काळे पहाड आणि दुष्टभू- साउथ डाकोटा

मिनेसोटा राज्यातून कार धावत होती. धावत्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मेपल्स, ओक्स, फर्स आणि इतर उंचउंच झाडांची दाटी, नेटकी शेतं, त्यातल्या फार्महाऊसेस आणि बार्न्सच्या भोवती गर्द झाडी बहुतेकवेळा असणारच. आणि मग विस्तीर्ण अशी मक्याची, सोयाबीनची शेते. लालस भुरकट तुऱ्यांखाली मक्याच्या हिरव्या धांड्यांच्या रांगा आणि गर्द हिरवे सोयाबीन अशी दुरंगी शेते मैलोगणती पसरलेली. मिनेसोटा राज्यच ‘लेक’रवाळे. त्यामुळे अनेक तळी, तलाव, सरोवरे... नजरेला थंडगार स्पर्श सतत जाणवत रहातो त्यांचा. मिसिसिपीची महानदी आणि तिच्या सख्या अधूनमधून दिसत रहातात. मधूनमधून लागणारी छोटी देखणी, आखीवरेखीव टुमदार नगरे... ही सारी दृश्ये आता परिचयाची झालेली इतकं मिनेसोटा राज्यात फिरून झालेलं. आता आम्ही साउथ डाकोटाला निघालेलो. माउंट रश्मोर, कस्टर नॅशनल पार्क, ब्लॅक हिल्स, क्रेझी हॉर्स, बॅडलॅन्ड्स नॅशनल पार्क हे सारं चार दिवसांत पाहायचं म्हणजे आव्हानच होतं. पण जेवढं जमेल तेवढं पाहायला निघालो होतो. रवी-गौरी दोघे ड्राइव करणार होते. दोघांनाही ड्राइव करायला प्रचंडच आवडतं त्यामुळे कंटाळ्याची बातच नव्हती.
स्यू फॉल्सच्या आगेमागे कुठेतरी मिनेसोटा राज्याची हद्द संपली. मिसुरी नदी आडवी पसरलेली दिसली. काही तलाव दिसले. आणि काही मिनिटांतच सपाट मैदानी प्रेअरीचा, स्टेपचा, गवताळ जमिनींचा प्रदेश सुरू झाला. गवत वाढवून ती कापून त्याच्या नीटस गलेलठ्ठ गुंडाळगंज्या करून ठेवलेल्या दिसत होत्या. ते गवत भिजू नये म्हणून त्यावर घट्ट प्लास्टिकचं आवरणही होतं. जराही गवत वाया जात नव्हतं. कोकणात मार्च-एप्रिल-मे मध्ये अमाप वाढलेल्या गवतामुळे वणवे जातात- पण ते कुणी कापून ठेवत नाही नि विकत नाही याची आठवण झाली. आता हे गवताळ प्रदेश बिनमालकीचे राहिले नाहीत. ते इतिहासजमा झालं. अमेरिकन शासनाने बाहेरून आलेल्यांना शेती करण्याच्या बोलीवर स्वस्तात जमिनी दिल्यात, शेतीसाठी आर्थिक मदत, कर्ज वगैरे असते. दूध आणि मांसासाठी भरपूर गायी पाळलेल्या दिसल्या. गवतात चरणारे तुस्त गायींचे तांडे पाहायाला मिळत होते. काही ठिकाणी घोड्यांचे कळप होते.
आता या भागात सोयाबीन क्वचितच दिसू लागलं. सगळीकडे मक्याची शेती, जांभळट छटा असलेलं ल्यूसेर्न गवत. गोलगोल तुळतुळीत डोकी वर काढल्यासारखे सिलोज्- म्हणजे धान्याची कोठारे. पवनचक्क्यांच्या फौजा. वर निळेशार आकाश. तुरळक ढग. समोरच्या रस्त्याची पट्टी कधी संपणारच नाही की काय असं वाटावं. सूर्य पश्चिमेला झुकला. त्या सोनेरी प्रकाशात अचानक पिवळ्या रंगाची उधळण जमिनीवर झालेली दूरवर दिसू लागली. रस्त्याकडेपासून क्षितिजापर्यंत सोनसळी पिवळ्याचे शिंपण. अगदी जवळ पोहोचलो तेव्हा कळले ही सूर्यफुलांची शेते.
शेकडो हजारो एकरांवर एकच पीक पाहाण्याचं सुख काही वेगळंच असतं डोळ्याला. त्यात पिवळा रंगाचं शेत आणि वर गर्द निळं आकाश... थोडी पांढऱ्या ढगांची वलये. दूरवरपर्यंत व्हॅन गॉच्या डोळ्यांतून साठून त्याच्या चित्रांत सांडलेले वास्तवच असीम.
सूर्य मावळल्यानंतरही कितीतरी वेळ राहाणाऱ्या लालस मंद प्रकाशात ही दिठीची मिठी सुटत नव्हती. अखेर नीट अंधार झाला. आणि दक्षिण क्षितिजावर अगदी दूर विजा चमकत आहेत हे कळू लागलं. तोवर रॅपिड सिटीचा आकाशातला आभागोल दिसू लागलेला. विजाही तिथल्याच आसमंतात चकाकत होत्या. आम्ही त्या विजांच्या दिशेनेच सरळसोट रस्त्याने जात होतो. हांहां म्हणता समोर, उजवीकडे, डावीकडे सगळीकडेच विजांचा नाच सुरू होता. आकाश सारीकडून लखलखत होतं.
रश्मोरचे हवामान गूगलवर तपासले. आज आणि उद्या वादळी पाऊस असणार होता... वावावा... ऐन पावसात रश्मोर पाहायला मजाच! माझं पावसाचं वेड बोललं.
रॅपिड सिटीत पोहोचलो तोवर विजापावसाचा जोर जरा कमीच झालेला. आणि हर्मोसा या गावात- जिथे रहाणार होतो तिथे पोहोचेपर्यंत तर सारं थांबलंच.
आहाः! ज्या घरात रहाणार होतो त्या घराचे सर्व बाहेरचे दिवे मालकाने लावून ठेवलेलं. अंधारातून डोकावणारा तो घराचा चेहरामोहरा सुंदरच होता. आणि आत गेल्यावर तर त्या सुंदरतेने काबीज करून टाकलं आम्हाला.
ही एअरबीनबीची सोय म्हणजे थोरच आहे... पण बारा तासाचा प्रवास करून आल्यावर बिछान्याचं सौंदर्य जास्त मोहक वाटतं! उद्या सकाळी लवकर उठायचं वगैरे मनाशी ठरवत सगळेच टपकन् झोपी गेलो.
--
सकाळ जराशी उशीराच झाली. सहा वाजता उठायचं ठरवून साडेसात वाजवले आम्ही. वादळाचा काही पत्ताच नव्हता. आकाश स्वच्छ निळाईत दंग होतं. उन्हं वर आलेली तरीही काचा उघडून बाहेरच्या गॅलरीत पाऊल ठेवलं तर थंडगार झटका लागला. जवळच एक बसक्या बांध्याचं आडवं टेकाड पसरलेलं. समोर एक हिरव्या छटेतलं दुमजली घर. दारासमोर तीन वाहनं. एक कॅडिलॅक, एक जीप आणि एक पिकअप. घराच्या पलिकडे गुब्गुबित कोंबड्या नि टर्क्या धावत बागडत होत्या. घराभोवती एक राखी रंगाचा कुत्रा फिरत होता. हे असणार एखाद्या एकरोगणती शेताच्या मालकाचं घर. तेवढ्यात एक आडवा आडदांड माणूस घाईघाईने बाहेर आला आणि जीपमधे बसून भुर्रकन् गेला.
आम्ही रहात होतो त्या घराचा मालक बहुधा माजी शिकारी आणि आजी निसर्गप्रेमी असणार. घरात चार बदकांच्या ट्रॉफीज होत्या. आणि बाकी सगळीकडे वेगवेगळ्या प्राण्यापक्ष्यांचे फोटो, चित्रे असलेल्या छोट्यामोठ्या वस्तू. एक से बढकर एक कॉफी मग्जचं कलेक्शन. दुमजली घर आणि खाली बेसमेन्ट मिळून पाच बेडरूम्स होत्या. भला मोठा व्हरांडा. दोन झोपाळे. रश्मोर, कस्टरचा बुलावा नसता तर चारही दिवस घरातच मस्त घालवता येतील इतकं मस्त होतं सारं. समोर मक्याचं शेत होतं. गवताळ कुरण त्याला लागूनच होतं. ब्लॅक बर्ड्सचा थवा झेपावत यायचा. घराच्या प्रवेशद्वारासमोर सायप्रसचे उंच सुगंधी वृक्ष होते. आणि इथून दूरची एक जांभळट फिकट टेकडी दिसायची. शांततेचा गहिंवर दाटलेला. त्यातून क्वचित पारव्यांची किळ्ळकिळ्ळ, इतर अनोळखी पाखरांची किलबिल आणि क्वचित रस्त्याने जाणाऱ्या गाडीची हलकीच घुरघुर.
रश्मोरच्या रस्त्याला झटपट लागलो... हर्मोसामधून ब्लॅक हिल्स म्हटल्या जाणाऱ्या नॅशनल पार्कमधून रस्ता जात होता. काळे पहाड...
काळ्या दगडांच्या किती किती परी... सह्याद्रीतील काळ्या बसाल्टपेक्षा अगदीच वेगळा असा अवतार होता या पाषाणांचा. चपट्याचपट्या थरांवर थर चढून तयार झालेले, आडवे उभे- आत्ता कोसळतील की काय असं वाटावं असल्या खतरनाक आकारांत उभे राहिलेले खडक. प्रथम दृष्टीक्षेपात जणू कुठल्या प्राचीन किल्ल्यांच्या ढासळलेल्या भिंतीच वाटाव्यात. मग लक्षात आलं की हा पाषाण म्हणजे अग्निजन्य बसाल्ट नव्हताच. त्यात होता ग्रॅनाईट... वालुकाश्मही त्यातच. दोन ते तीन अब्ज वर्षांपूर्वी- पृथ्वीच्या पृथ्वी होण्याच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिकन टेक्टॉनिक प्लेट- भूपृष्ठ खंड दुसऱ्या टेक्टॉनोस्ट्रॅटिग्राफिक टेरान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पृष्ठखंडावर टक्करल्यामुळे जी काही घुसळण, तप्तकल्लोळ करीत गेला त्यातून जे काही आकाराला आले त्यात अग्निजन्य अधिक रुपांतरित असे ग्रेनाईटचे खडक निर्माण झाले. आणि नंतर सहासष्ट दशलक्ष वर्षे ते तीन दशलक्ष वर्षे या काळातील ज्वालामुखींच्या उत्सर्गांनंतर खालचा भूस्तर वर ढकलला जाऊन- अपलिफ्ट- या ग्रेनाईटच्या खडकांचे सुळके, पर्वत वर आले. संपूर्ण सपाट अशा प्रेअरी भूभागाच्या मध्येच हे पर्वत जन्मले ते असे. येलो स्टोन, ग्रेट टेक्टॉन पासून ते या धारेपर्यंत हा सारा भाग एकाच भूआंदोलनाचा भाग असावा. पण येलोस्टोनच्या कॅल्डेरापेक्षाही इथली भूगर्भीय घडामोड अतिशय गुंतागुंतीची आहे.
या ग्रेनाईटचा रंग पांढरट, गुलाबी, भस्मरंगी अशा मिश्र छटांचा आहे. युगानुयुगांच्या वाऱ्यापावसामुळे त्यावर वाढणाऱ्या, सुकणाऱ्या शैवालामुळे तो कुठेकुठे काळसर दिसतो.
ब्लॅक हिल्स हे नाव इथल्या लाकोटा या मूळ अमेरिकन वंशाच्या जमातीच्या भाषेतील पाहॉ सॅपा या नावाचे इंग्रजी रुपांतर. इथे वाढणाऱ्या गर्द वृक्षराजीमुळे दुरून हे पहाड काळे दिसतात म्हणून त्यांचे नाव काळे पहाड पडले. पाषाणाच्या काळेगोरेपणाशी त्याचा संबंध नाही. इतरही काही मूळ अमेरिकन जमातींच्या भाषांतली नावेही काळे पहाड या अर्थीच आहेत हे विशेष.
खडकांचे आकार खुळावून पाहातानाच मधूनच दिसू लागली- हरणं. युगानुयुगे अचल राहिलेल्या कातळमायेतून फिरणारी चंचल मायावी हरणं?!
या अवघड टेकड्यांनाही प्रेमळ कूस लाभलेली आहे मधूनमधून. तेवढ्या सपाटीतही थोडी शेती, काही घरं, आणि पर्यटकांच्या सोयीसाठी सुबकशी विश्रांतीस्थाने आहेत. त्यातल्याच एका कुशीत वसलेलं एक टुरिस्टी गाव- कीस्टोन. रश्मोरपासून अगदी जवळ रहायचं असेल तर कीस्टोनमध्ये खूप सोयी आहेत. अगदी छानसं सुंदर गाव आहे. जाताजाता वाटेत रस्त्याकडेला डोळे चिकटले. एका आवारात जणू खडकांचं प्रदर्शनच भरलेलं. थांबू या थांबू या ओरडलेच सगळे. शेजारच्या गल्लीत गाडी उभी केली आणि पाहिलं तर कोपऱ्यावरचं दुकान काउबॉय जमान्यातल्या अँटिक्सचं होतं. जुन्या रिकिबी, जुने स्टोव्हज्, भट्ट्यांपासून कायकाय होतं. पण आमचे डोळे ओढले गेले होते खडकांच्या लखलखाटाकडे. रॉक शेड नावाचं छोटंसं टुमदार दुकान होतं. पण सगळा कच्चा खडकमाल बाहेरच. किंमतींच्या पाट्या, नावांच्या पाट्या सगळं शिस्तशीर होतं. खाली पडलेल्या दगडगोट्यांतून काहीही वेचा ते सगळं तीन डॉलर्सला एक पौंड हिशेबाने घेऊन जा म्हणून सांगितलेलं. दुकान चालवत होती एकच मुलगी. तिच्या वडिलांनी सुरू केलेलं दुकान.
आम्ही सर्वांनी भरपूर पाहून घेतलं, मग भरपूर खरेदी केली. माझ्या संग्रही जे नमुन्यालाही नव्हतं ते सारं घेतलं. खूप दिवसांपासून हवासा असलेला सेलेनाइटचा पीस घेतला. थोडे फ्लुरोसंट खडक मिळाले. खालच्या ग्रॅव्हलमधून कायकाय वेचायला पोरांना तर जाम मजा येत होती. आमच्या जिऑलजीच्या विद्यार्थ्यांची खूप आठवण झाली.
त्या खडकांगणात ठेवलेले वृक्षजीवाश्म भलेथोरले होते. नमुनेदार होते. ऑब्सिडियनचे, सेलेनाईट, रोझ क्वार्ट्झचे मोठमोठे खडक आणि अगणित प्रकारांतील छोटेमोठे नमुनेदार खडक- पोट भरतच नव्हतं पाहून. मेजवानीच.
कीस्टोनच्या त्या दुकानातून कसेबसे ओढत बाहेर पडलो. आणि रश्मोरच्या दिशेने निघालो. दुरूनच त्याचं पांढरं गुलाबी डोकं दिसू लागलं.
हिचकॉकच्या नॉर्थ बाय नॉर्थवेस्टमध्ये कॅरी ग्रान्ट या शिल्पातील दोन मस्तकांच्या मधून नायिकेला घेऊन लपतछपत उतरतो ते पाहिलं होतं तेव्हा मी पंधरा-सोळा वर्षांची असेन. पण तेव्हापासून रश्मोरबद्दल औत्सुक्य मनात होतं. पर्वतमाथ्यावर कोरलेले राष्ट्राध्यक्षांचे चेहरे...
ती शिल्पे सोप्या वालुकाश्मात कोरलेली असावीत असा समज झाला होता. फोटोग्राफ्समधून त्याचा बदामी रंग अगदी वालुकाश्मासारखाच भासतो. पण मग कळलं हा तर कोरीव काम करायला सर्वात आव्हानात्मक खडक... नाइस- Gneiss- रुपांतरित ग्रेनाईट.
प्रवेशद्वारापासून दोन किलोमीटरवर असताना ते चारही चेहरे स्पष्ट दिसू लागले. वॉशिंग्टन, जेफर्सन, रुझंवेल्ट आणि लिंकन. ती जागाही मनोरम होती. ज्या सपाट पठारावर हे खडकाळ पर्वत मधूनच ज्वालाफुलांसारखे मुळात उमलून आले ते सपाट पठार सभोवर पसरलेलं उजव्या बाजूला. आणि डावीकडे गुलबट छटेच्या भस्मरंगाचे फराटे ओढलेल्या खडकांच्या थप्प्या लागलेल्या. पिवळ्या, जांभळ्या रानफुलांचा सुसाट वाऱ्यात नाच चाललेला. सूचिपर्णी वृक्षांचे उंच गेलेले शेंडे झुलत होते.
आणि रस्त्याकडेच्या खांद्यावर भार टाकून अनेक गाड्यांतून माणसं सेल्फी काढायला, फोटो काढायला उतरली होती.
रश्मोर राष्ट्रीय स्मारकाच्या पायथ्याशी पोहोचलो. देखणेपणाने, पण फारशा अलंकरणाशिवाय जमीन, पार्किंग लॉट, पायऱ्या, वाटा, प्रवेशद्वार, खांब, कमानी, कठडे हे सारं रेखलेलं. त्याच ग्रेनाईटच्या मुक्त वापरामुळे सारा परिसर जणू बलदंड, शक्तीमान वाटत होता. स्वतःच्या शक्तीची पूर्ण जाण असलेल्या त्या अबोल पत्थराची शानच वेगळी.
उन्हावलेला गार वारा अंगावर घेत केवढी गर्दी जमलेली. पण कर्कशपणा जाणवत नव्हता.
आत शिरल्याबरोबर विझिटर्स सेंटर, पुस्तक विक्रीचं केंद्र होतं. आणि मग पुढे डावीकडे हे शिल्प अशा तऱ्हेने उभारावं ही कल्पना मांडून तडीस नेणाऱ्या शिल्पकार बोर्ग्लमचा ब्रॉन्झ-बस्ट होता. उजवीकडे एका चकचकीत काळ्या ग्रेनाईटच्या भिंतीवर त्याच्या टीममध्ये काम करणाऱ्या सर्व कारागिरांचीही नावे कोरलेली. या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांची नावे समोर लिहून ठेवली होती. सारे सादर, आदबशीर, स्वच्छ...
शिल्प बांधताना जिथे पुलीची केबिन होती, मशीनरूम होती ते सारे तिथेच जतन केले आहे. शेजारच्या कॅफेचे नाव कार्वर्स कॅफे. तिथे जेफर्सनने स्वतः कृती रचलेली आइसक्रीम मिळत होती. आणि इतर अनेक स्वादांतीलही. कार्वर्स कॅफेमध्ये या प्रदेशात फिरणाऱ्या बफेलोच्या मांसाचे बर्गर्स आणि स्ट्यू मिळत होते. स्पष्ट जाहिरातच होती तशी. तेव्हा इथे काम करणाऱ्या लोकांना सहज उपलब्ध होणारं ते मांस होतं. आणि अर्थातच एक प्रशस्त, सुंदर सुवेनिर शॉप.
जेफर्सन आइस्क्रीम चाखत तिथल्या प्रचंड खांबांपाशी पोहोचलो. सर्व खांब करकरीत चौरसचौकोनी. प्रत्येक खांबाच्या एकेका पृष्ठावर अमेरिकेच्या एकेका राज्याचं घसघशीत नाव कोरलेलं आणि टोकावर त्या राज्याचा वेगळा ध्वज. अगदी समोर अमेरिकेचा ध्वज.
येणारा प्रत्येकजण आपल्या राज्याची खांब-बाजू शोधून काढून तिथे स्वतःचे फोटो काढून घेत होता. आम्ही अर्थातच मिनेसोटा शोधून तिथे कौतुकाने फोटो काढले. आमचे यजमान मिनेसोटाचे नागरिक होते.
हा सारा वेळ रश्मोरचे शिल्प सतत पार्श्वभूमीवर होतेच. मग अगदी जवळच्या उंच कठड्यापाशी पोहोचलो. इथेही सारा ग्रेनाईटचाचा दिमाख होता. कठड्यावरून खाली पाहातो तो ऍम्फिथिएटर- खुले अर्धवर्तुळाकार प्रेक्षागृह आणि समोर मंच. वर पाहिले की ते शिल्पित नायक.
तिथेच कठड्यापाशी एक म्यूझियम, एक ऑडिटोरिअम होतं. ऑडीटोरिअममध्ये सतत रश्मोर शिल्पाच्या इतिहासावरील चौदा मिनिटांचा चित्रपट दाखवला जात होता. तो प्रथम पाहिला. साउथ डाकोटाच्या डोन रॉबिन्सन नावाच्या इतिहासकाराच्या डोक्यातून प्रथम असे शिल्प या पर्वतरांगेत कोरण्याची कल्पना स्फुरली. तेथील नीडल्स आय म्हणून प्रसिध्द असलेल्या खडकात डाकोटाचे नायक कोरावेत अशी त्याची कल्पना होती. बोर्ग्लम या शिल्पकाराला ती कल्पना खूप आवडली. पण स्थानिक नायकांपेक्षा अमेरिकेचे राष्ट्रीय नायक तेथे कोरावेत, त्या शिल्पाला व्यापक संदर्भ यावा असे त्याचे मत होते. नीडल्स आयचा ग्रेनाईट तेवढासा भक्कम नव्हता. आणि स्थानिक मूळ अमेरिकन टोळ्यांचा त्याला विरोध होता. पर्वतांना पवित्र मानणाऱ्या या टोळ्यांचा रश्मोरच्या शिल्पालाही विरोध होताच. पण देशपातळीवरचा पाठिंबा आणि भक्कम अर्थसहाय्य याची साथ बोर्ग्लमला मिळाली आणि रश्मोरचे काम सुरू झाले. हे काम ज्या गतीने आणि रीतीने झाले ती केवळ थक्क करणारी गोष्ट आहे. आज केवळ चेहरे आणि मानेपर्यंतचा भाग तेथे दिसतो, पण मूळ कल्पना अर्ध्या शरीरापर्यंत चारही जण कोरण्याची होती. अखेर निधी कमी पडल्यामुळे इतक्यावरच काम थांबले. त्या शिल्पाचा नमुना खाली असलेल्या शिल्पशाळेत मांडून ठेवलेला आहेच. त्यासाठी वापरलेली यंत्रे, बाजूला पडलेल्या उपकल्पना, साऱ्यांचीच मांडणी जतन करून ठेवली आहे. १९२७ ते १९४१ एवढ्या चौदा वर्षांतच हे काम पूर्ण झाले यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सुरुंग आणि हस्तकौशल्य दोन्हींचा वापर यात झाला. आणि कोणतीही मोठी दुर्घटना ना घडता हे काम पूर्ण झाले. एका बारीकशा दुर्घटनेतही केवळ उडी मारणारा माणूस दुखावला एवढेच.
गुत्झन बोर्ग्लम हा भव्य स्वप्ने पाहाणारा शिल्पकार होता. लिंकनच्या डोक्यामागच्या एका नैसर्गिक भगदाडात अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेचा दस्तावेज ठेवावा अशी कल्पना त्याने मांडली होती. पैशाअभावी, युद्धजन्य परिस्थितीमुळे हे काम ताटकळत राहिले आणि गुत्झनच्या आयुष्यात ते पूर्ण झाले नाही. तो १९४१मध्ये अचानक मरण पावला. त्याच्या मुलांनी मात्र ते ध्यास सोडला नाही. आणि अखेर तिथे एक टायटॅनियमचे दालन बसवण्यात आले आहे. तेथे एनॅमलवर कोरलेली राज्यघटना आणि अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा हे दोन दस्तावेज ठेवण्यात आले आहेत.
इतकी वर्षे लोटली पण सारा परिसर नवा कोरा करकरीत असल्यासारखा राखलेला आहे. शिल्पाच्या पायथ्याकडून एक लाकडी चालवाट बांधलेली आहे. आणि त्याच्या अखेरीस पुन्हा एक शिल्पशाळेचे माहिती केंद्र आणि सुवेनिर शॉप आहे. या परिसरातील खडकही अतिशय देखणे आणि कुतूहलजनक आहेत. मंचाच्या मागच्या बाजूने जाणाऱ्या वाटेवर रश्मोर पर्वताच्या पायाशी लोळण घेत पडलेल्या आहेत चकचकीत मायका शिस्टच्या खडक-लडी. काय मोहक खडक आहे तो...
...रश्मोरच्या या भव्य कामावर छाया आहे लाकोटा जमातीला अमेरिकन शासनाने या जमिनीसाठी गंडवल्याची. अमेरिकन शासन आणि लाकोटा जमातीमधील तह होता. काळे पहाड त्यांनी लाकोटांना कायमचे दिल्याचे तहात मान्य केले होते. पण या स्मारकासाठी तो तह शासनाने मोडला. आज या स्मारकामुळे पर्यटन आणि त्यातून पैसा या भागात आला आहे. तरीही फसवणुकीचा भावना गेली नाही, जाणार नाही. १९७१मध्ये लाकोटांच्या प्रमुखांनी हे स्मारक ताब्यात घेतले आणि रश्मोरवर जाऊन तेथे एक काठी रोवली. या अध्यक्षांच्या चेहऱ्यांवर आम्ही प्रेतवस्त्र घातले आहे आणि जोवर आमचे पहाड आम्हाला परत दिले जात नाहीत तोवर ते अस्वच्छच रहातील अशी घोषणा केली. यानंतर ओग्लाला लाकोटा जमातीचा एक प्रमुख ‘हेन्ऱी स्टॅन्डिंग बेअर’ याने क्रेझी हॉर्स या लाकोटांच्या लढाऊ वीरनायकाचे शिल्प पर्वतात कोरण्याची आव्हानात्मक घोषणा केली. बोर्ग्लमच्या बरोबर काम करणाऱ्या कोर्झॅक झिओल्कोवस्कीने ते काम अंगावर घेतले... हे शिल्प संथ गतीने, सरकारी मदतीशिवाय उभे रहाते आहेच...
दुसऱ्या दिवशी पाऊस होता. थंडगार पाऊस. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शिल्पाला मूळ अमेरिकन लाकोटांनी उत्तर म्हणून त्यांचा नायक क्रेझी हॉर्स याचे शिल्प एका पर्वतात कोरण्याचे ठरवले त्याची कथा कळत गेली.
१९३१मध्ये रश्मोरचा शिल्पकार बोर्ग्लम याला ओग्लाला लाकोटांचा एक प्रमुख हेन्ऱी स्टॅन्डिंग बेअर (माटो नाजी हे मूळ नाव) यांच्या मोठ्या भावाने एक पत्र लिहिले. चार राष्ट्राध्यक्षांच्या सोबत मूळ अमेरिकनांचा शूर नायक क्रेझी हॉर्स याचाही चेहरा आपण कोरावा अशी त्यात विनंती होती. बोर्ग्लमने त्या पत्राचं उत्तर कधीच दिलं नाही. त्यानंतर माटो नाजी यांनी अनेकांना पत्रे लिहिली. पण या राष्ट्रीय स्मारकात आणखी एक चेहरा येणं शक्यच नव्हतं. निराश होऊन माटो नाजी यांनी अमेरिकन सरकारला लिहिलं की माझी नऊशे एकर सुपीक जमीन घ्या, पण आम्हाला एका ओसाड पर्वतावर स्मारक उभारायची परवानगी द्या. शासनाने प्रतिसाद दिला. आणि थंडरहेड पर्वतावर क्रेझी हॉर्सचे शिल्प बनवण्याची परवानगी आली. शासनाने निधीही देऊ केला, पण स्टॅन्डिंग बेअरला या प्रकल्पात शासनाचा शिरकाव नको होता.
मग त्याच्या हाती लागला, बोर्ग्लमच्या हाताखाली काम करणारा शिल्पकार कोर्झॅक झिओल्कोवस्की. या म्हाताऱ्या प्रमुखाच्या मनातील आग त्याच्या डोळ्यांतून धगधगत होती. मोडलेल्या तहाबद्दलचे त्याचे संतप्त कथन ऐकताना झिओल्कोवस्कीने हे काम अंगावर घेण्याचा निर्णय घेतला.
त्याने आणि त्याच्या कुटुंबाने हे काम हेच आपले इतिकर्तव्य आणि उपजीविका मानले. शासनाचा पैसा न घेता वैयक्तिक दानी लोकांकडून आणि वाढत चाललेल्या स्मारकाच्या इतर अनेक कार्यक्रमांतून निधी उभा केला जातो आहे. आता ते एक मोठे व्यापारी तत्वावर झकास चालणारे खाजगी काम आहे. पर्यटकांचे लोंढे येथेही जातात. पैसा खर्च करतात. आम्हीही गेलो.
आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा क्रेझी हॉर्सचा चेहरा वागवणारा थंडरहेड पर्वत धुक्याच्या अवगुंठनात होता. एकच एक मोठा चेहरा पूर्ण झाला आहे. मूळ कल्पनेनुसार घोड्यावर बसून – जेथे माझे पूर्वज निजलेले आहेत त्या साऱ्या माझ्या जमिनी असे म्हणणारा क्रेझी हॉर्स हा नायक आसमंताकडे निर्देश करतो आहे असे पूर्ण शिल्प आहे. हे शिल्प पूर्ण झाले की संपूर्ण जगातील सर्वात मोठे शिल्प असेल. ८० फूट उंचीचा केवळ चेहराच आहे त्याचा. पण अखंड शिल्प पूर्ण होण्यासाठी खूप काळ जाणार आहे.
शिवाय ओग्लाला लाकोटा जमातीतूनही या तऱ्हेने एक पर्वत शिल्पाकृत करण्यास विरोध आहे. पावित्र्यभंगाचा संताप आहे. क्रेझी हॉर्सच्या कुटुंबातले वंशजही नाराज आहेत. असे काही करणे ज्या माणसाने स्वतःचा फोटो कधी काढू दिला नाही त्याला पटणेच शक्य नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे.
पण आता काही हे थांबणार नाही. एक प्रचंड शक्तीमान प्रतीक मूळ अमेरिकनांना लाभेल- त्याचा काय फायदा होईल ते जाणत नाही कोणी. परंतु त्या निमित्ताने स्मारक परिसरात विद्यापीठ, मूळ अमेरिकनांचे राष्ट्रीय म्यूझियम, विविध प्रशिक्षण सुविधा या गोष्टी घडून येत आहेत. एक उच्चतम दर्जाची सुविधा या स्मारकानिमित्ताने उभी होत असेल तर झिओल्कोवस्की कुटुंबाने आणि हेन्ऱी स्टॅन्डिंग बेअरच्या स्वप्नाने जिंकलेच म्हणायचे.
या स्मारकाच्या तिकिटाची गंमत आहे. वीस डॉलरच्या तिकिटात आत शिरल्यावर त्यांच्या कॅफेत कितीही फुकट कॉफी प्या. अमेरिकनांचा कॉफी पिण्याचा धडाका जबरदस्त असतो, तरीही कॉफी बेतानेच प्यायली जाते इथे.
आत शिरल्यावर स्वागत होते म्युझियमच्या देखण्या मांडणीने. मूळ अमेरिकी लोकांचे परंपरागत शिरोवेष, अंगरखे, दागिने, घोड्यांचे दागिने... मण्यांचे काम, शस्त्रे, चामड्याच्या वस्तू. मातीच्या सुंदर रंगवलेल्या भांड्यांचे वैविध्य तर अजबच. सुसज्ज प्रशस्त प्रेक्षागृहात क्रेझी हॉर्स शिल्पासंबंधाने माहिती देणारा चित्रपट...
क्रेझी हॉर्स संकल्पित शिल्पाचा नमुना फारच ऊर्जस्वल होता. आणि पलिकडे काचेतून दिसत होता धुक्यातून डोकावणारा गुलाबी ग्रेनाईटमधला तोच चेहरा.
प्रचंड मोठे सुवेनिर शॉप हे एक मोहात पाडणारे वैशिष्ट्य होते. यातून कमावलेला सर्व पैसा स्मारक बांधणीसाठी जात असल्यामुळे सर्व वस्तू महाग होत्या. रुपयांत कमावणारांना फारच महाग. 
एका दालनाच्या मध्यावर एक लाकोटा चित्रकार आपली अतिशय सुरेख चित्रे घेऊन विकायला बसला होता. विविध चित्रकारांनी काढलेली डाकोटा भूप्रदेशाची चित्रे, अनेक टोळी प्रमुखांची रेखाचित्रे, बफेलोच्या शिकारीचे शिल्प अशा काही नमुनेदार कलावस्तू पाहायला मिळाल्या. एक खाजगी प्रयत्नातून चालवलेले स्मारक किती सुंदर, सुविहित असू शकते याचा वस्तुपाठ होता हा.
सुवेनिर शॉपच्या काचेतून बाहेर पाहिलं तर धुक्याला हाकलून सूर्यकिरणे झळाळलेली. आणि क्रेझी हॉर्सच्या देखण्या मुद्रेवर तेजाची प्रभा फाकलेली. तिथे जवळ जाऊन पाहावं असं वाटलं. पण मग तो मोह टाळलाच.
इतर अनलंकृत खडकांच्या, पर्वतांच्या भुजांचे आवाहन अधिक मोठे होते...
पाऊस थांबल्याची संधी घेऊन आम्ही पृथ्वी-महाभूताच्या अवाढव्य कवेत शिरायला निघालो.
यापुढचा प्रवास म्हणजे इतिहासाचा स्पर्श नसलेल्या निसर्गाचे, भूलीलांचे दर्शन होते. मानवाने सौंदर्यस्थळे टिपून जिथे किमान सुखसोयी निर्माण केल्या, संवर्धन केले अशा काही ठिकाणांचा वेध घेत फिरायचं होतं. काळ्या पहाडांतलंच कस्टर नॅशनल पार्क, तिथले तलाव, सिल्वन लेक, हे पाहून मग पुढे पोट भरायला कस्टर गावाकडेही जायचं होतं.
आता वर्णनासाठी शब्द गर्दी करून धावत येतील आणि त्या गर्दीतून सर्वात सुंदर असे शब्द निवडावे लागतील असे आव्हान कातळ-पर्वत-दऱ्या-तलाव-वृक्षराजी यांच्या पंचकाने उभे केले होते. असा रमणीय प्रवास... भाग्योदयच.
रस्त्याने रश्मोरच्या चेहऱ्याच्या मागेमागे न्यायला सुरुवात केली. या भुईने या नभाला दान- दिले होते असे ते बेलाग उंचउंच सुळके भंवतालात खुशाल कसेही कुठेही उभे होते. येलोस्टोनमध्ये दिसलेले लॉजपोलचे सूचिपर्णी वृक्ष, इतर पाईन्स, फर्स त्यांच्याभोवती फेर धरून असल्यामुळे त्यांचे रौद्र सौंदर्य जरा सौम्य झालेले वाटत होते. प्रत्येकाच्या सांदीकपारींतून, अगदी अवघड चढणीच्या सरळसोट खडकातही अनेक वृक्षबाळे पाय रोवून वाढत होती. नातवंडांना-पतवंडांना आपल्या कडक आजीआजोबांचं जराही भय वाटू नये आणि त्यांनी खुशाल मांडीवर चढून बसावे तशी. ट्रेकर्सनाही हे खडक खुणावणारेच. वाटेत अनेक प्रचंड शक्तिशाली मोटरसायकली घेऊन निघालेले लोक दिसत होते.
एका दुस्तर घाटात डाव्या बाजूने दिसणारे खडक थोड्या अंतरानंतर जवळजवळ येत गेले. या खडकांचे सुळके तयार झाले आहेत आतून उसळून आलेल्या मॅग्माने वरच्या पर्वतांना ढुशी दिल्यानंतर वरच्या स्तराला ज्या उंच घड्या पडल्या त्यामुळे. माउंटन फोल्ड्स् म्हणतात त्यांना. वेगवान, बेभान थंड आणि उष्ण वाऱ्यांनी, वर्षानुवर्षे वर्षत राहिलेल्या पाण्याने किती काळापासून त्यांना घासघासून आकार दिले असतील. ते थिजल्याजागी भिजताभिजता झिजत गेले. त्यांची ही अनलंकृत शिल्पे आम्ही पाहात होतो. आणि त्या आकारांच्या अशाश्वततेतील शाश्वतता पाहून थक्क होत होतो. त्यांचे अस्तित्व आधारासारखेही आणि आदरयुक्त भय निर्माण करणारेही. मौलिक, चिरंतन सत्यांसारखे खडक... जे बाह्याकार बदलतात- गाभा नाही.
पृथ्वीच्या पोटातल्या रसायनशाळेने त्या खडकांमध्ये कायकाय गुंफले असेल. याच भागात एक ज्वेल केव आहे. जी पाहायला जायला वेळ झाला नाही. जिथे कॅल्साइट आणि क्वार्ट्झाईटच्या मोठमोठ्या स्फटिकगुच्छांनी सजलेल्या भिंतींच्या गुंफा आहेत. या ग्रेनाईटच्या खडकांमध्येही भरपूर मायका आहे, पायराईट आहे. रोझ क्वार्ट्झ भरपूर आहे. येथील वालुकाश्माच्या -सॅण्डस्टोन- स्तरात सोन्याच्या लगडीही सापडल्या होत्या. आणि मग सुरू झालेला या भागातला गोल्ड रश... सोन्याचा धावा. संपूर्ण अमेरिकेतून इथे सोन्याच्या शोधात येणाऱ्या माणसांची गर्दी झाली. याच सुमारास लाकोटांशी झालेल्या तहाचे उल्लंघन व्हायला सुरुवात झाली. त्यांच्याकडून काळे पहाड हिसकावून घेण्याची सुरुवात झाली. कस्टर हे नावच ज्या सेनाधिकाऱ्याच्या पाहाणीत सोन्याच्या लगडी आल्या त्याचं. त्यावरून या भागाला कस्टरचा प्रदेश म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. मग आलेल्या लोकांच्या पोटापाण्याच्या-रहाण्याच्या सोयींसाठी गावं वसू लागली. त्यातलं मुख्य कस्टर गाव. तिथेच आम्हालाही पोटापाण्याच्या सोयीसाठी जायचं होतं. पण आधी ओलांडायचा होता नीडल्स आय- खडकसुईचा डोळा.
ग्रेनाईटमधूनच खोदून काढलेल्या एका लहानशा बोगद्यातून पुढे गेलो. आणि मग एके ठिकाणी वाटलं, या इथे खालचं विहंगम दृश्य पाहायला थांबलंच पाहिजे. गाडी बाजूला उभी करून डावीकडे शिरलो. महाकाय खडकांचा सडा पडलेला जणू, आणि पलिकडे दरी. वाऱ्याचा सोंसों आवाज कानांशी झटत होता. हात गार पडत होते. पण सौंदर्याचे स्वर्ण-निमंत्रण मिळाले होते... एक टप्पा चढून गेलो. दोन खडकांच्या मधून घुसणारा वारा जाणवून देत होता... मीच तो शिल्पकार... या साऱ्या खडकांना घडवून आकार देणारा तो मीच.
खालचे दृश्य पाहायला पुढे जाताना हिंमत गोळा करावी लागत होती. पोरं भराभर शेजारच्या उंच खडकावर चढून गेली. आणि आम्ही खडकांच्या दुबेळक्यात उभे राहिलो. मन काठोकाठ भरूनही भरत नव्हतं असं काहीसं.
नीडल्स आय पाशी पोहोचलो. रस्त्याच्या एका बाजूला दूरवर पसरलेली दरी. आणि सुळक्यासारखे एकसंध, कधी अर्धभग्न खडक रस्ता अडवून थांबलेले. माणसाने खडकसुईच्या डोळ्याखालून अलगद रस्ता काढलेला. जरासा हर्षवायू झाल्यासारखेच तिथे थांबलेले लोक हसतबोलत होते. एकमेकांना फोटो काढायला मदत करत होते. खडकांवर शक्य तितक्या उंचीवर चढून जात होते. गाड्या एकावेळी एकाच दिशेने जातील एवढाच बोगदा होता. पण गोंधळ न माजवता निसर्गाची सारी लेकरे आनंदात पार होत होती.
पुढे सिल्वन लेककडे जायचे होते. ही काय चीज आहे आम्हाला माहीत नव्हतं. पण तिथे टॉयलेट्स, कॅफे अशा सोयी होत्या एवढं माहीत होतं. सिल्वन लेकपाशी आलो तेव्हा थंडी वाढली होती. तलावाचं अलिकडचं टोक पाहिलं. तिथल्या खडकपर्वताने थेट हृदयात उडी घेतली. पण आता पोटातली भूकही धडका देत होती. कॅफे नव्हताच तो. कस्टर पार्कचं सुवेनिर शॉप होतं. तिथे कोल्ड सॅन्डविचेस, केक्स इतकंच होतं. कुणीतरी सांगितलं- कस्टर गावात चांगलं जेवण मिळेल. ते होतं पंधरा किलोमीटरवर. धूम ठोकली गोल्ड रशवाल्या कस्टर गावाला जायला आमची भूक-रश होती.
कसलं देखणं नगर होतं हे. गावाला खडकांच्या सुळक्यांची नैसर्गिक तटबंदी होती. अतिशय देखणी घरं, त्याभोवतीच्या बागा, त्यात चरणारी हरणं, सुंदरशी शाळा, हॉस्पिटल्स, चर्चेस, आणि लांबरुंद रस्त्यांकडेला छानशी दुकानं.
तिथल्या एका फार जुन्या पर्पल पाय नावाच्या रेस्तराँबद्दल सुश्रुंतने वाचलं होतं. तिथे गेलो. गडद जांभळ्या, फिक्या जांभळ्या छटांमध्ये रंगवलेलं हे रेस्तराँ म्हणजे एक गोडगोड प्रकार होता. अनेक जुन्या पाट्या, वस्तू त्यात तशाच जपलेल्या. अतिशय गोड मुली तिथे काम करीत होत्या. बहुतेक एकाच कुटुंबातल्या असाव्यात. जेवण झाल्यावर तिथला सर्वात प्रसिध्द- सही- (सिग्नेचर डिश म्हणतेय) असा पर्पल पाय घेतला. तेव्हा वाटलं फक्त हेच खाऊन जेवण करायला हवं होतं. ताज्या ब्लूबेरीजचा पाय होता तो. कधीच विसरता येणार नाही असा रंग, चव आणि पोत.
पुन्हा परतलो घाईने सिल्वन लेकला. तोवर थंडी खूपच वाढलेली. माझी तर गाडीतून खाली उतरण्याची हिंमत होत नव्हती. पण धावतधावत तलावावर गेलेली मुलं आली आणि म्हणाली- जा जा जा... बघा. किती सुंदर आहे. थंडीच्या धसक्यावर मात करत उतरले... आणि मग मन तिथून कधी परतून आलंच नाहीये. तिथेच कायमचं झोपून जाता आलं तरी चाललं असतं. शांत निळ्या-राखी तलावाच्या आरशात उतरून आलेल्या घनमाला... आणि तलावाला कोंदण देणाऱ्या पाषाणमाला... कसं घडून आलं असेल हे चित्र...
लॉर्ड ऑफ द रिंग्जमधल्या मिररमिअर किंवा खेलेद झारमच्या वर्णनाची आठवण व्हावी असं दृश्य. गिम्ली हा ड्वार्फ फ्रोडो- हॉबिटला खेलेद झारम पाहायला ओढत नेतो आणि मग-
“.... त्यांनी त्या गडद निळ्या पाण्यात वाकून पाहिलं. पहिल्यांदा त्यांना काहीही दिसलं नाही. मग हळुहळू त्यांना भोवतालच्या पर्वतांची प्रतिबिंबे त्या खोल निळाईत दिसली... आणि त्यांची शुभ्र शिखरे शुभ्रधवल ज्वाळांसारखी दिसत होती... त्यावर अनंत आकाश. आकाशात अजून सूर्य होता पण तलावाच्या खोलखोल अथांग तळाशी तारकादळे चमकत असावी असं वाटत होतं... ते पाण्यावर वाकलेले असूनही त्यांची प्रतिबिंबे अजिबात दिसत नव्हती.”
तिथून मी खरंच अजूनही परतलेले नाही मनाने.
शब्दांपेक्षा या प्रतिमाच सांगतील त्या सौंदर्याची साक्ष. काय वानू आता...
सिल्वन लेकचा गारवा पापण्यांना बिलगलेलाच होता निघालो तेव्हा. सूर्यप्रकाश रात्री आठपर्यंत मिळणार होता. साडेसात वाजता सूर्यास्त होता. सूर्यास्ताच्या सुमारास वाईल्ड लाईफ लूप नावाच्या कस्टर पार्कमधल्याच भागातून गेलं तर खूप जंगली प्राणी दिसतात. वाईल्ड बफेलोंचा- बायसन्सचा कळपही दिसू शकतो. हरणं तर काय दिसतातच. त्या वाटेला लागलो तेव्हाही कातळजालाने वेढलेली झाडे, हिरवाळीचे प्रदेश दिसतच होते.
ठायीठायी हरणे दिसली, प्रॉन्गहॉर्न्स दिसले, टर्कींचे कळप दिसले. पण बायसन औषधाला म्हणून, आमचं समाधान म्हणून एकुलता एक दिसला. पण त्या कंच हिरव्या उतारांवरून उतरलेलं ऊन, ढगांचे खेळ पाहात जाणं हीच एक मेजवानी होती. घरी परत आलो तर आमच्या घरापलिकडच्या त्या घराच्या आवारातून पाच हरणं, त्यातलं एक आई-बाबा-बाळ असं कुटुंब आलेलं दिसलं. जंगली टर्कीही फिरत असलेल्या दिसल्या.
असं ठरलं की उद्या पुन्हा सिल्वन लेकलाच जायचं. सुश्रुत, अजिंक्य आणि रवीचं ट्रेकला जायचं ठरलं. तलावाच्या भोवतीने कोंडाळं केलेल्या खडकपर्वतांतून तीन वेगवेगळे ट्रेक्स होते. आम्ही बाकीच्यांनी तलावालाच ओंजळीत भरून घ्यायचं ठरवलं.
हा प्रदेशच असा आहे की कोणतीही वाट घेऊन जात रहावं, विलोभनीय खडक आणि तळी सुखावत रहातातच.
एक वेगळाच रस्ता घेऊन सिल्वन लेककडे निघालो. त्या रस्त्यात कॅम्पिंगच्या सोयी होत्या. कॅरावान्स पार्क करून रहाण्याच्या सोयी होत्या. त्या कॅरावान्ससाठी आंघोळी-टॉयलेट्स,गॅस, किराणा सारे नीट मिळण्याच्या सोयी होत्या. काही छोटे रिसॉर्ट्स होते. जंगलाच्या अगदी निकट राहू इच्छिणाऱ्या साहसी लोकांसाठी उत्तम व्यवस्था होती.
एका ठिकाणी खूप गाड्या होत्या. मेजवानीची, पार्टीची तयारी दिसत होती. पण आवाजाचा कल्लोळ नव्हता. जंगलाच्या शांततेला हसण्याची झालर होती, पण तडाडतडाड् तडे घालवणारा उत्सवी वाजरा आवाज नव्हता.
तलावावर पुन्हा आलो. हे तिघे सुटले ट्रेककडे. आणि आम्ही दुकानात जाऊन थोडी चॉकलेट्स वगैरे घेऊन रमतगमत निघालो. पाहिलं तर काय- या तलावाच्या कडेवरच एक वीसपंचवीस जणांचा गट सजूनधजून उभा होता. आणि मग पाहिली सुंदरशा शुभ्र वेषातली वधू. तिच्या मेड्स. इथे लग्न करायला आले होते. तेवढ्यात पाहिलं तलावाच्या पलिकडच्या किनाऱ्यावर आणखी एक पांढरा शामियाना होता. आणखी एक लग्न. तिथली बदामी रंगाच्या झग्यातली वधू छलकत छलकत झिरझिरित जाळीदार व्हेल चेहऱ्यावरून किंचित बाजूला सारत निघाली होती. थोडं धस्स झालं उरात. बाप रे... लग्न?! म्हणजे आता इथल्या गोड शांततेला विरजण लागणार. पण कितीतरी वेळ झाला, ना बँन्डबाजा, ना ओरडाआरडा... ना नाच... शांत तळ्याच्या काठी शांततेतच सुंदरसा सोहळा करायच्याच मिषाने ते सारे इथे आले होते. डेस्टिनेशन मॅरेजेस् होती ती. तो तलाव, त्याचं कातळकोंदण हाच त्यांचा कल्याणमंडपम् किंवा विवाहस्थळ होतं. ते तिथेच थांबले आम्ही पुढे चालत गेलो. कुणीही हाक जरी मारली असती तरी ऐकू येईल इतकी स्वच्छ शांतता होती तिथे. आम्ही तलावाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन छोट्याशा पुलावर जाऊन उभे राहिलो तरीही गोंगाटाचं नावही नव्हतं. दोन भल्या थोरल्या कातळांच्या कडेने जाणाऱ्या त्या देखण्या पुलावर उभं राहून शांतीत मुरत गेलो आम्ही. आमचं आपसातलं बोलणंही त्या शांततेवर ओरखडा न उठेल असं आपोआपच होत गेलं.
खळळ्खळ्ळ नाजूकसा आवाज होता. कानोसा घेत त्या दिशेने पाहिलं तर पुलाच्या एका कडेला तलावाचं पाणी कातळभिंतीवरून खाली सांडत होतं.
खाली उतरलो आणि खडकाखडकांच्या बोगद्यातून पलिकडे गेलो. हा आणखी एक ट्रेल होता. सुंदरशी पायवाट. बर्चची झाडे कमान धरून उभी होती. शिळा सैलावून पडलेल्या. त्यातून अगदी पिटुकल्या खारींचा खेळ चाललेला. कसलीच घाई नव्हती. आम्हाला काही ट्रेक पुरा करायचा नव्हता. अगदी रमतगमत एकेक झाडपान, दगड पाहात आम्ही पुढे गेलो. भाचीसाठी धनंजयने रानफुलांचे कडे गुंफून मुकुट करायला घेतला. तो पुढच्या वाटेवरून फुले आणून मी पुरा केला. आमची छोटीशी गोड परी खुश...
एक लहानशा खडकघेऱ्याच्या मधोमध आम्ही कितीतरी वेळ घालवला. जणू एका वेगळ्याच घरात रहात होतो थोडा वेळ.
उन्हाने आज रंग खुलवलेला परिसराचा. लवलेल्या निळ्या घनांखालचा तलाव वेगळा आणि आजचा सोनेरी निळ्या आभाळाखालचा तलाव वेगळा होता. आम्ही परत चालू लागलो तेव्हा समोरून एक चाळीस लोकांची दुहेरी रांग शिस्तीत चालत आली. आणखी एक वधूवर जोडी आम्ही जाऊन आलो त्याच दिशेने लग्न करायला चालली होती. सारे हसऱ्या चेहऱ्यांनी पण वचावचा न बोलता चाललेले. वधूला आम्ही सांगितलं- तू किती सुंदर दिसते आहेस... तिने छानस हसून थँक्यू म्हटलं. खरंच सुंदर होती ती. तो तलाव, ते आभाळ, ते ऊन... सारी आज तिच्यासाठीच खुलली असावीत जणू.
आणि पुढे एक जोडपं मासे पकडायला गळ टाकून बसलेलं. पाच रेन्बौ ट्राऊट्स त्याने अभिमानाने उचलून दाखवले. हं... या तलावात रेन्बौ ट्राउट्स होते तर.
पुढे गेलो तर आणखी एक जोडपं. स्ट्रोलरमध्ये दोन मुलांना ठेवून गळ टाकून बसलेले. त्यांना मात्र काहीच मिळालं नव्हतं. आम्ही सांगितलं- ते पहा, ते तिथे बसलेलं जोडपं आहे ना... त्यांना पाच ट्राउट्स मिळालेत. त्यांनी या माहितीवर खुशीत उडीच मारली. आणि ओ वॉव, लेट्स् गो देअर म्हणून गळ गुंडाळायला सुरुवातही केली. मग एक जपानी जोडपं तळ्यावर झुकून उभं दिसलं. काय करताहेत हे दोघे? तर तो माणूस तळ्याच्या केवळ लाटा कॅमेऱ्यात चित्रित करीत होता... किती सुंदर आहे हे पाणी... असाच त्याचा भाव होता.
सौंदर्यासक्त अशी सारी माणसे भवताली असतील तर हा असला अनुभव अधिकच सुंदर होतो हा अनुभव सहजच न मागता मिळून गेला. रसभंग करणारं काहीह नव्हतं- रंग-स्वर-वावर सारं जणू एका रागात बांधल्यासारखं अनवट मधुर.
उगीच नाही म्हणत- तिथे कायमची निजून जायचीही तयारी आहे माझी...

पण कितीही म्हटलं तरी सौंदर्याने पोट भरत नाही... आम्ही ट्रेकला न गेलेल्या चौघांनी पुन्हा कस्टरला जाऊन जेवायचं ठरवलं.
कस्टर गाव नीट पाहायचीही इच्छा होतीच.
गेलो. आज आता पर्पल पॅलेस नको दुसरं काहीतरी शोधू असं ठरलं. अमेरिकेत एक असतं. कुठल्याही जरा वस्तीच्या गावात, नगरात गेलं की काही चेन्स हजर असतातच. पण इथलंच असं खास रेस्तराँ मिळतं का पाहायचं होतं. मग ते शोधायला कस्टरच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत चक्कर मारली. या गावात देखणेपणाबरोबरच उद्योग-व्यापाराचा पायरव होता हे स्पष्टच होतं.
१८७४च्या गोल्ड रश पासून या नगराचा पाया घातला गेला. मग ब्लॅक हिल्सपेक्षा डेडवुडमध्ये जास्त सोनं मिळतंय म्हटल्यावर काही काळ हे नगर ओसाड झालं. पण नंतर इतर खनिज द्रव्ये, मूल्यवान द्रव्ये काढण्याचा उद्योग सुरू झाला. आणि कस्टर जोरात आलं. या गावातला मुख्य रस्ता अतिशय रुंद आणि प्रशस्त आहे. कारण इथली खनिजे लादलेल्या बैलगाड्या नीट जागच्याजागी वळवता याव्यात म्हणून सुरुवातीपासूनच खूप रुंद रस्ता ठेवण्याचा शहाणपणा दाखवून मग कडेने दुकाने झाली. अमेरिकेतील सर्व गावांमधल्या मुख्य रस्त्यांमधील हा सर्वात रुंद रस्ता आहे.
द फ्लिंटस्टोन या सुप्रसिध्द टीव्ही मालिकेचे शूटिंग येथेच झाले. त्यासाठी बेडरॉक सिटी म्हणून नगरी उभारण्यात आली. ती अजूनही जतन करून पर्यटकांसाठी खुली आहे.
रस्त्याच्या कडेला जुनी ट्रेडिंग पोस्ट्स आता अँटिक वस्तूंची दुकाने म्हणून कायकाय जुन्या वस्तू विकत असतात. गब्बर पर्यटकांनाच परवडतील अशा किंमती.
बरीच रेस्तराँज् दिसत होती. ग्रिल्स होती. पण भरपूर निवड करण्यासाठी बफेच निवडायचं मनात आलं. मग कस्टर कॉरल नावाच्या एका प्रशस्त बफेमधे शिरलो. अमेरिकन, मेक्सिकन, एशियन वगैरे बरेच स्टॉल्स होते. अतिशय विनम्र आणि तत्पर सेवा देणारे वेटर्स होते. भरपूर जेवलो. ट्रेकर्ससाठी काही सँडविचेस बांधून घेतली आणि परत निघालो.
कस्टर गावातून निघून सिल्वनपर्यंतचा रस्ता भरपूर वळणावळणाचा असा आहे. नंतर गूगल मॅपमध्ये सिल्वन लेक पाहिला आणि तिथवर जाणारा, नीडल्स आयपर्यंत जाणारा, रश्मोर आणि रॅपिड सिटीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची वळणे पाहिली... तेव्हा जाणवलं की या प्रदेशातून रस्ता काढणं किती अवघड असेल.
पर्यटन, खनिजद्रव्यांचे दळणवळण, जंगलातील लाकडांची वाहतूक, जंगलात लागणाऱ्या आगींशी सामना करणे यासाठी या दुर्घट प्रदेशातून रस्ते काढणं तर अत्यावश्यक होऊ लागलं.
या प्रांताचा गवर्नर पीटर नॉर्बेक याने जेव्हा पर्वतातले रस्ते बांधायचं आव्हान स्वीकारलं तेव्हा तो एंजिनीअर—बरोबर स्वतः ब्लॅक हिल्समधून कधी पायी तर कधी घोड्यावरून फिरफिर फिरला. सर्वात सोप्या चढणी आणि सर्वात सुंदर निसर्गदृश्ये लोकांना रस्त्यावरूनच दिसू शकतील असा रस्ता त्याला हवा होता. नॉर्बेक वजनदार होता. तरीही धापा टाकत त्याने काळे पहाड पालथे घातले. आणि एंजिनीअरला विचारलं, -तू इथून रस्ता बांधशील?- तो उत्तरला पुरेसे सुरुंग दिलेत तर नक्की. आणि मग साउथ डाकोटाला अमेरिकन फेडरल शासनाने रस्त्यासाठी पुरेसा पैसा द्यावा म्हणून नॉर्बेकने प्रयत्नांत कसूर सोडली नाही.
हा प्रदेश इथल्या जंगलांसाठी, जनावरांसाठी आणि खडकांसाठी जत व्हावा, संवर्धित व्हावा हे नॉर्बेकचे स्वप्न होते. त्याने तेही पुरे केले आणि लोकांना ते पहाता यावं म्हणून रस्तेही. सेनेटर म्हणून ओळखला जाण्यापेक्षा मला लोकांनी या कामासाठी किंवा रस्त्यांचा कलावंत म्हणून आठवावं असं तो म्हणत असे. त्याच्या सन्मानार्थ तिथे एक स्मारक आहे. माहिती केंद्र आहे. आम्हाला तेही पाहायला वेळ झाला नाही.
येलोस्टोनला रस्त्यांचा जो अनुभव आला होता, तोच इथेही. इतका अवघड घाट असूनही सारा रस्ता गुळगुळीत, प्रशस्त. वेगमर्यादा पस्तीस. म्हणजे आपोआपच निसर्ग पाहातपाहात.
जरासा रस्ता खराब वाटला की दोन बाजूची वाहतूक एकेरी करून लगेच तेवढंच काम न रखडवता करून टाकायची पद्धत.
सिल्वन लेकजवळ पोहोचलो आणि आमचे ट्रेक करून येणारे तीन वीर थकूनभागून येतच होते. वरून परिसर पाहून खुश झालेले आणि भुकेलेले.
हर्मोसाला परत जाताना गाडीत तिघेही डाराडूर. हर्मोसाला जाऊन पुन्हा रॅपिड सिटीत चक्कर मारायला जायचं ठरलं होतं. पण तेवढी ताकद नि उत्साह काही राहिला नव्हता त्यांच्याजवळ. समोर आलेली हरणं नि सांध्यरंग बघायला व्हरांड्यात येण्यासही त्यांची पावलं हलत नव्हती. जाऊ दे म्हटले- आज खूप बघितलंय...
हर्मोसातली शेवटचीच रात्र. मिनिआपलिसहून निघताना बटाटेवड्यांची झणझणीत भाजी करून घेतलेली बरोबर. मग आज बटाटेवडे करायचं ठरलं. महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय पदार्थाचा झेंडा अशा तऱ्हेने आम्ही साउथ डाकोटात फडकवला. तळलेल्या मिरच्या, तिखट चटणी, भजी आणि बटाटेवडे- डाकोटाच्या काळ्या पहाडांवरच्या खडकनाथाला नैवेद्य दाखवला ब्वा.
उद्या सकाळी बॅडलॅन्ड्स नॅशनल पार्कमधून फिरतफिरत मिनिआपलिसकडे परतायचं होतं...

बॅडलॅन्ड्सबद्दल वाचून झालं होतं. संध्याकाळच्या कलत्या उन्हात किंवा अरुणोदयापासून सूर्य कासराभर वर येईपर्यंत बॅडलॅन्ड्सचा देखावा अतीव सुंदर दिसतो म्हणे. रश्मोरमधल्या पुस्तकाच्या दुकानात सगळ्या पार्क्सवरची पुस्तकं झरझर पाहून घेतलेली. आणि बॅडलॅन्ड्सचे ते देखावे मनात तीरासारखे रोवून बसलेले.
पण आमची पोहोचायची वेळ अगदी भर मध्यान्हीची असणार होती. सकाळी एअरबीएनबीचं तात्पुरतं घर पुन्हा स्वच्छ करून, नीटनेटकं करून निघायचं असतं. या घरांची ती एक पूर्व अट असते. होटेलसारखं वाट्टेल तसं टाकून निघता येत नाही. नाश्ता करूनच निघालो.
पहिला थांबा असणार होता वॉल नावाचं गाव. बॅडलॅन्ड्सजवळ असलेलं गाव म्हणून लाकोटांनी नाव ठेवलं माखोसिचा अग्लाला ओथुनवाहे आणि एका भिंतीसारखा एक डोंगर जवळ असलेलं गाव म्हणून वसवणारांनी नाव ठेवलं वॉल.
शिकागोपासून निघालेली रेल्वे इथवर येत असे तेव्हा १९०७मध्ये हे गाव वसलं. १९३१मध्ये वॉल ड्रग स्टोअर नावाचं दुकान इथे निघालं. आज एकशेनऊ वर्षांपूर्वी सुरू झालेलं हे दुकान फार मोठं पर्यटकांचं आकर्षण झालंय. खानापिना शॉपिंगसाठी मोठं मजेशीर दुकान आहे ते. नुसतं फिरायलाच मजा येते. कित्येक जुन्या वस्तू, जुन्या काळात आकर्षणे म्हणून मांडलेले कार्टूनशैलीतले पुतळे आहेत. पूर्वी घोडे बांधायला ठोकलेल्या छानदार खुंट्याही राखल्या आहेत.
या दुकानाची जाहिरात साउथ डाकोटामध्ये शिरल्यापासून जागोजाग पाहायला मिळत होती. त्यामुळे तिथे फिरण्यासाठी अर्धा तास राखून ठेवलेला. प्रत्यक्षात दीड तास सहज घालवला आम्ही. नेटिव अमेरिकनांच्या वस्तू, कलावस्तू असं बरंच काही पाहायला मिळालं. टॅक्सीडर्मी करून ठेवलेल्या बायसन, कोयोट्स, एल्क वगैरेंच्या ट्रॉफीज होत्या. जुन्या पोस्टाच्या पेट्या, मुलांची खेळणी... इथेच कार्लोस नाकाईच्या सुंदर पावरीची भेट झाली. नेटिव अमेरिकन संगीतातलं हे रत्नच. मन शांतशांत करून टाकणारा हा पावा वॉल मुळेच आम्हाला कळला.
https://www.youtube.com/watch?v=19nm5_nAwQg
काही स्मरणवस्तू, कार्ड्स्, चामडी पाकिटं वगैरे घेऊन आम्ही अखेर बॅडलॅन्ड्सकडे निघालो. अगदी जवळच होती ही दुष्टभू... बॅडलॅन्ड्स.
या भागात प्रेअरीचे गवताळ प्रदेश असल्यामुळे आणि ठिकठिकाणी दऱ्याखोऱ्यांतील तलावांत पाणी असल्यामुळे प्राणीपक्षी फार पूर्वीपासून वावरत होते. आणि त्यांच्या शिकारीसाठी मूळ अमेरिकन टोळ्याही. शिकार सापडणाऱ्या या भागावरील कब्जासाठी मूळ अमेरिकन टोळ्यांतही संघर्ष झडले. आणि गोरा माणूस इथे शिरेपर्यंत ओग्लाला लाकोटांचा कब्जा त्यावर होता. नंतर ‘नव्या’ अमेरिकनांनी त्यांना हाकून देत काही भूभागांपर्यंत सीमित ठेवले. रक्तरंजित संघर्षांच्या कथा अगणित आहेत. पण आधुनिक अमेरिकेत नैतिक मूल्यांची चाड बाळगत जे बदल मूळ अमेरिकनांच्या बाबत करण्यात आले त्यातून आता त्यांना पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षितता देण्यात आली आहे हे निश्चित. १९७३नंतर मूळ अमेरिकन आणि नवे अमेरिकन यांच्यात शस्त्रसंघर्ष होणे थांबले आहे आणि कायद्याच्या लढाया सुरू झाल्या आहेत. साउथ डाकोटाच्या या काळ्या पहाडांत आणि दुष्टभूमध्ये मूळ अमेरिकन आणि नवे अमेरिकन यांच्यामधील संघर्षाच्या घटना ठायीठायी घडल्या आहेत.
बॅडलॅन्ड्स या नावाचा एक जुना गाजलेला हॉलिवुडचा गुन्हेगारी सिनेमा आहे. त्याचा दिग्दर्शक अगदी तरूण असा हार्वर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी होता आणि त्याचा हा सिनेमा अजूनही नावाजला जातो. पण त्यातल्या बॅडलॅन्ड्स या मॉन्टाना राज्यातील बॅडलॅन्ड्स होत्या. बऱ्याचशा सपाट. बॅडलॅन्ड्स म्हणवल्या जाणाऱ्या जमिनी म्हणजे जिथे काही पिकत नाही, अशा रेताड, राखाडी जमिनी. आणि त्या जगात बऱ्याच ठिकाणी आहेत. शेल, वाळू, धूळ यांच्या थराखाली कदाचित् मूळ जमीन झाकली गेलेली असते अशा या दुष्टभू अमेरिकेत मॉन्टाना, साउथ डाकोटा, वायोमिंग, नेब्रास्का, कोलोराडो, युटा, न्यू मेक्सिको अशा राज्यांत आहेत. कॅनडामध्ये, युरोपमध्ये स्पेन येथेही आहेत. अर्जेंटिनामध्ये चांद्रभूमी म्हणूनच ओळखली जाते तेथील दुष्टभू- व्हॅली ऑफ द मून, न्यूझीलंडमधील बॅडलॅन्ड्सही प्रसिध्द आहेत. इटलीमध्ये आहेत. आणि उष्ण कटिबंधात दुष्टभूचे उदाहरण केवळ तैवानमध्ये आहे.
(काही ठिकाणची जमीन माणसाने खाणकाम करून, किंवा वाईट प्रकारे शेती करून विधुळवाट लावून ठेवल्यामुळेही अशीच दिसू लागली आहे. त्यांनाही आता दुष्टभूचा दर्जा देण्यात आला आहे, पण खऱ्या अर्थाने दुष्टभू त्या नाहीत. तिथे मानवी बिनडोक दुष्टपणाच कारणीभूत आहे)
मला साउथ डाकोटातल्या बॅडलॅन्ड्सचा अनुभव मिळाला.
या नॅशनल पार्कचे नावच बॅडलॅन्ड्स नॅशनल पार्क. माकोसिका हा लाकोटा अमेरिकन्सचा शब्द बॅडलॅन्ड्ससाठी आहे त्यावरून मॉन्टानाच्या नॅशनल पार्कचे नाव आहे. दोन लाख त्रेचाळीस हजार एकरांचे हे साउथ डाकोटाचे नॅशनल पार्क अमेरिकेच्या नॅशनल पार्क सर्विस आणि लाकोटा नेशनच्या सहकार्याने सांभाळले जाते. १९३९मध्ये हे नॅशनल पार्क खऱ्या अर्थाने प्रस्थापित झाले.
ज्वालामुखींच्या उद्रेकांनंतर तप्त लाव्हासोबत तप्त राखेचे लोटही वाहात निघतात. ती राख, इथं पूर्वी असलेल्या व्हाईट नदीच्या तळातील माती, पूर्वी कधीतरी जमिनीने घेरलेल्या (इनलॅन्ड) समुद्राचा तळ आणि मग शतकानुशतके वाहात येणारी माती, भरड या सर्वांनी या भूभागाची घडण केली आहे. पासष्ट लक्ष वर्षांपूर्वी झालेल्या अपलिफ्टनंतर समुद्रतळ वर उचलला गेला, पाणी वाहून गेलं पण वाळू राहिली, बाजूने वाहणाऱ्या व्हाईट नदीला नामशेष करीत काळाने तिची वाळूही त्यातच टाकून दिली, मग लागोपाठ वाहात आलेल्या तप्त राखेचे थरावर थर बसत गेले. सहस्रकांच्या प्रवासात ढिल्या वाळूचे खडकांत रुपांतर झाले, उष्ण राख निवून तिचेही खडक झाले, येलोस्टोन, ब्लॅक हिल्स अशा सर्व ठिकाणांहून रेतीमाती येत राहिली. बारीकसारीक दगडगोटे जे प्रवाहांबरोबर दूरवर जाऊ शकले तेही आले.
त्यामुळे या टेकड्या, दऱ्या, पठारे यांच्या स्तरांचे रंग फिके राखी, गडद राखी, फिके पिवळे, गडद पिवळे, काळपट लालसर, पिवळट लालसर, गडद तपकिरी, भुरकट, पिंगट, आणि अगदी फिकट जांभळट असेही आहेत. सगळी गंमत आहे ती या थरांनीच घडवलेली.
पासष्ट दशलक्ष किंवा त्याहून अधिक वर्षांपूर्वी जे प्राणीजीवन होते ते दोन प्लेट्सच्या धडकेने उसळलेल्या भयकारी कल्लोळाखाली दबून गेले. आणि मग सजीवांचे पुन्हापुन्हा पुनरुज्जीवन झाले असले तरीही नंतरच्या ज्वालामुखींच्या सक्रीयतेमुळे वरच्या थरांतही सजीव मरत राहिले, दबत राहिले. या भागातल्या मानवी अस्तित्वाची नोंद अकरा हजार वर्षे जुनी आहे. आणि आताच्या मूळ अमेरिकी टोळ्यांचेच पूर्वज पॅलिओ इंडियन्स म्हणून तिथे जगत असावेत. या भागात समुद्र होता याचे ज्ञान मूळ अमेरिकन टोळ्यांना होते. शंख, शिंपले, कासवे यांचे जीवाश्म पाहून फार पूर्वीपासून त्यांनी हे अनुमान काढले होते आणि ते त्यांचे प्रचलित ज्ञान आहे. त्यांच्या पूर्वजांना जी मोठमोठी अश्मीभूत हाडे सापडली त्यावरून इथे फार पूर्वी कधीतरी जे प्राणी होते ते आता नाहीत इथवर त्यांनी निष्कर्ष काढले होते. निसर्गात सापडणारे सारे पवित्र असते या भावनेने त्यांनी जीवाश्मांची फारशी हलवाहलव केली नव्हती. पण नव्याने आलेल्या माणसांना मात्र कुतूहलही अधिक होते, माहितीही अधिक होती. येथे जीवाश्म मिळत आहेत ही बातमी साधारण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर्वदूर पसरली.
येथे जीवाश्म सापडतात म्हटल्यावर अनेक लोकांनी इथले जीवाश्म गोळा करण्यासाठी सफरी, मोहिमा काढल्या. सोन्यासारखीच किंमत येते जीवाश्मांना.
पण या जीवाश्मांना वैज्ञानिकांपर्यंतही पोहोचवण्यात आले. आणि तेव्हापासून ते आजतागायत व्हाईट नदीच्या या दुष्टभू खोऱ्यातील जीवाश्मांचा अभ्यास सुरू राहिला आहे.
वॉल गावातून निघून आपल्याला सीनिक हायवे घ्यायचा आहे एवढंच रवीगौरीने सांगितलेलं. हे या रस्त्याचं नाव आहे एवढीच नोंद मनाने घेतलेली. कारण आत्तापर्यंत जे रस्ते चाकाखाली घातलेले ते सारे ‘सीनिक’- रम्य देखावे नजर करणारेच रस्ते होते.
पण हा रस्ता एका वेगळ्याच अर्थाने रम्य होता. सपाट गवताळ प्रेअरीला ओहोटी लागून सपाट रेताड, वैराण भूमी सुरू झाली. आणि वालुकाश्मातून कोरून काढलेल्या कळस-खांबांसारख्या रचना दूरवर दिसू लागल्या. फक्त हे कोरणारे कुणी राजस्थानी कारागीर नव्हते आणि एकदा काम करून थांबलेही नव्हते... कारागिरी अव्याहत सुरू ठेवणारे वारा
या नॅशनल पार्कमध्ये येणारांना मोक्याच्या जागी थांबून या आगळ्या निसर्गाविष्काराचे कौतुक पाहाता यावे म्हणून तब्बल पंधरा ओवरलुक्स बांधले आहेत. आणि आठ ट्रेल्स आहेत. आम्ही आत शिरलो आणि पहिला ओवरलुक लागला तो पिनॅकल ओवरलुक. रस्त्याकडेला लोखंडी नळ्यांचे कठडे आणि खाली उतरून जाणाऱ्या प्रशस्त पायऱ्या. आणि अर्थातच व्हील चेअर्समधल्यांना सहज जाता येईल असा रॅम्पही. वरूनच दृश्य पाहून हक्काबक्का झालेलो. एवढा प्रचंड, विस्तीर्ण घळी, डोंगर आणि डोंगरघड्यांचा तो प्रदेश. तुरळक झुडपी जंगल, पांढरं-करडं गवत... संपूर्ण प्रदेशाची भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने माहिती लिहिलेले व्यवस्थित फलक होते. ते वाचून हे समोरचं आगळंवेगळं दृश्य पाहाताना वेगळी दृष्टी लाभेल अशीच सारी मांडणी होती. याच मासल्याचे अडीच लक्ष एकर चहुदिशांना पसरले आहेत ही कल्पना करणं अवघड होतं.
करड्या-पिवळट-लालसर-तपकिरी- पांढरट राखी रंगांच्या थरांचे ते डोंगर मनात जणू कसलीशी कालवाकालव करून जात होते. त्यांना घासून काढणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श आपल्यालाही होत असतो आणि एक शहारा आतवरून उमटतो. काळ जणू वाऱ्याच्या वाहण्याबरोबर कुजबुजतो... मी सतत बदल घडवून आणत असतो- अचेतनांमधे, सचेतनांमधेही.
या प्रदेशात एक समुद्र होता, उष्ण कटिबंधासारखी हवा होती, जंगले होती, नागमोडी वळणांनी धावणाऱ्या नद्या होत्या हे आता काही केल्या डोळ्यासमोर आणता येत नाही. पंचाहत्तर दशलक्ष वर्षांपासून (क्रेटेशियस कालखंड) ते अलिकडे चौतीस दशलक्ष वर्षे(ओग्लिओसीन कालखंड) या प्रचंड कालखंडात आणि नंतर तीस दशलक्ष वर्षांपूर्वी ज्वालामुखीतून ओतलेल्या राखेच्या लोंढ्यांनी झालेल्या बदलांनी सारे चित्रच बदलून टाकले. लसलसत्या प्रवाही निळ्या हिरव्या पिवळ्या रंगांच्या जागी करडेपिवळेराखी रंग भरले गेले. आधीच्या नद्यांनी वाहून आलेला गाळ, ज्वालामुखींची राख, चूरचूर झालेल्या खडकांची, झाडापानांची धूळमाती, साऱ्याच घुसळणीचे उदास रंग एकावर एक लेपन करत गेले आहेत.
अँड्र्यू वाएथच्या चित्रातल्या उदास करड्या रंगछटा जशा उदासी जाणवतानाच आनंदही देतात तसेच या विस्तीर्ण चित्रफलकाचेही आहे. कुठेतरी दोन पहाडांच्या मधल्या घळीत माती, ह्यूमस साचून जरा हिरवा झाडोरा दिसतो. पण त्यावरही पिवळट करडी छटा असतेच. आणि त्याला दो बाजूंनी वेढून घेणाऱ्या पर्वतांच्या कुशींमध्ये भक्क करड्या राखी थरांची उतरंड दिसते. अगदी वाएथ...
समोर आज निळंशार आकाश आहे. दूर क्षितिजाजवळ अगदी हलकेसे, ब्रशमधे राहिलेला पांढरा रंग निळ्या कापडावर पुसून टाकलेले असावेत असे ढगांचे एक दोन फराटे तेवढे आहेत. अशा गर्द निळ्या आकाशावर माझी प्रिय माणसे चित्रासारखी रेखलेली दिसतात आणि काळाचे भान अधिकच गहिरे होते.
हा परिसर मनात काहीतरी अव्यक्तच ठेवावे असे जागवतो खरा.
कितीतर वेळ आम्ही तिथे चिकटून उभे होतो. काळाच्या भानात वेळेचं भान हरपायला झालं होतं.
अखेर पुढे पण खूप काही पाहायचंय... असाच आहे सारा हाय वे ही आठवण होऊन पुढे सरकलो.
एका ठिकाणी सपाट जमिनीवर पांढरट पुंजके अंतराअंतराने दिसले. हे कसलं गवत म्हणून नीट निरखून पाहिलं. ती होती प्रेअरी डॉग्ज या प्राण्यांची घरटी- मोठी वसाहतच होती ती. आणि मग दिसलेच ते धिटुकले प्राणी. प्रेअरी डॉग्ज. मुंगसांसारखे दिसणारे उंदीर कुळातले हे प्राणी. त्यांना कुत्र्यांच्या नावाशी का भिडवलं असेल? माहीत नाही. मागच्या दोन पायांवर, उभे राहून टुकुटुकू बघणारे गुबगुबीत प्रेअरी डॉग्ज मस्तच आहेत. यांच्या वसाहतींमुळे इतर अनेक प्राण्यांनाही आसरा लाभतो. त्यांच्या प्रजननाचा वेग जास्त म्हणून संख्याही जास्त असल्यामुळे या भागातल्या इतर प्राण्यांच्या पोटाची सोयही होते यांच्या जिवावर.
कितीही वातड, भरड गवत, मुळं, खरबरीत बिया खाऊन हे जगू शकतात आणि टुमटुमित राहू शकतात हे यांच्या वंशाचं इंगित.
मग नंतर दोनतीन ठिकाणी दिसल्या यांच्या वसाहती.
गाडी अगदी सावकाश पस्तीस किलोमीटरच्या वेगाने जात असल्यामुळे आसमंत नीट पाहात चाललो. वाटेत लागलेल्या प्रत्येक ओवरलुकपाशी थांबण्याची चैन परवडणार नव्हती. पण पुढचा थांबा घेतला तो फॉसिल ट्रेलचा.
इथे बोर्डवॉक बांधलेला आहे. शक्य तोवर त्यावरूनच चालायचं. पण जवळच्या रेताड खडकाच्या माथ्यावर चढायचा मोह सर्वांनाच होतो. या बोर्डवॉकवर अंतराअंतराने या भागात सापडलेल्या जीवाश्मांच्या साच्यातल्या प्रतिकृती मांडलेल्या आहेत. व्यवस्थित लिहिलेल्या- न झिजलेल्या फलकांवरील शास्त्रीय माहितीसह.
पाच मैलांचा ट्रेल आहे हा. छेः! वेळ नाही... जेमतेम एक किलोमीटरपण पुढे गेलो नाही. फिरलो परत. वेळेचे गुलाम. रवि, जिंका, सोंटी आणि सुश्रुत तेवढ्यात वर खडकांवर चढून परिसर पाहून आले. थराथरांनी तयार झालेले ते खडक अगदीच काही भुसभुशीतही नाहीत.
इथून बाहेर पडून गाडीजवळ येईपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं की काहीतरी चावतंय. अंगावर कपड्यांवर अगदी सूक्ष्म असे कण धावत होते. कसलेसे किडे होते. गाडीत न बसता भराभर सर्वांनी एकमेकांचे कपडे झटकून दिले. या वाळवंटात जगणारे, वाढणारे हे जीव म्हणजे अजबच वाटलं.
पुन्हा रस्त्याला लागलो आणि सँडस्टोनमधून कोरलेले तें मंदिररचनेसादृश डोंगर पहात पहात निघालो.
कधीतरी त्या रचना संपल्या आणि नुसती सपाट रेताड जमीन दोन्ही बाजूला पसरून राहिली. नॅशनल पार्कच्या सीमापार आलो. आणि तिथे असलेल्या सुंदरशा सुवेनिर शॉप, रेस्तराँ, रेस्टरूम्स कॉम्प्लेक्समध्ये भरपेट हॉटडॉग्ज खाल्ले.
आता पुन्हा सूर्यफुले, ल्यूसेर्न, मका शेती दिसू लागणार होती...
पहिल्या सूर्यफुलाच्या शेताने डोळ्यांना प्रेमाने स्पर्श केला. कितीही सुंदर वाटलं तरी रेगिस्तानी रचनांनी डोळे भगभगलेले असतातच.
तरीही तिथे परतून जावंसं वाटतंय... सूर्योदय, सूर्यास्तातले दुष्टभूचे रंगढंग पाहायला कधीतरी परतायचंय.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आपला लेख वाचून, पृथ्वी,आप, तेज, वायु व आकाश या पंचमहातत्वांपैकी पृथ्वीतत्वाचे सौंदर्य ल्यालेले हे प्रदेश पहाण्याची इच्छा होते आहे. मिनेसोटामधील तळी आणि पाणपक्षी खूप पाहीले. मन शांतवणारं निळं पाणी, निळं आकाश आणि आकाशात चारच्या आकड्यात चंद्राला पाठीवर घेऊन उडणारे गीझही पाहीले. पाण्यावर चमचमणारी चांदीची नाणी पहाताना, कितीदा कितीदा मनोमन "वरुणाची (नेपच्युन) प्रार्थना केली." -

जलबिम्बाय विद्महे, नीलपुरुषाय धीमहि
तन्नो वरुण प्रचोदयात}|

.
भविष्यात ते कातळांचे, खडकाचे, पर्वतप्राय प्रदेशाचे दर्शन जरुर घेतले जाईल; हे स्वतःचे स्वतःला वचन. वायु तत्व जितके सुटवंग, इनडिफरंट, जल तत्व जितके कोमल, काव्यमय तितकेच पृथ्वी तत्व - मनात आदर जागृत करणारं, विशाल, भव्य असे आमचे ज्योतिष सांगते. या पृथ्वी तत्वाचा हा भव्य, मॅजेस्टिक, स्पेक्टॅक्युलर अविष्कार जरुर पाहीला जाईल. खरं तर इतकं सुंदर लिहीलय तुम्ही, की परत पारायण करुन ते सृष्टीसौंदर्य परत अंतःचक्षुंनी पिऊन घेणार आहे. व्हॅन गॉग च्या सूर्यफुलांचे इतके मनोरम वर्णन ऐकले नव्हते. अक्षरक्षः अंगावर काटा ऊभा राहीला. काही रंग हे एकमेकांचे सोल-मेटसच असतात जसे -गुलाबी-हिरवा, मोतिया-करडा, तशीच एक जोडी पिवळा-निळा. डिस्ने च्या "ब्युटी & द बीस्ट" मधील पिवळ्या झग्यातली बेल ही माझी सर्वात आवडती राजकन्या का तर पिवळा रंग प्रिय (अर्थात ती आवडायची इतरही कारणे आहेत. ती पुन्हा कधी तरी.)निळ्या आभाळाखालील, उन्हात चमकणारी सूर्यफुलांची पिवळी धमक शेते पहायला भाग्य लागत असणार. आणि त्याचे इतके उत्कट वर्णन करायला प्रतिभा.
.
मुग्धा मॅडम, हा लेख अतिशय आवडला. विशेषतः मला कशाकशाचा हेवा वाटतो आहे कसे सांगू- हे सौंदर्य र्टिपणार्‍या तुमच्या नजरेचा की वर्णन करण्याच्या उत्कटतेचा, ओघवत्या भाषेचा की मधेमधे पेरलेल्या माहीतीचा कशाकशाचा हेवा करु! आपल्याला असेच अनेक उत्तमोत्तम अनुभव यावोत ही सदिच्छा आणि ते आमच्यापर्यंत पोचत रहावोत हीच स्वार्थी हेतू Smile
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला फा र आवडलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एहेहेहे, मस्त. आवडले.
आर्टिस्ट बिर्टिस्ट आहात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉलिड मस्त लिहीलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड कार्विंग चक्क साडसहा हजार शब्दांचं झालंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे आमच्या ऑडिओच्या भाषेत ५४ मिन्टाची स्क्रीप्ट झाली. पॉज वगैरे धरुन एक तासाचा शो झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करून टाका. विज्युअल्सही आहेत. ऑडिओच कशाला विडिओही करा.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोठ्ठी लांबलचक पर्वतराजी होती ना...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रदर्शी आणि सुंदर लेखन.

न्यू मेक्सिकोच्या प्रेमात पडून मी तिथे आत्तापर्यंत तीनदा गेल्ये. पण त्याचं एवढं सुंदर वर्णन करणं मला शक्य नाही. तुम्ही एकदा या इकडे, आपण एकत्र न्यू मेक्सिकोला जाऊ; तिथलं सौंदर्य जॉर्जिया ओ'कीफने रंगांनी चितारलं आहे, तुम्ही शब्द वापरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इंग्रजीसारखं मराठी OCR कधी येणार?
तिकडे pdf पुस्तकं,पेपर्स ऐकता येतात.दोनचार MBची अॅप्स आहेत फक्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0