फुसके बार – ०४ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – ०४ फेब्रुवारी २०१६
.

१) ऐतिहासिक either-or व neither–nor

पूर्वी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामार्फत गणित – इंग्रजीच्या शालाबाह्य परीक्षा घेतल्या जात. कदाचित आजही चालू असतील.

त्यातली ज्युनियर की सिनियर पातळीवरची परीक्षा मी सहावी-सातवीत दिली होती. इयत्तेच्या मानाने ती परीक्षा अवघड समजली जात असे. परीक्षेमध्ये either-or किंवा neither –nor याचा वापर करून गाळलेल्या जागा भरा असा प्रश्न होता. हे आम्हाला शिकवले नव्हते. आता प्रश्न तसाच सोडून तर द्यायचा नव्हता. मग काय, एकाच वाक्यातील पहिल्या गाळलेल्या जागेत either-or आणि पुढच्या जागेत neither–nor लिहिले. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे सारखी नकोत म्हणून पुढच्या वाक्यात हा क्रम बदलून neither –nor आधी तर पुढच्या जागेत either-or. जे चार-पाच प्रश्न होते त्यांची अशी आलटून-पालटून उत्तरे लिहिली.

तो पेपर तपासताना हसूनहसून परीक्षकांचे पोट दुखले असणार नक्की.

मला नाही वाटत की Either-or व neither –nor च्या इतिहासात असा पराक्रम इतर कोणी केला असेल.

२) गिरगाव चौपाटीवरील मेक इन इंडियाची सभा

गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनाव्यतिरिक्त इतर कोणताही कार्यक्रम करू न देण्याच्या उच्च न्यायालयाच्या भुमिकेविरूद्ध राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले व ‘मेक इन इंडिया’बद्दलची सभा तेथेच घ्यावी असा कौल मिळवला.

त्याच ठिकाणाशिवाय काही नडले होते काय?

आता यापुढे या व अशा तर ठिकाणांचा (गैर)वापर चालू होण्याचा यामुळे पायंडा पडेल याचे भान राज्य सरकारला नाही काय?

३) दक्षिण अमेरिकेत झिका नावाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभुमीवर टाटा मोटर्सने त्यांच्या त्याच उच्चाराच्या नावाची नवी गाडी बाजारात आणण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. कोणाचे काय आणि त्रास कोणाला!

४) तोच तो विनोद त्याच त्या श्रोत्यांच्या कानावर वेगवेगळ्या वक्त्यांनी मारल्यामुळे होणरीं गंमत

तिकडे कतारमध्ये काही कार्यक्रमासाठी गेलेला प्रत्येक मराठी कलाकार न चुकता 'आप कतार में हो, प्रतिक्षा कीजिये' हे वाक्य कतारकरांना ऐकवतो.

बरे, प्रत्येकवेळी तेच ते एकल्यामुळे दुस-या- तिस-या वाक्यापर्यंत हे वाक्य टाकूनही हशा मिळत नाही. काही कतारकर उसने का होईना पण न हसण्यामुळे पाहुण्यांचा अपमान होऊ नये म्हणून थोडेसे हसतात. तेव्हा तो कलाकार मग इतर कतारकरांच्या एकूणच बौद्धिक क्षमतेबद्दल शंका घेतो. ही आणखी गंमत.

५) मोरा गोरा अंग लई ले, मोहे शाम रंग दई दे

यातला सुंदर भावार्थ सोडला तर यात स्त्रीवर्गाला पुरुषजातीची sexist विचारसरणी वगैरे आधारावर काही आक्षेपार्ह वाटत नाही?

मोराच गोरा रंग का, तोरापण का नाही किंवा मोरापण काला रंग का नाही, वगैरे.

नाही, एखादा संदर्भ वेगळा काढून त्यावरून बदनामी झाली असे हाकारे देत आक्षेप घेण्याची फॅशन आली आहे, म्हणून विचारले.

६) आमचा एक मित्र इतका देवभोळा (God fearing) आहे की व्हॉट्सअॅप, फेसबुकवर लोकांनी पाठवलेल्या देवादिकांच्या प्रतिमा असलेले मेसेजेस हाइड करायला अथवा डिलिट करायलाही तो घाबरतो.

आपण त्या पापाचे धनी व्हायला नको म्हणून.

या प्रतिमांनी फोनची मेमरी भरली तर नवीन फोनच घेईल बहुतेक.

कधीकधी प्रश्न पडतो की आपण खरोखर कुठल्या शतकात आहोत!

७) वरूण अॅरॉन याचा साध्या लग्नाचा आदर्श

भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज वरूण अॅरॉन याने अगदी साधेपणाने नोंदणी पद्धतीने लग्न केले. लग्नाचा खर्च किती? नोंदणी फॉर्म दोन रूपयांचा व नोंदणी फी पाच रूपये. तब्बल सात रूपयातले लग्न.