ऐसा अमेरिकन सोक्षमोक्ष (भाग दोन)

ऐसा अमेरिकन सोक्षमोक्ष (भाग दोन)
खास लोकाग्रह नसताना सादर केलेल्या पर्यटनलीळा !

न्युयॉर्कच्या गजबजलेल्या विमानतळावर उतरताच आता फ्लोरिडासाठी एक शेवटचा विमानप्रवास राहिलाय इतकंच चमेलीला आठवत होतं.फ्रेंच रक्तवारुणी आणि स्पेशल मेनूचा लाभ घेत घेत आत्तापर्यंतचा प्रवास चुटकीसरशी संपला होता.आता सामानासकट विमान बदलण्याची वेळ येऊन ठेपली होती.त्यांच्या हातात दोन छोट्या बॅग्ज होत्या आणि सरकत्या पट्ट्यावरून दोन येणार होत्या.

जीवनात काही नाट्य नसलं की जीवन निरस होतं म्हणतात ना .........................

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ........
अमेरिका हि लँड ऑफ अपॉर्च्युनिटिज आहे असे त्यांच्या एम्बसी मध्ये लिहिले आहे. पर्यटनशील स्वभाव असूनही सामान हरविण्याची अपॉर्चुनिटी आजवर चमेलीला लाभली नव्हती. एकदाच तिच्या सुपुत्राची बॅग घरी विसरून ते मुंबईला गेले होते. बाकी कधीच काहीच घडले नव्हते. महासत्तेच्या तावडीत सापडताना सामान ताब्यात घेताच ,इमिग्रेशन करून,डोमेस्टिक टर्मिनलला सुरक्षा तपासणी करून प्रवासातली शेवटची विमान सफर होती. रात्र थोडी सोंग फार अशी अवस्था होती. सामानाच्या पट्ट्यावर त्यांची एक बॅग तात्काळ मिळाल्याने आनंदाला उकळ्या फुटू लागणार होत्या पण …. सरकत्या पट्ट्यावर त्याच त्या बॅगा ८४ लक्ष योनींचा प्रवास करून आल्या , त्यांनी डोळ्यात प्राण आणले तरी त्यांची दुसरी बॅग दिसेना.खुणेसाठी हँडलला लाल,हिरव्या ,पिवळ्या रंगाच्या सॅटीनच्या रिबिनी बांधल्या असुनही तिला आपली बॅग नक्की कोणत्या रंगाची आहे आठवेनासे झाले. इतर सोपस्कार करून डोमेस्टिकला जायची त्वरा होऊ लागली मग त्यांनी डेल्टा विमानसेवेच्या चेक इन काउण्टरवर बॅग सापडत नसल्याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी, ऑरलँडोला पोहोचल्यावर क्लेम मध्ये तक्रार द्या , बॅग शोधून मिळेल असे सांगितले.डेल्टाच्या विमानाने ऑरलँडोला उड्डाण केले. छोट्या बॅगमध्ये जरुरीपुरते कपडे असल्याने निश्चिंत होऊन चमेली लवकरच फ्लोरिडाचे विहंगम फोटू काढण्यात रमली. विमानतळावर उतरल्यावर चमेलीच कुटुंब आशेचं पाखरू होऊन पुन्हा सरकत्या पट्ट्यावर अनिमिष नेत्र खिळवून बसले. पण त्यांची बॅग दिसली नाही . क्लेममध्ये विचारल्यावर त्यांच्या सामानाचा बारकोड वाचून तुमची बॅग पॅरिसहून थेट अटलांटाला गेली असून उद्या सकाळी १०.३० नंतर ती फ्लोरिडातल्या निवास स्थानी येउन पोचणार असल्याची सुवार्ता त्यांनी दिली. डेल्टा विमानसेवेने सकाळी ११.३० ला इमेल पाठवून त्यांच्या सामानदुताचा "सुभाष" चा फोटू पाठवून दोन तासात सामान घरपोच येण्याची घोषणा केली. फिजी मध्ये गेलेल्या मूळ भारतीय गुजराती कुटुंबाचा वारस असलेला डेल्टा कर्मचारी सुभाष, मी आता पक्का अमेरिकन झालो आहे, असे म्हणत होता.चमेलीने सामान मिळाल्याच्या आनंदात फेस्बुकी डकवायला सुभाषला फोटू घ्यायचा म्हटल्यावर तो लाजून पोझ देत म्हणाला ,इश्श्य अस काय करता ? माझं कर्तव्यच आहे ते !

अगणित विमानप्रवास घडल्यानंतर गुलजारने," मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है..... वो आज भिजवादो ....मेरा वो सामान लौटा दो ..... अशी करुण विनंती विमानकंपन्यांना केली होती , यात काहीही तरल , रुमानी वगैरे नाहीये याचं प्रत्यंतर आलं.

अथ स्वागतम् शुभ स्वागतम् ............
फ्लोरिडात विमानतळावर उतरताच चमेलीच्या सखीने हर्षोन्मादाने मिठी मारून जोरदार स्वागत केले.तासभर कारप्रवास करुन ते होष्टगृही पोहोचले.घरी विधिवत गणपतीची स्थापना झालेली होती. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने झाली आणि त्यांना कढी,वरण, भात,पोळ्या ,भाज्या , कोशिंबीर ,चटणी आणि मोदक असे साग्रसंगीत जेवण मिळाले.स्वतःला चिमटा काढून चमेलीने जागृतावस्थेत आणि अमेरिकेतच असल्याची खात्री केली.आजकाल तर भारतातही कोणी कष्टून इतके पदार्थ घरी करत नाही हो, आयशप्पथ ! म्हणून चमेली म्हणाली ,अग सखे,हे जेवण सुलभ हप्त्यांमध्ये मिळाले तरी चालेल. "जेवून घ्या बे , पुन्हा इतके जेवण कधी मिळेल सांगता येत नाही "अशी भयप्रद आकाशवाणी सखीने प्रसवली.आणि पुढे ती खरी ठरली !

मोना डार्लिंग , सोना कहां है ............
भरपेट जेवून रात्री गादीवर पडताच गादीने त्यांना गिळंकृत केले. २६ तासाच्या प्रवासी थकव्याने काही तास ठार्मेल्यागत झोप झाल्यावर, स्प्रिंगच्या गादीरुपी दलदलीतून देह अलग करणे दुरापास्त झाले. देह जावो अथवा राहो …. पांडुरंगी दृढ भाव …. असे म्हणत आत्यंतिक कष्टाने त्यांनी गादीचा त्याग केला.पुढेही घरोघरी त्यांना अशाच, पाहुण्यांना गादीत चिणून बेपत्ता करणाऱ्या अनारकली गाद्या आढळल्या. फ्लोरिडाला सिंक होल (जमीन खचण्याची )समस्या असल्याने त्या गादीतून आपोआप कृष्णविवरात बेपत्ता झालेल्या हजारो पाहुण्यांचे करुण रुदन ऐकू येऊन त्यांना तात्पुरता निद्रानाशाचा विकार जडला. साफसफाई करणाऱ्या दोन /तीन मेड सर्व्हंटना त्यांनी प्राणपणाला लावून गादीबाहेर काढले आहे.अजून काही रात्री तिथे झोपावे लागले असते तर ते सुद्धा कृष्णविवरात विलीन झाले असते. त्यांच्या शेजारच्या खोलीत कापसाच्या साध्या गाद्या जमिनीवर घातल्या होत्या.परंतु तिथे विशिष्ट विचारसरणीचे, स्वदेशी पाहुणे बहुतांशी वास्तव्यास असल्याने, तेंव्हा खोली रिकामी असून तिथे झोपायचा विचारही चमेलीच्या मनाला शिवला नाही.

मगरमिठी .....
फ्लोरिडामध्ये अतोनात तलाव आणि छोटी तळी आहेत आणि ती अंतर्गत जोडलेली आहेत.तळ्यात थुईथुई कारंजी असल्याने शेवाळे जमलेले दिसले नाही. सर्व तळ्यात भरपूर मगरी असून त्या सर्वत्र अंडरग्राऊंड संचार करतात.या विशेष प्राविण्यामुळे ,न्युयॉर्क अंडरग्राऊंड मेट्रो जाळ्यांची आद्यजनक "आल्फी एली बीच" या नावाची संशोधक एक मगर आहे असे विकिपीडियात लिहिले आहे.त्यामुळे भूमिगत संशोधनात मगरी मानवाला प्रेरणादायी असल्याचे नेहेमीप्रमाणे सर्वप्रथम अमेरिकेतच सिद्ध झाले (सर्वप्रथम आणि सगळ्यात मोठ्ठ स्पेशालिस्ट अमेरिका ,हुश्श!).
सुप्रभाती घराच्या मागीलदारी,तळ्याकाठी निवांत चहा पीत असताना,तिथे एखादी मगर सौंदर्यीकरणासाठी ,तिच्या पांढऱ्या पोटाला सनटॅन लोशन चोपडून उन्हात पहुडलेली दिसली तर, दचकून दंगा करू नका .तिला भावनांचे प्रदर्शन आवडत नाही. मगरमच्छके आंसू माहितीये ना, ते पण खोटे असतात , चमेलीचं सखीरत्न वदलं ! घराच्या मागीलदारी सुरक्षित,बारीक जाळीच्या कुंपणाने चहुबाजूंनी अवगुंठीत सुरेखसा स्विमिंगपूल होता. गर्द निळ्या आभाळाखाली, शुभ्र ढगांच्या महिरपी पहात, भान विसरून पोहताना,चमेलीला अचानक तिच्यासोबत व्हुप्पी गोल्डबर्ग सारखी दिसणारी एक मगर पोहतेय आणि गूढरम्य हसत "हाय हावायू" करतेय अशी हेल्युशीनेशंस होऊ लागायची. मगरमिठीचे आभासी संकट भयकंपित करत असूनही तिने वेळ मिळताच एकटीने स्वीमिंग करायचा दुर्लभ उपक्रम सुरूच ठेवला.

मानवी अस्तित्वाचा स्थूलगामी शोध !
महिनाभर वास्तव्य असल्याने अमेरिकन भूमीवरच्या मानवी अस्तित्वाचा स्थूलगामी शोध घेण्याची विपुल संधी आहे असे चमेलीला वाटत होते. डोळ्यात तेल घालून ती चौफेर लक्ष ठेवू लागली.
सायप्रस किंवा विलो सारखं एखाद झाडाचं नांव घेऊन त्याला विलो ब्रूक्स /ट्रॅक्स नायतर विलो पाँड , विलो बेंड वगैरे एंड बेंड जोडनाव लावून केलेल्या टुमदार,एकसाची वसाहती होत्या. तिथे बरेचदा पायी फिरताना चमेलीला चिटपाखरू सायकलस्वार किंवा कुत्र्याला फिरवणारा जिवंत नागरिक याची डोळा दिसले.दर शुक्रवारी एक गवतकाप्या येऊन असह्य ध्वनिप्रदूषण करत, कॉलनीत सगळ्यांची लॉन भादरून देई.आठवड्यातनं दोनदा कचरेवाला दर्शन देई.मॉलमध्ये आणि पर्यटनस्थळी जुजबी अमेरिकन मानवप्राण्यांचा प्रादुर्भाव आढळला. फ्लोरिडात मैलोनमैल केलेल्या कार प्रवासात, दुपारच्या रणरणत्या उन्हात सायकली दामटणारे हौशी अमेरिकन्स पाहून तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. कर्कश्श आवाजाच्या प्रचंड मोटारसायकली घेऊन हिंडणारे, सर्वांगीण टॅटू रंगवलेले, दांडगे,भयप्रद मानवसदृश प्राणी उरात धडकी भरवत होते.त्यांना शहरांमध्ये हिंडायला परवानगी नसते असे तिला कळले.मनुष्यप्राणी बघायचा असेल तर विकांताचा मुहूर्त लाभतो याचे आकलन आपोआपच झाले.

वायफायशरणता ...............
घरातल्या घरातसुद्धा एकमेकांना अहोरात्र टेक्स्टींग करणे आणि तरीही संपर्काचा सूर न लागल्यास नाईलाजाने कॉल करण्याची चमत्कारिक फॅशन तिच्या सखीकडे आढळून आली.कधी कधी वरच्या बेडरूममध्ये दुपारी वामकुक्षीच्या करताना चमेलीला व्हाॅटस अप मेसेजने, गॅसवर ठेवलेल्या चहाच्या उकळत्या भांड्याच्या ताज्या फोटोसकट चहापानाचे आमंत्रण सेंडले जात असे. एकदा सखीला तिच्या व्याकुळ पतीराजांनी ,लाडके झोपायला येतीस का ? असा मोहक संदेश पाठवल्याचे दिसून आल्याने चमेलीच्या मनोरंजनात कसलीच उणीव म्हणून राहिली नाही.

विमानतळ, मॉल ,मॅकडोनाल्ड ,टाको बेल आणि स्टारबक्स मध्ये वगैरे फुक्कट इंटरनेट उपलब्ध असते.स्टारबक्सचे फुकट सिग्नल बहुदा सगळ्यात पॉवरफुल असावेत. चमेलीला ठिकठिकाणी स्टारबक्सला फुकटे नेटार्थी बाहेरून लगडलेले पाहून अनावर हसू यायचे.फुकटचंबू बाबुरावांची जगात रेलचेल आहे याची तिला खात्री पटली.

डायवर कोन हाय .... लायसन बगू .
अमेरिकेत भरपूर कार प्रवास लाभल्याने ,सगळेच होष्टसारथी , जीपीएस नामक मार्गदर्शिकेचा अनन्वित छळ करताना आढळून आले.जीपीएस मध्ये पत्ता टाइप केला कि मार्गदर्शिका जिप्सीण आपली वाट लावते. चमेलीचे सारथीमित्र , जिप्सीणने उजवीकडे वळा म्हटले कि हमखास वाममार्गाला लागत.जिप्सीण आकांत करू लागे पण सारथी वाममार्गावरून पथभ्रष्ट होत नसत. मग थोडावेळ रुसून ती इच्छितस्थळी जायचा नवीन मार्ग शोधून काढे.जिप्सिणीशी फ्लर्टिंग करायचे असेल तेंव्हाच,ओक्के बेबी म्हणून ते आज्ञापालनाचा कडेलोट करीत.रस्त्यावर वेग तपासणीसाठी कॅमेरा असेल तर जिप्सीण बीप करुन चालकांना पोलिसांपासून सावधान करत होती. पोलिसांकडून दंड स्वरूपातले प्रेमपत्र मिळून आपले गाडीवान चारित्र्य कलंकित होऊ नये म्हणून एनाराय मंडळी डोळ्यात तेल घालून दक्ष आढळली.चमेलीला स्वदेशी पोलीस आणि शिकार असे मधुर संबंध आठवले.अॅव्हेन्यू , स्ट्रीट, बुलेवार्ड ,लेन, ड्राइव्ह, स्पॅगेटी जंक्शन,एक्झिट वगैरे गहन चक्रव्यूह पाहून," वाट संपता संपेना ....कुणी वाटेत भेटेना ......कुठे आलो,असाकसा .....कुणी काही म्हणा ...
हे गाणं चमेलीच्या कानात अनाहत वाजू लागे.

मॉला हो मॉला ........हैया ना हैया ना हैया ना हैया ......
जिंदगी की आग में काहेको जलाते हो कागजी शरीर का चोला
भूक मिटाये दे प्यास हटाये दे खाली है पेट का झोला ....

यार्ड सेल,फार्मर्स मार्केट ,के मार्ट,वॉल मार्ट,कॉस्टको वगैरे मॉला हो मॉला पालथी घालून झाली. सगळीकडे फॉल सिझन आणि हॅलोविनची तिच रटाळ सजावट पाहून चमेलीला मळमळू लागलं. हातपाय धड आहेत तोवर करायचे सर्वोच्च अमेरिकन तीर्थाटन म्हणजे आयकीया हे फर्निचरचे दुकानही पाहून झालं .शेवटी फ्लोरिडातील प्रेक्षणीय स्थळे आणि म्युझियम्स बघण्यातच चमेलीच्या जीवनाचे सार्थक झाले.

गर्द निळ आकाश , सुंदर समुद्र ,हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या आणि अगणित तलावांनी अलंकृत,अदभूत फ्लोरिडाचा निरोप घेऊन आता थंड हवेच्या अल्बनीत जायची वेळ झाली होती.ऐसीकर मंडळींच्या जीवनाचा जवळून अभ्यास करायचा...अहाहा ... चमेली मुक्त कंठाने गाऊ लागली ..............
जिसका मुझे था इंतजार , जिसके लिये दिल था बेकरार वो घडी आगयी आगयी.........

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

जरा अतीच हलकंफ़ुलकं वाटलं. शैलीचा अतिरेक आणि त्यामुळे वाचनीयता कमी होते आहे. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

n a covering letter of 2 February 1891 to the Daily Telegraph, Oscar Wilde wrote of a letter on ‘Fashion in Dress’ which he enclosed, ‘I don't wish to sign my name, though I am afraid everybody will know who the writer is: one's style is one's signature always.’

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile लब्बाडेस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडेश

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

स्प्रिंगरूपी दलदल, गादीने गिळंकृत करणे,'लाडके, झोपायला येतीस का' हा मोहक संदेश आवडला.
अगदीच ठार्मेल्या गेल्या जाणे झाले नाही तरी अधून मधून मेल्या गेले जाणे झाले.
आवडल्या गेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदीच सुपरफिशियल वाटलं...
ह्यापेक्षा मागे मुक्तसुनीताने त्याच्या बनी बरोबर केलेली अमेरिकेची सफर कितीतरी जास्त इंट्रेष्टिंग होती!!
कोणीतरी लिंक द्या रे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुक्तसुनीत यांच्या बनीबद्दल संपूर्ण सहमती आहे. अप्रतिम जमलेलं होतं ते लेखन. या घ्या लिंका...

http://www.misalpav.com/node/2920
http://www.misalpav.com/node/2948

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

हे म्हणजे एकदम,
'फ्रेंन्डिन्नीड इजे फ्रेंन्डींडीड' ह्या कानडी म्हणीनुसारच झालं!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंडीड! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

सरकत्या पट्ट्यावर त्याच त्या बॅगा ८४ लक्ष योनींचा प्रवास करून आल्या

गुलजारने," मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है..... वो आज भिजवादो ....मेरा वो सामान लौटा दो ..... अशी करुण विनंती विमानकंपन्यांना केली होती

वगैरे पेश्शल उसंत सखू टचेस आवडले.

कदाचित अधूनमधून नॉर्मल वाक्यं आली तर वाचकांना थोडा नॉन-कॉमिक रीलीफ मिळेल हे मात्र पटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0