‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ --- कथामालिका की चित्रपट?

गणेश मतकरींचं ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ वाचून संपलं तेव्हा लक्षात आलं... अरे! सिनेमा संपला वाटतं! डोळ्यांसमोर पांढर्‍या कागदावरची काळी अक्षरं दिसत होती पण मनात मात्र चलतचित्रपट केव्हाच सुरू झाला होता, कधी ते कळलंच नाही.

कसं असतं, आपल्या जगण्याचा एक पॅटर्न नकळतच तयार झालेला असतो. आणि ‘जे आहे जसे आहे, त्यातल्या त्यात उत्तम’ असे ते ते करण्या-मिळवण्याची अथक धडपड सुरू असते. पुस्तकांच्या जगात गेलं की मात्र आपल्या कम्फर्ट झोनच्या पलिकडे जायला होतं, तेही नकळतच!
तर, बारा वर्षांपूर्वी अशीच सुरूवात झाली होती गौरी देशपांडे वाचायला. लग्न-कुटुंब-स्त्रीची कुचंबणा-पुरूषसत्ताक समाज-संस्कार.... हडबडून जायला झालं. आणि एकामागे एक सानिया, आशा बगे, मिलिंद बोकील, विजय पाडळकर, अंबिका सरकार, मिळून सार्‍याजणी, मेघना पेठे, कविता महाजन असं करता करता वाचनाचाही विविधांगी तरीही एक पॅटर्न तयार झाला.
फेसबुकच्या माध्यमातून अनेक वाचनप्रेमींशी ओळखी झाल्या. साहित्य-चित्र-शिल्प-सिनेमा-नाट्य अशा अनेक कलांचा दृश्यात्मक परिचय घडू लागला. त्यावरील चर्चा, मतमतांतरे वाचनात येऊ लागली आणि आपल्या पलिकडे अस्तित्वात असणारं वेगळं जग दिसायला लागलं! वाचनात विविधता येत राहिली. मनातले जगण्या-वाचण्याविषयीचे बंध दूर व्हायला सुरूवात तर झालेली होतीच आणि आता सगळं विश्वच आपलंसं होऊ लागलं. मनातील पूर्वग्रह बाजूला सारून वाचता येऊ लागलं.

आजच्या काळात, पारंपारिक कुटुंब-व्यवस्थेत जगणार्‍यांच्या विरूध्द परिस्थितीत जगणार्‍या वेगवेगळ्या वयोगटातील माणसांचं जग काय आहे, कसं आहे हे कुतूहल जागं झालं आणि हाती घेतलं गणेश मतकरींचं ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’! अनुभव मासिकात प्रसिध्द झालेली, अदृश्य धाग्याने एकत्र जोडली गेलेली कथामालिका असं ह्याचं स्वरूप.

आजच्या माणसांच्या, आजच्या जगण्याच्या कथा! ह्या कथांमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिप मधे रहाणारे, लग्न-संसार-मुलं असणारे-नसणारे, घटस्फोट घेऊनही पुन्हा एकत्र येणारे तिशी-चाळीशीतील अनेकजण आहेत. जसं की, सुश्रुत-सानिका-अंत्या-आगाशे-स्वरूपा, राम्याचे डॅड-मॉम. तसेच शाळकरी रोहन-पुशि-सौम्या, आर्किटेक्चरला शिकणारे रिधिमा-राम्या-हर्ष आहेत, आजी-आजोबांच्या वयाच्या जोशीकाकू आहेत. सगळ्यांचं जगणं, आजच्या उसंत न घेता, जलदगतीने धावणाऱ्या तांत्रिकतेशी बांधलेलं आहे.
रोजचा दिवस कधी सुरू झाला आणि कधी संपला हेही न समजणारं अपूर्ण तरीही भरगच्च जगणं! त्यात परदेशी राहणार्‍या मुलांमुळे एकटेपण येणारे आई-बाप, शाळकरी वयातील भांडणं, कॉर्पोरेट्समधील जीवघेणी स्पर्धा आणि या सगळ्यातील राग-लोभ, मैत्री-शत्रुत्व आहे. प्रत्येक मनोगतातील इंग्रजी-मिश्रीत भाषा आणि त्या व्यक्तीबरोबर उलगडलेली इतर अनेक पात्रे, थोडक्या शब्दांत परिसर-घटना-वातावरण-व्यक्तीमत्त्व निर्मिती हे ह्या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य आहे.

‘ऑल धिस हॅपन्ड, मोर ऑर लेस.’ स्लॉटरहाऊस-फाइव्हचा जनक, कर्ट वानेगटच्या ह्या सूचक वाक्याने पुस्तक वाचायला सुरूवात होते. ‘माझ्या मते बहुधा असेच काहीसे घडले’ हे प्रत्येक मनोगताच्या पार्श्वभागी असते. उदा. आत्महत्येची घटना घडत असताना तिचे साक्षीदार असणारे हर्ष-राम्या आणि त्या घटनेची माहिती कळल्यानंतर त्याचे उमटलेले पडसाद-प्रतिक्रिया, सानिका-स्वरूपाच्या घटकेत जुळलेल्या व तुटलेल्या मैत्रीची कारणं व त्याचे दोघींवरही झालेले परिणाम, ‘सबमिशन’च्या निमित्ताने कोण कुणाच्या किती प्रेमात आहे ह्याची झालेली जाणीव.
ह्यामुळे कोणतेही निवेदन तेच-तस्सेच न उरता अथवा चूक वा बरोबर असेही न ठरता, त्या-त्या व्यक्तीच्या ‘तसे असण्याचे’ ते प्रतिबिंब ठरते. ह्या व्यक्ती, कोणताही अभिनिवेश न बाळगता, जशा आहेत तशा, आपल्यापुढे पेश होतात. जसे की, आधुनिक काळात जगत असतानाही आगाशेसारख्या उच्च-शिक्षित माणसाच्याही मनात शुभ-अशुभ संकल्पना (उदा. जिवंत वा मृत भारद्वाज पक्ष्याचे दिसणे शुभ) किती खोलवर दडलेल्या असतात आणि अडचणीच्या काळात, तेवढ्यापुरत्या का असेनात, पण मनाला शांत ठेवण्यात प्रभावी ठरतात.
आपल्या शाळकरी वयातील काही अनुभवही मनात इतके खोलवर रुतून बसलेले असतात की व्यावसायिक जगण्यातही ते अलगदपणे वर येतात. त्यांची जाणीव सुखद ठरु शकते आणि आजच्या जगण्याला नवे आयाम देते. उदा. आगाशेला आठवणारी नर्सरी र्‍हाइम्सच्या पुस्तकातील ‘हू किल्ड द कॉक रॉबिन?’ ही कविता अथवा स्वरूपाच्या मनात आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत स्टेजवर जाण्यापूर्वी आणि गेल्यानंतर फुटलेला घाम, भणभणणारं व क्षणात रिकामं झालेलं डोकं ह्याची पंचवीसेक वर्षांनंतरही जिवंत झालेली आठवण.

मला स्वत:ला आवडलेल्या कथा आहेत एकाकीपणाचे पदर ल्यालेल्या, काहीशी गूढ वातावरण-निर्मिती असलेल्या, शिवाय काही मूलभूत संकल्पनांना भिडलेल्या, ‘घर’ आणि ‘जम्प’.
घर म्हणजे नक्की काय? घरात राहणारी माणसं? की त्यांचे एकमेकांशी जोडलेले भावनिक धागे? की ज्या भूमिकांमध्ये स्वत:ला व एकमेकांना पाहतात त्या भूमिका व त्यातून निर्माण होणारी व्यवस्था?
तसेच, मनातील संकल्पनेला अस्तित्व येणं म्हणजे काय आणि ह्या अस्तित्वाचा घेतलेला अनुभव ही या जगण्यातील गंमत आहे का?

काही ठिकाणी एखादा शब्द जरासा खटकतो. उदा. ‘जत्रा’ ह्या कथेतील रोहनच्या तोंडी नियंत्रण ह्याऐवजी कंट्रोल हा शब्द जास्त चपखल वाटला असता. तसेच अलिकडे वडिलांनाही अरे बाबा वा अरे डॅड असं सहजी म्हटलं जात असताना, रोहनचे अहो डॅड जरासे खटकते. पण असे अपवाद वगळले तर रोजच्या संभाषणात इंग्रजीचा झालेला शिरकाव हा ओढून-ताणून आणलेला नसून तो किती सहजी भिनलेला आहे हेही लख्ख जाणवतं.

वरपांगी सुटं भासणारं जगणं आतून एकमेकांशी कसं आणि किती जोडलेलं आहे हे ह्या अर्ध्या उघड्या खिडक्यांतूनही थेटच भिडतं. जेव्हा एखादं पुस्तक मन लावून सलग वाचलं जातं तेव्हा त्या भाषेचा परिणाम नकळतपणे आपल्या विचार करण्यावरही झालेला असतो आणि आपण म्हणतो, आफ्टरऑल धिस इज द लाइफ ऑफ अवर जनरेशन!

चित्रा - २४.४.१६

(‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ - गणेश मतकरी - समकालीन प्रकाशन - पहिली आवृत्ती - रु.१५०/-)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

छान लिहिलंय
वाचून पाहिलं पाहिजे, इंटरेस्टिंग प्रयोग वाटतोय

==

बाकी बर्‍याच दिवसांनी लिहिताय. लिहित रहा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!