दृष्टान्त कथा : काही नोंदी

मुखपृष्ठाविषयी.

दृष्टान्त कथा : काही नोंदी

- जयंत गाडगीळ

महानुभाव वाड्मयात दृष्टान्तांचा विलक्षण प्रभावी वापर केला आहे. ही त्या वाड्मयाची मराठी भाषेला आणि मराठी गद्याला मोठी देणगी मिळालेली आहे. या मोठ्या वारशाचा आपल्याला बहुधा विसर पडलेला आहे. ही प्रासयुक्त भाषा, यमकांचा वापर असलेले गद्य, छोटी वाक्ये, छोटे किस्सेवजा दृष्टान्त एकूण मांडणीला अल्पाक्षर-अर्थ-बहुलत्व देते. पद्याच्या ताकदीनी असे गद्य वापरता येते. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच बहुजन संतकवींची पद्यरचना जेवढी नावाजतात, तेवढी गद्यरचना टिकतही नाही. यामुळे लोकव्यवहाराच्या गद्य भाषेतील म्हणी - वाक्प्रचार कमी होतात, उपमा - उत्प्रेक्षांची विविधता नष्ट होते.

जवळजवळचे अर्थ असणारे अनेक शब्द ज्या भाषेत असतात, त्या भाषेत नेमकेपणे वाक्यरचना करता येते. त्यामुळे नि:संदिग्ध अर्थ असणारी गद्यरचना मान्यता पावते. (अनेक अर्थ सुचवणारी पद्यरचना कमी ताकदीची असते असा याचा अर्थ नाही. म्हणायचे असलेले नेमकेपणे मांडता न येणे हे ती भाषा वापरणार्‍याचे आणि कधीकधी भाषेचे दोष ठरतात.) याउलट एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात, आणि नेमकेपणे व्यक्त होणारे शब्द भाषेत कमी असतात, तेव्हा शब्दश्लेषावर आधारलेले विनोद जास्त निर्माण होतात. हे विनोद काही काळ रंजन करतात. पण त्याचा सुळसुळाट होणे हे तणकट वाढल्याचे लक्षण असते.

मात्र सभ्य समाजाला सभ्यपणा टिकवून धरण्यासाठी चावटपणा, क्वचित अश्लील, लैंगिक किस्से उपयोगी पडतात. सभ्यतेच्या दडपणाखाली दबलेल्या विचारविकारांचे विरेचन होण्यासाठी किश्शांची मदत होते. त्यांच्यामध्ये माणसाच्या किंवा समाजाच्या विसंगती, दुटप्पीपणाचे दर्शन हसतखेळत होते. कधी कधी त्यांतून गंभीर अर्थपण काढता येतो. म्हटले तर शारीरिक प्रेमाचे, म्हटले तर परमात्म्याच्या ओढीचे असे हे वाड्मय नसते. थिल्लरपणे, क्षणिक करमणूक हे या किश्शांचे मुख्य उद्देश असतात. मात्र त्यातूनही काही वेगळाच किंवा गंभीर अर्थ काढता आला, तर एक वेगळीच अनुभूती येते. बरेचदा समाजाच्या मानसात अशा किश्शांचे कालपरत्वे उदात्तपणात रूपांतरण होते. हे रूपांतरण जाणीवपूर्वक करून बघितले, तर संकल्पनांमध्ये कसकसे बदल होतात, याचा अभ्यास करायला हे चांगले उदाहरण आहे.

याखेरीज अनेक वेगवेगळे शब्द, अनेक सूक्ष्म अर्धवट असणारे शब्द त्या काळात प्रचारात होते. ते सध्या फारसे वापरात नाहीत. जे शब्द चलनात, वापरात राहत नाहीत, ते हळूहळू नाहीसे होतात. त्यामुळे भाषेतले मूळ तत्सम - तत्भव शब्द कमी होतात. भाषा आक्रसते. आक्रसणारी भाषा दुसर्‍या भाषेतील शब्द आणि भाषेची मांडणी जशीच्या तशी घेऊ लागते. मराठीत कर्तरी – कर्मणी - भावे प्रयोगाच्या ऐवजी पॅसिव्ह व्हॉईसची मांडणी होते. (उदा. "मराठीत वाक्य असे लिहितात" असे म्हणण्याऐवजी "मराठीत वाक्य असे लिहिले जाते" असा प्रयोग होतो.) मग मूळ भाषेत अभ्यासाचे विषय मांडत नाहीत. ती व्यवहाराची भाषा राहत नाही. मग ती भाषा काही काळ लोकव्यवहाराची भाषा उरते. मात्र कारागीर बोलताना मराठी वाक्यरचनेत इतर शब्द बोलतात. "सायकलची ट्यूब पंक्चर झाली." अशी पंचाहत्तर प्रतिशत इंग्रजी शब्द असलेली मराठी वाक्ये बोलतात. हळूहळू माणसे प्रमाणभाषा, ज्ञानभाषा परकी असली तरी आत्मसात करतात. हिंदी जाहिरातींवरून आणि वृत्तनिवेदनातून हिंदी वळणाची मराठी भाषा वापरण्यास आपण 'सतर्क' होतो. पुढे जाहिरातीत रोमन लिपीत हिंदी शब्द येऊन शब्द, लिपी, आणि मांडणी यांत खूप बदल होतो. आणि मूळ भाषा कमीकमी वापरात राहून नष्ट होऊन तो समाज आपले स्वतंत्र अस्तित्व गमावतो. मराठी भाषा बोलणार्‍यांची एकूण लोकसंख्या जगातील पहिल्या पंधरा भाषांमध्ये असल्याने त्या भाषेला नजिकच्या भविष्यात मरण येण्याची शक्यता नाही. ती जर मेली तर त्याआधी काही हजार भाषा आणि त्या बोलणारे समाज आपले अस्तित्व गमावून बसतील. भाषा मरण्याची पराभूत मनोवृत्ती बाळगायचे आपल्याला कारण नाही. पण आपलीच भाषा प्रभावीपणे वापरण्याची आपल्याला आवश्यकता आहे. त्यासाठी भल्या घरी उधारउसनवारी करून शब्द, आशय, फॉर्म यांच्यात प्रयोग केले पाहिजेत.

म्हणून काही ठिकाणी शब्द, तर कधी मांडणी, तर जवळजवळ सर्वच किश्शांची लोकपरंपरेतून उसनवारी करीत या दृष्टान्तकथा मांडल्या आहेत.

खेळ

परदारारमणांचे दृष्टान्त

१.

परग्रामीचा राओं । वृत्तीशोधाचे उपाओं । महानगरीचे ठाओं । पांते एके । नगरशेटीचे काजे । करी कामकाजे । कार्य करी सहजी । लोकी तैं बडिवार । त्याचा होई ।

परी राही एकला । स्वग्रामीचे अस्तुरीवेगळा । कामक्षुधित । जरि नगरे पण्यांगना । त्यांचा संबंधू वंचना ।
म्हणोनी एकला राही तैसा ।

परी एक दुपारी । पारुखे गरति नारि । तिसी दृष्टिसंकेत करी । वारंवार । तिला त्याने अखेरि । विकरिले नाना परी । आणि त्यानी ठाववेर्‍ही । स्थापिला संबंधु । परी जैसे दिवसांतरी । होई त्यांचा एकसुरी । सिंगारे तो एकपरी । गाठे दुसरीच नारी । ऐसे केले एकसरी । फितविल्या किती नारी । रमण्याचे परदारी । येई पर्व । राये तयासिक सीष्यापिले । आणवी आपुले । नारी ऐसे ।

राओं बोले एकसरे । इये गावी नारिचे नखरे । माझी म्हैळारूसी न बरे । ती तो पतिनिष्ठ ।

----

किस्सा १ : एका गावी नोकरी करणारा एक माणूस होता. त्याने पत्नीला आपलेबरोबर आणले नव्हते. हळूहळू त्याने त्या गावच्या तोपर्यंत सभ्य राहिलेल्या अनेक स्त्रियांबरोबर विवाहबाह्य संबंध प्रस्थापित केले. अखेर त्या गावचा एक पोक्त गृहस्थ त्याला म्हणाला, की असे वागण्यापेक्षा तुम्ही आपल्या पत्नीस का घेऊन येत नाही. त्यावर तो म्हणाला छे, छे भलतेच काय. मला माहित्ये ना, या गावच्या बायका किती बाहेरख्याली आहेत. अशा गावी माझ्या सभ्य बायकोला कशाला आणू.

खेळ

२.

एके नगरे दंपति । दोहोंसी जारकर्मे रति । स्त्रियेसी पुरुषसंगे प्रिती । रायें ललनाविषयी गति । दोहो शय्याचतुर । रतिरंग व्यासंगी नरनार । दोहो अती कामक्षुब्ध । दोहो परशयनी व्यस्त ।

विशेष विळिंचे काळी । राओं परदारा धुंडित घरोघर । जैं राओ स्वगृहापासौन दूर । तै तयाची स्त्री स्वभावे आतुर । व्याहाळी डखलेया चालविली । परपुरुषा पारूखली । तै रावास प्रियपात्रांचा दुष्काळ । ऐसा हिंपुटा सकळ । वनी पैंतला । दोहो एकमेकांचे असणे नेणे । आपुलीच म्हैसारु परस्त्री । आपुलाच स्वामी परपुरुष । दोहोंसी अतिसंतोष । अज्ञाने जाला । रात्रीचा अंधार । दोहो कामांध कामतप्त । एकमेका आलंगुनि घेत । जैंजैं उभयता कामचेष्टित तैंतैं चकित । कवण देशीचे कामखेळिये । ओठ चुंबिती की हे गुर्जर । फुटा-अंचळा निवारिती का हे मद्र देशी । वरियाने निवारित कवळिती म्हणे की हे सिंधुदेशीचे । कर्नाट देश वा तेलंगदेशीचे । ऐसे विभ्रम की हे अंग वा वंग देशीचे । ऐसे कामतृप्त रतिक्लांत सुशुप्त । कवणे पदरवे जागृत । जागसते । जागसते उभय जारकर्माकारणे । आपणासि म्हणती आपण । सदा परदारारमण । तया परगृहीचे स्वामी कवण । अवचटा आगमन । स्वगृही पळा । तंव उभयता आपुलिये घरीचे मंचकी । जाऊनी देती आलिंगन । एकेमेकां अजाण ।

आपुलिये ठायिच ईश्वर । त्यासि धुंडिती दारोदार । बुवा स्वामी मातांचा कहार । आत्मतृप्तीचे भांडार आपुलिये ठायी ।
(व्याहाळ – वनविहार, डखलेया – डुलतडुलत, म्हैळारु – बायको, पारुखणे – वाट बघणे, चेइला जागसता – ज्याची झोप सावध आहे असा निद्रित मनुष्य, फुटा – उपरण्यासारखे पांघरायचे वस्त्र, वरियाने – नितंबिचे वस्त्र, अंचळा – अंतर्वस्त्र, आखूड वस्त्र. )

खेळ

किस्सा २. एका गावी एक नवराबायको राहत होते. दोघेही सारखेच बाहेरख्याली होते. त्यामुळे त्यांना त्या चोरट्यासंबंधातील जोडीदाराच्या येण्याची सतत सावधगिरी बाळगावी लागे. एके दिवशी ते नवराबायको एकमेकांतबरोबरच झोपले होते. अचानक कोणाच्या येण्याचा आवाज आला. त्यावर स्त्रीला वाटले आपला नवरा आला, म्हणून ती दचकून दुसर्‍या खोलीत पळाली. तर नवर्‍यास वाटले त्या परस्त्रीचा नवरा आला. म्हणून तो आपल्याच जोडीदारापासून बाहेर पळाला.

---

३.

एक ग्रामे चहाटळ । एका नरासी भेटे दुजा नर । धरोनी वस्त्र अथवा वाजवी करतल । कानाखाली निघे जाळ । गजबाजिला ।

रे रे जारकर्मी श्रीपाद । माजे पत्नीचा नाद । सांडि ना तरी राख याद । मजाइसा क्रव्याद । कोणी नाही । एरू सांगो जाई काही । दुजा ऐकेचि नाही । उपरी सांगे लवलाही । वाद नको । तैं क्रोधी नर जाई । दुजा चिंताक्रांत होई ।

एरू बैसे अरबळला संचित । त्यासी पुसे अवचित । काय चिंतेचे निमित्त । आप्ता सांगे । म्हणे परस्त्री कोणी । तिचा पती अवलक्षणी । मजसी मारेल कारणी । मज चिंता । सांगे तयासी आप्त परनार नव्हे युक्त । सांडि तिचा नाद । मरणभये ।

काकुळता एरू बोले । माझे नाही काही झाले । परदारीचे नाद खुळे । मज कोणी प्रेमिका नव्हे । तरी मज धमकावे । तरी चिंता वाहे अंतरंगी ।

आणि एके आप्ते तयाला सीष्यापिले । सांडि तिये स्त्रिच्या पदरा । बाईचा नाद नव्हे खरा । एरू म्हणे ऐसे । मज ठाऊकी नसे । ऐसी कोणी स्त्री वा । पुरुष ऐसे ।

आप्त म्हणे ऐसे कैसे । आगीवीण धूर वसे । त्यासी बोले एरू ऐसे । माझे नामही श्रीपाद नसे ॥ १ ॥

ऐसे मूढमती सारे । नसलेलिया चिंताभारे । जाती थकून ।

---

तोचि चहाटळ । दुजे नरासी भेटे । तयासी तैसेचि गजबाजिला ।

ऐसाही तो राओं निश्चित । बसे तैसेचि उदास । पुसे एक । कांई रे तुज न उमटे । तो तुज उरद्रवील ऐसे थाटे । कीरू कुवारून गजबजिला वाटे ।

गजबजिला तयाने खंखोखले । नाना उपाये शांत केले । भयभीत मित्रा ।

एरू म्हणे मित्रा । अंगी कामकळा सत्रा । म्हणोनी पराचे कलत्रा । माझे चित्त ।

ऐसी कितीक मजला नारि । मी न जाणे याची आंबुली खरी । नेमकी कोण म्हणौन । ऐसे भिऊ जाता । मज ठेवणे लागे सावध चित्ता । ऐसाही आता । काळजीने फुका । संबंधु सोडावे ते कैसे ॥ २ ॥

ऐसे कवण करटमती । करू सावरोनी बैसती । संसारी निश्चिंत ।

---

तोचि चहाटळ । निजे नरासी भेटे । भेटे त्यास त्राहाटे । न जाई माझे पत्नीचे वाटे । मजसारिखे वोखटे । कोणी नव्हे । ऐसेचि तयाने । कितिकासी सांगितले । काही भेणे पळाले । काही उगे राहिले । उघडीस आला संबंधु म्हणौनि ।

काही त्यास बोले । तडजोड करू मागे । मी काढता पाय घेई मागे । तूही राहि उगे । नको गवगवा याचा । तैं चहाटळामागे । एक जण येई मागे । पुसे तयासि वेगे । एकटा गाठोनी । रे रे पुरुष चोखटा । तुझे स्त्रीचा चोरटा । संबंधु कितीकांसी । क्रोधाने इतके लोकांसी । फुका कासया बोलसी ।

तुझे म्हैळारूसी घरी । सांभाळी नाना परी । सोडी तीस ना तरी । कारण वेभिचारी ।

चहाटळे अनुवादिले । मी तो कोपु नटलेले । ऐसेचि सोंग केले ।
कधी कोड । कधी कवतूक । मला तरी करमणूक । व्हावी कैसी ।
मज नसे पत्नी । तीज कोणी म्हणोनी । प्रेमपात्र नसे । परी येथे संसारी । नाही पुरुष एक तरी । बोले जो ठाम अंतरी । मी साच म्हणौनि ॥ ३ ॥

ऐसे कितीक । भीती आपल्याच विवेकासी । परि चोरुनी पापासी । शरण जाती ।

खेळ

---

किस्सा ३.
एका गावी अचानक एका माणसाला दुसर्‍याने धरले आणि धमकाविले. काय रे श्रीपाद, माझ्या बायकोचा नाद सोड नाही तर माझ्यासारखा वाईट दुसरा नाही. त्यावर तो माणूस चिंतित झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला समजावले की मग असा नाद सोड. तर त्याने सांगितले, की माझी अशी कोणतीही भनगड नाही. एवढेच काय पण माझे नावही श्रीपाद नाही.

---

चेटकीचे दृष्टान्त

किस्सा : एक माणूस जीव देण्यासाठी गेला. तेथे जिच्याकडे बघून कामेच्छाच काय बघण्याचीसुद्धा इच्छा होणार नाही अशी दिसणारी चेटकी दिसली. तिने त्याला आत्महत्या करण्याचे कारण विचारले. त्याने पत्नी, वंचना, धंद्यातले अपयश, वगैरे ऐहिक कारणांपैकी एक कारण सांगितले. ती म्हणाली, एक रात्र मला कामतृप्त कर. मग मी चेटुकाच्या साहाय्याने तुला पाहिजे ते मिळवून देईन. सारे उपाय केल्यासारखे हाही एक अखेरचा उपाय करावा म्हणून ती रात्र त्याने चेटकिणीसह काढली. चेटकीण तृप्त झाली. सकाळ झाल्यावर त्याने विचारले, तुझे शिक्षण किती झाले? त्याने सांगितले, की तो उच्चशिक्षित आहे. त्यावर चेटकी त्याला म्हणाली, मला एक कळत नाही; इतकी शिकली सवरली माणसे चेटकी वगैरे गोष्टींवर विश्वासच कसा ठेवता तुम्ही?

जीवदेणा कडा । तैं एकवीसे शतकीचा राओं निरास हतास । अरे सांडी । भोगयुगी विरस कैं । मी चेटकी । एक नीशा माझे ठाई निजे । तुजे मनोरथ पुरे पाइजे । तैं राओं शेटकीजे शेजे नाना चोज पावे । राओं शरीरदु:खी । राओं जैं जैं स्त्रीसंबंध दु:ख पाएं तैं तैं सुखाशे अति उत्कट । वसिनएपाठी प्रस्थाने राओं वेगळाति । चेटकी सीष्यापिती । अरे कोई रे विज्ञानवंत । कलियुगी चेटकीचे स्थान । अन्यथा ज्ञान । चेटकीसी रमणे अवधि । रे रे मूढ । जैं तुज चेटकीचा विश्वास तैं आपणावर विश्वास काहांथी । ठाववेर्‍ही राओं जानपन पांता जाला ॥ १ ॥

वेगळाच राओं । तिच चेटकी । जीवदेणा कडा चाचपडे । जीव देणे मिषे चेटी निरखे । चेटकी पुसो गेली । एरु पाहिला राओं सुखिया जाला । जीवदेणी चेष्टा म्हणौनी सुख । कारणे मिया जीवदेणी चेष्टा करू जाणे । मज सुख हवे । धन हवे । नातरि माझे प्राण सांडि । चेटकी सीष्यापिती । गा गा सुख मिळे ना तरि संपत्ति मिळे । सुख संपत्ती एके ठाई कांहाथी । कोणे एकी आस धरि । एक नीशा माझे ठाई नीजे । तुझे एक मनोरथ पूर्ण पाईजे । गे गे चेटकीदेवी । मिया दोन रात्री वसिनले तंव दोहो मनोरथे पुरवि मां । नातरि मी प्राण सांडि । चेटकी एकसरेचि त्राहाटती । एरु कडेपाठी सांडो जाला । माघौता रेंदेयाचंदेया लडबडी रडे ओरडें । चेटकी समागमाची आशा धरितो । जै पूर्ण निरास एक भले । एक आंस एक भले । बहु आंस हावरटे । तैं राओं न चाले पाएं । तंव चेटकी पूर्ण भोगोन सांडे । तंव प्राणी पूर्ण विरक्त होत्सा स्वामीभक्त ठेला ॥ २ ॥

आणि एक राओं । ते चेटकी पुसे । भोगयुगी अवधी पात्रे काहांथी । जैं आस न सुटे तैं चंगळ वोखटी अमंगळ । अमंगळापोटी बहुत निरर्गळ निरास । तैं राओं अनुवादे । मियां पूर्ण निरास तैंत प्राण सांडि । चेटकी राओं विकरिले । तंव आंहिच निरास । ते एके रात्रीस मज निरास न किजे । मिया तंव मनोरथ सिद्ध करी । तैं राओं तैसेची नाना उपावो चेटकी तुष्टली । तैं चेटकी अनुवादे । रे रे बुद्धिवंत । काल तू निरास आज चेटकीसंगी घृना न ठेली । तरि मिया चोखटा राओं निरास कांई । मज तुवा आभारिले । मज आशादान दिल्हे । मज आयुष्यांतरि बहुत होष्यमाण उरे । आता मज जीवेच्छा जाली ॥ ३ ॥

तैसेचि एक थेर जर्जर । चेटकीशी जुगू मागे । तयासी उपानहमुखभंग पाओं जाला । आता कांई बोंबइले । तू थेर मी थेरडी । हे तो सरुपता मुक्ती तरी कामेच्छा न सांडि । त्वा प्रस्तानकळा प्रसवकामी । सरनी पडिजे गा ॥ ४ ॥

येर चेटकीची नाना रुपे । आस दांवि । निरासा उभवी । जगवी । मरवी । चेटकी आशा । तर्‍हि आशा नाना चेटके करी । आशा चेटकीने खादला तंव जन्ममरणी गुंतला । चेटकीपासौन रिघे । हें तो निर्वाण ।

***

मूळ प्रकाशन : खेळ, दिवाळी २००७
चित्रश्रेय : मंगेश नारायणराव काळे

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

व्यभिचाराच्या कथात सामान्य माणूस गुंग होतो.तीच गोष्ट वाढवून पुराणं ,ग्रीक मिथॅालजी ( बनीव/ऐकीय )कथा सुचल्या असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेटकी आणी श्रीपादाची गोष्ट __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेटकीची गोष्ट सगळ्यांत जास्त आवडली. पण यू नो व्हॉट, कॉलिंग धनुष अगेन! ही गोष्ट मी त्याच्याकडून एकदा ऐकली आहे. ती त्याच्याच तोंडून, त्याच्या भोट चेहर्‍यावरच्या निरागस हावभावांसकट आणि त्याच्या पॉजेससकट ऐकण्यात जो हंगामा आहे... ज्याचं नाव ते!

बाकी प्रयोग म्हणून या कथांचं मूल्य आहेच. पण वाचक म्हणून माझा रसभंग झाला. कारण भाषा सवयीची नसणं. परिश्रम करून विनोद समजून घ्यायला लागला, की जे होतं, ते झालं. अर्थात, चिडचिड!

पण चित्रं मात्र खास. या शैलीतली चित्रं मला या अंकात इतरत्रही वापरायला अतिशय आवडली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कथा भारी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0