'ऐसी अक्षरे' दिवाळी अंक- २०१६ चे परीक्षण

रेषेवरची अक्षरे: अंकनामामध्ये आलेले हे परीक्षण

मी दिवाळी अंकांचा चोखंदळ वाचक नाही. मी 'ऐसी अक्षरे' हा फोरम पूर्वी केव्हातरी नियमाने वाचत असे. पण नंतर जे नेटावर थेट आणि अधिक शुद्ध स्वरूपात आहे, त्याबद्दल तिथे परत वाचणं नकोसं वाटायला लागलं. पुढे-पुढे लोकांच्या गीकीसदृश होत गेलेल्या कमेंट्सही कंटाळवाण्या होत गेल्या, त्यामुळे मी ते सोडून दिलं. पण अर्थात फेसबुकवर त्यांच्या दिवाळी अंकाबद्दल कळलं होतं. 'ऐसी अक्षरे'ने ह्याअगोदर काढलेल्या पॉर्न विशेषांकात 'जलपर्णीच्या नशिबाचे साडेतीन फेरे' हा फर्मास प्रकार होता. त्यामुळे 'ऐसी अक्षरे'चा दिवाळी अंक मी बऱ्यापैकी वाचला. काही लिखाण वेगाने वाचलं; काही परत-परत, आणि काही केवळ चाळून सोडून दिलं.

इतर साऱ्या गोष्टींसारख्या दिवाळी अंकांबद्दलच्याही - काही चेरीश्‍‍ केलेल्या, पण आता पुसट झालेल्या - इमेजेस्‌ माझ्या डोक्यात आहेत. त्यात एक आहे अभय बंगांचा लेख (बहुतेक 'मौजे'तला २००२ किंवा २००३ सालचा), आणि त्या अंकातली किनाऱ्यावरचे मासे समुद्रात फेकणाऱ्या माणसाची गोष्ट; एक आहे 'प्रयास'च्या गिरीश संतांचा लेख (मौज दिवाळी २००५ बहुधा), ज्या लेखाने माहितीपर लिखाणाबद्दल मला जागं केलं; सदानंद देशमुख ह्यांची २०१० सालच्या ('अंतर्नाद' किंवा 'मौज'च्या) दिवाळी अंकामधली कथा (एड्‌स झालेला भाऊ आणि त्याला फकिराकडे घेऊन गेलेली वहिनी); केव्हातरी वाचलेली अनंत सामंतांची कादंबरी - बहुतेक 'ऑक्टोबर एंड'.

मी दिवाळी अंकांकडून काही अपेक्षा वगैरे ठेवत नाही. त्यामुळे मला धक्का बसलाच, तरी दुःख न देणारा धक्काच बसण्याची शक्यता होती. 'ऐसी अक्षरे'च्या २०१६ दिवाळी अंकामधल्या असा दुःख न देणारा धक्का देणार्‍या किंवा वर दिलेल्याप्रमाणे लक्ष्यात राहणार्‍या कोणत्या गोष्टी असतील, तर त्या ह्या :

१. 'विभक्ती'चे प्रत्यय आणि सापेक्ष सुरक्षिततेचे सिद्धांत : म्हणजे, मी वाचत गेलो ही गोष्ट. अ, ब, क अशी थोडी त्रयस्थ, निरपेक्ष नावं असली; तरी त्या गोष्टीचा नूर 'घडलं असेल असं कदाचित लिहिणाऱ्याबाबत' असा काहीसा आहे. अर्थात तसं ह्या गोष्टीत काही घडत नाही. खूप टोकाची संवेदना, बऱ्यापैकी उत्पन्न आणि तसेच मित्र-मैत्रिणी असलेल्या माणसांच्या रकान्यात मी ही गोष्ट सोडून देईन.

२. लोकशाही राज्यपद्धतीचे फायदे-तोटे : ह्या कथेचा फॉर्म आणि त्यातलं कोडं लक्ष्यात राहील. ह्या कथेत लोकशाहीबद्दल जी सटल्‌ कमेंट वगैरे आहे, ती काही मला मान्य नाहीय. रॅशनल निवडीने किंवा स्ट्रॅटेजिक मॅन्युप्युलेशनने लोकशाही मॉडेल होत नाही, असं मला वाटतं. पण ही बाब अलाहिदा आहे. ती एक सरस कथा आहे. कथा अशा अर्थाने वाचत असलेल्या काही वाचकांना मधला गणिताचा भाग अगम्य वाटू शकतो. पण कथेची शैली ही काही प्रमाणात मराठी कथांचे जनुकीय प्रणेते जीए ह्यांच्याशी जुळणारी असल्याने आणि मानवी वर्तनाचा पेच अशी एकूण कथेची मांडणी असल्याने आणि तिच्या चिरेबंद मांडणीमुळे मजा येते.

३. आधुनिक कविता अवघड का असते? : असण्यामधल्या अनेक असण्यांचा पेच माझ्या लेखी ही कविता अचूक पकडते. कवितांची उत्क्रांती वगैरेंबद्दल मला काही ठोस माहिती नाही. पण तरीही कवितांच्या बाह्य स्वरूपात आणि त्या काय सांगताहेत यानुसार नक्कीच दोन मोठे गट पडतात. गेयता, अर्थाच्या टोकदार पाठलागापेक्षा तंत्राची आस, आणि मुळात जगाला काहीएक नैतिक बैठक आहे अशा गृहितकावर आधारित असलेल्या कविता एका गटात. आणि दुसरा गट, जो कालान्वयेही नंतरचा असणार, तो म्हणजे जगाकडे बघायचा एकच एक असा बरोबर कोन नाही, असं मानणारा. जो जिथे आहे, तिथून त्याला जे दिसतंय, ते त्यानं मांडावं; अशी भूमिका असलेला. यमकाचा, गेयतेचा आणि अन्य तंत्राचा सोस सुटण्यामागे मुळात कसं बघावं ह्यात झालेला बदल कारणीभूत आहे असं मला वाटतं.
म्हणजे हा काही फक्त कवितांमधला बदल नाहीये. कोणत्याही मानवी कृतीकडे बघायचं कसं या भूमिकेतलाच हा बदल आहे. आपल्या भोवतीच्या जगाकडे बघायचा एक असा चश्मा नाही असं मानल्यावर चूक-बरोबर हे सात्त्विक वर्गीकरण एकदम ढासळून जातं आणि त्यातून विविधता येते. पण विविधता आली की त्याची जटिलता वाढते आणि काही वेळा हा केवळ 'अगम्य कोलाहल' वाटू लागतो. मुळात कविता हा प्रामुख्याने कवीचा स्वतःशी बोलण्याचा मार्ग आहे अशा अर्थाने आपण तिच्याकडे बघायला लागल्यावर, मग त्यात इतरांसाठी काही आहे का नाही असा प्रश्नच उद्भवत नाही. जे काही आहे, ते ज्याचं त्यानं बघून घ्यावं.
हे त्रोटक विवेचन आहे, पण माझ्यामते ह्यामुळे काही जणांना 'आधुनिक' कविता कठीण / जटील वाटत असणं शक्य आहे.
'आधुनिक कविता अवघड का असते?' हा खरा प्रश्न आहे का सटायर आहे, हे मला ठाऊक नाही. मला जेवढं कळलं, त्यानुसार ही कविता मॉक करतेय आणि काही वेळा एकदम सरळ काहीतरी सांगतेय. सिनिक, सहानुभूतीने बघणारा, विसंगती पकडणारा असे सारे कोपरेही तिला आहेतच. तरी शेवटच्या चार ओळी मला बेहद्द आवडलेल्या आहेत. त्यात एक थंड निष्कर्षाचा सुस्कारा आहे, का शब्दांच्या रचनेत दडवलेली कुत्सित कमेंट आहे, हे कवीच जाणे!

४. आय-क्यू पंक्चरलेली बाहुली : मला गोष्ट आवडली. "इट्स क्यूट!" असं म्हणतात ना, तशा रकान्यात!

५. काळीजमाया : हा लेख मात्र मी दोनदा वाचला. मी केव्हातरी जीएंच्या रूपककथासदृश लिखाणाचा फॅन होतो. कदाचित मी कधीकाळी जे काही लिहिलं होतं, त्यातल्या काहीवर त्यांच्या शब्दांची झाक होती. (उरलेल्या काहीवर अजून कोणी असेल!) बरं म्हणा किंवा वाईट म्हणा; नेमाडे, ग्रेस, जीए अशा लोकांनी त्यांच्या-त्यांच्या जॉनरवर त्यांची मोठी सावली सोडलेली आहे. अनेक वाचक हे सारे प्रकार वाचताना सुरुवातीला त्याच सावलीत चाचपडू लागतात. ह्या सावलीतून बाहेर पडल्यावर त्यातील न्यून, किंवा त्याहून सरस किंवा रंजक काही सापडतं. हे सापडूनही काही जण आधीच्या चाचपडीशी भावनिक जवळीक ठेवू शकतात. काही जण तिला पूर्णपणे झिडकारू शकतात. लेखकाने जीएंच्या कथांना स्पर्शत जात त्यांच्या कथात येणाऱ्या, सुख रसरसून जगण्याच्या आशेला आणि त्या आशेचा निश्चित चुराडा झाल्यावर मागे उरलेल्या माणसांना याद केलेलं आहे. त्यांच्या शैलीमुळे हा लेख जमला आहे एवढं नक्की. तो वाचल्यावर सदाभाऊ आणि सीताबाई आणि त्या कथेचा शेवट मला आठवला.
एके काळी जीए आणि सुनीता देशपांडे ह्यांचा पत्रव्यवहार मी वाचायचो. आता कधी ते पुस्तक काढलं, तर फार वाचवत नाही. तसंच जीएंच्या कथांबद्दलही होतं, विशेषतः मानवी स्वभावाच्या एखाद्या मूलभूततेला रूपकवाटेने हात घालू पाहणाऱ्या कथांबद्दल. त्यापेक्षा करवादलेल्या, चिरडीला येऊन सणकेने काही करू जाणाऱ्या लोकांच्या, किंवा अनपेक्षिताच्या एखाद्या फटक्याने तुटलेल्या, मोडक्या लोकांच्या त्यांनी लिहिलेल्या गोष्टी मी केव्हा-केव्हा वाचतो.
'काळीजमाया'चंही असंच झालं. मला पहिल्यांदा तो गारद आवडला. मग दुसऱ्यांदा काही शब्द जड-जड, अधिक नटवलेले वाटू लागले.

बाकी काही लेखांचा, बहुतकरून माहितीपर लेखांचा, उद्देश मला कळलाच नाही. अनेकदा हे लेख नेमकं कोण वाचणार आहे आणि त्यातून वाचणाऱ्याला शॉर्ट रनमध्ये आणि लॉंग रनमध्ये काय वाटणं अपेक्षित आहे, का असं काही नाहीच; ह्याचा काही उलगडा झाला नाही. 'नाती' हा माणसांबद्दल लिहिल्या जाणाऱ्या बहुतेक गोष्टींचा कच्चा माल असतोच. त्याची थीम जरी दिवाळी अंकाला असली, तरी तिला फार पक्केपणा आलेला नाही.

मुळात माहितीपर लेखांच्या बाबतीत, त्यातही मराठीत असलेल्या अशा लेखांच्या बाबतीत, मी आता स्वतःला काही प्रश्न विचारतो:

१. लिहिणारा ज्या क्षेत्रात काम करतो, त्यातल्या नैपुण्याच्या आधारे आणि माहिती इतरांत वाटावी अशा भावनेने लिहिलेला लेख असेल; तर - मला आत्ता ह्या माहितीची गरज आहे का? किंवा हे माझ्या डोक्यात घोळणाऱ्या गोष्टींबाबत आहे का? उदाहरणार्थ, 'महाराष्ट्रातील अमुक एका देवतेची मंदिरे' असं असेल, तर मी ते थोडसं बाजूला ठेवतो. मंदिरं, देवता आहेत म्हणून नाही, तर ह्या लेखात जे असेल ते मला आत्ता नकोय म्हणून.

२. लेख लिहिताना घडलेल्या किंवा घडायच्या अवस्थेत असणाऱ्या आणि लोकांच्या भौतिक सुखावर परिणाम करू शकणाऱ्या गोष्टींची, वैयक्तिक अनुभवावर आधारित नसलेली, इतरांना तपासून पाहता येईल अशा पुराव्यांवर आधारित असलेली आणि काही उपाय सुचवायचा प्रयत्न करणारी, किंवा प्रस्थापित उपायांचा तर्काधारित प्रपोगंडा करणारी मांडणी असेल; तर मी ती प्राधान्याने वाचतो. पण वरील घटकांपैकी एखादा घटक नसेल, तर मी थोडा साशंक असतो. अमुक एक अमुक एका क्षेत्रात थोर आहेत, म्हणून त्यांचं म्हणणं प्रमाण माना किंवा त्यांची मांडणी जशी असेल तशी प्रमाण माना; असं असू नये असं मला वाटतं. हे एक प्रकारचं दैवतीकरण झालं.

३. आत्मविवरणपर किंवा अन्य कोणाच्या कृतींचं वर्णन असलेले माहितीपर लेख : इथे मी थोडा डळमळीत आहे. मला आत्मचरित्र हा प्रकार मुळातच स्वतःचे हिशोब जुळवायला केलेला प्रकार वाटतो. माझी माणसांच्या उतरंडीची जी परीक्षा आहे; त्यात 'माझं असं, माझं तसं' न करणारे आणि एखाद्या विषयातच मुरून, त्या विषयाचं अंग होऊन गेलेले लोक, किंवा अशी माझ्या मनातली त्यांची इमेज हीच काय ती जगण्याची पद्धत आहे. तरीही काही संदिग्धतेवर अधिक प्रकाश टाकायला, काही पूर्ण काळोखातल्या गोष्टी - धूसर का होईना - दाखवायला चरित्रं अथवा आत्मचरित्रं उपयोगी पडू शकतात. पण हे अशा कृतींमध्ये फार कमी वेळा लागू पडतं. अनेकदा, अमुक एका गोष्टीबद्दल कुणाला काही विचारायचं असेल, तर ह्याबद्दल ह्यांना विचारता येईल - अशी एन्ट्री बनवायला आपल्याला अशा लेखांचा उपयोग होतो.

या सगळ्या पार्श्वभूमीवर 'ऐसी..' मधल्या माहितीपर लेखांत मला फारसं काही गवसलेलं नाही. पण अर्थात हे थोडसं तिरकस सापेक्ष आहे.

'कथा' विभागातल्या बहुतेक कथा ह्या धक्का-तंत्रावर उभ्या केल्यासारख्या वाटतात. कदाचित सध्याचे बहुतेक सिनेमे, प्रख्यात कादंबऱ्या ह्या सगळ्यांचाच हा गुण आहे किंवा एकूणच जीवनाची गुणवत्ता या अर्थी सपक होत चाललेल्या आयुष्यात धक्कातंत्र हाच मजा आहे.

'खेळ'मध्ये संवादांचा अतिरेक आहे. 'खेळ' ही कथा नाटक म्हणून परत सादर केली, तर अधिक चांगलं होईल, असं मला वाटत राहिलं. 'कुलंगी कुत्र्याला…'मध्ये जननेंद्रियं, स्तन ह्यांचे उल्लेख नेमके कशाला आहेत हे कळलं नाही आणि केवळ शेवटावरच सारी कथा फिरवायचा प्रयत्न आहे असं वाटत राहिलं. तसंच 'अंतर'चं. काही पद्धतशीर स्टिरिओटाईप ठोकळे घेऊन ही कथा लिहिलेली आहे. (ही कथा वाचताना काही वेळा झुम्पा लहिरीच्या 'लोलँड'ची आठवण येते, विशेषतः 'बेला' ह्या नावामुळे.) खरंतर चीअरलीडर हे थोडं वेगळं सूत्र होतं. भारतात वाढून-जन्मून परदेशात स्थायिक झालेल्या लोकांच्या पाल्यांबद्दल, विशेषतः त्यांच्यातल्या डीवियंट्सबद्दल (सेक्शुअली अशाच अर्थाने नाही. करिअर, भारताबद्दल काही वाटणं, खेळांची आवड अशा अनेक अर्थांनी. डॉ. अतुल गावंडे हे एक उदाहरण म्हणून मी देईन. ) मला कुतूहल आहे. 'वाढदिवस'च्या शेवटाचा मी अजून विचार करतो आहे. 'धनुष्यातून सुटलेला बाण' निवांत सुरू होते, पण मग कमेंट करण्याच्या नादात कशीतरी संपते. 'डावलच्या स्वप्नात पतंगी' मी काही तांत्रिक कारणाने ऍक्सेस न मिळाल्याने वाचू शकलो नाही. उरलेल्या कथांबद्दल काही आठवत नाही.

ब्रह्मे आता जाम ताणू लागले आहेत.

'ऐसी'च्या लेखनिवडीत रोमॅन्टिसिझमला किंवा सरासरी डोक्यावर घेतल्या जाणाऱ्या फॉर्म्सना नाकारणं अशी एक ठरवून केलेली निवड दिसते. आपण जेव्हा असं ठरवून सगळं नाकारतो आणि मुद्दामून, हेतूपूर्वक लिखाण करतो; तेव्हा ती प्रामुख्याने बौद्धिक निर्मिती बनते. 'ऐसी'च्या दिवाळी अंकाला हा बौद्धिक गंध आहे. त्यापाठचं रसायन हळूहळू मराठीच्या जेनेटिकली मॉडिफाईड फुलांचं एलीट अत्तर बनेल का काय, असं काही वेळा वाटतं. कथा, कविता, अधिक लांबीचं फिक्शन ह्यांवर काम करणाऱ्या लोकांना चोखंदळ संपादन पुरवणं आणि दुसऱ्या प्रतलावर, अधिक स्ट्रक्चर्ड असलेल्या आणि निव्वळ उष्णता निर्माण करण्यापेक्षाही काहीएक प्रकाश पाडण्याच्या दृष्टीने बनणाऱ्या वैचारिक लिखाणाचं चोखंदळ संपादन आणि प्रसार - ह्या दोन दिशांना 'ऐसी अक्षरे' जाऊ शकेल काय?

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

जलपर्णी आवडल्याचं वाचून आनंद झाला. Smile

'कुलंगी कुत्र्याला…'मध्ये जननेंद्रियं, स्तन ह्यांचे उल्लेख नेमके कशाला आहेत हे कळलं नाही ...

ही कथा लाचारीचे विविध पैलू दाखवते. कथेतलं प्रत्येक पात्र कोणत्या ना कोणत्या प्रकारे लाचार आहे. (गारवे धरून.) पापल कदाचित सर्वात लाचार आहे. लहानपणापासून त्याच्यावर अर्धवट/स्लो-लर्नर/वेडसर वगैरे शिक्के बसले आहेत. त्यायोगे त्याची लैंगिक कुचंबणाही झाली आहे. या रिप्रेस्ड भावना त्याच्या डोक्यात भडक बनून थैमान घालतात. त्याच्या 'पापल' असण्याचा तो एक भाग आहे.

लाचार अवस्था कोणीही सहजासहजी स्वीकारत नाही. प्रत्येक लाचार माणूस काही ना काही डिफेन्स मेकॅनिझम वापरतोच; त्याच्या आत्मसन्मानासाठी ते आवश्यक असतं. शाब्दिक/शारिरिक हिंसा हे गारवेचं डिफेन्स मेकॅनिझम आहे, देवभोळेपणा/अंधश्रद्धा हे बापूचं. तसं बीभत्स लैंगिकतेच्या चष्म्यातून जगाकडे बघणं हे पापलचं.

पापल प्रथमपुरुषी नॅरेटर असल्याने त्याच्या वर्णनात भडक लैंगिक वर्णनं येणारच. त्याला पर्याय नाही. जर प्रथमपुरुषी नॅरेटर गारवे असता तर त्यात कदाचित हिंसक-लैंगिक संदर्भ आले असते. बापू असता तर कर्माचा सिद्धांत, पूर्वजन्मीचं संचित वगैरे आलं असतं.

...आणि केवळ शेवटावरच सारी कथा फिरवायचा प्रयत्न आहे असं वाटत राहिलं.

हे मान्यच. कारण शेवट हा या कथेचा स्पष्टपणे उत्कर्षबिंदू आहे. पण शेवट जाणीवपूर्वक फिकट, धूसर ठेवला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

१. या संपूर्ण समीक्षेत अंकाची थीम 'नातीगोती' आहे याचा उल्लेखही नाही. या मूळ सूत्राभोवती धागे गुंफलेले आहेत का या प्रश्नाचा विचारच न करता समीक्षा कशी करता येईल असा प्रश्न पडतो. त्यामुळे आख्खं पुस्तक वाचण्याऐवजी एकेक पान सुटं करून, त्यातली काही पानं वाचून लिहिल्याप्रमाणे वरचा लेख झालेला आहे.
२. 'बाकी काही लेखांचा, बहुतकरून माहितीपर लेखांचा, उद्देश मला कळलाच नाही.' पुन्हा, जर नातीगोती या दृष्टिकोनातून पाहिलं असतं तर अनेक लेखांची या अंकात का उपस्थिती आहे हे सुजाण समीक्षकांना सहज समजून यावं. उदाहरणार्थ - नात्यांचा जनुकीय पाया, माझे घर नक्की कोणते, अर्थ काय बेंबीचा - हे किंवा अशासारखे लेख या अंकात अपरिहार्य आहेत हे ऐसीच्या बहुतांश वाचकांना समजलेलं आहे. समीक्षकांकडून सामान्य वाचकांपेक्षा अधिक अपेक्षा असतात.
३. यापलिकडे जाऊन, 'ललित लिखाण तेवढं खरं, बाकीचं वाचून नक्की काय करायचं?' असा एक पूर्वग्रह दिसतो. वैचारिक आणि माहितीपूर्व लिखाणाची साहित्यात जुनी आणि उज्वल परंपरा आहे. ही परंपरा सांभाळण्याचा ऐसीचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे असे पूर्वग्रह बाळगून ऐसीच्या अंकाची समीक्षा करायला जाणं म्हणजे 'शास्त्रीय संगीतच तेवढं खरं' असं मानणाऱ्याने रॉक संगीताच्या कार्यक्रमाला जाऊन त्यावर 'हा गदारोळ का हे मला समजत नाही' असं म्हणण्यासारखंच आहे.
४. जयदीप चिपलकट्टींच्या लिखाणात माध्यम एक वापरून लोकांना त्यात गुंतवायचं आणि मग काही वेगळ्याच संकल्पना समजावून सांगायच्या या धर्तीचं असतं. त्यांची 'अल्बाट्रॉस सॅंडविच' ही कथा वाचावी ही विनंती. त्या कथेत एक कोडं वापरून एखादी वैचारिक व्यवस्था, त्यांचे स्वतंत्र नियम, त्यांच्या आत विचार करणं, बाहेर विचार करणं यासारख्या गहन गोष्टी उलगडून दाखवल्या आहेत. याउलट इथे एक जीएस्टाइल वातावरणाची कथा वापरून एक क्लिष्ट कोडं सोडवून दाखवलेलं आहे. फॉर्म आणि कंटेंट यांच्या परस्परसंबंधांबद्दल त्यांना नेहमीच रस असतो. 'चौसष्टतेरा' हा त्यांचा लेखही अशाच गुंतागुंतीचं विवेचन करतो. पुन्हा, लेखनाची किंवा लेखकाची व्यापक थीम काय आहे हे समजून न घेता त्या कथेविषयी टिप्पणी आहे.
५. धनंजयच्या कथेचा उल्लेखही नाही हे पाहून प्रचंड आश्चर्य वाटलं. या अंकात इतर कुठल्याही अंकापेक्षा एक प्रचंड वेगळा प्रयोग केलेला आहे. त्याची दखलही न घेता या अंकाची समीक्षा होऊ शकत नाही.
६. अनेक लेखांना नुसतं रकान्यांमध्ये टाकलेलं आहे. उदाहरणार्थ 'खूप टोकाची संवेदना, बऱ्यापैकी उत्पन्न आणि तसेच मित्र-मैत्रिणी असलेल्या माणसांच्या रकान्यात मी ही गोष्ट सोडून देईन' यातून जणूकाही बऱ्यापैकी उत्पन्न नसणाऱ्या लोकांना अशी दुःखं होतच नाहीत असं काहीतरी सुचवलेलं आहे. यावर नक्की काय बोलावं ते कळत नाही.

या व इतरही अनेक गोष्टींमुळे ही समीक्षा वाटली नाही. 'पूर्वग्रहांमुळे स्वतःचा एक घट्ट दृष्टिकोन असलेल्या वाचकाच्या काहीशा अस्ताव्यस्त टिप्पणी' या रकान्यात मी हा लेख टाकला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"नातीगोती" थीम असली तरी अंकातले लेख ह्या थीमला अनुसरून असतीलच अहे नाही, जे जे उत्तम ते ते अंकात देण्याचा प्रयत्न असताना, "नातीगोती" थीमवर अवाक्षरही नाही असे म्हणणे कितपत योग्य?

खालच्या घाटावरच्या भटाची प्रतिक्रिया आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

परीक्षण किंवा समीक्षा अशा नावाखाली लिखाण करताना लेखकाने किमान लेखनामागची भूमिका, लेखकांचे उद्देश, मांडणीमागचे प्रयत्न आणि आत्तापर्यंतचा या लेखकाचा/प्रकाशनाचा इतिहास हे सगळं पार्श्वभूमीला ठेवून त्याअनुषंगाने विश्लेषण करणं अपेक्षित असतं. हा लेख समीक्षा किंवा परीक्षण या निकषांवर उतरत नाही इतकंच म्हणणं आहे. 'ऐसीचा अंंक वाचून माझ्या मनात आलेले विचार' असं शीर्षक असतं तर हे मुद्दे उपस्थितच झाले नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या समीक्षकाच्या इतर लेखनाविषयी उत्सुकता निर्माण झालीय.
यांचे इतर लेखन नेट वर कुठे उपलब्ध होइल ?
ते वाचायला आवडेल.
सर्व साहीत्याची इतकी दमदार "विल्हेवाट" लावणारं यांच साहीत्य नेमकी कुठली "वाट" चोखाळतयं ते
चाचपडायला आवडेल.
म्हणजे अशोक शहाणे यांनी जसा मराठी साहित्यावर "क्ष" किरण टाकल्यावर स्वतः
शहाणेंच्या लिखाणाकडुन जशी न पेक्षा अपेक्षा निर्माण होते तसं काहिसं या समीक्षकाविषयी झालयं.
म्हणजे जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा टाइप
बाकी या लेखाचं मुळ शीर्शक
"जेनेटिकली मॉडिफाइड फुलांचं एलीट अत्तर" इतकं कल्पक विचारपुर्वक निवडलेलं असतांना हा लेख इथे देतांना
"'ऐसी अक्षरे' दिवाळी अंक- २०१६ चे परीक्षण" इतका सरकारी धोरणासारखा बदल का केला गेला ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

माझ्या प्रतिसादाला खवचट श्रेणी का मिळाली असेल याचं आज खरोखर कुतुहल वाटतय
ते एक खरच जाऊ द्या
पण खालील श्री राजेश घासकडवी यांच्या प्रतिसादात नेमकं "विनोदी" काय आहे ?
हे तर कहर कुतुहल आहे.
आज तर पुरता गोंधळात पडलो राव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

यावर एक धागा काढा ना. सांगोपांग चर्चा होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बघ्या यांचा ब्लॉग - दुवा

समीक्षकांनी स्वतः थोर साहित्य लिहिलंच पाहिजे अशी अपेक्षा मला अवास्तव वाटते. समीक्षा हा स्वतंत्र लेखनप्रकारही मानता येईल, अशासारखं लेखन कधीमधी वाचायला मिळतं. उदाहरणार्थ, कुमार शहानींचा दिवाळी अंकातला ऋत्विक घटकांबद्दलचा लेख. (तो लेख सदर साफच समीक्षेत दुर्लक्षिला गेला, ही निराळी गंमत.) मी घटक आणि शहानी कोणाचाही एकही चित्रपट अजूनपर्यंत बघितलेला नाही, पण तो लेख वाचून मला दोघांचेही चित्रपट बघावेसे वाटले.

अंकातलं, मला खूप आवडलेलं लेखन काढायचं तर धनंजयचं 'विकल्पतरू', रोचनाने लिहिलेली 'उद्या'ची समीक्षा, नीधपची कथा 'खेळ', आदूबाळची कथा 'कुलुंगी कुत्र्याला मारहाण होते त्याची गोष्ट', आणि चार्ल्स कोरियांचा लेख 'सूर्यप्रकाश, अवकाश, वास्तुरचना आणि आपण' अशी पाच धाग्यांची यादी करेन. इतर बरंच लेखनही आवडलं, पण यादी काढताना 'राउंड फिगर'ची, माफक मर्यादा घालून पाचची यादी दिली. यांतल्या तीन धाग्यांचा समीक्षेत उल्लेखही नाही. पण हे व्यक्तिगत मत म्हणजे सांगोवांगीच्या गोष्टी; समूहाचं शहाणपण काढायचं तर यांतले निदान तीन धागेतरी उत्तम म्हणून निवडले जातील याबद्दल मला शंका नाही. (पण समूहाच्या शहाणपणाबद्दल, दिवाळी अंकातच, चिपलकट्टी प्रश्न विचारतात.)

मला दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ आवडलं. कपड्यांच्या सुरकुत्या सरळ करणाऱ्या इस्त्रीला खिळे असणं, यातला डँबिसपणा भावला. नात्यांची गुंतागुंत सुचवणारं पार्श्वभूमीचं न्यूरॉन्ससारखं जाळं आणि वस्तू सांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नट-बोल्ट, स्क्रूंचा पसारा, गडबडगुंडा या घटकांची योजना यात खेळकर कल्पकता आहे; नात्यांमधली ओढाताण आणि तरीही माणसं हवीहवीशी वाटणं, यासारखीच. या चित्राबद्दल समीक्षेत एकही शब्द नाही. ना आतल्या, लेखांवर असणाऱ्या चित्रांबद्दल. ह्याबद्दल थोडं आश्चर्य वाटलं. कदाचित त्याचं उत्तर लेखनाच्या पहिल्याच वाक्यात आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल जिव्हाळा असेल तर त्यात चांगलं काय दिसलं याबद्दल भरभरून बोलणं किंवा नावडलेल्या गोष्टींबद्दल होणारा सात्विक संताप नैसर्गिकरीत्या व्यक्त होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दिवाळी अंकातील लेखांचे लेखक किंवा मालक-चालक/ संपादक-मंडळ-सदस्य यांच्या प्रतिक्रियांमधील सूर डिफेन्सिव्ह का वाटतोय? एकदा दिवाळी अंक प्रसिद्ध केला की लोक त्याच्याकडे कुठल्या चष्म्यातून पाहाणार हे तुम्ही ठरवू शकत नाही. त्याच प्रमाणे त्यांनी अंकातल्या कुठल्या भागावर फोकस करावं यावरही अंकाचे कर्ते म्हणून तुमचं काहीही नियंत्रण नाही. सुरुवातीपासूनच ऐसीच्या विशेषांकांचं स्वरूप, त्यातला आशय आणि त्याच्या संकल्पना हटके असतात असं निरीक्षण आहे. असं असताना हा डिफेन्सिव्ह सूर म्हणजे स्वतः चाकोरीबाहेरचे आहोत हे मान्य असूनही 'आम्हाला चाकोरीत असलेल्या इतरांसारखं जज केलं नाही' असं म्हटल्यासारखं वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> स्वतः चाकोरीबाहेरचे आहोत हे मान्य असूनही 'आम्हाला चाकोरीत असलेल्या इतरांसारखं जज केलं नाही' असं म्हटल्यासारखं वाटलं

'चाकोरीत असलेल्या इतरांसारखं जज करणं' ह्या शब्दप्रयोगाचा अर्थ कळला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चाकोरीतल्या दिवाळी अंकांसाठीचे पॅरॅमीटर्स वापरून...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चाकोरीतल्या दिवाळी अंकांसाठीचे पॅरॅमीटर्स वापरून

म्हणजे कोणते पॅरामीटर्स?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी जे लिहिलं ती समीक्षा नाहीच, परीक्षणसुद्धा नाही. पण उपलब्ध टॅग हेच होते!
एक प्रकारे, मला जे वाटलं ते माझ्या गृहीतकांसह (जे माझे पूर्वग्रहही असू शकतात) ते मी (थोडं अस्ताव्यस्तच) लिहायचा प्रयत्न केला. माझ्या लिखाणात (म्हणजे जे काही थोडके आहे ते) मी शक्यतो मला वाटतं अशा प्रकारचे शब्दप्रयोग करतो. ह्याचं कारण म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी काही सार्वत्रिक सत्याला हात घालू शकेन, विशेषतः माणसांच्या वर्तनाच्या, त्यांच्या कृतीच्या स्पष्टीकरणाबद्दल, किंवा सौंदर्य किंवा चांगले-वाईट अशा अशांबद्दल, असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे मी मुळात अशी साक्षेपी किंवा सरासरी भूमिका घेऊन काही लिहूच शकलो नसतो. कदाचित माझ्या 'परीक्षणाची' किंवा रिमार्क्सची ही भूमिका मी नीट मांडली नाहीये. ही गफलत मला जाणवली आहे.
मी ज्या काही गोष्टींबाबत विचार करत असतो त्यात मला थोडीफार समज येते. पण काही कृती त्याच्याबाहेर आहेत. चित्र, शिल्प, संगीत ह्यांचा अनुभव मी घेऊ शकत असलो तरी त्याची चांगली उकल मला होत नाही, केवळ आनंदाचा अनुभव येतो किंवा काहीवेळेला (जसं नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये फिरताना) तोही येत नाही. कदाचित ह्या कृतीच्या निर्मात्यांशी, मला ह्या कृतींची निर्मिती कशी असेल हे काळत नसल्याने मला जोडता येत नाही. मला आनंदाचा अनुभव आला तरी मी त्याच्याबद्दल काही बोलू शकणार नाही आणि मला नाही आवडलं म्हणजे ते चूक असंही नाही, पण मी त्यावर काही टिप्पणी करायचा प्रश्न येत नाही. अंकातल्या काही गोष्टींबाबतही माझं असंच झालंय. जिथे असं झालं नाहीये, तिथे मला जे वाटतं, ते मी त्रोटक मांडलं आहे.
आता मी एवढे 'शहाणे' वाटावेत असे शिक्के मारतो आहे तर मी असा काय करतो आहे हा प्रश्न मला बिलकूल जायज वाटतो. आणि मी त्याला पुरा किंवा अपुरा पडलो आहे ह्याची जजमेंट तुम्हीच करू शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंकाच्या समीक्षेबद्दल आभार आणि वाचकांच्या प्रतिक्रियेवर व्यक्त होण्याविषयीही. मला प्रतिसादातला हा परिच्छेद रोचक वाटला -

>> चित्र, शिल्प, संगीत ह्यांचा अनुभव मी घेऊ शकत असलो तरी त्याची चांगली उकल मला होत नाही, केवळ आनंदाचा अनुभव येतो किंवा काहीवेळेला (जसं नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये फिरताना) तोही येत नाही. कदाचित ह्या कृतीच्या निर्मात्यांशी, मला ह्या कृतींची निर्मिती कशी असेल हे काळत नसल्याने मला जोडता येत नाही.

अंकातले काही लेख हे कलानिर्मिती किंवा कलाशिक्षणाबाबतच आहेत. उदा. कोलते यांचा पळशीकरांविषयीचा, शहानी यांचा घटकांविषयीचा, मुकुल शिवपुत्र यांचा कुमारांविषयीचा आणि कोरिया यांचाही. तुमच्या वर उल्लेख केलेल्या अडचणींच्या संदर्भात अशा प्रकारच्या लेखांचा तुम्हाला काही उपयोग होतो का, ह्याविषयी मला कुतूहल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दिवाळी अंकावरचा लेख हा काहीसा "बोल्ड ब्रश स्ट्रोक्स" सारखा वाटला. त्याच प्रकल्पात सामील असलेल्या सन्जोपराव यांनी, उदाहरणार्थ, त्यांनी निवडलेल्या अंकातल्या एकेका लेखावर एकेक अभिप्राय देण्याचा मार्ग अवलंबला आहे. यात त्यांनी अंकाची परंपरा, यंदाच्या दिवाळी अंकाचा त्या परंपरेशी असलेला-नसलेला मेळ, एकंदरीत त्या प्रकाशनाचं स्वरूप यावर काही लिहिलेलं आठवत नाही. बघ्या यांचा लेख अगदी उलटा म्हणता येईल. त्यांनी, आपण अंकातला लेखन् लेख कव्हर केलेला नसल्याचं म्हण्टलेलं आहे. आणि मूळ लेखात नि त्यांच्या वरच्या प्रतिसादामधे म्हण्टल्याप्रमाणे, ऐसी दिवाळी अंकाचा मूड पकडण्याचा, काही गोष्टींची वर्गवारी करण्याचा - त्यांच्या भाषेत रकान्यात टाकण्याचा - आणि एकंदर ऐसीअक्षरेच्या प्रकृतीच्या संदर्भात प्रस्तुत अंकाला ठेवून तपासण्याचा प्रयास केलेला आहे.

अशा प्रकारच्या तपासणीमधे काही डीटेल्स सुटून जातात. काही मुद्दे राहून जातात. पण कदाचित असं विहंगमालोकन करताना, "आतल्या" लोकांना दिसणार नाही, किंवा चटकन जाणवणार नाही असे मुद्दे/निरीक्षणं येतात. ती आलेली आहेत. "जेनेटिकली मॉडिफाइड फुलांचं एलीट अत्तर" या शीर्षकाला मी दाद देतो. मात्र, काहीकाही वाक्यरचना मला नीटशी समजली नाही, माझ्याकरता ती संदिग्ध होती. मूळ लेखातलं शेवटचं वाक्य असं :

"कथा, कविता, अधिक लांबीचं फिक्शन ह्यांवर काम करणाऱ्या लोकांना चोखंदळ संपादन पुरवणं आणि दुसऱ्या प्रतलावर, अधिक स्ट्रक्चर्ड असलेल्या आणि निव्वळ उष्णता निर्माण करण्यापेक्षाही काहीएक प्रकाश पाडण्याच्या दृष्टीने बनणाऱ्या वैचारिक लिखाणाचं चोखंदळ संपादन आणि प्रसार - ह्या दोन दिशांना 'ऐसी अक्षरे' जाऊ शकेल काय?"

यामधे, "कथा, कविता, अधिक लांबीचं फिक्शन ह्यांवर काम करणाऱ्या लोकांना चोखंदळ संपादन पुरवणं" हे ऐसीअक्षरेमार्फत केलं जातंय का ऐसीअक्षरेने हे केलं पाहिजे याचा नीटसा बोध झाला नाही. प्रकाश-उष्णता यामागे नक्की काय म्हणायचं होतं ते पुरेसं समजल्यासारखं वाटलं नाही.

असो. मूळ लेखकाने इथे हा लेख आवर्जून दिला आणि इथल्या एकंदर प्रश्नोत्तरांमधे सामील होण्याचा दिलदारपणा दाखवला हे मला विशेष आनंदाचं वाटतं. एकमेकांशी संपर्क न ठेवतां आपापली कामं करण्याच्या एकंदर पॅटर्नमधे अशा प्रकारचा cross-platform approach दिलासा देणारा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.