फुसके बार – ०९ फेब्रुवारी २०१६ - कोठे अंधार कोठे प्रकाश

फुसके बार – ०९ फेब्रुवारी २०१६ - कोठे अंधार कोठे प्रकाश
.

१) माझे फेबुमित्र व उत्तम छायाचित्रकार चित्तरंजन भट यांना हेल्मेटसक्ती अशी दिसली.
“हेल्मेटसक्ती म्हणजे 'जगायचीही सक्ती आहे', नाही काय?”
फार सुंदर. हेल्मेट वापरण्यासाठीचे बोधवाक्य यावर आधारायला हवे.

२) कोणी अभ्यासात कच्चे असेल तर अलीकडे शाळांकडून अशा मुलांना बाहेरून मदत मिळवण्यासाठी पालकांकडे शिफारस केली जाते. यात डिसलेक्सिया असणे, गणितात गती नसणे, इंग्रजीतला क्रियापदाला जोडून होत असलेला to do चा प्रयोग काही केल्या न समजणे या व अशा इतर अनेक प्रकारच्या अडचणी असलेली मुले असतात. ही मदत शाळेमध्येच शाळेच्या वेळेच्या आधी किंवा नंतर आठवड्यातून काही तास दिली जाते किंवा काही वेळा घरी येऊनही. अंजली मॉरिसन ही संस्था यासाठी लोकांच्या ब-यापैकी माहितीची आहे. काही ठिकाणी शाळा ही त्यांचीच जबाबदारी असल्याप्रमाणे त्यासाठी पालकांकडून काहीच शुल्क आकारत नाहीत. काही ठिकाणी त्यासाठी वेगळा आकार लावतात. सहसा हा आकार नाममात्र असतो.

एक जण या प्रकारची सेवा खासगी स्वरूपात देतात. त्यांच्याकडचा विद्यार्थी गतिमंद आहे. वर्गातल्या अगदी ‘ढ’ मुलाएवढाही कुठलाच विषय त्याला उमजत नाही. त्याने कसेबसे का होईना दहावीतरी पास करावे अशी पालकांची किमान अपेक्षा. तरीही त्याची एकूण प्रगती पाहता शाळेतून त्याचे नाव कमी करून त्याच्यासाठी खासगी पातळीवर प्रयत्न करावेत असे शाळेकडून अनेकदा सुचवले जाते. तर हे प्रयत्नही त्याच खासगी प्रयत्नांचा भाग आहे. याला आपण खासगी शिकवणी म्हणुयात फार तर, ती त्याच्या घरी जाऊन घेतली जाते.
एकदा मुलाची आई मुलाबद्दल बोलताना थोडी भावूक झाली होती. आणि अचानक बोलून गेली, याच्या आधी दोन वेळा गर्भपात केला होता, मुली होत्या म्हणून. आणि आता भोगते आहे. माझी अक्कल तरी कोठे गेली होती त्यावेळी या लोकांच्या आग्रहाला बळी पडताना.

तीन अक्षरी एकारान्त नाव कोणत्याही समाजात असू शकते, म्हणून सांगत नाही, फार ताण देऊ नका. शिवाय तो प्रश्नही नाही. पण त्या आईला सांगायला हवे, हा प्रकार म्हणजे त्या पापाचे फळ समजायचे कारण नाही. आणि मिळालेले असे आयुष्य तिला किंवा इतर कोणाला नाही तर त्या मुलाला काढायचे आहे.

३) जलतज्ञ राजेन्द्र सिंह महाराष्ट्रात वेळ वाया घालवत आहेत का?

राजेन्द्र सिंह मराठवाड्यात पोहोचले. मराठवाड्यातले पर्जन्यमान लक्षात न घेता तेथे साखरकारखानदारी व पर्यायाने ऊसशेती चालू करणा-यांच्या बुद्धिमत्तेवर त्यांनी कोरडे ओढले. यात सर्वपक्षीय दळभद्री राजकारणी आले. त्यातही गंमत अशी की आपापल्या डबक्यातले हे सगळेच तथाकथित ‘दूरदर्शी लोकनेते’.

राजेन्द्र सिंह नुकतेच कोकणात जाऊन आले. कोकणातल्या मृतप्राय झालेल्या नद्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी त्यांनी अनेक मौलिक सूचना केल्याचे कळते. सरकारी अधिका-यंनी त्यांना लोटेपरशुराम, महाड व इतर भागात केले जाणारे प्रदूषण दाखवले की नाही कोणास ठाऊक?

या पार्श्वभूमीवर माझे फेबुमित्र इंद्रजित खांबे यांची एक पोस्ट; जी देवगडचे पत्रकार हेमंत कुलकर्णी यांच्या नावावर व्हॉट्सअप व इतरत्र फॉरवर्ड होत आहे, आपण कदाचित याआधीच पाहिली असेल. चारशे-पाचशेच्या गर्दीतही खरे श्रोते किती होते याची त्यांनी केलेली फोडही फारच वास्तवदर्शी व तरी मजेशीर आहे.

समाजाची लायकी...

आठ दिवसांपुर्वी ‘चला हवा येऊ द्या’ चा कार्यक्रम आमच्या गावात झाला. जवळपास आठ-दहा हजाराच्या आसपास पब्लीक जमलेलं असं वर्तमानपत्रातील फोटो बघुन अंदाज.
कार्यक्रम एका मोठ्या ग्राऊंडवर होता. लोकांनी आत जाण्यासाठी अक्षरशः धुडगुस घातला, गेट तोडलं असं ऐकलं. या कार्यक्रमाच्या निमीत्तानं "आम्ही रमेश भाटकर/वैभव मांगले/अशोक शिंदे/निलेश साबळे/इत्यादी इत्यादी यांच्यासोबत फोटो/सेल्फी काढुन घेतला" किंवा "झी मराठीवर (०.३७ सेकंद) दिसलो" असं सांगत आयुष्य सार्थकी लागल्यागत हरकून गेलेल्या एका पिढीला जन्म दिल्याबद्दल ‘झी’ वाल्यांचे आभार. आता ज्या ज्या गावात याचे कार्यक्रम होतील तिथं तिथं अशी पिढी जन्म घेईलच.

आज आमच्या गावात अजुन एक कार्यक्रम झाला. ‘चला पाणी येऊ द्या’ असं त्याला नाव देता येईल. नोबेल प्राईस विजेते जलतज्ञ राजेंद्र सिंह गावात आलेले. आमच्या कोकणात जरी खुप पाऊस पडत असला तरी उन्हाळ्यात ४०० ते ५०० गावांना टॅंकरणे पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे आमच्याकडे जलसाक्षरतेचं काम आत्ताच झालं पाहिजे नाहीतर कोकणाचाही मराठवाडा व्हायला वेळ लागणार नाही.

या कार्यक्रमाला साधारण ३०० ते ४०० लोक उपस्थित होते. कार्यक्रम एका राजकीय पक्षाचा असल्यामुळे त्यातील जवळपास निम्मे पक्षाचे कार्यकर्ते होते. बाकी ५० च्या आसपास NSS ची मुलं होती. या मुलांना धरून आणणारे दोन प्राध्यापक होते. राजेंद्र सिंह यांच्यासोबत आलेले जवळपास ७०-८० कार्यकर्ते होते. शासनाच्या जलपुरवढा विभागाचे जिल्हाभरातील अधिकारी लोक होते. ते साधारण ४०-५० च्या आसपास असावेत. बाकी पत्रकार, फोटोग्राफर वगैरे लोकं. ही सर्व मंडळी सोडून गावातील फारफारतर सहा-सात मंडळी मला दिसली. त्यात एक होता साऊंडसिस्टीमवाला. व एक वेडी बाई होती. कार्यक्रम एका मंगल कार्यालयात असल्यामुळे तिथं जेवायची सोय होईल या उद्देशानं ती आली असावी. पण पंधराविस मिनीटांनी तीसुद्धा उठून गेली. गावातील प्राध्यापक, शिक्षक, व्यापारी, डॉक्टर्स, इंजिनीयर्स, वकील यापैकी कोणीही नव्हतं. मागच्या खुर्चीवर बसलेला अधिकारी कार्यक्रम भर दुपारी ठेवला म्हणुन कुरकूरत होता. त्याच्या सहकारी त्याला “तु फोटो काढून झाला की निवांत खुर्चीत झोपून दे. कार्यक्रमाला उपस्थित रहाणं आपलं काम आहे. राजेंद्र सिंह काय बोलतात ते ऐकायचं असं कोणीच सांगीतलं नाही” असे सल्ले देत होता. यावर सगळे मिळुन एकमेकांना टाळ्या देत होते.

काही तोंडओळख असलेली माणसं मलाच उलटं विचारत होती की तु इथं काय करतोयस ?. राजेंद्र सिंह यांच्याशी बोलायची, त्यांना प्रश्न विचारायची संधी काही मिळाली नाही. परंतु मिळालीच असती तर एक प्रश्न नक्कीच विचारला असता. “ज्या समाजाची लायकीच पाण्याशीवाय तडफडून मरायची आहे अशा समाजासाठी तुम्ही आयुष्यभर रक्त का सांडलंत?”

४) सूर्यदत्ता या संस्थेने कसले तरी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही हा पुरस्कार दिला गेला. सामाजिक कार्य, संगीत, शास्त्रीय संगीतम अभिनय अशा विविध क्षेत्रातील लोकांना पुरस्कार दिले गेले. तर कुठलाशा गुरवानंद स्वामी यांच्यासह आणखी काहींना जीवनगौरव पुरस्कारही दिला गेला.

भाजपचे उपाध्यक्ष शाम जाजू हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून नाही तर अॅक्सिस बॅंकेच्या वरिष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांनाच या पुरस्कारासाठी का निवडण्यात आले, कोणास ठाऊक. अर्थात हा पूर्णपणे खासगी स्वरूपाचा कार्यक्रम असल्यामुळे कोणी कोणाला पुरस्कार द्यावा हे विचारण्याचे कारण नाही.

पण या स्वामींच्या उद्योगांमुळे या प्रकरणी वाद निर्माण झाला. पुरस्कार देऊन झाल्यानंतर या स्वामींनी अमृता फडणवीस यांना आशीर्वादासाठी बोलावून एक साखळी की मंगळसूत्र भेट म्हणून दिले. त्यांच्या मुठीत काही तरी धरल्यासारखे दिसत होते, त्यामुळे यात चमत्काराचा भाग नसावा. तरीही हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नींला आशीर्वाद देण्याचा भंपकपणा या स्वामींचा.

माध्यमांनी जरी याचा चमत्कार, अंधश्रद्धा वगैरेवरून गवगवा केला तरी स्वत: अमृता फडणवीस यांनी त्या स्वत: चमत्कारावर विश्वास ठेवत नाहीत हे स्पष्ट केले ते बरे झले, पण यापुढे त्यांनी आशीर्वाद देणा-या अशा आगाऊ भोंदूंपासून सावध रहावे हे बरे.

५) उत्तर प्रदेशमध्ये हैवाना, अखिलेश यादव सरकार तुझे नाव

शामली नावाच्या गावातल्या या हैवानाच्या जिंकलेल्या उमेदवाराच्या विजयाच्या प्रित्यर्थ त्याचे गुंड अंदाधूंद गोळ्या झाडत राहिले. त्यातली एक गोळी रस्त्यावरून जाणा-या रिक्षातल्या का लहान मुलाला लागली व ते मूल मृत्युमुखी पडले.

पोलिस तेथेच होते. काही झाले नाही. मागे कर्नाटकात टांझानियाच्या मुलीला निर्वस्त्र करणयाचा प्रयत्न केला गेला, तिची गाडी जाळली गेली, तेव्हाही तिथले पोलिस निव्वळ पहात राहिले होते.

तर उत्तर प्रदेशातल्या गुंडांनी टाइम्सनाऊच्या तेथील बातमीदाराला धमकावून त्याच्याकडचा कॅमेरा हिसकावून घेतला आणि त्यातले सगळे रेकॉर्ड्स काढुन टाकले. या गोंडस दिसणा-या अखिलेशच्या मागे समाजवादी म्हणवणारा त्याचा गुंड बाप, गुंड काका, हे कमी पडले म्हणून की काय, आझम खान नावाचा आणखी एक गुंड अशी गुंडांची फौज आहे आणि उत्तर प्रदेशचे रूपांतर या लोकांनी गुंडाराज म्हणणेही कमी होईल असे हैवानांच्या राज्यात केलेले आहे. कोणाचेही भय नसल्यामुळेच अखिलेशच्या या बापाची मजल बलात्कार झाल्यावर ‘ती मुले आहेत, त्यांच्याकडून चुका होणारच’ असे म्हणण्यापर्यंत गेली.

केद्र सरकारने अलीकडे अरूणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट आणली. खरी गरज बंगालमधले ममता बॅनर्जींचे व उत्तर प्रदेशमधील यादव सरकार यांच्या राजवटी बरखास्त करण्याची आहे.

आधी मायावती सरकार. आता हे हलकट. उत्तर प्रदेश भाजपही काही वेगळे दिवे लावेल असे नाही. तिथल्या जनतेचे नशीबच फुटके आहे असे दिसते आणि त्यामुळे जनतेची लायकीही तशीच.

६) दादाजी 'एचएमटी' खोब्रागडे

मागे हेमलकसाला प्रकाश आमटेंकडे गेल्यानंतर परत निघताना भामरागडमध्ये थोडी तांदुळखरेदी केली होती. तांदळाचे नाव वेगळे असल्यामुळे लक्षात राहिले आहे. एचएमटी. कोणी म्हणेल हे काय नाव आहे! किंवा कोणाला वाटेल संशोधकाने त्याच्या पूर्ण नावाच्या आद्याक्षरांपासून हे नाव तयार केले असावे. तर तसे नाही. हा संशोधक इतका साधा आहे की त्या काळात प्रसिद्ध असलेल्या घड्याळांच्या कंपनीच्या नावावरून हे नाव दिले आहे. हे वाण त्यांनी संशोधित केलेल्या नऊ वाणांपैकी. नावे तरी कोणाखोणाची द्यायची? मध्येच एखाद्याला नातवाचे नाव, एकाला एखाद्या आकड्याचे (संख्येचे) नाव.

हा संशोधक म्हणजे पूर्वी दोन एकर जमीन असलेला व त्यातलीही अर्धा एकर जमीन मुलीच्या लग्नासाठी विकावी लागलेला म्हणजे आता केवळ दीड एकरावर काम करणारा पासष्ठीतला एक साधा शेतकरी दादाजी खोब्रागडे.

एचएमटी हे त्यांनी संशोधन केलेल्या तांदळाच्या नऊ वाणांपैकी एक. संशोधनाचे स्वामित्व कसे जपायचे हे गावीही नाही. स्वत: निर्माण केलेले हे ज्ञान, हे धन आजुबाजुच्या शेतक-यांमध्ये वाटून टाकायचे इतकी साधी पद्धत. प्रोत्साहन तर सोडाच, त्याऐवजी त्यांनी शोधलेल्या एक वाणातच थोडा बदल करून त्याला थोडे वेगळे नाव देऊन आपल्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करणारे जवळचे कृषी विद्यापीठ. अर्थात आपल्याकडच्या कृषी विद्यापीठांचे असे पराक्रम आपल्याला नवे नाहीत.

कोणी म्हणते की त्यांच्या संशोधनाचे मूल्य इतके मोठे आहे की प्रयत्न केले असते तर मोन्सॅंटोसारख्या कंपन्यांप्रमाणे आज जगातल्या अर्ध्या भात उत्पादनावरचा स्वामित्वाचा हक्क त्यांचा असता.