फुसके बार – ३१ जानेवारी २०१६

फुसके बार – ३१ जानेवारी २०१६
.

१) बांगला देशाच्या निर्मितीच्याआधी भारतीय लष्कराने तेथील मुक्तिवाहिनीच्या जवानांना लष्करी प्रशिक्षण दिले होते, ही बाब काही लपून राहिलेली नाही. बांगलाभाषिक लोकांवर होणा-या भयंकर अत्याचारांमुळे पूर्व पाकिस्तानात (म्हणजे आताच्या बांगलादेशात) स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली होती, त्यामुळे बांगला लोकांची स्वातंत्र्याची चळवळ दडपली गेली तरी ती थांबणे शक्य नव्हतेच.

पाकिस्तानच्या काश्मीरमधील दहशतवादी कारवायांच्या बाबतीत मात्र भारताचे म्हणणे नेहमी असे असते की भारत पाकिस्तानमध्ये काही कारवाया करत नाही. मनमोहनसरकारच्यावेळी भारताच्या बलुचीस्तानमधील कारवायांचा पाकिस्तानने उल्लेख केला, परंतु हे प्रकरण थोडक्यावर थांबले. तरीही पाकिस्तानकडून त्याचा मधूनमधून उल्लेख होतोच.

भारताने कितीही आरडाओरडा केला तरीही पाकिस्तान त्याला भीक घालत नाही. अमेरिका वगैरे देश पाकिस्तानला दटावल्यासारखे करतात, परंतु त्यानेही काही फरक पडत नाही. तेव्हा एकीकडे पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश असल्यामुळे भारत पाकिस्तानात घुसून काही करू शकत नाही, तर दुसरीकडे पाकिस्तान आपल्याकडे जे प्रकार उघडपणे करतो, तसेच प्रकार भारत पाकिस्तानमध्ये करताना दिसत नाही.

आपले नागरिक, सुरक्षा दलांचे जवान व अधिकारी या प्रकारांना वरचेवर बळी पडत असताना कोणतीच ठोस कारवाई न करण्याच्या भारताच्या भूमिकेवे टीका होत राहते, मग ते कोणतेही सरकार असो.

तसेही पाकिस्तानकडून होणा-या दहशतवादी कारवायांबाबत भारत अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रश्न उपस्थित करत असतोच. पाकिस्तान तेथील अंतर्गत अशांततेमुळे व दहशतवादामुळे तसाही त्रस्त आहे. त्यात भारताने वर म्हटल्याप्रमाणे उघडउघड प्रयत्न चालू केले तर त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडेल.

तेव्हा बलुच व सिंधमधील स्वातंत्र्यांच्या चळवळींना उघड पाठिंबा देण्याची भूमिका भारताने घेतली तर त्यातील देशाच्या आंतरराष्ट्रीय हितसंबंधांवर कोणते परिणाम होतील? पाकिस्तानकडून अशा कारवायांवर होणारी असलेली प्रतिक्रिया कोणत्या स्वरूपाची असेल?

कठोर भूमिका घ्यायची नाही किंवा घेऊ शकत नाही आणि प्रतिमेबद्दलच्या भलत्याच मुद्द्यांवरून जवळजवळ काहीच हालचाल करायची नाही असा प्रकार अव्याहतपणे चालू असतो.

२) आपल्याकडे पुढील दोन वचनांचा वारंवार उल्लेख केलेला वाचण्यात-ऐकण्यात येतो. ‘तयाचा वेलु गेला गगनावरी’ हे संतवचन, ‘प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाने वंदन केलेली, शहाजीचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी शोभून दिसते आहे’ ही शिवाजीची राजमुद्रा. हे अर्थ शब्दश:च घ्यायला हवेत.
वेल कोठेही पोहचला, कितीही फोफावला, तरी त्याचे मूळच उखडून टाकल्यावर इतक्या उंचावर पोहोचूनही त्याचा काय उपयोग होईल, त्याचप्रमाणे वाढत जाणारी चंद्राची कोर नंतर कधीतरी अस्ताला जातच असते मग असे उल्लेख करावेतच कशाला, अशा आक्षेपांना काही अर्थ नसतो.

३) मागे सिक्कीममध्ये असताना तेथील रस्त्यांवरील सूचनाफलक पाहिले होते.
‘दौडने का इतना ही शौक है, तो पी टी उषा बनें’
‘Be smooth on my curves’
असे फलक लावायचे ठरवणारा मोठाच रसिक असला पाहिजे.

४) अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला कोणताच तगडा प्रतिस्पर्धी राहिलेला नसताना ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवणारी जर्मनीची अँजेलिक केर्बेर हिने नेत्रदीपक विजय मिळवला.

पूर्वी मार्टिना नवरातिलोवा जोशात असताना ती एखाद्या पुरूष प्रतिस्पर्ध्याला हरवू शकेल का हे पाहण्यात आले. तिने खरोखरच तसे करून दाखवलेही होते.

तसे सेरेनाच्या बाबतीत झालेले पाहण्यात आले नाही. काही जण तिच्या ‘धिप्पाडपणा’वरून तिला रणगाडा असे म्हणत तिची चेष्टा करतात. मात्र तिच्यावर तिची शरीरयष्टी तयार करण्यासाठी कोणत्याही बंदी घातलेल्या पदार्थांचा वापर केल्याचा आरोप नाही. तेव्हा तिला तिच्या पराक्रमाचे श्रेय द्यायलाच हवे. तिच्या जवळजवळ अनिर्बंध वाटणा-या विजयरथाचे कारण हेच की तिला तिच्यासारख्या दर्जाची व तिच्यासारखे सातत्य असलेली प्रतिस्पर्धीच नाही.

अशी सेरेना पूर्ण भरात असताना आपण एका चॅंपियनशी खेळत अहोत हे विसरून अँजेलिकने जिगरी खेळ केला व विजयश्री मिळवली. तिचे अभिनंदन. तिच्या रूपाने महापराक्रमी स्टेफी ग्राफच्या नंतर म्हणजे १९९९नंतर प्रथमच एका जर्मन महिला खेळाडूने अशा मोठ्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले.

५) रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणी आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांबरोबर आज लाक्षणिक उपोषणात सहभागी व्हायला आज जवळजवळ दिवसभर एक पाहूणा होता. पप्पू. विद्यार्थ्यांच्या नेत्यांपैकी काही नेते म्हणतात की आम्ही स्वत:हून राजकीय नेत्यांना आमंत्रित करत नाही, तर दुसरे काही नेते म्हणतात की त्यांच्या आमंत्रणावरूनच पप्पू तेथे आला होता. तर पप्पूने तेथे भाषणदेखील झाडले. पप्पूला रोहितचा आजचा जन्मदिवस व गांधीजींचा स्मृतीदिन यांच्यातही साम्य दिसले.

या विद्यापीठात गेल्या दहा वर्षात अनेक दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यावेळी राज्यात व केंद्रात अशा दोन्ही ठिकाणी पप्पूच्याच पक्षाची सरकारे होती. आंदोलनकारी विद्यार्थ्यांना सोयीस्करपणे याचा विसर पडलेला आहे. त्यामुळे पप्पूनेही याबद्दल चकार शब्द काढला नाही. तर असे हे राजकारणविरहीत आंदोलन छान चालले आहे.

जाहिरपणे नाही तरी खासगीत तरी पप्पू त्याच्या पक्षाचे आजवर दलितांच्या हिताशी घेणेदेणे नसण्यावरून सोनियांना याबाबत विचारत असला तरी मिळवली.

६) आज गांधीजींच्या स्मृतीदिनानिमित्त गांधी हा सिनेमा मला वाटते जवळजवळ विसाव्यांदा पाहिला. या सिनेमात डॉ. आंबेडकरांचा संदर्भ पूर्णपणे वगळण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शित होतानाही यावरून झालेली टीका माझ्या लक्षात आहे. त्यावर दिग्दर्शक अटेनबरोंचे भाष्य कधी ऐकण्यात आले नाही.

आजचा दिवस हा भाजप-संघ-ब्राह्मण या सर्वांचा वा यातील काहींचा उल्लेख करणा-यांसाठी पर्वणी असते. त्यावरून काही पोस्ट्स दिसल्याच. मात्र नथुरामची भलावण करणारी पोस्ट आज पाहण्यात आली नाही. हा सकारात्मक व स्वागतार्ह बदल म्हणावा की तसे करणा-यांची याआधीच मित्रयादीतून गच्छंती केल्याचा परिणाम असावा कल्पना नाही. गांधीजींचे कार्य एखाद्याला आवडत नसेल तर हरकत नाही, मात्र त्यांच्य हत्येचे समर्थन करणारे आपल्या कितीही जवळचे असले तरीही त्यांची स्पष्ट शब्दात कानउघाडणी करायला हवी. तरच ही प्रवृत्ती कमी व्हायला मदत होईल.

किस्त्रीमच्या दिवाळी अंकात नथुराम गोडसेबद्दल एक वेगळीच आठवण दिलेली आहे. त्याबद्दल नंतर.

७) बॅंकेत काम करणा-या एका बाईंना मधूमधून बडीशोप खाण्याची सवय होती. असे बरेच वर्षे झाल्यावर त्यांच्या पोटात फार दुखू लागले. तपासण्या केल्या तरीही नक्की कारण कळेना. त्यांना त्यांच्या खाण्याच्या सवयी विचारल्यावर त्यांचे बडीशोप वेड कळले.

उपचार काही महिने चालले. विविध पथ्यांमुळे त्या खंगल्या. वजन कमी झाले. ब-याच दिवसांनी कामावर रूजू झाल्यावर त्यांच्या सहका-यांपैकी एक जण त्यांना म्हणाला, “मॅडम, बडीशोपच्या आवडीपायी बॉडीशेप गेला की हो.’

८) पुण्याचे भूषण – एम. प्रकाश सर

आयआयटीची प्रवेशपरीक्षा व गणित ऑलिम्पियाड यांच्यासाठी मुलांची तयारी करून घेण्यासाठी पुण्यात एम. प्रकाश नावाचा शैक्षणिक क्लास आहे. इतर धंदेवाईक क्लास आणि एम. प्रकाश सरांचा क्लास यांच्यात मूलभूत फरक आहे. तुम्हाला हा अभ्यासक्रम झेपत नसेल तर तुम्ही केव्हाही क्लास सोडू शकता, उर्वरीत पैसे परत मिळतात. ते स्वत: मुलांना किती समजते आहे हे पाहण्यासाठी वर्षाखेर चाचणी घेतात. ज्या मुलांना त्यांच्या दृष्टीने हे अभ्यासक्रम झेपत नाहीत असे त्यांना वाटते, त्यांच्या पालकांना त्याबाबत सांगितले जाते. आणि मुलांचे नाव कमी केले जाते.

सरांचे मूळ नाव प्रकाश मुळगुंद आहे. ते पूर्वी फर्गसन महाविद्यालयात गणित अध्यपनाचे काम करत. मात्र बंदिस्त अभ्यासक्रमांमुळे प्राविण्याचा कस लागत नसल्याचे पाहिल्यावर त्यांनी तेथून बाहेर पडून हे क्लासेस चालू केले. त्यांच्या या ध्यासामुळे ते अविवाहित राहिलेले आहेत. अशा एम. प्रकाश सरांवर एक सुंदर डॉक्युमेंटरी केली आहे.

कमकुवत मुलांना प्रशिक्षण देणे त्या मानाने फार सोपे असते. त्यातली आव्हाने गृहित धरली तरी. मात्र हुशार व अतिहुशार मुलांना ‘शिकवू’ शकणारे फारच दुर्मिळ असतात. अशा मुलांनाही काही आव्हानात्मक वाटेल अशा स्वरुपाचे शिकवू शकणे हे त्यांचे मोठेच यश आहे.

अशा मुलांसाठी खास प्रशिक्षण देण्यासाठी ते त्यांच्याकडून एक पैसाही घेत नाहीत. ही मुले देशाने नाव मोठे करणार आहेत, मग मी त्यांच्याकडून पैसे घेणे योग्य ठरणार नाही.

एम. प्रकाश सरांमुळे भारताचे नाव गणित ऑलिंपियाडमध्ये दरवर्षी मानाने उंचावलेले रहात आहे. अर्थात ती मुलेही तेवढी हुशार असतात हे गृहित धरले तरी.

असा ध्यास घेणा-या पण शिक्षकसम्राट नसणा-या खासगी अध्यापन करणा-यांना पद्म पुरस्कार मिळण्याची सोय वा शक्यता असते का?

सदर चित्रफित येथे पाहता येईल.

https://www.youtube.com/watch?v=UFTFguJWers

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

एम प्रकाश माझे सर. Smile एकदम आवडते सर Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा. छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वारंवार सांगूनही योग्य ठिकाणी लेखन न केल्यामुळे धागा वाचनमात्र करण्यात येत आहे.


  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0