Skip to main content

"छापील"कडून इलेक्ट्रॉनिककडे सगळाच मुख्य लेखनप्रवाह वळावा

पुरस्कार मिळणं ही ऐसीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहेच आहे. पण एकूणच "छापील"कडून इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग मीडियमकडे सगळाच मुख्य लेखनप्रवाह वळावा आणि यथावकाश तोच मुख्यप्रवाह बनावा अशा मताचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक सिग्निफिकंट मैलाचा दगड.

(व्यवस्थापन : गविंनी उपस्थित केलेल्या विषयावर पुरस्काराच्या धाग्यावरच चर्चा सुरू झाल्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार त्यांचा प्रतिसाद आणि चर्चा इथे वेगळ्या धाग्यावर हलवली आहे.)

Taxonomy upgrade extras

मेघना भुस्कुटे Wed, 23/03/2016 - 11:43

गविंशी अंशतः सहमत. मुख्य लेखनप्रवाह फक्त ऑनलाईन लिखाणाकडे वळावा, असं नाही. पण मुख्यप्रवाहात या लेखनाला जागा मिळावी; त्या जबाबदारीनं रेषेवर लिहिणार्‍या नि वाचणार्‍यांनी अधिक जाणतं, सजग लिहावाचावं; हा निराळा गट न उरता प्रवाहाचा एक महत्त्वाचा भाग बनावा - असं नक्की वाटतं.

गवि Wed, 23/03/2016 - 12:18

In reply to by मेघना भुस्कुटे

मुख्य लेखनप्रवाह फक्त ऑनलाईन लिखाणाकडे वळावा

हेच्च पुन्हापुन्हा अधोरेखित करु इच्छिन. कागदाचा अपव्यय असं केवळ पर्यावरणीय कारण नसून त्या फिल्डमधे उगीचच तयार झालेली बंधनं आणि चुकीच्या प्रॅक्टिसेस त्या प्रकारासोबतच बंद होतील.

१. लिखाण हे प्रकाशकाला पसंत पडलं पाहिजे तरच ते छापून येणार. यात वाचकाला काहीच स्थान नाही.
२. ते विकलं जाईल असं असलं तरच मुळात छापलं जाण्याची जास्तीत जास्त शक्यता. पुन्हा एकदा लेखक आणि वाचकाला स्थान नाही.
३. सुपरहिट लेखकामागे प्रकाशकांची रांग तर सुपरहिट प्रकाशकांमागे लेखकांची रांग. या सर्वामधे नवोदित किंवा हिट नसलेल्या लेखक आणि प्रकाशकांना आपला ओरिजिनल हवा तो कंटेंट पुढे आणणं व्यावसायिक मर्यादेमुळे शक्यच न होणं.
४. मानधन, आवृत्त्या, प्रती वगैरेंबाबत प्रचंड अपारदर्शकता.

आणखीही बरेच मुद्दे निघतील.

लेखन मुळात संपत्ती उभारण्यासाठी असू नये असं एक वैयक्तिक मत आहे. त्याचा वापर जोपर्यंत अन्य माध्यमांत केला जात नाही तोपर्यंत आर्थिक लाभ हा विषय उद्भवू नये. कमाई हा मूळ उद्देश ठेवून लिखाण होण्याची पद्धत ऑनलाईन पब्लिकेशनमधे निष्प्रभ होते. हे चांगलं आहे. यात लेखक आणि त्याचं लिखाण याला सेंटरस्टेज मिळतं. भले ते आत्ताच्या स्टार लेखकांइतकं उच्च लोकप्रियतेचं नसेल. पण या इलेक्ट्रॉनिक मीडियावर ते मिळवणं हे प्रकाशककृपेवर किंवा कंटेंटच्या सेलेबिलिटीवर अवलंबून नसून केवळ लिखाणाच्या वाचकांच्या मते असलेल्या दर्जावर अवलंबून राहील.

मेघना भुस्कुटे Wed, 23/03/2016 - 12:28

In reply to by गवि

सगळ्या मुद्द्यांशी सहमत आहे. ऑनलाईन लेखनानं यांतले अनेक दोष बायपास करण्याची एक भारी शक्यता निर्माण केली आहे खरी.

पण हे दोष आज जरी ऑनलाईन लेखनव्यवहारात नसले, तरी ते उद्या उद्भवणारच नाहीत याची काय खातरी आहे? यांतले बहुतांश दोष आज इथे नाहीत, कारण इथल्या लेखनाला मुख्यधारेत स्थान नाही, त्याचं व्यवसायीकरण झालेलं नाही (व्यावसायिकीकरण झालंय बरं का!), त्यात आर्थिक गुंतवणुकी अगदी कमी आहेत. एकदा वाचकसंख्या वाढली, पैसा गुंतला, व्यवसाय वाढला की हे सगळे दोष इथेही येण्याची शक्यता आहेच.

मुळात यांतले बहुतांश दोष माध्यम कागदी आहे की इलेक्ट्रॉनिक आहे त्यावर ठरतच नाहीत. ते माध्यमाचं व्यवसायीकरण झालं आहे की नाही, यावर ठरतात.

दुसरं उलट बाजूनं बोलता येईल ते असं - आर्थिक गुंतवणूक अगदी कमी असल्यामुळे इथल्या लेखनामध्ये (सन्माननीय अपवाद वगळता) एक प्रकारचा हलगर्जीपणा, एक हौशीपणा जाणवतो. मधला व्यावसायिक साखळीचा अडसर दूर करण्याच्या नादात संपादन नामक अत्युपयुक्त आणि अत्यावश्यक संस्कारही गमावला जातो.

अर्थात याचेही काही फायदे असतीलच. काळाच्या ओघात ते हळूहळू स्पष्ट होईल. पण दोन्ही ठिकाणचे आपापले गुणदोष आहेत, हे खरं.

आदूबाळ Wed, 23/03/2016 - 12:37

In reply to by मेघना भुस्कुटे

मुळात यांतले बहुतांश दोष माध्यम कागदी आहे की इलेक्ट्रॉनिक आहे त्यावर ठरतच नाहीत. ते माध्यमाचं व्यवसायीकरण झालं आहे की नाही, यावर ठरतात.

व्यवसायीकरण व्हायची इतक्यात भीती नाही. जोपर्यंत चोप्यपस्ते बंद करवता येऊन ऑनलाइन लेखन "प्रायव्हेट गुड्स" होत नाही (consumption by one individual prevents another individual from consuming it) तोपर्यंत व्यवसायीकरण होणार नाही. तोपर्यंत नवे प्रयोग, नवे फॉर्म्स इ०चं हे ब्रीडिंग ग्राऊंड असेल.

संपादनाबद्दल सहमत आहे.

गवि Wed, 23/03/2016 - 12:58

In reply to by आदूबाळ

हेच म्हणतो. छपाई (फिजिकल), वितरण (फिजिकल) या दोन गोष्टींमुळे आणि केवळ त्यासाठी लागणार्‍या तुलनेच बर्‍याच जास्त इन्व्हेस्टमेंटमुळेच (थेट पैसा आणि वेळ, श्रम इ. रुपांत गुंतवणुकीची गरज असण्यामुळेच) खाली दिलेले काही प्रॉब्लेम्स येतातः

१. या "लेखनकला / लेखनातला क्रिएटिव्ह भाग"बाह्य सव्यापसव्यामुळे प्रत्यक्ष लेखक एन्ड टु एन्ड प्रक्रिया पूर्ण करु शकत नाही. त्यासाठी तो प्रकाशकावर अवलंबून राहतो. आणि वाचकही.
२. प्रकाशकाला आपली गुंतवणूक परत मिळणं आवश्यक असल्याने (ते योग्यच आहे), तो त्याच्यामते काय विकाऊ आहे ते छापण्यावर जास्त भर देणार.
३. फिजिकल छपाई आणि वितरणात लपवाछपवीला भरपूर वाव मिळतो.

ऑनलाईन पब्लिकेशनमधे आर्थिक लाभ कोणालाच मिळणार नाही, अधिकाधिक रेंजचं साहित्य थेट बाहेर आल्याने कचराही बराच होणार हे सर्व मान्यच, पण निदान लेखक आणि वाचकांमधे भिंती तर राहणार नाहीत. आणि छापील पुस्तकाबाबत नसलेला आणखी एक भाग जो सॉफ्टवेअर पब्लिशिंगमधे आहे तो म्हणजे वाचकाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया, रियलटाईम रेटिंग, जे काही बरं किंवा वाईट आहे ते खणखणीतपणे कळून घेण्याचं धाडस, आणि मुख्य म्हणजे काय चांगलं आणि काय वाईट हे ठरवणं पूर्णतः वाचकांवर सोडून अधलेमधले "समाजाची दिशा ठरवणारे स्वयंघोषित सुकाणूधारक" किंवा "समाजाची दिशा पाहून तिकडेच कळप हाकलणारे मेंढपाळ" हे दोन्ही हटणं. हे सर्व अत्यंत आवश्यक आहे.

चिंतातुर जंतू Wed, 23/03/2016 - 14:11

In reply to by गवि

>> लेखन मुळात संपत्ती उभारण्यासाठी असू नये असं एक वैयक्तिक मत आहे. त्याचा वापर जोपर्यंत अन्य माध्यमांत केला जात नाही तोपर्यंत आर्थिक लाभ हा विषय उद्भवू नये. कमाई हा मूळ उद्देश ठेवून लिखाण होण्याची पद्धत ऑनलाईन पब्लिकेशनमधे निष्प्रभ होते. हे चांगलं आहे.

>> यात लेखक आणि त्याचं लिखाण याला सेंटरस्टेज मिळतं.

>> या इलेक्ट्रॉनिक मीडियावर ते मिळवणं हे प्रकाशककृपेवर किंवा कंटेंटच्या सेलेबिलिटीवर अवलंबून नसून केवळ लिखाणाच्या वाचकांच्या मते असलेल्या दर्जावर अवलंबून राहील.

गवि, इथे एक अडचण आहे. संपत्ती उभारणं तर दूरच राहिलं; लिखाणावर साधा चरितार्थ चालावा इतकी किमान अपेक्षाही कधी (छापील) मराठी साहित्यविश्वात पूर्ण होऊ शकली नाही. अगदी विख्यात लेखकांनाही चरितार्थासाठी चाकरी किंवा काही तरी व्यवसाय करावा लागे. वि. स. खांडेकर हे पहिले ज्ञानपीठविजेते मराठी लेखक शाळामास्तर होते. जी ए कुलकर्णी धारवाडमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते. मंगेश पाडगावकर हा एक लोकप्रिय आणि रसिकप्रिय कवी घ्या - त्यांनी युसिसमध्ये चाकरी केली. वगैरे. लिखाणात काहीही कमाई नसावी असा आग्रह धरणं म्हणजे एक प्रकारे लेखकांना असा संकेत देणं की साहित्याची फारशी पत्रास मराठी समाज ठेवत नाही; किंवा, लेखकानं उपाशी मरावं किंवा जिवंत राहण्यासाठी लिखाण सोडून काय वाट्टेल ते करावं; पण मानधन किंवा निर्मितीहक्क मागू नये. मला वाटतं की असा आग्रह साहित्यासाठी आणि मराठी भाषेसाठीही दीर्घगामी हिताचा नाही.

शिवाय, 'वाचकांच्या मते असलेला दर्जा' हे एक प्रकारे फडमारू लेखकांनाच पुढे आणण्याला हितकारक ठरू शकेल. उदाहरणार्थ, अशा वातावरणात जीएंसारखा किंवा खानोलकरांसारखा माणूस कधीच लिहू शकणार नाही, तर पुलं किंवा पाडगावकर फुलतील. त्यांपैकी कोण चांगला / वाईट हा मुद्दा नाही; तर हे विशिष्ट प्रकारच्या अभिव्यक्तीसाठीच पूरक आणि वेगळ्या अभिव्यक्तींसाठी हानिकारक ठरण्याचीही शक्यता आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

बाळ सप्रे Wed, 23/03/2016 - 15:33

In reply to by चिंतातुर जंतू

लिखाणात काहीही कमाई नसावी असा आग्रह धरणं म्हणजे एक प्रकारे लेखकांना असा संकेत देणं की साहित्याची फारशी पत्रास मराठी समाज ठेवत नाही;

भविष्यातही संकेतस्थळ अथवा ब्लॉगसारख्या माध्यमातही जास्त वाचकवर्ग असलेल्या लिखाणाच्या पानांवर जाहीरातीमार्फत उत्पन्न वगैरे स्रोत होउ शकेल. उदा. गविंना मिळणार्‍या + श्रेण्या/ लाइक्स वगैरे ते जाहिरातदारांना आकर्षून घेण्यास वापरू शकतील. :-)

गवि Wed, 23/03/2016 - 15:42

In reply to by बाळ सप्रे

पाहिलंत ? मला जर्रा कुठे श्रेण्यांमुळे पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाली न झाली अन लगेच विनोदी श्रेणी आली. मी रोज शिक्रण मटारउसळ खाईन हे यांना बघवत नाही.

अनु राव Wed, 23/03/2016 - 16:05

In reply to by गवि

गवि, तुमच्या वेबपेज ला मी भरपुर हीट्स मिळवुन देइन. तुमचा जहीरातींचा रेट पण वाढेल. चांगली मटन बिर्याणी खाल.

आदूबाळ Wed, 23/03/2016 - 15:55

In reply to by चिंतातुर जंतू

"मराठी लेखकाला साहित्यनिर्मितीवर पोटपाणी चालवता यावं" असा आशय असलेला पहिला परिच्छेद आणि "वाचकांच्या मते असलेला दर्जा' हे एक प्रकारे फडमारू लेखकांनाच पुढे आणण्याला हितकारक ठरू शकेल. मंग अभिजात साहित्यकार टिकणार कसे?" असा आशय असलेला दुसरा परिच्छेद एकमेकांना छेद देताहेत का?

चिंतातुर जंतू Wed, 23/03/2016 - 16:39

In reply to by आदूबाळ

>> "मराठी लेखकाला साहित्यनिर्मितीवर पोटपाणी चालवता यावं" असा आशय असलेला पहिला परिच्छेद आणि "वाचकांच्या मते असलेला दर्जा' हे एक प्रकारे फडमारू लेखकांनाच पुढे आणण्याला हितकारक ठरू शकेल. मंग अभिजात साहित्यकार टिकणार कसे?" असा आशय असलेला दुसरा परिच्छेद एकमेकांना छेद देताहेत का?

नाही. वैविध्य टिकावं आणि वाढावं असं मी म्हणतोय. जर लिखाणाला मानधन मिळेनासंच झालं तर तर नवे जीए, खानोलकर लिहिते व्हायला अडचण येईल. पण ज्यांना फड मारायचाय त्यांनाही जागा हवीच.

गवि Wed, 23/03/2016 - 16:15

In reply to by चिंतातुर जंतू

शिवाय, 'वाचकांच्या मते असलेला दर्जा' हे एक प्रकारे फडमारू लेखकांनाच पुढे आणण्याला हितकारक ठरू शकेल. उदाहरणार्थ, अशा वातावरणात जीएंसारखा किंवा खानोलकरांसारखा माणूस कधीच लिहू शकणार नाही, तर पुलं किंवा पाडगावकर फुलतील. त्यांपैकी कोण चांगला / वाईट हा मुद्दा नाही; तर हे विशिष्ट प्रकारच्या अभिव्यक्तीसाठीच पूरक आणि वेगळ्या अभिव्यक्तींसाठी हानिकारक ठरण्याचीही शक्यता आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

कोणाची अभिव्यक्ती किती किंमतीची / डिझायरेबल आहे हे वाचकांवर सोडा ना. तुम्ही का सर्वांसाठी ठरवताय?

चिंजं हे नाव एक प्रातिनिधिक म्हणून घेतोय.. व्यक्ती म्हणून नव्हे. तर... फक्त चिंजंना आणि त्यांच्यासारख्या पाचच जणांना आवडणार्या खास लेखकाचा चरितार्थ त्या पाचांनीच शेयर करावा.. जास्त लोकांना आवडणार्याचा त्याचे चाहते करतील.

सध्याच्या सिस्टीममधे अशा दोन्ही प्रकारच्या लेखकांना इक्वल इक्वल संधी मिळतेय का?

उलट ऑनलाईन फ्री मीडियममधे हे सध्या मर्यादित वाचकवर्ग असलेले लेखक अधिक वाचकांपर्यंत ट्रायल बेसिसवर तरी पोहोचून ते आवडायला लागण्याची शक्यता निर्माण होईल. आत्ता पुस्तक विकत घेऊन तर मासेस अजिबात वाचणार नाहीत.

चिंतातुर जंतू Wed, 23/03/2016 - 16:53

In reply to by गवि

>> कोणाची अभिव्यक्ती किती किंमतीची / डिझायरेबल आहे हे वाचकांवर सोडा ना. तुम्ही का सर्वांसाठी ठरवताय?

मी ठरवत नाही. मी फक्त एवढंच म्हणतोय की 'मानधन मिळूच नये', 'सगळं लिखाण फुकटच असावं' असा आग्रह योग्य नाही.

>>चिंजं हे नाव एक प्रातिनिधिक म्हणून घेतोय.. व्यक्ती म्हणून नव्हे. तर... फक्त चिंजंना आणि त्यांच्यासारख्या पाचच जणांना आवडणार्या खास लेखकाचा चरितार्थ त्या पाचांनीच शेयर करावा.. जास्त लोकांना आवडणार्याचा त्याचे चाहते करतील.

लेखकाला पैसे कसे आणि कुणी द्यावेत हा मुद्दा पुढचा झाला. 'वाचकांना लिखाण फुकटच मिळायला हवं' हा आग्रह नको. क्राउडफंडिंग केलंत तरीही चालेल.

>>सध्याच्या सिस्टीममधे अशा दोन्ही प्रकारच्या लेखकांना इक्वल इक्वल संधी मिळतेय का?

सध्याची व्यवस्था सर्वगुणसंपन्न नाहीच. म्हणून तर 'ऐसी'सारखा प्लॅटफॉर्म महत्त्वाचा आहे. मात्र, छापील नकोच असा आग्रहही नको.

>>उलट ऑनलाईन फ्री मीडियममधे हे सध्या मर्यादित वाचकवर्ग असलेले लेखक अधिक वाचकांपर्यंत ट्रायल बेसिसवर तरी पोहोचून ते आवडायला लागण्याची शक्यता निर्माण होईल. आत्ता पुस्तक विकत घेऊन तर मासेस अजिबात वाचणार नाहीत.

नव्या माध्यमांतून अशा प्रकारे लेखक अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नुसती आहे असं नव्हे, तर ते प्रत्यक्षात घडताना दिसतं आहे. मात्र, असे वाचक जोडून मग त्याद्वारे पुढे पैसे कमवायचे ह्याकडे लेखकाचा कल असला तर त्यात काही मूलतः गैर नाही एवढंच म्हणतोय (गब्बर याच्याशी सहमत असेल का?) . आणि मासेसचं म्हणायचं तर अच्युत गोडबोलेंची पुस्तकं हा सध्याच्या मासेसचा विकत घेऊन वाचायचा आवडता वाचनप्रकार आहे. महाराष्ट्रातल्या गावोगावी त्यांच्या पुस्तकांचे लोक भुकेले आहेत. पुढचं पुढे बघूच. :-)

गब्बर सिंग Wed, 23/03/2016 - 18:27

In reply to by चिंतातुर जंतू

नव्या माध्यमांतून अशा प्रकारे लेखक अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नुसती आहे असं नव्हे, तर ते प्रत्यक्षात घडताना दिसतं आहे. मात्र, असे वाचक जोडून मग त्याद्वारे पुढे पैसे कमवायचे ह्याकडे लेखकाचा कल असला तर त्यात काही मूलतः गैर नाही एवढंच म्हणतोय (गब्बर याच्याशी सहमत असेल का?) .

एकदम सहमत.

--

खरंतर चिंजं च्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.

'मानधन मिळूच नये', 'सगळं लिखाण फुकटच असावं' असा आग्रह योग्य नाही. - अगदी. अगदी.

--

कोणाची अभिव्यक्ती किती किंमतीची / डिझायरेबल आहे हे वाचकांवर सोडा ना. तुम्ही का सर्वांसाठी ठरवताय?

--

लेखन मुळात संपत्ती उभारण्यासाठी असू नये असं एक वैयक्तिक मत आहे. त्याचा वापर जोपर्यंत अन्य माध्यमांत केला जात नाही तोपर्यंत आर्थिक लाभ हा विषय उद्भवू नये. कमाई हा मूळ उद्देश ठेवून लिखाण होण्याची पद्धत ऑनलाईन पब्लिकेशनमधे निष्प्रभ होते. हे चांगलं आहे.

@गवि, हेच ते, हेच ते - ज्ञान हे मोफत / माफक दरात दिले जावे कारण ज्ञान हे मूलभूत आहे. लेखन हे एकप्रकारे नैतिक दृष्ट्या उच्च व समाजसुधारक/विकासक आहे म्हणून ते नाममात्र किंमतीत मिळावे, पाणी हे मोफत/माफक दरात दिले जावे कारण पाणी हे जीवनावश्यक आहे, डॉक्टरच्या सेवा ह्या जीवन वाचवण्याच्या असल्याने व जीवन मूल्यवान असल्याने डॉक्टरने नफेखोरी करू नये... माफक किंमतीत रुग्णसेवा द्यावी --- या सगळ्या "नैतिक" कल्पना संपत्तीच्या निर्मीतीस मारक आहेत. व निर्मीती केलेली नसली तर (आर्थिक दृष्ट्या दुर्बलांकडे) वितरण (त्यांच्या कामाच्या बदल्यात) कशाचे करणार ?

संपत्तीच्या निर्मीतीस कारक/प्रेरक काय असावे व काय नसावे हे इतरांनी/समाजाने का ठरवावे ?

आधीच ऑनलाईन कंटेंट ची समस्या ही आहे की त्याची कॉपी करण्याची कॉस्ट १ पैसा किंवा त्यापेक्षा कमी असते. त्यामुळे प्रताधिकार मोडून कॉपी बनवण्याची संधी महाप्रचंड असते. वर भारतात प्रताधिकाराचे कायद्यांची राबवणूक अत्यंत कमकुवत - मग कंटेंट निर्माता (लेखक, कलाकार) हा दर्जेदार कलाकृति निर्मीतीसाठी उद्युक्त का होईल ? त्यामुळे परिणाम बघा की कलाकृति क्लासिक बनवणे ह्यापेक्षा कमीतकमी कालात ती मॉनेटाईझ कशी केली जाऊ शकेल याकडे त्याचे लक्ष लागते. चित्रपट हे उत्तम उदाहरण आहे. पहिल्या महिन्यात किती कमाई केली ते महत्वाचे. बाकी नंतर जाहीरातींद्वारे होईल ते होईल. रामभरोसे.

--

सध्याच्या सिस्टीममधे अशा दोन्ही प्रकारच्या लेखकांना इक्वल इक्वल संधी मिळतेय का?

@गवि, इक्वल संधी का असावी ? कशी मोजणार की ती इक्वलच आहे ते ?

१९९५ च्या तुलनेत काय स्थिती आहे ? त्याकाळी (लेखक, प्रकाशक, वितरक यांना) छापील हे एकच माध्यम उपलब्ध होते ना ? आज दोन माध्यमे आहेत. आता स्पर्धा कशी, कुठे करायची ते प्रकाशक व वितरक ठरवतीलच. प्रथम प्रताधिकार कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यत्न करणे महत्वाचे आहे.

गवि Wed, 23/03/2016 - 18:32

In reply to by गब्बर सिंग

आधीच ऑनलाईन कंटेंट ची समस्या ही आहे की त्याची कॉपी करण्याची कॉस्ट १ पैसा किंवा त्यापेक्षा कमी असते. त्यामुळे प्रताधिकार मोडून कॉपी बनवण्याची संधी महाप्रचंड असते

म्हणून जुनी अवघड पद्धत जास्त बरी?

गब्बर, मग पूर्वीच्या हातमागाच्या, बैलनांगराच्या, कुदळीने खणण्याच्या पद्धतीत जास्त लोकांना काम मिळतं म्हणून मिनिटाला शेकडो मीटर कापड काढणारा (हातमागापेक्षा प्रचंड स्वस्तात आणि तेच हस्तकलेचं डिझाईन स्वस्तात "कॉपी" करणारा) पॉवरलूम, यांत्रिक नांगर, बुलडोझर याला विरोध करशील?

फारच बाळबोध प्रश्न आहे आणि एक्झॅक्टली समांतर नाही, तरीही...

गब्बर सिंग Wed, 23/03/2016 - 18:53

In reply to by गवि

@गवि, प्रश्न गैरसमजावर आधारलेला आहे.

मी - ऑनलाईन सोडून देऊन छापील जवळ करा - असं म्हणत नैय्ये.

मी असं म्हणतोय की प्रताधिकाराचे कायद्यांची राबवणूक होत नसेल व कॉपी करणे अत्यंत सोपे व मोफत असेल तर लक्षावधी वाचक कंटेंट विकत न घेता... पायरेटेड कॉपीज वापरतील व परिणामस्वरूप अनेक (सगळे नव्हे) प्रकाशक, वितरक, लेखक तोट्यात जातील, काही दिवाळखोर होतील. मग जे नवीन प्रवेशोत्सुक आहेत त्यांना प्रकाशक, वितरक, व लेखक (जे मार्गदर्शन करू शकतात) - ते मिळणार नाहीत. नवीन कंटेंट ची निर्मीतीप्रक्रीया रोडावेल.

प्रकाशकांच्या, लेखकांच्या, वितरकांच्या हितासाठी व पर्यायाने वाचकांच्याही हितरक्षणार्थ - प्रताधिकार कायदे मजबूत व अंमलबजावणी कडक केली पाहिजे. जावेदभाई राज्यसभेतून रिटायर होण्यापूर्वी त्यांनी जे भाषण केले (२० मार्च च्या दरम्यान) त्यात त्यांनी प्रताधिकार कायद्यांचा उल्लेख केला होता ... की ते राज्यसभेत आले त्यामागे हे एक कारण होते. की यावर विचार केला जावा. समस्या राज्यसभेत उपस्थित केल्या जाव्यात व त्यावर अंमलबजावणी व्हावी. तपशील माहीती नाही.

आदूबाळ Wed, 23/03/2016 - 18:59

In reply to by गब्बर सिंग

त्यामुळे परिणाम बघा की कलाकृति क्लासिक बनवणे ह्यापेक्षा कमीतकमी कालात ती मॉनेटाईझ कशी केली जाऊ शकेल याकडे त्याचे लक्ष लागते. चित्रपट हे उत्तम उदाहरण आहे. पहिल्या महिन्यात किती कमाई केली ते महत्वाचे. बाकी नंतर जाहीरातींद्वारे होईल ते होईल. रामभरोसे.

ही आयड्या कादंबरीसाठी राबवायची म्हटली तर बटाट्याची चाळमधल्या निष्काम साहित्यसेवेसारखी "उंबरगावचा उमाजी" टैप पुस्तकं लिहायला लागतील.

गवि Wed, 23/03/2016 - 17:03

In reply to by गवि

प्लीज तो माझ्या प्रतिसादाने सुरु झालेला छापील विरुद्ध अॉनलाईन भाग या धाग्यातून वेगळा काढता येईल का? अभिनंदनासाठी असलेल्या धाग्याला फाटा. सॉरी..

(व्यवस्थापन : वेगळा धागा काढला आहे.)

'न'वी बाजू Wed, 23/03/2016 - 17:36

In reply to by चिंतातुर जंतू

शिवाय, 'वाचकांच्या मते असलेला दर्जा' हे एक प्रकारे फडमारू लेखकांनाच पुढे आणण्याला हितकारक ठरू शकेल. उदाहरणार्थ, अशा वातावरणात जीएंसारखा किंवा खानोलकरांसारखा माणूस कधीच लिहू शकणार नाही, तर पुलं किंवा पाडगावकर फुलतील.

"मग काय, इथे काय 'सौभद्र' आहे असे समजून आला आहात की काय? अहो, ती गल्लाभरू नाटके निराळी!" या 'खुरच्याऽऽऽऽ'मधील सुप्रसिद्ध संवादपंक्तीची (उगाचच) आठवण झाली. ती लिहीत असताना, पुढेमागे खुद्द आपलाही नामोल्लेख अशाच पद्धतीने होईल, अशी प्रीमॉनिशन पु.लं.ना झाली असावी की काय, अशी शंका येते.

बाकी, पाडगावकरांबाबत सहमत. (ते 'लिज्जत पापडां'च्या वर्तमानपत्रांतील छापील जाहिरातींकरितासुद्धा कविता करत. पण मग त्याच न्यायाने, पु.ल.सुद्धा नंतरनंतर 'कालनिर्णय'च्या जानेवारीच्या पानामागे साळगांवकरांच्या मासिक राशिभविष्यास खेटून आपला वार्षिक रतीब घालू लागले होते - आणि तो तितपतच असे - असे स्मरते. तेव्हा, पु.लं.बद्दलही ठीकच आहे म्हणा!)

अनु राव Wed, 23/03/2016 - 19:23

हल्ली च्या दिवसात, सर्वच कला(?) क्षेत्रात किंवा निर्मीतीच्या क्षेत्रात तुमच्या कलाकृतीतुन पैसे मिळवण्याची गरज नसते. तुमची कलाकृती तुम्हाला नाव मिळवुन देते आणि तेव्हडे खूप आहे. मिळालेल्या नावा ला एनकॅश करणे सहज शक्य असते, ते तो कलाकार, खेळाडु, लेखक करु शकतात.

सध्या कलाकाराला आपल्या कला कृती चा दर्जा कडे लक्ष देणे जास्त सोप्पे आहे कारण तो जर सांभाळला तर पैसे मिळवण्याचे बरेच मार्ग उपलब्ध झाले आहेत.

कवि संगीतकाराला जितके पैसे कविता लिहुन किंवा चाली लाऊन मिळतात त्या पेक्षा कीतीतरी पटीनी जास्त ब्रँड अँबेसिटर होऊन किंवा कुठल्यातरी टुर वर जाउन आणि अ‍ॅवॉर्ड फंक्शन ला जाउन मिळतात. चॅनल वर मुलाखतींचे पण भरपुर पैसे मिळतात. त्यामुळे पुस्तके किंवा गाणी वगैरेंची कोणी चोरी वगैरे केली किंवा पायरेटेड वापरली तरी काही फरक पडत नाही.

खेळाडुंना पण खेळ दाखवला की जहीरातींमधुन कमाई अनेक पटींनी जास्त होते.

जयदीप चिपलकट्टी Thu, 24/03/2016 - 00:10

> मुख्य लेखनप्रवाह फक्त ऑनलाईन लिखाणाकडे वळावा, असं नाही. पण मुख्यप्रवाहात या लेखनाला जागा मिळावी;

सहमत आहे, पण त्यासाठी आटापिटा करण्याची गरज दिसत नाही. इंटरनेटचा रेटा असा आहे की हे आपसूक होईल. दहा वर्षांनी ‘मराठी साहित्याचा अनिल अनिलेक्ट्रॉनिक लिखाणाकडे कसा वळवता येईल’ ह्या विषयावर धागा निघेल असं भाकित करतो. याबाबतीत घासकडवींचं मत वेगळं असल्यास ते सोयीचं होईल, कारण मग त्यांच्याशी पैज लावता येईल.

आडकित्ता Thu, 24/03/2016 - 00:44

गविंची मते ललित, वा संपूर्ण काल्पनिक लेखनास लागू व्हावीत.

जिथेही थोडाफार्/फार थोडा वास्तवाचा संबंध येतो, तिथे किमान पिअर रिव्ह्यू लागू व्हायलाच हवा. ऑनलाईन, कुणीही सोम्यागोम्या उठून कोणत्याही पेनस्टेकिंगली प्रूव्ह केलेल्या थियरीला खोडून काढणारी बेजबाबदार विधाने करीत फिरतो. त्याची मते खोडून काढताना शास्त्रज्ञ जरतरच्या भाषेत उत्तर देत राहतो, अन .०००००१% शक्यतेस मान्य करताच हा सोम्यागोम्या जितं मया करीत उर बडवितो. (कोर्टात बलात्काराच्या केसवर साक्ष देताना, बाईट मार्क्स त्या बलात्कारितेच्या गालावर दिसले, हे मी नमूद केलेले असताना निर्लज्ज बचावपक्षाचा वकील, 'का हो? ही मुलगी तिच्या आजोबांच्या कवळीवर पडली तर अशा खुणा गालावर दिसतील का?' हा प्रश्न विचारतो, व उत्तरात मला 'हो, दिसू शकतात' असेच म्हणावे लागते, हे आठवले. हा प्रश्न मला विचारला गेला होता, व त्या दिवट्या वकीलाचा गळा घोटायची जहाल इच्छा अजूनही उरी दाटून आहे.)

पियर रिव्ह्यूड जर्नल्स व मायपॉवरमधे चालविल्या गेलेल्या तथाकथित वैद्यकीय सल्ला साईट्स वाचल्या तर हे समजायला जड जाऊ नये.

विनाकारण फिअर माँगरींग, शब्दबंबाळ व स्युडोसायंटिफिक माहितीचा महापूर या ऑनलाईन समुद्रात आहे.

याच समुद्रातून मोती कसे वेचावेत हे कधीकाळी लोकांना समजेलच, पण तोपर्यंत, छापीलकडून इलेक्ट्रॉनिक प्रवास योग्य नाही, असेच म्हणावेसे वाटते.

दुसरे म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव.

हे असे प्रच्छन्न, व अनकंट्रोल्ड व्यक्त होणार्‍या ऑनलाईन लोकांबद्दल कडवटपणा मनात भरायला लागतो.

हेच, प्रकाशकाने फिल्टर लावले की कमी होतं.

तिसरे,

पुस्तक वाचून पूर्ण होईपर्यंत, त्याला उत्तर देणे, व ते उत्तर पुस्तक अर्धवट वाचणार्‍या इतरांनी वाचून लेखकाबद्दल विपरीत मत बनविणे इ.बाबी कागद हातात असेल, तर कमी होतात..

असो.

थोडे विस्कळित लिहिले आहे. जमेल तसे क्रिस्टलाईज करीनच.

गवि Thu, 24/03/2016 - 04:32

In reply to by बॅटमॅन

उलट माहितीबाबत "ऑनलाईन" सोर्सेस जास्तच सरसकट बदनाम आहेत (अनरिलायेबल म्हणून..अनेकदा जेन्युईन असले तरी).

अर्थातच ललित आणि तत्सम लेखनाबाबतच माझं मत होतं. तेव्हा आडकित्तासाहेबांशी सहमत.

राजेश घासकडवी Thu, 24/03/2016 - 14:02

In reply to by आडकित्ता

तुमचे मुद्दे मान्य आहेत. मुद्दा ऑनलाइन कचरा कसा थांबवायचा यापेक्षा ऑनलाइन वाचनीय लिखाणाला उत्तेजन देऊन ते सस्टेनेबल कसं करायचं हा आहे. दूध कुठचं आणि पाणी कुठचं हे समजण्यासाठी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काही ना काही ओळख लागणार. उदाहरणार्थ, मी मेघनाचा ब्लॉग वाचतो, आणि मला तो आवडतो. मी माझ्या मित्रमंडळींना सांगतो. आणि ते त्यांच्या मित्रांना सांगतात वगैरे वगैरे. अशा ऑनलाइन पब्लिसिटीमधून कोणालातरी 'माझ्या अमुकतमुक मित्रांनी/मैत्रिणींनी हे रेकमेंड केलं आहे' यावरून ते वाचनीय वाटू शकतं. किंवा ऐसी अक्षरे दिवाळी अंकात आलं आहे म्हणजे ते चांगलं असलं पाहिजे अशी रेप्युटेशन तयार होऊ शकते. या 'अपेक्षित चांगल्या' लिखाणासाठी लोक पैसे द्यायला तयार आहेत का? माझ्या मते आहेत. मात्र त्याचं लॉजिस्टिक अजून नीट झालेलं नाही.

मासिकाची वर्गणी दिली की त्याची रेप्युटेशन त्या कव्हरामधल्या लिखाणाबरोबर यायची. आता कव्हरात मावणारं असं फारसं नाही. वाचक शेकडो साइट्सवरचं वाचतात. त्यामुळे नक्की कुठचं मॉडेल चालेल याची खात्री नाही.

चांगलं लिखाण वर काढण्याची सोय व्हावी म्हणून ऐसीवर तारका देण्याची सुविधा आहे. अजूनही 'निवडक'वर क्लिक केलं तर दर महिन्यातलं वाचकांनी ठरवलेलं वाचनीय लेखन पाहायला मिळतं.

मिसळपाव Thu, 24/03/2016 - 06:53

गवि,
तुझे मुद्दे बरोबर आहेत - पण एकांगी आहेत. तू खाली दिलेल्या पहील्या गटात आहेस, मी शेवटच्या!! तुझ्या गटाला उपयोगी पडणारं तुझं प्रपोझल माझ्या मुळावर येईल. तस्मात, " मुख्य लेखनप्रवाह फक्त ऑनलाईन लिखाणाकडे वळावा " याला माझा कडाडून विरोध. (खाण्यापिण्यातलं उदाहरण दिल्यामुळे जरा कळायला सोपं पडेल !)

- माझाही हाच मुद्दा आहे. मी काय सुरेख फिशकरी करतो माहित्येय? पण साले मार्केटचे नियम जाचक आहेत. काय तर म्हणे ज्याच्याकडे हाटेल घालायला पुरेसं भांडवल असेल त्याच्याकडे जाउन मला फिशकरी त्याच्या हाटेलात विकता येईल का बघता येईल! मला माहित्ये माझ्या फिशकरीला भरपूर गिर्‍हाईक मिळेल. अरे ज्याना ज्याना खिलवल्येय ना, सगळे बोटं चाटत साफ करायचे ताटली. या या हाटेलवाल्याना माहित्ये तरी का गिर्‍हाईक काय म्हणतं ते? आणि म्हणे मेन्यू आम्ही ठरवणार. अरे हट!

- माझाही हाच मुद्दा आहे. अहो हाटेल टाकायचं म्हणजे काय चेष्टा आहे? लोकाना चालणारी हाटेलं दिसतात. ओस पडलेली नाही दिसत. मेन्यू ठरवताना ब्रम्हांड आठवतं. बरं, बिर्याणी नाही आवडली मार्केटमधे तर त्यातून चटकन बाहेर पडायची सोय नसते हो. रॉ मटेरिअल मधे, तयारीमधे केलेली ईन्व्हेस्टमेंट गेली ना गाळात. नी आता त्यात या खानावळी निघाल्यात. एखादा पदार्थ सर्व्ह करतात, चार जणात त्याची वाहवा होते की बस. नाही दोन-चार असतील चांगले. पण बाकी कीती भरताड असते बघतल्येत का? आणि आता म्हणे हाटेलं बंदच करणारेत - म्हणे तुमची गरजच नाही मार्केटात, जे काही लोकाना खायचंय ते खानावळीत जाउन खातील. अरे हट!

- माझाही हाच मुद्दा आहे. पूर्वी हाटेलं काढायला निदान काही पात्रता लागत असे. सगळीच हाटेलं चांगली नव्हती नी सगळेच पदार्थ चांगले नव्हते. पण आता काय, भरमसाठ खानावळी निघाल्यात! कोणीही उठतो नी पातेल्यात खुडबुड करून विकायला काढतो! कुठे जाउ एखादा छानसा पदार्थ खायला याची पंचाईत होते हो. बरं आज जिथली बिर्याणी आवडली तिथे निदान दुसरी एखादी डीश ट्राय करून बघावी असंही वाटत नाही - एक पदार्थ चांगला निघाला तर तुमचं नशीब. आणि म्हणे आता हाटेलं बंदच करणारेत - खायचं तर म्हणे या असल्या खानावळीत खा. अरे हट!