'डाऊनटन ॲबी' : स्मरणरंजनी कळा

'डाऊनटन ॲबी' ही मालिका संपून बरेच महिने लोटले; सगळ्या सीझन्सच्या डीव्हीड्याही आल्या. एवढ्या उशीरा ह्याबद्दल लिहिण्याचं कारण खरडफळ्यावर आदूबाळने डाऊनटनची तुलना 'सांस भी कभी बहू थी'शी केली. ह्यामुळे माझ्या ब्रिटीश स्मरणरंजनी भावना दुखावल्या आणि मी लिहिण्यासाठी उद्युक्त झाले.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मालिका सुरू होते; 'टायटॅनिक' बोट बुडल्याची खबर ब्रिटीश वृत्तपत्रांमध्ये छापली गेली त्या दिवशी. शीर्षकातच ज्या ॲबीचा उल्लेख आहे, तिथे राहणारं सरदार - लॉर्ड ग्रँथम ह्याचं कुटूंब आणि तिथे काम करणारे नोकरचाकर ह्यांच्याबद्दल ही मालिका आहे. जुन्या काळातल्या गोष्टी, ते वैभव, सरदार आणि नोकरचाकरांचे कपडे, त्यांच्या पद्धती कशा होत्या हे मला माहीत नाही. त्यामुळे त्याच्या ऐतिहासिक ग्राह्यतेबद्दल मला लिहिता येणार नाही; पण जे दाखवलं आहे ते अनभ्यस्त डोळ्यांना आणि बुद्धीला खुपत नाही

मालिकेचे सहा सीझन आहेत. प्रत्येक सीझनमध्ये कथा पुढे सरकते त्यासोबत त्या-त्या काळात घडलेल्या, समाजावर मोठा परिणाम करणाऱ्या गोष्टींचा संदर्भ आहे. टायटॅनिक बुडणं, पहिलं महायुद्ध, युद्धामुळे स्त्रियांची घरातून बाहेर पडायला सुरुवात होणं, स्त्रियांना सरसकट मताधिकार नसणं, (उल्लेखापुरतं) जालियनवाला बाग हत्याकांड, आयर्लंडचा स्वातंत्र्यलढा अशा निरनिराळ्या गोष्टींचा समाजावर झालेला परिणाम हे सुद्धा डाऊनटनच्या कथेमधलं महत्त्वाचं पात्र आहे. विविध कारणांमुळे सामाजिक बदल घडत जातात; ते आवडोत अगर नावडोत, मान्य करावे लागतात. तरुण पिढीकडे आत्मविश्वास असतो, बंडखोर वृत्ती असते, त्यामुळे तरुण लोक बदलांचं स्वागतच करतात असं नव्हे तर कधी स्वतःच बदल घडवून आणतात. लॉर्ड ग्रँथमच्या घरातली एक नोकर टंकनाच्या परीक्षा लपूनछपून देते, सर्वात धाकट्या सरदारकन्येच्या मदतीने नोकरी मिळवते आणि अगदी शेवटच्या सीझनमध्ये प्रतिष्ठीत, सभ्य स्त्री म्हणून सरदार-दरकदारांसोबत जेवणाची - समानतेची संधी तिला मिळते. सर्वात धाकटी सरदारकन्या - सिबिल - राजकीय सभांना जाते, युद्धकाळात परिचारिकेचं काम करते, एका ड्रायव्हरशी लग्न करते. सिबिलमुळे तिच्या दोन्ही मोठ्या बहिणीही कमी-जास्त प्रमाणात बदलतात.

ह्या बदलांकडे बघताना मधली पिढी - लॉर्ड ग्रँथम आणि त्याच्या वयाचे लोक थोड्या बहुत प्रमाणात साशंक असतात. त्यांच्या पिढीतही बदल घडवून आणण्याची इच्छा असणारी, त्यासाठी कष्ट करणारी श्रीमती क्रॉली नावाची स्त्री आहे. बर्ट्रांड रसलने कोणत्याशा पुस्तकात लिहिलेलं आहे, स्त्रियांना, गुलामांना स्वातंत्र्य मिळावं असं त्यांना स्वतःला वाटत असलं तरीही पुरुषांना, श्रीमंतांना असं वाटत नाही. कारण त्यातून त्यांचं आयुष्य आहे त्यापेक्षा खडतर बनतं. ज्यांच्या आयुष्यात आशा ठेवण्यासारखं फार काही नाही किंवा आपलं सुखही ज्यांना टोचतं, अशा लोकांमुळेच बदल घडून येतात. सरदार घराण्याशी लांबचं नातं असणारी श्रीमती क्रॉली ही सुख टोचणाऱ्या लोकांपैकी एक. तिच्या पात्राला मालिकेत फार फुटेज नाही; तरीही मुद्दाम तिचा उल्लेख केला. कारण डॉवेजर काऊंटेस.

मालिकेतलं सगळ्यात रोचक आणि दिलखेचक पात्र म्हणजे ही आजी. म्हतारीने औद्योगिक क्रांतीनंतर आलेली सुबत्ता, त्या काळात ब्रिटन आणि युरोपमध्ये असलेली (तुलनेत) युद्धरहित शांतता स्वतःच्या तरुण वयात उपभोगलेली आहे. वयानुसार आपल्या मुलाकडे कारभार सोपवताना तिला फार त्रास झाला नसावा. मुलगा आपलं ऐकतो, सून अमेरिकन असली तरीही जुळवून घेते, संपूर्ण गावच आपल्याला नाही म्हणत नाही ह्याची तिला सवय झालेली आहे. लोक आपल्याबद्दल काय बोलतात, आपल्याबद्दल त्यांना किती प्रेम वाटतं ह्याबद्दल डॉवेजर काऊंटेसला काही घेणंदेणं नाही, निदान ती सुरुवातीला तशी दाखवलेली आहे. पैसा आणि सामाजिक स्थान-सन्मान ह्या दोन गोष्टी तिच्या अस्तित्वासाठी पुरेशा आहेत. त्यामुळे अर्थातच कोणत्याही प्रकारचे सामाजिक बदलाचे वारे तिला झेपणारे नाहीत. आपल्या भाचीला समजावताना ती एकदा म्हणतेही, "By any means I cannot be accused of being modern, still ... " आजी घरी एकटी विधवा आणि श्रीमती क्रॉलीसुद्धा. एवढं एक साम्य वगळता बाकी दोघींमध्ये काहीही साम्य नाही. आजी म्हणजे ब्रिटीश परंपरा, सरदारी पोशाखीपणा, सभ्यता, जुन्या परंपरांचा अभिमान बाळगणारी आणि सुरुवातीच्या सीझन्समध्ये 'थेरडेशाहीचा निःपात व्हायला पाहिजे' ह्याची आठवण करून देणारी. श्रीमती क्रॉलीच्या घरात एकही नोकर नाही, साधे कपडे, तरुण वयात तिने परिचारिकेचं काम केलेलं, आता अचानक श्रीमंती आल्यावरही तिचं वर्तन, सामान्य लोकांबद्दल असलेली कळकळ अजिबात कमी झालेली नाही. ह्या दोन स्त्रियांची मैत्री होते, श्रीमती क्रॉलीने दुसरं लग्न केलं तर आपल्याला जिवाभावाचं कोणीही राहणार नाही असं वाटणं असा आजीचाही प्रवास होतो.

ह्या सरदार लोकांना त्या काळानुसार रंगीत, आधुनिक फॅशनचे कपडे घालायला मिळतात. नोकरवर्गाला कायमच ठराविक कपड्यांत बघावं लागतं. पण ही पात्र अधिक मानवी आहेत. त्यांतला सगळ्यात पहिला माणूस म्हणजे टॉमस बॅरो नावाचा नोकर. हा गे दाखवला आहे. त्या काळात समलैंगिकता हा ब्रिटनमध्ये गुन्हा होता. जोडीदार नसणं, कोणीही आपल्यावर प्रेम करत नाही हे वाटणं, आपल्या अस्तित्वालाच गुन्हेगार समजलं जातं ह्यामुळे टॉमस असंतुष्ट आहे; तो सतत काहीतरी काड्या करत असतो. त्याच्या उद्योगांमुळे इतर नोकरचाकर आणि ग्रँथम कुटुंबियांनाही अधूनमधून त्रास होतो. कायद्यानुसार त्याचं समलैंगिक असणं हा गुन्हा होता तरीही कोणी त्याला पोलिसांकडे देत नाहीत. कायदे माणसांना जाचक वाटत असतील तर माणसंही कायद्यांना धूप घालत नाहीत.

ह्या नोकर मंडळींमध्येही तरुणांना नवीन काही करण्याची इच्छा आहे. सुरुवातीला काहीही आकांक्षा नसणाऱ्यांना, इतरांमुळे काही करून दाखवावंसं वाटतं. ज्या गोष्टी डॉवेजर आणि एकंदरच सरदार घराण्याला आपत्तीसारख्या वाटतात, त्या नोकरवर्गासाठी संधी असतात. मालिकेत मध्यमवर्गाचा उदय होताना दिसतो. बटलरचं काम करणाऱ्या, मध्यमवयीन मोलस्लीचं आधी डिमोशन होतं; पण शेवटी तो शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवतो. स्वयंपाकाघरातली मदतनीस म्हणून काम करणारी डेझी घरकामात बढती मिळवतेच, पण पुढे तीही शालेय शिक्षण पूर्ण करते.

मालिकेतली सगळ्यात वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे (मालिका बराच काळ चालत असल्यामुळे) अनेक व्यक्तीरेखा मांडायला पुरेसा काळ मिळाला आहे. जसं टॉमस बॅरोची समलैंगिकता आणि तो कायदेशीर गुन्हा असल्यामुळे तो बरेचदा काहीतरी दुष्टपणा करतो, तशी त्याला मुलांची आवडही असते; सरदारकन्यांच्या मुलांना तो शब्दशः अंगाखांद्यावर खेळवतो; सर्वात थोरली सरदारकन्या मेरी हिला सगळं काही लहानपणापासून मिळालेलं आहे - मोठेपण, सिनीयॉरिटी, पैसा, सन्मान, सामाजिक स्थान, आक्रमक स्वभावही. परंतु, मधल्या बहिणीचा निष्कारण दुस्वास करणं, तिला कमी लेखणं आणि त्या दोघींमधला बेबनाव; ब्रिटीश आणि अमेरिकन संस्कृतींमधला फरक; अल्फा-मेल बनण्यासाठी किंवा बढतीसाठी नोकरांमध्ये चालणारी खेचाखेच आणि त्यांचं मानवीपण ह्या गोष्टी मालिकेत चांगल्या रेखाटल्या आहेत. ह्या सगळ्याला ब्रिटीश विनोदाची भर आहेच.

परंतु, सगळे सरदार-दरकदार लोक एवढे चांगले कसे काय निघतात! डाव्या विचारांच्या ड्रायव्हर जावयाला म्हातारे लोक थोडी काचकूच करत का होईना, स्वीकारतात ही गोष्ट मला फार गोग्गोड वाटते. ब्रिटीश स्टीरीओटाईपनुसार हे लोक अर्थातच आपल्या भावना मेलोड्रामा करून व्यक्त करणार नाहीत; पण आजी एकटीच एवढी खवचट का असावी? (तिचाही खवचटपणा पुढच्या भागांमध्ये कमी करून, प्रेमळपणा वाढवला आहे.) दोन सरदारकन्यांमधला परस्परदुस्वास वगळता मानवी स्वभावामुळे निर्माण झालेल्या अडचणी त्यांना फारशा नाहीत. म्हणून की काय, त्या लोकांमध्ये फार मृत्यु घडतात. त्या मानाने नोकरवर्गात पात्रमृत्यु नाहीत; तिथे तणाव निर्माण करण्यासाठी आपसांतले बेबनाव आहेत. अशा प्रकारचं चित्रण फार टोरी वाटतं.

बाकी माझी कुजकट तक्रार म्हणजे, ह्या लोकांकडे फक्त ख्रिसमसलाच कसा पाऊस/बर्फ पडतो! मेलं आम्ही ब्रिटनमध्ये होतो तेव्हा कधी सलग चार दिवस धो-धो ऊन पडल्याचं आठवत नाही.

डाऊनटनचं संगीत मला फार आवडलं. पहिल्या सीझनचा पहिला भाग सुरू होतानाच दिवस सुरू होण्याची लगबग दाखवलेली आहे. तेव्हा पार्श्वभूमीला वाजणारं संगीत लक्षात राहिलं. इथे संपूर्ण आल्बम ऐकता येईल.

---

१. ह्या मालिकेच्या नावाची सुरुवात क्यूं ने होते ह्याचं कारण न्यूमरॉलॉजी नसून पाश्चात्यांचं अंधानुकरण आहे असं माझं सज्जड मत आहे. आपण कसं 'द गुड, द बॅड, अँड द अग्ली' किंवा 'द इकॉनॉमिस्ट' ह्यांच्या नावांमधले सुरुवातीचे शब्द सोडून देतो आणि फक्त 'गुड, बॅड, अग्ली' किंवा 'इकॉनॉमिस्ट' एवढंच म्हणतो. तसं तिच्याही मालिकेबाबत व्हावं म्हणून तिचं नाव 'क्यूं की सांस...'
२. मालिकेत यॉर्कशरचा भाग प्रामुख्याने दाखवला आहे. डाऊनटन हे गाव अस्तित्वात नाही, पण त्यात येणारे यॉर्क, रिपन आणि थर्स्क ह्या गावांचे उल्लेख मला स्मरणरंजनी बनवतात. उत्तर इंग्लंडात शिकत असताना उन्हाळ्यात अनेकदा मी यॉर्क किंवा रिपनमध्ये विकेण्डचा दिवस घरंगळून काढत असे.
३. नाहीतर अनुराग बासूची मालिका 'रविंद्रनाथांच्या कथा'! तरुण, विधवा स्त्री (राधिका आपटे) एकवस्त्रा असेल हे समजण्यासारखं आहे; पण घरात तरुण, (अ)विवाहित पुरुषमाणसं असतानाही संपूर्ण पाठ दाखवत फिरेल ही गोष्ट अतिशय अनाकलनीय आणि गंडकी वाटते.
४. विधवांना डॉवेजर (dowager) म्हणतात असा नवा अर्थ ह्या मालिकेमुळे समजला. ती राहते त्या घराचा उल्लेख 'डावर हाऊस' (dower house) असा होतो. डावरी (dowry) हा शब्दही ह्या शब्दांशी संबंधित असेल का?
५. स्वयंपाकी, बटलर आणि सैरंध्रीसह
६. दुसऱ्या महायुद्धात कोड ब्रेकिंग यंत्र शोधणारा ॲलन टय्ूरींगचं गे असणं, समलैंगिकतेला गुन्हा मानणारे कायदे, त्यातून आत्महत्या. आठवा - द इमिटेशन गेम.
७. भारतातमध्ये हे अजूनही करावं लागतं ह्याबद्दल खेद; परंतु माणसं अशा कायद्यांना फार धूप घालत नाहीत हे त्यातल्या त्यात आशादायक.
८. ब्रिटनमध्ये मध्यमवर्गाचा उदय कदाचित पहिल्या महायुद्धाच्या थोडा आधीही सुरू झाला असावा, असा अंदाज.
९. उजव्या विचारसरणीच्या, हुजूर पक्षाचं ब्रिटीश बोलीभाषेतलं नाव.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

खूप आवडले. मलाही ती मॅगी स्मिथ ची व्यक्तिरेखा खूप आवडली. ती खवचत, खडूस असली तरी पहिल्या काही एपिसोड्स मधे वाटते (त्याला इन-जनरल तिचे टायटॅनिक पासून इतर चित्रपटांतील रोल्सही कारणीभूत असतील) तशी नाही. तिचे 'कोट्स' फार मस्त आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही मालिका खूप छान होती. त्यांच्या पोशाखीपणाच्या अस्सलतेबद्दल मलाही काही म्हणता नाही येणार, पण त्यातले प्रसंग काही खऱ्या लोकांच्या ऐतिहासिक गोष्टींवर बेतल्याची उदाहरणे दिलेली काही आंतरजालीय पाने सापडतात.
या कुटुंबाचं आडनाव क्रॉली आहे. त्यातली डावजेर ही व्हायलेट आणि सुधारक इसोबेल क्रॉली. मॅगी स्मिथला खूप छान वन लायनर्स पण आहेत. मला तिच्या पात्रासोबतच मि. कार्सनचं पात्रही आवडलं.

हे पाहावे मनाचेचे दोन पैसे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

४. विधवांना डॉवेजर (dowager) म्हणतात असा नवा अर्थ ह्या मालिकेमुळे समजला. ती राहते त्या घराचा उल्लेख 'डावर हाऊस' (dower house) असा होतो. डावरी (dowry) हा शब्दही ह्या शब्दांशी संबंधित असेल का?

en-dow-ment शी संबंध सार्‍यांचा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेगळ्या धाग्याचा ऐवज असलेला प्रतिसाद.

>>सगळे सरदार-दरकदार लोक एवढे चांगले कसे काय निघतात! डाव्या विचारांच्या ड्रायव्हर जावयाला म्हातारे लोक थोडी काचकूच करत का होईना, स्वीकारतात ही गोष्ट मला फार गोग्गोड वाटते.

>>अशा प्रकारचं चित्रण फार टोरी वाटतं.

विसाव्या शतकाची सुरुवात ते दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीचा हा काळ ब्रिटनमध्ये आणि युरोपमध्ये खूप संक्रमणाचा काळ होता. ह्या काळाचं रोचक आणि थोड्या वेगळ्या अंगाचं (ब्लूम्सबरी गट) चित्रण वाचण्यात रस असेल तर ही पुस्तकं सुचवेन -

हॉवर्ड्स एन्ड - इ एम फॉर्स्टर
ब्राइड्सहेड रिव्हिजिटेड - एव्हलिन वॉ

(दोन्ही कादंबऱ्यांची नावं स्थानदर्शक आहेत हा आणखी एक योगायोग)

रिमेन्स ऑफ द डे - काझुओ इशिगुरो

(ह्यातल्या प्रत्येकावर चित्रपट किंवा मालिका झाली आहे. पण प्रत्येक तुलनेत मला कादंबरी अधिक बरी वाटते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विसाव्या शतकाची सुरुवात ते दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीचा हा काळ ब्रिटनमध्ये आणि युरोपमध्ये खूप संक्रमणाचा काळ होता. >>> मला एक मिनीट वाटले एखाद्या पुणे-५२ टाईप हेवी मराठी पिक्चरचे परीक्षण इथून सुरू होत आहे :). जस्ट किडिंग

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विस्तारभयास्तव मुळात काही गोष्टी लिहिल्या नव्हत्या.

अनेक पात्रांची राहणी, स्वभाव ह्यांना परस्परविरोधी असे संघर्ष काही प्रमाणात मालिकेत आहेत. विशेषतः श्रीमंत लोकांच्या आयुष्यांत फार संघर्ष नाहीत अशी तक्रार केल्यावर हे मुद्दाम लिहावेसे वाटतात.

सरदार कुटुंबाचा (पुरुषप्रधान पद्धतीनुसार) प्रमुख आहे तो लॉर्ड ग्रँथम. हा दिलदार वृत्तीचा मनुष्य आहे; श्रीमंतीमुळे माज असण्याच्या अगदी उलट; ह्याला जबाबदारीची जाणीव आहे. आपली श्रीमंती राहणी आपण टिकवून ठेवायला हवी, कारण आपल्या अशा राहणीमुळे गावातल्या अनेकांना स्वयंपाकी, वाढपी, सैरंध्री, व्हॅले, ड्रायव्हर अशा नोकऱ्या मिळतात ह्याची जाणीव त्याला आहे. आपल्या बटलरकडून नियमांचा अतिरेक होतोय आणि त्यातून माणसं दुखावली जात आहेत असं दिसल्यावर लॉर्ड ग्रँथम वेळप्रसंगी नियम, नीतीमत्ता गुंडाळायलाही कमी करत नाही. अशा व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष आणायचा हे काम थोडं कठीण. पण डाव्या विचारांचा, ड्रायव्हर जावई येणार म्हटल्यावर तो सुद्धा सामाजिक बंधनं झुगारून देऊ शकत नाही. काही काळ कुटुंबात तणाव निर्माण होतो.

ह्या पार्श्वभूमीवर विचार करता, श्रीमंतीत लोळणाऱ्या स्त्रियांमध्ये आपसांत बेबनाव फार दिसतात. दोन बहिणी, कुटुंबातल्या दोन स्त्रिया, आई-मुलगी अशा प्रकारच्या नात्यांमध्ये. ह्याचं कारण हळूहळू दिसायला लागतं. ह्या श्रीमंत बायका वगळता बाकीच्या लोकांना काही ना काही काम आहे; नोकरचाकरांना काम करण्याशिवाय पर्यायच नाही. श्रीमंत पुरुषांना श्रीमंती सांभाळणे-वाढवणे(!) किंवा हॉस्पिटलच्या कमिटीवर असणे अशासारखी कामं आहेत. श्रीमंत स्त्रियांना अधूनमधून कोणत्यातरी उद्घाटन समारंभात फीत कापायला जाणं, असं बारकं काही वगळता डोक्याला आणि शरीराला कष्ट नाहीत. सिमोन दी बोव्हार 'द सेकंड सेक्स'मध्ये बूर्ज्वा स्त्रियांच्या कंटाळ्याचं जे कारण देते ते इथेही दिसतं. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळणं, त्यांना इस्टेटीचा हक्क मिळणं, ह्या हक्कांबरोबर जबाबदाऱ्या येणं अशा गोष्टी मालिकेत साधारण एकाच काळात घडतात. त्यानंतर ह्या स्त्रियांचे आपसांतले बेबनाव बरेच कमी होतात.

टॉमस बॅरोचं समलैंगिक असणं सगळ्यांना माहीत असतं, काहीसं गृहीत धरलेलं असतं. त्याची तक्रार होत नाही ह्याचं कारण माणसं तशी क्षमाशीलच असतात, हे पटतं. काही अंशी, आपल्या मालकाच्या कुटुंबाची बदनामी होईल म्हणूनही गोपनीयता राखली जाते. इज्जत-अब्रूच्या विचित्र कल्पनांपायी स्ट्रेट-पुरुष नसलात तर त्रास होणं अपेक्षितच. सरदारकन्येला विवाहबाह्य संबंधांमधून मूल होतं; पण ह्या मुलीचं वास्तव ती चारचौघांत स्वीकारू शकत नाही. घरातल्या एक नोकर स्त्रीवर बलात्कार होतो, पण ह्याची वाच्यता अन्नदात्यांच्या बदनामीच्या भीतीपोटी ती करू शकत नाही. बलात्कार करणाऱ्याचा खून झालेला दाखवून, 'दोषी कोण' ह्यातून निर्माण झालेला संघर्ष आजच्या काळात दाखवणं कृतक वाटतं.

तसा मालिकेचा शेवट अगदीच गोडगोड केला आहे. जी जे वांछील ती ते लाहो, म्हणत टीआरपीचीही काळजी घेतलेली आहे. त्यामुळे फार वैताग आलाच तर मालिकेसाठीच रेकॉर्ड केलेलं हे गाणं ऐकायचं आणि आपल्या कामाला लागायचं.

१. हा अभिनेता म्हणजे 'नॉटिंग िहल' चित्रपटातला बर्नी; शेअर ट्रेडर; प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आपल्या मित्राकडे जेवायला आलेली आहे हे लक्षात येण्याआधी "तुला गेल्या चित्रपटात किती पैसे मिळाले होते" असं विचारणारा. हा उल्लेख अशासाठी की, धाकट्या सरदारकन्येचं काम करणाऱ्या अभिनेत्रीने तिसऱ्या सीझननंतर मालिकेतून अंग काढून घेतलं. त्याच प्रकारच्या पात्रांमध्ये स्टिरीओटायपिंग होईल, अशी भीती तिला वाटली.१अ
१अ. 'कपलिंग' ह्या ब्रिटीश मालिकेतलं सगळ्यात दिलखेचक पात्र जेफ. ह्या अभिनेत्यानेही स्टिरीओटायपिंगच्या भीतीपोटी शेवटच्या, चौथ्या सीझनमधून अंग काढून घेतलं; 'कपलिंग'चा चौथा सीझन इतर तिनांच्या मानाने सपक वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या धाग्याच्या निमित्ताने (लेडी मेरी च्या निमित्ताने) दोन अप्रतिम चित्रपट आठवले :

गतवर्षीचा :

आणि या वर्षीचा (अतिशय आवडला, नावावर जाऊ नका, नाव कितीही क्लिशेड असलं तरी चित्रपट भन्नाट आहे) :

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

जंतू आणि नील लोमस ह्यांचा निषेध. कामं वाढवून ठेवतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती तै, हा बोर्ड गेम पण आहे तुमच्या आवडत्या सेरीअल चा. खेळला आहात का कधी?

http://destinationboardgames.com/collections/downton-abbey/products/dest...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कंंटाळा आलेला असताना समोर दिसली आणि ऐसीवर कोणीतरी चांगलं म्हटल्याचं वाचलेलं आठवत होतं म्हणून सव्वा सीझन पाहिला. आदूबाळाशी अगदी सहमत आहे. आहे मुळात 'सोप ऑपेरा'च पण 'आपण कै सोप ऑपेरा बघणारे नै कै' वाले लोक तसं म्हणायच्या ऐवजी 'पीरियड ड्रामा' म्हणतात असं एके ठिकाणी वाचलं ते पटलं. Biggrin

अशा प्रकारचं चित्रण फार टोरी वाटतं.

सहमत. मालिकेचा लेखक निर्माता टोरी पक्षाकडून हाऊस ऑफ लॉर्ड्सचा सदस्य आहे हे वाचल्यावर आश्चर्य वाटलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी पण एक सिझन कसाबसा संपवला. नंतर पाहयाची इच्छा नाही झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मी पण एक सिझन कसाबसा संपवला.

का बरे? संपविण्याची सक्ती नक्की कोणी केली होती?

नाही आवडत आहे, बंद करून टाकायचा टीव्ही! आहे काय, नि नाही काय? शेवटपर्यंत थांबायचे कशाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्या भागानंतर बरी वाटलेली पण नंतर अगदीच बोर झाली. आता आलीच्चे संपत तर संपवू म्हणुन बघितला. पण तुम्ही म्हणता तो न्याय नंतर मनी हाईस्ट आणी माइंड हंटर या दोन सिरियल्सना लावला. पाहिला भाग अर्धा पाऊण बघुन सोडून दिल्या दोन्ही सिरियला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

संबंधित विषयावरील एक ३ भागीय documentary:
https://www.youtube.com/watch?v=wqiMASk5MIU
ही documentary आधी बघितली असती तर मलिका बघवली नसती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझं कुतूहल म्हणून प्रश्न - ज्यांना ही मालिका फारशी आवडली नाही, सहन झाली नाही, त्यांनी कोणी 'गिलमोर गर्ल्स' किंवा 'मार्व्हलस मिसेस मेझल' बघितल्यात का? बघितल्या, किंचित चाखल्या असल्यात तर काय मत पडलं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या दोन्ही maalikaa नाहीं पाहिल्या. डाउंटन अबी सुरुवातीला आवडण्याचे कारण त्यातले ब्रिटिश उमराव घराचे चित्रण होते. बटलर, फुटमन, मेड इत्यादी लोक बघताना छान वाटलेले. पण त्यातले नाविन्य संपल्यावर बोर झाली मालिका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मार्व्हलस मिसेस मेझल बऱ्यापैकी आवडली. मालिका दिसायला छान आहे, विनोदी आहे. आमच्या विद्यापीठाचं आणि घराजवळच्या भागाचं शूटिंग आहे हा बोनस. Biggrin गिल्मोर गर्ल्स पाहिली नाही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन्ही मालिका एकाच निर्मातीच्या आहेत. मला मिसेस मेझल जास्त आवडते. एकदा तिच्या एकपात्री विनोदांची सवय झाल्यावर मग तिचं स्वकेंद्रित वर्तन आणि माणसां-माणसांतली नाती कशी दाखवली आहेत, त्यासाठी बघितली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पूर्ण सिरीज दुसऱ्यांदा सलग पाहिली. पुन्हा तितकीच आवडली. रोमॅण्टिक संवाद ७० मधल्या मराठी कादंबऱ्यांसारखे चीजी आहेत पण बाकी संवाद, प्रसंग, अभिनय, नेपथ्य सगळेच खिळवून ठेवते.

यावर एक चित्रपटही आला आहे (अमेरिकेत एचबीओ मॅक्स वर आहे). त्यातली कथा या कथेच्या पुढची आहे. कलाकार बरेचसे (किंबहुना सर्वच) तेच असल्याने सलगता आहे. तो चित्रपटही मला खूप आवडला. तो चित्रपट पाहिल्यानेच पुन्हा सिरीज मधे इण्टरेस्ट निर्माण झाला.

डॉवेजर काउण्टेस व्हायोलेट हे पात्र भन्नाट आहे. मॅगी स्मिथचे कामही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डावेजर काउंटेस आणि श्रीमती क्रॉली ह्यांचं बदलत जाणारं नातंसुद्धा मला आवडलं.

नंतर बघताना वाटलं, मधली मुलगी इडिथ, कर्तबगार आहे. पण ज्या काळात तिनं घरात बसणं अपेक्षित होतं तेव्हा तिची खूपच कुचंबणा होते.

सिनेमा अजून बघितलेला नाही. बघितला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुला सिरीज आवडली असेल तर पिक्चर नक्कीच आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथावस्तू बाजूला राहूंदे. पण अतिशय सुंदर दृष्य, उजेडाचा लाजवाब वापर, नेमक्या अँगलने कॅमेरे लावून केलेलं सुरेख चित्रण, एकाही फ्रेममधे न ढळलेलं नेपथ्य, ओव्हरऑल तांत्रिक सफाई हे सगळं बघायला तरी ही मालिका जरूर बघा असं सुचवेन. आणि हे सगळं 'मेह' वाटलं तर फाष्ट फारवर्ड करत करत निदान डोवेजर काउंटेस या आजीचं अप्रतिम काम तरी बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

“First electricity, now telephones. Sometimes I feel as if I’m living in an H.G. Wells novel.”

“Vulgarity is no substitute for wit.”

Isobel: “Servants are human beings too.”
Violet: “Yes. But preferably only on their days off.”

Cora: “I take that as a compliment.”
Violet: “I must have said it wrong.”

[to Cora] I'm so looking forward to seeing your mother again. When I'm with her I'm reminded of the virtues of the English.
Matthew : But isn't she American?
Violet: Exactly.

खरे म्हणजे ती यातली लीड नाही. स्क्रीन टाइमच्या हिशेबाने टॉप ५ मधेही नाही. पण हळूहळू डेव्हलप केलेले तिचे कॅरेक्टर नंतर आले की पूर्ण सीनची पकड घेते. खूप लेयर्ड व्यक्तिरेखा आहे. ब्रिटिश उमराव लोक सोडून सर्व जगाबद्दलची तुच्छता, पण स्वतःच्या कुटुंबाकरता काहीही करण्याची तयारी, तर कधी मोक्याच्या वेळी लोकांना योग्य दिशा देणारी म्हातारी - टोटल अर्क उतरला आहे यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहितीपूर्ण लेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग