्टरेट ऑफ आर्ट’ असं वेगळं बोर्ड आहे. त्यांच्यातर्फे डिप्लोमा कोर्सेस चालवले जातात. त्यांच्याशी दोनशेच्या आसपास महाविद्यालयं संलग्न आहेत. पण त्यांचा हेतू विकेंद्रीकरणाचा नाही, तर तो व्यावसायिक आहे.
या शिक्षणाचा जो मूळ हेतू आहे तो जास्तीत जास्त प्रामाणिकपणे राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. काही मुलांना ते क्लिक होतं आणि त्यांतल्या ज्यांना शिक्षकाची नोकरी मिळते, ते पुढे चांगल्या रीतीने कलाशिक्षण देतात. त्याचा परिणाम होतो. अजूनही मानसिकता पूर्णपणे बदललेली नाही; ते होण्यासाठी वेळ जावा लागेल. शाळांमध्ये अजूनही चित्रकलेचा तास म्हणतात. आता चित्रकला शिक्षक असं पद नाही, कलाशिक्षक असं आहे. कलाकाराला, शिक्षकाला मुलांकडून थोडं नाटक करून घेता आलं पाहिजे, कारण प्रत्येकाला चित्रकलेत रस असेल असं नाही. हे ब्रिटिशांनी केलं होतं, ते आपल्याला समजायला स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षं जावी लागली. शाळेच्या पातळीवर सगळ्यातच रस घेतला जातो; पण तो फक्त गॅदरिंगला, वर्षातून एकदाच. त्याऐवजी दैनंदिन व्यवहारातच या गोष्टी करता आल्या पाहिजेत. शाळेच्या वयात मुलांना वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव दिला की आपल्याला काय आवडतं, हे त्यांना समजू शकतं. सगळे कलाप्रकार मुलांना शिकवावेत आणि तेही एकत्रितरीत्या शिकवावेत, अशी अपेक्षा आहे. म्हणजे गात-गात नाचायचं आणि चित्रं काढायची. आमची मुलं शाळांमध्ये असं शिकवतात.
समजा पाचवी-सहावीतल्या मुलांना लयबद्ध रेषा काढा, असं सांगितलं. 'लयबद्ध रेषा' म्हणजे नक्की काय? लय कशी शिकवणार? ते शब्दांतून सांगण्याऐवजी गाणं लावून दिलं, काही मुलांच्या हाताला रंगीत बँड्स बांधून हात हलवायला सांगितले तर ते बँड्स इतरांना बघायला सांगायचे आणि तशा रेषा काढायला सांगायचं. साध्या प्रयोगांतून, अनुभवातून हे शिकवायचं. समजा बाजाराचं मेमरी ड्रॉईंग काढायचं आहे, तर तसं नुसतं सांगायचं नाही. पाच-दहा मिनिटांचा बाजार वर्गात तयार करायचा. कोणीतरी टोपली घेतली आहे, कोणीतरी हाळी देतंय; तो सगळा अनुभव घेऊ द्यायचा आणि म्हणायचं, ‘याचं चित्र काढा.’ हे सोपं जातं कारण नुकतंच पाहिलेलं असतं. इथे नाटक आणि चित्रकला एकत्र झाली.
आपल्याकडे गेल्या काही वर्षांत चित्रांवर समाजाच्या संवेदनाहीनतेचा काही परिणाम झालेला दिसतो का? आश्चर्य म्हणजे सेन्सॉरची बंधनं असणाऱ्या इराणमध्ये खूप चांगले चित्रपट बनतात, उदाहरणार्थ असगर फरहादीचा ‘अ सेपरेशन' किंवा जाफर पनाहीचा 'ऑफसाईड'.
इराणचा विषय काढलास हे बरं झालं. 'ऐस पैस कला'चा जो अंक काढलाय, त्यात संदीप वासलेकरांची मुलाखत घेतली आहे. बाहेरच्या देशांत आणि आपल्याकडे असणारा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन, यावर त्यांना प्रश्न विचारला. त्यांनी इराणपासूनच सुरुवात केली. सदोदित अशांत, युद्धाने पेटलेला, धर्मांध अशी इराणची प्रतिमा आहे. ते म्हणाले, "तिथे मी काही कामासाठी गेलो होतो. जायचं आणि काम करून परत यायचं एवढंच डोक्यात होतं. पाहण्यासारखं काही तिथे असेल असं वाटलंच नाही. तिथले लोक आग्रहाने तिथली उद्यानं बघायला घेऊन गेले. तिथे बघितलं तर तरुण मुलं जमली आहेत, शेरोशायरी चालली आहे. उद्यानांतले पुतळे लेखकांचे, कवी आणि कलाकारांचे होते. साध्या रेस्टॉरंटमध्ये गेलं तरी खाणं समोर येताना ती व्हिज्युअल ट्रीट होती."
आपल्याकडे हा प्रकार फक्त आदिवासींकडे आहे. त्यांच्यातच काम करणाऱ्या गणेश देवींचाही लेख या अंकात आहे. आपल्याकडे वारली कला आहे. ओडिशामध्ये आहे. त्यांची घरं नीटनेटकी असतात, निसर्गातून पाहिजे तेवढंच फक्त घेतात आणि वस्तू वापरतानाही - उदाहरणार्थ तट्ट्यांसाठी बांबू काढला - हळुवारपणे वापरतात. निसर्गाबद्दल असणारी आत्मीयता त्यांच्या वर्तनातून दिसते. आपण त्यांना मागास समजतो, कारण त्यांच्या भाषेत मर्यादित प्रमाणातच शब्द आहेत. हे पाहून जास्त मागास कोण, असं विचारायची वेळ येते.
आर्थिक विषमता आहे, त्यातून हे दिसतं. आदिवासींना मागास ठरवलं ते ब्रिटिशांनी. आपणही त्यांना खिजगणतीत न धरता त्यांच्यावर अन्यायच करतो आहोत. स्वतंत्र देशात ही स्थिती. पण खरं भारतीयत्व असणारी कला त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे पाश्चात्यांचे प्रभाव येत गेले, त्यात स्वरूप पार बदलून गेलं. संगीतामध्ये, नृत्यामध्ये असं झालं नाही; तिथे आपण घराण्याची परंपरा जपली. चित्रकला आणि साहित्यामध्ये ती परंपरा राहिली नाही. चित्रकलेमध्ये फक्त 'बेंगॉल स्कूल'ने ही घराण्यांची परंपरा जपली. अवनींद्रनाथ टागोर, नंदलाल बोस या रिव्हायव्हलिझमवाल्या लोकांनी भारतीयत्व टिकवून जे काही करता येईल ते केलं. स्वातंत्र्यसैनिक आणि कलाकार असे हे लोक होते. त्यात काही स्कूल्स वाचली; पण 'बाँबे स्कूल'ने ब्रिटिशांनी तिथे सोडून दिलेली पद्धत आपल्याकडे आणली. तिथे चित्रं सपाट व्हायला लागली होती; आपल्याकडेही हीच परंपरा आहे. अजंठा-वेरूळमधली चित्रं सपाट आहेत. आपल्याला अॅनॅटमी जमत नव्हती असं नाही, पण आपल्याकडे चित्रं विचारपूर्वक द्विमितीय काढलेली आहेत. दैनंदिन भारतीय जीवनातली विविधता (पुंगीवाल्यासमोर डुलणारा नागोबा, सजवलेल्या हत्तीवरच्या मिरवणुका) दाखवणारे पोर्टफोलिओ तयार करून लंडनमध्ये दाखवायचे होते. ‘लंडनमध्ये दाखवणं’ या हेतूने ब्रिटिशांनी इथे कलामहाविद्यालयं सुरू केली. भारतीयांना कला शिकता यावी हा त्यांचा हेतू नव्हता.
आपल्याकडची म्हणजे पौर्वात्य प्रवृत्ती अशी आहे की जे काही दृश्यजगत आहे तो, आपल्या आत डोकावण्याचा मार्ग आहे. हे झाड असं आहे, तर त्याचा आणि माझा संबंध काय? आपण याचा तत्त्वज्ञान म्हणून विचार करतो; पाश्चात्य लोक त्याचं डिसेक्शन करून आत जायचा प्रयत्न करतात. ते ऐंद्रिय अनुभूती घेतात, आपण इंद्रियांपलीकडचा विचार करू पाहतो. हा विचारसरणीतलाच फरक आहे. आपल्यासारखा विचार तिथे नाहीच असंही नाही. पण त्यामुळे तिथे नग्नसत्य जे आहे, ते जसंच्या तसं स्वीकारण्याचा विचार आहे. नग्नतेचा विचार केला तर युरोपीय आणि आपली नग्नता यांच्यातही फरक आहे. तिथे डोळ्यांना दिसणारी नग्नता असते, आपले कलाकार त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांची कला इंद्रियांना सुखावणारी कला आहे, पण आपल्याकडची नग्नता इंद्रियांपलीकडे जाऊन विचार देणारी आहे. खजुराहोचीच शिल्पं पहा. ती कामशिल्पं मंदिरावर आहेत. आपल्या तत्त्वज्ञानातून ते आलेलं आहे. भारतीयांनी जीवन रसपूर्णतेने स्वीकारलेलं आहे. भारतीय विचारसरणी मृत किंवा शुष्क नाही, उलट सगळ्यात रस घेणारी आहे. पण त्यापलीकडे प्राणिपातळीकडून मनुष्यपातळीकडे जाण्याचा प्रवासही कलेच्या माध्यमातून झाला पाहिजे. म्हणून आपल्या कलांचा पॅटर्न निराळा आहे.
वर्तमानातला विचार केला तर आपली दृश्यजाणीव मृत आहे, हे निश्चितच खरं आहे. याला दृश्यप्रदूषणही म्हणणार नाही, ही दृश्यनिरक्षरता आहे. आपल्या डोळ्यांवर मोठमोठे फ्लेक्सबोर्ड्स आघातच करत नाहीत. अस्वस्थ वाटून ते फाडून टाकले पाहिजेत! हे होत नाही, कारण कोणालाही हे खटकत नाही. परिसरामध्ये असणारी घाण पाहून त्रास होतच नाही. कारण आपण सौंदर्य बघण्याऐवजी हेच बघत बघत मोठे झालो आहोत. थोड्या प्रगत देशात जाऊन हेच सौंदर्य आपण अवाक होऊन बघत राहतो. पण ही सौंदर्यदृष्टी आपल्या खेड्यापाड्यांत दिसते. एखाद्या बिहारी-बंगाली खेड्यात जाऊन पाहिलं तर नेटकी घरं, स्वच्छ रस्ते हे दिसतात. अगदी कोकणातही दिसतं. ही सौंदर्यदृष्टी अशिक्षितांमध्ये आहे, पण शहरांत नाही. संदीप (वासलेकर) हेच म्हणतात, "हे भारतातही नाही आणि अमेरिकेतही सर्वसामान्य माणसाकडे ही दृष्टी नाही. कलावंत हा समाजापेक्षा निराळा; कला ही काहीतरी वेगळीकडे, आर्ट स्कूल, म्युझियम, आर्ट गॅलरीजमध्ये करण्याची गोष्ट समजली जाते. जीवनाशी तिचा काही संबंधच नाही. इराण, इराकमध्ये हे सर्वसामान्यांच्या जीवनात आहे."
सहज दृश्यसंस्कार होत नाहीत, कारण त्याबद्दल समीक्षा लिहिली जात नाही. शब्द हे माध्यम सगळ्यांपर्यंत पोहोचतं. म्हणून शब्दांमध्ये मांडावं लागतं. आमचे चित्रकार म्हणतात, "आम्ही चित्रातूनच बोलतो, आम्ही शब्द का वापरायचे?"
पण कलाकारांनी हा दृष्टिकोन बदलावा म्हणून तुम्ही काय करता?
कॉलेजमध्ये आम्ही मुलांना आपापल्या चित्राविषयी बोलायला, लिहायला लावतो. टाईम्सने 'टीच इंडिया' नावाचा प्रकल्प सुरू केला आहे, त्यात ते व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त असं इंग्लिश बोलायला शिकवतात. आम्ही आमच्या मुलांना जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा तिथे पाठवतो. कला विकत घेणारे 'पेज थ्री'वाले लोकच आहेत. फार अर्थ नसणाऱ्या चित्राबद्दल तासभर बोललात तर चित्र सहज विकलं जाईल. बंगाली लोकांनी चित्रांबद्दल बोलण्याची कला जिवंत ठेवलेली आहे. नवे संस्कार घेणं, कालानुरूप बदल घडवणं या गोष्टी बंगालमध्ये ब्रिटिश काळापासून आहेत. त्या खालोखाल हा प्रकार मुंबईत आहे.
आमचा जीव छोटासा आहे, कारण आर्थिक पाठबळ नाही. आम्ही फार गोष्टी करू शकत नाही. पण त्यातल्या त्यात दृश्यकलांबद्दलची संवेदनक्षमता आमच्या विद्यार्थ्यांकडे आहे, असं समजून चालतो. पण तेवढंच महत्त्वाचं नाही. एखाद्या कलेतला अनुभव जसा वाढायला लागतो तसा त्यात सूक्ष्मपणा येतो; इतर कलांचे अनुभव घेण्याचे दरवाजे खुले होतात. आमची सगळी पोरं गातात, काही वाद्यं वाजवतात, नाच तर सगळेच सहजतेने करतात. मी त्यांची नृत्यस्पर्धाही घ्यायचे, क्रिएटिव्ह नृत्यस्पर्धा. गाणं चित्रपटातलं वापरलं तरी नृत्यात क्रिएटिव्हिटी पाहिजे. तीन-चार वर्षं हा प्रकल्प राबवला. या मुलांना इनहिबिशन्स नाहीत, कोणीही उठून मस्त नाचायला लागतात. ती एक छान संस्कृती तयार झाली आहे. साहित्य, काव्य एवढ्या जवळ आलेलं नाही, पण नाच मात्र अगदी सहज होतो.
साहित्याची गोडी मुलांना लागावी म्हणून आम्ही आमच्या वर्तुळातल्या अरुण म्हात्रेंसारख्या कवींना कलामहाविद्यालयात बोलावतो, अशोक नायगावकरांसाखे कवी-चित्रकार येतात. चित्रकलेच्या बाहेरचे अनुभव द्यायचे असा विचार आहे. महाविद्यालयाच्या पंचविसाव्या वर्षी तसा प्रयोग केला होता; वसंत आबाजी डहाके यांना आमच्याकडे अध्यक्ष म्हणून बोलावलं होतं. त्यांच्या कविता चित्रमय आहेत; त्यांना स्वतःला चित्रांमध्ये रस आहे, ते चित्रं काढतात. त्या वर्षी नेमके तेच साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते. त्यांच्या काही कवितांवर आमच्या काही मुलांनी चित्रं काढली, आपापल्या पद्धतीने. त्याचा एक वेगळा विभाग बनवून तो सादर केला. महाविद्यालयातून डिग्री, डिप्लोमा द्यायचा कारण त्यामुळे नोकरी मिळते. अर्थार्जन महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर अभ्यासक्रमाबाहेरचे उपक्रमही राबवतो. हे करण्याचं स्वातंत्र्य राहावं म्हणून कसलाही राजकीय पाठिंबा घेतलेला नाही.
कलासमीक्षा लोकांपर्यंत पोहोचावी हा ‘ऐस पैस कला’ हे अनियतकालिक सुरू करण्यामागचा उद्देश आहे का?
अनियतकालिक हा त्या अभ्यासक्रमाबाहेरच्या उपक्रमांचा एक भाग आहे. एखाद-दोन अंक काढून नंतर कदाचित ई-मॅगझिनही काढू. दृश्यकलांबद्दल फार चांगलं लेखन होत नाही. होतं त्यातही पीत पत्रकारिता म्हणावी तसे प्रकार चालतात. चटकन आकर्षण वाटेल असे विषय घेऊन सनसनाटीही केली जाते. त्याच्याशिवायही अंक वाचनीय होऊ शकतो, असं आम्हांला वाटतं. या विचारधारेतून लेख मागवले आहेत; अमोल पालेकर, गोपी कुकडे, गणेश देवी यांचे लेख आहेत.
गणेश देवींचं काम आदिवासींमध्ये आहे. संस्कृतीजतन असा त्यांचा उद्देश आहे. आम्ही त्यांच्याकडे लेख मागितला तो आदिवासींच्या कलांच्या प्रेरणा या संदर्भात. आपण कला करायला जातो, त्यांच्या आतूनच ती उमलते. कला हा त्यांच्या जीवनाचा भाग आहे. उदाहरणार्थ, ते प्रेतात्म्यांना बोलावतात. आपल्या दृष्टिकोनातून ही अंधश्रद्धा आहे; पण त्यांचा दृष्टिकोन निराळा असतो. जमिनीच्या तुकड्यावरची मालकी ही कन्सेप्ट त्यांना अजूनही कळलेलीच नाही. ज्यात आपण जन्मतो, ती जागा आपल्या कायमच्या मालकीची हा प्रकार त्यांच्याकडे नाहीच. समाजापासून पूर्ण तुटलेल्या, जंगलात राहणाऱ्या लोकांच्या प्रेरणा काय असतील? त्यांचा जमिनीशी संबंध काय, तर गुजराण होईल तिथे स्थलांतर करायचं. अशा मानसिकतेतून ते काळाशी संबंध जोडतात. मग मेलेल्या लोकांना जिवंत करतात, ही मानसिकता तयार होते. कारण भौतिकातल्या गोष्टी त्यांच्या मालकीच्या नाहीत. मला हे कधी सुचलेलंच नव्हतं. आपण त्याला अंधश्रद्धा म्हणून सोडून देतो, त्या पलीकडे विचार करतच नाही. गणेश देवी तिथे राहिले, त्यांच्या सुखदुःखांशी समरस झाले तेव्हा त्यांना हा दृष्टिकोन कळला.
गणित, विज्ञानातलं काही समजलं नाही तर लोक म्हणतात हा विषय कठीण आहे, मला समजत नाही. पण एखादं चित्र, शिल्प समजलं नाही तर ती कलाकृतीच वाईट आहे असा शिक्का मारतात. कलाकृती सुंदर, श्रेष्ठ का याचं काही व्यक्तिनिरपेक्ष स्पष्टीकरण देता येणं शक्य असतं का?
गणित आणि विज्ञान म्हणजेच बुद्धी असा समज आपल्याकडे फार काळ होता. अलीकडच्या काळात मेंदूसंदर्भात जे संशोधन झालं, त्यात ‘मल्टिपल इंटेलिजन्स’ ही संकल्पना समजली. काळ, भाषा, तर्क, कला यांची वेगवेगळी केंद्रं आहेत. अवकाश आणि फॉर्म या अमूर्त संकल्पना आहेत. तर्काचं केंद्र एकच आहे; पण भाषा, शरीरभाषा अशा अमूर्त संकल्पनांसाठी एकापेक्षा जास्त केंद्रं आहेत. एका ध्वनीचा काही ठरावीक अर्थ, हे अॅबस्ट्रॅक्शन आहे. भाषेत, अर्थांच्या छटा यांसाठी बरीच बुद्धी लागते. हे कळलेलं आहे, पण समाजात पचलेलं नाही. आपल्याकडे या सगळ्याची चुकीची उतरंड लावलेली आहे. युरोपीय समाजात बुद्धिमान लोक एकतर संशोधक बनतात किंवा कलाकार. आपल्याकडे हुशार लोक संशोधक बनतात किंवा पैसे देणारी इंजिनियरिंगसारखी क्षेत्रं निवडतात.
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कलेच्या प्रांतातही विज्ञानासारखी व्यक्तिनिरपेक्ष कारणं देता येतात. जिथे तंत्राचा संबंध आहे तिथपर्यंत हे मांडता येतं. कारण तंत्र भौतिक गोष्टींवर आधारित असतं. पण कला अमूर्त आहे, कलेसाठी तंत्राच्या पलीकडे जाते. पण त्यासाठी आर्ट अप्रीसिएशन हा प्रकार आपल्या आयुष्याचाच भाग बनेल, तेव्हा हे सहज होईल. जसा कानसेन हळूहळू, स्वरांच्या सहवासात संस्कारांनी तयार होतो; तसाच दर्शकही तयार होईल. मग फार प्रश्न पडणार नाहीत. शब्दांचा छल करावा लागणार नाही. नाहीच असं नाही, पण प्राथमिक पातळीच्यावर ही चर्चा पोहोचेल. चित्रकाराला शब्द वापरावेच लागतील, संगीतकारांनी केवढीतरी पुस्तकं लिहिलेली आहेत. कलावंतांनी आपले संगीतासंदर्भातले अमूर्त विचार लिहिलेले आहेत. नवनिर्मिती करताना आम्ही काय विचार केला, हे भातखंड्यांपासून संगीतकारांनी लिहून काढलेलं आहे. दुर्दैवाने चित्रकारांनी हे केलं नाही. आमचं चित्रच काय ते बोलेल, हा एस्केपिझम पत्करला. आपण समाजापासून तुटतोय हे त्यांना कळलं नाही.
काहीजण प्रयत्न करताहेत. माधुरी पुरंदऱ्यांनी पिकासोवर लिहिलंय. इंग्लिशमध्ये अशी नियतकालिकं आहेत, पण मराठीत नाहीत. आता इंटरनेटमुळे गोष्टी बऱ्याच सोप्या होताहेत. आमच्याकडे मुलांना डिप्लोमासाठी एक डेझर्टेशन लिहायचं असतं. त्या मुलांचा अनुभव कमी असतो, पण शिक्षक बरीच मदत करतात. त्यातली एक गोष्ट. वसईत एक कलाकार होते, रायबा नावाचे. त्यांची चित्रं आणि त्यांच्या दोनशे वर्षं आधी चीनमध्ये झालेला एक चित्रकार यांच्या चित्रांमध्ये विलक्षण साम्य आहे. रायबांना चीनमधल्या चित्रांबद्दल, चित्रकाराबद्दल माहिती असणं शक्यच नाही. आजच्या कलाकाराला या दोघांच्या चित्रांमधली लय सारखी आहे हे समजलं, तेही नेटवरून. त्यावर त्याने डेझर्टेशन लिहिलं.
'ऐस पैस कला'चे वाचक कोण असतील अशी अपेक्षा आहे?
दृश्यकलांमध्ये ज्यांना रस असेल असे कोणीही वाचक असू शकतात. या विषयात त्यांना फार गती असली पाहिजे असं काही नाही. समाजातला कलात्मक दृष्टिकोन आणि त्यामागच्या मानसिकतेवर लेख आहेत, दृश्यकलांबद्दल मूलभूत प्रकारचे लेख आहेत. ठरावीक वयोगट किंवा कलाशाखेचे विद्यार्थी अशी मर्यादा वाचकवर्गाला नाही.
काहीतरी वेगळं बघण्याचा प्रयत्न कलेतून होतो असं तुम्हाला वाटतं का?
कलेमध्ये प्रवाह आहेत, समकालीन कला हा त्यातला एक प्रवाह आहे. उदाहरणार्थ कविता महाजनांचं 'ब्र' हे पुस्तक. हे समकालीन वास्तव आहे. समाजासमोर धरलेल्या आरशातलं प्रतिबिंब कलाकार बनवतो, ती समकालीन कला. पण ग्रेसची कविता घेतली तर त्यात नागपुरी, अहिराणी भाषा यांचं काहीही प्रतिबिंब नाही. पण ज्यात अभिजात मूल्यं आहेत, अशी एक कला असते. ती स्थलकालातीत असते. समकालीन कलेत स्थलकालातीत मूल्यं नसतीलही किंवा असतीलही. पिकासोच्या ‘गर्निका’मध्ये समकालीन, युद्धाचं वास्तव आहे; पण आत्म्यापर्यंत पोहोचणारी आहे, म्हणून ती कला स्थलकालातीत बनते. कलावंताची प्रतिभा किती यावर ते अवलंबून आहे.
काव्य हा कलेचा एक भाग घेतला तर समकालीन वास्तव असणाऱ्या कविताच निर्माण झाल्या, असं होत नाही. काही कलावंतांचा पिंड अभिजात कलानिर्मितीचा असतो, काहींचा पिंड वास्तवावर प्रतिक्रिया देण्याचा असतो. कलावंतांची प्रकृती, प्रतिभेचा दर्जा यावर ते सगळं अवलंबून असतं. फोटोग्राफी स्वस्त झाल्यावर अनेक फोटो काढले जात आहेत. पण दृष्टी, प्रतिभा काही लोकांकडेच असते; रघु रायसारखं तंत्र जमलं तरी इनसाइट असणारे फोटो मोजकेच लोक काढतात. तेच टिकून राहतं.
चंगळवादाचा कलाक्षेत्रावर काय परिणाम झाला आहे?
कलेवर चंगळवादाचा अनिष्ट परिणाम होतो आहे, असं मला वाटतं. चंगळवादामुळे मानसिकता बदलते आहे. आपण, सुशिक्षित समाज त्याकडे दुर्लक्ष करतो आहोत; त्यामुळे समाजाला सुविद्य म्हणावं का, अशी शंकाही येते. संवेदनक्षमतेचा कलेशी संबंध आहे. चंगळवादामुळे संवेदनक्षमता हरवली आहे.
कलेची समीक्षा बघूया. चित्रं फारच लांब राहिली पण मागच्या पिढीपर्यंत शास्त्रीय संगीत लोकांच्या खूप जवळ होतं. कानसेन खूप आहेत, कारण संगीतक्षेत्रात तीन-चार पिढ्या आधीपासून संगीतकारांनी खूप काम केलं आहे. सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकात हे करण्याचा प्रयत्न झाला आहे. असं चित्रकारांनी केलेलं नाही. साहित्यामध्ये हे आपोआप होतं. साहित्याचं माध्यम हे सर्वसामान्यांच्या संवादाचंच माध्यम असल्यामुळे ते पटकन पोहोचतं.
पूर्वी संगीताचे जलसे, मोठे समारोह व्हायचे. आज सादरीकरणाचा काल पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आलेला आहे, कारण एकाग्रपणे काही ऐकण्याची मानसिकताच कमी झालेली आहे. हाही चंगळवादाचा परिणाम आहे. आपल्या हातात सतत रिमोट असतो. आपल्या वेळेवर हा घाला आहे, हा भावच मनात येत नाही. थोडं रिलॅक्स होण्यासाठी आपण दुसरं काम हातात घेऊ शकतो, ही गोष्ट गेली आहे. आपण सतत स्क्रीनसमोर असतो. आणि वायफळ बडबड किती वाढल्ये! मेंदू शांत केल्याशिवाय सृजन संभवतच नाही. आपल्या बोलण्यात सांगण्यासारखं किती असतं? व्हॉट्सॅपवरच्या संवादांमधलं कंटेंट ०.१% एवढंही नसेल. लोक एकमेकांना भेटत नव्हते तेच चांगलं होतं, असं मला वाटायला लागलं आहे.
चंगळवादाचं आणखी एक रूप दिसतं. 'आहे रे' आणि 'नाही रे' वर्गातली दरी प्रचंड आहे. आहे त्यांच्याकडे बरंच काही आहे, वाया चाललंय आणि त्याची किंमत नाही. कलेची किंमत आणि मूल्य न कळणाऱ्या असंवेदनशील लोकांच्या हातात या क्षेत्राच्या किल्ल्या आहेत. सृजनप्रक्रियेविषयी असणारा आदर, त्याचं पावित्र्य हे संवेदनशील समाजाचं लक्षण चंगळवादामुळे निघून जायला लागलं आहे. अर्थात, एकेकाळी कसं सगळं छान होतं, असं मी म्हणत नाहीये. मानसिकता बदललेली आहे तरीही याच समाजात संवेदनाक्षम कलाकार आहेत; पण त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचवण्यात बरेच अडथळे आहेत.
![]() |
![]() |
साधारण ८०-९०च्या दशकांनंतर टीव्ही आणि पर्यायाने जाहिराती घराघरांत आल्या. फ्लेक्सबद्दल तुम्ही जसं म्हणालात, तसा जाहिराती, टीव्ही यांचाही परिणाम होतो का?
हो तर. अभिरुची वाईट होणं हा परिणाम होतो. हा व्हिज्युअल्सचा मारा होतो आपल्यावर. नाही म्हटलं तरी आवाज, दृश्यं आदळत राहतात. त्यातही लोगो, स्लोगन यांचं कंपोझिशन, रचना असते. हे करताना कलाकार उचलेगिरी करतात. तयार संदर्भ घ्यायचे, इकडचं-तिकडचं आणून काहीतरी रचायचं; पण त्यात काही विचारप्रक्रिया आणण्याऐवजी शॉर्टकट्स वापरले जातात. कारण पटकन पैसे मिळतात. चांगली अभिरुची, चांगली रचना यांचा विचार नसतोच. काहीही करून आपलं प्रॉडक्ट वर कसं येईल, एवढाच विचार करताना त्यातली सौंदर्यदृष्टी टिकवली जात नाही. खरंतर अप्लाईड आर्टचा अर्थ खूप सुरेख आहे. सौदर्यदृष्टी रोजच्या आयुष्यात, गरजेच्या गोष्टींमध्ये आणणं. पण या अर्थाचं प्रदूषण झालेलं आहे.
थोडं वैयक्तिक विचारते. तुम्हाला घरून कलाशिक्षण घेण्याबद्दल टोकलं गेलं नाही का, "चित्र काढत्येस हे ठीक, पण औपचारिक शिक्षणाचं काय?" असले प्रश्न विचारले गेले नाहीत का?
नाही झालं. घरून माझ्या कलाशिक्षणाला पूर्ण पाठिंबा होता. औपचारिक शिक्षण वगळता अन्य बऱ्याच गोष्टी करायलाही घरून पूर्ण प्रोत्साहन मिळालं.
आईच्या कामामुळे घरात वेगवेगळे लोक यायचे. वेगळे वारे घरात होते, वेगळ्या प्रकारचं आयुष्य असू शकतं हे समजलेलं होतं. अच्युतराव आपट्यांची 'इनव्हेस्टमेंट इन मॅन' नावाची पुण्यातली एक चांगली संस्था आहे. त्या काळात आम्ही त्यांच्यासाठी व्यक्तिमत्त्वविकासाची शिबिरं घ्यायचो, विशेषतः मुलींसाठी. कारण मुली दबलेल्या असायच्या, बोलायला घाबरायच्या. त्या काळात दहावी-बारावीच्या मुलींना आठ दिवस एकत्र ठेवून वेगवेगळे लेखक, कलाकार भेटवायचे, वक्तृत्वाची संधी द्यायची असं उन्हाळी सुट्टीत करायचो. मी तेव्हा शाळकरी वयाची होते, पण संघटन करण्याचा अनुभव तेव्हा मिळाला. पैशांच्या विनियोगाच्या पावत्या ठेवायच्या, जमाखर्च मांडायचा, सहा महिने आधीपासून आखणी करायची, यात मी पूर्ण तयार झाले. शेवटच्या काही शिबिरांमध्ये आईपेक्षा मीच जास्त काम केलं.
तिथे विद्या बाळ, वपु, योगाचार्य अण्णा व्यवहारे असे वेगवेगळे लोक यायचे. या लोकांच्या सहवासात उदारमतवादी विचार हळूहळू तयार झाले. आमच्या घरातलं हळदीकुंकू बंद झालं; उपास, कुंकू लावणं अशा बऱ्याच परंपरा मोडल्या, आता तर बिचारे देवही गेले आमच्याकडचे! आजी-आजोबाही मोकळ्या विचारांचे होते, त्यांनी आईचं याबद्दल कौतुकही केलं. घरातली हवा पोषक होती. त्यातच आपणही तयार होतो; आपण थोडेच ढगातून पडतो?! ज्या सगळ्या संस्कारांमधून आपण घडतो, ते काही आपलं श्रेय नाही. स्वत:च्या आयुष्यावर प्रयोग करायची परवानगी आई-बाबांनी मला दिली होती.
तुम्हाला पुरुषप्रधानतेचा कितपत अनुभव आला, त्रास झाला?
बाहेर समाजामध्ये अनुभव येतोच. पण आपण त्याचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नये. आपण त्याला तोंड कसं देतो यावर आहे. परिस्थिती बदलण्याचे बरेच प्रकार असू शकतात. झगडा देऊनच हे करावं लागतं असं नाही, असं माझं मत आहे.
तरीही पुरुषप्रधानतेचे अनुभव येत राहतातच; पण आपण आपली पद्धत सोडायची नाही. बायकांना काय समजतं, ही कोण बाई आपल्या डोक्यावर येणार; या मनोवृत्तीला सामोरं जावं लागतंच. 'डायरेक्टरेट ऑफ आर्ट'च्या प्रमुख पदासाठी अर्ज मागवले होते. हे शासकीय पद आहे. ते पद एकदा आरक्षणातून, एकदा खुल्या प्रवर्गातून अशी पद्धत आहे. तेव्हा मला तिथल्या राजकारणाचा अनुभव नव्हता. माझा अनुभव माझ्या कॉलेजपुरता मर्यादित होता, आम्ही तर अनुदानही घेत नव्हतो. त्यांना बौद्धिक मदत हवी असते, अभ्यासक्रम ठरवणं वगैरे. मला नेहमी बोलवायचे आणि मी भरीव मदतीची संधी मिळत होती म्हणून विनामोबदला काम करून द्यायचे. शिवाय आमच्या कॉलेजला ग्रँट नसल्यामुळे मी त्यांची मिंधीही नव्हते. अशा वेळेस ही पोस्ट निघाली. माझ्या काही शिक्षकांनी अर्ज भरण्यासाठी मला सांगितलं. त्यातल्या सत्तावीस अर्जांपैकी तिघांची मुलाखतीसाठी निवड झाली, त्यात मी होते. शेवटी राजकारण होऊन त्या मुलाखती झाल्या नाहीतच. अशा ठिकाणी पुरुषप्रधानतेचा अनुभव येतो.
माझ्याकडे तेव्हा फक्त दहा-बारा वर्षांचा संस्था चालवण्याचा अनुभव होता. पुढे आतल्या गोष्टी जसजशा जास्त समजत गेल्या तेव्हा वाटायला लागलं, झालं ते चांगल्यासाठीच झालं. मला जे करायचं होतं ते मी तिथे जाऊन करू शकले नसतेच. तिथे मी फिट झाले नसते आणि मला मूल्यं सोडता आली नसती. पुढे कधीतरी "काय बाई, तुम्ही इथे येता येता राहिलात" असं म्हणाले. "तुमच्या चांगल्यासाठीच झालं ना ते!" मी टोलवून दिलं.
पुरुषप्रधानता आपल्या समाजातच आहे. ती काही सहजासहजी जाणार नाही. संपूर्ण देशाचा विचार केला तर अत्यंत मोकळेपणाने पुरुषांशी वागणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण अर्धा टक्का तरी असेल का? मानसिकता बदललेले पुरुषही खूप कमी आहेत. जातीयता जशी मुरलेली आहे तशीच पुरुषप्रधानता. आता परिस्थिती जरा बदलायला लागली आहे, पण पुरुषही गोंधळलेल्या मनोवस्थेत असू शकतात; त्यांच्याशी कोणी बोलतच नाही, त्यांना सहानुभूती मिळतच नाही.
तुमची चित्रांची प्रदर्शनं आणि नृत्याचे कार्यक्रम कुठे झाले आहेत?
जे.जे.मध्ये असतानाच जहांगीरला माझा एक ग्रूप शो झाला होता. त्यानंतर बालगंधर्व, बजाज आर्ट गॅलरी, नाशिकला एक केला होता. मधल्या काळात माझी चित्रकला मागे पडली होती; कारण संस्थात्मक काम आणि नृत्याचे कार्यक्रम खूप केले. ते अजूनही सुरू असतात. काही मुलींना नृत्य शिकवलं आणि आता त्यांचेही कार्यक्रम होतात. सहकाऱ्यांच्या मदतीने कालिदासाच्या 'ऋतुसंहार'साठी नृत्यदिग्दर्शनही करून झालं. नृत्याचे सगळे आयाम वापरून पाहिले.
मी पूर्णवेळ नृत्य करत नाही. मी विचार केला, सुचेताताई (चापेकर) सत्तरीतही नाचतील; पण मी कदाचित तितकी नाचू शकणार नाही. माझा रोजचा रियाज नाही त्यामुळे माझ्यावर मर्यादा येतील. तेव्हा मी चित्रं काढीन. आता मी नियमितपणे चित्रंही काढते. दोन्ही सुरू आहे. हे सगळं जितकं सहज जमलं तेवढं केलं. समोर आलेली संधी सोडली नाही, पण मुद्दाम संधी निर्माण करायचा प्रयत्नही केला नाही. 'सूर सिंगार संसद' नावाची मुंबईमधली एक प्रख्यात संस्था आहे. ते दरवर्षी तरुण कलाकारांना संधी देतात. त्यातल्या टॅलेंटेड कलावंतांना पदवी देतात. त्यांनी मला 'सिंगारमणी' अशी पदवी एका वर्षी दिली. पुणे विद्यापीठातून मी पुढे नृत्यामधून एम.ए. केलं. तिथे शिकणाऱ्या मुलींसाठी एक थिअरी विषय - चित्र, शिल्प आणि नृत्यातली एकात्मता - घ्यायला सांगितला. तेव्हापासून आजपर्यंत मी ललित कला केंद्रामध्ये शिकवते आहे.
सतत विद्यार्थ्यांमध्ये असते त्यामुळे सतत काहीतरी नवं शोधता येतं. ललित कला केंद्रात सतीश आळेकरांकडून बरंच शिकता आलं. आळेकर हे कलाकार म्हणून आणि संस्थाचालक म्हणून, दोन्ही बाबतींत इंटेन्स आहेत. स्वतःचं मूल्यमापन करताना माझा कल संस्थात्मक कामापेक्षा कलेकडे जास्त आहे, हे मला कळतं. माझ्या मते मी चांगली संघटक नाही. त्यामुळे आमच्या संस्थेची प्रगती सावकाश झाली असेल, आणि संस्था फार वाढवताही येत नाही. पण आम्हाला आमची मूल्यं जपता आली.
खूप चांगलं संघटनाकौशल्य माझ्याकडे नाही. माझा प्रत्येक क्षण मला सार्वजनिक करता येत नाही. मला स्वतःसाठी वेळ द्यावा लागतो, काहीही न करता शांत बसणं हीसुद्धा माझी गरज आहे. जगायला, मजा करायला मला आवडतं. त्याशिवाय मला चांगली कलाकार बनता येणार नाही. मी खूप प्रतिभासंपन्न आहे असं नाही; पण रियाजाची, साधनेची वेळ असते तेव्हा विचलित न होता तेच केलं पाहिजे.
आर्ट स्कूलसाठी वेळ दिल्यामुळे तुमच्यातल्या कलाकाराला पुरेसा वेळ मिळाला नाही असं वाटतं का?
हो, असं झालंच आणि होणार हे मला माहीत होतं. भोपाळ कलाभवनचे डिरेक्टर होते स्वामिनाथन म्हणून. आदिवासींची कला जतन करण्याचं काम ते गणेश देवींच्या आधीपासून करताहेत. एवढं सगळं करूनही त्यांची स्वतःची चित्रनिर्मिती प्रचंड आहे. एवढं सगळं करायला त्यांना वेळ कधी मिळत असेल? मला वाटतं, हे असे लोक झोपतच नसणार. हे लोक बरेच ऑर्गनाईज्ड असतात; मी तशी नाही, मी विस्कळीत आहे. पण त्याची खंत नाही.
✻ ✻ ✻
सर्व फोटो प्रा. नीलिमा कढे यांच्या सौजन्याने.
प्रतिक्रिया
मुलाखत आवडली. वर्तमानातला
मुलाखत आवडली.
सहमात आहे. बहुतेक सार्वजनिक ठिकाणे म्हणजे डोळ्यांवर अत्याचार असतात.
दणदणीत मुलाखत! खूप आवडली.
दणदणीत मुलाखत!
खूप आवडली. आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुलाखत आवडली.
मुलाखत अतिशय आवडली. आभार!
चांगली मुलाखत.नीलिमा यांचे
चांगली मुलाखत.नीलिमा यांचे विचार आवडले.त्यांचे काम इतरांना प्रेरणादायक आहे.
शांतपणे, सावकाश वाचून आत
शांतपणे, सावकाश वाचून आत जिरवावं असं काहीसं. धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
Very nice interview...
Very nice interview...
DarshanSP.
छान मुलाखत.
छान मुलाखत.