उद्याच्या मराठी भाषा दिनानिमित्त-
उद्या मराठी भाषा दिन. ऐसीवर काही पेशल असेल का माहीत नाही, पण मला बर्रीच मदत हवी आहे.
तर, उद्या एका कार्यक्रमात साधारण तीन कविता, त्याही कुसुमाग्रजांच्याच सादर करायच्या आहेत. माझ्याकडे त्यांचा एकही संग्रह नाही. मी गुगल गुगल गुगलून काही ठरवल्या आहेत.
१) गाभारा
२) समिधाच सख्या ह्या- विशाखा
३) निवारा अखेर कमाई
४) सर्वात मधुर स्वर मूर्तिभंजक
लढ, कोलंबसाचे गर्वगीत, प्रेम कर भिल्लासारखं ह्या कविता नक्कीच आधी सादर होतील ह्याची खात्री बाळगण्यास हरकत नाही. त्यामुळे हा धागाप्रपंच.
आता ह्यात गोची अशी, की, आधी अनुक्रमांक असलेल्या लोकांनी ह्या कविता आधीच सादर केल्या, तर आयुष्यात झोल होईल. त्यामुळे, जर कोणाकडे संग्रह-दुवे इ. च्या स्वरुपात, कुसुमाग्रजांच्या कविता असतील तर त्या इथे प्रतिमा/दुवा/शब्द स्वरुपात डकवणे. साधारण गुगल करून ज्या मिळतात, त्या नकोत. बी.जी.लिमये ह्यांचा सुप्रसिद्ध ब्लॉग चाळताना मला 'समिधाच सख्या ह्या' मिळाली, जी टेक्स्ट सर्च केल्यास मिळत नाही. अशी, युनिक विषयांवरची कविता मिळाल्यास अनेक आभार. अख्ख्या संग्रहाचा दुवा मिळवून दिल्यास, तुमच्यासाठी नक्की दुवा मागेन.
संपादितः कुठली कविता सादर करावी ह्यावर मत नोंदवल्यासही आभार.
आहाहा समिधाच सख्या या.....
आहाहा समिधाच सख्या या..... फार प्रभावी कविता आहे.
____
होय हा ब्लॉग मी पाहीलेला आहे.
_____
बाकी कवितांबद्दल माफ करा. माझ्याकडे नाहीत.
____ सापडली-
ब्लॉग - https://madhavikavishwar.wordpress.com/2014/01/09/kusumagraj-ek-krantikavi/
http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=060212122050&Pr... - इथे आहेत काही कविता
http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=060212013021&Pr...

.
_______
http://ek-kavita.blogspot.com/2006/12/blog-post_9098.html
अखेर कमाई - कुसुमाग्रज
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
___________________
सहानभूती - कुसुमाग्रज
सहानभूती
उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकान्ची होय दाट गर्दी
प्रभादिपान्ची फ़ुले अन्तराळी
दौलतीची नित चालते दिवाळी
कोपर्याशी गुणगुणत अन अभन्ग
उभा केव्हाचा एक तो अपन्ग
भोवतीचा अन्धार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला
जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसान्चा त्यात ही उपास
नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?
कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला
तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दिना त्या उभारुनी उर
म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी
खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिन बन्धू वाट
आणी धनिकान्ची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात.
स्वप्नांची समाप्ती स्नेहहीन
स्वप्नांची समाप्ती
स्नेहहीन ज्योतीपरी
मंद होई शुक्रतारा
काळ्या मेघखंडास त्या
किनारती निळ्या धारा
स्वप्नासम एक एक
तारा विरे आकाशात
खिरे रात्र कणकण
प्रकाशाच्या सागरात
काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत
रातपाखरांचा आर्त
नाद नच कानी पडे
संपवुनी भावगीत
झोपलेले रातकिडे
पहाटेचे गार वारे
चोरट्याने जगावर
येती, पाय वाजतात
वाळलेल्या पानांवर
शांती आणि विषण्ण्ता
दाटलेली दिशांतून
गजबज जगवील
जग घटकेने दोन!
जमू लागलेले दव
गवताच्या पातीवर
भासते भू तारकांच्या
आसवांनी ओलसर
काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत
प्राजक्ताच्या पावलाशी
पडे दूर पुष्परास
वाऱ्यावर वाहती हे
त्याचे दाटलेले श्वास
ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधी पूर्ती
वेड्यापरी पूजतो या
आम्ही भंगणाऱ्या मूर्ती!
खळ्यामध्ये बांधलेले
बैल होवोनिया जागे
गळ्यातील घुंगुरांचा
नाद कानी येऊ लागे
आकृतींना दूरच्या त्या
येऊ लागे रूपरंग
हालचाल कुजबूज
होऊ लागे जागोजाग
काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत
होते म्हणू स्वप्न एक
एक रात्र पाहिलेले
होते म्हणू वेड एक
एक रात्र राहिलेले
प्रकाशाच्या पावलांची
चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे
लागतील गडावर
ओततील आग जगी
दूत त्याचे लक्षावधी
उजेडात दिसू वेडे
आणि ठरू अपराधी
- कुसुमाग्रज (’विशाखा’)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
पाचोळा आडवाटेला दूर एक
पाचोळा
आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास
उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा
तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत
आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूरदूर कोठे
आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हे सुरांनो, चंद्र
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥
सरणार कधी रण प्रभू सरणार कधी
सरणार कधी रण प्रभू
सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी
दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरु देह परी
होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी
पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी
__ कुसुमाग्रज
ऋण पदी जळत वालुका वर उधाणलेली
ऋण
पदी जळत वालुका
वर उधाणलेली हवा
जळास्तव सभोवती
पळतसे मृगांचा थवा
पथी विकलता यदा
श्रमुनि येतसे पावला
तुम्हीच कवी हो, दिला
मधुरसा विसावा मला !
अहो उफळला असे
भवति हा महासागर
धुमाळुनि मदांध या
उसळतात लाटा वर,
अशा अदय वादळी
गवसता किती तारवे
प्रकाश तुमचा पुढे
बघुनि हर्षती नाखवे !
असाल जळला तुम्ही
उजळ ज्योति या लावता
असाल कढला असे,
प्रखर ताप हा साहता,
उरात जखमातली
रुधिर-वाहिनी रोधुनी
असेल तुम्हि ओतली
स्वर-घटात संजीवनी !
नकोत नसली जरी
प्रगट स्मारकांची दळे
असंख्य ह्रदयी असती
उभी आपुली देवळे
__कुसुमाग्रज
निरोप गर्दीत बाणासम ती
निरोप
गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान
लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात
बाजार येथे जमला बळींचा
तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी
चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?
एकाच शापातून सर्व जाती
निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे
"जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे"
ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!
__कुसुमाग्रज
झाड - कुसुमाग्रजएकदा
जालियनवाला बाग
रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"
आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !
पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तूं अपुले खास;
असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !
__कुसुमाग्रज
___________________
झाड - कुसुमाग्रज
एकदा मध्यरात्रीच्या नीरवेतून मी ऐकला होता एक भयानक चीत्कार पलिकडच्या परसात असलेल्या एका वृक्षाच्या काळ्याशार पानघुटमटातून उफ़ाळलेला.
कोणत्या तरी पक्षाची प्राणान्तिक किंकाळी जी फ़ोडीत गेली दहा दिशांच्या तटस्थ तावदानी काचा, भ्रमिष्टपणाने धावली सैरावैरा अंतराळात आणि कोसळली पुन्हा चेंदामेंदा होऊन त्याच वृक्षाच्या फ़ांद्यांतून साचलेल्या काळोखाच्या तळ्यामध्ये. नंतर त्या किंकाळीला फ़ुटत होते धुमारे चिणलेल्या पण तीव्र स्वरांचे, रात्रीच्या केसाळ काजळी त्वचेमध्ये घुसत होते अनकुचीदार झटके फ़ांद्यांतून फ़ुटणार्या अपस्मारांचे. सार्या जगाबरोबर झोपी गेलेले ते झाड अकस्मात झाले होते जागे कोठल्या तरी दानवी अत्याचाराने, आणि झाले होते स्वतःच एक अगतिक वेदनेचे वारूळ पृथ्वीच्या छातीतून उमाळलेले आणि शृतिहीन आकाशाला हाक मारणारे. देव जाणे काय घडले असेल त्या पानांच्या दुनियेमध्ये. आले असेल एखादे जहर काळे रानमांजर अमावास्येच्या योनीतून बाहेर सरपटलेले क्रूर चमकत्या नजरेतून ठिणग्यांचे बुंद डाळणारे एका फ़ांदीवरुन दुसर्या फ़ांदीवर ललसत्या नखाळ पंजांनी चडणारे. त्याने अचानक अखेरच्या तळावरुन घेतली असेल उशी टाकली असेल झेप उषःकालाचे राजवर्खी स्वप्न पाहणार्या एखाद्या निद्रिस्त गोजिरवाण्या पाखरावर. मृत्यूच्या करवती दातांत जागृत झालेल्या त्या पाखराने फ़ोडली असेल पहिली भीषण किंकाळी आणि तुकड्यातुकड्याने शरीर फ़ुटत असताना घातल्या असतील त्या व्याकूळ विझणार्या हाका भोवतालच्या विश्वाला. नसेल रानमांजर असेल कदाचित घुबडही असेल कदाचित एखादा अजगरी सर्प कृतान्ताचे विळखे घालीत बुंध्यावरुन सरकणारा, असेल काहीही; पक्षा-ऐवजी कुरतडली गेली असतील कदाचित त्याची पिलेही, पण एक खरे की त्या दहा मिनिटांच्या काळात परिसरातील एकाही वृक्षाचे एकही पान हालले नाही, काहीही शहारले नाही, काहीही उसासले नाही क्षणार्धात झाले पुन्हा सारीकडे शांत्–शांत! दूर झालो मी खिडकीपासून पुन्हा मोठा केला रेडियोचा मंदावलेला गाज आणि शिलगावला मेजावरचा दिवा. कोठल्या तरी केंद्रातील विलायती संगीताच्या इंद्रमहिरापी उभ्या राहिल्या माझ्या खोलीतील विषण्ण हवेवर, आणि प्रकाशाच्या सोनेरी रेषांनी त्यांना मिठी मारली माहेरवासी अधीरतेने; सावल्यात साखळेल्या भिंती मुक्त झाल्या त्यांनी धारण केले प्रचंड आकार पहाडासारखे आणि उभे केले माझ्या सभोवार एक स्नेहमय शक्तिशाली आश्वासन, आयुष्यात पहिल्यांदाच दिलासा वाटला मला की मी पक्षी नाही
- कुसुमाग्रज
________________
जोगीण
साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन
दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जाईन.
तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही
माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.
__कुसुमाग्रज
मराठी दिनाकरता ही झकास आहे
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दरयाखोर्यांतील शिळा.
हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात,
ज्यांच्या दुर्दम धीराने,
केली मृत्यूवरी मात.
नाही पसरला कर,
कधी मागायास दान,
स्वर्णसिंहासनापुढे,
कधी लवली ना मान.
हिच्या गगनात घुमे,
आद्य स्वातंत्र्याची द्वाही,
हिच्या पुत्रांच्या बाहूत,
आहे समतेची ग्वाही.
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगे जागतील,
मायदेशातील शिळा.
छानच!
अनेकवार धन्यवाद! पण जवळपास प्रत्येकजण हीच सादर करेल असं नाही तुम्हाला वाटत?
हा दुवा पहा. भन्नाट आहे.
Hope is for sissies.
त्रिवार धन्यवाद.
शुचि व आदूबाळ ह्यांस, त्रिवार धन्यवाद. विशाखा अख्खा संग्रह ऑनलाईन उपलब्ध आहे, तो मिळाला.
Hope is for sissies.