न्यूयॉर्क शहरातील ‘ थॅंक्स गिव्हींग डे परेड ‘

न्यूयॉर्क शहरातील ‘ थॅंक्स गिव्हींग डे परेड ‘
अमेरिकेच्या २०१३ च्या पहिल्या भेटीत ४ जुलैच्या ' अमेरिकन स्वातंत्र्य दिनानिमित्त " MACY “ या अमेरिकन डिपार्ट्मेंटल स्टोअर्स कंपनीतर्फे सादर केला जाणारा, हडसन नदीच्या कांठावर, न्यूयॉर्क शहरातून ' FIRE WORKS '
( आकाशात केली जाणारी शोभेच्या-दारुची आतिषबाजी ) पहाण्याचा योग आला होता.
अमेरिकेच्या दुसर्‍या भेटीत, त्याच कंपनीतर्फे २४ नोव्हेंबर २०१६ रोजी न्यूयॉर्क शहरात मोठ्या दिमाखात " थॅंक्स गिव्हींग डे परेड " समक्ष पहाण्याची संधी चालून आली होती. सुमारे चार किलोमिटरचा प्रवास करणारी ही परेड असल्याने, अमुक एके ठिकाणाहुनच पहावी लागेल अशी गरज नव्हती. न्यूयॉर्क शहराच्या सेंट्रल पार्क (पश्चिम) च्या बाजुच्या रोड पासून सुरु होऊन, कोलंबस सर्कलच्या कडेकडेने पुढे सिक्स्थ अवेन्यु ( सेंट्रल पार्क (दक्षिण) व ३८ स्ट्रीट ) येथे परेडची सांगता होणार होती. सर्वांना नि:शुल्क प्रवेश होता.या उलट आयोजकांचे म्हणणे होते की, तुम्ही जर लवकर याल(म्हणजे सकाळी सहा वाजेपर्यंत ! ) तर तुम्हाला पुढे उभे राहून, कोणाचाही अडथळा न येता, परेड पहाता येईल. अमेरिकेत पाऊस कधी येईल याचा भंरवसा नाही. त्यामुळे त्या दिवशीचा हवामानाचा अंदाज अगोदरच घेतला गेला होता. पाऊस तर नसणार होता, पण आकाशात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता, स्थानिक हवामान खात्याने वर्तवली होती. पण तरीही आम्ही छत्र्या सोबत नेल्या होत्याच. ही परेड खुल्या वातावरणात रस्त्यावरून जाणार होती, उघड्यावर बोचर्‍या थंडीत उभे रहावे लागणार होते. त्यामुळे अंगावर थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून गरम कोट /जाकीट /कानटोपी / हातमोजे / बूट असा जामानिमा करून आम्ही निघालो. कितीही ठरविले तरी माहवाह येथुन सकाळी ६.२० वाजता निघुन एका तासात, न्यूयॉर्क शहरात पोहोचलो. मोठ्या शहरात सर्वात अगोदर अडचण येते ती कार-पार्किंगची ! तशी ती येथेही होतीच. त्यातल्या त्यात मिरवणूक ज्या रस्त्याने जाणार होती, त्याच्या जवळचे पार्किंग शोधले. रस्त्यावर मधून मधून काही काही मिरवणूकीसाठी सजलेले कलाकार, पायी अथवा बसमधून जातांना दिसत होते.
वस्तुतः परेड सुरु होणार होती सकाळी ९ वाजता ! त्यामुळे आम्हास वाटले की बरं झालं, आपण फार लवकर आलो आहोत, पण मिरवणूक ज्या रस्त्यावरून प्रत्यक्ष जाणार होती, तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजुस, फूटपाथवर, आमच्याही अगोदर अनेकजण मोक्याची जागा धरुन बसले होते. काहींनी तर फोल्डिंगच्या चेअर्स आणुन मस्त ठाण मांडले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजुला, लोखंडी कठडे लावण्यात आले होते. पोलिस बंदोबस्त अगदी कडक होता. दर वीस फूटांवर दहा बारा पोलिसांचा गट उभा होता. काही महिन्यापूर्वी, फ्रान्स मध्ये जी घटना घडली होती, त्या पासून धडा घेऊन, पोलिसांनी, मिरवणूकीच्या रस्त्यांना जोडणार्‍या छेद रस्त्यांच्या मध्ये, मातीने भरलेले दोन दोन डंपर एकाच रांगेत लावून ठेवले होते. हेतू एकच की गर्दीमध्ये अतीरेक्यांनी ट्रक घुसवू नये. कारण एका इस्लामिक स्टेट्च्या इंग्रजी दैनिकात ही मिरवणूक म्हणजे " An Excellent Target " ( उत्तम संधी ) असे छापून आले होते. त्याशिवाय आकाशात सतत हेलीकॉप्टर्स घिरट्या घालतच होती. समोरच्या फुटपाथवर काहीशी मोकळी जागा दिसत होती, तिकडे जाण्यासाठी आम्ही ही प्रयत्न करुन पाहिला, पण छे, पोलिस अजिबात दाद देत नव्हते.नाही म्हणजे नाहीच. शेवटी थोडेसे इकडे तिकडे फिरून आम्ही त्यातल्या त्यात समोर कमी गर्दी होती अशा एका बस-स्टॉप च्या खाली, आमचे बूड टेकले. आमच्या समोर एक दोन रांगात लोक उभे होते.थंडी जाणवत होतीच. पण इतक्या थंडीतसुद्धा काही लहान मुले आपल्या पालकांसोबत अगदी मजेत बागडत होती. अधुन मधून बंदोबस्त करणारे वाहनातून जात होतेच. सर्वांचे लक्ष घड्याळ्याच्या काट्यांकडे लागले होते. आणि एकदम डावीकडून जल्लोष ऐकू आला. मिरवणूक सुरु झाली होती. देखावे पुढे पुढे येत होते. हेलियम वायूने टम्म फुगविलेले व सर्वसाधारण टीव्ही वरील लहान मुलांच्या आवडीच्या अशा वेगवेगळ्या प्रतिमांच्या रबरी प्रतिक्रुती रस्त्यांवर तरंगत येतांना दिसू लागल्या होत्या. त्या प्रतिमा हवेत तरंगत रहाव्यात म्हणून, त्यांच्या चारही बाजुंना दोर्‍या बांधल्या होत्या. रंगी-बेरंगी कपडे घातलेले किंवा एकाच रंगाचे व डिझाईनचे कपडे घातलेले कलाकार त्यात स्त्री-पुरुष-मुले-मुली अशा सर्वजण ह्या दोर्‍या धरुन, पुढे पुढे चालत होते. प्रत्येकाचा गट वेगवेगळा होता. काही शिस्तबद्ध अशा बॅंडच्या तालावर रांगेने जात होते. दर्शकांचे फोटो घेणे सुरुच होत
https://goo.gl/photos/Fm3KY9U6MFRytj1g8
https://goo.gl/photos/EJ695hoBdD4XjgYg7

ह्या मिरवणूकीचा पूर्व इतिहास शोधू गेले असता असे समजले की यंदाची ही नव्वदावी मिरवणूक होती. १९२० साली ' मॅसी ' या डिपार्ट्मेंटल स्टोअर्स चे सर्व नोकर, जे युरोपातून स्थलांतर करून अमेरिकेत आलेल्या पहिल्या पिढीचे प्रजाजन होते, त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली.अमेरिकेत आपला वारसा कायम रहावा म्हणून, युरोपात त्यांचे वाडवडिल थॅंक्सगिव्हिंगचा सण ज्या उत्साहाने साजरा करीत असत, त्याच उत्साहाने येथेही साजरा करण्याचे त्यांनी ठरविले. १९२४ साली नेवार्क येथील, मि.लुइस बम्बर्गेन यांनी बम्बर्गर स्टोअर पासून ही मिरवणूक सुरु केली. नंतर हीच प्रथा MACY डिपार्टमेंटल स्टोअरने पुढे सुरु ठेवली आहे. १९२४ च्या नाताळ सणापासून ही परंपरा सुरु आहे. ' मॅसी ' चे अनेक कर्मचारी विदूषक, काऊबॉय, आणि विविध अशा चित्र-विचित्र पोषाखात, नटून थटून्, बँडच्या तालावर, मोठमोठे देखावे तयार केलेल्या ट्रक्स वर वा पायी चालत चालत, मिरवणूकीत सामिल झाले होते. मॅनहटन शहराच्या हेरॉल्ड स्क्वेअर पासून हर्लेम पावेतो सहा मैलांची ही मिरवणूक होती. अर्थात ही मिरवणूक काढण्याचा ' मॅसी ' कंपनीचा हेतू असा होता की या निमित्ताने लोकांचे ' मॅसी ' डिपार्टमेंट स्टोअर कडे लक्ष जावे. एक प्रकारची ही खूप पैसे खर्च करून केलेली जाहिरात होती. आणि खरोखर कंपनीचा अंदाज खरा ठरला. सुमारे अडीच लाख लोकांनी ही मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली. आणि तेव्हांच कंपनीने ठरविले की ही " थॅंक्स गिव्हींग डे परेड " दर वर्षी लक्षात राहील अशा थाटामाटात काढायची. फक्त १९४२ ते १९४४ मध्ये खंड पडला, कारण द्वितीय महायुध्दामुळे हेलियम व रबराचा तुटवडा होता म्हणून.
https://goo.gl/photos/95wqqQ21PZfjngbX6
https://goo.gl/photos/ZYxKFbrYtdqtfj41A
२०१६ साली समक्ष पाहिलेल्या या परेडमध्ये , एकूण विविध प्रकारच्या १६ प्रतिमा ज्यात प्रामुख्याने थॉमस इंजीन्,टर्की,फ्रॉग्,,मिकी माऊस,ससा,मांजर,कुत्रा इ.इ.होत्याच.त्याशिवाय १६ देखावे, १००० च्या वर विदुषक,११०० च्या आसपास कलाकार, १६ मार्चिंग बँड्स, सामिल झाले होते. काही देखाव्यात गिटार, बर्फाने आच्छादित घर व झाडी, हॉटेल, सांताक्लोज दाखविण्यात आले होते. त्यातल्या त्यात न्यूयॉर्क पोलिस डिपार्टमेंट ( NYPD ) च्या बँडने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते. शिस्तबद्ध रितीने, एक एक देखावा नजरेसमोरून पुढे जात राहिला. अधुन मधुन ढगाळ वातावरण जाणवत होते, पण कलाकारांचा उत्साह पाहून्,थंडीचे भय राहिले नव्हते. दोन अडीच तासांचा हा सोहळा समक्ष पहाता आला याचा आनंद दर्शकांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता.
ज्यांना संपूर्ण मिरवणूक पहाण्याची इच्छा असेल त्यांनी तुनळी ( YouTube) वर खालील लिंक जरूर पहावी.
https://www.youtube.com/watch?v=J1i4n11Ia9g&t=6656s

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

थँक्स गिव्हिंगच्या सुट्ट्यांमुळे, ब्लॅक फ्रायडेच्या आगमनाच्या प्रतीक्षेमुळे एकदम फेस्टिव्ह वातावरण असते., मला फार आवडते ही परेड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0