Skip to main content

फिजीकल रात्र

अजाणतेपणी तुझा देह खुडुन

निघुन गेलेल्या फिरस्त्याची

आठवण तुझ्यावर गोंदलेली असते,

’पेन ऑफ दि ख्रिसमस पास्ट’!

करुणाग्रस्त आणि अतृप्त मळवट

उत्कट डोळ्यांनी आतुर

असतात माझी वखवखलेली रंध्र

जमेल तितका प्राशुन घेण्यासाठी

तु़झ्या वेदनेचा फिसीकल फॉर्म

पुरलेल्या सगळ्या वेदना

उकरुन काढल्या तरी

एक रात्र पुरत नाही

गतकाळाचे आंधळे संदर्भ

ओरबाडुन गलबलायला.

तुझ्या माझ्यातली

दोन अजाण समदुःखी मुलं

अनुभुतीच्या असंबद्ध लयीने

ग्रासुन जातात,

या समागमाचे उगम शोधत.

गुंफलेली कोवळी वीण

तु सहज ओलांडुन जातेस

माझा शापित यक्ष.

मागे ठेऊन, ओंजळभर

सावल्यांचे चित्रविचित्र तुकडे.

जातं आयुष्य कोंदट होऊन,

नि:शब्द शुष्क निश्वासांनी.

अशातच दिशाहिन झालेल्या

स्मृतींची लक्तरें विचारतात,

'अनैतिक करुणा घेऊन उशाशी

त्वचा श्रुंगारुन घरंगळत

हे शरिर जातं रात्रीजवळ

की रात्र येते शरिराजवळ?'

ऋषिकेश Fri, 02/03/2012 - 09:03

वा! आवडली!
तुमच्या काहि कविता पुन्हा वाचत्या की अधिक आवडू लागतात.. त्यातलीच ही एक

अवांटरः तुम्ही केवळ मुक्तछंदातच लिहिता का?

............सा… Sat, 03/03/2012 - 19:38

>> तुझ्या माझ्यातली

दोन अजाण समदुःखी मुलं

अनुभुतीच्या असंबद्ध लयीने

ग्रासुन जातात,>>

क्या बात है

कविता काय किंवा कोणतीही कला काय ही वयक्तीक रीत्या अनुभवण्याची गोष्ट असते हे जरी मला मान्य असले तरी बर्‍याच कविता या खूप उघड उघड अर्थ असलेल्या असतात. पण आपल्या कविता मात्र तशा नसतात. आपल्या कविता खूप "इंटिमेट" आणि "मिस्टीकल" असतात. म्हणजे अनेकांना त्याच्या जीवनाचे प्रतिबिंब सापडेल अशा असतात.

आपण अमुक्तछंदातच नेहमी लिहावे असे वाटते. लयबद्धतेच्या नादात गूढता हरवू नये येवढीच इच्छा.