Skip to main content

फक्त र्‍हस्व- मराठीचे संवर्धन?

इन्ट्रो: ऐसीवरचं हे पहिलंच गद्य लिखाण. मुळात मुम्बईकर असल्याने मराठीची जागोजाग विटंबना दिसून येते. तशात इन्टर्नेट. त्यावर स्माईलीची ठिगळं लावून फॉरवर्डले जाणारे भयानक म्यासेज. मजा अशी की हे संकेतस्थळ सापडलंय, ज्यात सातत्याने फक्त आणि फक्त शुद्धच लेखन केलं जातं. ह्यातली फोनेटिक टंकलेखन पद्धत झकासच आहे. आयाम अ‍ॅडिक्टेड टू धिस वेबसाईट्ट.

मुद्दा: मध्यंतरी आन्तरजालावर एका गृहस्थांशी संपर्क झालेला. (ह्या पिकल्या पानाचा देठ बराच पिवळा आहे.) तर, ह्यांची टूम अशी, की उगीच र्‍हस्व-दीर्घ च्या भानगडीत न पडता सरसकट सगळे उकार-ईकार र्‍हस्व घोषीत करावेत. ह्यासाठी ते आंतरजालावर भन्नाट प्रचारही करतात.
ह्याकारणाने, (म्हणे)
१. मराठीचं अधिककाळ संवर्धन होईल
२. टाईपसेट तयार करणे, छपाई इत्यादींमध्ये बराच वेळ आणि पैसा वाचेल
३. मराठी शिकायला/शिकवायला सोपी होईल
४. अमराठी लोकांनाही ब्यानर, अ‍ॅड वगैरेमध्ये दणादण मराठीत छपाई करून बरेच कार्यभाग साध्य होतील.
५. मुळात त्या र्‍हस्व-दीर्घमागे काही लॉजिक नाहीये, आणि असलंच तरी ते कालातीत नाही. (स्याडली, मुंबईतल्या जागोजागच्या भुमीपुजन सोहळ्याची सुचना वाचून मला ह्या सगळ्यात भयानक तथ्य वाटतंय.)

ह्यावर माझं मत जरी नकारात्मक असलं, तरी मुंबईत राहून प्रचण्ड जडवादी आणि ऑब्जेक्टीव्ह झालेल्या माझ्या मनास, हे मुद्दे अंशतः पटल्याशिवाय राहिलेले नाहीत. ह्यावर तार्किक चर्चा अपेक्षीत आहे. काळाची दिशा हीच आहे का? असेल तर अती अँटॅगॉनिस्ट राहून कोणाचंच भलं झालेलं नाहीये, हेही आलंच. त्याचबरोबर, स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यात अत्यंत पुसट अशी रेषा असते, हेही आमच्या दहावीला मराठी शिकवणार्‍या बाईंचं वाक्य लक्षात आहे.

नितिन थत्ते Mon, 26/12/2016 - 11:29

धागालेखाक गांगललेले दिसतात.

चेंज शुड नॉट बी ड्रिव्हन बाय टेक्नॉलॉजी. म्हणजे सावरकरांनी टाइपरायटर किंवा खिळे जुळवणारी प्रिंटिंग प्रेस डोळ्यासमोर इ ई या चिन्हांऐवजी अ या अक्षराला वेलांटी काढावी असे सुचवले होते. पुढे तंत्रज्ञान सुधारलेबदलले आणि टंकांची संख्या ही मर्यादा गळून पडली आहे.

राही Mon, 26/12/2016 - 13:05

In reply to by नितिन थत्ते

तंत्रज्ञान आणि परिस्थितीबदल हे परस्परावलम्बित आणि परस्परसापेक्ष असतात. कधी कधी नवीन सोपे, वापरकर्तानुकूल तंत्रज्ञान झटकन रुळून पूर्वीची पद्धत मागे पडते तर कधी कधी विद्यमान पद्धतीला अनुकूल असे नवे तंत्रज्ञान शोधले जाते.

१४टॅन Tue, 27/12/2016 - 09:07

In reply to by नितिन थत्ते

धागालेखाक गांगललेले दिसतात.

हॅट्स ऑफ! आणि हो, मी मान्यही केलेलं आहे ते.

तुमचा मुद्दा पटला. बाकी मुद्द्यांचं काय?

अजो१२३ Mon, 26/12/2016 - 13:09

आपण वापरत असलेल्या भाषा हजारो वर्शे जुन्या आहेत. त्यांचेकडून वेगळी कामे (फास्ट टंकलेखन, वॉइस टायपिंग, आय ए) करून घ्यायची असतील तर ते असंभव आहे. या भाषाच निकालात काढल्या पाहिजेत.
===========
तुम्हास जे अंशतः पटले आहे त्याचे मोठे शास्त्र आहे.

१४टॅन Tue, 27/12/2016 - 09:03

In reply to by अजो१२३

आयाम होपिंग की दॅट फर्स्ट लाईन वौज सार्कैस्टीक.
===========
कुठले शास्त्र? अधिक माहितीच्या अपेक्षेत.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 11:27

In reply to by १४टॅन

There is absolutely nothing sarcastic in what I wrote. Our languages are useless tools for modern applications.
==============================
प्राचीन शास्त्रज्यांनी भाषा नावाचा शोध लावला. तो भाषा हा कंसेप्ट म्हणून आजही उपयुक्त आहे. पण मॉडेल? ते बदलायला हवं. मंजे कार ही संकल्पना काहीशे वर्षे जुनी असली तर आपण कार वापरू पण मॉडेल आजचे वापरू. १००-१५० वर्षांपूर्वीचे मॉडेल आजच्या जीवनशैलीला उपयुक्त नाही.
===================
नैसर्गिक ध्वनि वा नैसर्गिक उच्चारणे यांचे जे एकूणात शास्त्रीय वर्गीकरण आहे, त्यापासून आजच्या भाषा कोसो मील दूर आहेत. केवळ ध्वनिच नव्हे तर आशय, संरचना, शब्दप्रकार इ इ अनंत प्रकार मूळातच अशास्त्रीय प्रकारे वापरल्या जातात.

सुचिता Tue, 27/12/2016 - 14:01

In reply to by १४टॅन

आयाम होपिंग की दॅट फर्स्ट लाईन वौज सार्कैस्टीक.
-----–------------------------------------------------
हे कुठल्या द्रुष्टी ने शुद्ध लेखन आहे ?

बॅटमॅन Tue, 27/12/2016 - 21:44

In reply to by नितिन थत्ते

आयाम होपिंग की दॅट फर्स्ट लाईन वौज सार्कैस्टीक.

यात तीनवेळेस दीर्घ ईकार आहे. हे कस्लं गांगललेलं शुद्धलेखन?

राजेश घासकडवी Mon, 26/12/2016 - 19:12

त्यापेक्षा चांगला शुद्धिचिकित्सक का तयार करू नये?

२००० सालच्या आसपास इंग्लिशसाठी काही व्हॉइस टु टेक्स्ट करणारे प्रोग्राम आले होते. ते अतिशय वाईट होते. याउलट आता साध्या फोन्समध्ये जे व्हॉइस रेकग्निशन सॉफ्टवेअर असतं ते खूपच चांगलं असतं. गूगल सर्च करण्यासाठी मायक्रोफोनचं बटण दाबलं की बहुतांश वेळा आपण बोलतो तेच शब्द टाइप होतात. मराठीत हे आलं की या असल्या शुद्धलेखनाच्या चुका शंभरपट कमी होतील. दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारला पुतळ्यासाठी ३६०० कोटी खर्च करणं सहज शक्य होतं, मात्र मराठी भाषेची तांत्रिक प्रगती करण्यासाठी जे काहीशे कोटी खर्चावे लागतील ते करणं जड जातं.

बिटकॉइनजी बाळा Thu, 29/12/2016 - 10:23

In reply to by राजेश घासकडवी

गुगल आपले पत्ते खोलत नाहीय.

गुगलचे इंग्रजी वॉइस टू टेक्स्ट हे जवळपास बरोबर, सुधारित आणि सोयीचं आहे.
गुगलचे ट्रान्सलिटरेशन हे सुद्धा खूप बरोबर आणि उत्तम आहे.

मग : वरील दोन ठोकळे एका पुढे एक लावून (कॅस्केड) करुन उत्तम मराठी वॉईस टू टेक्स्ट करता येईल.

मराठीत बोला (ध्वनि) --> रोमनीकरण(अक्षरं) --> ट्रान्सलिटरेशन --> मराठी (लेखन)

चिमणराव Tue, 27/12/2016 - 18:40

जुन्या बादल्यांना बुडं घालून वापरण्याचं लोकांनी सोडून दिलं. नवीनच प्लास्टिकच्या घेतल्या.त्या मनुष्यास सांगा की बाबारे तू नवीनच भाषा बनव.

पिवळा डांबिस Wed, 28/12/2016 - 22:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचा जीव भांड्यात पडला!!!

तरीच म्हंटलं की शुद्धलेखनाच्या विरोधात कधी लिहीलं आम्ही?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 29/12/2016 - 01:11

In reply to by पिवळा डांबिस

स्वतःचं वय जाहीर करण्याचा क्षीण प्रयत्न!

पिवळा डांबिस Thu, 29/12/2016 - 10:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठी आंतरजालावर स्वतःचं पिवळेपण जाहीर करायचा लोक क्षीण का होईना प्रयत्न करतात हे गृहितक वाचून ड्वाले पानावले!!!
अन्यथा,
पोक्त पुरंध्री कुणीही नाही,
सगळ्या मुग्ध बालिकाच इथे|
फक्त तयांच्या मागून फिरती
त्यांच्या तारूण्याची भुते||
:)

ऋषिकेश Wed, 28/12/2016 - 09:48

परवाच काही मित्रांसोबत चर्चा झाली की देवनागरी जोडाक्षरांची उभी-मांडणी छपाईच्या सोयीसाठी सरकारने मोठा घाट घालून सर्वत्र एकसारखी आडवी केली. तोवर संगणक आले. मग त्याची गरज राहिली नाही मात्र सरकारी नियम म्हणून ते फॉलो होत असते.

===

धाग्याशी थेट संबंध नाही सहज आठवलं म्हणून टंकलं

बाकी सध्याच्या लिपी जालीय टंकनासाठी सोयीच्या नाहीतया अजोंच्या मतात दम आहे

तिरशिंगराव Wed, 28/12/2016 - 12:08

मुळात त्या र्‍हस्व-दीर्घमागे काही लॉजिक नाहीये,

दीर्घ हा शब्द दिर्घ असा उच्चारुन पहा म्हणजे काय लॉजिक आहे ते समजेल.
असे अनेक शब्द आहेत. वरचा फक्त वानगीदाखल.

धनंजय Thu, 29/12/2016 - 03:04

In reply to by तिरशिंगराव

माझ्या नेहमीच्या मराठी बोलण्यात दीर्घ/दर्भ पूर्ण/पर्ण एकाच ताला-लयीत येतात. तसेच पुत्र/सूत्र. तसेच मित्र/जीर्ण. र्‍हस्व/दीर्घ असा उच्चारी लांबीचा फरक स्पष्ट कळत नाही.

संस्कृतात मी वरील सर्व उदाहरणांत र्‍हस्व-दीर्घ ह्रस्व 'अ', इ/ई, उ/ऊ असा उच्चारी लांबीचा फरक स्पष्ट करतो (म्हणजे माझ्या जिभेला जमते), पण मराठीत मात्र तसे आपोआप नाही. (मुद्दामून संस्कृतासारखे मराठीत बोलू शकतो, पण मग ऐकायला कृत्रिम वाटते.) मराठीत मराठीतले हे काय स्वाभाविक हेल आहेत (म्हणजे अन्त्य/उपान्त्य दीर्घ, सामान्यरूप, वगैरे) ते आपोआप उच्चार होतात. विचार-प्रयत्न न करता प्रमाणबोलीस योग्य तेच उच्चार होतात. म्हणजे त्याही बाबतीत र्‍हस्व-दीर्घाबाबत जीभ वळते.

"दीर्घ/दिर्घ" हे उदाहरण आपोआप उमटणार्‍या भाषेतून मलातरी समजत नाही, त्याचे लॉजिक स्पष्ट नाही - आणि हे "जिभेला जमत नाही" किंवा अशा कुठल्या अपंगत्वामुळे नव्हे.
---
त्यापेक्षा बरे उदाहरण पीता (पिणे क्रियापदाचे रूप) विरुद्ध पिता (बाप)

कोणाकडून तरी अभावितपणे "दारू पीता पिता नको" असे काहीतरी वदवून बघितले पाहिजे. म्हणजे अगदी लक्ष न देता बोलताना दीर्घ (पीता) आणि र्‍हस्व (पिता) असा फरक लोक करतात का? ते ध्वनिफितीवरून मोजमाप करून बघितले पाहिजे. कारण मुद्दामून म्हणायचे, तर आपण लक्षपूर्वक फरक करू. किंवा कोणी एक म्हणेल - मी करतोच फरक, दुसरा म्हणेल, नाहीच अरत फरक - ते मग नको इतके व्यक्तिनिष्ठ होऊ लागते.

धनंजय ह्यांच्याच मराठीतील शुद्धलेखनः थोडासा गुंतागुंतीचा प्रश्न ह्या धाग्यामध्ये मी पुढील व्यक्तिगत प्रतिक्रिया दिली होती. तीच येथे पुनः चिकटवत आहे:

माझे सर्व शाळेपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मराठीतील आहे तरीहि मलाहि पाणिनि, पतंजलि, कवि, गति, गुरु, पटु हे आणि असे शेकडो शब्द असेच पाहायची आणि उच्चारायची सवय झाली आहे. कोणी 'कवी' म्हटले की मला अंगावर पाल पडल्यासारखे वाटते. शिकण्याच्या दिवसात मी हे शिकून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा मला आनंद आहे. ह्याला अर्थातच थोडे प्रयत्न आणि कष्ट घ्यावे लागतात पण शिकण्याच्या दिवसात प्रयत्न आणि कष्ट करायचे नाहीत तर केव्हा करायचे?
तेव्हा मला असे वाटते की जे जमत नाही असे वाटते ते सोडून द्या असे उत्तेजन पुढील पिढीला देण्याऐवजी 'जमत नाही तर प्रयत्न करून जमवा' असे आपण त्यांना सांगितले पाहिजे, अन्यथा ही backsliding ची सवय जीवनशैलीच बनते. येणारे दिवस सुशिक्षिततेला अधिक महत्त्व देणारे होत आहेत. Backsliders आणि taking-it-easy types, व्यक्ति काय किंवा देश काय, त्यात मागे पडतील हे स्पष्ट दिसत आहे.

धनंजय Thu, 29/12/2016 - 07:41

In reply to by अरविंद कोल्हटकर

(हा सुरुवातीचा भाग औपरोधिक नाही, पुढे औपरोधिक भाग सुरू होतो, तिथे सांगितलेले आहे : )

आपल्याला "हे लोक माझ्या मते ठीक बोलत आहेत" असे पटते, अशी दूरदर्शनवरील किंवा सिनेमातील चित्रफीत यूट्यूबवर शोधावी. उदाहरणार्थ साधारण १९३५ साली जन्मलेले एक साहित्यिक पु. ल देशपांडे यांची पुढील चित्रफीत घ्या (भाषण १९९० दशकातले असावे.). हे एक जाहीर भाषण आहे, त्यामुळे अगदीच घरगुती घिसाडघाईचे उच्चार नाहीत. सुरुवातीला थोडे ऐकून ठरवा - यांचे उच्चार ठीकठाक सुशिक्षित (बॅकस्लायडिंग नव्हे अशा सुशिक्षित) बोलीतले आहेत का? अंगावर पाल पडल्यासारखे शहारे येत आहेत का?

https://www.youtube.com/watch?v=dOjSsHKqmug&index=22&list=PLb1cUq6hIVBF…

मग पुन्हा एकदा काळजीपूर्वक संस्कृतात-ह्रस्व-इकारान्त शब्दांच्या उच्चाराकडे लक्ष देत ऐका. उदाहरणार्थ सुरुवातीच्या २ मिनिटांत संस्कृतात-"क्रांति" शब्द येतो. साधारण ३मिनिट १ सेकंद आणि ३ मिनिट ३ सेकंदच्या मध्ये कुठेतरी संस्कृतात-"महाकवि" हा शब्द उच्चारलेला ऐकू येतो. विशेष म्हणजे हे शब्द प्रथमा एकवचनात आहेत, म्हणजे सामान्यरूप नाही. मराठीत हा भाषक र्‍हस्वान्त उच्चार करतो, की दीर्घान्त? (दीर्घान्त करतो.)

पु ल देशपांडे कदाचित सुशिक्षित बोलीत बोलत नसतील, तरी शोधल्यास मागच्या पिढीतील तुम्हाला प्रमाणबोली बोलणारे कोणीतरी भाषणकर्ते यू ट्यूबवर सापडतीलच. (मला १९४०चा "संत ज्ञानेश्वर" चित्रपट सापडला, त्यात २८:०२-२८:०३ ठिकाणी संस्कृतात-"शुद्धि" प्रथमा एकवचनात सापडतो. नट दीर्घान्तच उच्चार करतो. काळजीपूर्वक ऐकले, तर असे कित्येक प्रयोग सापडतील.) तुम्ही तपासून बघा, की दीर्घान्त उच्चार तुम्हाला खरोखरच खटकतात का?
https://www.youtube.com/watch?v=J2736UvG4-M&index=26&list=PLHIsqHZb57sg…

तुम्ही कौटुंबिक गप्पा मारत असताना स्वतःचे ध्वनिमुद्रण करावे. याची कुटुंबाला गंमत वाटते, हा निखळ आनंद. आणि पुष्कळदा "आपण अमुक असे लेखी उच्चार करतो, की बाकीच्या लोकांशी मिळून-मिसळून वागताना त्यांच्यासारखेच उच्चार करतो?" हा प्रश्न ध्वनिमुद्रण ऐकताना सोडवता येतो.

---
(औपरोधिक लेखन येथपासून सुरू)

बहुसंख्य सुशिक्षित मराठी लोक जसे बोलतात तसे बोलायला, कमीतकमी ऐकायला, शिकावे, असे फ्रन्टमूव्हिंग करण्याबाबत टेक-इट-ईझी-पणा का करावा?

लहानपणी शिकताना शिस्तीचे बाळकडू हवे असेल, तर एखादी परदेशी भाषा शिकायची (पण तिथले लोक सहज बोलतात, तसा उच्चार शिकायचा). म्हणजे आजूबाजूला कोणीही बोलत नाहीत तसे उच्चार शिकण्याचा तप-त्रास-शिस्त सगळे फायदे मिळतात. पण मग त्या देशात गेल्यावर लोक सहज (काही त्रास न घेता) बोलतात ते चुकीचे आहे, म्हणण्याचा मोह सुद्धा टळतो.

माझ्या शाळेतल्या फ्रेंच शिक्षिकेने कोणीही फ्रेंच-स्वभाषक बोलत नाही अशा प्रकारचे उच्चार आम्हाला शिकवले. खूप शिस्तीत घोटवून शिकवले. "जे स्विस डान्स ला साले डे क्लासे", वगैरे. त्यानंतर मी हल्ली फ्रेंच ध्वनिमुद्रणे ऐकून उच्चार बदलले आहेत. मूळ फ्रान्समधले लोक बॅकस्लायडिंग करत जे काय आईबापांकडून ऐकतात ते शिकतात, त्यांची निर्भर्त्सना करून मला शाळेत शिकवले, तेच खरे म्हणायला हवे होते काय?

मला तुमचा "टेकिंग इट ईझी"चा मुद्दा समजत नाही. आणि "बॅकस्लायडिंग"चा मुद्दा सुद्धा समजला नाही. मराठी भाषा बहुतेक जशी लोक बोलतात, ती तुमच्याकरिता एक परदेशी भाषा आहे - मला फ्रान्समधील आळशी लोकांची फ्रेंच आहे तशी. तुम्ही लहानपणी खूप त्रास घेऊन शिकलेली भाषा माझ्या "जे स्विस डान्स ला साले डे क्लासे" सारखी एक विशेष भाषा आहे.

टेकिंग इट ईझीचा मोह सोडला, प्रयत्न केला, सराव केला, तर बाकीचे आळशी मराठी लोक बोलतात तसे "कवी" म्हणणे जमू लागेल. (मलाही सरावाअंती "झ स्वि दाँ ला साल् द् क्लास्" असे आळशी फ्रेंच लोकांसारखे म्हणायला जमू लागले आहे.) किंवा ऐकणे तरी जमू लागेल. आणि एका अवघ्या प्रांतात सदानकदा, पु ल देशपांडे यांचे भाषण ऐकतानासुद्धा, पाल पडल्यासारखे किळसेत वावरण्याची वाईट परिस्थिती टाळता येईल.

---

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 29/12/2016 - 06:05

मला प्रमाणलेखनाची तुलना स्वयंपाकाशी आणि खाण्यापिण्याशी करावीशी वाटते.

मला प्रमाणलेखन आणि स्वयंपाक-खाणंपिणं यांत फारशी गती नाही. भाजी चिरायची, फोडणी करायची, त्यात भाजी ढकलून द्यायची, गॅस बारीक करायचा, गरज असेल तर भाजीत थोडं पाणी घालावं आणि आपण आपली कामं करून अर्धा-पाऊण तासानं परत येऊन गॅस बंद करावा. मी हे असं अन्न दिवसेंदिवस खाते. पण म्हणून इतर कोणत्याही पद्धतीनं भाज्या बनवूच नयेत आणि/किंवा माझ्याच पद्धतीच्या भाज्या सर्वश्रेष्ठ असतात असा दावा कोणी केल्यास मी त्याला कडाडून विरोध करेन. मी माझ्या घरी लोकांना जेवायला बोलावते तेव्हा मी आळशीपणे केलेला स्वयंपाक वाढत नाही.

गांगलांना ज्या पद्धतीनं लिहायचंय त्या पद्धतीनं त्यांनी लिहावं. आहे ती, सर्वमान्य, प्रतिष्ठित पद्धत सोडून ही नवी पद्धत सगळ्यांनी वापरावी हा हट्ट मला तुघलकी वाटतो. हा हट्ट विनोद म्हणून मला आवडतो; पण त्या पलीकडे मला त्याचा कंटाळा येतो. अशा प्रकारे केलेलं लेखन बघून, वाचून नव्हे, बघूनच माझे डोळे दमतात. मी ते वाचण्याचा प्रयत्नही करत नाही. गांगलांचे फार पाठीराखे आहेत असं आंतरजालावर दिसत नाही. त्यांचं जे काही लेखन वाचलंय, त्याची मांडणी फार जुनाट आणि बाळबोध आहे; त्यामुळे त्यांच्या हट्टाची भीती मला वाटत नाही. (अर्थात हे व्यक्तिगत मतच आहे.)

प्रमाणलेखनाची अॅप्स आली की मराठीच्या इतर बोली लयाला जातील का काय, अशी भीती मला वाटते. प्रमाणलेखन कोशाचं संस्थळ बनलं तरीही त्यामुळे इतर बोलीभाषा विरण्याची भीती वाटत नाही. नवीनतम तंत्रज्ञानाचा रेटा प्रचंड असतो.

'न'वी बाजू Thu, 29/12/2016 - 06:25

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रमाणलेखनाची अॅप्स आली की मराठीच्या इतर बोली लयाला जातील का काय, अशी भीती मला वाटते.

प्रमाणलेखनाची अॅप्स आली तर मराठीच्या इतर बोली लयाला कशा काय जातील ब्वॉ?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 29/12/2016 - 06:37

In reply to by 'न'वी बाजू

भारतीय लोकांत जसं इंग्लिश बोलणं म्हणजे थोर असं समजलं जातं, तसं मराठी लोकांत प्रमाणबोली बोलणं थोर समजलं जातं. सध्या बरेच लोक मराठी/देवनागरी लिहिताना गूगल इनपुट वापरतात असं दिसतं. फोनवर टंकताना बहुतेकांचा ऑटो-करेक्ट मोड ऑन असतो. त्यात प्रमाणलेखन-प्रमाणभाषा आधी येईल, इतर बोली नंतर.

दुसरं भारतीय लोकांचा आंजा वापर पाहता, फोन, टॅबलेटवरून आंजावर येणारे लोक अधिक असतील असं सध्या दिसतंय. हे असंच राहिलं तर ऑटो-करेक्ट आणि फोनचा सजेशन-मोड सुरू ठेवून टंकणं, या गोष्टी अशाच राहिल्या तर प्रमाणलेखनाच्या अॅपमुळे लिहिलेल्या बोलीभाषा दिसणं आणखी कमी होईल. सध्या मला ते प्रमाण फार दिसतंय असं नाही, पण हा कदाचित सिलेक्शन इफेक्टही असेल.

'न'वी बाजू Thu, 29/12/2016 - 07:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतीय लोकांत जसं इंग्लिश बोलणं म्हणजे थोर असं समजलं जातं

हो हो. पण काय लायकीचं इंग्लिश लिहितात, तेही ठाऊकाय. त्यामुळे राहूच द्या.

तसं मराठी लोकांत प्रमाणबोली बोलणं थोर समजलं जातं.

डिट्टो.

सध्या बरेच लोक मराठी/देवनागरी लिहिताना गूगल इनपुट वापरतात असं दिसतं.

गूगल इनपुट बोले तो, तो जीमेलवर मराठी टैपताना वापरतात तो भयंकर प्रकार? ज्याच्यात सगळंच प्रेडिक्टिव असतं, आणि त्या प्रेडिक्टिवच्या बाहेरचं सरळसरळ फोनेटिक टैपायची सोय जवळपास नसतेच, तो? कल्याण असो.

फोनवर टंकताना बहुतेकांचा ऑटो-करेक्ट मोड ऑन असतो.

त्या ऑटो-करेक्टचं काही सांगू नका मला! मागे एकदा आमच्या बायकोनं तिच्या भावाच्या नव्यानव्या बायकोला वॉट्सॅप केला इंग्रजीतून, त्यात तिला खेचायचं म्हणून तिला संबोधताना मुद्दाम अमूकअमूक(तिचं नाव)-vahini असं रोमनमध्ये टैपलं, तर ऑटो-करेक्टनं त्याचं अमूकअमूक-vagina केलं. बरं झालं सेंड दाबण्यापूर्वी वेळीच लक्षात आलं ते. (सीरियसली. नॉट जोकिंग.)

त्यात प्रमाणलेखन-प्रमाणभाषा आधी येईल, इतर बोली नंतर.

दुसरं भारतीय लोकांचा आंजा वापर पाहता, फोन, टॅबलेटवरून आंजावर येणारे लोक अधिक असतील असं सध्या दिसतंय. हे असंच राहिलं तर ऑटो-करेक्ट आणि फोनचा सजेशन-मोड सुरू ठेवून टंकणं, या गोष्टी अशाच राहिल्या तर प्रमाणलेखनाच्या अॅपमुळे लिहिलेल्या बोलीभाषा दिसणं आणखी कमी होईल.

उलट मी म्हणतो की ऑटो-करेक्ट/सजेशन-मोडचा स्वैराचार/व्यभिचार असाच (वर दिलेल्या उदाहरणातल्यासारखा) सुरू राहिला, तर बोली भाषांचं सोडाच, पण प्रमाण मराठीच्याही भविष्याची मला काळजी वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 30/12/2016 - 00:39

In reply to by 'न'वी बाजू

प्रतिसाद देताना माझा मूड खूप सकारात्मक होता, एवढंच.

धनंजय Thu, 29/12/2016 - 08:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

र्‍हस्व-दीर्घ इ/ई उ/ऊ चिन्हांचे उच्चाटन गांगलांकडून होणार नाही. सोशल मीडियावरती जे अनेकानेक लेखक र्‍हस्व-दीर्घाकडे थोडेफार दुर्लक्ष करून लिहितात, त्यांच्याकडून व्हायची शक्यता जास्त आहे.

हे लेखक र्‍हस्वदीर्घाकडे दुर्लक्ष करत लिहू शकतात, यावरून एक कल्पना करता येते की बरेचसे वाचक या दोन-दोन-प्रकारच्या चिन्हांच्या फरकाकडे दुर्लक्ष करून लेखन वाचू शकतात, त्यांच्या डोळ्यांना त्रास होत नाही.

(गांगलांचे भाषाविज्ञान गंडलेले आहे, तरी योग्य भाषाविज्ञानाच्या विश्लेषणातून सुद्धा) मराठीत इ/ई उ/ऊ यांचे र्‍हस्वत्व किंवा दीर्घत्व अन्त्य/उपान्त्य वगैरे ठिकाणांवरून आपोआप बदलते. जीभ वळून जे र्‍हस्वदीर्घत्व आपोआप होते, त्याकरिता वेगवेगळी चिन्हे खर्च करायची काहीच गरज नाही. (म्हणजे मला या खर्चाचा फार त्रासही होत नाही, म्हणून मी वेगवेगळी वापरतो, तरी.)

जर भाषा लिहिणारे बहुतेक लोक दुर्लक्ष करू लागले, तर त्या दोन-दोन चिन्हांच्या वेगवेगळ्या जागा, हे शुद्धलेखनाचे नियम आपोआप बाजूला पडू लागतील. आणि भाषालेखनात अप्रमाण काय, प्रमाण काय, हे "भाषासमाजात प्रतिष्ठित कोण" यावरून ठरते. ज्यांचे लेखन अनेक वाचक आवडीने वाचतात, ते प्रतिष्ठित ठरतील, आणि एखाद-दोन पिढ्यांत र्‍हस्व-दीर्घ शुद्धलेखनाचे सध्याचे नियम जुनाट/आर्ष मानले जातील.

मला माझ्या आदल्या पिढीशी संवाद साधायचा आहे, म्हणून मी १९७०च्या शुद्धलेखनाच्या नियमानुसार लिहितो. पण मला माझ्या पुढच्या पिढीशी संवादही करायचा आहे. म्हणून जेव्हा सोशल मीडियावरती अर्थपूर्ण/मनोरंजक/विचारप्रवर्तक मजकूर लिहिणारे लोक र्‍हस्वदीर्घाकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा वाचताना मीसुद्धा र्‍हस्वदीर्घांकडे दुर्लक्ष करतो. ते लोक दुर्लक्षच करत आहेत, त्यामुळे त्यांना माझे १९७० काळचे शुद्धलेखनही समजू येईल, अशी मला खात्री वाटते. ... परंतु माझ्या हयातीत जर दोन-दोन चिन्हे उपटून एक-एकच चिन्ह वापरात येऊ लागले, तर ते नवे प्रमाण होईल. त्या नव्या प्रमाणाचे नव्या लेखनाकरिता मला काहीच तोटे दिसत नाहीत. आणि मी नव्याच्या पुढच्या नव्या पिढीशी लेखी संवाद साधताना त्यांच्या नव्या प्रमाण-शुद्धलेखनाचा सराव करणे शहाणपणाचे ठरेल.

>>भाषालेखनात अप्रमाण काय, प्रमाण काय, हे "भाषासमाजात प्रतिष्ठित कोण" यावरून ठरते.

सध्या जे प्रमाण म्हणून ठरले आहे तेही असेच ठरले आहे ना !! (नव्हता हे प्रमाण पण व्हता हे प्रमाण- संदर्भ: ती फुलराणी ).

आदूबाळ Thu, 29/12/2016 - 17:03

पण गांगलांची आयड्या सगळं र्‍हस्व करायची का आहे? सगळं दीर्घ का नाही? मराठीत दीर्घ उकार-वेलांट्या र्‍ह्स्वपेक्षा संख्येने जास्त वापरात असतील.