विश्वाचे आर्त - भाग ९ - अनैसर्गिक निवड

आपण तऱ्हेतऱ्हेचे कुत्रे पाहातो. पांढरे गुबगुबीत केसाळ पॉमेरियन; काळे हिंस्र वेगवान डॉबरमन; कुरळ्या केसांचे खेळण्यासारखे वाटणारे पूडल; लांडग्यासारखे दिसणारे निष्ठावान आल्सेशियन... शेकडो जाती आहेत त्यांच्यात. प्रत्येकाचं रूप वेगळं, प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे. सहा इंचांचा चिव्हाव्हा आणि जवळपास पाच फूट उंच ग्रेट डेन इतकी प्रचंड रेंज दिसते. या वेगवेगळ्या जाती माणसाने तयार केलेल्या आहेत. काही हजार वर्षांपूर्वी तुम्हाला लांडगा किंवा जंगली कुत्र्याच्या जातीचा काही प्राणी सापडला असता.

आपण सध्या खातो तो मका काही शतकांपूर्वी एका अगदी छोट्याशा रूपात होता. म्हणजे आत्ता आपल्याला जी कणसं दिसतात, त्याऐवजी एकेकाळी बंद बिया असलेल्या शेंगा असायच्या. आकार आणि बियांचा उघडेपणा निवडत निवडत आता त्यात प्रचंड बदल झालेला दिसतो. आपण खात असलेली सगळीच धान्यं ही अशाच छोट्याशा पूर्वजापासून तयार झालेली आहे.
मक्यात झालेला बदल
हे बदल आपल्या डोळ्यासमोर म्हणावे इतक्या वेगाने, म्हणजे काही शतकांत घडलेले आहेत. हे कसे घडले? तर वेगवेगळ्या लोकांनी आपल्याला हवे ते गुणधर्म असलेल्या प्राण्यांची किंवा वनस्पतींची पैदास केली. बाकीच्यांची पैदास न करता ते टाकून दिले अगर वापरून टाकले. एक काहीसं सोपं उदाहरण घेऊ. समजा आपल्या शेतात येणारी मक्याची कणसं चार ते सहा इंच लांबीची होती. अर्थातच आपल्याला सर्वच कणसं सहा इंच लांबीची असलेली आवडतील. आता आपल्याला सर्वसाधारण निरीक्षणाने माहीत आहे, की आईवडिलांचे गुणधर्म मुलांच्यात उतरतात. तेव्हा पुढच्या वर्षी पेरणी करू ती फक्त सहा इंच लांबीच्या कणसांचीच करू. आणि खरोखरच पुढच्या वर्षी येणारी कणसं ही लांब असतात. पुन्हा, सगळीच अचूक सहा इंची असतील असं नाही. कारण कणसांची वाढ ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. पण निदान यावेळी दिसणारी कणसं ही पाच ते सहा इंच लांबीची असतील. म्हणजे आपल्या कणसांची सरासरी लांबी वाढली. आता यातली सगळ्यात लांब कणसं घेतली, तर आपल्याला कदाचित काही कणसं साडेसहा इंचांची असलेली सापडतील. पुन्हा पुढच्या वर्षी त्यांपासून पीक घ्यायचं. आता आपल्याला मिळणारी कणसं सर्वसाधारणपणे साडेपाच ते साडेसहा इंचांची असतील. ही प्रक्रिया पुढे चालू ठेवली तर आपल्याला कणसांचा आकार वाढत जाताना दिसेल. लवकरच आपली कणसं फुटभर लांब झालेली दिसतील.

या उदाहरणात थोडं सुलभीकरण आहे. वापरलेले आकडे सोयीसाठी चार इंच, पाच इंच, सहा इंच असे घेतलेले आहेत. कदाचित एका पिढीत अर्ध्या इंचाचा बदल होत नसेल. कदाचित फक्त दशांश इंचाचा फरक पडत असेल. म्हणजे या प्रक्रियेने चारपाच वर्षांत प्रचंड फरक दिसणार नाही. सहा इंचांपासून फुटभरापर्यंत जायला कदाचित अनेक दशकं लागतील. त्याने अर्थातच मुद्दा बदलत नाही.

मात्र एक गोष्ट मी फारशी न समजावता गृहित धरली. आणि ती जर व्यवस्थित समजून घेतली नाही तर वरचा युक्तिवाद वाचकांची फसवणूक करणारा वाटू शकतो. त्यामुळे नक्की काय घडतं हे नीट तपासून पाहायला हवं. 'पहिल्या पिढीत हजारो कणसं होती. त्यातलं सगळ्यात लांब सहा इंची होतं. म्हणजे त्या जातीची क्षमता जास्तीत जास्त सहा इंच लांब कणीस तयार करण्याची होती. मग पुढच्या काही पिढ्यात निव्वळ जास्तीत जास्त लांब कणीस निवडल्यामुळे ती सात किंवा आठ इंच लांबीची कणसं तयार कशी करू शकेल?'

हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जर मूलभूत क्षमता बदलत नसेल, तर कितीही निवड करा, तुम्हाला विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे जाताच येणार नाही. जर चार ते सहा इंच इतकी रेंज असेल तर सहा इंचांची मर्यादा ओलांडता येणार नाही. पण आपल्याला हे घडताना दिसलेलं आहे. पेन्सिलला टोक काढावं तशी अधिकाधिक निमुळत्या नाकांचे कुत्रे पिढ्यानपिढ्या अशी निवड करून घडवले गेलेले आहेत. हे कसं होतं?

याचं कारण म्हणजे आपोआप होणारे जनुकीय बदल, (किंवा थोडक्यात 'आजब'). यांनाच जेनेटिक म्यूटेशन्स म्हणतात. पुनरुत्पादनाची प्रक्रिया ही शंभर टक्के अचूक नसते. हजारात एक, लाखात एक वगैरे प्रमाणात तीत चुका होतात. बहुतेक वेळा या चुका हानिकारकच असतात. पण काही वेळा या चुका 'चांगल्या' असतात. आता चांगल्या चुका म्हणजे काय? आपण झेरॉक्स कॉपीचं उदाहरण घेऊ. समजा एखाद्या तरुणीच्या चेहेऱ्याच्या चित्राच्या आपण अनेक झेरॉक्स कॉपी काढतो आहोत. बहुतेक सगळी चित्रं हुबेहुब म्हणावीत अशीच येतील. पण काही चित्रांमध्ये कदाचित शाईचे डाग येतील. आता ज्या चित्रांत डाग येतील त्यांपैकी बहुतेकांत चेहेऱ्याचं सौंदर्य कमी होईल. पण एखादा डाग बरोब्बर हनुवटीवर आला तर कदाचित तो तीळ म्हणून चेहेरा जास्त गोड दिसू शकेल. या अर्थाने चुका या दरवेळी वाईटच असतील असं नाही. म्हणून त्यांना बदल म्हणणं जास्त योग्य ठरेल.

कणसांच्या बाबतीत पुन्हा पुन्हा नवीन कणसं घेताना एखादा आजब घडतो. ज्याने त्या झाडापुरती कणसांची लांबी किंचित वाढते. म्हणजे एरवी सहा इंच लांबीचीच मर्यादा असलेल्या झाडापेक्षा किंचित वेगळे गुणधर्म असलेलं झाड तयार होतं - कदाचित या झाडाची कणसं साडेसहा इंच लांब असतील. आणि पुढच्या पेरणीसाठी जर आपण सर्वात लांब कणसं निवडणार असू तर अर्थातच या झाडाची निवड होते. आणि काही वर्षांनी - हजारो, लाखो कणसं लावल्यावर पुन्हा एखादा आजब घडतो. पण जेव्हा जेव्हा कणसांची लांबी वाढवणारे आजब घडतात तेव्हा लांब कणसं निवडल्याने ते टिकून राहातात. आणि काही दशकं असंच करत राहिलं तर एकेकाळी चार ते सहा इंच असलेल्या कणसांपासून आपल्याल आठ ते दहा इंच लांबीची कणसं असलेली जात मिळते.

ही निवड करून जात 'सुधारण्या'साठी काय काय आवश्यक असतं? सर्वप्रथम म्हणजे मुळात काहीतरी चांगला अथवा वाईट गुणधर्म असावा लागतो. इथे कणसाची लांबी हा तसा गुणधर्म आहे. यात अधिक लांबी चांगली, कमी लांबी वाईट असा निकष आहे. तसंच या निकषानुसार एक विशिष्ट प्रमाणात वैविध्य असावं लागतं. म्हणजे मुळात जर सगळीच कणसं अचूकपणे पाच इंच लांब असती, तर त्यात निवड कशी करणार? चार ते सहा इंच असं वैविध्य असल्यामुळे आपल्याला असा विचार करता येतो की सहा इंची कणसात कदाचित काहीतरी वेगळं असेल जे त्यांच्या संततीत उतरू शकेल. या वैविध्यापलिकडे वर म्हटल्याप्रमाणे होणारी आजबं असायला हवी. जर जनुकांमध्ये कधीच बदल होत नसतील - म्हणजे पालकांचे गुणधर्म हुबेहुब संततीत येत असतील तर कुठचंच कणीस सहा इंचापेक्षा मोठं होणार नाही. पण असे बदल अधूनमधून होत असतील तर त्यात होणारे सोयीस्कर बदल निवडत निवडत आपल्याला हव्या त्या दिशेने बदल घडवून आणतात. कारण दरवेळी झालेले 'चांगले बदल' आपण टिकवून ठेवतो, आणि पुढच्या पिढीत येतील अशी खात्री करून घेतो. त्यामुळे आज दिसणारं पीक हे काही दशकांपूर्वीच्या पिकापेक्षा पूर्णपणे वेगळं दिसू शकतं.

या प्रक्रियेला मी 'अनैसर्गिक निवड' किंवा 'कृत्रिम निवड' असं म्हटलेलं आहे. याचं कारण म्हणजे निवड करणारी कोणी व्यक्ती असते. एक सुजाण पैदासक आत्ताच्या पिकातल्या कणसांच्या लांबींची तुलना करतो आणि त्यातली सर्वात लांब निवडून पुढच्या पेरणीसाठी वापरतो. त्यासाठीचा निकष हा त्या पैदासकाच्या मनात असतो. त्याला एका विशिष्ट दिशेने बदल घडवण्याची इच्छा असते, आणि उद्देशपूर्वक तो ही निवड करतो.

नैसर्गिक निवड ही याच तत्त्वावर चालते. मात्र इथे निवड करणारी कोणी डोळस व्यक्ती नसते. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे कुठचे गुणधर्म चांगले आणि कुठचे चांगले नाहीत हे ठरतं. कणसं मानवी निवडीमुळे मोठी झाली हे उघड आहे. पण जिराफाची मान लांब झाली तेव्हा 'लांब मान असणं चांगलं' असा निकष लावणारी कोणी व्यक्ती नव्हती. तरीही ती लांब झाली. आणि तिच्यामागची प्रक्रिया तीच आहे. हजारो पिढ्यांपूर्वीच्या पिढीतल्या चार ते सहा फूट मान असलेल्या जिराफांपैकी अधिक उंच जिराफांना उंचपर्यंतचा पाला खाता आला. त्यामुळे त्यांना अधिक पिलांना जन्म देता आला, अधिक पिलांना पोसता आलं. त्यामुळे पुढच्या पिढीत पाहिलं तर सहा फुटी जिराफ किंचित काही प्रमाणात जास्त झाले. हेच पिढ्यानपिढ्या चालू राहिलं तर एक वेळ अशी येते की चार फूट लांब मानेचे जिराफ नाहीसे होतात. कणसांप्रमाणेच आजब घडत राहिल्यामुळे ही चढाओढ सहा फुटांपलिकडेही चालूच राहाते. आणि शेकडो, हजारो पिढ्यांनंतर सर्वच जिराफ आठ ते दहा फूट मानेचे दिसून येतात. मूळ पिढीतले सर्वात उंच जिराफदेखील त्यांच्या इतक्या पिढ्यांनंतरच्या संततीच्या बुटक्या जिराफांपुढे खुजे दिसतात.

निसर्गाला 'अमुक व्हावं' किंवा 'प्राणीसृष्टीचा या दिशेने विकास व्हावा' अशी इच्छा नसते. निसर्ग केवळ असतो. उंच झाडं असतात. त्यांच्या पानांवर जगणारे जिराफ असतात. आणि त्यांच्या मानेच्या लांबीत वैविध्य असतं. त्यांची मानेची लांबी त्यांच्या संततीत उतरते. आणि आसपासच्या उंच झाडांपोटी अधिक लांबी उपयुक्त ठरते. एवढंच पुरेसं असतं. लांब कणसं पुढच्या पिढीत अधिक प्रमाणात जायची प्रक्रिया जशी माणूस घडवून आणतो, तशी लांब मानेचे जिराफ पुढच्या पिढीत जाण्याची प्रक्रिया आपोआपच घडते. त्यासाठी कोणी मार्गदर्शक लागत नाही.

(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

झेरॉक्स कॉपीतल्या तिळाचे उदाहरण फार चपखल आहे (दृष्ट लागण्याजोगे :)), अतिशय आवडले. वाचतो आहे, पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

हेच्च बोलतो. झेरॉक्सचं उदाहरण आवडलं.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा आजब रँडमली घडतो का?

समजा, ४-६ इंचांची कणसं निर्माण करणारे अ, ब आणि क असे तीन घटक आहेत. आजब घडून त्यात ड हा घटक नव्याने आला असं समजू (किंवा क च्या जागी ड आला असंही चालेल).

तर हे अबक --> अबकड किंवा अबक --> अबड हे रँडमली घडेल का? हा रँडमनेस प्रेडिक्ट करता येतो का?

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा आजब रँडमली घडतो का?

याचं उत्तर हो असं आहे. जेनेटिक म्यूटेशन्स घडण्याची दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे बाह्य घटक. कॉस्मिक रेडिएशनचा सतत मारा पृथ्वीवर होत असतो. या रेडिएशनमुळे डीएनएमध्ये बिघाड होऊ शकतो. किंवा काही विशिष्ट रसायनांशी संपर्क आल्यामुळेही हे बदल होऊ शकतात. आपल्या पेशींमध्ये डीएनए दुरुस्त करण्याची सोय असते. पण त्यातूनही काही बदल शिल्लक राहातातच.

दुसरा घटक म्हणजे डीएनएची प्रतिकृती तयार करण्याची जी यंत्रणा असते तीमध्ये काही 'बिघाड' झाला तर त्यातून किंचित बदललेला डीएनए तयार होऊ शकतो.

रॅंडमनेस प्रेडिक्ट करणं यातून मला वाटतं त्याबद्दल काही तरी स्टॅटिस्टिकल मॉडेल तयार करून 'अमुक प्रकारचे बदल अमुक काळात साधारण इतके होतील' यासारखं विधान करता येतं का असं तुम्हाला म्हणायचं आहे. तर याचं उत्तर आहे हो. इथे म्यूटेशन्सच्या दराबद्दल माहिती मिळेल.

<वि. ठा. मोड ऑन>

लेख अनावश्यक आहे. सुधीर मोघ्यांनी या गाण्यातल्या तीन ओळींतच याचं सार कसं मांडलंय बघा:

रोप आपुलंच पर होईल येगळं --> आ.ज.ब.
दैवासंगं झुंजायाचं देऊ त्याला बळ --> मानवी निवड
दिस जातील, दिस येतील --> काळाचा आवाका (पहिला भाग)

<वि. ठा. मोड ऑफ>

१. वि.ठा. म्हणजे कोण हे ठाऊक नसल्यास, तुमचं आयुष्य व्यर्थ आहे. मराठी आंतरजालाचा अभ्यास वाढवा, अवकाशाचा बोध करून घ्या!

विठा म्हणजे ओल्ड सर इन न्यू इन्कार्नेशन ना?

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

किंवा ओल्ड मंक इन न्यू बॉटल Smile