फुसके बार – ०२ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – ०२ फेब्रुवारी २०१६
.

१) आता बारावीत असलेला माझ्य मित्राचा मुलगा त्याच्या शाळेतील आठवणी सांगत होता. त्याच्या एक बाईंबद्दल सांगताना तो म्हणाला की या बाई अगदी शिवराळ. शिक्षकांना अजिबात शोभणार नाही अशी अतिशय भाषा. शिक्षाही तशाच. मारल्याचा पुरावा दिसू नये म्हणून त्या मुलांच्या हाताऐवजी ढुंगणावर पट्ट्या मारायच्या. कारण कोणाकडे तक्रार करायची झाली तरी पुरावा दाखवण्यासाठी चड्डी काढण्याची कोणाची हिंमत होणार नाही याची खात्री.

पण बाईंची दुसरी बाजू म्हणजे एक पैसा न घेता अभ्यासात कच्च्या असलेल्या वर्गातल्या मुलांना शाळेच्या वेळेनंतर शाळेतच किंवा त्यांच्या घरी बोलावून त्यांचा अभ्यास घ्यायच्या. मुलांना घरी बोलावून त्यांच्यासाठी पावभाजी वगैरे करायच्या. भाषाही अशी की या त्याच बाई आहेत का असा प्रश्न पडावा.

कशी संगती लावायची एकाच व्यक्तीच्या या दोन टोकाच्या स्वभावांची?

२) शालेय शिक्षण प्रभावी व्हावे याकरिता विविध शिक्षक जे प्रयोग करत आहेत त्याबाबतची माहिती देण्यासाठी बाळेवाडीमध्ये शिक्षण विभागामार्फत प्रदर्शन भरले आहे. प्रदर्शनाचा कालावधी वगैरे माहितीची नोंद एबीपीमाझावर ही बातमी दाखवत असताना मी करू शकलो नाही.

परंतु जी माहिती दाखवली गेली त्यात अनेक उत्तम कल्पना दिसल्या. त्यात मुलांना शास्त्रीय राग व तेही केवळ इंस्ट्रुमेंटल ऐकवायचे हा एक प्रयोग आहे. एका शिक्षकांनी व्हर्च्युअल ब्लॅकबोर्ड हा प्रकार केला आहे.तेव्हा ज्यांना याबाबत जिज्ञासा अहे त्यांनी या प्रदर्शनाबद्दल माहिती मिळवून जरूर भेट द्यावी.

३) डाएटिंग करणा-या महिलांच्या ग्रुपमध्ये त्यावरून गप्पा चालल्या होत्या. त्यात कोणत्या पद्धतीने वजन कमी केले तर ते पुन्हा वाढते वगैरे बोलणे चालले होते. त्यावर एकीने सांगितले की अशा कुठल्या पद्धतीने वजन झपाट्याने कमी होऊन तब्येत रोडावत होत असेल तर ते नको. कारण त्याने वजन कमी झाले तरी अशक्तपणा येतो. घरी येणारे गॅसचे सिलिंडर उचलण्याइतपत तरी ताकद आपल्याकडे हवी.

चांगल्या तब्येतीची ही कल्पना इंटरेस्टिंग वाटली.

४) छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना आज अखेर अटक झाली. जनतेच्या पैशावर गबर झालेल्या या भ्रष्ट रेड्यांची ही अवस्था केवळ आताच्या सरकारबदलामुळे झाली शक्य झाली आहे हे स्पष्ट आहे. अर्थात भविष्यात काय व्हायचे ते होईल.

तिकडे या सर्वांचे गुरू मात्र तिकडे अमेरिकेतील कोणत्या तरी परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यास गेले आहेत. मागे ओबामा भारतात आले असता या भ्रष्टाचा-याने महात्मा फुलेंच्या कार्याचे खरे वारस जणु आपणच आहोत असा त्यांचा समज करून दिला होता. ओबामांना त्यांचे खरे स्वरूप अजुनही कळलेले दिसत नाही, म्हणूनच कदाचित त्यांना या परिषदेसाठी निमंत्रित केलेले दिसते.

लाज-लज्जा नसते म्हणजे काय असू शकते हे आपण पहात आहोत.

५) पुण्यातील आबेदा इनामदार महाविद्यालयाचे १३ विद्यार्थी जंजि-याजवळच्या मुरूडच्या समुद्रकिना-यावर समुद्रात बुडून मरण पावले. दुपारी ही घटना झाली तरी त्यांच्या संस्थेचे पदाधिकारी पुण्यातच तळ ठोकून टीव्हीवाहिन्यांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना दिसले. काही जखमी झालेल्या विद्यार्थ्याना तिथल्या रूग्णालयामध्ये दाखल केलेले आहे. सगळी मुले जरी पुण्यात परतली तरी या पदाधिका-यांनी घटनास्थळी धावण्याची तत्परता दाखवली का, हा प्रश्न त्यामुळे पडतो.

बाकी समुद्रात उतरलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना पोहोता येत होते का, हा प्रश्न आता विचारून उपयोग नाही. मृतांमध्ये दहा मुली आहेत. हे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांचा डोळा चुकवून समुद्रात उतरले असे ऐकण्यात आले. भरतीची वेळ असल्यामुळे समुद्रात उतरू नका असे अनेक ग्रामस्थांनी मुलांना बजावले होते असेही टीव्हीवर ऐकले.

आता नेहमीप्रमाणे किना-यावर पुरेशी यांत्रणा होती का, मुलांकडे लाइफ जॅकेट्स का नव्हती वगैरे प्रश्न विचारले जातील. अशा प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नसतात. यावेळीही तसेच होईल.

माझ्या माहितीप्रमाणे सहलीला जाण्यापूर्वी मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळा/कॉलेज जबाबदार राहणार नाही असे अलीकडे लिहून घेतलेले असते. त्यामुळे बहुधा या प्रकरणी शाळेची काहीच जबाबदारी नाही असे सांगण्यात येईल.

शासनातर्फे मृत मुलांच्या पालकांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत जाहिर केलेली आहे. या प्रकरणी मुलांचाच दोष होता, तर सरकारने मदत कशासाठी द्यायची असे कोणी विचारतील. तर मानवतेच्या दृष्टीकोनातून अशी मदत करण्यात गैर नाही असे काहीजण म्हणतील.

६) गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत लोकल/रेल्वेअपघातामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडताना दिसत आहेत. हे आधीही घडत होतेच, मात्र आता अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवलेले असल्यामुळे या प्रकारांची दाहकता जाणवते आहे एवढेच.

७) मुंबई महापलिकेतील शिवसेनेचे अनेक नगरसेवक करदात्यांच्या पैशाने अंदमानची सहल करायला गेले आहेत. त्याला त्यांच्या भाषेत अभ्यासदौरा म्हणतात. टाइम्स नाऊचे बातमीदार अगदी पहिल्या दिवसापासून त्यांच्या मागे आहेत. अभ्यासदौ-याच्या नावाखाली हे नालायक लोक तेथे चक्क सहल करताना दिसले.

मुंबईत देवनारच्या डंपिंग ग्राउंडवर मोठी आग लागल्यामुळे निर्माण झालेल्या धुरामुळे तेथील परिसरातील लोकांना तेथे राहणे अशक्य झाल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत आहे. मुलांना श्वसनाचे त्रास होत आहेत. त्या भागातील शाळा ल्या आठवड्यापसून बंद आहेत. तरीही मुंबईच्या महापौरांसह अनेक महत्त्वाचे पदाधिकारीही सहलीवरून परत यायला तयार नाहीत. असे हे दळभद्री व निर्लज्ज लोकप्रतिनिधी म्हणजे आपले दुर्दैव आहे.

टाइम्स नाउच्या बातमीदारांनी या नगरसेवकांना तिकडे हटकले असता या नालायक नगरसेवकांनी त्यांना जी खोटारडेपणा करण्याची जन्मजात सवय असते त्याप्रमाणे या बातमीदारांविरूद्ध तेथील पोलिसांमध्ये तक्रार नोदवली आहे.

८) राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते शिवसेनेचे आहेत याचा अर्थ एस.टी बसेस त्यांना आंदण मिळाल्या आहेत असा समज त्यांनी करून घेतलेला दिसतो.
कोकणातून आलेल्या एका एसटीबसवरील शिवसेनेची खालच्या फोटोंमधील जाहिरात पहा. जाहिरात परिवहन मंत्र्यांच्या नव्हे तर शिवसेना नेते या नात्याने त्यांच्या नावाने आहे. हे काय चालले आहे? अशा प्रकारे एखाद्या पक्षाच्या जाहिरातीसाठी एसटी बसेसचा वापर करण्याची पद्धत केव्हापासून रूढ झाली?