विश्वाचे आर्त - भाग १४ - उत्क्रांती आणि हरितक्रांती

माल्थसने १७९८ साली जो निबंध लिहिला त्यात जगाच्या भवितव्याबद्दल अत्यंत काळेकुट्ट चित्र उभे केले होते. त्याकाळी जगाची लोकसंख्या होती सुमारे एक अब्ज. आत्ताच्या एक सप्तमांशाहूनही कमी. तरीही दुष्काळ, रोगराई, आणि गरिबीने थैमान मांडलेले होते. मोजके श्रीमंत लोक सोडले तर पोटभर खायला, स्वच्छ पाणी प्यायला मिळण्याची अनेकांना मारामार होती. दुष्काळ पडला की अन्नान्न होऊन अनेक लोक तडफडून मरत. त्यांना सरकारने काहीतरी आधार द्यावा असे प्रयत्न होत. निदान आत्ता निभावून नेले तर चांगल्या काळात सर्वांचीच परिस्थिती सुधारेल याची आशा काहींना वाटत असे. पण या आशेच्या मुळावरच त्याने कुऱ्हाड घातली. त्याने अत्यंत सोपा पण प्रभावी युक्तिवाद केला. 'आपण समजा या सर्वांना पुरेल इतके अन्नाचे उत्पादन केले, तरीही त्याचा फायदा काय होणार? जेव्हा सर्वजण खाऊनपिऊन सुखी असतील, तेव्हा अर्थातच लोकसंख्या वाढणार. आणि पुढच्या पिढीत खायला घालायची तोंडे वाढणार. लोकसंख्या चक्रवाढीने वाढणार, आणि अन्नोत्पादन फारतर सरळ रेषेत. आणि तेही किती काळ वाढू शकेल? कारण पृथ्वी तर मर्यादितच आहे. तेव्हा प्रत्येक काळात तळागाळातले लोक तडफडून मरणे हेच मनुष्यजातीचे प्राक्तन आहे. किंबहुना त्यांना मदत करून आपण पुढच्या पिढीचे प्रश्न वाढवत आहोत.'

माल्थसची मांडणी निराशाजनक होती. गेल्या काही दशकांत ती मोडून पडली. पण त्याच्या काळात ती मानवजातीच्या कपाळावर सटवाईने लिहिलेल्या भविष्याप्रमाणे अटळ वाटत होती. कधीकधी वाईटातून चांगले निघते त्याप्रमाणे या अत्यंत निराशाजनक मांडणीतून डार्विनला नैसर्गिक निवडीतून होणाऱ्या उत्क्रांतीचे तत्त्व सापडले. माल्थसने वर्णन केलेली परिस्थिती प्राण्यांनाही लागू पडते. किंबहुना त्यांना उत्पादन वाढवण्याची सोयच नसते. त्यामुळे भरपूर अन्न असेल तेव्हा खाणारी तोडे वाढतात. मग ते अन्न पुरेनासे होईल इतकी वाढ होते. कधीतरी अशी वेळ येते की कमकुवत प्राण्यांना पुरेसे खायला मिळत नाही. त्यांना आपली संतती वाढवता येत नाही. त्यामुळे सक्षम आणि त्या परिस्थितीत अन्न शोधण्यासाठी लायक गुणधर्म असणारे प्राणी अधिक प्रमाणात टिकून राहातात. अशा रीतीने नैसर्गिक निवडीने प्रजाती कालांतराने बदलतात - काही गुणधर्म टिकतात, काही गुणधर्म नष्ट होतात. परिस्थिती बदलते, तीत टिकून राहाण्यासाठी प्रजाती बदलतात, या बदललेल्या प्रजाती इतर प्राण्यांसाठी नवीन परिस्थिती निर्माण करतात आणि हे चक्र अव्याहतपणे चालूच राहाते.

१८५९ साली जेव्हा डार्विनने 'द ओरिजिन ऑफ स्पीसीज' प्रसिद्ध केला तेव्हा माल्थसचे विचार मनुष्यजातीला लागू होतेच. त्याच्या लेखनानंतरच्या साठ वर्षांत लोकसंख्या फार वाढलेली नव्हती. एक अब्जावरून ती जेमतेम सव्वा अब्जापर्यंत गेली होती. दुष्काळ, युद्धे, महामाऱ्या, गरिबी आपापले बळी वसूल करून घेत होतेच. सर्वसाधारण स्त्रीला सहा मुले जन्मावीत त्यातली दोन-तीन लहानपणी जावीत, एक-दोन थोडी मोठी झाल्यावर मरावीत आणि दोनेक उरावीत हे चित्र तसंच्या तसे होते. श्रीमंत असाल तर थोडी बरी परिस्थिती. नव्वद टक्क्यांहून अधिक लोक अशिक्षित आणि अत्यंत दयनीय अवस्थेत जगत होते. त्याच सुमाराला सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीने परिस्थिती बदलायला सुरूवात झाली. त्या काळी जगाचे वैचारिक आणि औद्योगिक केंद्र असलेल्या युरोपात प्रचंड प्रमाणावर लोकसंख्यावाढ सुरू झाली. त्यांच्या गरिबीचे वाटप त्यांनी आपापल्या वसाहतीच्या लोकांकडे केल्यामुळे आश्चर्यकारकरीत्या वाढती लोकसंख्या आणि वाढती सुबत्ता हे एका वेळीच दिसायला लागले. माल्थसचे म्हणणे खोटे ठरते की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झाली. महायुद्धकाळात आलेल्या कृत्रिम घटी वगळता, लोकसंख्या सतत वाढतच गेली. डार्विनने आपला सिद्धांत मांडल्यापासूनच्या पुढच्या पंच्याऐशी वर्षांत लोकसंख्या पुन्हा दुप्पट झाली.

मात्र खरी पंचाइत आली ती पुढच्या काही दशकांत. स्वतंत्र झालेल्या देशांनी दुष्काळातले आणि रोगांच्या साथींमुळे होणारे मृत्यू टाळण्यात यश मिळवले. किंचित काही सुबत्ता वाढली. आणि लोकसंख्या दुप्पट व्हायला पूर्वी जिथे पंच्याऐशी वर्षे लागत होती तिथे आता चाळीस-पंचेचाळीस वर्षे पुरायला लागली. हे प्रचंड भीतीदायक होते. माल्थसचे भूत आख्ख्या मानवजातीच्या मानगुटीवर बसू पाहात होते. अन्नाचे उत्पादन आणि व्यवस्था पाहाणाऱ्या सरकारांना पुढच्या दशकांमधले विदारक चित्र दिसत होते. लोकसंख्या काही वाढायची थांबत नाही. अन्न आधीच तुटपुंजे आहे. ते वीस वर्षांनी दीडपट लोकांना कसे पुरवायचे? पंचवीस तीस टक्के लोकांची अन्नान्न दशा झाली तर यादवी युद्धे होणे, अराजक माजणे, देशांचे तुकडे होणे सहज शक्य होते. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टचे रूपांतर बळी तो कान पिळी मध्ये होणार आणि त्यातून मृत्यूंचे प्रमाण अधिकच वाढणार. अन्न कमी पडले तर संपूर्ण संस्कृतीच नामशेष होऊन लोक रानटी पातळीवरती उतरतील अशी रास्त भीती सगळ्यांना वाटत होती.

भारताचे उदाहरण पाहायचे झाले तर साठच्या दशकात परिस्थिती बिकट होती. ब्रिटिश सरकार जाऊन तेराच वर्षे झालेली होती. दरम्यानच्या काळात फाळणी, सीमेवरती युद्ध, एकंदरीत अस्थिरता यातून राज्याची घडी बसवायलाच वेळ गेला होता. गरिबी आणि अज्ञानाने समाज पोखरलेला होता. अशा कमकुवत देशासमोर कोट्यवधी लोक उपाशी मरण्याचे धर्मसंकट उभे राहिले होते. १९४९ सालपासूनच भारतीय शास्त्रज्ञांना अधिक पीक देणारी जात निर्माण करण्यात यश आलेले होते. पन्नासच्या दशकात वाढलेले उत्पादन, हरितक्रांतीची सुरूवात या बियाण्यापासून झाली. १९६० साली इंडियन राइस रीसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. संशोधनासाठी जगभरातून हजारो जाती मागवण्यात आल्या. त्यांमधले सर्वोत्तम गुणधर्म असलेल्या जाती शोधणे, त्यांच्यात संकर घडवून आणणे आणि त्यांचा अभ्यास करून योग्य ते गुणधर्म असलेली भारताच्या भौगोलिक परिस्थितीत टिकून राहील अशी जात शोधून काढणे हे कर्मकठीण काम होते. सुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि IR8 नावाची जात जन्माला आली. या जातीपासून खत न घालता हेक्टरी पाच टन आणि योग्य खतपाणी घालून हेक्टरी जवळपास दहा टन पीक मिळू लागले. त्याकाळी सर्वसाधारणपणे हेक्टरी एक टन मिळत असे हे लक्षात घेतले, तर उत्पादन जवळपास दहापट करण्याची शक्यता निर्माण झाली. पासष्ट सालापासून भारतात सुरू झालेला हा प्रयोग जगभर फुकटात वाटण्यात आला. आणि वीस वर्षांत जगभरचे तांदळाचे उत्पादन दुप्पट करण्यात यश मिळाले. गव्हाच्या बाबतीतही उत्पादन वीस वर्षांत दुप्पट आणि चाळीस वर्षांत चौपट झालेले आहे. त्यामुळे या काळात लोकसंख्येपेक्षा जास्त गतीने अन्न उत्पादन वाढ राखली गेली.

भाताच्या आणि गव्हाच्याही चांगले पीक देणाऱ्या जाती या उंच असत. त्यामुळे लोंब्यांमध्ये दाण्यांचे वजन वाढले की ते पेलेनासे होऊन त्या मान टाकत. हे टाळण्यासाठी बुटक्या जातीची, पण भरपूर पीक देणारी जात हवी होती. हा बुटकेपणाचा जीन (मराठीत जनुक) इतर जातींत होता. ते वेगळे काढून या जातीत घालणे हे सोपे नव्हते. आज जनुकीय तंत्रज्ञान इतके पुढारलेले आहे की विशिष्ट जनुके ओळखून ती दुसऱ्या जातीत 'बसवणं' शक्य झालेले आहे. पण त्याकाळी संकर करत राहात, ट्रायल अॅंड एररने नवीन जमाती शोधणे भाग होते. IR8 च्या शोधाची आणि आत्तापर्यंत कधीही न जन्माला आलेल्या जातीच्या १३० दाण्यांपासून पुढे अब्जावधी लोकांचे जीव वाचतील इतके खाद्य तयार कसे झाले याची स्वतंत्र चित्तरकथा आहे. ती आपण पुढच्या भागात पाहू.

या सगळ्या जीवनमरणाच्या नाट्यामध्ये आपल्याला सिद्धांतांचा लढा दिसतो. माल्थसच्या सिद्धांताने उत्क्रांतीच्या सिद्धांताला जन्म दिला होता. आता जुना सिद्धांत आपले सत्य मनुष्यजमातीवर लादणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातून जो अनर्थ माजला असता त्यातून सर्वच ज्ञान नष्ट होण्याची शक्यता होती. पण तसे झाले नाही. उत्क्रांतीचाच चुलतभाऊ असलेले जनुकशास्त्र माल्थसच्या विरुद्ध उभे राहिले. निष्ठूर, कठोर बापाच्या पोटी ज्ञानी मुलगा जन्माला यावा - त्याने व त्याच्या तितक्याच हुशार पण कर्तबगार, दयाळू चुलतभावाने आपल्या चुलत्याचा नाश करावा तसा माल्थसच्या सिद्धांताचा पराभव केला. कृष्ण आणि बलरामांनी मिळून कंसाचा नाश केला तसा काहीसा. या सैद्धांतिक लढाईला दुसऱ्या सैद्धांतिक लढाईचीही पार्श्वभूमी आहे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला रशियात कम्युनिस्ट क्रांती झाली. चीनमध्येही १९४९ साली कम्युनिझम पसरला. आणि इतर भांडवलशाही राष्ट्रांना, विशेषतः या वाढत्या प्रसाराची काळजी वाटायला लागली. अशिक्षित, गरीब, उपाशी शेतकरी समाज हा क्रांती करण्यासाठी सहज तयार होतो. त्यामुळे भारत, फिलिपाईन्स वगैरे देशांमध्ये भुकेकंगाल लोकांनी क्रांतीचा मार्ग चोखाळण्याआधीच त्यांची उपासमार कमी होण्यासाठी, व उत्पादन वाढवण्यासाठी अमेरिकन सरकार व फोर्ड फाउंडेशन, रॉकफेलर फाउंडेशन यांसारख्या संस्था कार्यरत होत्या. कारण कम्युनिझम व माल्थस एकत्र आल्याने भांडवलशाहीचा माल्थस शत्रू झाला होता. या सर्व सिद्धांतांनी मिळून माल्थसचा जो गेली साठेक वर्षे पराभव चालू ठेवला आहे, त्यामुळे आज मानवजातीची लोकसंख्या माल्थसच्या काळी होती त्यापेक्षा सातपट होऊनही अन्नान्न दशा तर जावोच, पण अधिक लोकांना पोटभर खायला मिळायला लागलेले आहे.

(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

field_vote: 
0
No votes yet