जीएंना आयुष्यभर सलत असलेल्या दोन गोष्टी: ते ना कवी होऊ शकले, ना चित्रकार...
आज जुलै १० २०१६, जीएंची ९३ वी जयंती....
जीएंना आयुष्यभर सलत असलेल्या दोन गोष्टी: ते ना कवी होऊ शकले, ना चित्रकार...ते किती चांगले कवी होऊ शकले असते ह्याची झलक आपल्याला 'स्वामी' मधील embedded 'कविते'तून येते...
चित्रकारी बद्दल त्यांनी अधून मधून त्रोटक लिहले आहे... ही पहा एक झलक...
जी ए लिहतातः "... मागे बर्याच वर्षांपूर्वी मी थोडा चित्रकार होतो. म्हणजे तसे भव्य, नवीन काही करण्याच्या महत्त्वाकांक्षेने नव्हे. तसली कोणती पालखी खांद्यावर घेणे माझ्या स्वभावात नाही. तर पुष्कळसे झळझळीत रंग वापरावे, एखादी तयार आकृती करावी, एवढ्याच माफक इच्छेचा आणि कुवतीचा. अद्यापही एखाद्या Rembrandt किंवा Vermeer सारख्या अद्वितीय चित्रकाराच्या कृतीची Tolerable copy करू शकतो. पण (काव्याप्रमाणेच) मला स्वतंत्र चित्रदृष्टी नाही... " (आनंद अंतरकर, 'एक धारवाडी कहाणी', २०१५)
मला कधी टेम्प्लेटवजा सूर्योदय नीट काढता आला नाही आणि हा मनुष्य Rembrandt आणि Vermeer ची टॉलरेबल कॉपी करू शकत होता!...आजच्या जगात तशा कॉप्या करून लोक- तथाकथित कलावंत- कोट्यवधी रुपये मिळवतायत. पण तो मार्ग जीएंनी कधी धरला नसता....
समीक्षेचा विषय निवडा
डोहकाळिमा बहुधा
जी.ए.च्या चित्रकलेच्या जाणकारीविषयी सुभाष अवचटांनी त्यांच्या लिहीलेल्या आठवणीतुन माहीती मिळते. चित्रांवर जी.ए. नी केलेले काही मार्मिक अभिप्राय आढळतात. एक बहुधा "डोहकाळिमा" या त्यांच्या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावरील चित्र हे स्वतः जी.ए. नी काढलेल आहे. त्यांच्या पत्रसंग्रहातही काही चित्रकारांचे व्हॅन गॉग व Gauguin इ. चे जिव्हाळ्याने केलेले उल्लेख येतात.
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे चित्रकार व्हाव वा ग्रेससारखी एखादी तरी कविता लिहायला जमणे अशी आस ते व्यक्त करतांना दिसतात.
पण जसे श्री.पु. भागवत एका वेगळ्या संदर्भात म्हणाले होते " सत्यकथे/मौज ने जे मराठी साहीत्याला दिलं नाही त्यापेक्षा जे काही दिलय ते महत्वांच आहे त्याकडे पहावे " अशा अर्थाच काहीस विधान होत हेच जी.ए.ना चपखल लागु होते असे वाटते. जी.एं ना जे जमले नाही त्यापेक्षा जे कथाकार म्हणून साधले ते ही फार मोलाचे वाटते.
मला कधी टेम्प्लेटवजा सूर्योदय
मला कधी टेम्प्लेटवजा सूर्योदय नीट काढता आला नाही आणि हा मनुष्य Rembrandt आणि Vermeer ची टॉलरेबल कॉपी करू शकत होता!...आजच्या जगात तशा कॉप्या करून लोक- तथाकथित कलावंत- कोट्यवधी रुपये मिळवतायत. पण तो मार्ग जीएंनी कधी धरला नसता....
व्यक्तिशः जीएंबद्दल बोलत नाही, पण मला ह्या कलाकार लोकांचं थिंकिंग कधी कळलच नाही. च्यायला, मी पोट भरण्यासाठी पुस्तकं लिहितो, कविता करतो, चित्रं काढतो असं साला कधी म्हणतच नाहीत. कॉपी मारायची तर मारा ना कॉपी, तीच बनवा तुमची बिझनेस स्ट्रॅटेजी. बाजारात माल विकला जातोय ते बघा, नाही खपला तर लोकांना कलेतलं काही कळत नाही, असं म्हणत गळे काढा. एकदा नाव झालं की काहीही, अँडी वॉरहॉलचं केळ्याचं चित्र पण खपतं बाजारात. आम्हाला कलेची सेवा करायची आहे, अमक्यातमक्यासारखं किंवा अजून बरच काही करायचं आहे अश्या गप्पा कशाला मारायच्या?.
याचं थोडक्यात उत्तर म्हणजे
याचं थोडक्यात उत्तर म्हणजे बाजारातली लोकं बाजारचं काम करतात - कोणतं पेंटिंग किंवा कुठलीही वस्तू कितीला विकली जाईल हे पाहातात. कलाकार हा कलेसंबंधी विचार करतो आणि कलाकृती निर्माण करतो. कोण स्पष्टपणे बाजारचा माणूस असतो, कोण अस्सल कलाकार असतो, आणि कोणी दोन्ही डगरींवर पाय ठेवून असतात. या तिन्हीत काही गैर नाही. मात्र एका भूमिकेतून केलेल्या विधानाचा अर्थ दुसऱ्या भूमिकेतून लावण्याचा प्रयत्न करू नये. त्याने विसंगती निर्माण होते.
[अवांतर] वर्मिएर आणि कॉपी
वर्मिएर ची कॉपी कशी करावी?
एका गीक माणसाने आयुष्यात कधीही ब्रश धरला नाही. पण वर्मिएरची कॉपी करण्याचे त्याने त्याच्या बुद्धीच्या जोरावर जे धाडस केले(कदाचित मूळ चित्रकार देखील तितकाच गीक असावा) ते "प्रचंड" यशस्वी झाले. कसे ते या डॉक्युमेंटरीत पाहा. अतिशय रोचक फिल्म आहे.