आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३)

भाग १
भाग २

भारतीपूरच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असते मंजुनाथाचे मंदिर. हा मंजुनाथ भारतीपूरच्या पंचक्रोशीत आपली सत्ता गाजवत असतो. त्यासाठी त्याचा सहाय्यक असतो भूतराया नावाचा देव. तो अंगात येतो आणि लोकांवर वचक ठेवतो. मंजुनाथ सर्वशक्तिमान पण निष्क्रिय असतो तर भूतराया सेवक पण क्रियाशील असतो. या भूतरायाची कीर्ती इतकी मोठी की प्रत्यक्ष राष्ट्रपती त्याच्या दर्शनाला येऊन जातात आणि प्रसाद म्हणून कपाळभर कुंकू माखून घेतात. भूतरायाचा प्रभाव एव्हढा मोठा की भारतीपूरमध्ये कोणीही आपले वाद विवाद कोर्टात घेऊन जात नाही. सगळे वादविवाद भूतरायच्या मर्जीने सुटतात. हे वाचताना मला शनी शिंगणापूरच्या घरांना दारे/ कुलुपे नसतात हे सत्य आणि तिथे चोऱ्या होत नाहीत ही समजूत आठवत होती.

इतके असूनही तीर्थस्थळी असते तसे गावभर घाणीचे साम्राज्य असते. सगळीकडे यात्रेकरूंच्या मलमूत्राचा वास भरून राहिलेला असतो. शिवमोग्याहून गावी येणाऱ्या बसमधून यात्रेकरू उतरले की गावातल्या ब्राह्मणांची त्यांना आपल्या घरी जेवण, स्नान आणि पूजेसाठी आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी लगबग चालू असते. हे वाचताना मला महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, माहूर आणि आंध्र प्रदेशातील राघवेंद्र स्वामींचे मंत्रालयम इथली परिस्थिती आठवत होती.

देवावर विश्वास नसलेल्या जगन्नाथने विश्वस्तपद नाकारल्याने ते प्रभूंकडे जाते. त्यांनी पूर्ण गावाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात घेतलेल्या असतात. मंजुनाथाच्या नावे चालणारी गावची एकुलती एक राईस मिल, एकुलती एक बस सेवा आणि वाणसामानाचे भलेमोठे दुकान त्यांच्याच मालकीचे असते.

पूर्ण गाव आपापल्या जातीच्या परिघात मंजुनाथ आणि भूतरायाच्या भोवती फिरत असते. त्याला गती देत असतो देशभरातून येणाऱ्या भाविकांचा ओघ आणि त्याला आधार असतो तो भूतरायाच्या जागृतपणाचा. जगन्नाथच्या शब्दात, भारतीपूरची संपूर्ण जनता म्हणजे मंजुनाथ आणि भूतरायाच्या उदरातंच जन्म घेऊन तिथेच जीवन संपवणारे लाखो गर्भ. त्यांनी प्रत्यक्ष जगात जन्म घेतलाच नाही. ते उदरातंच जन्मले आणि भूतरायाच्या नियमांनी बांधले जाऊन तिथेच त्यांनी जीवन संपविले. बाह्य जगाचे आयुष्य त्यांना स्पर्शदेखील करत नाही. आणि त्यांना त्याची जाणीवदेखील नसल्याने त्याचा खेद किंवा खंत काहीही नाही.

जुन्या जगात जन्माला आलेला जगन्नाथ, शिक्षणासाठी परदेशी जातो. तिथून आपल्या जडणघडणीतील अनुभवांची कमतरता जाणवून ती पूर्ण करण्यासाठी जन्मगावी परततो. आणि जीवन समग्रपणे जाणून घेण्यासाठी त्याला भिडायचे ठरवतो. त्यासाठी तो शूद्रांचा मंदिर प्रवेश करवून आणण्याचे ठरवतो. त्याच्या निर्णयामुळे त्याच्या घरात, गावात, ज्यांनी मंदिरप्रवेश करायचा आहे त्या शूद्रांच्या आयुष्यात आणि इतर समाजघटकांच्या आयुष्यात कुठली वादळे तयार होतात? राजकारणी लोक या सगळ्यावर कशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात? पोलीस कशी बोटचेपी भूमिका घेतात? मंदिर प्रवेशामुळे आर्थिक गाडा मोडू नये म्हणून कोण काय प्रयत्न करतात? स्वतःच्या जन्माबद्दल आलेल्या निनावी पत्रामुळे जगन्नाथाच्या मनात कोणते आणि कसे विचार येतात? आणि शेवटी काय होते? या सगळ्या प्रश्नांना अनंतमूर्तींनी फार कुशलतेने हाताळलेले आहे आणि त्याचा अनुवादही तितकाच अजोड झाला आहे.

पूर्ण कादंबरी वाचताना मला तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापूर, हाजी अली आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी स्त्रियांच्या मंदिरप्रवेशासाठी केलेल्या आंदोलनांची आणि त्यावेळी घडलेल्या विविध घटनांची आठवण येत होती. एखाद्या घटनेला मांडत असताना तिची स्थल काल आणि समाज निरपेक्षता मांडता आली तर तिलाच लेखकाची सर्वोच्च प्रतिभा म्हणत असावेत आणि भारतीपुरमध्ये अनंतमूर्तींनी मंदिरप्रवेश ह्या घटनेला वापरून भारतीय मनोवृत्तीचे जे प्रत्ययकारी चित्रण केले आहे ते पाहून, वाचकाला एकाच वेळी अतीव आनंददायी पण विस्मयचकित करणारा अनुभव येतो.

पण या लेखमालेचे उद्दिष्ट भारतीपूरबद्दल बोलणे नसून प्रो. टी पी अशोक यांनी लिहिलेल्या तिच्या प्रस्तावनेबद्दल बोलणे आहे. प्रस्तावनेत मांडलेला विचार समजण्यासाठी भारतीपूरची पार्श्वभूमी माहिती असेल तर सोपे जाईल, म्हणून नमनाला हे तीन भागांचे घडाभर तेल वाहिले आहे. आता पुढल्या भागात त्या प्रस्तावनेबाबत लिहितो.

भाग ४
भाग ५
भाग ६

field_vote: 
0
No votes yet