Skip to main content

शाकाहारवाद्यांची असत्ये आणि मांसाहाराचे सत्य

इतरांनी काय करावं, कसं वागावं हे सांगण्याची माणसांना फार हौस असते. यात आपल्याला ज्याचा चांगला अनुभव आला आणि फायदा झाला ते इतरांना सांगावं असा सद्भाव मनात असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर काही सांगावं हे ठीकच म्हणायचं. पण ते सांगतानाही आपला अनुभव तर्कसंगत होता का, जो फायदा झाला त्यातील कार्यकारण भावाची सत्यता खरीच आहे कां, हे मुद्दे महत्त्वाचे असतातच. ते तपासून मगच ती माहिती इतरांना देणे हा झाला ज्ञानप्रसार. सत्यता न पडताळता एखाद्या गोष्टीचा श्रध्दात्मक आग्रह धरून सांगत रहाणे म्हणजे अंधश्रध्देचाच प्रसार.
धार्मिक-अध्यात्मिक कल्पनांच्या विश्वात असे अनेकदा चालतेच. प्रश्न येतो जेव्हा रोजचे आवश्यक व्यवहार, निसर्गाचे व्यवहार या क्षेत्रात असल्या अंधविश्वासांतून स्फुरलेल्या कल्पना थयथयाट करू लागतात तेव्हा. आज हा थयथयाट माणसाच्या आहाराबाबतही होऊ लागला आहे.
माणसाने काय खावे, कसे खावे, कां खावे याचा विचार मानवी नागर-अनागर संस्कृतींच्या प्रत्येक टप्प्यावर होत गेला. जे उपलब्ध आहे, जसे हवामान आहे, जशी प्रकृती आहे त्यानुसार विविध प्रदेशांतल्या विविध लोकांनी आहाराच्या पध्दती ठरवल्या. अन्नग्रहणाचे सामाजिक, कौटुंबिक संकेत, रीती ठरवल्या. आज जग जवळ आल्यानंतर एकमेकांच्या आहारपध्दतीही थोड्याबहुत स्वीकारल्या गेल्या. अन्नघटकांत अनेक प्रकारची धान्ये, कडधान्ये, फळेमुळे, पानेफुले असा शाकाहार, मत्स्याहार, मांसाहार, दही-दूध-लोणी-तूप-छेना-चीक असा प्राणिज आहार अशा वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश होत गेला.
जगातील कुठल्याही धर्मात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा असे सांगण्यात आलेले नव्हते. प्रत्येक धर्मात काही अन्नपदार्थ वर्ज्य आहेत. काही विशिष्ट काळासाठी काही आहार्य वस्तू वर्ज्य आहेत. हिंदू धर्मातील एक पंथ- School of thought म्हणून सुरू झालेल्या जैन धर्मात मात्र अशाक आहार पूर्णतः वर्ज्य मानण्यात आला आहे. आणि त्यातील कट्टरभाव वाढत आहे.
पण आजकाल जगभरातच सर्वत्र, मूळ धर्मांचा भेदाभेद न रहाता शुध्द शाकाहारी बनण्या-बनवण्याचा थोडी कट्टरतेची झांक असलेला आधुनिक विचार बळावण्याचे प्रयत्न होत आहेत. मांसाहाराविरुध्द धर्मयुध्द पुकारल्यासारखी प्रचारकी भाषा वापरली जाते आहे. मानवी करुणाबुध्दीला भावुक आवाहन केले जाते आहे. भावुकतेच्या आहारी जाऊन अनेक मांसाहारी लोक नाहक अपराधी भावनेने ग्रस्त होत आहेत.
व्यक्तिगत आवडनिवड म्हणून कुणी शाकाहारी रहायचे ठरवले तर तो मुद्दा मान्यच करता येईल. अशा व्यक्ती कुणी मांसाहार करण्याचा आग्रहच केला तर नम्रपणे मला आवडत नाही, चालत नाही अशी उत्तरे देऊन मांसाहार टाळतात. क्वचित थोडी चव घेऊन आवडलं नाही म्हणून बाजूस सारतात. अशा उदाहरणांचा सन्मान वैयक्तिक आवड म्हणून राखलाच पाहिजे.
हिंदू धर्मात ब्राह्मण्याचे पावित्र्य जपण्याच्या काही निकषांमध्ये अशाक आहाराला अभक्ष्य ठरवण्यात आले असले तरीही आधुनिक जगात पाऊल ठेवलेले जन्मजातीने ब्राह्मण असलेले अनेक लोक हे निकष मानत नाहीत. मांस-मासे-अंडी अभक्ष्य मानत नाहीत.
ब्राह्मण्याचे निकष बदललेल्या जगात तर्कसंगत विचार करून त्यानुसार आहार बदललेली तिसरी पिढी तरी भारतात आहेच.
परंतु त्याचवेळ शाकाहारासंबंधी आग्रही प्रतिपादनाला आता एखाद्या आक्रमक धर्मपंथाची कळा येऊ लागली आहे. जैन धर्मीय तर त्यात आहेतच, पण भारतीय परिघाबाहेर, जागतिक स्तरावरही शाकाहाराचा प्रचार करणाऱ्या गटांनी अनेक अवास्तव मुद्दे उपस्थित केले आहेत. त्या मुद्द्यांचा कठोर प्रतिवाद करण्याची गरज आहे. कारण या वादामुळे मानवजातीचे विभाजन आणखी एका अंगाने होऊ लागले आहे., एवढेच नव्हे तर मानवी प्रगतीचा एकुणात अधिक्षेप करणाऱ्या एका अविचारालाही या मंडळींच्या आक्रस्ताळेपणामुळे जोर येतो. जगातील अनेक माणसे, लहान मुले एका श्रेष्ठ प्रथिनयुक्त आहाराला मुकतात, आरोग्य समस्यांच्या विळख्यात नाहक अडकतात.
फार खोलात जाऊन विचार न करणाऱ्या लोकांची दिशाभूल बाबा, बुवा फेथहीलर्स कशा प्रकारे विज्ञानाच्या परिभाषेचा दुरुपयोग करून करतात हे तर सहजच पाहायला मिळते. हा सारा खेळ प्रसिध्दी आणि पैशाचा असतो. यांच्या जोडीला इतरही अनेकांचे पडाव पडले आहे. ज्यांनाज्यांना आपले काही विशिष्ट दुकान चालवायचे आहे, प्रस्थापित सत्यांना विरोध दर्शवून आपले ठाणे प्रस्थापित करायचे आहे अशा जगभरातील विविध गटांत कोणकोण आहेत? यात आहेत पृथ्वीच्या रक्षणाचे काही ठेकेदार, प्राणिप्रेमाचे ठेकेदार, पर्यायी आरोग्य नीती, पर्यायी विकासनीती, रिव्हर्स एंजिनिअरिंगची भाषा बोलणारे आधुनिक महंत- अशा अनेकांची मांदियाळी त्यात पाहायला मिळते. या सर्वांचीच दुकाने भोळसट बहुसंख्येमुळे आणि या बहुसंख्येच्या बहुत्वाला भिऊन असलेल्या सत्तेच्या दुकानदारांमुळे तशी तेजीत चालतात. सर्वांचेच ध्येय पैसा असते असेही नाही. कुणाला प्रसिध्दीचे वलय हवे असते, कुणाला काटेरी मुकुट... जसे ध्येय तसा मोबदला बरोबर मिळतो. पैसा हवा असेल त्यांना फंड्स आणि काटेरी मुकुटाच्या प्रेमात असलेल्यांना पारितोषिके. कधीकधीतरी दोन्हीही मिळतात. सभा-संमेलने, प्रकाशने, बिझनेस कम्-प्लेज्झर-ज्यादा अशा परिषदा हे एक पैसा मिळवण्याचे शूचिर्भूत साधन या गटांना चांगलेच अवगत झाले आहे.
असल्या गटांमधलाच एक अत्याधिक बोंबाबोंब गट आहे शाकाहारवाद्यांचा. हे बोलके शाकाहारवादी कोणत्या प्रकारची विज्ञान परिभाषा वापरतात आणि दिशाभूल कशी केली जाते हे पाहाण्यासारखे आहे.
माणसाची शरीररचना मांसाहार करण्यासाठी योग्य नाही, माणसाची पचनसंस्था, दातांची रचना हे मांसाहाराच्या दृष्टीने निर्माण झालेले नाही हा त्यांचा सर्वात लाडका युक्तीवाद. शरीररचनेचा वैज्ञानिक विचार केल्याचे वरकरणी दर्शवून चालवलेले हे एक चकचकीत खोटे नाणे आहे.
शरीरशास्त्राची वैज्ञानिक माहिती असलेला कोणताही तज्ज्ञ असे विधान करणार नाही. तर्कनिष्ठा गहाण पाडणाऱ्या एखाद्या प्रणालीच्या पगड्याखाली असलेली माणसेच असली विधाने करतात. अनिमल लिबरेशन फ्रंट नावाच्या एका दुकानाचे घोषवाक्यच आहे की ‘वी आर नॉट बॉर्न टु ईट मीट’. आपण मांस खाण्यासाठी जन्मलेलो नाही. बऱ्याच शाकाहारवादी माणसांचे म्हणणे असते की मांस हे आपले स्वाभाविक, निसर्गसंमत अन्नच नाही.
निसर्गसंमत म्हणजे काय? मानवाला इतर जीवांपेक्षा वेगळी बुध्दी निसर्गतःच मिळाली. एकाच खाद्य वस्तूवर विविध संस्कार करून ती खाण्यायोग्य करण्याची बुध्दी माणसाकडेच आहे. आणि त्या निसर्गदत्त बुध्दीचाच वापर करून मानवजात तगून राहिली. जे काही दात, दाढा, सुळे निसर्गतः मिळाल्या त्यांचे आताचे स्वरूप हे त्यांच्या वापरामुळे उत्क्रांत होत आले आहे. माणूस आपल्या भंवतालातील प्रत्येक निसर्गदत्त सजीव वस्तूमध्ये परिवर्तन-संस्कार करून ती खाऊ, पचवू शकतो. उष्ण कटिबंधातील मामसे अनेक शाक-अशाक वस्तू जल, अग्नी, शस्त्रसंस्कार, विविध रसांचा- तिखट, खारट, आंबट, गोड, प्रसंगी कडू, तुरट चवींचा वापर करून खातात. मांस, मांसे, अंडी वगैरेंप्रमाणेच धान्ये कडधान्ये, भाज्या, फळे मुळे. फुले खातानाही त्यांवर काही संस्कार करूनच खावे लागते. निवडणे, सोलणे, धुणे, बिजवणे, चिरणे, कुटणे, शिजवणे, तळणे, भाजणे हे संस्कार या सर्व शाक-अशाक द्रव्यांवर करावेच लागतात. शीत कटिबंधांतील माणसं कमी-जास्त प्रमाणात तेच संस्कार करतात. अतीशीत प्रदेशांतील एस्किमो आदि जमातींतील माणसे बर्फाळ हवेशी टक्कर देत जगताना कच्चे मांस, कच्ची चरबीही खाऊन त्यातून निर्माण होणारी ऊर्जा वापरतात.
दुसरे असे की माणसाची आतडी साधारण शुध्द शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा कमी लांब असतात. पूर्णपणे मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा थोडी अधिक लांब असतात. पूर्ण शाकाहारी प्राण्यांच्या शरीरात असतात तशी तीन-चार जठरांची रचना माणसांत नसते. रवंथ करण्यासाठी योग्य अशी रचनाही माणसाच्या अन्नपचनसंस्थेत नसते. माणूस हा शाका तसेच मांस असे दोन्ही प्रकारांतले अन्न घेऊ शकतो., ( तरीही “चार जठरं” ही रचना सर्वच शाकाहारी प्राण्याना असतेच असं नाही. पण इतर अवयव तत्सदृश कार्यासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ अपेंडिक्स – काही शाकाहारी प्राण्यांमध्ये वनस्पतीज सेल्युलोजच्या पचनासाठी लांब अपेंडिक्स असतात, ज्यात जीवाणूंद्वारे सेल्युलोजचे पचन होते. मानवांमध्ये फक्त मोठ्या आतड्यात हे कार्य काही प्रमाणात होते.)
दातांच्या उत्क्रांतीवर एक नजर टाकल्यास लक्षात येईल की मानवाची दंतरचना सुद्धा शाक-अशाक दोन्ही प्रकारच्या अन्नासाठी उपयुक्त आहे. शिवाय भाषा/धर्म इत्यादीच्या कल्पना पूर्णत्वास जाण्याआधी सुद्धा मनुष्यप्राणी शिकारी आणि अन्न गोळा करणारा होता – ह्यामध्ये मांसासाठी शिकार करणे एआणि वनस्पतिज अन्न ‘गोळा’ करणे हेच अध्याहृत आहे.
अशाक आहार घेणे किंवा मांसाहार करणे याचा अर्थ कुणीही शुध्द अशाक आहार घेत नाही. शाकायुक्त आहारातच प्राणिज पदार्थांची किंवा पशुपक्ष्यांचे मांस, जलचर, उभयचर यांचे मांस यांची जोड दिलेली असते. भात, भाकरी, पोळी, पाव, भाज्या, उसळी, कोशिंबिरी यांच्या जोडीला मांसाहार घेतला जातो. छान मजेत पचवतो माणूस सगळं. दातांनी, सुळ्यांनी तोडतो, किंबहुना सुळे हे मांस तोडून काढण्यासाठीच उत्क्रांत झाले आहेत! आपल्या मानवेतर पूर्वजांमध्ये सुळे बऱ्याचदा मोठाले होते असे दिसून आले आहे. तर माणूस अन्न चावतो, दाढांखाली रगडतो आणि त्याचं जठर, आतडी आणि इतर सहाय्यक इंद्रिये आपापले पचवण्याचे काम यथास्थित करीत असतात.
संस्कृतींच्या युगप्रवासात पाककला प्रगत झाली याला कारण होती माणसाची निसर्गदत्त बुध्दी, निसर्गदत्त शरीररचना-म्हणजे पचनसंस्था आणि काय आवडतंय, काय नावडतंय हे कळवणारी रसना. शरीराला काय अहिताचं आहे हे कळवण्यासाठी आजारी पडणारं शरीर आणि त्यापासून बोध घेऊन आहारात बदल करण्यास सुचवणारी अक्कल हे सारं निसर्गदत्तच होतं. मग ते निसर्गसंमत नसण्याचा प्रश्नच कुठे येतो.
दुसरा मुद्दा पुढे केला जातो तो क्रौर्याचा. तर्कनिष्ठेला, अनुभवसिध्द ज्ञानाला खुंटीला टांगून केवळ आपलीच भावना श्रेष्ठ मानणारांनी अशाक आहार घेणारांना क्रूर ठरवून स्वतःच्या माथ्यावर संवेदनशीलतेचा किरिट ठोकून बसवला तरीही असले खुळचट मत मनावर घेण्याची गरज नाही.
अनेक लोक आपण संवेदनशील, भावनाप्रधान असल्याचा उपयोग शस्त्रासारखा करतात. आपल्यासारखे नसलेले इतर लोक खालच्या प्रतीचे आहेत हे दाखवण्यासाठी, नैतिकदृष्ट्या आपण श्रेष्ठ आहोत म्हणून आपल्या मताला प्राधान्याने सर्वसंमती मिळालीच पाहिजे हे ठसवण्यासाठी या भावनाप्रधानतेचा वापर होत असतो. पण बुध्दीनिष्ठ परिशीलनातून स्पष्ट झालेले सत्य कळले तर असल्या भावनाप्रधान श्रध्दांना आदर देण्याची गरज उरत नाही. किंबहुना असल्या उद्योगांना सज्जनता म्हणून थोडाही आदर दाखवल्यास त्यांच्या शस्त्रांना धार चढते. काही काळानंतर त्यातूनच भावना दुखावण्याचे राजकारण सुरू होते.
अशाक आहार म्हणजे जीवहत्या, मांसाहार म्हणजे क्रौर्य असे मानण्याच्या भ्रामक समजुतीवर या भावनांचा डोलारा आधारित आहे. शाका म्हणजे सजीव नाहीत असे मानणे हे मध्ययुगातील अडाणी माणसाचे मत असू शकते.
खरे तर धान्य खाणे म्हणजे भ्रूणहत्याच. जीवनशक्ती निद्रिस्त असलेल्या भ्रूणासारख्या बिया दोन दगडांत भरडल्या दळल्या जातात, उकळत्या पाण्यात रटरटताना, गरम कढईत पडताना त्यांच्या वेदनां ध्वनी उमटत नाही म्हणून त्यांना वेदनाच होत नाहीत असे गृहीत धरणे सोयिस्कर पडते एवढेच. ऊब मिळते आहे, पाण्याचा ओलावा जाणवतो आहे अशा जाणीवेने गहू, कडधान्ये अंकुरायला लागतात, वाढण्याचे स्वप्न त्या बीजांना पडू लागते. त्यांची जीजिविषा अशी जागवून त्यांना फोडणीत परतून खाणे ही क्रूर जीवहत्या नाही? कोवळी रोपे उपटून त्यांची पाने चिरणे, फळ जून झालेले नसताना अगदी कोवळेच पाहून चिरणे ही काय क्रूरता नाही? या सर्व निर्विवादपणे जीवहत्याच आहेत. आणि शुध्द शाकाहारी म्हणवून घेणाऱ्या माणसांना त्या करणं भाग आहे. कारण अजूनही माणूस दगडमातीसारखे निर्जीव पदार्थ, रसायने, धातू खाऊन जिवंत रहाण्याइतका प्रगत झालेला नाही. भावनांचेच भांडवल करायचे तर मग या जीवहत्यांचाही विचार जरूर करावा (आणि मग प्रायोपवेशन-संथारा वगैरे करून आत्महनन करून मोकळे व्हावे. मोक्षच. कसे?)
निसर्गचक्र चालताना त्यात ज्या प्रमाणात साहचर्य आहे, तितक्याच प्रमाणात क्रौर्यही आहे. अर्थात साहचर्य, क्रौर्य ही विशेषणे माणसाने दिलेली आहेत. खरे तर तो एक अटळ असा सृष्टीक्रम आहे. प्रत्येक जीव त्याच्यात्याच्या गुणसूत्रांनुसार, जनुकांनुसार जगतो. त्यात नैतिकतेच्या तत्वांचा प्रश्न नसतो. जगणे हीच एक नैतिकता असते. अन्नाच्या बाबतीत माणूसही याच नैतिकतेचे तत्व पाळत आला आहे.
स्वग्रहसंवर्धनाच्या नव्या जाणीवांमुळे आपण जीववैविध्य नष्ट होऊ नये म्हणून खाद्य जीव, अखाद्य जीव असा फरक करू लागलो आहोत. यात पशुपक्ष्यांच्या जोडीने वनस्पतीही येऊ शकतात. मांसाहार प्रिय असलेल्या व्यक्ती दुर्मिळ झालेल्या जीवांची शिकार करून खातात असेही नाही. असला आततायीपणा करणाऱ्या व्यक्तींचे वर्गीकरण शाकाहारी किंवा मांसाहारी असे न होता निर्बुध्द, लोभी, लालची एवढेच करता येईल. शाकाहारी तसेच मांसाहारी असलेल्या अनेक व्यक्ती दुर्मिळ जीवसृष्टीच्या अवयवांच्या काळ्या बाजारात तसेच अनेक काळ्या व्यवहारांतही असतात. तेव्हा काहीच फरक होत नाही. त्याच बरोबर आस्थेने आपला परिसर, आपली सृष्टी, आपला समाज निरोगी रहावा म्हणून तळमळीने काम करणारांत शाकाहारी नि मांसाहारी दोन्ही आवडीनिवडींची माणसे असतात. सुष्टत्वाचे आणि दुष्टत्वाचे नमुने कोण काय आहार घेतो यावरही अवलंबून नसतात. शाकाहार म्हणजे सात्विक आहार आणि मांसाहार म्हणजे तामसी आहार असा एक लोकप्रिय गैरसमज आहे. ही आयुर्वेदिक संकल्पना आहे आणि ती आधुनिक विज्ञानाच्या कसोटीस उतरत नाही.
वनस्पतींची जीवहत्या सात्विक आणि प्राणीजीवहत्या तामसी हा एक लटका भेद नाहकच करून ठेवला आहे.
पशुपक्ष्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा जीवनरस म्हणजे रक्त आपल्याच रक्ताच्या रंगाचे असल्यामुळे कींव वाटणे किंवा घृणा वाटणे या दोन भावना उचल खाण्याचे प्रमाण जास्त असते. भाजी कापल्यावर, फळे चिरल्यावर वाहणारा वनस्पतींचा जीवनरस अशी भावना चेतवत नाही याचे कारण जीव म्हणून त्यांचे आपल्याशी गुणसाधर्म्य नसते. एका पूर्ण वेगळ्या प्रकारातील सजीवांची संज्ञा जाणून घेण्याची आपली कुवत नसते. शिवाय पावित्र्यासंबंधी आंधळे गैरसमज असल्याने स्त्रीचे पाळीचे रक्तही अपवित्र मानणाऱ्या समाजात- मांसाहारी व्यक्तींमध्ये अनेकदा हकनाक न्यूनगंड किंवा अपराधी भावना निर्माण झालेली पाहायला मिळते. संभ्रम निर्माण होतो. असल्या संभ्रमित दुबळेपणाचा फायदा भोंदूबुवा-स्वामी-बापू घेतात तसेच प्रचारकी शाकाहारवादीही घेतात.
शाकाहारवाद्यांचा क्रौर्यासंबंधीचा हा प्राथमिक खुळचटपणा निकाली काढायला फारसा त्रास पडत नाही. प्रश्न येतो, जेव्हा ते अशाक आहारातील पोषक द्रव्यांचा अभाव, अपद्रव्ये वगैरे संदर्भात बोलू लागतात, आणि शाकाहारातील पोषक द्रव्यांची(च) श्रेष्ठता पटवून देऊ लागतात तेव्हा.
शाकाहाराच्या प्रचाराचे व्रत घेतलेल्या संस्था आजकाल सॅच्युरेटेड फॅट्स, पॉलिअनसॅच्युरेटेड, कोलेस्टेरॉल, ओमेगा ६, ओमेगा३, अँटिऑक्सिड्ट्स या अन्नघटकांसंबंधीने मांसाहारासंदर्भात बेधडक विधाने करत असतात. आरोग्य हा त्यांचा आणखी एक लाडका मुद्दा. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, आतड्यांचे विकार, कर्करोग अशा अनेक रोगांना सामोऱ्या जाणाऱ्या लोकांना आधीच धसका बसलेला असतो. त्यात अशी दणकावून केलेली, आकडेफेक विधाने ऐकल्यावर अपेक्षित परिणाम त्यांच्यावर होतोच. शुध्द शाकाहारी लोकांचे आयुर्मान मांसाहार घेणाऱ्या लोकांपेक्षा किमान नऊ वर्षांनीतरी अधिक असते असा एकजात खोटा प्रचार केला जातो.
मेरीलॅण्ड विद्यापीठातील पेडिएट्रिक्स, मेडिसीन आणि फिझिऑलजीचे प्राध्यापक डॉ. अॅलिसिओ फॅसॅनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले संशोधन सायंटिफिक अमेरिकनच्या ऑगस्ट २००९च्या अंकामध्ये प्रसिध्द झाले आहे. शेतीची कला अवगत झाल्यानंतर माणसाचा फळे, मुळे, पशुपक्ष्यांचे मांस हा प्राथमिक आहार बदलला. हे अन्न शोधण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबली. एका ठिकाणी राहून निश्चिंतपणे अन्न मिळवण्याचे शेतीतंत्र अवगत होताच धान्यबियांचे आहारातील प्रमाण वाढले. त्यानंतरच माणसाला गहू, बार्ली, राय या धान्यांतील ग्लुटेन या प्रथिनामुळे त्यापूर्वी होत नसलेले आतड्याचे विकार होऊ लागले असे त्यांचे निरीक्षण आहे. आतड्यांच्या विकारांनी जगातील खूप मोठी लोकसंख्या त्रस्त आहे. ग्लुटेनयुक्त आहार कमी करावा असे सुचवताना ग्लुटेनच्या दुष्परिणामांवर उत्तर शोधण्यासाठी त्यांचे पुढील संशोधन सुरू आहे. ही सारी शाकाहारात मोडणारीच धान्ये असूनही त्यांचे दुष्परिणाम आहेत, म्हणून काही कुणी गहू खायचं सोडून देणार नाही. शिजवण्याच्या सर्वोत्तम पध्दती कोणत्या ते शोधायच्या कामाला माणूस लागेल. त्यातील दोष कसे कमी करावेत ते शोधण्यासाठी अनेकांची बुध्दी कामाला लागेल.
माणसाने विकसित केलेल्या किंवा वापरात आणलेल्या अनेक आहारद्रव्यांमध्ये, अन्नसंस्कारंमध्ये दोषकर आणि दोषशामक असे विशेष असतातच. आयुर्वेदाने तर अनेक प्रकारच्या मांसांचे, भाज्यांचे, धान्ये, फळे-मुळे यांचे व्यक्तिशः गुणावगुणवर्णन केले आहे. पथ्यकर काय, कुपथ्यकर काय याचा तपशीलवार अभ्यास करून निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत. त्याबद्दल लोकांना माहिती देण्याऐवजी एकांगी प्रचार करण्याने कुणाचे कल्याण साध्य होते? काहीजणांची स्वतःबद्दलची श्रेष्ठत्वाची भावना गोंजारली जाण्यापलिकडे यातून काहीही साध्य होत नाही.
शाकाहारी लोक अधिक निरोगी रहातात या दाव्याची शहानिश कुणी केली आहे कां? निरोगीपणाच्या कारणांचा अभ्यास करायचा तर त्यात आहाराव्यतिरिक्त कित्येक मुद्दे लक्षात घेऊन संशोधन करावे लागेल. त्यात जीवशैली, आहार-विहार, देशस्थान, हवामान, जलस्रोत, व्यसने किंवा त्यांचा अभाव, अन्नाचा दर्जा, अभाव, वैपुल्य असे कितीतरी मुद्दे- वेरिएबल्स असतील.
मांसाहार केल्याने आरोग्यास बाध येतो असे सुचवले जाते. आधीच म्हटल्याप्रमाणे, मांसाहारी लोक काही शुध्द मांसाहारी नसतात. शाकाहाराला ते मांसाहाराची जोड देतात. मांसामधून जी आठ अमायनो आम्ले मिळतात, जीवनसत्वे मिळतात, लोह, जस्त, कॅल्शियम ही द्रव्ये मिळतात ती सारी आरोग्याला मारक आहेत असा एक गैर निष्कर्ष यातून काढला जातो. इथे बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो. पार्श्वभूमी अशी : आपल्या शरीरातली प्रथिने एकूण २३ अमायनो अम्लांची बनलेली असतात. त्यापैकी काही अशी आहेत की आपला शरीर इतर अमायनो आम्लांपासून तयार करू शकतं. पण दहा आम्ले अशी आहेत की ती शरीर तयार करू शकत नाही – ती आहारातूनच घ्यावी लागतात. त्यांना essential amino acids म्हणतात. ह्यातली बहुतेक मांसाहारातून सहज उपलब्ध असतात. ही ती आठ acids असावीत. जर हीच अभिप्रेत असतील, तर ती आरोग्याला हानिकारक आहेत हा समाज निर्बुद्धपणाचाच नाही, तर धोकादायक आहे! Essential amino acids ही शाकाहारातून सुद्धा मिळू शकतात, नाही असं मुळीच नाही.
आपल्या शरीराला रोज (सरासरी) विविध amino acids वेगवेगळ्या मात्रेमध्ये आवश्यक असतात. कुठलाही अन्नपदार्थ हे सगळी अचूक प्रमाणात देऊ शकत नाही. म्हणूनच आहारात वैविध्य असणे आवश्यक आहे. ह्यामध्ये शाकाहार-मांसाहार संतुलन आणि दैनंदिन वैविध्य दोन्ही अंतर्भूत आहेत.
शाकाहार प्रवर्तकांनी काहीही म्हटलं तरी दूध हे खऱ्या अर्थाने प्राणिज अन्न आहे!
शुध्द शाकाहारामुळे आरोग्यप्राप्ती होते हे अनभ्यस्त, असत्य विधान प्रचारकी थाटाला शोभेसे आहे. आरोग्यशास्त्र आणि पोषणमूल्यांचा अभ्यास करणाऱ्या अधिकांश तज्ज्ञांनी या प्रचाराला आक्षेप घेतला आहे.
आजकाल धर्माधिष्ठित शाकाहार प्रचाराला फॅशनचीही साथ मिळाली आहे. फॅशनचे हेतू थोडे परस्परविरोधी वाटावेत असे दुहेरी असतात. एक म्हणजे चारचौघात वेगळेपणाने उठून दिसण्याची गरज वाटून फॅशन सुरू होते आणि मग एक नवा ट्रेन्ड आपणही स्वीकारला आहे, आपण काही मागासलेले नाही हे दाखवण्याची गरज वाटून फॅशन रुळते. अनेक प्रश्नांवर लोक चालू फॅशनच्या चौकटीत बसणारी मते चटकन् स्वीकारतात. असल्या फॅशनकेंद्री मनमानी मतांचा पराभव करणे सोपे नसते. कारण केवळ बुध्दीनिष्ठा ग्राह्य धरून सत्य आणि सत्यच स्वीकारण्याचे धैर्य दाखवणारे नेहमीच अल्पमतात असतात.
--------------------------
दुसरा भाग येतोय.

राही Sat, 30/01/2016 - 22:26

लेख आवडला. ह्यातली अनेक सत्ये, तथ्ये आणि मिथ्ये अनेकांना माहीत असतात. पण निव्वळ आपल्या मताची हार (कारण त्यात अजेंडा असतो.) सहन होत नसते म्हणून त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते. अजेंडा महत्त्वाचा. तथ्ये आणि आरोग्य गेले खड्ड्यात. आरोग्याची काळजी मुळात नसतेच. ते आरोग्य तुम्ही अमक्याच (आमच्याच) पद्धतीने मिळवले पाहिजे हा अट्टाहास असतो. इतरांची जीवनपद्धती आपल्या हातातल्या रिमोट कंट्रोलने नियंत्रित करू पाहाण्याचा हा प्रकार म्हणजे एक प्रकारे सत्ता गाजवण्याची हौस किंवा सोस म्हणावा लागेल.

adam Sun, 31/01/2016 - 21:38

हो, हो. अहो, तुम्ही आधी जरा शांत व्हा पाहू.
मुद्दे बरोबर पकडलेत आपण.
.
ह्यासंबंधीची माझ्याकडची शिदोरी :-
http://www.aisiakshare.com/node/3267
.
.
.
http://www.misalpav.com/node/1740
.
.
वरील दोन्ही केसमध्ये धागाकर्ता मीच, एकूणात कंटेंट सारखच, पण चर्चा चांगली झालेली आहे.
पहा वाचून.
.
.
शिवाय http://aisiakshare.com/node/3264 हा अलिकडच्या काळातला धागा पहावा.
.
.
ह्या सर्वच धाग्यांतले काही मुद्दे तुम्ही म्हणता तसे प्रचारकी थाटातले वाटूही शकतात.
(नेमक्या तुम्ही कशावर चिडलात त्याची एक सॅम्पल केस म्हणून ह्याकडे पाहता यावं ;) )
आणि काही नवीनही आहेत. पहा बुवा.
.
.
बाकी आहाराबद्दल वगैरे माझी काहिच मतं नसतात. किंबहुना बहुतांश गोश्टींबद्दल काहीच मतं नसतात.

अरविंद कोल्हटकर Fri, 05/02/2016 - 01:38

द्विशतकाकडे वाटचाल करू लागलेला हा दोन धाग्यांचा संच म्हणजे 'नव्या बाटलीत जुनी दारू' अशा प्रकारचा वाटतो. नव्याने येऊ घातलेल्या धर्माच्या प्रसारकाने आक्रमक शब्दात 'आपला धर्म कसा अधिक चांगला' हे व्यासपीठावरून मांडावे अशी भाषाशैली येथे दिसते. त्याला प्रासंगिक निमित्त जैन धर्मियांच्या अलीकडील 'काही विशिष्ट दिवशी सर्वांनी अहिंसा पाळावी' अशा आक्रमक आवाहनातून मिळालेले दिसते. १९व्या शतकात चौपाटीच्या मैदानावर विल्सन, मरे मिचेल सारखे मिशनरी 'हिंदू धर्मात काय चूक आहे' अशी भाषणे देत असत आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याच आक्रमकतेने त्याला उत्तरे देत असत त्याचा भास होतो. "कौरवपांडव संगर तांडव द्वापर-कालीं होय अती | तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती॥ ह्या गोविंदाग्रजांच्या ओळींची किंवा "ततः शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः । सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत्‌॥ ह्या गीतेतल्या श्लोकाची आठवण व्हावी असे तुंबळ युद्ध येथे चालू आहे.

मुळात मांसाहारधर्माचा इतका आक्रमक प्रसार करावयास लागावे इतका मांसाहारधर्म धोक्यात आहे का? मांसाहार करणारे तो करत राहणार, शाकाहारीहि आपल्या आहाराला चिकटून राहणार, दोघेहि एकमेकास शिव्या घालणार हा जुनाच प्रकार आहे. त्यामुळे कोणाचेहि काहीहि बिघडलेले नाही आणि आपापल्या अन्नपद्धतीहि कोणी सोडलेल्या नाहीत. तेव्हा मांसाहारधर्माचे इतक्या हिरीरीने समर्थन आत्ताच व्हावे असे काय घडले आहे असा प्रश्न मला पडलेला आहे. जैन धर्मियांनी जी मागणी केली होती तिचे कपातले वादळ आठवड्याभरातच शमले कारण त्यात तितकाच दम होता.

(मी पूर्ण शाकाहारी वगैरे काही नाही आणि शाकाहार-मांसाहार ह्यातील कशाचाच मला धर्मतत्त्वाच्या प्रसाराच्या ईर्षेने प्रचार करावयाचा नाही. तरीपण मी कोठेतरी वाचलेली एक शाकाहाराच्या बाजूची 'शास्त्रीय' चाचणी - तशाच काही 'शास्रीय' चाचण्यांबरोबर - उल्लेखिलेली असावी म्हणून येथे नोंदवतो.

शाकाहारी प्राणी ओठाने पाणी पितात तर मांसाहारी जिभेने. गाय-म्हैस-शेळी विरुद्ध कुत्रा-मांजर-वाघ. माणूसहि ओठानेच पाणी पितो. कुत्र्यासारखे लपलप करत जिभेने नाही.)

ऋषिकेश Fri, 05/02/2016 - 09:54

In reply to by अरविंद कोल्हटकर

शाकाहारी प्राणी ओठाने पाणी पितात तर मांसाहारी जिभेने. गाय-म्हैस-शेळी विरुद्ध कुत्रा-मांजर-वाघ. माणूसहि ओठानेच पाणी पितो. कुत्र्यासारखे लपलप करत जिभेने नाही

ह ह पु वा झाली आहे! =)) आता सांख्यिकी ठरवणार काय खाणे योग्य! (एकदम हत्ती, देवमासा वगैरे सस्तन (मिश्राहारी) प्राणी जिभेने लपलप पाणी पिताना आले)
बाकी माणूस मांसाहारी आहे हा दावा नाहीच. तो मिश्राहारी आहे.

नितिन थत्ते Fri, 05/02/2016 - 09:59

In reply to by अरविंद कोल्हटकर

आपण भारतीय जसे भांडे उंचावर धरून पाणी पिऊ शकतो तसे पाश्चात्यांना येत नाही असेही ऐकले आहे.

ऋषिकेश Fri, 05/02/2016 - 10:13

In reply to by नितिन थत्ते

त्यांना पायांच्या अंगठ्याने वस्तुही (जसे फडके, पडलेला मोजा वगैरे) पटकन उचलून घेता येता नाही असेही एका ऐसीकराच्या मागल्या भारत भेटीत समजले. आपण असे करतो त्याचे त्यांना भयंकर अप्रूप वाटते. :)

नितिन थत्ते Fri, 05/02/2016 - 10:24

In reply to by ऋषिकेश

त्यावरून आपली शरीरे शाकाहारास उपयुक्त आणि त्यांची मांसाहारास उपयुक्त असतात हे सिद्ध होते. =))

नगरीनिरंजन Fri, 05/02/2016 - 15:55

In reply to by अरविंद कोल्हटकर

मांसाहारी लोकांना आमच्या सोसायटीत फ्लॅट घेऊ देणार नाही असे म्हणत असतील तरी मांसाहारधर्म धोक्यात नाही? हे म्हणजे नव्या अस्पृश्यतेकडे वाटचाल आहे.
हा लेख फार माईल्ड आहे शाकाहार्‍यांच्या विखारी प्रचारापुढे.

अतिशहाणा Fri, 05/02/2016 - 20:49

In reply to by नगरीनिरंजन

असेच म्हणतो. जैनधर्मीयांची मागणी हे कपातले वादळ नाही. पर्युषणकाळाव्यतिरिक्त इतरत्रही अशी मुस्कटदाबी होत आहे.

राही Sat, 06/02/2016 - 12:42

In reply to by नगरीनिरंजन

या बाबतीत एक किस्सा (जालावर अनेकदा लिहिलेला) सांगावासा वाटतो. मुंबईच्या उपनगरात बर्‍यापैकी सोसाय्टीत तळमजल्यावर राहाणार्‍या आमच्या एक अगदी जवळच्या नातेवाईकांच्या शेजारी घडला आहे. ह्यांचे एक शेजारी मिश्राहारी आणि दुसरे अगदी कडक शाकाहारी बिगरमराठी. या दोघांमध्ये सतत 'वासा'वरून कुरबुरी. अगदी मिश्राहार्‍यांच्या घरी पाणीही न पिण्यापर्यंत. एकदा जिन्याच्या समोर एक कुत्रं मरून पडलं. येण्याजाण्याची पंचाईत. वॉच्मनने ते उचलायला नकार दिला. म्युनिसिपालिटीवाल्यांना बोलवायचे असे ठरले. पण दरम्यानच्या काळात या क.शा.ची भयंकर घालमेल. त्यांनी काय करावे? त्यांनी दुसर्‍या(मिश्राहारी) शेजार्‍यांच्या दारावरची बेल वाजवली. दार उघडताच त्यांना म्हणाले, भयंकर वास येतोय. शेजार्‍यांनी हो म्हणून मान डोलवली. पुन्हा, 'राहाणं कठिण झालंय'. खरंच होतं ते म्हणून शेजार्‍यांनी पुन्हा मान डोलवली. क्षणभर गप्प राहून क.शा. शेजारी म्हणाले, इतका सगळ्यांना त्रास होतोय तर तुम्हीच का उचलून टाकत नाही ते? शेजारी स्तंभित. मग खुलासा आणि सांत्वनादाखल हे क.शा. म्हणाले, नाही तरी तुम्ही मांस खाता ना? मग तुम्ही ते टाकू शकता.
मुद्दा तत्त्वतः खरा. मृत देहाला हात लावायला (एरवी सवय असल्याने) किळस वाटू नये.
पुढची अवांतर गोष्ट. या क.शा.ना एक मनोरुग्ण मुलगी होती. तिला त्यांनी कायम बाल्कनीत ठेवले होते. ती विचित्र ओरडायची. ताटलीतून दिलेले अर्धवट खाल्लेले जेवण भोवती पसरलेले. बाहेरून येणार्‍याजाणार्‍याला रोज ते दृश्य दिसायचे. लोक हळहळायचे. पण औषधपाणी काहीही नाही. आमच्या नातेवाईकांनी काही प्रसिद्ध डॉक्टरांची नावे सुचवली. स्वतः घेऊन जाण्याची तयारी दाखवली. पण उत्तर मिळाले, 'एक तो इसकी शादी होनेवाली नहीं और वैसे भी लडकी है. इतना खर्चा क्यों करने का? रहने दो वैसेही. जब तक जियेगी, खाना खिलायेंगे.'!
धर्म कशामुळे बुडतो काहीच समजत नाही अशा वेळी.

प्रकाश घाटपांडे Fri, 05/02/2016 - 21:26

हा विषय आला कि मला हमखास हे उदाहरण आठवत.
सुकट वाकट बोंबिल इत्यादी च्या वासाने कुणाच्या तोंडात लाळ गळायला सुरवात होते तर त्याच वासाने कुणाची भुक मरते व मळमळायला लागत. एकाचा वासाचा काय हा महिमा.एकदा ऒफिस मधे बोंबलाच्या वासाने एका सहकार्‍याच्या तोंडातुन चक्क लाळ गळायला लागली तर मला त्या वासाने मळमळ झाली. इतर सामिष वासांचा त्रास होत नाही. पण काही वास उग्र असतात त्याबाबत काहींच डोक उठत. काहींच्या बाबत हा संवेदनशील मुद्दा असतो हे मात्र खरे.
सहभोजनात जर एखाद्याने सांगितले की तुला बोंबील आवडत नाही तर तू खाउ नको आम्ही खातो. तुला तुझे स्वातंत्र्य आहे मला माझे. तर काय होईल? मांसाहारी माणसांना शाकाहारी पदार्थांच्या वासाने मळमळत नाही असे माझे निरिक्षण आहे. पण एकाचे अन्न हे दुसर्‍याच विष बनत तेव्हा सहजीवनात अडचणी निर्माण होतात. त्यामुळेविशेषत: आंतरजातीय विवाहाच्या वेळी प्रश्न निर्माण होतात.

साती Fri, 05/02/2016 - 21:42

In reply to by प्रकाश घाटपांडे

बाजुला बसून नुसते कोणी शेपू निवडत असेल तरी त्या वासाने मला मळमळतं!
दूधाला आलेली उकळी, तूपाचा कढवतानाचा वास, पुरणपोळ्या भाजतानाचा वास येताच मला मायग्रेन होते.

आणि असे बरेच वास आहेत.
इकडे चिंच /लसूण घालून एक भयानक आमटी करतात , जेवताना बाजूला बसून कुणी ते जेवू लागल तरी माझं डोकं दुखतं.

पूर्वी थोडं स्ट्राँग बोर्नव्हिटा असायचं ते दूधात घालून ढवळताना मलाच ढवळायचं. हल्ली थोडं माईल्ड बोर्नव्हिटा आल्यापासून बरं वाटतं.

.शुचि. Fri, 05/02/2016 - 21:45

In reply to by साती

मुळ्याचाही वास किती उग्र असतो.
.
पुरणाच्या वासने माझंही डोकं ऊठतं.
.
बोर्नव्हिटा तर इइइइक्स!!!
.
मात्र तूप कढताना आहाहा!!! मस्त वास येतो. आवडतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/02/2016 - 22:25

In reply to by .शुचि.

मला साखर पाण्यात उकळण्याच्या वासाने कसंतरी होतं. तशीच बाब मसालेदार पदार्थांची; हे वास फार मर्यादित प्रमाणात मेणबत्त्यांमध्ये आलेले चालतात. पण या वासांचा अन्न म्हणून मी विचार नाही करू शकत.

प्रकाश घाटपांडे Sat, 06/02/2016 - 14:33

In reply to by .शुचि.

ठीक आहे. शाकाहारी पदार्थांचे वास देखील त्रासदायक असतात हे मान्य. परंतु ते पदार्थ तेच शाकाहारी व मांसाहारी लोक खातात. कट्टर शाकाहारी मांसाहारी पदार्थ खातच नाही. परंतु मांसाहारी लोक शाकाहारी पदार्थ खाउ शकतात.
लोणी कढवण्याचा वास मलाही घाणच वाटतो परंतु त्याचे तुप झाल्यावर मग तोच वास सुंदर होतो.

मंदार कात्रे Fri, 05/02/2016 - 22:54

https://www.youtube.com/watch?v=jqxENMKaeCU

नुसता मान्साहार नव्हे तर बीफ आणि पोर्क च्या अति वापराचा जगाच्या पर्यावरणावर अन निसर्गावर किती भयानक परिणाम होत आहे , ते जरा महा कर्णिक मॅडम