काही कविता

मी थोड्याच कविता केल्यात...मला तशा यमक जुळणार्याच कविता लिहायला आवड्तात.... इथे असण्याच्या त्या योग्यतेच्या नसल्या तर धागा बिनधास्त काढुन टाकावा...
वसंत, एक गुलाबी स्वप्न...
१.
संपला शिमगा , लागल्या झळा
मोगर्याचा सुवास , अंगणी दरवळला
कितीही भरला उरी, रितेपण कळेना
वैशाख वनव्यात , वाळ्याचा आसरा

ऊन्हाच्या झळा, जाळती जीवा
लाल पळस ओकतो ज्वाळा
निथळला पिंपळ, घालतो सडा
आईच्या माझ्या शेवया पापड्या

आला ग वसंत , फुलला झाडोरा
ढाळली पाने, फुटवा फुटला
रंग उधुळण, निसर्ग नटला
एवढ्या ऊन्हात, चाफा फुलला

२.
आयुष्य समरसुन जगावे पण कधी कधी थकतोच आपण आयुष्य ओढुन...कितितरी हिशेब द्यायचे घ्यायचे असतात...
द्यावा म्हणते हिशोब आयुष्याचा
दिल्या घेतल्या वेदनांचा

काढावा म्हणते उकरून पसारा
उरात कोंबल्या आठवणींचा

उसवावा म्हणते धागा धागा
उरल्या सुरल्या स्वप्नांचा

घ्यावा म्हणते एक एक घास
मनी धरलेल्या इच्छांचा

पहावा म्हणते परतून घाट
चढल्या उतरल्या वाटांचा

चढवावा वाटतो देह सरणावर
आयुष्य ओढून थकलेला

३. कितीतरी दु:ख आपली अशीच असतात... त्या कळा आपणच भोगतो आणि त्या आपल्याच असतात...
कळ
कळ ,कुठूनशी उठणारी
खोल खोल रुतणारी.
एकांताची सोबतीण
गर्दीतही एकांतात लोटणारी
क्षणिक,हवीशी , नकोशी.
बहुतेकदा नकोशीच .
काळाची पुटं चढवूनही
नेमाने येणारी
डोळ्याच्या कडा ओलावणारी
भिजक्या कडा चुकवताना
जिव्हारी वेदना नोंदवणारी
कितीशे हिशेब मांडणारी
हिशेब मांडता मांडता
काहीच शिल्लक नसणारी
शुन्याच्या भोवऱ्यात अजूनच गुरफटणारी
आणि मग त्यातच विरणारी
काळासोबत अजूनच गहिरी होणारी
अंतापर्यंत साथ देणारी , एकटी सोबतीण
म्हणूनच कदाचित आपलीशी वाटणारी ,कळ

४.
मागच्या अंगणात चाफा होता . अगदी सहज चढता येता येयील असा . शिवाय त्यावर आरामात बसता येयील अशी एक अगदी आडवी फांदी होती . त्या फांदीवर बसून झाड हलवले आहे ,त्यालाच लोंबकळले आहे, त्याला झोके घेतले आहेत. आजीला रोजच परडीत फुले वेचुण आणून दिली आहेत . फुलांच्या पाच पाकळ्यांना भोक पाडून ,एक एक पाकळी उलटी करून ती फुलांच्या दांडयात मागून खोचयाच्या कि झाली अंघटी तयार . रोज पाच पाच अंघटया करून घालायच्या . कानात घालायच्या . कानात काही ते दांडे जात नसत मग नुसतीच फुले कानाच्या पाळीवर खोचायची . एक एक पाकळी काढूण ती पाच बोटाला (नखांना )चिकटवायच्या. चाफ्याच्या ,मोगऱ्याच्या कळ्या काढून पाण्यात टाकायच्या . बंद छत्री सारखी दिसणारी चाफ्याची कळी उलगडून बघायची ,उघडत नसे ती मग ती दोन बोटात धरून उगाच फिरवायची .मज्जा नुसती . असे होते चाफ्याचे माझे अनामिक नाते .
नंतर वाड्यातली मागची जागा एका चुलत आजोबांनी विकली . चाफा आणि असंख्य झाडे तिथून तोडली
आता तिथे एक इमारत उभी आहे . आता काहीच शिल्लक नाही तिथे मागच्या अंगणात .पण हि कविता मला अजुनही त्या चाफ्याची आठवण करुन देते..

कशी विसरू तुला ?

पाहून माझे छुमछुमते झुबे
स्मरण होते मजला तुझे
नसे तो वर्ण धमक पिवळा
मधूनच दिसतो शुभ्र पांढरा

नसे तो आवाज किनरा
परी स्पर्श तो मऊ हसरा
नसे जपण्याची व्यर्थ काळजी
असे हजर नाजूक पाकळी

किती केल्या मी तुझ्या कुडया
कानात बसवल्या त्या बुगडया
दुमडून पाकळ्या केल्या अंगठया
रुतवून काटा बसवल्या फिरक्या

कशी विसरू मी चाफ्या तुला
बालपणीच्या ह्या गोड खुणा

field_vote: 
0
No votes yet