फुसके बार – ०६ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – ०६ फेब्रुवारी २०१६
.

१) पुण्यातील कर्वेनगरमध्ये कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनेक शैक्षणिक शाखा आहेत. या महाविद्यालयात अनेक परराज्यीय मुलीही असतात. तेथील प्राध्यापक-प्राध्यापिकांकडून मधूनमधून त्यांच्याबद्दलचे अनुभव कळत असतात. एकीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी बाईंकडून पैसे मागितले. किती? तर फक्त पंचवीस हजार. बाईंना आश्चर्य वाटले. एवढे पैसे द्यावेत की नाही याबद्दल त्या विचार करत असतानाच या मुलीने थेट तिच्या आईला फोन केला आणि तो बाईंकडे दिला. आई म्हणाली, सिर्फ पच्चिसही तो मॉंग रही है ना, दे दीजिये और मुझे आप का अकाउंट नंबर बताइये, मैं आज ही भिजवा दूंगी. बाई आश्चर्यचकीत.

दुस-या एका प्राध्यापिकेकडून कळलेली गोष्ट. अतिडाएटिंगच्या नादात किंवा विविध 'काळज्यां'मुळे काहीजणी बेशुद्ध पडतात. डॉक्टरला बोलवावे लागते. पण अनेकदा यांचे कपडे एवढे तोकडे असतात की आम्हाला काही सलवारी तयार ठेवाव्या लागतात.

बाकी आजकालच्या मुलांच्या हू वॉज धिस सॅने गुरूजी या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यावे लागते. ही संस्था महर्षी कर्वेनी स्थापन केलेली असली तरी दुस-या राज्यातून आलेल्याच काय, अनेक महाराष्ट्रीय मुलींनाही महर्षि कर्वेंची झोपडी व त्यांच्या भारतरत्नाची प्रतिकृती वगैरेची माहिती नसते, ना त्यांच्या कार्याची. अर्थात महर्षी कर्वे तर त्यांचे काम करून गेले.

२) परगावच्या मुलांनी पुण्यात नोकरी शोधणे

नोकरीच्या शोधात आलेल्या अनेक जणांशी विविध कारणांनी माझा संपर्क येतो, विशेषत: नुकतीच डिग्री परीक्षा दिलेल्यांशी.

एक गोष्ट वारंवार लक्षात येते की नोकरी 'शोधायची' कशी याचे तंत्र त्यांच्यापैकी अनेकांना अवगत नसते. अनेकांना या नोकरी शोधण्याच्या महासागरात किंवा बाजारात आपण कोठे आहोत, आपली पत काय आहे, याचे भान नसते. त्यांच्या कॉलेजमध्ये शिक्षणाकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष व इंडस्ट्रीच्या काय अपेक्षा आहेत याच्याशी घेणेदेणे नसलेला मागास अभ्यासक्रम ही जशी त्याची कारणे आहेत, तसेच स्वावलंबी होण्यासाठी यातले कोणी गंभीरपणे प्रयत्न करत नाहीत व त्यांना त्यासाठी मार्गदर्शनही मिळत नाही अशा या प्रश्नाच्या अनेक बाजू आहेत. शिवाय काही जण ओव्हरस्मार्ट व कामाच्या व पगाराच्याबाबतीत भलत्याच अपेक्षा बाळगणारे तर काही इंजिनियरिंग किंवा इतर कोर्सेस करताना निव्वळ पाट्या टाकल्याने नोकरी मिळू शकण्याच्या जवळपासही नसतात. कोणीतरी सांगितले म्हणून एका पाठोपाठ विविध कोर्सेस करत राहतात. मूळ अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावरदेखील नोकरी नसल्याने पालकांकडून पैसे घेत रहायचे, याचेही मानसिक दडपण काही संवेदनशील मुलांवर असते. अर्थात काही जण याबाबतीतही निगरगट्ट असतात ही गोष्ट वेगळी.

सगळे इंजिनियरिंग वा इतर अभ्यासक्रम बहुधा इंग्रजी माध्यमातूनच पूर्ण केलेला असतो, तरीदेखील इंग्रजी बोलणे-लिहिणे-वाचणे-समजणे या प्रकारांमधील ज्ञान यथातथाही नसते, इतकी गंभीर परिस्थिती असते.

इमेलवर सीव्ही पाठवतानाही एसएमएसची भाषा वापरतात. आपण नोकरीसाठी अर्ज करत आहोत याचेही भान या मुलांना नसते. मुखदुर्बळता हा गुण तर अगदी सामान्यपणे आढळणारा.

कॅंपसमधून बाहेर पडतानाच नोकरीची सोय झाली नाही तर स्वत: नोकरी मिळवणे हे मुला-मुलींना फारच अवघड झालेले आहे.

३) अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्यास राज्याचे आताचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी परवानगी दिली. अशोक चव्हाण यांच्यावरील आरोपांची माहिती असतानाही कॉंग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष केले. आता चव्हाण अगदी अपेक्षेप्रमाणे म्हणत आहेत की हे राजकीय षड्यंत्र आहे. त्यांच्या ड्रायव्हरला अशा आलिशान सोसायटीत फ्लॅट घेण्याचा अधिकार नाही काय, असा धन्य प्रश्न जाहीरपणे विचारण्याची मजल कॉंग्रेसच्या प्रवक्त्याने गाठली आहे. भ्रष्टगुंडवादीचेही अनेक नेते त्याच नावेत असल्यामुळे तेही कॉंग्रेसवाल्यांच्या सुरात सूर मिळवत आहेत.

राज्यात कॉंग्रेसचे सरकार असताना तेव्हाचे राज्यपाल शंकर नारायण यांना चव्हाणांवर खटला चालवण्याची परवानगी नाकारताना कोणतेच पुरावे आढळले नाहीत. आताचे सरकार वेगळे व राज्यपालही वेगळे. त्यांना असा खटला भरण्यासाठी निस्चित पुरावे मिळाले. पूर्वी अंतुले किंवा निलंगेकर पाटील मुख्यमंत्री असताना प्रथमदर्शनी पुराव्यावरून त्यांना पायउतार व्हावे लागले होते. तीच गत अशोक चव्हाणांची झाली होती. ते किटाळ दूर झालेले नसतानाही त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना प्रदेशाध्क्षपद देण्यात आले.

तिकडे सीबीआयचेही तेच नाटक. मागचे सरकार असताना याच सीबीआयने चव्हाणांचे नाव या प्रकरणातून काढावे अशी शिफारस केली होती. आता तेच सीबीआय खटला चालवायला तयार आहे.

खेळणे म्हणजे किती करून घ्यायचे स्वत:चे? अर्थात यावरही कोणत्या राज्यपालांनी, आताच्या की आधीच्या, कोणत्या सीबीआयच्या अधिका-यांनी, आताच्या की आधीच्या, हे प्रश्नदेखील जरूर विचारले जातील.

या सर्व प्रकरणावर कडी म्हणजे या महाभागांना दैवत मानणारेही दिसतात. तीच गोष्ट सगळे करून थकले-भागलेले दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचीही.

चव्हाणांच्या वडलांना आदराने हेडमास्तर म्हणत. चारित्र्यावर डाग पडू दिला नाही त्यांनी. म्हणजे त्याबाबत कधी ऐकू तरी अाले नाही.मात्र त्यांच्यानंतर नांदेडमधील निवडणुकांमध्ये प्रभाव दाखवल्याचे निमित्त काय झाले, त्यांच्या चिरंजीवांना थेट मुख्यमंत्रीपद दिले गेले. हेडमास्तरांचे चिरंजीव म्हणून थोडीफार आशा निर्माण झाली होती. हो, कॉंग्रेसमधील लोकांकडूनही कधीकधी आशा वाटते. पण या चव्हाणसाहेबांनी ती धुळीला मिळवली. शेवटी वडील पुण्यवान असले तरी ती त्यांची वैयक्तिक पुण्याई, त्यावर थोडाकाळ तगता येते, नंतर आपले पुण्य आपले आपणच कमवावे लागते, हेच खरे.

बाकी करून सवरून त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त न करता आपल्यावर सुडबुद्धीने कारवाई होत आहे असे म्हणताना यांची जीभ कचरत नाही. जणु काही मी तर फक्त भ्रष्टाचारच तर केलाय, खून तर नाही केला ना, अशा समजुतीत आहेत हे दळभद्री.

त्यांच्यावर खटला दाखल करणारेही या प्रकरणाचे राजकीत हत्यार न बनवता तत्परता दाखवून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतील ही अपेक्षाही भोळसट म्हणावी का?

४) अण्णा हजारे व पंचायत राज्याचा पुरस्कार

विकासाच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करत ग्रामसभांना अधिक अधिकार द्यावेत हा अण्णा हजारेंच्या आंदोलनामधला एक प्रमुख मुद्दा होता. मागण्या करायला काय जाते, ग्रामीण राजकारणाची प्रत्यक्ष परिस्थिती आज काय आहे या वास्तवाकडे लक्ष द्यायला वेळ आहे का कोणाकडे?

संपत मोरे या माझ्य पत्रकार फेबुमित्रांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे.
“बबनराव कांबळे या दलित समाजातील सरपंचाना मी भेटायला गेलो होतो. त्यांच्या घरी जावून चौकशी केली तर ते पंचायतीत गेल्याच समजलं. मी पंचायतीत गेलो तर बबनराव पंचायतीत झाडू मारत होते. ते पाहून मला धक्का बसला.

मी त्यांना विचारलं त्यावर ते मला तुम्ही आत जावून बसा एवढंच म्हणाले.
मी आत गेलो. थोडया वेळाने ते आत आले.सरपंचाच्या खुर्चीवर बसले. टेबलावर पाण्याचा तांब्या त्यावर पेला होता.त्यातील पाणी घटाघट पिले आणि मला म्हणाले, वार्ताहर, मी सरपंचबी हाय आणि शिपाईबी हाय पंचायतीचा. तवा सकाळी शीपाई म्हणून हा पाण्याचा तांब्या टेबलावर ठेवला आता सरपंच म्हणून पाणी पितोय बघा. असं म्हणून ते हसले. त्यांनी स्वतच्या दु:खावरच विनोद केला पण मी ते पाहून हादरून गेलो होतो. तेच पुन्हा माझी समजूत काढत म्हणाले, वार्ताहर, तुम्ही वंगाळ वाटून नका घिवू. आवं सरपंचपदाची जागा पाच वर्षासाठी हाय. शिपायाच काम आयुष्यभर हाय. आणि बातमी-बितमी छापू नका.

गेल्या वर्षी बबनराव गेले. पण बबबनराव कांबळे यांची ती भेट कायम माझ्या लक्षात राहिली. सरपंचपद गेल्यावर पुन्हा ते पूर्णवेळ शिपायाच काम करत होते. त्यांना सरपंचपदावर असताना गावातील टग्यानी अधिकाराची जाणीव होवू दिली नाही. कायम त्यांच्या डोक्यावर नोकरीच्या असुरक्षिततेची तलवार टांगती ठेवली. आजही गावागावात बबनराव आहेत. चळवळवाले तिकडे लक्ष देतील काय? बबनरावांना मोकळा श्वास घेता येईल काय?”