आजचा दिवस कसा गेला?
कोणी तुमच्याकडे पृच्छा केली की तुमचा आजचा दिवस कसा गेला? तर सहसा तुम्ही काय उत्तर देता?
"ठीक सो सो!"
"कंटाळवाणा गेला यार"
की तक्रारीची लांबलचक यादी लावता?
एका अभ्यासात असे आढळून आले आहे की सर्वात जास्त निर्मीतीक्षम लोक हे प्रत्येक दिवसाकडे ३ दृष्टीकोनातून बघतात - (१)उपलब्ध संधी (२) एक दालन (३)एक पोर्टल
पण कल्पना करा की आपल्याला जर प्रत्येक दिवसाकडे "पूर्णतेच्या प्रतीक्षेत असलेली अपूर्ण कविता" या दृष्टीने पाहता आले तर काय बहार येईल. अगदी लहान सहान बारकाव्यांकडे लक्ष पुरवोन त्यांना देखणे बनविण्याचा प्रयत्न आपण करू लागलो तर दिवस पक्षी आयुष्य किती अर्थपूर्ण होऊ लागेल.
बहुतेक "कोको शॅनेल' च.... तिचे विचार वाचताना मी असे वाचले होते की ती सदैव नीटनेटके आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असे. कारण न जाणो कधी तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती तिला कोणत्या क्षणी भेटेल असे तिला नेहेमी वाटत असे.
खरे तर हा प्रसंग इथे आठवण्याचे तसे काही कारण नाही. पण कदाचित "कविता आणि सौंदर्य" या दोन गोष्टी मनात घट्ट निगडीत झाल्यामुळे आठवला असेल.
beauty is found in two things,
in a verse and in a tent of skin.
दिवसभरात नानाविध सुंदर गोष्टी आपल्याला दिसतात, स्पर्शून जातात - बाळ सूर्यबिंब, कॉफीचा अत्यंत आल्हाददायक चुरचुरीत सुगंध, मैत्रिणीबरोबरच्या गप्पा हास्यविनोद, कुटुंबाबरोबरचा वेळ असे अनेक क्षण आनंदाने भारलेले असतात.
आपण जर दिवस (mindfully) लक्षपूर्वक व्यतीत केला तर , तक्रारी कमी होऊन आपलीच निर्मीतीक्षमता वाढावयास मदत होईल. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील ३, सर्वात आवडलेल्या मुद्द्यांची उजळणी मनाशी करू शकतो, ज्यायोगे मनाला उभारी, चैतन्य मिळण्यास मदत होईल.
लेख थोडा उपदेशात्मक झाला आहे. पण मूळ लेख/साईट तशीच आहे.
कल्पना - http://www.psychologytoday.com/blog/tracking-wonder/201101/every-day-is-...
प्रतिक्रिया
लेख थोडा उपदेशात्मक झाला आहे.
हरकत नाही. "अमकी अडचण आहे काय करू?" असे लेख सायटींवर बघण्यापेक्षा "अमकं करा बरं वाटेल" असे लेख कधीही चांगलेच वाटतात.
कोको शनाल नावाची कोणी व्यक्ती होती ही माहिती मला आजच मिळाली. ही कोण बरं, असा शोध मी गूगलवर घेतला, वरच्या डाव्या कोपर्यात काळा पॅच दिसला. personal results मधे हे सापडलं. (आमचे हे मित्र हल्ली गायब झालेले आहेत.) त्याच्या खाली Coco - Chanel Fragrance अशी लिंक दिसली; हं, विमानतळावर दिसणार्या या दुकानांपासून मी शिंका येतात म्हणून लांबच रहाते. आणि पुढची लिंक विकीपीडीयाची दिसली. त्यांचाही आज संप आहे.
पण पुढे इथे मात्र सापडलं की तिने २० व्या शतकाच्या सुरूवातीला युरोपीय स्त्रियांची कॉर्सेटमधून मुक्तता केली.
मी नेहेमीच नीटनेटकी आणि व्यवस्थित दिसते त्यामुळे मला त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. पण तुला करावा लागत असेल तर शुभेच्छा!
आणि मी नेहेमीच 'मजेत' असते आणि दोन-चार महिन्यांतला एखादा दिवस वगळता बाकीचे 'झकास' असतात, त्यामुळे मला उलटा डोस देण्याची गरज आहे का काय असा विचार बर्याचदा येतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कोणी तुमच्याकडे पृच्छा केली
असं उत्तर मी फक्त कामाच्या दिवशी (workday) देतो असे माझ्या लक्षात आलं आहे.
दिवसाचे आठ तास कामाच्या ठिकाणी काढणे प्रचंड कंटाळवाणे वाटते त्यामुळे साधारण ३-४ वर्षांनी काम किंवा कामाची जागा बदलणे आवश्यक होऊन जाते. कामाचा दिवस बर्याचदा खूप ठराविक असतो.
(ऑफिसचे) काम नसलेला दिवस मला खूप आवडतो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे एका खुल्या दालनासारखा.
त्या दिवसाचे नियोजन आधीच करून मी त्यातली मजा घालवत नाही.
"पूर्णतेच्या प्रतीक्षेत असलेली अपूर्ण कविता" असा विचार मी अजून कधी केला नाही पण दिवस म्हणजे उलगडत जाणारी कविता असा विचार केलेला आहे आणि करतो (सुटीच्या दिवशी).
विचार आवडला
विचार आवडला..
मात्र माझे बहुतांश दिवस तसेही मस्त, आनंददायी, प्रसन्न जात असल्याने अजुन पॉसिटीव्ह विचार केल्यास आनंदातिरेक होईल अशी भिती वाटते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आनंददायी
सहजसुंदर आणि जणू काही फोनवरून गप्पा मारता मारता "सांगितल्या युक्तीच्या चार गोष्टी" सम लिखाण, अर्थातच आवडले.
त्यातही "दिवसभरात नानाविध सुंदर गोष्टी आपल्याला दिसतात, स्पर्शून जातात - कॉफीचा अत्यंत आल्हाददायक चुरचुरीत सुगंध" ~ ही ओळ जास्तच भावली. कारण माझे कॉफीप्रेम. कॉफी किती आवडते यापेक्षा ती स्वतः करून घेण्यामध्ये जो काही आठदहा मिनिटांचा वेळ जातो, 'मग' मध्ये कॉफी ढवळताना खोलीत दाटून राहणारा कॉफीचा उग्र वासाचा छोटासा ढग आणि मग निवांतपणे एकट्यानेच मावळत्या सूर्याकडे पाहत पाहत ते घुटके घेणे. अशावेळी शेजारी म्युझिक सिस्टिमवर तितक्याच हळुवारपणे आपुलकीच्या अंगाने उलगडत जाणारा 'ब्रायन सिलास' चा पियानो.
सारीका म्हणतात त्याप्रमाणे ह्या सार्या साध्या सोप्या गोष्टी. माणूस म्हटला की तक्रारीचे लेप त्याच्या दैनंदिनीवर पसरला जाणारच, पण अशा छोट्या छोट्या आनंददायी चुटक्यामुळे त्या लेपाची झळ कमी करण्यास सहाय्यभूत ठरणार्या.
थॅन्क्स.
अशोक पाटील
खरच कॉफी हा माझा देखील वीक
खरच कॉफी हा माझा देखील वीक पॉईंट आहे. सध्या मला स्टारबक्स ची एक कॉफी खूप आवडते. अतिशय माईल्ड आहे. नाव ता इतकं काव्यमय आहे - "ब्लाँड रोस्ट" : ). स्ट्राँग कॉफी चं आणि माझं तितकसं जमत नाही. केरळमध्ये गेलो होतो, तेथील कॉफी बद्दल खूप ऐकून होते पण मला फारशी आवडली नाही.
मूळातील माईल्ड कॉफी, भरपूर हाफ्-न्-हाफ (साय/ घट्ट क्रीम) घालून अधिकच माइल्ड करून पिण्यात मी हुषार आहे.
पण सुट्टीच्या दिवशी, कॉफी, बेगल आणि आवडीचे पुस्तक (बाजूस कॅफेटेरीयात संगीत चालू) ..... अहाहा स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच
पाटील सरांनी या सर्व आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल त्यांचे खूप आभार.
कॉफीची जादू
सारीका,
आभार मानायचेच झाल्यास मीच तुमचा आभारी राहीन. त्याला कारण म्हणजे कॉफीशी निगडित माझे काहीशा रम्य आठवणीचे दिवस मला आठवले. विशेषतः पॉन्डिचेरीसारख्या तशा दूरच्या समजल्या जाणार्या गावातील एक फॅमिली गोव्याच्या ट्रीपनंतर इथे कोल्हापूरात खास मला भेटण्यासाठी रस्ता वाकडा करून आली होती. त्याला कारण श्री.मणी आणि माझ्यात नेटवरून "कॉफी" विषयावरून जमलेली मैत्री. ज्यावेळी श्री. आणि सौ. व त्यांच्या दोन्ही मुलांनी माझ्या घराचा दरवाजा ठोठावला त्यावेळी मला समजले की "आश्चर्याने तोंडात बोट घालणे" म्हणजे काय ? त्यानी अगोदर कल्पना दिली होतीच, पण ते येतीलच याविषयी खात्री नव्हती. आल्यावर फार दिवसापासून 'गायब' असलेला मित्रच जणू मला भेटला असे होऊन गेले. या अनोख्या मैत्रीला कारणीभूत म्हणजे "Cappuccino Coffee" ने नेटमैत्रीची करून दिलेली अनोखी सुरुवात.
तुम्ही संगीताचा उल्लेख केला आहेच; आणि खरंय, वाफाळत्या कॉफीसोबतीने शेजारी 'सॉफ्ट म्युझिक' चालू असताना जी एक खास तंद्री लागते ती केवळ अवर्णनीय अशीच असते.
अशोक पाटील
छान लेख
छान लेख
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही