फुसके बार – १३ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – १३ फेब्रुवारी २०१६
.

१) उस से मोहोब्बत करो

अनेक वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका मोठ्या कंपनीतील वाहतुक विभागाचा प्रमुख एक बंगाली गृहस्थ होते. पूर्वी सुरक्षा कंपनीत काम केलेले. आवाज अगदी भारदस्त. वेगळे बंद केबिन दिले तरी त्यांचा फोनवरील आवाज हॉलमधील सर्वांना ऐकू जात असे. हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे त्यांच्या जोरजोरात फोनवरून बोलण्यामुळे सर्वांची करमणूक होत असे. त्यातले हे एक उदाहरण.

एकदा त्यांच्या ताफ्यातील एक गाडी कोणीतरी अडवलेली होती. हे त्या गाडीच्या ड्रायव्हरशी बोलत होते. हे जोरजोरात सांगत होते की ‘अरे भैया, उस को समझाओ, उस से मोहोब्बत करो, वो समझ जायेगा”. इकडे बाहेर हॉलमधल्या सर्वांची हसूनहसून मुरकुंडी वळलेली.

२) http://369apps.bizही एक वेबसाइट आहे. जे निरूद्योगी आहेत किंवा अशा गोष्टींवर ज्यांना वेळ घालवायचा आहेत त्यांनी जरूर तसे करावे, पण या वेबसाइटवर तुमचा मृत्यु केव्हा होईल वगैरे सांगणारे अॅप आहे. गेल्या काही महिन्यांपासून काहीजणांनी येथे त्याचा निष्कर्ष टाकलेला आपण पाहिलेला आहे. काही जणांना आपण कोणत्या हिरो-हिरॉइनसारखे दिसतो, किंवा तुमच्या फेसबुक मित्रांपैकी कोण तुमचा खरा मित्र आहे असे काहीही हं वाले प्रकार असतात आणि काहीजण अगदी आवडीने ते येथे दाखवत असतात. हाही त्यातलाच प्रकार.

अर्थात तुमचा मृत्यु केव्हा होईल वगैरे सांगणे वा त्याबद्दलचा दावा करणे हा प्रकार बेकायदेशीर आहे. शिवाय याचे कोणावर कसे परिणाम होतील हे सांगणेही अवघड आहे.

तेव्हा अशा वेबसाइट्स बंद व्हाव्यात यासाठी काय करता येईल? यात या वेबसाइटचा वापर ऐच्छिक आहे तेव्हा कोणी तेथे जावे की न जावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. वगैरे मुद्दे येऊ नयेत.

याचा उद्देश या फालतु वेबसाइटची जाहिरात करणे हा अजिबात नाही. तेव्हा ज्यांना ती माहित नाही त्यांनी ती पाहू नये.

३) प्रधानमंत्री ही एबीपीन्यूजवरील मालिका

आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर इंदिरा गांधींच्या मनात निवृत्तीचा विचार येऊ लागला होता.

बेलची या बिहारमधील खेड्यात करा दलितांची जाळून हत्या केली गेली. ही बातमी दिल्लीला पोहोचेपर्यंत तीन दिवस लागले. मात्र इंदिरा गांधींनी तेथे पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्या भागात प्रचंड पाऊस पडत होता. जीप जेथून पुढे जाऊ शकत नाही, तेथून त्या ट्रॅक्टरने गेल्या. पुढे तर वाट आणखी अवघड. सर्वांनी त्यांना परत जाण्याचा सल्ला दिला. तरीही त्या हट्टाला पेटल्या. अखेर त्या हत्तीवर बसून त्या खेड्यात पोहोचल्या. वय वर्ष साठ फक्त. त्या तेथे पोहोचल्यावर तेथील दलितांना बराच धीर मिळाला. त्यांचे तेथे चांगलेच स्वागत झाले.

निवडणूक हरलो तरी अजून सगळे संपलेले नाही याची इंदिरा गांधींना जाणीव त्या दुर्गम भागातील स्वागतामुळे झाली.

नंतर निवडणुकीत वापरलेल्या जीपगाड्यांच्या खरेदीमधील भ्रष्टाचाराच्या कारणावरून त्यांना एका दिवसासाठी अटक झाली. न्यायाधिशांनी मूलभूत पुरावे मागितले तरी सरकारी पक्षाचा वकील ते सादर करू शकला नाही. त्या दुस-या दिवशी सुटल्या. मात्र या सरकारी मूर्खपणामुळे त्यांना आयतीच प्रसिद्धी मिळाली. भारताचे एक दळभद्री राजकारणी चरणसिंग त्यावेळी गृहमंत्री होते. इंदिरा गांधींना कधी तुरूंगामध्ये पाहतो असे त्यांना झाले होते. त्यांनी हे प्रकरण उकरून काढले, पंतप्रधान मोरारजी देसाईंची परवानगी घेतली आणि नंतर हा असा तमाशा झाला. नंतर मोरारजींना कळले की या महाभागांनी कायदामंत्रालयाशी याबाबतीत सल्लामसलत केलीच नव्हती. आणि त्यांनी ती घेतलेली अहे असे ‘समजून’ सही करणारे पंतप्रधानही अर्थातच धन्य.

४) पाकिस्तानने तेथील हिंदूसाठी वेगळा विवाहाचा कायदा संमत केला आहे. याबद्दलचे विधेयक तेथे मांडताना तेथील मंत्र्यांनी हे विधेयक आणायला फारच उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

आता प्रश्न एवढाच आहे की पाकिस्तानात एवढे अत्यल्प हिंदू उरलेले आहेत की या कायद्याची अंमलबजावणी कोणावर करायची हा प्रश्न राहिला आहे.

५) डोनाल्ड ट्रम्प यांची तब्येत

डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीनच मुद्दा त्यांच्या समर्थनार्थ प्रचारात आणला आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या शर्यतीत असळेया सर्वच उमेदवारांना त्यांच्या तब्येतीविषयीची पूर्ण माहिती देणे बंधनकारक असते. परंतु गेल्या चाळीस वर्षांपासून ट्रम्प यांच्या तब्येतीची काळजी घेत असलेल्या त्यांच्या डॉक्टरांनी त्यांची तब्येत ठणठणीत असल्याचे असे काही सर्टीफिकेट दिले आहे की त्यामुळे सर्वांचे मनोरंजन होत आहे.

डॉक्टरांनी सांगितले आहे की अल्कोहोलप्राशन अजिबात प्राशन करत नसल्यामुळे व सिगरेटसह तंबाखूचे कसलेही व्यसन नसल्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात निवडून येणारे ६९ वर्षीय ट्रम्प हे सर्वात निरोगी उमेदवार असतील.

यात गंमत म्हणजे आयुष्यात एकदाच ट्रम्प हे वैद्यकीय चाचणीत नापास झाले व ती चाचणी नेमकी व्हिएतनामला पाठवणी करण्यासाठी होती. आपल्याकडे बडे बाप के बेटों के साथ सहसा जसे होते तसा काहीसा प्रकार. मात्र ट्रम्प यांचे समर्थक सांगतात की त्यांच्या तळपायाच्या हाडांच्या रचनेमुळे त्यांना या तपासणीत उत्तीर्ण केले गेले नाही. म्हणजे त्यांना व्हिएतनामच्या युद्धावर पाठवण्यात अाले नाही.

६) ‘माझ्या बाबांना विचारा’ ही जरा जास्तच लाडेलाडे असलेली लोकसत्ताची जाहिरात एव्हाना चांगलीच माहित झाली आहे.
त्या जाहिरातीचा व्हॉट्सअपवर कल्पकपणे केलेला वापर एका फोटोमध्ये दाखवला आहे.

दुस-यामध्ये दोघा जणांचे तरूणपणचे फोटो आहेत. ते कोणाचे आहेत हे सांगायचे आहे. एकच क्ल्यु की हे दोघेही चित्रपटांशी संबंधित नाहीत, म्हणजे हॉलिवूड स्टार नाहीत.